माननीय औफ बिन मालिक यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी आणि करपलेल्या चेहऱ्याची महिला अंतिम निवाड्याच्या दिवशी या दोन बोटांसारखे असू.’’ (यजीद बिन जरीअ यांनी ही हदीस कथन करताना आपल्या हाताचे मधले बोट आणि अंगठ्याजवळचे बोटाकडे इशारा केला) म्हणजे ती महिला जिचा पती मरण पावला आणि घराण्याची प्रतिष्ठा आणि वैयक्तिक रूप व सौंदर्य असतानादेखील तिने मेलेल्या पतीच्या मुलांकरिता स्वत:ला विवाहापासून दूर ठेवले, इतकेच काय ती मुले तिच्यापासून अलिप्त झाली किंवा मृत्यूमुखी पडली. (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण
जर एखादी महिला विधवा झाली आणि तिची लहानलहान मुले असतील आणि लोक तिच्याशी विवाह करू इच्छितही असतील, परंतु ती आपल्या त्या निराधार मुलांच्या संगोपणासाठी विवाह करीत नाही आणि अब्रू व निष्कलंक राहून जीवन व्यतीत करते. तर अशा महिलेला अंतिम निवाड्याच्या दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) यांचे सान्निध्य प्राप्त होईल.
माननीय सुराका बिन मालिक (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी तुम्हाला उत्तम सदका (दानधर्म) सांगू का? ती जी तुझी मुलगी तुझ्याकडे परत पाठविली गेली आहे आणि तिला तुझ्या व्यतिरिक्त दुसरे कोणी कमवून खाऊ घालणारा नाही.’’ (हदीस : इब्ने माजा)
स्पष्टीकरण
अशी मुलगी जिची कुरूपता किंवा शारीरिक कमतरतेमुळे लग्न होऊ शकले नाही किंवा लग्नानंतर घटस्फोट झाला आहे आणि तुमच्याव्यतिरिक्त तिचे पालनपोषण करणारा कोणीही नाही तर तिच्यावर जो काही खर्च कराल तो अल्लाहच्या दृष्टीने उत्तमोत्तम सदका (दान) असेल.
अनाथाचा अधिकार
माननीय सहल बिन सअद यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी आणि अनाथाचे पालनपोषण करणारा आणि दुसऱ्या वंचितांचे पालनपोषण करणारा आम्ही दोघे स्वर्गात अशाप्रकारे असू.’’ असे म्हणून पैगंबरांनी मधले बोट आणि अंगठ्याजवळचे बोट दाखविले आणि त्या दोन बोटांमध्ये थोडेसे अंतर ठेवले. (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण
अनाथांचे पालनपोषण करणारे स्वर्गात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याजवळ राहतील आणि ही शुभवार्ता फक्त अनाथांचे पालनपोषण करणारांसाठीच नाही तर विवश आणि वंचित लोकांचे पालनपोषण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे.
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मुस्लिमांच्या घरात सर्वांत उत्तम घर ते आहे ज्यात कोणी अनाथ असेल आणि त्याच्याशी चांगली वर्तणूक केली जात असेल आणि मुस्लिमांचे सर्वांत वाईट घर ते आहे ज्यात कोणी अनाथ असेल आणि त्याच्याशी वाईट व्यवहार केला जात असेल.’’ (इब्ने माजा)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एका मनुष्याने पैगंबर मुहम्मद (स.) यांना आपल्या मनाचा निष्ठूरपणा आणि कठोरपणा सांगितला, तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘अनाथाच्या डोक्यावर सहानुभूतीचा हात फिरवा आणि गरिबांना जेवू घाला.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण
जर एखाद्या मनुष्याला आपल्या मनाच्या कठोरतेचा इलाज करण्याची इच्छा असेल तर त्याने सहानुभूती व कृपेने काम करण्याची सुरूवात करावी. गरजवंत व निराधार लोकांची गरज भागवावी आणि त्यांच्या कामांमध्ये त्यांची मदत करावी तेव्हा त्याच्या मनाचा कठोरपणा नष्ट होईल आणि त्याच्या मननात दया व कृपा निर्माण होईल.
0 Comments