कायदा मानवी जीवनाच्या कोणत्याही विभागाशी संबंधीत असो, मानव आणि मानवी सभ्यतेसाठी त्याची आवश्यकता महत्वाची असते. त्याच्या अभावी मानवाचे श्रेष्ठत्व कायम राहू शकत नाही आणि सभ्यतेचे अस्तित्वही शिल्लक राहू शकत नाही. कायद्यामुळे मानवी समूहाचे ‘समाजामध्ये’ रूपांतरण होते. कायद्यामुळे लोकांच्या अधिकाराचे संरक्षण होते आणि सामुहिक जीवनास शक्ति प्राप्त होते. अत्याचार आणि समाजविघातक दुष्कृत्यामुळे होणार्या विनाशापासून समाजाला कायद्यामुळे संरक्षण मिळते, न्याय आणि शांती लाभते. मानवी सभ्यतेच्या वृद्धीस कायद्यामुळे संधी प्राप्त होते. कायद्याची पकड जर नसेल तर सर्वत्र अराजक पसरेल. म्हणून कायद्याचे अस्तित्व आणि कायदा विषयक संस्थांची स्थापना ह्या समाजाची अपरिहार्यता आहेत.
चांगल्या कायद्याची मौलिक वैशिष्ठये
चांगल्या कायद्यासाठी दोन वैशिष्ठयांची जरूरी असते:
चांगल्या कायद्यासाठी दोन वैशिष्ठयांची जरूरी असते:
- ज्या समाजासाठी कायद्याची निर्मिती झाली आहे आणि ज्या कायद्याची बंधने समाजाने स्वीकारली आहेत, तो कायदा समाजाच्या प्रगतिचे आणि यशाचे खरे साधन बनले पाहिजे. कायद्याचा हा उद्देश्य सफल न करणारा एखादा कायदा एखाद्या समाजावर लागू केल्यास समाजाचा त्याग व्यर्थ जाईल आणि तथाकथित कायदा अमलात आणण्याचे कोणते ही कारण शिल्लक राहणार नाही आणि अशा कायद्याला समाजासाठी योग्य समजले जाऊ नये.
- समाजाच्या मौलिक विचारांशी आणि धारणांशी अशा कायद्यात फारकत घेतलेली नसावी. समाजाच्या भावना आणि सांस्कृतिक मूल्ये प्रस्तुत कायद्यात प्रतिबिबीत झाली पाहिजेत. ज्या समाजावर एखादा कायदा लागू केला जाईल तो कायदा त्या समाजास मानसिकरित्या स्वीकारार्ह असला पाहिजे. त्या कायद्यात समाजाच्या सन्मानाची भावना असावी आणि अशा कायद्याची बंधने आनंदाने स्वीकारण्यास तो समाज तयार असावा. कायद्यास नापसंत ओझे समजले जाऊ नये, त्याला डोक्यावरून फेकून देण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. कायद्यातुन सुटण्यासाठी पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. तर्क आणि अनुभवानुसार कायद्याचे हे वैशिष्टय तेव्हांच निर्माण होऊ शकते, आणि समाजात त्यास तेव्हांच व्यावहारिक स्थान प्राप्त होऊ शकते, जेव्हां त्या कायद्यात सामाजिक सिद्धान्त आणि मूल्यांचा आत्मा समाविष्ट झालेला असेल आणि त्या कायद्याची मुळे त्या समाजाच्या विचारांशी आणि भावनांशी जुळलेली असतील.
उपरोल्लेखीत पहिल्या वैशिष्टयापेक्षा दुसरे वैशिष्टय अधिक महत्वपूर्ण आणि योग्यच नव्हे, तर तोच त्याचा पाया सुद्धा आहे असे विचारान्ती दिसून येईल. कारण कोणताही कायदा, साफल्य आणि प्रगतिचे खरे साधन तो पर्यंत कदापि सिद्ध होऊ शकत नाही, जो पर्यंत तो कायदा समाजाची जीवन मूल्ये आणि सिद्धान्त, विचार धारा आणि भावना विचारात घेऊन केलेला नसेल. समाजाची जीवनमूल्ये आणि सिद्धान्त यावर कायद्याचा पाया रचण्याची कायद्याची पहिली आणि अंतिम आवश्यकता असते. त्याशिवाय तो एक चांगला आणि यशस्वी कायदा होऊ शकत नाही. अशा कायद्याने समाजाचे कल्याण होत नाही किवा समाज यशस्वी होत नाही. आणि जेव्हां हे सर्व काही होऊ शकत नाही तर अशा कायद्यास लोकांच्या माथी मारण्याचा कोणताही अधिकार कोणाला पोहचत नाही. असा तथाकथित कायदा एखाद्या समाजाने स्वतःहून बनविला तर वास्तविकता त्या समाजाची सांस्कृतिक आत्महत्या होईल आणि दुसर्या एखाद्या शक्तीने असा कायदा समाजाच्या माथी मारला तर त्या समाजाची सांस्कृतिक हत्या होईल.
0 Comments