अल्लाहचे सर्वांत मोठे उपकार
बंधुनो! प्रत्येक मुस्लिम अंत:करणपूर्वक असे समजतो की जगात सर्वांत मोठी अल्लाहची देणगी म्हणजे इस्लाम होय. प्रत्येक मुस्लिम याबद्दल अल्लाहचे उपकार मानतो की त्याने प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या उम्मत (अनुयायी समाज) मध्ये त्याला सामील केले आणि इस्लामची देणगी त्याला प्रदान केली. खुद्द सर्वश्रेष्ठ अल्लाहसुद्धा याला आपल्या दासांना त्याने प्रदान केलेली सर्वांत मोठी देणगी ठरवितो. त्या संबंधाने पवित्र कुरआनमध्ये सांगितले गेले आहे,
‘‘आज रोजी मी तुमचा धर्म तुमच्याकरिता परिपूर्ण केला आहे आणि आपली कृपा तुम्हावर परिपूर्ण केली आहे. आणि तुमच्यासाठी इस्लाम तुमचा धर्म म्हणून संमत केला आहे.’’ (कुरआन-५:३)
कृतज्ञ वृत्तीची मागणी
हा उपकार अल्लाहने आपणावर केला आहे त्याचा हक्क अदा करणे आपले कर्तव्य आहे. कारण जो मनुष्य एखाद्याच्या उपकाराची परतफेड करीत नाही किंवा हक्क अदा करीत नाही तो कृतघ्न असतो. सर्वांत वाईट कृतघ्नता माणसाने ईश्वराच्या उपकाराच्या हक्काचे विस्मरण करावे, ही आहे.
आता तुम्ही विचाराल की ईश्वराच्या उपकाराचा हक्क कशाप्रकारे अदा केला जातो? मी उत्तरादाखल असे म्हणेन की अल्लाहने आपणास प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या उम्मत (अनुयायी समाज) मध्ये जन्म दिला आहे, तर या उपकाराची योग्य कृतज्ञता प्रेषित मुहम्मद (स.) यांचे पूर्णार्थाने अनुयायी बनणे ही आहे.
अल्लाहने तुम्हाला मुस्लिमांच्या मिल्लत (समाज) मध्ये सामील केले आहे, तर त्याच्या या मेहेरबानीचा हक्क अदा होऊ शकतो, पूर्णार्थाने मुस्लिम बनूनच! याशिवाय अल्लाहच्या या महान उपकाराचा हक्क कोणत्याही प्रकारे अदा होऊ शकत नाही. समजा जर तुम्ही हा हक्क अदा केला नाही तर जितका मोठा अल्लाहचा उपकार तितकाच मोठा त्याच्या कृतघ्नतेचा प्रकोपसुद्धा असेल. अल्लाहने आम्हा सर्वांना त्या प्रकोपापासून वाचवावे. आमीन. (तथास्तु.)
मुस्लिम बनण्यासाठी पहिले पाऊल
यानंतर तुम्ही दुसरा प्रश्न कराल की मनुष्य सर्वार्थाने कशाप्रकारे मुस्लिम बनू शकतो? याच्या उत्तरासाठी खूप तपशीलाची आवश्यकता आहे आणि पुढील शुक्रवारच्या प्रवचनात याच्या एक एक भागाचे आपल्यापुढे पूर्ण स्पष्टीकरण केले जाईल. परंतु आजच्या प्रवचनात मी आपल्यासमोर त्या गोष्टीचे वर्णन करतो जी मुस्लिम बनण्यासाठी सर्वांत महत्त्वाची आहे. त्यास या मार्गातील प्रथम पाऊल समजले पाहिजे.
काय मुस्लिम एखाद्या वंशाचे नाव आहे?
बुद्धीला थोडे ताण देऊन विचार करा की तुम्ही ‘मुस्लिम’ शब्दाचा प्रयोग करता त्याचा अर्थ काय आहे? काय मनुष्य आईच्या पोटातूनच इस्लाम आपल्याबरोबर घेऊन येतो? काय एखादा मनुष्य केवळ यामुळेच मुस्लिम ठरतो की तो मुस्लिमाचा मुलगा व मुस्लिमाचा पौत्र आहे? काय मुस्लिमसुद्धा अशाप्रकारे मुस्लिम म्हणून जन्म घेतो ज्याप्रकारे एखाद्या ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण म्हणून जन्म घेतो, एखाद्या राजपुताचा मुलगा राजपूत आणि एका शूद्राचा मुलगा शूद्र? काय मुस्लिम एखाद्या वंश अथवा जाती अथवा भावकीचे नाव आहे, जसे एखादा इंग्रज, इंग्रजाच्या घरी जन्मल्यामुळे इंग्रज होतो आणि एखादा जाट हा जाट जातीत जन्मल्यामुळे जाट होतो, अशाच प्रकारे एखादा मुस्लिम केवळ या कारणाने मुस्लिम होतो की तो मुस्लिम नावाच्या जातीत जन्माला आला? हे प्रश्न मी तुम्हाला विचारीत आहे, त्यांची उत्तरे तुम्ही काय द्याल?
तुम्ही असेच म्हणाल ना की नाही साहेब! याला मुस्लिम म्हणत नसतात. मुस्लिम जातीमुळे मुस्लिम होत नसतो, तर इस्लामचा स्वीकार केल्याने तो मुस्लिम बनतो आणि त्याने इस्लामचा त्याग केला तर तो मुस्लिम राहत नाही. एखाद्या माणसाने मग तो ब्राह्मण असो अथवा राजपूत, इंग्रज असो किंवा जाट, पंजाबी असो की निग्रो, जेव्हा त्याने इस्लामचा स्वीकार केला तेव्हा त्याचा मुस्लिमांत समावेश होतो आणि दुसरा एक मनुष्य मुस्लिमाच्या घरात जन्मला आहे आणि त्याने इस्लामचा अवलंब करण्याचे सोडून दिले तर तो मुस्लिमाच्या जमातीतून बाहेर टाकला जाईल, मग तो सय्यदचा मुलगा असो की पठाणचा.
सज्जनहो, तुम्ही माझ्या प्रश्नांची हीच उत्तरे द्याल ना? बरे तर आता खुद्द तुमच्याच उत्तरावरून कळते की अल्लाहची सर्वांत मोठी देणगी म्हणजे मुस्लिम असण्याची देणगी तुम्हाला मिळाली आहे ती काही अशी वांशिक गोष्ट नाही जी आईवडिलांकडून वारसा म्हणून आपोआप तुम्हाला मिळते आणि आपोआपच तुम्हाला आयुष्यभर चिकटून राहणार आहे. मग तुम्ही त्याची पर्वा करा अथवा करू नका. ती तर अशी देणगी आहे ज्यास प्राप्त करण्यासाठी स्वत: प्रयत्न करणे आवश्यक आहेत. तुम्ही प्रयत्न करून ती प्राप्त केली तरच मिळेल आणि जर त्याची पर्वा केली नाही तर ती तुमच्याकडून fहरावूनसुद्धा घेतली जाऊ शकते.
0 Comments