पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्ही स्त्रीयांशी फक्त त्यांचे सौंदर्य पाहूनच विवाह करू नका, शक्य आहे की त्यांचे सौंदर्य त्यांचा विनाश करील. तद्वतच केवळ त्यांची संपत्ती पाहूनही त्यांच्याशी विवाह करू नका. शक्य आहे की संपत्तीमुळे त्यांनी तुमची अवज्ञा करावी. खासकरून जेव्हा तुमच्या व तिच्या आर्थिक परिस्थितीत खूप तफावत असेल तेव्हा अवज्ञेची दाट शक्यता असते. – तुम्ही (दीन) चारित्र्यालाच प्राधान्य देऊन त्यांच्याशी विवाह करा. एक काळीसावळी, मोलमजुरी करणारी मात्र चारित्र्यसंपन्न स्त्री (अल्लाहच्या नजरेत त्या रूपवान व धनाढ्य स्त्रीपेक्षा) बेहतर आहे.’’
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एकदा म्हटले की, ‘‘सहसा चार बाबींचा विचार करून स्त्रीयांशी विवाह केला जातो.
(१) तिची संपत्ती पाहून,
(२) तिचे खानदान, कुळाचे श्रेष्ठत्व पाहून,
(३) तिचे सौंदर्य पाहून आणि
(४) तिची (दीनदारी) चारित्र्यसंपन्नता पाहून.
तुम्ही हे सदैव ध्यानात ठेवा की तिच्या चारित्र्यसंपन्नतेलाच प्राधान्य द्यावे.’’
(इब्ने माजा, दारमी, अबू दाऊद)
निरुपण
विवाह करताना बहुतांशी लोक फक्त सौंदर्य आणि संपत्तीलाच प्राधान्य देतात. आचारविचार, चारित्र्यसंपन्नतेला हवे तेवढे महत्त्व देत नाहीत. वैवाहिक जीवनाच्या खNया सुखसमाधानासाठी सौंदर्यापेक्षा व संपत्तीपेक्षा चारित्र्यसंपन्नताच अधिक महत्त्वाची आहे. मानवी जीवनात शीलाला जे महत्त्व आहे ते सौंदर्याला व संपत्तीला कदापि नाही. म्हणूनच आपल्या जीवनाच्या साथीदाराला निवडताना चारित्र्यसंपन्नतेला महत्त्व देण्यासंबंधी पैगंबरांनी उपदेश केला आहे. हा उपदेश केवळ मुलगी पसंत करतानाच नव्हे तर मुलगा पसंत करतानाही महत्त्वाचा आहे. निव्वळ सौंदर्य व संपत्ती पाहून करण्यात आलेले विवाह अनेकदा मोकळीस येतात आणि पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
आचारविचारांना, चारित्र्यसंपन्नतेला महत्त्व देणे हेच माणसाच्या चारित्र्यसंपन्नतेचे लक्षण आहे. जे लोक शीलतेकडे दुर्लक्ष करून केवळ संपत्ती व सौंदर्याच्या मागे धावतात त्यांना खरे वैवाहिक सुखसमाधान कदापि लाभू शकत नाही. सद्य अनुभव असा आहे की लोक म्हणतात आमच्या मुलाला स्थळ पाहा. ‘अट काय?’ अशी विचारणा केल्यावर त्यांची पहिली डिमांड असते की मुलगी गोरीपान, सुंदर हवी! आणि वर हुंडा भरपूर हवा. खरे पाहता, या दोन्ही गोष्टी चारित्र्यासमोर गौण आहेत. हुंडा घेणे देणे तर चक्क हराम आहे. पैगंबरांच्या उपरोक्त उपदेशाचा सारांश हा आहे की एकाधी काळीसावळी मात्र शीलवान, चारित्र्यसंपन्न मुलगी एखाद्या रूपवान, गोऱ्यापान, धनाढ्य व चंगळवादी विचारसरणीच्या मुलीपेक्षा केव्हाही बेहतर आहे.
– संकलन : डॉ. सय्यद रफीक
0 Comments