बंधुनो! तुम्ही स्वत:ला मुस्लिम म्हणून संबोधता आणि तुमचा विश्वास आहे की अल्लाहची मुस्लिमावर कृपा असते. परंतु जरा डोळे उघडून पाहा की काय खरोखर अल्लाहची कृपा तुमच्यावर अवतरित होत आहे? पारलौकिक जीवनात जे काही घडेल ते तुम्ही नंतर पहालच, परंतु या जगात तुमची जी स्थिती आहे त्यावर दृष्टी टाका. या हिंदुस्थानात (लक्षात असावे की ही प्रवचने त्या काळात लिहिली गेली होती जेव्हा हिंदुस्तानची फाळणी झाली नव्हती.) तुमची संख्या नऊ कोटी आहे. तुमची इतकी मोठी संख्या आहे की जर एका एका व्यक्तीने एक एक खडा टाकला तर पर्वत बनेल, परंतु जेथे इतके मुस्लिम आहेत तेथे अनेकेश्वरवादी राज्य करीत आहेत. तुमच्या माना त्यांच्या मुठीत आहेत की तुम्हाला त्यांनी हवे तिकडे वळवावे. तुमचे मस्तक जे अल्लाहशिवाय कोणासमोर नमत नसे ते आता मनुष्यासमोर नमत आहे. तुमची ती प्रतिष्ठा मातीत मिसळून टाकली जात आहे. तुमचा हात जो सदैव उंच राहत असे आता तो खाली असतो आणि तो अनेकेश्वरवाद्यांसमोर पसरला जातो. अज्ञान, गरीबी व कर्जबाजारीने तुम्हाला सर्वत्र अपमानित व लज्जित करून सोडले आहे. काय हीच अल्लाहची कृपा आहे? ही कृपा नव्हे तर हा उघड प्रकोप आहे. हे किती आश्चर्य आहे की मुस्लिमावर अल्लाहचा प्रकोप व्हावा! मुस्लिम आणि तो अपमानित व्हावा! मुस्लिम आणि तो गुलाम असावा! हे तर अशक्य कोटीचे आहे की एखादी वस्तु पांढरी शुभ्र आहे व काळीकुट्टही आहे. मुस्लिम अल्लाहला प्रिय असतो, मग अल्लाहचा प्रिय जगात तो कसा अपमानित व तुच्छ असू शकेल? काय तुमचा अल्लाह अत्याचारी आहे की तुम्ही तर त्याचा अधिकार ओळखावा, त्याच्या आज्ञेचे पालन करावे आणि त्याने अवज्ञा करणाऱ्यांना तुमच्यावर शासक बनवावे? आणि तुम्हाला मात्र आज्ञाधारकतेचा मोबदला म्हणून शिक्षा द्यावी? तुमचा विश्वास आहे की अल्लाह जुलूम करणारा नाही आणि तुमची खात्री आहे की अल्लाहच्या आज्ञापालनाचा मोबदला अपमान म्हणून मिळू शकत नाही. तर तुम्हाला हे स्वीकार करावे लागेल की मुस्लिम असण्याचा जो तुम्ही दावा करता त्यातच काहीतरी चूक आहे. सरकारी कागदपत्रात तर तुमच्या नावाची नोंद मुस्लिम म्हणून अवश्य केली जाते. परंतु अल्लाहच्या न्यायालयात इंग्रज सरकारच्या दफ्तराच्या सनदीवर निर्णय केला जात नाही. अल्लाह आपला वेगळाच दफ्तर ठेवतो. त्यात शोधा की तुमचे नाव आज्ञाधारकाच्या यादीत नोंदले आहे की अवज्ञाकारींच्या यादीत?
अल्लाहने तुमच्याकडे ग्रंथ पाठविला आहे जेणेकरून तुम्ही हा ग्रंथ वाचून आपल्या स्वामीस ओळखावे आणि त्याच्या आज्ञापालनाची पद्धत समजून घ्यावी. काय तुम्ही कधी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की या ग्रंथात काय लिहिले आहे? अल्लाहने आपल्या प्रेषितांना तुमच्याकडे पाठविले जेणेकरून त्यांनी तुम्हाला आज्ञाधारक (मुस्लिम) बनण्याची पद्धत शिकवावी. काय तुम्ही कधी हे माहीत करून घेण्याचा प्रयत्न केला की त्याच्या प्रेषितांनी काय शिकविले आहे? अल्लाहने तुम्हाला या जगात व पारलौकिक जीवनात प्रतिष्ठा प्राप्त करण्याची एक आदर्श जीवनपद्धत दाखविली. काय तुम्ही त्यावर चालता? ज्यांच्यामुळे मनुष्य या जगात व पारलौकिक जीवनात लज्जित होतो. काय तुम्ही अशा कामापासून अलिप्त राहता? सांगा, तुमच्यापाशी याचे काय उत्तर आहे? जर तुम्ही हे मान्य करता की तुम्ही अल्लाहचा ग्रंथ आणि त्याचे प्रेषित (मुहम्मद स.) यांच्या जीवनापासून कोणतेही ज्ञान प्राप्त केले नाही आणि त्यांनी दाखविलेल्या पद्धतीचे अनुसरणसुद्धा केले नाही, तर तुम्ही आज्ञाधारक (मुस्लिम) तरी कुठे झाला की तुम्हाला याचा चांगला मोबदला मिळेल? ज्या प्रकारचे तुम्ही आज्ञाधारक (मुस्लिम) आहात त्याच प्रकारचा मोबदला तुम्हाला मिळत आहे आणि त्याच प्रकारचा मोबदला तुम्ही पारलौकिक जीवनात प्राप्त कराल.
यापूर्वी मी सांगितले आहे की मुस्लिम व अनेकश्वरवाद्यामध्ये केवळज्ञान व कर्माशिवाय अन्य कोणताही फरक नाही. एखाद्या माणसाचे ज्ञान व कर्म अनेकेश्वरवादीप्रमाणेच असेल आणि स्वत:ला तो मुस्लिम म्हणवितो तर तो साफ खोटे बोलत आहे. अनेकेश्वरवादी पवित्र कुरआनचे पठण करीत नाही आणि त्याला माहीत नसते की यात काय लिहिले आहे. हीच स्थिती जर मुस्लिमाचीसुद्धा असेल तर त्याला काय म्हणून मुस्लिम म्हणावे? अनेकेश्वरवादीला जाणीव नसते की प्रेषित (मुहम्मद स.) यांची काय शिकवण आहे आणि त्यांनी ईश्वरापर्यंत पोहचण्याचा कोणता सरळ मार्ग दाखविला आहे. मुस्लिमसुद्धा त्याच्याप्रमाणे अज्ञानी असेल तर तो कसा मुस्लिम असू शकतो? अनेकेश्वरवादी ईश्वराच्या मर्जीप्रमाणे चालण्याऐवजी स्वत:च्या मर्जीप्रमाणे चालतो. मुस्लिमसुद्धा त्याच्या व आपल्या मताप्रमाणेच चालणारा असेल, त्याच्याप्रमाणेच अल्लाहकडून बेपर्वा व आपल्या इच्छेचा गुलाम असेल तर त्याला स्वत:ला मुस्लिम (अल्लाहचा आज्ञाधारक) म्हणण्याचा काय अधिकार आहे? अनेकेश्वरवादी हलाल (धर्मसंमत) व हराम (धर्मनिषिद्ध) मध्ये फरक करीत नाही आणि ज्या कामात स्वत:ला फायदा व गोडी वाटेल त्याचा अवलंब करतो, मग अल्लाहच्या दृष्टीने ते हलाल असो की हराम. आणि असाच व्यवहार मुस्लिमाचासुद्धा असेल तर त्याच्यात व अनेकेश्वरवाद्यामध्ये फरक तो कोणता? याचा अर्थ असा की मुस्लिमसुद्धा इस्लामच्या ज्ञानापासून तितकाच कोरा असेल जितका की अनेकेश्वरवादी असतो, आणि मुस्लिमसुद्धा ते सर्वकाही करतो जे अनेकेश्वववादी करतो तर त्याला अनेकेश्वरवाद्याच्या तुलनेत श्रेष्ठत्व का प्राप्त व्हावे? अंतिमदिनी त्याचा निवाडा अनेकेश्वरवाद्याप्रमाणेच का केला जाऊ नये? ही गोष्ट अशी आहे की जिचा विचार शांत मनाने आम्ही सर्वांनी केला पाहिजे.
0 Comments