Home A आधारस्तंभ A रोजा (उपवास)

रोजा (उपवास)

सर्वच प्रेषितांच्या काळात ‘रोजा’ अनिवार्य स्वरुपात होता आणि प्रेषित मुहम्मद (स) यांच्यावरसुद्धा ही उपासना अनिवार्य करण्यात आली. दिव्य कुरआनात म्हटले आहे की,
‘‘रोजा तुमच्यावर अनिवार्य करण्यात आला, जसा तुमच्या पूर्वीच्या लोकांवर करण्यात आला होता.’’ (संदर्भ : दिव्य कुरआन)
यावरून हे आपोआपच स्पष्ट होते की, इस्लामच्या स्वभावाशी या (रोजामुळे होणाऱ्या) प्रशिक्षणाचा विशेष संबंध आहे.
नमाज, जकात आणि हजप्रमाणेच रोजासुद्धा सारख्याच स्वरुपाचा स्तंभ आहे. ‘रोजा’ या उपासनेमुळे जो प्रभाव पडतो, तो नमाजमुळे मानवी जीवनावर होणाऱ्या प्रभावांना बळ आणि शक्ती प्रदान करतो. नमाज ही रोजची प्रशिक्षण व्यवस्था आहे. थोड्या-थोड्या वेळाने ‘नमाज’चा उत्तम प्रभाव दररोजच मानवी स्वभावात सुधारणा घडवून आणतो. अर्थात स्वभाव आणि वर्तन सुधारण्याचे दररोजचे पाच वेळचे औषधच जणू. परंतु ‘रोजा’ ही उपासना वर्षभरात एकच महिन्याची जबरदस्त प्रशिक्षण व्यवस्था आहे. रोजच्या प्रशिक्षणामध्ये निर्माण होणाऱ्या थोड्याफार त्रुटींची भरपाई करण्याकरिता वर्षभरात जवळपास सातशे वीस तासांचे हे अखंड प्रशिक्षण आहे. यात माणूस अत्यंत शिस्तबद्ध व्यवस्थेचा पुरेपूर लाभ घेतो. या प्रकरणात आपण हेच पाहणार आहोत की ‘रोजा’च्या स्वरुपात मिळणारे प्रशिक्षण मानवीय स्वभावात आणि आचरणात कशा प्रकारे सुधारणा घडवून आणते.
‘रोजा’ चे परिणाम
‘रोजा’ या उपासनेचे नियम असे आहेत की, यासाठी रात्रीच्या उत्तरार्धात आणि सूर्य उगवण्याच्या जवळपास दोन-अडीच तासांपूर्वी ‘सहेरी’ खावी लागते, अर्थात जेवण करावे, पाणी प्यावे, वगैरे, यानंतर सहेरी खाण्याची वेळ संपण्यापासून ते सूर्य मावळेपर्यंतच्या या दिवसभराच्या काळात खाणे, पिणे आणि आपल्या पत्नींशी जवळीकता साधणे निषिद्ध ठरविण्यात आले आहे. मग सूर्य मावळताच या बाबीं अर्थात जेवण-खाण आणि पती-पत्नींचे संबंध ‘वैध’ होतात. अर्थात दिवसभरात लावण्यात आलेले बंधन तुटते, तसेच दुसऱ्या दिवशीची ‘सहेरी’ खाण्यापर्यंत या बाबींची परवानगी असते. मग सहेरी खाल्ल्यानंतर परत अन्न-पाणी वर्ज्य होते आणि पती-पत्नी संबंध करणेही वर्ज्य ठरते. रमजान महिण्याच्या पहिल्या तारखेपासून सतत एक महिना हे चालू असते. याचा अर्थ असा की, जोपर्यंत परवानगी आहे तोपर्यंत माणसाने अन्न खावे, पाणी प्यावे, वैवाहिक संबंध प्रस्थापित करावे आणि जेव्हां याच कर्मांची मनाई झाली, या कर्मांपासून स्वतःस रोखावे.
दासत्वाची जाणीव
या प्रशिक्षण व्यवस्थेवरून सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट होते ती ही की, इस्लाम या प्रशिक्षणाच्या माध्यमाने मानवामध्ये अथवा मानवाच्या विवेकबुद्धीमध्ये ईश्वराचे स्वामित्व आणि सार्वभौमत्वाची जाणीव निर्माण करतो. तसेच ही जाणीव एवढी भक्कम स्वरुपात प्रदान करण्यात येते की, मानव हा आपले स्वातंत्र्य आणि अधिकारसुद्धा ईश्वरास समर्पित आणि स्वाधीन करतो. ईश्वराचे हे सार्वभौमत्व आणि स्वामित्व मान्य करणे हाच इस्लामचा आत्मा आहे आणि याच मान्यतेच्या आधारावर माणूस हा मुस्लिम असतो. केवळ ईश्वराचे अस्तित्व मान्य केल्याने इस्लामची मागणी पूर्ण होत नाही. केवळ वैचारिकरीत्या तो मुस्लिम असून चालत नाही, वैचारिकदृष्ट्या हे मान्य करून चालणार नाही की, या सृष्टीचा निर्माता आणि ही सृष्टी चालविणारा केवळ ईश्वरच आहे, तर या वैचारिक दृष्टिकोनास कृतीची जोड असणे आवश्यक आहे. या विचारसरणीचा मूळ उद्देश हा आहे की, माणसाने ही वास्तविकता मान्य करण्याबरोबरच तिच्या तात्त्विक आणि स्वाभाविक परिणामांचा स्वीकार करावा. म्हणजे ज्याअर्थी माणूस ही गोष्ट मान्य करतो की, त्याचा स्वतःचा आणि या संपूर्ण विश्वाचा निर्माता आणि पालक तसेच आदेशक हा केवळ ईश्वरच असून संपूर्ण विश्व आणि विश्वातील प्रत्येक बाब त्याच्याच इशाऱ्यावर चालते, तो हेही मान्य करतो की, ईश्वराचा कोणीही भागीदार नाही, त्याअर्थी त्याने स्वतःस ईश्वराच्या स्वाधीन करावयास हवे, आत्मसमर्पण करावयास हवे, म्हणजेच त्याचे दासत्व स्वीकारावयास पाहिजे. यालाच वस्तुतः ईश्वराची उपासना असे म्हणतात. माणसाने ईश्वराप्रती तेच वर्तन आणि नाते अंगीकारावे, जे स्वामीप्रती त्याच्या दासाचे असते. हीच बाब ‘इस्लाम’ आणि ‘इस्लामचा इन्कार’ या दोन अवस्थांना विभक्त करते. इस्लामचा इन्कार यालाच म्हणतात की, मानव ईश्वराच्या मुकाबल्यात स्वतःचे सार्वभौमत्व आणि स्वामित्व प्रस्थापित करण्याचा गैरसमज करून घेऊन अगदी बेजबाबदारपणे वागतो, मनमानी जीवन जगतो, आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वाटेल त्याचा बळी देतो, आपलेच आदेश आणि कायदे लागू करण्यासाठी चांगले-वाईट न पाहता पृथ्वीवर उपद्रव माजवितो. त्याच्या या स्वैर वर्तनामुळे सर्वचजण संकटात सापडतात. याच्या अगदी उलट ‘मुस्लिम’ या शब्दाची परिभाषा आहे. म्हणजेच माणसाने स्वतःस ईश्वराचा दास आणि आपल्या प्रत्येक कर्मास जवाबदार समजावे. तसेच याच दासत्वाच्या आणि जवाबदारीच्या जाणीवेसह या जगात जीवन जगावे. ईशद्रोहाच्या अवस्थेतून निघून इस्लामच्या अवस्थेत येण्यासाठी ज्याप्रकारे अल्लाहचे स्वामित्व अथवा प्रभुत्व सच्चा अंतःकरणाने मान्य करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इस्लाममध्ये राहण्यासाठीसुद्धा याची नितांत आवश्यकता आहे की, माणसाच्या मनात आणि विचारबुद्धीत आपल्या दासत्वाची जाणीव प्रत्येक क्षणी जिवंत आणि कृतीशील असावी. कारण की, ही जाणीव आणि विवेकता संपताच माणसात स्वतःच्या सार्वभौमत्व आणि स्वामित्वाच्या भावनेचा तसेच बेजाबदारपणाचा शिरकाव होतो. त्याचप्रमाणे ईशद्रोहाची ती अवस्था निर्माण होते, ज्यात माणूस असे समजून काम करतो, त्याचा प्रभू अल्लाह तर नाहीच शिवाय अल्लाहसमोर त्यास आपल्या बुऱ्या-भल्या कर्मांचा जाबसुद्धा द्यावा लागणार नाही.
वर उल्लेख केल्याप्रमाणे, ‘नमाज’चा सर्वप्रथम हेतु मानवामध्ये इस्लामच्या याच अवस्थेचे वारंवार नुतनीकरण होणे हा आहे. त्याचप्रमाणे रोजाचा हेतुसुद्धा हाच आहे. परंतु या दोन्हींत फरक असा आहे की, नमाज दररोज थोड्या-थोड्या वेळाने ही जाणीव जिवंत करते आणि रमजान महिण्यातील रोजे वर्षभरात एकदाच सातशे वीस तासांपर्यंत मानवास या अवस्थेत बांधील ठेवते. यामुळे माणसाचे संपूर्ण मन व विचारबुद्धी प्रभावीत करते व हा प्रभाव वर्षभर राहतो. रोज्यांचे एवढे कडक नियम पाळण्यासाठी अथवा हे नियम आपल्यावर लागू करून घेण्यासाठी या गोष्टीची आवश्यकता आहे की, त्याने ईश्वरास आपला स्वामी वा प्रभू जाणावा. तसेच आपले स्वातंत्र्य आणि अधिकार ईश्वराच्या स्वाधीन करावे. ज्याअर्थी तो ईश्वरीय आज्ञापालन करण्यासाठी दिवसभर बारा-बारा आणि तेरा-तेरा तास अन्न व पाण्यावाचून राहतो, वैवाहिक संबंधांपासून दूर राहतो, ईश्वराच्या मर्जीनुसार जगतो आणि संध्याकाळी ईश्वराच्या आज्ञेचे पालन करून रोजा सोडतो. असे सतत एक महिनाभर करीत असतो. याचाच अर्थ असा की, त्याने आपले जीवन ईश्वरीय आज्ञेच्या स्वाधीन केले. आपल्या इच्छा-आकांक्षा, विचारधारा, कृती, अधिकार ईश्वराच्या स्वाधीन केले. आपल्या सर्वस्वावर ईश्वराचे प्रभुत्व आणि स्वामित्व लागू केले. आपल्या दासत्वाचा ठोस पुरावा दिला. तसेच याची त्यास कायमस्वरुपी जाणीव राहिली. अगदी एका क्षणासाठीही तो गाफील राहिला नाही व ईश्वराचा नियम तोडला नाही.
आदेशपालन
दासत्वाच्या जाणीवेबरोबरच जी बाब परिणामस्वरुपात समोर येते ती ही की, माणूस स्वतःला ज्याचा दास समजतो, त्याच्या आदेशाचे त्याने पालन अवश्य करावे.
या दोन्ही बाबींत असा नैसर्गिक आणि तात्त्विक संबंध आहे की, हे दोन्ही एकमेकांपासून कधीच विभक्त होऊ शकत नाहीत. कारण दासत्वाच्या जाणीवेचा हा परिणामच आहे की, दास हा आपल्या स्वामीच्या आदेशांचे पालन करतो. एखाद्यास जोपर्यंत स्वामी स्वीकारण्यात येत नाही, तोपर्यंत त्याच्या आदेशांचे पालन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग जर खरोखरच एखाद्यास स्वामी स्वीकारले असेल तर त्याच्या दासत्वापासून मुक्त राहण्याचा प्रश्नच नाही.
अशाप्रकारे रोजाच्या माध्यमाने माणूस आपल्या सर्वस्वांवर ईश्वरीय कायदा लागू करतो. या प्रशिक्षणात केवळ दोन प्रकारच्या इच्छा निवडण्यात आल्या आहेत. अर्थात अन्नपाणी ग्रहण करण्याची इच्छा आणि पती-पत्नींच्या समागमाची इच्छा, याशिवाय या काळात विश्रांती करण्याचीही पाहिजे तशी संधी मिळालेली नाही. कारण संध्याकाळी ‘तरावीह’ची नमाज या महिन्यात अदा करावी लागते.
असुरी इच्छांच्या याच प्रमुख तीन मागण्या असल्याने यावर चांगलीच गदा येते. जीवन जगण्यासाठी अन्न-पाण्याचे सेवन, शरीरसुखासाठी विरुद्धलिगी समागम आणि विश्रांती याच तीन गरजा समस्त असुरी मागण्या पूर्ण करण्याचे मूळ स्त्रोत आहे. या मागण्या एवढ्या शक्तीशाली असतात की, यांच्यासमोर माणूस विवश होतो. मानवास जे शरीर प्रदान करण्यात आले आहे, त्याच्यासुद्धा याच तीन प्रमुख मागण्या आहेत. मानव हा इतर सर्व प्राण्यांपेक्षा उच्च दर्जाचा जीव असल्यामुळे त्याच्या मागण्यासुद्धा भरमसाठ वाढलेल्या असतात. फक्त जगण्यापुरते अन्न मिळाल्यावरही त्याचे समाधान होत नसते, तर त्याला चांगल्या प्रतीच्या भोजनाची इच्छा असते. विरुद्धलिगी समागमासाठीसुद्धा त्याच्या मागण्या भयंकर असतात. मग पुरुष असो वा स्त्री असो, त्यातील त्याची आवड-निवड आणि इतर छंद कमालीचे असतात. या सर्व इच्छा प्रत्येक पुरुष आणि स्त्री पूर्ण करून घेऊ इच्छिते. अर्थात या इच्छा व कामनांना मर्यादाच नसते. शरीर जोपासण्यासाठी केवळ झोप म्हणून चालत नाही. यातसुद्धा त्याचे कितीतरी नखरे असतात. त्याला वाटते की, कमीत-कमी श्रमामध्ये जास्तीतजास्त लाभ व्हावा, यासाठी तो तऱ्हेतऱ्हेच्या युक्त्या काढतो. आता खरे म्हणायचे तर माणसाच्या याच त्या तीन प्रकारच्या असुरी इच्छा आणि कामना आहेत, ज्यांच्यासाठी तो जीवनभर धडपडत असतो, एवढेच नव्हे, तर वाटेल ते करून या तिन्ही इच्छा पूर्ण करण्याची धडपड करीत असतो. येथेच माणसास पराजय पत्करावा लागतो. याच तीन इच्छांसमोर तो आपले सर्वस्व अर्पण करतो, याच तिन्ही इच्छांचा तो गुलाम बनतो आणि या तिन्ही इच्छा माणसाला आपल्या तालावर जीवनभर नाचवीत असतात. माणसाने जर या तिन्ही असुरी इच्छांवर ताबा मिळविला नाही आणि त्यांची वेसन ढिली सोडली, तर मात्र तो या इच्छांचा दास व त्या त्याच्या स्वामी होतात. ईश्वराने माणसाला जी विवेकशक्ती आणि इतरांना समोहित करण्याची पात्रता व क्षमता दिली आहे, या सर्व प्रकारच्या पात्रता आणि क्षमता या तिन्ही इच्छांच्या पूर्ततेत माणूस खर्च करीत असतो. उच्चकोटीच्या मानवी उद्दिष्टांच्या ठिकाणी नीच प्रकारचे हेतु साधण्यात जीवन खर्च होते. रात्रंदिवस केवळ एवढेच काम त्याला असते व नवनवीन साधनांचा यासाठी तो वापर करीत असतो. परिणामी माणूस हा माणूस न राहता असुर बनतो. त्याच्या अमर्याद इच्छांची भूक, लैंगिक तृष्णा कधीच संपत नाही.
या संकटापासून वाचण्यासाठी केवळ एवढे पुरेसे ठरत नाही की, त्याच्यासमोर मानवी जीवनाचे मूळ उद्दिष्ट ठेवण्यात यावे आणि त्यास मानवीय शक्तींचा योग्य वापर करण्याचा उपदेश द्यावा. त्याला या उपदेशाबरोबरच या गोष्टीचीसुद्धा गरज आहे की, त्याच्या या असुरी इच्छांचा त्याच्याशी जो नैसर्गिक आणि स्वाभाविक संबंध आहे, त्यास वास्तविक स्वरुप द्यावे आणि योग्य सराव करून घेऊन माणसाला एवढे शक्तिशाली आणि चपळ व तापट बनवावे की, त्यास या तिन्ही इच्छांवर सहजपणे ताबा मिळविता यावा. या इच्छांचा तो दास नव्हे स्वामी व्हावा आणि या असुरी इच्छा त्याच्या दासी व्हाव्यात. वास्तविकता अशी आहे की, या इच्छांवर केवळ ताबा मिळविणे हे आपले उद्दिष्ट नाहीच व त्याचप्रमाणे आपणही त्यांच्या अधीन व्हावे, हेसुद्धा आपले उद्दिष्ट नाही. याचे मुख्य उद्दिष्ट असे आहे की, या इच्छा पूर्णही व्हाव्यात, परंतु त्या ईश्वरीय आज्ञेनुसार पूर्ण व्हाव्यात. ईश्वराने नेमून दिलेल्या मार्गावर या इच्छांची पूर्तता व्हावी. हाच मूळ उद्देश यामागे आहे. ‘रोजा’ च्या अवस्थेमध्ये माणूस याकरिता आपल्या या तिन्ही इच्छांचे लाड पुरवीत नाही की, त्याला ईश्वराचा असा आदेश असतो. ईश्वराचा आदेश असल्यामुळेच तो सकाळ होण्यापूर्वीची ‘सहरी’ खातो, ईश्वराच्या आदेशानेच तो दिवसभर अन्न-पाणी वर्जित करतो, ईश्वराच्या आज्ञापालनासाठीच तो वैवाहिक समागमापासून दूर राहतो आणि ईश्वराची आज्ञा पूर्ण करण्यासाठीच तो संध्याकाळी सूर्य मावळताच रोजा सोडतो, अन्न-पाणी ग्रहण करतो, वैवाहिक संबंध प्रस्थापित करतो. अशा प्रकारे चोवीस तास माणसाच्या संपूर्ण इच्छा-आकांक्षा आपल्या नव्हे तर ईश्वराच्या ताब्यात येतात. हा सराव दरवर्षी महिनाभर असतो. यामुळे या इच्छांची मुस्कटदाबीही करण्यात येत नाही आणि त्यांना स्वैरही सोडण्यात येत नाही, तर त्यांना योग्य वळण लावण्यात येते.
या जगात अशा लोकांचीसुद्धा भरमसाठ संख्या आहे, जे आपल्या इच्छांची मुस्कटदाबी करण्याचे अघोरी कृत्य करतात आणि यालाच पुण्यकर्म समजतात. वैराग्य, संन्यास, ब्रह्मचर्य याच रकाण्यात मोडतात. अन्न-पाणी न घेता आपले शरीर वाळविणे, ब्रह्मचर्याच्या नावावर स्वतःवरच अत्याचार करणे व या प्रकारच्या ना-ना तऱ्हेने अनैसर्गिक कृत्य करणे हे कोणत्या पुण्यकर्मात बसते? हा एक संशोधनाचा विषय आहे. यामुळे आत्मिक विकासाची आशा बाळगणे हा केवळ कल्पनाविलास आहे. या अनैसर्गिक विचारसरणीच्या आधारावरच आपल्या आत्मा व शरीराचे नैसर्गिक अधिकार हिरावून घेण्याचे महापाप घडले आहे. ईश्वराने या सृष्टीत अन्न, पाणी, फळे, स्त्री-परुष संबंध आणि यासारख्या अनेक बाबी मानवाच्या उपजीविकेसाठी आणि रंजनासाठीच निर्माण केल्या आहेत. मात्र आपण याच ईश्वराच्या अमूल्य देणग्या नाकारून अनैसर्गिक कृत्य करतो, ही विचित्र बाब आहे. ईश्वराने प्रदान केलेली ही सुख-साधने ईश्वराच्या कायद्यानुसार वापरणे हाच ‘रोजा’चा उद्देश होय.
माणसाने वैराग्य आणि ब्रह्मचर्याच्या नावावर आपल्या आत्मा व शरीरावर कशासाठी एवढे अत्याचार करावे? माणसाचे शरीर व आत्मा आणि त्याच्या इच्छा व आकांक्षा, तसेच त्याच्या भावना व आवडीनिवडी या सर्व ईश्वराची अनामत आहेत. मग आपल्याला या अनामतीत ढवळाढवळ करण्याचा अधिकार दिलाच कोणी? ईश्वराने प्रदान केलेल्या शरीरावर अन्याय आपण का म्हणून करावा? त्याच्या वैध इच्छांची एवढी निर्दयीपणे कशासाठी मुस्कटदाबी करावी? आणि खरे सांगायचे असेल तर, या सर्व उचापती केवळ आपले वर्चस्व इतरांवर प्रस्थापित करण्यासाठी आहेत, ही एक उघड वास्तविकता आहे. माणूस संन्यासी झाला, माणूस वैरागी झाला, माणसाने ब्रह्मचर्य पत्करले, माणसाने संसारत्याग केला, अर्थात संसाराच्या जवाबदाऱ्यांतून पळ काढला, ईश्वराने घालून दिलेल्या सामाजिक बांधिलकी आणि जवाबदाऱ्यांना पाठ दाखविली, ईश्वराने प्रदान केलेल्या शारीरिक आणि आत्मिक इच्छा-आकांक्षावर घोर अन्याय केला, एवढेच नव्हे तर आपण मोठे धार्मिक, धर्मात्मा, संन्यासी आणि ब्रह्मचारी भासवून वर्चस्व गाजवून त्यांच्या धार्मिक भावनांशी खेळ खेळला. हे सर्व काय आहे ? याला कसली धार्मिकता म्हणता येईल?
नैसर्गिक धर्माची तर ही मागणी आहे की, माणसाने पोटाला खावे. चांगले अन्न ग्रहण करावे. ईश्वराच्या कृपाफळांचा स्वाद घ्यावा. लग्न करून संसार थाटावा. आई-वडिलांची काळजी घ्यावी, त्यांची सेवा करावी. वैध धंदा-व्यापार वा नोकरी करून पत्नीचे वैध लाड पुरवावे. तिला शरीरसुख द्यावे. तिच्याकडूनही शरीरसुख घ्यावे. मुलांबाळांना योग्य शिक्षण-प्रशिक्षण द्यावे. समाजात सद्वर्तनाने जगावे. गरजवंतांच्या गरजा पूर्ण कराव्यात. भुकेल्यांना अन्न द्यावे, विवस्त्रांना वस्त्र द्यावे, अत्याचारपीडितांचे अश्रू पुसावेत, योग्य आणि समर्थपणे आपल्यावर असलेले इतरांचे अधिकार पूर्ण करावेत, अशारीतीने समर्थपणे जीवन जगावे, अशी असेल धार्मिकता तर ठिक, नसता काय उपयोग त्या धर्माचा आणि भक्ती व पूजापाठाचा आणि त्या कर्मकांडाचा! ज्या धार्मिकतेमुळे भुकेल्यास अन्न मिळत नसेल, वस्त्रहीनास वस्त्र मिळत नसेल, अनाथ व दुर्बलांना आश्रय मिळत नसेल, अन्याय व अत्याचार दूर होत नसेल, तर असा धर्म आणि अशी व्यवस्थाच काय उपयोगाची, जो धर्म मानवांत समता, न्याय आणि बंधुत्व प्रस्थापित करू शकत नसेल, ज्या धर्माच्या नावावर माणसांत आणि माणसांच्या मनात दुरावा निर्माण होत असेल, धर्माच्या नावावर माणसांचे मुडदे पडत असतील, ज्या धर्माच्या नावावर स्त्रियांचे शोषण होत असेल, त्या धर्माचा उपयोगच काय?
ईश्वराने मानवासाठी त्याचा अधिकार निश्चित केला. त्यासाठी उपजीविकेची वैध साधने उपलब्ध केली. त्याच्या नैसर्गिक इच्छा आणि भावना पूर्ण करण्यासाठी आवश्यक बाबी निर्माण केल्या आणि त्या ईश्वरीय नियमांवर पूर्ण करण्यास पुण्यकर्म आणि ईश्वरप्रसन्नता ठरविले. मात्र आपल्या इच्छा अनावर होऊन जेव्हा निषिद्ध वस्तुंची मागणी करतात आणि यासाठी माणूस जगात उपद्रव माजविण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ईश्वराने त्यासाठी कडक निर्बंधसुद्धा लावले आहेत. परंतु ज्या ठिकाणी मानव आपल्या गरजा वैधरीत्या आणि ईश्वराच्या मर्जीनुसार पूर्ण करू इच्छित असेल तर, ईश्वराने याकरिता आपली दारे सदैव उघडी ठेवली आहेत. याच बाबींचा सराव रमजान महिण्यात करून घेण्यात येतो. या सरावांमुळे माणसात धर्मपरायणता निर्माण होते.
रोजाचा सामुदायिक लाभ
इस्लामचा मूळ उद्देश हा सद्वर्तन आणि सज्जनांचा असा समुदाय निर्माण करणे आहे की, जो मानवसंस्कृतीची निर्मिती भलाई आणि चांगुलपणाच्या व नैतिकतेच्या आधारावर करतो. परंतु हे उद्दिष्ट साधण्यासाठी केवळ सामुदायिक नियमांची निर्मिती करुन ठेवण्यावर इस्लामने समाधान मानले नसून यासाठी तो एक परिपूर्ण नागरी व्यवस्था उभी करण्यासाठी अशा व्यक्तींना तयार करतो ज्यांचे विचार, आचरण, जीवनशैली आणि योग्य भूमिका इस्लामी व्यवस्थेशी समरुप असते. त्याचप्रमाणे मनावर कसलेही ओझे न ठेवता, विवशतेने ईश्वराच्या मर्जीवर न जगता अगदी आत्मसमाधानाने, आत्मप्रसन्नतेने, प्रामाणिकपणाने, तसेच आत्मप्रेरणेने ईश्वराच्या आज्ञेचे त्या (भूमिका) पालन करणाऱ्या असतात. या योजनेत रोजाचे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य पुढीलप्रमाणे आहे –

  • १) ‘रोजा’ च्या माध्यमाने होणाऱ्या प्रशिक्षणामुळे समुदायाच्या प्रत्येक व्यक्तीस अल्लाहच्या प्रभुत्वासमोर आपले स्वातंत्र्य आणि अधिकार समर्पित करण्यासाठी तयार करण्यात येते, जेणेकरून आपले समस्त जीवन ईश्वरीय आदेशांच्या अधीन व्हावे.
  • २) प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरण व विचारबुद्धीत ईश्वराच्या अमर्याद ज्ञानाची आणि परलोकी जाब देण्याची जाणीव अशारीतीने निर्माण व्हावी की, ती स्वतः आपल्या व्यक्तिगत जवाबदारीच्या जाणिवतेच्या आधारावर ईश्वरीय आज्ञेचे पालन करील.
  • ३) प्रत्येक व्यक्तीमध्ये ही प्रेरणा निर्माण करण्यात यावी की, ईश्वराशिवाय कोणीही दासत्वास पात्र नाही, उपासना केवळ त्याचीच करावी, ही बाब श्रद्धात्मक आणि कार्यात्मक या दोन्ही पैलुंनी सिद्ध व्हावी. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने केवळ ईश्वराचेच स्वामित्व, प्रभुत्व आणि आदेश स्वीकारावेत, एखादा आदेश, नियम वा कायदा समोर आल्यास तो ईश्वरीय प्रमाणानुसार असेपर्यंत त्याचे पालन करू नये.
  • ४) प्रत्येक व्यक्तीचे नैतिक प्रशिक्षण अशारीतीने व्हावे की, तिला आपल्या इच्छा व आकांक्षा आणि भावना व अभिलाषांवर पूर्ण ताबा मिळावा. तिला आपला लोभ, इच्छा आणि अभिलाषांवर एवढे प्रभुत्व अथवा पकड असावी की, आपली श्रद्धा, विवेक आणि विचारबुद्धीनुसार त्यांचा योग्य वापर करणे शक्य व्हावे. तिच्यामध्ये संयम, त्याग, ईश्वरावर श्रद्धा आणि स्थैर्य, यासारखे गुणधर्म निर्माण व्हावेत. त्याच्या वर्तनात एवढी शक्ती व क्षमता निर्माण व्हावी की, तिच्यावर कोणताही दबाव आला तरी ईश्वरीय आदेशपालनात ती डगमगता कामा नये.

हीच ती प्रमुख उद्दिष्टे आहेत, जी साध्य करण्यासाठी इस्लामने रमजानचे रोजे प्रत्येकावर अनिवार्य केले आहेत. मग ती पुरुष असो वा स्त्री, ही उद्दिष्टे साधण्यासाठी इस्लामशिवाय अख्ख्या जगात कोणतीच व्यवस्था अस्तित्वात नाही व येणारही नाही.
‘रोजा’ चा सामुदायिक पैलू
नमाजप्रमाणेच रोजासुद्धा एक व्यक्तिगत कर्म असले तरी, ज्याप्रमाणे नमाजकरिता सामुदायिकतेची अट लावून या कर्मास सामुदायिकतेचे स्वरुप देण्यात आले आहे, त्याचप्रमाणे ‘रोजा’लासुद्धा सामुदायिक उपासनेचे स्वरुप देऊन याच्या फायद्यांना अमर्याद स्वरुपात वाढविण्यात आले. याकरिता ईश्वराने ही योजना आखली की, यासाठी एका विशिष्ट महिन्याची निवड करण्यात आली. तसेच सर्वांसाठी वेळापत्रक ठरवून देण्यात आले. ईश्वराने नेमून दिलेल्या वेळापत्रकानुसारच सर्वांवर रोजे ठेवण्याचे बंधन टाकून या उपासनेत सामुदायिकतेचा आत्मा फुंकला.
सामूहिकतेची भावना
या सामुदायिकतेचा दुसरा लाभ हा आहे की, यामुळे लोकांत नैसर्गिक आणि मौलिक ऐक्य निर्माण होते. कारण यामध्ये सर्वांनाच रोजा असतो, सर्वांच्या श्रद्धा, भावना एकच असतात, सर्वांचा ध्यास एकच असतो, सर्वांचे विचार एकच असतात.
ज्या समुदायात या बाबी सारख्याच अथवा एकच असतात, तेथेच खरे ऐक्य आणि सौख्य नांदत असते. कोणीच स्वतःस वेगळा, पृथक वा अजाण समजत नाही. सर्वजण आपले आणि आपण सर्वांचे असल्याची वास्तविकता समोर येते. सर्वांनाच तहाण व भूक लागलेली असते. सर्वांचेच दुःख सारखे असते. संध्याकाळी सर्वचजण रोजा सोडतात, तेव्हा सर्वांनाच एकाच वेळी आनंद होतो. याच सर्व बाबी सर्वांना सामायिक असतात आणि यामुळेच असामान्य ऐक्य निर्माण होते.
रोजाचा आत्मिक प्रभावसुद्धा सर्वांवरच सारखा पडतो. कारण सर्वांनाच ईशप्रसन्नतेची आत्मिक तृष्णा लागलेली असते. ईशप्रसन्नतेची आस सर्वांची एकच असते. दिवसभर अन्न-पाण्यावाचून राहणे हे केवळ ईशप्रसन्नेसाठीच असते. तेव्हा याचा सामुदायिक स्थैर्यावर जबरदस्त परिणाम होतो.
याच एकत्रित कर्मांमुळे लोकांत ऐक्य, प्रेम, बंधुत्व निर्माण होते. म्हणून प्रत्येकजण नेकी आणि चांगुलपणात एक-दुसऱ्याची साथ देतात. प्रत्येकजण ईशपरायणतेच्या अथांग सागरात बुडालेले असतात. यापेक्षा उत्तम प्रकारचे ऐक्य भूतलावर कोठेच सापडणे शक्य नाही
सहकार्याचा आत्मा
या सामूहिक उपासनेचे आणखीन एक जबरदस्त कार्य हे अस्थायी स्वरुपात सर्व लोकांना एका स्थानावर संघटित करते. श्रीमंत हा श्रीमंत जरी असला आणि गरीब हा गरीब राहिला तरीसुद्धा श्रीमंतांवरसुद्धा रोजाचा असा प्रभाव पडतो की, त्याला उपासमार झेलणाऱ्याची जाणीव होते. कारण तोसुद्धा दिवसभर अन्न-पाण्यावाचून राहात असल्याने भुकेल्या आणि तहाणलेल्या दीन-दलित आणि पामरांच्या उपासमारीच्या परिस्थितीची प्रखर जाणीव होते. ईश्वराची प्रसन्नता मिळविण्याखातर तो या भुकेल्या व तहाणलेल्या लोकांच्या मदतीसाठी सरसावतो, यामुळे गरिबांना श्रीमंताविषयी असलेला हेवा आणि द्वेषाची भावना नष्ट होते आणि या ठिकाणी कृतज्ञता, प्रेम आणि बंधुत्वाची भावना निर्माण होते. तसेच समाजातील सामुदायिक मतभेद नष्ट होतात. ज्या राष्ट्रात अगर समूहात अशा प्रकारची सहकार्याची भावना नसते, त्या राष्ट्र अगर समुदायाची शकले पडतात. ज्या समुदायाच्या लोकांना भूक आणि तहाण काय असते हेच माहीत नसेल तर त्यांना दीन-दुबळ्यांच्या पोटाची आग कशी असते, याची जाणीव होणारच कशी? परंतु ‘रोजा’मुळे प्रत्येक सक्षमास अक्षमाच्या अंतःकरणाचा टाहो स्पष्टपणे ऐकू येतो आणि त्याला गरिबांची मदत केल्याशिवाय समाधान व सुख लाभत नाही. शिवाय ‘रोजा’सारखी कडक आणि कठीण उपासना स्वीकार करण्याची स्वतः ईश्वरानेच आज्ञा केली आहे ती अशी की,
‘‘ज्यांनी सदका आणि फित्र (दान-धर्म) दिला नाही, त्यांचे रोजे माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत.’’ (दिव्य कुरआन)
अर्थात गरिबांना आणि भुकेल्यांनासुद्धा आपल्या अन्न-पाण्यात सामील करून घेतल्याशिवाय आणि त्यांना अन्नदान केल्याशिवाय ईश्वर ‘रोजा’ सारखे पुण्यकर्म स्वीकार करीत नाही. या उच्चतम कर्मासाठी ईश्वराने ताकीद तर केलीच, शिवाय रोजामध्ये श्रीमंतास होणाऱ्या भुकेच्या वेदना आपोआपच त्याला यासाठी प्रेरित करतात. ज्या श्रीमंतांनी कधीच भुकेचा आणि तहाणेचा अनुभव घेतलेला नसतो आणि जेव्हा जनता दुष्काळाने ‘भूक-भूक भाकरी द्या’ सारख्या घोषणा देत राज्यकर्त्यांसमोर केविलवाणा टाहो फोडतात, तेव्हा त्यांना याचे खूप आश्चर्य होते, ते त्या गरिबांना उत्तर देतात,
‘‘भाकरी काय मागता? भाकरी नसेल तर केक खा!’’
ही विदारक अवस्था इतिहासाने पाहिलीच आहे. एवढेच नव्हे, तर या भूतलावरील श्रीमंताचे अंतःकरण एवढे निर्धास्त आणि मृत झालेले आहे की, त्यांच्या पाळीव कुत्र्यांना खाण्यासाठी लक्षावधींचा खर्च येतो, मात्र त्यांना उकिरड्यावर कचरा वेचून पोटाची खळगी भरणाऱ्यांची जाणीव होत नाही. या असमतोलतेवर लिहिण्यासाठी येथे वाव नाही.
‘रोजा’ ही उपासना इस्लामचा क्रमांक दोनचा स्तंभ आहे. याच्या माध्यमाने इस्लाम हा व्यक्तींना व्यक्तिगत प्रशिक्षण देऊन त्यांना सामाजिक बांधिलकीच्या दोऱ्यात मोत्यांप्रमाणे गुंफतो. त्यांची एक संघटना निर्माण करतो, एक विशेष समुदाय तयार करतो. इस्लामचे अंतिम लक्ष्य हे आहे की, या जगाच्या पाठीवर सत्य, न्याय, समानता आणि बंधुत्वाची स्थापना व्हावी. याच हेतुपूर्तीस्तव इस्लामने नमाज आणि रोजाच्या माध्यमाने सत्य स्थापण्याच्या व्यवस्थेसाठी लागणारे शिपाई, लष्करप्रमुख आणि विविध पदाधिकारी त्याचप्रमाणे शिक्षक, प्रशिक्षक, न्यायाधीश, व्यापारी, मजूर, कारागीर, उद्योजक, शेतकरी, सल्लागार, प्रतिनिधी आणि नागरिक तयार करण्याची व्यवस्था निर्माण केली आहे. यामुळेच एक सुशील आणि प्रमाणिक शासन व्यवस्था अस्तित्वात येऊ शकते.

संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *