Home A परीचय A सृष्टीचे विविध स्वरूपी स्पष्टीकरण

सृष्टीचे विविध स्वरूपी स्पष्टीकरण

Galaxy
ही सृष्टी काय आहे, कशाकरिता अस्तित्वात आली आणि हिची नियमबद्ध कार्यव्यवस्था कशावर टिकलेली आहे? या प्रश्नांचे सामान्यतः चार स्वरूपात विश्लेषण करण्यात येत आहे.
  1. या सृष्टीची वास्तविकता ही एक भ्रामक कल्पना आहे.
  2. ही सृष्टी कधी निर्माण झालीच नाही. ती अनादी असून चिरकाल आहे.
  3. ही सृष्टी आपोआप निर्माण झाली आणि आपोआपच चालू आहे.
  4. या सृष्टीची निर्मिती एका असामान्य व जबरदस्त निर्माणकर्त्याने केली असून त्याच्याच नियमानुसार या सृष्टीचे प्रत्येक कार्य चालू आहे.
ही चार स्पष्टीकरणे अथवा भुमिकांचा संबंध इंद्रिये आणि शोध-साहित्याशी नसल्यामुळे सारख्याच दर्जाची आहेत. अशा वैचारिक भूमिकांचा आधार हा मानवी बुद्धीची विचारशक्ती आहे. विचार क्षमतांच्या पुराव्यांवरच ही चारही विश्लेषणे सिद्ध होऊ शकतात. हे खरे आणि खोटे ठरविण्याकरितासुद्धा विचारशक्तीचाच आधार घ्यावा लागतो. आता आपण एकेका वैचारिक भूमिकेवर स्वतंत्रपणे चर्चा करू या आणि पाहू या की, यातील कोणती विचारसरणी बुद्धिसंमत आहे, सृष्टीचे रहस्य उलगडण्यासाठी यात काय आहे आणि या भूमिका कोणत्या पुराव्यांवर आधारित आहेत आणि या पुराव्यांमध्ये किती सामर्थ्य असून यांच्या आधारांवर आपण कोणत्या निष्कर्षांपर्यंत पोहोचतो?
ही सृष्टी केवळ भ्रमाचा भोपळा आहे काय?
सर्वप्रथम आपण या पहिल्या वैचारिक भूमिकेवर चर्चा करू या. या विचारसरणीची भूमिका अशी आहे की, ही सृष्टी माणसाच्या भ्रामक कल्पनेतून निर्माण झाली आहे. म्हणून वास्तवाशी या सृष्टीचा काहीच संबंध नाही. मात्र आपण थोडा जरी विचार केला, तर या विचित्र भूमिका मांडणार्यांच्या विवेकशीलतेवर कीव येते, दया येते आणि रडावेसे किवा शोक करावेसे वाटते. कारण या ठिकाणी अगदी स्पष्टपणे वैचारिक पराभव पत्करल्यासारखे दिसून येते. ज्या वेळी आपण तत्त्वज्ञान आणि विज्ञानाचा अभ्यास करतो, त्या वेळी आपल्याला आपल्या बुद्धीक्षमतेवर अति विश्वास असतो. आपल्या ज्ञानावर खूपच जास्त भरवसा असतो. परिणामी कोणताही विचार न करता आपण बर्याच निराधार गोष्टींवर पटकण विश्वास करतो. नास्तिकतेवर विश्वास करणेसुद्धा याचाच एक भाग आहे. परंतु आपण जेव्हा तत्त्वज्ञान आणि विज्ञानाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करतो, तेव्हा आपल्या ज्ञान व माहितीचा गर्व आणि ज्ञानाभिमान आपोआपच गळून पडतो. असे वाटते की, आपण विनाकरणच असे समजत होतो की, आपले तत्त्वज्ञान आणि विज्ञान खूप पक्के होते. मात्र वस्तुस्थिती अशी की, आपले ज्ञानसामर्थ्य खरोखरच कमी पडले. आपले ज्ञान हे ज्ञान नसून केवळ वरवर पातळीवरील अथवा भ्रामक स्वरूपाचेच आहे आणि मग लगेच भ्रमाचा भोपळा फुटतो. एवढेच नव्हे तर केवळ शंकाकुशंका आणि कल्पनेसम आपले ज्ञान असल्याचे स्पष्ट होते.
आतापर्यंत असे वाटत होते की, शंका म्हणजे तत्त्वज्ञानाचीच पैदास. अनुभव आणि प्रयोगांती सिद्धप्राय असलेले विज्ञान मानवी बुद्धीत शंकाकुशंका आणि भ्रामक स्थितीस थारा देत नसून त्यामुळे माणसाला विश्वास आणि समाधान लाभते. परंतु या शतकातील होणार्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे विज्ञानजगताची परिस्थिती पार बदलून गेली. आता मात्र तत्त्वज्ञान आणि विज्ञान या दोन्हींपासून केवळ भ्रामक कल्पनाच आपल्या झोळीत पडत आहेत. तत्त्वज्ञान आणि विज्ञान या दोघांनी मानवाला शंकाकुशंका आणि भ्रामकतांच्या पाशवी जाळ्यात ओढले आणि यातून सुटकेचा मार्ग काही सापडत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, माणसाजवळ भ्रामक विचारांशिवाय काहीच नाही. वास्तविक ज्ञान हे केवळ ईश्वराजवळच असून विश्वास आणि समाधानाची फळे चाखण्याची संधी केवळ अशांनाच लाभते, ज्यांना ईश्वरीय ज्ञानावर विश्वास असतो. विज्ञानाच्या आधुनिक प्रगतीवर आपले मत मांडताना प्रख्यात वैज्ञानिक आणि भौतिकशास्त्राचे जगविख्यात तज्ज्ञ ‘जेम्स जेनिफर’ यांनी ‘रहस्यमय सृष्टी’ या पुस्तकात लिहिले आहे की,
‘भौतिकशास्त्राच्या आधुनिक विचारानुसार सृष्टीचे भौतिक वर्णन करणे मुळीच शक्य नाही आणि मला याचे कारण असे वाटते की, सृष्टीची प्रत्येक बाब अगर प्रत्येक विषय कल्पनांवर आधारित आहे.’
परंतु एक गोष्ट अशी आहे की, या सृष्टीशी संबंधित असलेले मानवी ज्ञान हे भ्रामक आणि कल्पनात्मक स्वरूपाचे आहे, तर दुसरीकडे मात्र अशी गोष्ट समोर येते की, ही सृष्टी म्हणजे केवळ भ्रम आणि कल्पना आहे. कोणत्याही प्रकारचे बाह्य अस्तित्व या सृष्टीस लाभलेले नाही. या दोन्ही गोष्टी परस्पर भिन्न आहेत आणि आपण यात फरक केला पाहिजे. पहिली गोष्ट खरी आहे. तत्त्वज्ञानाच्या माध्यमाने असो वा विज्ञानाच्या माध्यमाने मिळणारे ज्ञान असो, या ज्ञानाचा आधार विश्वास नसून कल्पनाच आहे. त्याचप्रमाणे तत्त्वज्ञान आणि विज्ञानात किती जरी प्रगती झाली तरी मानव भ्रम आणि कल्पनांच्या जंगलातून बाहेर येऊन विश्वासाचे लक्ष्य गाठू शकत नाही. या विश्वासपूर्ण ज्ञानाच्या प्राप्तीसाठी त्याला ईशवाणीवरच विश्वास ठेवणे आवश्यक ठरते. मात्र वर उल्लेख झालेल्या दुसर्या गोष्टीला कोणताच आधार नाही. ही द्वितीयोल्लेखित गोष्ट म्हणजे विचारकार्यापासून पळवाट काढणे होय. अर्थात सृष्टीचे रहस्य जाणून घेण्यासाठी कराव्या लागणार्या वैचारिक धडपडीतून पळवाट काढणे होय.
एखादी विचारसरणी किवा सिद्धान्त पडताळून पाहण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली ज्ञानात्मक आणि दुसरी कार्यात्मक बुद्धीच्या कसोटीवर पारखून आणि प्राप्त पुराव्यांना विवेकाच्या पारड्यात ठेवून वा त्यांचे वजन पाहून तपासण्यास ज्ञानात्मक पद्धती म्हणतात आणि एखाद्या विचारसरणी अगर उदाहरणास थोड्या वेळेपुरते खरे मानून या उदाहरणाच्या आधारावर प्रयोगाच्या माध्यमाने हे पाहावे की, हे खरे की खोटे आहे. पहिली पद्धत ही तत्त्वज्ञानावर आधारित असून दुसरी पद्धत ही वैज्ञानिक पद्धत आहे. आपण या दोन्ही पद्धतींचा वापर करून ही विचारसरणी चर्चेच्या ऐरणीवर घेऊ या.
सिद्धान्त – परीक्षणाची ज्ञानात्मक पद्धती
जी व्यक्ती म्हणते की, या सृष्टीचे मुळात अस्तित्वच नाही. जे काही डोळ्यांनी दिसते, ते केवळ भ्रम अथवा कल्पना आहे. आम्ही विचारू इच्छितो की, तिच्या या प्रश्नात कितपत तथ्य आहे? हा सुद्धा भ्रम आहे की, पूर्णपणे विचार करून हा सिद्धान्त मांडण्यात आला? जर ती व्यक्ती असे म्हणते की, मी जो दृष्टिकोन मांडला, तोसुद्धा भ्रामक आणि काल्पनिक आहे, तर हा सिद्धान्त आपोआपच संपुष्टात येतो. कारण भ्रामक आणि काल्पनिक बाबी अथवा सिद्धान्त किवा दृष्टिकोन मान्य करता येणे शक्य नाही. अशा सिद्धांतावर चर्चा करणेसुद्धा योग्य नाही. तसेच भ्रामक असूनदेखील यावर चर्चा करायची असेल तर सृष्टीविषयी चर्चा करण्यास प्राधान्य द्यावे लागेल.
मात्र प्रश्न असा आहे की, कोणता दृष्टिकोन स्वीकारावा? सृष्टी ही भ्रामक आणि काल्पनिक असल्याचा दृष्टिकोन अथवा हा दृष्टिकोनच मुळात भ्रामक वा काल्पनिक असण्याचा दृष्टिकोन? पहिला दृष्टिकोन स्वीकारण्याचा अर्थ असा की, आपण हा सिद्धान्त भ्रामक अगर काल्पनिक समजत नसून एक वस्तुस्थिती गृहीत धरतो. खरे पाहता हा सिद्धान्त मांडणारी व्यक्ती स्वतःच या सिद्धान्तांस भ्रम आणि कल्पना असल्याचा दावा करते. मात्र आपण द्वितीय बाबीचा स्वीकार जर केला, तर ही बाब आपोआपच सिद्ध होते की, ही सृष्टी भ्रम आणि कल्पना नसून एक ठोस वास्तविकता आहे. कारण हिच्या भ्रामक आणि कल्पनात्मक असण्यास याची दावेदार व्यक्ती स्वतःच भ्रम आणि कल्पना असल्याचा दावा करीत आहे.
परंतु ती जर असे म्हणते की, हा दृष्टिकोन भ्रम आणि कल्पना नसून ती एक ठोस वास्तविकता आहे आणि पूर्ण विचारांती सादर केलेला दृष्टिकोन आहे, तसेच ती व्यक्ती इतरांनासुद्धा सांगत आहे की, ही सृष्टी जर भ्रामक आणि काल्पनिक असल्याचे स्वीकार केले, तर अगदी एकाच वेळी कित्येक वास्तविकतांचे रहस्योद्घाटन होते. कितीतरी वास्तविकतांचा साक्षात्कार होतो. अर्थात आपल्या दृष्टिकोनाचा, आपल्या अस्तित्वाचा, आपल्या बुद्धीचा, इतर माणसांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या विचारसरणीचा, त्यांच्या विवेकतेचा आणि मग सृष्टीचा साक्षात्कार न का होईना, कमीतकमी मानवजातीचे अस्तित्व असणे तरी सिद्ध होतेच. मग परत आणखीन एक प्रश्न उभा राहतो की, मानव आपोआप निर्माण झाला की त्यास एखाद्या निर्मात्याने निर्माण केले?
एवढेच नव्हे तर मानवाचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर, हे सिद्ध होतेच की, मानव असल्यावर त्यास विचारक्षमता असून आपल्या या विचारशक्तीच्या माध्यमाने त्यास वस्तुस्थितीचे ज्ञान प्राप्त होऊ शकते. त्याच्या सभोवतालचे लोक, सजीव आणि निर्जीव वस्तू, हवा, पाणी, अग्नी, सूर्य, चंद्र, पशु-पक्षी, पाऊस, शेती, थंडी, गरमी वगैरे या सर्व बाबींचा त्याच्याशी प्रत्यक्ष संबंध येत असून ज्यांशी त्याचा संबंध येतो आणि ज्या बाबींपासून तो लाभ घेतो व वापर करतो, हे सर्वच सिद्ध होते आणि मग हळूहळू संपूर्ण सृष्टी सिद्ध होते आणि परत हा प्रश्न उभा राहतो की, ही सृष्टी कोणी निर्माण केली व हिची पूर्ण व्यवस्था कोण सांभाळत आहे?
सिद्धान्त परीक्षणाची कार्यात्मक पद्धती
कार्यात्मक पद्धतीचा वापर केला तर हा सिद्धान्त पूर्णपणे चुकीचा सिद्ध होतो. या सिद्धान्तावर तुम्ही जर जीवनाची वाटचाल सुरू केली तर प्रत्येक पावलावर ठेच खावी लागेल आणि क्षणोक्षणी हा दृष्टिकोन चुकीचा असल्याचे स्पष्ट होईल. हा दृष्टिकोन स्वीकारण्याचा अर्थ असा होईल की, आपण स्वतःचा आणि स्वतःच्या दृष्टिकोनाचासुद्धा इनकार करतो. परंतु असे करावयाचे असल्यास स्वतःला आणि स्वतःच्या विचारसरणीला नाकारावे लागेल, तसेच हे काम काही सोपेसुद्धा नाही व यावर कायम राहणेही शक्य नाही, यावर जीवन जगणे शक्य नाही. समजा कोणी स्वतःला आणि स्वतःच्या विचारसरणीला नाकारले तरी एकार्थाने ही बाब आपोआपच मान्य करण्यासम आहे की, एक असे अस्तित्व आहे जे नाकारण्याची क्रिया करीत आहे आणि त्याच्याकडे निरीक्षण व विचार करण्याची शक्ती व क्षमता आहे. याच क्षमतेचा वापर करून त्याने पूर्णपणे विचार करून नाकारण्याचा निर्णय घेतला.
शिवाय तुमच्या या विचारसरणीनुसार असे होईल की, या ठिकाणी सर्व काही काल्पनिक आणि भ्रामक आहे. तुम्हाला कोणत्याच मातेने जन्म दिला नाही. कोणत्याच पित्याने तुमचे संगोपन केले नाही. तुमची पत्नी तुम्हाला देत असलेले तन-सुख आणि मनसुखसुद्धा नाहीत अगर परिवारही नाही. तुमच्या परिवारजणांच्या सर्व भावना आणि नाते हे काहीच नाही. तुमचा कोणी मित्र नाही व वैरीही नाही. तुमचे आचारविचार आणि भूमिका व कर्तेपणा जणू हे सर्व काहीच नाही. तुमचे मूल जर भुकेने व्याकूळ होत असेल तर तुम्ही असा विचार करून तर गप्प बसणार नाही की, याचे रडणे व भुकेने व्याकूळ होणे हे काहीच नसून केवळ कल्पना वा भ्रम आहे. कारण तुमच्या या विचारसरणीनुसार स्वतःचे अस्तित्व, इतरांचे अस्तित्व, नातेसंबंध आणि भावनांचे मुळात काहीच अस्तित्व नाही. अशा अवस्थेत तुमचे मूल भुकेने मरून जाईल. समजा, तुमच्या शत्रूने तुमच्यावर प्राणघातक हल्ला केला, तर तुम्ही असा विचार करून शत्रूशी प्रतिकारच करणार नाही. कारण हा शत्रू, हा हल्ला व हे शस्त्र हे सर्व काही काल्पनिक आहे.
हे तर मानवांसंबंधी झाले आणि आपल्याशी संबंधित समाजासंबंधी झाले. मानवाच्या सभोवतालच्या जगताचेसुद्धा असेच आहे. तुम्ही कधीही आणि कोठेही ही विचारसरणी अमलात आणू शकत नाही. तुमच्या या विचारसरणीनुसार पाणी ही केवळ काल्पनिक वस्तू आहे. तहान लागल्यास पाणी पिण्याची काहीच गरज नाही. घराला आग लागल्यास तुम्ही ती विझविणार नाही, कारण घर हे काल्पनिक, त्याला लागलेली आग ही काल्पनिक, होणारा विध्वंस हा काल्पनिक. अर्थात या सृष्टीत कोणतीही वस्तू आणि घडणारी घटना ही काल्पनिक व भ्रामक असून वास्तवाशी काहीच संबंध नाही. मात्र ही विचारसरणीच मुळात हास्यास्पद, काल्पनिक आणि भ्रामक आहे. वास्तवाशी कवडीमात्र संबंध नसलेली आहे. तहान लागल्यावर पाणी प्यावेच लागते, घराला आग लागली तर विझवावीच लागते. जगातील प्रत्येकजण जोपर्यंत त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली नसेल, तोपर्यंत तहान, पाणी पिणे, घराला लागलेली आग, तिला विझविणे आणि अशा स्वरुपाची प्रत्येक लहान-मोठी समस्या व तिचे समाधान काल्पनिक आणि भ्रामक असल्याचे स्वीकारू शकत नाही. जगातील प्रत्येक मानव सृष्टीची ठोस वास्तविकता मान्य केल्याशिवाय राहणार नाही व याशिवाय दुसरा पर्यायच नाही. ही सृष्टी काल्पनिक आणि भ्रमाचा भोपळा असण्याचा दावा करणारेसुद्धा आणि या विचारसरणीचा जोरदार प्रचार करणारे महाभागसुद्धा या भ्रामक आणि काल्पनिक विचारसरणीवर चालू शकत नाहीत. सृष्टीला आणि सृष्टीतील प्रत्येक घटनेला अगदी भ्रमाचा भोपळा समजणार्यांनी तहान लागल्यास पाणी का प्यावे? घराला आग लागल्यास का बरे विझवावी? आजारी पडल्यास उपचार का करावे अथवा इतर संकटांचा सामनाच का करावा? अर्थातच त्यांच्या दाव्यामध्ये काहीच तथ्य नाही. कथनी आणि करणीत असामान्य फरक आणि तफावत आहे. एवढेच नव्हे तर त्यांना स्वतःलासुद्धा त्यांची विचारसरणी पटत नाही. दावा तोंडी असतो, जिभेवर प्रचार असतो, मात्र स्वतःची बुद्धीच त्यांच्या दाव्याशी सहमत नसते.
ही सृष्टी अनादी आणि चिरकाल आहे काय?
दुसरी विचारसरणी अशी आहे की, ही सृष्टी निर्माण झालीच नाही, कोणी तिला निर्माण केलेदेखील नाही. अर्थात हिचा कोणीच निर्माणकर्ता नाही. ती अनादी असून कधीच नष्ट होणार नाही. ही विचारसरणीसुद्धा पहिल्याच विचारसरणीसारखी आहे. जे महाभाग ईश्वराचा स्वीकार करीत नाहीत, त्यांची हीच विचारसरणी आहे. या विचारसरणीचा आधार घेऊन ते सृष्टीनिर्मात्याचा स्वीकार करण्यातून पळवाट काढतात. तुम्ही जर त्यांना विचारले की, या विचारसरणीला कोणता पुरावा आहे? कोणत्या आधारांवर तुम्ही हा दावा करता की, ही सृष्टी अनादी व चिरकाल असून हिचा कोणीच निर्माता नाही? तर त्यांच्याकडे मात्र तुमच्या या प्रश्नाचे कोणतेच समाधानकारक उत्तर मिळणार नाही. त्यांना या सृष्टीचा निर्माता मान्य करायचा नसतो आणि यासाठी ते या सृष्टीला अनादी व चिरकाल म्हणण्याचा वा सिद्ध करण्याचा आटापिटा करतात. कारण सृष्टी निर्माण झाली असल्याचे जर कोणी मान्य करीत असेल, तर मग तिच्या निर्माणकर्त्याचा स्वीकार करावा लागेल. मग निर्माणकर्ता असण्याचा इन्कार करण्यासाठीच ते असा दावा करतात की, सृष्टी निर्माण झाली नसून ती अनादी व चिरकाल आहे. काही जरी असले तरी एक गोष्ट सर्वांनाच स्वीकारणे भाग पडते आणि ती गोष्ट अशी की.. जोपर्यंत एखादी अनादी आणि चिरकाल शक्ती असल्याचा स्वीकार करीत नाही, तोपर्यंत या सृष्टीचे रहस्य मुळीच उलगडत नाही. एक तर या सृष्टीच्या निर्माणकर्त्या ईश्वराचा स्वीकार करावा लागेल, जो अनादी, कायमस्वरूपी, सर्वशक्तिमान, चिरकाल असून त्यानेच या सृष्टीची निर्मिती केली आहे, अथवा हे स्वीकारावे लागेल की, ही सृष्टी अनादी आणि चिरकाल आहे. या दोन स्वरुपाच्या विचारसरणींपैकी एका विचारसरणीचा स्वीकार केल्याशिवाय या सृष्टीच्या रहस्याचा गुंता सुटणे शक्यच नाही. कारण ज्या वस्तूचे मुळात अस्तित्वच नव्हते, ती वस्तू आपोआपच कशी काय अस्तित्वात येऊ शकते अथवा तिचे अस्तित्व हे स्व-अस्तित्व असू शकते, म्हणजेच अनादी आणि चिरकाल असू शकते किवा एखाद्या निर्माणकर्त्याने तिला निर्माण कले असावे वा अस्तित्व प्रदान केले असावे. अर्थात याच निर्माणकर्त्यास ‘ईश्वर’ म्हणतात. हे दोनच पर्याय असून तिसरा पर्यायच नाही.
सृष्टी ही अनादी आणि चिरकाल नाहीच
सृष्टी ही अनादी व चिरकाल असण्याचा आटापिटा करणार्यांच्या या दाव्याचा वास्तवतेशी काहीच संबंध नाही. कारण त्यांच्या या दाव्याला कोणताच पुरावा आणि आधार नाही. या सृष्टीचे रहस्य जर जाणून घ्यायेचच असेल तर ही सृष्टी अनादी व चिरकाल असल्याची विचारसरणी मान्य केलीच पाहिजे, अशातला भाग नाही. सृष्टीचे रहस्य उलगडण्यासाठी हा सरळसरळ मार्ग आहे की, आपण या सृष्टीचा एक निर्माता स्वीकार करावा. ही सृष्टी अनादी व चिरकाल असल्याचे स्वीकार केले तर सृष्टीनिर्मितीचा प्रश्न काही अंशी सुटण्याचा केवळ भास होतो आणि तेसुद्धा अशा स्वरुपात की, तुम्ही या सृष्टीस निर्मिती अगर उत्पादन असल्याचे मान्य करावे. मूळ प्रश्नापासून स्वतःची सुटका करून घेताही येते. मात्र बाकीचे सर्व प्रश्न जशास तसे. त्यांची उत्तरे काही केल्याने सापडत नाहीत. या उलट आपण जर असे मान्य केले की, या सृष्टीचा निर्माणकर्ता ईश्वर आहे आणि तो अनादी व चिरकाल आहे तर सृष्टीनिर्मितीचा प्रश्नसुद्धा आपोआपच सुटतो आणि इतर सर्वच गुंते एकेक करून आपोआपच सुटत जातात. मग ही एवढी चांगली सोपी आणि सरळ पद्धत सोडून सृष्टीस अनादी व चिरकाल स्वीकारण्याची पद्धत कशासाठी स्वीकारायची. कारण ही दुसरी पद्धत अवघड तर आहेच, शिवाय बाकीचे प्रश्न सोडविण्याचे सामर्थ्यसुद्धा यात नाही. मग वैज्ञानिक पद्धती अथवा अशी एखादी पद्धत स्वीकारावी, ज्यात प्रश्न सुटण्याऐवजी प्रश्नांचा गुंता वाढतच जातो? प्रथमोल्लेखित पद्धतीचा स्वीकार करण्यात सृष्टीनिर्मात्याचे अस्तित्व स्वीकारावे लागते आणि द्वितीयोल्लेखित पद्धतीत मात्र सृष्टीनिर्मात्याचे अस्तित्व नाकारावे लागते. सृष्टीनिर्मात्याचा स्वीकार करायचा नाही म्हणूनच प्रथम पद्धतीचा अवलंब न करण्याचा हट्ट धरणे कितपत योग्य आहे? खरे पाहता ही परिस्थितीच या गोष्टीचा भक्कम पुरावा आहे की, या सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचे स्वीकारल्याशिवाय या सृष्टीचे रहस्य उलगडत नाही. वैज्ञानिक आणि बुद्धिसंमत असलेली भूमिका हीच आहे की, आपण प्रथमोल्लेखित पद्धतीचाच स्वीकार करावा. तत्त्वज्ञान, गणितशास्त्र वा अशा सर्वच शास्त्रांविषयी आपण अशाच पद्धतीचा स्वीकार करतो, ज्यामुळे सर्वच प्रश्न आणि समस्या सुटाव्यात. याकरिता अशा प्रकारच्या असंख्य वस्तुस्थितींचा स्वीकार करणे भाग पडते, ज्या कधी आपण पाहिल्यासुद्धा नाहीत. आपल्या पंचेंद्रियांना त्यांची कधी कल्पनासुद्धा नसते आणि प्रयोगाने सिद्धही करता येत नाही. कधीकधी तर यासाठी बौद्धिक मान्यतासुद्धा नसते. आपण या न जाणवणार्या व कधीकधी बुद्धीलाही न पटणार्या वस्तुस्थितींचा स्वीकार केवळ एवढ्याकरिता करतो की, याशिवाय संबंधित प्रश्न आणि समस्यांचे समाधान होऊ शकत नाही. ज्या अर्थी या सृष्टीतील घटकांविषयी आपली ही भूमिका आहे, तर मग पूर्ण सृष्टीसंबंधीसुद्धा हीच भूमिका स्वीकारणे आवश्यक आहे. कारण सृष्टीतील घटक तर आपल्याला साध्या डोळ्यांनीसुद्धा पाहणे शक्य आहे, त्यांचे परीक्षण करून त्यांचा भौतिक अर्थ आणि परिस्थिती जाणून घेऊ शकतो, मात्र संपूर्ण सृष्टीबाबत हे शक्य नाही. म्हणून या सृष्टीचे रहस्य जाणून घेण्यासाठी आपण जर अभौतिक आणि जाणीव न होणार्या वस्तुस्थितीचा स्वीकार केला तर हे बुद्धीविरोधी आणि विज्ञानविरोधी ठरणार नाही.
बर्याच वर्षांपासून या सृष्टीचे अस्तित्व आहे. मात्र यावरून असे मुळीच सिद्ध होत नाही की, ही सृष्टी अनादी आहे. केवळ एवढे म्हणता येईल की, ही सृष्टी कोट्यवधी वर्षांपासून अस्तित्वात आहे. मात्र असे सिद्ध होण्याकरिता कोणताच पुरावा कोणाजवळही नाही की, ही सृष्टी अनादी आणि चिरकाल आहे. आपल्याला या सृष्टीतील अशा असंख्य वस्तू माहीत आहेत, ज्या पूर्वी कधी नव्हत्या आणि भविष्यात नष्ट होणार्या बर्यांच वस्तूसुद्धा आपल्याला माहीत आहेत. एवढेच नव्हे तर आपणसुद्धा पूर्वी अस्तित्वात नव्हतो आणि एका ठराविक काळानंतर आपले अस्तित्व राहणार नाही. मात्र अवघ्या सृष्टीत एकही अशी वस्तू आढळत नाही, जी अनादी आणि चिरकाल असेल. ज्या अर्थी कोणी ही सृष्टी अनादी आणि चिरकाल असण्याचा दावा करील, त्या अर्थी त्याला पुरावा तर मिळणार नाहीच आणि आम्ही त्याचा हा दावा स्वीकारणारही नाही. मात्र जर कोणी असा दावा करीत असेल की, ही सृष्टी एक दिवस नष्ट होणार आहे, तर ही बाब मात्र अगदी स्वीकारणीय आहे. कारण आपण नेहमीच पाहतो की, निर्माण होणारी प्रत्येक वस्तू एका ठराविक कालावधीनंतर नष्ट होते.
आणखीन एका पैलूने विचार करता येईल. एखाद्या वस्तूचे बरेच घटक असतील तर हे सर्व घटक अनादी आणि चिरकाल असतील, तरच ती वस्तू अनादी आणि चिरकाल असू शकते. मात्र एखाद्या वस्तूच्या घटकांची झीज होत असेल आणि ते नष्ट होत असतील तर हा मुळात या गोष्टीचा पुरावाच आहे की, ती वस्तू चिरकाल नाहीच. अशा वस्तूस अनादी आणि चिरकाल मुळीच म्हणता येणार नाही. आपण उघड्या डोळ्यांनी आणि बुद्धी ठिकाणावर ठेवून या सृष्टीतील कोणतीही वस्तू पाहिली तर हे आपोआपच आपल्या लक्षात येईल की, येथील प्रत्येक वस्तू सतत झिजत आहे, तिच्यावर सतत आघात होत आहेत, तिचे वय कमी होत आहे, ती नष्टतेकडे सरकत आहे. ही वस्तुस्थिती चोहीकडे आणि दाहीदिशा आपल्याला दिसते. या जगात कित्येक मानव आहेत, जन्मतात आणि मृत्यू पावतात. जन्म आणि मृत्यूची शृंखला सतत सुरू आहे. हीच अवस्था पशु-पक्ष्यांची आणि वनस्पतींची तसेच येथील सर्वच वस्तूंची आहे. ही लीला आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो आणि अनुभवतो आहोत. कारण निर्माण होणारी प्रत्येक वस्तू नष्ट होणे, हा येथील नियमच आहे. मग ती सजीव असो वा निर्जीव वस्तू असो. यावरून हेच सिद्ध होते की, या सृष्टीतील प्रत्येक वस्तू नष्ट होणारी आहे, अर्थात कोणतीच वस्तू अनादी व चिरकाल नाही आणि यावरूनच ही बाब आपोआपच सिद्ध होते की, ही सृष्टी अनादी आणि चिरकाल नाहीच. ही सृष्टी एकदा निर्माण झालेली आहे आणि एके दिवशी ती अवश्य नष्ट होणार आहे. काही महाभागांची आमच्या या विचारसरणीशी सहमती नसून उत्तरादाखल ते असा दावा करतात की, कोणतीच वस्तू निर्माणही होत नाही आणि नष्टही होत नाही. तुमच्या दृष्टीत जी प्रक्रिया निर्माण होण्याची आणि नष्ट होण्याची आहे, ती म्हणजे मुळात पदार्थाचे स्वरूप बदलणे आहे. अर्थात पदार्थ विविध स्वरुपात रूपांतरित होत असल्याने आपल्याला निर्मिती आणि नाश होण्याचा भास होतो. विभिन्न प्रकारचे भौतिक घटक जेव्हा एका विशेष प्रमाणात रचित होतात तेव्हा परिणामस्वरूपी ते एका विशिष्ट वस्तू अगर पदार्थाचे स्वरूप धारण करतात. तसेच जेव्हा हे घटक पृथक होतात तेव्हा आपल्याला असे वाटते अथवा गैरसमज होतो की, ही वस्तू नष्ट झाली अथवा नाश पावली आहे.
केवळ एवढेच घडते की, एका विशिष्ट रचनेत असलेले घटक विखरून जातात आणि दुसर्या एखाद्या घटकांत मिसळून दुसर्या वस्तूमध्ये परिवर्तित होतात, त्यांचे एका विशिष्ट वस्तुच्या स्वरूपात रूपांतर होते. अर्थातच पदार्थ हा नष्ट होत नसून त्याचे केवळ स्वरूप बदलते आणि तिच्या स्वरूपातील हा बदल म्हणजे घटकांची रचना बदलणे होय.
मात्र वैज्ञानिकदृष्ट्या ही बाब खरी सिद्ध झाली नसली तरी थोड्या वेळासाठी आपण हे मान्य करू या. परंतु यावरून केवळ एवढेच मान्य करता येईल की, पदार्थाचे विभिन्न स्वरूप निर्माण होतात आणि नष्ट होतात. जणू पदार्थ हा अनादी आणि चिरकाल आहे आणि याचे स्वरूप नाश पावणारे आहे. परंतु यावरूनच हेसुद्धा सिद्ध होते की, ही सृष्टी अनादी व चिरकाल नाही, अर्थात नष्ट पावणारी आहे. कारण पदार्थाच्या स्वरुपाचेच दुसरे नाव हे ‘सृष्टी’ असे आहे. असे म्हटले जाते की, स्वरूप हे नष्ट पावणारे सिद्ध होत असल्याने ही सृष्टी नश्वर असल्याचे सिद्ध होत नाही. कारण पदार्थाचे स्वरूप हे नष्ट होत नसून ते केवळ बदलत असते. अर्थातच सृष्टीच्या स्वरूप बदलाची प्रक्रियासुद्धा सुरूच असते. मात्र यात थोडेही तथ्य नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, पदार्थाचे बदलणारे स्वरूप हे झिजणारे आणि नाश पावणारेच आहे. हे अनादी व चिरकाल असू शकत नाही. शिवाय या गोष्टीकडेसुद्धा लक्ष द्यावे लागेल की, पदार्थांच्या स्वरूपाची एक मर्यादित मुदत असते. या मुदती किती जरी एकत्र झाल्या तरी त्या अमर्याद होऊ शकत नाहीत. म्हणजेच सृष्टीची मुदतसुद्धा मर्यादितच असणार. मग ती कितीही जास्त का असेना.
आणखीन एका पद्धतीने विचार करता येईल. या सृष्टीत पदार्थाप्रमाणेच त्याच्या स्वरूपाचासुद्धा प्रारंभ आणि अंत आहे. अर्थात सुरुवात आणि शेवट होणार्या स्वरूपांचा संच म्हणजे ही सृष्टी. या सृष्टीत बदलणारे प्रत्येक स्वरूप ज्या अर्थी सुरू होऊन अंत पावते, त्या अर्थी ही सृष्टी कशी काय अंत पावणार नाही. अर्थात सृष्टीचीही कधीकाळी सुरुवात झालेली असणार आणि कधी ना कधी ती नष्ट होणारच. यावरूनच ही गोष्ट सिद्ध होते की, पदार्थसुद्धा अनादी व चिरकाल नाही. कारण त्याचे आणि त्याच्या स्वरूपाचे अस्तित्व काही भिन्न नाही. पदार्थ हा आपल्या स्वरूपाच्या रूपातच आपल्या समोर येत असतो. तसेच तो अनादी आणि चिरकाल नाही, हे सिद्ध झाले आहे.
आणखीन एका पैलूने विचार करता येईल. या भूतलावर मानवजात अनादी काळापासून अस्तित्वात नाही. प्राचीन अवशेष आणि भूगर्भशास्त्राच्या संशोधनावरून असे लक्षात येते की, एका विशिष्ट मुदतीपासूनच मानवाचे अस्तित्व आहे. त्यापूर्वी मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे सापडत नाहीत. शिवाय हे आपल्याला चांगलेच माहीत आहे की, मानवांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावरून हे सिद्ध होते की, शंभर वर्षांपूर्वीची लोकसंख्या आजच्या लोकसंख्येपेक्षा निश्चितच कमी असणार. तसेच आणखीन शंभर वर्षे मागे गेल्यास लोकसंख्येचा दर आणखीन कमी होणार. अशाप्रकारे भूतकाळात जाता जाता त्या काळाची कल्पना करता येईल, जेव्हा या भूतलावर माणसांची संख्या केवळ ‘‘एक पुरुष आणि एक स्त्री’’ एवढीच असेल. मग त्याच्याही पूर्वीच्या काळाची कल्पना केली तर असे वाटेल की, मानवाचे मुळी अस्तित्वच नव्हते. अशाच प्रकारे पशु, पक्षी आणि वनस्पतीचेही अस्तित्व नव्हते. अर्थात एक काळ असा होता की, या भूतलावर काहीच नव्हते. कशाचेही अस्तित्व नव्हते. कोणत्याही प्रकारच्या सजीव सृष्टीचे मुळी अस्तित्वच नव्हते. इतर ग्रहांची सध्याची जी स्थिती आहे, अगदी तशीच स्थिती पृथ्वीचीही होती. वैज्ञानिकांचीसुद्धा या गोष्टीवर सहमती आहे.
प्रश्न असा आहे की, अशी परिस्थिती असण्याचे काय कारण असावे? अशी परिस्थिती का होती? जर तुम्ही एखाद्या निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाचा स्वीकार करीत नसाल तर तुमत्याकडे या प्रश्नाचे केवळ एवढेच उत्तर असेल की, त्या वेळी या भूतलाची आणि वातावरणाची परिस्थिती सजीव सृष्टी निर्माण होण्यासाठी मुळीच अनुकूल नव्हती. अर्थात सजीव सृष्टी निर्माण होण्यासारखे या भूतलावर काहीच नव्हते. या अत्यंत विलक्षण आणि विचित्र परिस्थितीत या वातावरणात, या भूतलावर क्रांती घडली. या भूतलावर अचानक सजीव सृष्टी निर्माण झाली. दुसर्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास या भूतलाची परिस्थिती जी आज आहे ती यापूर्वी नव्हती. पृथ्वीची जी स्थिती आज आहे ती यापूर्वी नव्हती. पृथ्वीची आज जी परिस्थिती आहे, ती सजीव सृष्टी निर्माण होण्यापूर्वी नव्हतीच. ही बाब आपल्या सर्वांनाच मान्य करावी लागते. सध्याची परिस्थितीच यापूर्वीसुद्धा होती आणि हीच परिस्थिती कायमस्वरूपी राहील, असे मुळीच शक्य नाही. परिस्थितीचा हा बदलाव वा परिवर्तन सर्वमान्य आहे. परिवर्तन होणे हे कायमचेच आहे. पदार्थाच्या परिवर्तनावर सर्वच वैज्ञानिक सहमत आहेत. अर्थात परिवर्तन हा पदार्थाचा विशेष गुणधर्म आहे. या सृष्टीचाही विशेष गुणधर्म आहे. दुसरी गोष्ट अशी की, या सृष्टीत परिवर्तनाचा गुणधर्म नसता तर सजीव सृष्टी निर्माण होण्यापूर्वीचीच परिस्थिती आजही जशासतशी राहिली असती. या भूतलवार जीवनाचे नामोनिशान राहिले नसते. किवा या उलट असे की, या भूतलावर यापूर्वीही आजच्यासारखीच सजीव सृष्टी नांदत असती. अर्थात परिवर्तनाची साधी कल्पनाही नसती. मात्र तुम्ही या परिवर्तनाशी सहमत नसाल तर तुम्हाला हे सांगावे लागेल की, भूतलावरील अनादी परिस्थितीत हे परिवर्तन का आणि कसे झाले आणि झाले तर या ठराविक मुदतीच्या प्रारंभबिदूवरच कसे झाले? यापूर्वी का झाले नाही? या प्रश्नाचे तुमच्याजवळ याशिवाय दुसरे कोणतेच उत्तर नाही की, परिसिथतीतील उत्क्रांतीसाठी एका विशिष्ट मुदतीची आवश्यकता असते. ही विशिष्ट मुदत पूर्ण झाल्यावर उत्क्रांती घडली. या मुदतीपूर्वीच्या परिस्थितीवर विचार केल्यास भूतलावरील अवस्था आणि वातावरण निश्चितच भिन्न होते. तुमचे उत्तर बरोबर आहे. मात्र तुम्ही या विशिष्ट कालावधीपूर्वीचा विचार केला तर तुम्हास या भूतलावरील आणि या वातावरणातील विभिन्न स्वरूपाच्या अवस्था चक्क लक्षात येतील. एवढेच नव्हे तर तुमची कल्पना अधिक खोलपर्यंत गेली तर असे लक्षात येईल की, सूर्यमंडलातील सर्वच ग्रह आणि तारे एकच आहेत. आज आपल्याला दिसणारे सूर्यमंडल त्या काळी अस्तित्वातच नव्हते. केवळ एक बिदू मात्र होते. तुम्ही या अवस्थेस सृष्टीचा ‘आरंभबिदू’ संबोधू शकता. या परिस्थितीपर्यंतच वैज्ञानिकांचे संशोधन पोहोचू शकले. मात्र सृष्टीच्या या अत्यंत प्राथमिक आणि प्रारंभी अवस्थेससुद्धा अनादी म्हणता येणार नाही. कारण वैज्ञानिकांच्या अगदी वर्तमान संशोधनानुसार ही सृष्टी पन्नास खर्व वर्षापूर्वीच अस्तित्वात आलेली आहे. मग हा दावा आपोआपच संपुष्टात येतो की, पदार्थ हा अनादी व चिरकाल आहे. म्हणून तुम्हाला आता हे स्वीकार करावे लागेल की, पदार्थ हा अनादी व चिरकाल नाही. एक वेळ अशी होती की, पदार्थसुद्धा अस्तित्वात नव्हता. मग पदार्थ अस्तित्वात आला आणि या पदार्थापासूनच संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आली. या स्पष्टीकरणाशिवाय इतर कोणतेच स्पष्टीकरण तुम्हाला सृष्टीविषयी देता येणार नाही. जर ही परिवर्तन पावणारी सृष्टी अनादी व चिरकाल नाही तर पदार्थसुद्धा अनादी व चिरकाल होऊ शकत नाही. जर तुम्ही या सृष्टीच्या प्रारंभबिदूचा स्वीकार करीत असाल तर तुम्हाला पदार्थाच्या प्रारंभबिदूचासुद्धा स्वीकार करावाच लागेल. वस्तुस्थिती अशी आहे की, ही सृष्टी अनादी व चिरकाल असण्याचा दावा करणे तर खूप सोपे आहे मात्र सिद्ध करणे खूप अवघड आहे की, नेमकी कोणती वस्तू अनादी व चिरकाल आहे. भूतलावरील जीवनव्यवहार की सूर्यमंडल अनादी व चिरकाल आहे, सृष्टीची व्यवस्था की यातील इतर कोणती वस्तू अनादी व चिरकाल आहे? कोणतीच वस्तू अनादी आणि चिरकाल असण्याचा पुरावा नाही. केवळ पदार्थाविषयीच तेवढे काय तुटपुंजे पुरावे देण्यात येतात आणि तेसुद्धा संपुष्टात येतात. कारण ज्या अर्थी सृष्टीच अनादी आणि चिरकाल नाही, त्या अर्थी पदार्थसुद्धा अनादी आणि चिरकाल असल्याचा दावा करता येत नाही.
पदार्थ अनादी आणि चिरकाल नाही
मागे काही काळापूर्वीपर्यंत वैज्ञानिकांचे असे मत होते की, पदार्थ हा कधीच नष्ट न पावणारी वस्तू आहे, अर्थात अविनाशी आहे. प्रयोगावरून त्यांना असा अनुमान आला की, कोणताही पदार्थ नष्ट होत नसून त्याचे केवळ स्वरूप बदलत असते. घनरूपी वस्तूस जाळल्यास त्याचे द्रवरूप अगर वायूरूपात परिवर्तन होते. पदार्थास जाळले असता त्यात घट होते. यावरून असे सिद्ध जरी झाले असले की, पदार्थ हा नष्ट होत नसून त्याचे स्वरूप बदलते आणि यावरून बर्याच जणांनी हा निश्कर्ष लावला की, पदार्थ हा अनादी व चिरकाल आहे. मात्र अनुच्या प्रयोगामुळे हा निश्कर्ष पार संपुष्टात आला. अणूविषयक प्रयोगावरून हे सिद्ध झाले की, पदार्थ हा नष्ट होतो. रेडियम, थोरियम, यूरेनियम वगैरेंच्या घटकासंबंधी ही माहिती समोर आली की, अणूचे तुकडे-तुकडे होऊन वातावरणात लीन होतात आणि त्याचे ऊर्जेत रूपांतर होते, तसेच ही ऊर्जा अदृष्य होते. दुसर्या शब्दांत असे की, पदार्थ अनादी व अविनाशी नसून नाशवंत आहे. ‘लेनीन’सारख्या भौतिकवाद्यालासुद्धा हे मान्य करावे लागले. त्याने आपल्या ‘भौतिक आणि प्रायोगिक समीक्षा’ या ग्रंथात एका फ्रेंच वैज्ञानिकाचा संदर्भ देऊन लिहिले आहे की,
‘‘अत्यंत क्रांतीशील घटक असलेले रेडियम हे ऊर्जास्थापत्य नियमाबाहेर आहे. एवढेच नव्हे तर ऊर्जेविषयी इतर कोणतेही नियम या घटकावर लागू होत नाहीत.’’(पृष्ठ २६०)
याच ग्रंथात ‘पदार्थ नष्ट झाला’ या शीर्षकाखाली त्याने विविध देशांतील भौतिक शास्त्रज्ञांच्या ‘पदार्थ आणि त्याची नष्टता’विषयी भूमिकेसंबंधी चर्चा करताना लिहिले आहे की, ‘पदार्थ हा नष्ट होतो’, ‘सर विल्यम डेम्परे’ याने ‘विज्ञानाचा इतिहास’ या पुस्तकात एकोणीसाव्या शतकापासून आजपर्यंतच्या मोठमोठ्या भौतिकशास्त्रांच्या विचारसरणींवर चर्चा करीत असा निष्कर्ष काढला की,
‘‘भौतिक वास्तविकता ही ‘हेमेल्टन’ या भौतिक शास्त्रज्ञाच्या गणितीय समीकरणाच्या लांबलचक शृंखलेत परिवर्तीत झाली असून प्राचीन भौतिकता नष्ट झाली आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनसुद्धा, अणुप्रमाणेच केवळ एखाद्या निराकार आत्म्याप्रमाणे अस्तित्वहीन स्वरूपात बाकी राहिले. इलेक्ट्रॉनमुळेसुद्धा केवळ लहरींची कल्पना निर्माण होते. या लहरीसुद्धा आपल्या या वातावरणात निर्माण होणार्या नाहीत, शिवाय मॅक्सिकोच्या ठराविक एथरमध्येही होत नाहीत. तर त्या एका निनावी अथवा माहिती नसलेल्या काल्पनिक ठिकाणी किवा भ्रामक व्यवस्थेत निर्माण होतात आणि त्याविषयी विचारशक्तीसुद्धा कल्पना करू शकत नाही.’’(पृष्ठ : ४७८)
सांगायचे तात्पर्य असे की, विज्ञान जगतामध्ये आता या बाबीवर वैज्ञानिकांचा विश्वास वाढत चालला आहे की, पदार्थ हा नाशवंत आहे. त्याची केवळ अवस्थाच बदलत नसून त्याचे विशेष गुणधर्म नाश पावतात. अर्थात पदार्थ चिरकाल नाही आणि चिरकाल नसल्यामुळे तो अनादीसुद्धा नाही. जी वस्तू नष्ट होते, ती कधी ना कधी निर्माण झालेली असते, तसेच जी वस्तू निर्माण झाली, तिचा एका ठराविक कालावधीनंतर नाश अटळ आहे. अखेर अथवा अंत स्वीकारला तर आरंभही स्वीकारावाच लागतो आणि आरंभ स्वीकारला तर अंतही स्वीकारावाच लागतो.
आता हे निश्चित झाल्यावर की, पदार्थ चिरकाल व अनादी नाही, ही बाब आपोआपच सिद्ध झाली की, ही सृष्टी अनादी आणि चिरकाल नाही. तरीसुद्धा आपण याविषयी विज्ञानाचे आधुनिक संशोधन पाहु या. ‘अॅडवर्ड लोथर केसल’ हे एक प्रसिद्ध आणि महान वैज्ञानिक आहेत. त्यांनी मांडलेला सिद्धान्त असा आहे.
‘‘काही लोकांची अशी विचारसरणी आहे की, ईश्वर हा अनादी आणि चिरकाल नाही. त्यांचा हा मोठा गैरसमजच आहे. कारण ऊर्जा ही नष्ट होत नाही आणि तयारही होत नाही. ती केवळ स्वरूप बदलत असते. मात्र ऊर्जासंबंधीचा हाच नियम असे सिद्ध करतो की, ईश्वर हा अनादी आणि चिरकाल आहे. तसेच ऊर्जा निर्माण होण्यासाठी गतीची आवश्यकता असते. कारण ए=चउ२ या नियमानुसार ऊर्जा निर्माण होते. मात्र ऊर्जेचे मूळ स्त्रोत हे कार्यशीलता अथवा गती आहे आणि या सर्व बाबी सर्वशक्तिमान ईश्वराच्या ताब्यात आहे.
विज्ञानाच्या अत्याधुनिक संशोधनावरून हे सिद्ध झाले आहे की, या सृष्टीचा एक प्रारंभबिदु आहे. यावरून ईश्वराचे अस्तित्वसुद्धा आपोआपच सिद्ध होते. कारण अनादी आणि चिरकाल नसणारी अर्थात नाश पावणारी प्रत्येक वस्तू ही कोणत्या ना कोणत्या निर्मात्याने निर्माण केली असणारच. कारण ती आपोआप निर्माण होत नाही. तसेच निर्मात्याकडूनच ती वस्तू कार्यरत असते. म्हणजे हे अवघे विश्व अगर सृष्टी ही एका अतिशक्तिशाली आणि सामर्थ्यशाली निर्मात्याने निर्माण केली व तोच निर्माता आपल्या सामर्थ्याने ही संपूर्ण सृष्टी अत्यंत नियमबद्धरीत्या कार्यरत ठेवतो. विज्ञानाने यासोबत हेसुद्धा सिद्ध केले की, पन्नास खरब वर्षांपूर्वी एक विलक्षण स्फोट झाला आणि ही सृष्टी अस्तित्वात आली. अर्थात वैज्ञानिकांनी ही बाब मान्य केली की, या सृष्टीस निर्माण करण्यात आले असून या निर्मितीचे नियम सृष्टीनियमांपेक्षा पूर्णतः भिन्न व कोण्या शक्तिशाली अस्तित्वाचा चमत्कार आहे. कारण सृष्टीची ही नियमावली अथवा कायदेसुद्धा एखाद्या निर्मितीचेच द्योतक व परिणाम आहेत. याच महान व अतिसामान्य शक्तिशाली निर्मात्याचे नाव ईश्वर असे आहे.’’(संदर्भ पाश्चिमात्य देशातील चाळीस वैज्ञानिकांची साक्ष ३, पृष्ठ क्र.८७ ते ८९)
‘जॉहन क्लेवी लॅन्डी’ लिहितात की, ‘‘रसायन शास्त्राच्या संशोधनावरून ही बाब समोर येते की, पदार्थ नाश पावत आहे. त्याचे काही घटक अत्यंत मंद गतीने नाश पावत आहेत, तर काही तीव्र गतीने नाश पावत आहेत. यावरून हेच स्पष्ट होते की, जी वस्तू नष्ट होत आहे, तिचा निश्चितच निर्मितीबिंदू आहे. नष्ट होणारी प्रत्येक वस्तू निर्माण झालेली असते आणि निर्माण झालेली प्रत्येक वस्तू नष्ट होत असते. ही बाब रसायनशास्त्रावरून तर सिद्ध होतेच शिवाय इतर सर्वच शास्त्रांवरून ही बाब स्पष्ट झालेली आहे. एवढेच नव्हे तर ही वस्तुस्थिती देखील समोर आली की ही सृष्टी अचानक अस्तित्वात आली.
आता ही बाब लक्षणीय आहे की, जर हे भौतिक विश्व स्वतःहून अस्तित्वात येऊ शकत नसेल, तसेच सृष्टीचे अस्तित्व आणि कार्य कायम व अबाधित ठेवण्यासाठी असे कायमस्वरूपी आणि यशस्वी नियम अगर कायदे स्वतः निर्माण करीत नसेल, तर हा महाप्रतापी कारनामा निश्चितच कोण्या अभौतिक अस्तित्वाचा आहे आणि याच अभौतिक अस्तित्वाचे नाव ‘ईश्वर’ किवा ‘अल्लाह’ असे आहे.’’(संदर्भ : ईश्वर आहे.., पृष्ठ! ६९ व ७०, लेखक, जॉहन क्लेवी लँडी)
हा असा प्रकार आहे की, वैज्ञानिक संशोधनावरून हे पूर्णतः सिद्ध होते, झाले की, पदार्थ हा अनादी व चिरकाल नाही आणि याच पदार्थापासून तयार करण्यात आलेली ही संपूर्ण सृष्टीसुद्धा अनादी व चिरकाल नाही. पदार्थ आणि सृष्टी या दोन्ही बाबी निर्माण करण्यात आलेल्या असून दोन्हींचा नाश निश्चितच होणार आहे. ही बाब स्वीकारण्यात आलेली असून यावरून ईश्वराचे अस्तित्व स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही, हे आपोआपच सिद्ध होते. जी बाब अनादी नाही, ती बाब कोण्या एके काळी अस्तित्वातच नव्हती आणि जी बाब अस्तित्वात नव्हती, ती आपोआपच अस्तित्वात येऊ शकत नाही. कोणीतरी निर्माण केल्याशिवाय ती निर्माण होत नाही. मग हा निर्माणकर्ता? तर हा निर्माणकर्ता अर्थातच ‘ईश्वर’ अगर ‘अल्लाह’ होय!
ही सृष्टी स्वतःहूनच कार्यरत आहे काय?
आता आपण क्रमांक तीनच्या स्पष्टीकरणावर चर्चा करु या. अर्थात ही सृष्टी आपोआपच निर्माण झाली आणि स्वतःहूनच कार्यरत आहे. या युक्तिवादास वास्तविकतेचा थोडासुद्धा आधार आहे काय? प्रश्न असा आहे की, या युक्तिवादाचा अर्थ काय आहे? असा अर्थ आहे काय की, ही सृष्टी अस्तित्वातच नव्हती आणि मग आपोआपच अस्तित्वात आली आणि आपोआपच कार्यरत झाली? हा युक्तिवाद केवळ भ्रामकच नसून ही बाब अशक्यप्राय आहे. जी बाब मुळी अस्तित्वातच नव्हती, ती स्वतःहून कशी काय अस्तित्वात येईल? या युक्तिवादाचा दुसरा अर्थ असा की, सृष्टी ही कोणत्याही निर्माणकर्त्याशिवायच अस्तित्वात आली आणि कोणत्याही चालकाशिवायच व्यवस्थितपणे कार्यरत झाली, अजूनही चालूच आहे. थोड्या वेळाकरिता आपण असे गहीत धरू या की, कोणत्याही संचालकाशिवाय ही सृष्टी स्वतःहूनच कार्यरत आहे. मात्र आपण जर विचार केला तर या युक्तिवादाने सृष्टीच्या निर्मिती आणि कार्यासंबंधी निर्माण होणार्या प्रश्नांची उत्तरे कशी मिळू शकतील?
प्रश्न असा आहे की, पदार्थापासून अस्तित्वात येणारी ही सृष्टी अशा एका विशिष्ट स्वरूपातच कशी अस्तित्वात आली आणि एका विशिष्ट वेळेवरच कशी अस्तित्वात आली? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूक्ट्रॉनपासून अगदी एकशे दोनच रासायनिक घटक कसे काय तयार झालेत? रासायनिक घटकांच्या रचनांची अगदी निश्चित ठेवण आणि जडणघडण कशी काय आणि यापासून सूर्यमंडल व यातील प्रत्येक वस्तू अगदी नियमबद्धरीत्या कशी काय तयार झाली? पृथ्वी नावाचा हा ग्रह सौरमंडलात एका विशिष्ट अंतरावर एका विशिष्ट त्रिज्या आणि परिघात, कसा काय भ्रमण करतो? मग या पृथ्वीला असलेला हा एक विशिष्ट आकार कसा काय आहे? रासायनिक घटकांच्या संमिश्र रचनेमुळे जीवन कसे काय प्राप्त झाले? या जीवनास असंख्य स्वरूप आणि आकार कसे प्राप्त झाले? दोन अत्यंत सूक्ष्म असलेल्या शुक्रजंतुपासून मानव नावाचे अतिशय विचित्र आणि विलक्षण अस्तित्व कसे काय निर्माण झाले? असे असंख्य प्रश्न असून हे प्रश्न अत्यंत पायाभूत दर्जाचे आहेत आणि जोपर्यंत या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत या सृष्टीच्या रहस्याचा उलगडा होत नाही. या आणि यासारख्या असंख्य प्रश्नांची तुमच्याकडे काय उत्तरे आहेत?
या प्रश्नांचे एक उत्तर असे समोर येते की, जे काही घडले आणि घडत आहे, ते केवळ पदार्थाच्या आवश्यक आणि विशेष भौतिक गुणधर्मामुळेच. या प्रश्नांचे दुसरे उत्तर असे की, हे सर्वकाही योगायोग आहे. योगायोगानेच सृष्टीची निर्मिती झाली आणि योगायोगानेच ती कार्यरत आहे व तिच्यात उत्क्रांती घडत आहे.
या प्रश्नाचे तिसरे उत्तर मात्र तत्त्वज्ञानावर आधारित आणि अत्यंत विवेकपूर्ण आहे. या उत्तर देणार्याच्याच मर्जी आणि आदेशावर ही अवघी सृष्टी कार्यरत असून त्याचेच कायदे सृष्टीतील संपूर्ण बाबींवर लागू आहेत. कोणतेही लहान असो वा मोठे असो, सर्वकाही याच कायद्यानुसार होत असते. कारण त्यानेच या सृष्टीस अस्तित्व प्रदान करून एक विशिष्ट स्वरूप प्रदान केले आणि आपल्या नियमानुसार संपूर्ण सृष्टी कार्यरत आहे. त्यानेच सर्व कायदे आणि नियम लागू केलेले आहेत.
पहिल्या उत्तरासंबंधी विचार केल्यास असे वाटते की, हे उत्तर शिखर आणि प्रश्न गर्तता आहे. कारण तुम्ही पदार्थाच्या भौतिक गुणधर्मांचा उल्लेख करीत आहात आणि मी असा प्रश्न उपस्थित करीत आहे की, इलेक्ट्रान, प्रोट्रान व न्यूट्रानसारख्या अभौतिक बाबींपासून पदार्थ कसा काय अस्तित्वात आला? तुम्ही म्हणता की, पदार्थाचा आवश्यक आणि भौतिक गुणधर्म हा आहे की, यामुळे अशा स्वरूपाची एक सृष्टी अस्तित्वात यावी. मात्र ही बाब निराधार आहे. जर ही गोष्ट खरी असल्याचे मान्य केले तर आणखीन एक प्रश्न निर्माण होतो आणि तो असा की, तुमच्या दृष्टीनुसार पदार्थ हा अनादी व चिरकाल आहे, मग ही सृष्टी एका निश्चित वेळीच कशी निर्माण झाली? ती तर पदार्थाबरोबरच अस्तित्वात यावयास हवी होती. यावर तुम्ही म्हणाल की, एका दीर्घ मुदतीपर्यंत पदार्थात एका विशेष स्वरूपात उत्क्रांती घडली आणि मग सृष्टी अस्तित्वात आली. परंतु ही गोष्ट मुखावाटे काढताच तुम्ही हे स्वीकार केले की, सृष्टी पदार्थाचा आवश्यक आणि भौतिक परिणाम मुळीच नाही. प्रश्न असा आहे की, पदार्थात होणार्या उत्क्रांतीची ही विशेष पद्धतीच का? तुमच्याकडे याची केवळ दोनच उत्तरे असतील. पहिले उत्तर ‘योगायोगाने असे घडले’ आणि दुसरे उत्तर हे असेल की, कोणीतरी असामान्य व जबरदस्त कार्यक्षम शक्तीने आपल्या मर्जीने आणि पूर्ण विवेकशीलतेने पदार्थात या विशेष पद्धतीने उत्क्रांती घडविली. याशिवाय तिसरे उत्तर शक्य नाही.
आपल्याला माहीत आहे की, संपूर्ण रासायनिक घटक हे इलेक्ट्रॉन्स, प्रोट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्सपासूनच तयार होतात. मात्र या ठिकाणी मोठा विचित्र प्रश्न उभा राहतो. या इलेक्ट्रॉन्स, प्रोट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्सपासून भिन्न गुणधर्म असलेले एकशे दोन रासायनिक घटक कसे तयार होतात? कारण हे गुणधर्म तर इलेक्ट्रॉन्स, प्रोट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्समध्ये मुळीच नसतात. मग या १०२ रासायनिक घटकांपासून असंख्य सजीव, निर्जीव व भौतिक वस्तू आणि त्यासुद्धा भिन्न व परस्परविरोधी गुणधर्म असलेल्या वस्तू तयार झाल्या. हे गुणधर्म तर इलेक्ट्रॉन्स, प्रोट्रॉन्स व न्यूट्रॉन्समध्येही नसतात. शिवाय या प्रश्नाचेसुद्धा कोणाकडेच उत्तर नाही की, या रासायनिक घटकांपासून सौरमंडलातील कार्यरत असलेली प्रत्येक वस्तू विशिष्ट आकार व स्वरूपाची, विशिष्ट वातावरणात आणि विशिष्ट नियमानुसार कशी काय तयार झाली? तसेच त्या विशिष्ट गती आणि त्रिज्या व परिघातच का व कशा भ्रमण करतात? हा प्रश्न पृथ्वीविषयीसुद्धा विचारता येईल. पदार्थाच्या भौतिक गुणधर्माशी या प्रश्नांच्या उत्तरांचा कवडीमात्र संबंध नाही. शिवाय या प्रश्नाचेदेखील कोणाकडेच उत्तर नाही की, अत्यंत सूक्ष्म शुक्रजंतुपासून मानव नावाचे अतिशय विचित्र आणि विलक्षण अस्तित्व कसे निर्माण झाले?
मग तुम्ही जे म्हणता की, पदार्थास भौतिक गुणधर्म असतो, तर याची वास्तविकता काय आहे? तुम्हाला फक्त एवढेच माहीत करून घेता आले आहे की, विविध वस्तूंचे रचनात्मक घटक कोणते आहेत आणि या घटकांच्या विशेष प्रमाणातील मिश्रणाने अथवा रचनेने अमकी वस्तू तयार होते, त्या वस्तूचे अमके-तमके गुणधर्म आहेत. मात्र तुम्हाला आजपर्यंत हे माहीत होऊ शकले नाही(आणि संशोधनानेसुद्धा माहीत होणार नाही) की, असे का होते? तुम्ही पदार्थाचा जो भौतिक गुणधर्म म्हणता, तो केवळ ‘कसे’ चे उत्तर असू शकते. या उत्तराने सृष्टीचे रहस्य उलगडत नाही. यासाठी ‘का’ या प्रश्नाचे उत्तर आवश्यक आहे. मात्र तुमच्याकडे याचे कोणतेच उत्तर नाही.
एवढे सर्व काही समजल्यावर तुम्ही या वस्तुस्थितींकडे कसे दुर्लक्ष करता की, पदार्थाच्या अणूपरीक्षणानंतर पदार्थ आणि त्याचे कायदे व नियम, हे सर्वकाही फोल ठरले आहेत. एवढेच नव्हे तर लेनीनसारख्या भौतिकवादी शास्त्रज्ञाससुद्धा हे मान्य करावे लागले की,
‘‘पदार्थाचा रासायनिक गुणधर्म नष्ट होतो.’’ (संदर्भ : भौतिकवाद आणि परीक्षण, पृष्ठ क्र.२६१)
‘लेनीन’च्या या वाक्याने अशा लोकांचा जणू भरपूर खरपूस समाचार घेतला ज्या लोकांची ही विचारसरणी आहे की, सृष्टी ही एक भौतिक यंत्र असून भौतिक वैशिष्ट्यांसह ती आपोआपच कार्यरत आहे. वैज्ञानिकांनी मागे हे जाहीर केले होते की, निसर्गाची वाटचाल केवळ एकाच मार्गाने होऊ शकते आणि तो मार्ग ‘कारण आणि प्रभावा’च्या अखंड शृंखलेनुसार प्रारंभ ते अखेरपर्यंत ठरलेला आहे. मात्र सृष्टीसंबंधी ‘क्वांटम’च्या आधुनिक सिद्धान्तामुळे मागील सिद्धान्त संपुष्टात आला आहे. या आधुनिक सिद्धान्तानुसार, ही सृष्टी चालू यंत्र नसून ती चालविण्यात येत आहे.
सृष्टीतील प्रत्येक कार्य योगायोगाने होते काय?
पहिले उत्तर चुकीचे सिद्ध झाल्यावर आणि तिसरे उत्तर स्वीकार न करण्याच्या परिणामस्वरूपी केवळ दुसर्या क्रमांकाचे उत्तर शिल्लक राहते. ते असे की, ही सृष्टी केवळ योगायोगाने अस्तित्वात आली असून योगायोगानेच तिचे प्रत्येक कार्य सुरू आहे. मात्र या उत्तराला काही अर्थ आणि आधारच नाही. या उत्तराने कोणाचेच समाधान होत नाही. या सृष्टीच्या निर्माण करणार्याचे अस्तित्व मान्य न करण्याच्या हट्टापायी हे उत्तर घडविण्यात आले आहे. सृष्टी आणि तिच्या कार्यप्रणालीस पाहिल्यावर खरोखरच असे वाटते काय की, येथे घडणारी कोणतीही घटना अनियमित आणि अव्यवस्थित तसेच उद्देशहीन आहे. या प्रश्नाचे सविस्तर उत्तर मी माझ्या ‘खरेच ईश्वराची गरज नाही काय?’ या पुस्तकात दिले आहे. या ठिकाणी मी केवळ दोन-तीन वैज्ञानिकांनी केलेली चर्चा आपल्यासमोर ठेवत आहे. ‘फ्रँक एलीन’ याने एक निबंध सादर केला. या निबंधाचे शीर्षक आहे, ‘सृष्टीची निर्मिती… एक अपघात की योजना’ या निबंधात त्याने लिहिले आहे की,
‘‘जर असे गृहीत धरले की, या जगामागे कोणतीच योजना अथवा उद्दिष्टच नाही तर सहसा हे मान्य करावे लागेल की, हे रंगबिरंगी आणि गंध असलेले विश्व केवळ योगायोगाने व अपघातानेच अस्तित्वात आले. मात्र कोणतीही बाब ही केवळ गृहीत बाब नसून एक आधुनिक गणितीय सिद्धान्त आहे. याच्याच आधारावर आपल्याला सत्य आणि असत्यातील फरक ओळखता येतो व एखाद्या विशेष स्वरूपाच्या संभावित घटनेचा हिशेब लावून या गोष्टीचा खरा अनुमान लावता येऊ शकतो की, योगायोगाने ही गोष्ट सादर होणे कुठपर्यंत शक्य आहे.
सर्व सजीवांमध्ये सजीव पेशींकरिता आवश्यक असलेले घटक म्हणजे प्रथिने होय. ही प्रथिने म्हणजे पाच घटकांवर आधारित आहेत, अर्थात कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सीजन आणि गंधक. एका प्रोटीनमध्ये ४०,००० घटक असावेत. या सृष्टीत ९२ रासायनिक घटक अत्यंत विस्कळीत स्वरूपात विखुरलेले असून आता या ९२ घटकांच्या विस्कळीत ढिगारामधून निघून हे पाचही घटक अशा रितीने संकलित व्हावे की, परिपूर्ण प्रथिन आपोआप अस्तित्वात यावे. पदार्थाचे असे प्रमाण जे सतत हलविल्यास योगा त्यातून मिळणारा निश्कर्ष आणि मुदत की, जिच्या कालावधीमध्ये हे काम पूर्ण होणे शक्य व्हावे, याचा हिशोब लावून माहिती करून घेता येते.
स्वीत्झरलँडच्या एका गणिततज्ज्ञाने अर्थात ‘चार्ल्स अबूजेनगाई’ याने हा हिशोब लावला आणि याद्वारे हे संशोधन केले की, अशा प्रकारच्या योगायोगी घटनेची संभावना असण्याचे प्रमाण हे १६० पैकी १ एवढीच असणे शक्य आहे. जणू ही बाब अशक्यप्रायच आहे. प्रथिने हे अॅमिनो अॅसिडच्या लांबलचक कार्यशृंखलेतून अस्तित्वात येतात. यामध्ये ही शृखला संकलित होण्यास सर्वांत जास्त महत्त्व आहे. जर हे चुकीच्या पद्धतीने संकलित झाले तर जीवनामृत सिद्ध होण्याऐवजी अथवा जीवनाचे अस्तित्व कायम राहण्याऐवजी हे एक अत्यंत तीव्र स्वरूपाचे विष तयार होईल. इंग्लंडचे प्रोफेसर ‘जे. बी. लेदर्झ’ यांनी म्हटले की, एका साध्यासुध्या प्रथिनाच्या शृंखलेस संकलित करण्याच्या लक्षावधी पद्धती असू शकतात. अर्थात(१०)४८ इतक्या पद्धती असू शकतात. यावरून हे लक्षात येते की, एवढ्या मोठ्या संख्येत असणार्या संकलन पद्धतीने संकलन होणे हे योगायोग नाही.
शिवाय प्रथिन हीसुद्धा रासायनिक वस्तू आहे. यामध्ये जीवनाचे मुळीच अस्तित्व नसते. जेव्हा यात आत्मा येतो, तेव्हा कुठे यामध्ये जीवन निर्माण होते. हे काही योगायोग नसून याकरिता अत्यंत आणि असामान्य बुद्धिमान असलेला ईश्वरच सर्वकाही करू शकतो.’’
हे आहे ‘चार्ल्स अबुजेनगाई’ या गणितज्ज्ञाचे मत की, एक प्रथिन संकलन हे योगायोगाने अस्तित्वात येऊच शकत नाही. यावरून लक्षात येते की, या महाकाय भूतलावर असलेली ही सृष्टी आणि या विश्वात घडणार्या अत्यंत नियमबद्ध घटना व घडामोडी योगायोगानेच कशा काय घडतील?
‘जॉन क्लेवी लँड’ या शास्त्रज्ञाने असे मत मांडले की, ‘‘अत्यंत सूक्ष्म घटकांच्या रसना विभिन्न प्रकारच्या संपूर्ण रासायनिक प्रक्रियांवरून हेच सिद्ध होते की, हे सर्व अत्यंत नियोजनबद्ध असलेल्या नैसर्गिक नियमांच्या अनुसार कार्य होत आहे. यात योगायोग नावाच्या बाबीचा लवलेश मात्र असणे अशक्य आहे. आपण जर थोडा विचार केला की, १०२ रासायनिक घटकांमध्ये किती विचित्र विषमता, विलक्षण साम्य आणि प्रमाणबद्ध संबंध आढळतात. हे सर्वकाही असून आणि कमालीची विषमता असूनसुद्धा अथवा साम्य असूनसुद्धा या १०२ रासायनिक घटकाचा प्रत्येक कण समानरीत्या तीन प्रकारच्या विद्युत घटकांवर आधारित असतो. प्रोटॉन, न्यूक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे खरे पाहता एका धन आणि एका ऋण घटकांच्या मिलनामुळे अस्तित्वात येतात. आता असे समजण्यास हरकत मुळीच नाही की, पदार्थ हा अणू आणि रेणूंच्या रचनेचेच दुसरे नाव आहे. यातील रचनात्मक घटक… न्यूट्रॉन्स, प्रोट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स तसेच ऊर्जासुद्धा हे सर्वच्या सर्वच आपापल्या परिमंडलात अगर भ्रमण वर्तुळात एका सुनियोजित व्यवस्थेनुसार कार्यरत असतात, आहेत. यांच्या अवस्था अगर कार्यात कोणत्याही प्रकारच्या योगायोग किवा अपघाती घटनेची साधी कल्पना करणेसुद्धा शक्य नाही. नियजोनबद्धतेचे यापेक्षा जास्त उत्कृष्ट उदाहरण आणखीन कोणते असू शकते की, रासायनिक घटक(१०)१ ची ओळख आणि वैशिष्ट्य त्याच्या विशेष घटकां(१७) च्या अभ्यासावरून करून घेण्यात आली आहे. हा या वास्तविकतेचा स्वीकृत योग्य सबळ पुरावा आहे की, हे रंगीत व गंध असलेले विश्व एका विवेकपूर्ण, उद्दिष्ट्यपूर्ण आणि सुनियोजित व्यवस्थेनुसार कार्यरत आहे. मग कोणत्या विवेकी आणि सजग असलेल्या माणसाला असे वाटेल की, हा स्थिर आणि विचारशक्तीहीन असलेला पदार्थ अपघाती स्वरूपात आपोआपच अस्तित्वात आला आहे? मुळीच नाही. असे कदापि शक्य नाही. असे कसे शक्य होईल की, ही विश्वव्यवस्था कोणताही हेतु आणि उद्दिष्ट नसताना व या अथांग विश्वव्यवस्थेमागे कोणतीही कार्यकारी शक्ती नसताना अत्यंत नियमबद्ध योजनबद्धरीतीने कार्यरत आहे.’’‘जेरल्ड टी’ नावाच्या आणखीन एका शास्त्रज्ञाने आपल्या भावना व्यक्त करताना हे रहस्योद्गार काढले,
‘‘मला पूर्ण विश्वास आहे की, एक अत्यंत शक्तिशाली आणि सामर्थ्यशाली ईश्वर आहे. तो सतत वनस्पती आणि पशु-पक्ष्यांच्या, ओथंबून आणि खळखळून वाहणार्या नद्या आणि अथांग पसरलेल्या सागरांच्या, न मोजता येणार्या व चमकणार्या नक्षत्रांच्या व आकाशगंगेच्या, विविध आणि विलक्षण कार्यात आपल्या सक्षम आणि नियोजनबद्ध व कलात्मक कार्याचे दर्शन घडवितो. त्याच्या या कार्यामध्ये प्रामुख्याने निम्नलिखित बाबींचे दर्शन घडते.
  1. व्यवस्थापन : एका पेशीतून अस्तित्वाची निर्मिती आणि कलात्मक विकास अत्यंत नियमबद्ध आणि विलक्षण व चमत्कारिकरीत्या होते.
  2. रचना : एका साध्या रोपट्याची निर्मितीसुद्धा इतक्या कलात्मक आणि रचनाबद्ध करण्यात आलेली आहे की, मानवी बुद्धी याची कल्पनासुद्धा करू शकत नाही.
  3. सौंदर्य : रोपटे, मुळे, पाने, फुले आणि त्यातील रंग आणि सुगंधात, ईश्वरीय सौंदर्यनिर्मितीची विलक्षण अनुभूती येते. असे विलक्षण सौंदर्य मानवनिर्मितीत निर्माण होणे अशक्य होय.
  4. जन्म : रोपटे आपल्या सजातीय वनस्पतीच जन्म देतात. गव्हातून गहूच, आंब्यातून आंबा किवा बाभळीतून बाभळीचेच झाड जन्म घेते. सहस्त्रावधी वर्षे लोटली तरी या नियमांत काहीच फरक पडला नाही.
या सर्वच पुराव्यांतून एकच बाब सिद्ध होते की, या नियोजनकार्यामागे एका असामान्य कार्यकुशल व सामर्थ्यशील अस्तित्वाची करणी आहे. त्याच्या निर्मितीसामर्थ्य आणि कार्यसामर्थ्याची मर्यादा मानवी कल्पनेच्या बाहेर आहे. याच अस्तित्वाचे नाव ‘अल्लाह’ असे आहे.
संबंधित पोस्ट
Febuary 2024 Rajab 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
29 18
30 19
31 20
1 21
2 22
3 23
4 24
5 25
6 26
7 27
8 28
9 29
10 30
11 Sha'ban 1
12 2
13 3
14 4
15 5
16 6
17 7
18 8
19 9
20 10
21 11
22 12
23 13
24 14
25 15
26 16
27 17
28 18
29 19
1 20
2 21
3 22

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *