Home A प्रेषित A ‘मौता’ आणि ‘तबूक’चे युद्ध

‘मौता’ आणि ‘तबूक’चे युद्ध

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी सत्यधर्माचे प्रसारकार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे कार्य सुरुच ठेवले. याच कार्याचा एक भाग म्हणजे आदरणीय प्रेषितांनी माननीय हारिस बिन उमैर(र) यांना ‘सीरिया’कडे दूत म्हणून पाठविले. परंतु ‘हिरकल’ सम्राटाचा राज्यपाल शुरह बिल बिन अम्र याने त्यांना रस्त्यातच शहीद केले. हे पातक कृत्य मानवनीतीची पायमल्ली करणारे आणि दूतांचे अधिकृत अधिकार हिरावून घेणारे असल्याने इस्लामी शासन एवढे घोर पाप सहन करण्याएवढे आणि आपले मूल्य पायदळी तुडविताना उघड्या डोळ्यांनी तमाशा पाहण्यासारखे तर मुळीच नव्हते.
‘मौता’चे युद्ध अगोदरच घडले होते. ते असे की, हिजरी सन ७ मध्ये ‘जमादिलआखिर’च्या महिन्यात आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी माननीय जैद बिन हारिसा(र) यांच्या नेतृत्वात तीन हजारांचे सैन्य ‘सीरिया’च्या ‘बलका’ या प्रदेशाकडे पाठविले होते. हे सैन्य रवाना करण्यासाठी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) जातीने मदीना शहराबाहेर त्यांच्यासोबत गेले होते.
हे सैन्य जेव्हा ‘मुआन’ या ठिकाणी पोहोचले तेव्हा ‘सम्राट हिरकल’ तेथे दौर्यावर आल्याचे समजले. त्याच्यासोबत खूप बलाढ्य लष्कर आणि मोठ्या संख्येत ख्रिस्ती समुदाय होता. त्याच्यासोबत असलेल्या लष्कराची आणि ख्रिस्ती समुदायाची संख्या जवळपास एक लाखावर होती. इस्लामी लष्कराच्या अधिकार्यांनी सल्लामसलत करून निर्णय घेतला की शत्रूच्या बलाढ्य सैन्यास न घाबरता त्याचा सामना करू. ‘मुशारिफ’ या ठिकाणी दोन्ही सैन्याची टक्कर झाली. तुंबळ युद्ध सुरु झाले. या युद्धात इस्लामी लष्कराचे सेनापती माननीय जैद बिन हारिसा(र) हुतात्मे झाले. सेनापतींचा झेंडा माननीय जाफर(र) यांनी सांभाळला आणि त्यांनीही शत्रूंचे नव्वद घाव शरीरावर झेलून आपल्या प्राणाचे बलिदान दिले. नंतर माननीय खालिद बिन वलीद(र) पुढे सरसावले आणि शत्रूसैन्यावर अक्षरशः तुटून पडले. शत्रूवर हल्ला करताना त्यांच्या हातून नऊ तलवारी तुटल्यात. अंततः शत्रूसैन्य पराभूत झाले. इस्लामी लष्कराचे बारा शूर वीर या युद्धात शहीद झाले.
अत्यंत कमी संख्येत असलेले आणि कमी शस्त्रसामुग्री असलेले इस्लामी लष्कर ही मोहीम फत्ते करून परतले. याच युद्धामधील विजयाचे श्रेय माननीय खालिद बिन वलीद(र) यांना मिळाले आणि आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्यांना ‘सैफुल्लाह’ (अर्थात ईश्वराची तलवार) हा किताब बहाल केला.
हा ‘मौता’ च्या युद्धाचा वृत्तान्त आहे. याच युद्धाचा दुसरा भाग म्हणजेच ‘तबूक’चे युद्ध होय. ‘तबूक’चे युद्ध हे इस्लामी इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण अध्याय आहे. मक्काच्या विजयानंतर हिजरी सन ०९ च्या रजब महिन्यात खबर मिळाली की, ‘सम्राट हिरकल’चे लष्कर मदीना शहरावर हल्ला करण्याची ‘सीरिया’मध्ये जोरदार तयारी करीत आहे. ‘सम्राट हिरकल’ हा अफाट भूप्रदेशाचा सम्राट होता आणि त्याने ‘ईराण’च्या अफाट शक्तिशाली शासनास पराभूत केले होते. त्यामुळे त्याच्या नावाने संपूर्ण जगाचा थरकाप उडत असे. परंतु इस्लामी शासन मात्र जगातील कोणत्याही शक्तीला न जुमानता सत्यधर्माचा प्रसार करीत होते.
‘मदीना’ शहरास केंद्र बनवून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी मोठ्या त्याग व परिश्रमाने इस्लामी राज्याची स्थापना केलेली होती. त्यामुळे या शासनास क्षती पोहोचणे म्हणजे एक असहनीय बाब होती. म्हणून असा ठाम निर्णय घेण्यात आला की, कोणत्याही परिस्थितीत रोमन सम्राटाच्या सैन्यास अरब प्रदेशात घुसू न देता बाहेरच हे युद्ध सर करावे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी इस्लामी लष्कराने युद्धाची जोरदार तयारी सुरु केली. उन्हाची रखरख वाढलेली होती. दुष्काळही पडलेला होता. अशा विषम परिस्थितीतही आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी युद्धासाठी वर्गणी देण्याचे आवाहन करताच मुस्लिमांनी वर्गणीचे असे उदाहरण सादर केले की, ही बाब जगाच्या इतिहासात इतरत्र कोठेच सापडत नाही. एकट्या माननीय उस्मान(र) यांनी नऊशे उंट आणि शंभर घोडे प्रेषितांना सादर केले. माननीय अब्दुर्रहमान बिन औफ(र) यांनी ४० हजार दिरहम (आजचे जवळपास आठ लाख रुपये) चा प्रेषितांसमोर ढीग लावला. माननीय अबू बकर सिद्दीक(र) यांनी तर घरातील संपूर्ण संपत्तीच अगदी झाडू मारून आणून प्रेषितांसमोर हजर करून या देणगीस्पर्धेत बाजी मारली. माननीय उमर(र) यांनी आपल्या पूर्ण संपत्तीचा निम्मा भाग प्रेषितांसमोर ठेवला. परंतु या देणगीकार्यात सर्वांत जास्त पुण्य मिळविणारे एक गरीब श्रमिक होते की, ज्यांनी दिवसभर पाण्याचे डोल खेचून खेचून चार शेर खजुरी मजुरीत मिळविल्या आणि दोन शेर खजुरी आपल्या परिवारासाठी ठेवून दोन शेर खजुरी प्रेषितांच्या सेवेत अर्पण केल्या. त्यांची ही त्यागभावना पाहून सर्वांच्या पापण्या पाणावल्या आणि प्रेषितांनीसुद्धा आपले आनंदाश्रू आवरत त्यांच्या दोन शेर खजुरी सर्वांनी दिलेल्या देणगीच्या ढिगार्यावर ठेवून त्यांचा सन्मान वाढविला. स्त्रियांनीसुद्धा आपल्या त्यागभावनांना वाट काढून देत आपल्या शरीरांवरील सोने-चांदीचे सर्व दागिने प्रेषितांसमोर टाकले.
अशा प्रकारे परिपूर्ण त्याग आणि बलिदानाच्या भावनेतून ३० हजाराचे इस्लामी सैन्य तयार झाले. हे लष्कर ‘तबूक’च्या ठिकाणी पोहोचताच अशी माहिती मिळाली की, आता शत्रूपक्षाने इस्लामी शासनावर हल्ला करण्याचा निश्चय सोडून दिला आहे. खरे पाहता ‘सीरिया’ देशाच्या राजास कोणीतरी चुकीची वार्ता कळविली होती की, प्रेषितांचा देहान्त झाला असून इस्लामी राज्यावर हल्ला करण्याची ही उत्तम संधी आहे. परंतु त्यास जेव्हा सत्य परिस्थिती समजली की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) जीवित असून मदीनाचे इस्लामी शासनही अबाधित आहे, तेव्हा त्यांच्या हल्ल्याच्या तयारीवर विरजन पडले.
मग प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘तबूक’मध्ये एक महिनाभर थांबून बरेच कार्य तडीस लावले. या महिन्याभराच्या कार्यकाळात ‘ऐला’ या ठिकाणच्या राजाने आत्मसमर्पण करून कर निश्चित करून समझोता केला. त्याचबरोबर ‘अरबा’ आणि ‘अजरुह’च्या लोकांनीसुद्धा ‘जिजया’ (रहिवासी कर) प्रेषितांना सादर केला. माननीय खालिद बिन वलीद(र) यांना चारशे सैनिकांची तुकडी देऊन ‘दौमतुल जुन्दल’च्या राज्यपाल ‘उकैदर’वर ताबा मिळविण्यासाठी पाठविण्यात आले. या लढाईत ‘उकैदर’चा भाऊ ठार झाला आणि ‘उकैदर’ला कैदी बनविण्यात आले. त्याने ‘जिजया’ देण्याचे स्वीकारले आणि अशा प्रकारे संपूर्ण उत्तर क्षेत्रावर इस्लामी शक्तीचा प्रभाव कायम झाला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) मदीना शहरी परतले. या अतिशय कठीण परिस्थितील युद्धात सामील न होणारे बरेचसे दांभिकजण मदीना शहरात होते. आदरणीय प्रेषितांनी त्यांना युद्धात सामील न होण्याचा जाब विचारला, तेव्हा त्यांनी खोटेनाटे निमित्त प्रेषितांसमोर ठेवले. आदरणीय प्रेषितांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु काही निष्ठावान लोकही असे होते की, ज्यांच्याकडून या महत्त्वाच्या युद्धात सहभागी न होण्याची चूक घडली. नंतर एके दिवशी उन्हाच्या वेळी ते आपल्या परिवारजणांसह थंड सावलीत बसले असताना अचानक उठून म्हणाले की, ‘‘हे ईश्वरा! तुझे प्रेषित तर अशा तीव्र उन्हात युद्धासाठी प्रवासावर निघालेत आणि मी मात्र आपल्या परिवारासह थंड सावलीत आहे!’’ असे म्हणून त्यांनी तत्काळ आपल्या उंटावर स्वार होऊन प्रेषितांच्या लष्करात सहभागी झाले.
या प्रसंगाची आणखीन एक विचित्र घटना अशी घडली की, माननीय काब बिन मालिक(र), हिलाल बिन उमैया(र) आणि माननीय मुरारह बिन रूबैअ(र) हे तिघें प्रेषितांचे निष्ठावंत सोबती असूनही युद्धात सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे आदरणीय प्रेषितांनी ईश्वराचा आदेश येईपर्यंत त्यांना सामूहिक जीवनापासून विभक्त होण्याचा आणि आपापल्या पत्नींशी दूर राहण्याचा आदेश दिला. प्रेषितांची ही नाराजी या तिघांना खूप असह्य ठरली. त्यांनी हे दिवस अतिशय शोकावस्थेत काढले. अशा या शोकाकुल अवस्थेत आणि अरिष्टपूर्ण परिस्थितीत मुस्लिम समुदायाची कोणतीच व्यक्ती त्यांच्याशी बोलतदेखील नव्हती. याच काळात ‘गस्सानी’च्या राजाने ‘माननीय काबबिन मालिक(र)’ यांना पत्र पाठविले की,
‘‘आम्हास अशी माहिती मिळाली आहे की, तुमच्या प्रमुख असलेल्या मुहम्मद(स) यांनी तुमच्यावर अत्याचार केला. कदाचित त्यांना तुमची कदर नसावी. तुम्ही सरळ आमच्या छत्रछायेत या. आम्ही तुमची कदर करू आणि तुम्हास वाट्टेल ते देऊ!’’
माननीय काब बिन मालिक(र) यांनी त्याचा प्रस्ताव झुगारून दिला, त्याचे पत्र जाळून टाकले. कारण ते खरोखरच प्रेषितांचे निष्ठावंत असून कोणीही त्यांच्या निष्ठेस खरेदी करण्याच्या लायकीचा नव्हता. जगातील कोणत्याही संपत्तीस ते प्रेषितांच्या निष्ठेवर ओवाळून टाकीत असत. अशा या शोकाकुल आणि कठीण वातावरणात पूर्ण पन्नास दिवस व्यतीत झाले आणि मग ईश्वराने या तिघांना जाहीर माफी दिली. मदीना शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि सर्व बाजूंनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत गेला. माननीय काब बिन मालिक(र) यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि अत्यानंदाच्या भरात त्यांनी आपल्या संपत्तीचा एक मोठा भाग दान केला.
हाच आहे तो चारित्रिक आदर्श. हा आदर्श आदरणीय प्रेषितांच्या सत्यधर्म आंदोलनास हवा होता आणि हा आदर्श निर्माण करण्यात इस्लामी विचारशक्तीचा इतिहासात नेहमीच विजय झाला.
आणखीन एक महत्त्वाची घटना अशी की, या युद्धात माननीय अब्दुल्लाह बिन दुबजादैन(र) या तरूणास हौतात्म्य मिळाले. अगदीच तारूण्याच्या उंबरण्यावर त्यांना इस्लामचे निमंत्रण मिळाले आणि त्यांचे अंतःकरण इस्लामच्या विचारसरणीने प्रभावित झाले. परंतु यामध्ये त्यांच्या काकांचा खूप विरोध होता. मक्का विजयानंतर आदरणीय प्रेषितांसह परत आल्यावर त्यांनी आपल्या काकांना इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रण देताना म्हटले की, ‘‘हे काकावर्य! आपण इस्लाम स्वीकारण्याची बर्याच वर्षांपासून मी वाट पाहत आहे. परंतु अद्यापही आपले अंतःकरण पाणावलेले नाही. आता मला इस्लाम धर्म स्वीकारण्याची परवानगी द्यावी.’’
परंतु पाषाणहृदयी काकांनी त्यांना खडसावले की, ‘‘जर तुम्हास मुहम्मद(स) यांची साथ द्यायचीच असेल तर खुशाल द्या! परंतु तुमच्या संपूर्ण वडिलोपार्जित संपत्तीतून एक कवडीदेखील मिळणार नाही. शिवाय तुमच्या अंगावरील हे वस्त्रसुद्धा मिळणार नाही. माननीय अब्दुल्लाह(र) म्हणाले, ‘‘हे काका! आता मूर्तीपूजेचा मला खूप कंटाळा आलेला आहे. मी तर केवळ एकाच ईश्वराची उपासना करण्याच्या मानसिकतेत आहे.’’ मग त्यांनी आपल्या आईकडून एक घोंगडी पांघरली आणि शरीरावरील पोषाख काकाच्या स्वाधीन करून आदरणीय प्रेषितांच्या सेवेत हजर झाले.
हे क्रांतिकारी तरूण जिहाद (धर्मयुद्ध) आणि हौतात्म्याची तीव्र प्रेरणा घेऊन प्रेषितांच्या लष्करात सामील झाले आणि त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. मग आदरणीय प्रेषितांनी स्वतःहून त्यांचा दफनविधी केला आणि ईश्वरदरबारी प्रार्थना केली की,
‘‘हे ईश्वरा! मी यांच्याशी राजी आहे. तूसुद्धा यांच्यावर प्रसन्न हो!’’
हे दृष्य पाहून ‘माननीय इब्ने मसऊद(र)’ यांच्या मुखावर शब्द आले की,
‘‘या कबरीत मलादेखील दफन करण्यात आले असते, तर किती चांगले झाले असते!!!’’
‘तबूक’ नंतरच्या दोन महत्त्वाच्या घटना
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) ‘तबूक’च्या युद्धावर रवाना होण्यापूर्वी काहीजण प्रेषितांना येऊन भेटले आणि म्हणाले की, ‘‘आम्ही वृद्ध आणि अपंगांच्या सवलतीसाठी आणि विशेष करून पावसाळ्यात होणारी गैरसोय टाळण्यासाठी ‘कुबा’ मस्जिदच्या जवळच ‘बनी सालिम’ मोहल्यात एक मस्जिद बांधली असून तिच्या उद्घाटनास्तव आपण येऊन नमाज पढवावी. या प्रसंगी प्रेषितांचे संपूर्ण लक्ष ‘तबूक’च्या मोहिमेच्या तयारीकडे केंद्रित झालेले असल्याने त्यांना सांगितले की, ‘‘‘तबूक’च्या मोहिमेवरून परत आल्यावर पाहू या!’’
ही मस्जिद ९२ दांभिक जणांच्या एका गटाने ‘अबू आमेर’ या दांभिकाच्या नेतृत्वात बांधली होती. त्याने आपल्या गटास सांगितले होते की, ‘‘शक्य होईल तेवढी हत्यारे गोळा करून ठेवावीत. मी रोमन सम्राटाशी साठगाठ करून ‘मुहम्मद(स)’ आणि त्यांच्या सहकार्यांना मदीना शहरातून बाहेर घालवितो.’’ याबरोबरच आपल्या दांभिक अनुयायांना असेदेखील सांगितले होते की, मी प्रत्येक सूचना कोणत्या ना कोणत्या मार्गे तुमच्यापर्यंत पोहोचवीत राहीन. परंतु यासाठी तुम्ही एका मस्जिदीची निर्मिती करावी. त्या मस्जिदमध्ये मी पाठविलेला खबर्या असेल. तो प्रवासी म्हणून तेथे मुक्कामास असेल आणि कोणासही शंकादेखील येणार नाही. अशा प्रकारे इस्लामी शासनाविरुद्ध कट शिजला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे ‘तबूक’च्या मोहिमेवरून परत येताना ‘जी- अवान’ या ठिकाणी पोहोचताच ईश्वराने आपल्या वाणीद्वारे प्रेषितांना या कटाबाबतीत सूचना दिली. याप्रसंगी आदरणीय प्रेषितांनी आपल्या दोन निष्ठावान सहकार्यांना दांभिकांनी निर्माण केलेली मस्जिद जमीनदोस्त करण्याचे आणि तेथील संपूर्ण साहित्यास आग लावून जाळण्याचे आदेश दिले. हे दोन्ही सहकारी तत्काळ दांभिकांच्या मस्जिदवर पोहोचले आणि मस्जिदीस जमीनदोस्त करून सर्व साहित्या जाळून भस्म केले. या मस्जिदच्या बाबतीत ईश्वराने अत्यंत कडक शब्दांत वर्णण केले. ते अशा प्रकारे,
‘‘ज्या लोकांनी इस्लामविरोधी कारस्थानांचा अड्डा बनविण्यासाठी आणि श्रद्धावंतांमध्ये फूट टाकण्यासाठी, ईश्वर आणि प्रेषितांविरुद्ध आणि इस्लामविरुद्ध लढण्यासाठी या मस्जिदीजी निर्मिती केली, तेव्हा त्या मस्जिदमध्ये मुळीच जाऊ नये.’’(दिव्य कुरआन)
या घटनेवरून हा सिद्धान्त समोर येतो की, केवळ मस्जिदीचा सांगडा उभा करून ती इमारत ईशपरायणता, संयम आणि पावनतेचे केंद्र होत नसते. यासाठी इमारत निर्मात्यांच्या निश्चयानुसारच योग्य परिणाम मिळेल. याचबरोबर मस्जिद ही ईश्वर आणि प्रेषितांच्या विरुद्ध कारवाया करण्याचेच केंद्र बनता कामा नये आणि एवढेच नव्हे तर मस्जिद ही मुस्लिमांदरम्यान फूट पाडण्याचे केंद्रसुद्धा बनता कामा नये.
दुसरी महत्त्वाची घटना ही घडली की, इस्लामी शासनाने जकातव्यवस्था स्थापन केली. हिजरत (मदीना स्थलांतर) च्या नवव्या वर्षी मुहर्रम महिन्याची पहिलीच तारीख उगवली असताना संपूर्ण मानवतेचे हितेषी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी देशभर जकात वसुलीची विधिवत वसुलीची व्यवस्था लागू केली. हा महिना म्हणजे जकात (जण कल्याण कर) च्या वसुलीचे स्मरण करून देणारादेखील आहे. जवळच्या आणि दूरवरच्या विविध कबिल्यांकडे जकात वसुलीप्रतिनिधी पाठविण्यात आले. या वसुलीप्रतिनिधींना जमा करून प्रेषितांनी आदेश दिला की, लोकांच्या संपत्तीतून उत्तम प्रतीचा माल गोळा करावा.
या ठिकाणी ही बाब स्पष्ट करणे आवश्यक ठरते की, एकेश्वरवादाच्या मुळावर आधारलेले इस्लामी शासन हे पारलौकिक यशाबरोबरच मानवाच्या रोजीरोटीचा प्रश्नसुद्धा सोडविते. अंतःकरणाच्या पावित्र्याबरोबरच पोटापाण्याची समस्यासुद्धा सोडविते. आजच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यास ही बाब अत्यंत प्रखरतेने जाणवते की, रोजीरोटीविना श्रद्धा अथवा ईश्वरी मार्गदर्शनापासून वंचित असलेल्या निधर्मी सत्तेमुळे जग किती भयंकर संकटात सापडलेले आहे. ऐहिक आणि सामाजिक समस्यांना डावलून होणारी ईश्वरभक्ती, तसेच रोजीरोटी सोडविणारी किवा रोजीरोटीच्या वैध अधिकारांचा विसर पाडणारी श्रद्धा म्हणजेच एक अतिशय विषम आणि असंतुलित व अनैसर्गिक बाब होय. अशा बाबींना इस्लाम धर्मात कोणतेच स्थान नाही.
सुरुवातीस ज्या वेळी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी एकाच ईश्वराच्या उपासनेचा प्रचार केला, त्यात नमाज पढण्याबरोबरच दुर्बलजणांना भोजन देण्याचासुद्धा प्रचार केला. अर्थातच दीनदुबळ्यांच्या पोटापाण्याची समस्या सोडविल्याशिवाय एकेश्वरवादाचा हेतूच मुळी पूर्ण होत नाही. हेच दानधर्म पुढे चालून अनिवार्य करण्यात आले आणि याचेच नाव ‘जकात’ असे होय. कारण याच जकातीच्या अर्थसाह्यावर दीनदुबळ्यांच्या आणि पददलितांच्या सर्व समस्यांचे समाधान होते. म्हणूनच इस्लामी शासनाने ही व्यवस्था सुरु केली. जकातीची मात्रा, प्रमाण व दर निश्चित करण्यात आले, जेणेकरून प्रत्येक सधन व्यक्तीकडून रोकड आणि अन्नाची ठराविक मात्रा घेऊन आर्थिक दुर्बल, निराधार आणि पददलितांना जणांना देण्यात यावी.
वास्तविक पाहता इस्लामी समाजाची व्यवस्थाच बंधुभावावर आधारलेली आहे आणि इस्लामी अर्थव्यवस्थेस आपण ‘आर्थिक भातृत्व’ असे म्हणू शकतो. प्रत्येकाच्या पडत्या अवस्थेत त्याला हात देऊन आणि जीवनाच्या शर्यतीत मागे पडणार्याला हात देऊन पुढे आणण्याची व्यवस्था म्हणजेच ‘जकात’ होय.
एका कबिल्याने या प्रसंगी जकात वसूल करणारे ‘माननीय बिशर(र)’ यांना विरोध करताना म्हटले की, ‘‘ईश्वराची शपथ! येथून एक उंट ही हलू देणार नाही.’’ प्रेषितांना या घटनेची खबर मिळताच पन्नास जणांच्या तुकडीसह ‘माननीय उऐना बिन हिसन(र)’ यांना पाठविले. ‘माननीय उऐना(र)’ यांनी तेथील अकरा पुरुषांना व २१ स्त्रियांना अटक करून प्रेषितांसमोर हजर केले. शेवटी ‘तमीम’ कबिल्याचे प्रतिनिधी मंडळ प्रेषितांना भेटण्यासाठी आले आणि त्यांच्या घरासमोर ओरडून म्हणू लागले,
‘‘हे मुहम्मद(स)! बाहेर या! आम्ही तुमच्याबरोबर कविताशास्त्रात स्पर्धा करु इच्छितो, पाहू या कोण जिकतो ते!’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे तर सभ्यता आणि शिष्टाचाराचे आदर्श आणि अग्रदूत होते. प्रेषितांशी असे हे असभ्यवर्तन ईश्वरास नाराज करणारे होते. त्यामुळे ‘सूरह-ए-हुजरात’च्या क्रमांक ४ आणि ५ च्या आयती अवतरल्या. मग आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) घरातून बाहेर आले. माननीय बिलाल(र) यांनी जुहरची (दुपारच्या नमाजची) अजान दिली. नमाज आटोपल्यावर प्रेषितांनी मस्जिदीच्या अंगणात येऊन प्रतिनिधी मंडळास येण्याचे कारण विचारले. मंडळाने उत्तर दिले, ‘‘आम्ही आमचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आलो आहोत!’’ (अशा प्रकारे श्रेष्ठत्व सिद्ध करणे हे अरब संस्कृतीचा एक भाग होता.) ‘तमीम’ कबिल्याने आपल्या वाडवडिलांचे गुणगान केले. त्यांच्या उत्तरादाखल प्रेषितांकडून ‘माननीय साबित बिन कैस(र)’ यांनी आपल्या वंशाचे गुणगान न करता ईश्वराचे महिमत्व वर्णन केले आणि प्रतिनिधी मंडळाच्या ‘अकरा बिन हाबिस’ने म्हटले की, ‘‘खरोखरच आमच्या कवी आणि वक्त्यांपेक्षा प्रेषितांचे कवी आणि वक्ते जास्त पारंगत आहेत. वंशश्रेष्ठत्वापेक्षा त्यांनी ईश्वरमहिमेचे गुणगान वर्णन केले!’’ आणि मग या संपूर्ण प्रतिनिधी मंडळाने इस्लाम स्वीकारला. प्रेषितांनी त्यांच्या सर्व कैद्यांना सोडून दिले.
संबंधित पोस्ट
October 2024 Rabi'al Awwal 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *