– सीमा देशपांडे
मुक्ती (निजात) म्हणजे मनुष्याची सुटका किंवा नरकापासून संरक्षण म्हणून परिभाषित करतो. ज्याला हिंदूमधे मुक्ती व इस्लाममधे निजात संबोधतात.
आज मनुष्य हा मनुष्य राहिला नसून भौतिकतेचे एक चालते-फिरते यंत्रच झाले आहे. त्याची सर्व धावपळ ही आपल्या स्वैर इच्छांची पूर्तता आणि भौतिकवाद व चंगळवादापर्यंत मार्गाचा अवलंब करुन जीवनातील भोगवस्तू प्राप्त करण्यासाठी पिसाट लांडग्याप्रमाणे सैरावैरा धावतच सुटला आहे. पण मृत्यू म्हटले की त्याचा थरकाप उठतो आणि तो सतत ह्याच संभ्रमात असतो की त्याला वाटत की दुसऱ्याला मृत्यू येऊ शकतो पण मला नाही. त्यामुळे त्याला मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या जीवनाची साधी आठवणसुद्धा होत नाही. तो हे पण विसरु लागला आहे की ईश्वरच मनुष्याला जन्म देतो, तो या जगात वावरताना ईश्वरच त्याची परीक्षा घेतो आणि ईश्वरच त्याला मृत्यू पण देतो. मग मृत्यू हे अटळ सत्य आहे तर मृत्यूनंतर काय? मनुष्याच्या परीक्षेचा निकाल कुठे लागेल? मनुष्याला मुक्ती कशी मिळेल? चला तर प्रत्येक धर्माचा याबद्दल काय दृष्टिकोन आहे… पुनर्जन्म हा समज की गैरसमज काही लोक हे मानतात की हेच जीवन मूळ व अंतिम असून मृत्यू जीवनाचा अंत होय. पण… हेच अंतिम जीवन मानणारे लोक इतकेच सांगू शकतात की आम्हाला अजिबात हे माहीत नाही की मृत्यूपश्चात जीवन आहे की नाही! मात्र तो छातीठोकपणे असे मुळीच सांगू शकत नाही, आम्हाला माहीत आहे की मृत्यूपश्चात जीवनच नाही.
काही लोकाना वाटते की मृत्यूनंतर परलोक जीवन आहे आणि त्यात स्वर्गप्राप्तीसाठी अशी श्रद्धा ठेवावी की समस्त मानवजात ही जन्मजात गुन्हेगार व पापी आहे. मात्र मानवजातीच्या पापाचे प्रायश्चित्त स्वत: ईश्वरपुत्राने सुळावर आपल्या प्राणाचा बळी देऊन केले आणि तिला पापातून मुक्त केले. म्हणून या ईश्वरपुत्रावर श्रद्धा ठेवावी, तर निश्चितच स्वर्गप्राप्ती होईल. पण… ईश्वर निराकार असताना ईश्वर पुत्र कसा धरतीवर येईल बर? मग तो सर्व मानवजीतीला पाप मुक्त करुन गेला तर त्याना धर्माची गरज काय? आणि जनावर व मनुष्यात काय असमानता आढळून येईल जेणेकरुन फक्त मनुष्यालाच पारलौकिक जीवन लाभेल.
काही लोकाना वाटते की मृत्यू म्हणजे जीवनाचा अंत नव्हे! मनुष्य या ऐहिक जीवनातील चांगल्या व वाईट कर्माचे अथवा पाप-पुण्याचे फळ भोगण्यासाठी वारंवार या सृष्टीत जन्म घेतो. तो कधी कृमी-कीटक तर कधी पशु-पक्षी, कधी झाडे-झुडपे आणि कधी तो ८४ लक्ष योनीतून भ्रमण केल्यानंतर मनुष्य योनीत जन्म घेतो. पण… माणसाच्या चांगल्या-वाईट कर्मानुसार त्याचा पुनर्जन्म होत असेल तर हे समजणे आवश्यक आहे ईश्वराने कुठल्या ग्रंथात हे नियम नमूद केले आहेत का की कोणत्या पुण्यकर्माच्या पुरस्कारापोटी कोणाचा जन्म (पशु-पक्षी, कृमी-कीटक, वनस्पती) मिळतो आणि कोणत्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी कोणता जन्म मिळतो? तसेच, आजपर्यंत कोणत्या डॉक्टरने किवा शास्त्रज्ञाने मनुष्याचे मृत शरीराची चाचणी करुन हे सांगू शकले का की तो पूर्वी कुठल्या रुपात जन्मला होता किंवा पुढे कोणत्या रुपात जन्म घेणार आहे.
एक विचारसरणी अशीदेखील आहे की ऐहिक जीवन प्रत्येक मनुष्यासाठी परीक्षा आहे त्यासाठी आपल्या एकमेव निर्मात्याने (ईश्वर) मानवास बुद्धी व विवेकसामथ्र्य दिले आहे. त्याद्वारे मानवाने मृत्यूनंतरचा (स्वर्ग किंवा नरक) विचार करुन ऐहिक जीवन व्यतीत करावे. म्हणजेच जर मानवाने एका ईश्वरावर श्रद्धा ठेवली आणि त्याच्या नियमावालीनुसार जीवन व्यतीत केले तर त्याला स्वर्गप्राप्ती होईल आणि याउलट एका ईश्वराला न मानता नियमाचे उल्लंघन केले तर त्याला नरकप्राप्ती होईल. पण… या चारपैकी चौथी विचारसरणी सत्याच्या खूप जवळ असल्याचे स्पष्ट दिसून येते. ती सांगत आहे की मृत्यू म्हणजे आपल्या जीवनाचा अंत नाही; आपल्या वास्तविक जीवनाची ही सुरुवात आहे. कारण आपल्या भावी नशिबाचा(स्वर्ग-नरक) आपल्या सध्याच्या मानवी जीवन कामकाजाच्या आधारावर निर्णय घेतला जात आहे, आपण परलोकात स्वत:साठी योग्य स्थान (स्वर्ग) मिळवण्यासाठी पृथ्वीवरील एका ईश्वरावर श्रद्धा व ईशनियमावलीनुसार जीवन व्यतीत करू शकतो, किंवा आपण त्यांना दूर पेâवूâन देऊन आपल्यास नरकात शिक्षा म्हणून दोषी ठरवू शकतो.
यावरुन हे नक्कीच लक्षात येते की, मृत्यू अंतिम नाही आहे परंतु ते या जगाच्या जीवनातून नंतरच्या जीवनाचे संक्रमण आहे. ज्याला परलोक जीवन म्हणतात.
परलोक जीवन हे नंतरच्या जीवनाच्या प्रवेशद्वारासारखे आहे आणि स्वर्ग किंवा नरक प्राप्त करणे हे ईश्वराच्या (अल्लाह) एकत्वामध्ये शुद्ध विश्वास आणि ईश्वराची (अल्लाह) मंजुरी ही ह्या जीवनात आपली आचारसंहिता व वर्तणूक ह्यावर अवलंबून आहे.
‘‘सरतेशेवटी प्रत्येकाला मृत्यू आहे आणि तुम्ही सर्वजण आपापले पुरेपूर मोबदले कयामतच्या दिवशी प्राप्त करणार आहात. यशस्वी खर्या अर्थी तोच आहे जो तेथे नरकाग्नीपासून वाचेल व स्वर्गामध्ये दाखल केला जाईल. उरले हे जग, तर ही केवळ एक भुरळ पाडणारी बाब आहे.’’ (कुरआन ३:१८५)
मनुष्याला परलोकाची गरज का?
जसे… ऐहिक जीवनात एकाने जर एकाचा खून केला तरी एकदाच फाशीची शिक्षा होईल आणि दहा जणांचा खून केले तरी एकदाच शिक्षा होईल पण त्याला नऊ जणांच्या खुनाची शिक्षा कुठे मिळेल?
माणसाचे विचार, क्रिया व हालचाली, आवाज सुरक्षित ठेवण्याचे कारण काय?
चोराला शिक्षा मिळाली तर त्याचे दु:ख घरच्यांना होते मग फक्त चोरालाच शिक्षा कुठे मिळणार?
प्रत्येक क्रियेची एक प्रतिक्रिया होत असते, जसे एका व्यक्तीने दुसऱ्याला मारले तर तो जखमी होतो, उपाशी व्यक्तीने जेवण केले तर त्याची भूक मिटते, रोगीने औषध पिले तर बरा होतो. मात्र काही क्रिया अशादेखील असतात ज्यांची प्रतिक्रिया दिसून येत नाही जसे आपण एका आंधळ्याला मार्ग दाखविला, स्वत: उपाशी राहून भुकेल्याला भोजन दिले. गरजुंना दान दिले. मग अशा कामांच्या प्रतिक्रिया का दिसून येत नाहीत?
दुष्कर्म करणारा श्रीमंत माणूस गरीब होत नाही व सत्कर्म करणारा गरीब माणूस श्रीमंत होत नाही असे का?
मग.. हा प्रत्येक मनुष्यासाठी परिपूर्ण न्याय आहे का? आणि हा न्याय ऐहिक जीवनात मिळणे शक्य आहे का?
मनुष्याच्या कर्माचा न्याय कुठे होतो?
सर्वच नाती अथवा सबंधांचे खास केंद्र असते. जसे, डॉक्टर-पेशंट भेटण्याचे ठिकाण दवाखाना, वकील अर्जदाराच्या भेटण्याचे ठिकाण न्यायालय, शिक्षक-विद्याथ्र्याचे ठिकाण शाळा.. तसे ईश्वर-मानवाचे भेटण्याचे ठिकाण कोणते? ते ठिकाण दुसरे कोणते नसून परलोकच होय.
कुरआन काय सांगतो..
आणि हे ऐहिक जीवन काही नाही परंतु एक खेळ आणि मनोरंजन. वास्तविक जीवनाचे घर तर पारलौकिक घर आहे, हाय, या लोकांनी जाणिले असते. (कुरआन २९:६४)
त्या दिवसाच्या संकटापासून आपला बचाव करा जेव्हा तुम्ही अल्लाहकडे परत जाल, तेथे प्रत्येक माणसाला त्याने कमाविलेल्या पुण्य व पापाचा पुरेपूर मोबदला मिळेल आणि कोणावरही कदापि अन्याय होणार नाही..(कुरआन २:२८१)
जन्म-मृत्यू प्रवास
१. पवित्र जग जेथे ईश्वराने सर्व आत्मे बनविले.
जेव्हा तुझ्या पालनकत्र्याने दूतांना सांगितले, ङ्गमी मातीपासून एक मानव बनविला आहे, मग जेव्हा मी त्याला पूर्णपणे बनवीन आणि त्यात माझा आत्मा फुंकीन तेव्हा तुम्ही त्याच्यासमोर नतमस्तक व्हा! (कुरआन ३८:७१-७२)
२. गर्भाशय जेथे आत्मा मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतो.
जसे सर्वानाच माहीती आहे की आपण ऐहिक जीवनाचा प्रवास आपल्या मातेच्या गर्भाशयातून सुरू करतो. जेव्हा स्त्री गर्भवती राहली की घरचे व स्वत: ती पण मुलगाच पाहिजे म्हणून आतोनात नवस, ज्योतिष्य, डॉक्टरकडे वेगवेगळे उपचार यासारखे विविध उपाय करत राहतात. आणि स्वत:ची इच्छा पूर्ण झाली नाही की मात्र स्त्रीलाच दोष देतात. तसेच काहीजण १२० दिवसानंतर चाचणी करुन तपासतात मुलगा की मुलगी आणि मुलगी असेन तर गर्भपात करतात. पण सत्य हे आहे की आईच्या गर्भात काय आहे हे फक्त ईश्वरच जाणतो.
तोच तर आहे, जो तुमच्या मातेच्या गर्भाशयात तुमचा आकार हवा तसा घडवितो, त्या जबरदस्त बुद्धिमानाशिवाय इतर कोणी ईश्वर नाही. (कुरआन ३:६)
३. ऐहिक जीवन
जिथे आपण सर्व मर्यादित वेळेसाठी जगतो. हे जीवन आपले परीक्षाकाळ आहे. ईश्वर आपल्याला इथे अजमावून पाहणार आहे की आपण ईशमार्गाने जीवन व्यतीत केले की भौतिक जीवनाप्रमाणे…
ह्यावर कुराआन काय सांगतो:
ज्याने मृत्यू आणि जीवन निर्माण केले जेणेकरून तुम्हा लोकांना अजमावून पहावे की तुमच्यापैकी कोण अधिक चांगले कृत्य करणारा आहे. आणि तो जबरदस्तही आहे आणि क्षमाशीलदेखील(कुरआन ६७:२)
प्रत्येक मनुष्य फक्त स्वैर इच्छांची पूर्तता करणे हेच जीवनाचे ध्येय घेऊन बसलाय पण हे कितपत त्याच्या कामाला येईल व ह्या भोगवस्तूंचा कितपत आनंद लुटेन?
आपला हा समज असतो की समाजाला लपून काही वाईट कृत्य (अनैतिक संबंध, लाच खाणे, गरजुंचे पैसे लुबाडणे, चोरी करणे, खोटे बोलणे, मानवांची हत्या करणे इत्यादी) केले तर काहीच फरक पडत नाही. असे केल्याने ते समाजापासून स्वत:ला वाचवू शकतील पण ईश्वरापासून कसे वाचतील?
४. मृत्यू
मृत्यू हे अंतिम जीवन नसून ते फक्त ह्या जीवनातुन पुढील जीवनात संक्रमण आहे. ह्यावर कुराआन काय सांगतो:
प्रत्येक जीवितास मृत्यूची चव चाखावयाची आहे. आणि आम्ही चांगल्या व वाईट स्थितीत आणून तुम्हा सर्वांची परीक्षा घेत आहोत. सरतेशेवटी तुम्हाला आमच्याकडेच रुजू व्हायचे आहे. (कुरआन २१:३५)
मग मृत्यूनंतर काय?
५. बरजख (पित्रलोक)
हा टप्पा म्हणजे मृयूनंतर व पुनरुत्थानाच्या आधीचा कालावधी. बरजखमधील पहिले ठिकाण कबर आहे. कबरमधे आस्तिकाच्या मृत शरीराचा सुगंध येतो तर काफिर (अविश्वासु) चा दुर्गंध येतो. जेव्हा आस्तिकचा आत्मा जीवित केला जातो तेव्हा तो सहजपणे बाहेर येतो पण काफिर (अविश्वासु) चा आत्मा बाहेर येण्यास प्रचंड वेदना होतात जणू काही त्याचे जीवितपणे आतडे ओढून काढत आहे.
तेथे मृत व्यक्तीचा आत्मा दोन देवदूतांसह (मुनकिर व नाकिर) भेटतो. देवदूत आस्तिकाना (मोमिन/विश्वासु) रेशीम वस्त्रे परिधान करुन भेटायला येतात व त्याचा आत्मा बाहेर यायला सांगतात तेव्हा तो आत्मा ईश्वराची स्तुती करत येतो. देवदूत काफिर (अविश्वासु) ला अंगावर काळी रग परिधान करुन भेटायला येतात व त्याचा आत्मा बाहेर यायला सांगतात तेव्हा त्याला शाप देतात.
मग प्रत्येक मनुष्याला त्याच्या श्रद्धेबद्दल प्रश्नावली करतात. आणि इतर प्रश्न पुनरुत्थानाच्या दिवशी सोडले जातात.
मात्र काफिरसाठी (अविश्वासु) स्वर्गाचे दार उघडले जाणार नाही. उलट त्यासाठी नरकचे दार उघडले जाईल आणि न्यायाच्या दिवसापर्यंत त्याला नरकाच्या शिक्षाला सामोरे जावे लागेल.असे का?
बरजखचे प्रकार:
१. प्रथम गट: अविश्वासु व अत्याचारी जे अल्लाह, प्रेषित आणि पुनरुत्थानाच्या दिवसावर ऐहिक जीवनावर विशास ठेवत नाहीत. ते स्वत:ला मुक्त समजले आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे वागले आणि कोणत्याही वाईट गोष्टी करण्यापासून स्वत:ला थांबविले नाही व दुसऱ्याला ते करण्यापासून परावृत्त केले. त्यांना बरजखांममध्ये खूप कठीण जीवन मिळेल आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा दंड दिला जाईल. परंतु ते नरकाच्या शिक्षांच्या तुलनेत काहीच नाही.
२. दुसरा गट: ज्यांनी सर्वसमर्थ अल्लाह, प्रेषित आणि पुनरुत्थानांवर विश्वास ठेवला होता आणि ज्यांनी त्यांच्या धार्मिक कर्तव्यांचा अवलंब केला आणि प्रतिबंधित कृत्यांपासून निर्भय केला. त्यांना बरजखांमधे एक चांगले जीवन मिळेल आणि त्यांना आशीर्वाद दिला जाईल, जे नंदनवनात त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या आशीर्वादांचे एक नमुना असेल.
३. तिसरे गट: जे लोक सर्वशक्तिमान अल्लाह, प्रेषित आणि पुनरुत्थानांवर विश्वास ठेवत होते आणि त्यांच्या धार्मिक कर्तव्ये पार पाडतात; परंतु कधीकधी लक्षावधीत त्यांनी एक अनिवार्य कर्तव्य सोडून दिले किंवा बेकायदेशीर कृत्य केले; परंतु ते मरणापर्यंत त्यांनी आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप केला आणि माफी मागितली. त्यांना बरजखमध्येही शिक्षा होणार नाही.
४. चौथा गट: ज्यांनी सर्वसमर्थ अल्लाह, प्रेषित आणि पुनरुत्थानांवर विश्वास ठेवला आणि त्यांची धार्मिक कर्तव्ये पार पाडली; परंतु कधीकधी लक्षावधीत त्यांनी एक अनिवार्य कर्तव्य सोडून दिले किंवा बेकायदेशीर कृत्य केले; परंतु त्यांनी आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करून आणि दैवी क्षमा मिळविण्याशिवाय मरण पावले. ते त्यांच्या पापांप्रमाणेच बरजखमध्ये शिक्षा करतील आणि त्याद्वारे ते शुध्द होतील. न्यायाच्या दिवशी ते पवित्र प्रेषित आणि पवित्र इमामांच्या (त्याप्रमाणे) मध्यस्थी घेऊन पश्चात्ताप करतील आणि मग त्यांच्या कर्मांच्या हिशोबाप्रमाणे ते नंदनवनात पाठविले जातील.
विश्वासू (मोमिन) चा असा गैरसमज आहे की त्याने एका ईश्वरावर श्रद्धा ठेवली की काही केल्या तो स्वर्गात जाणार… नाही कदापि नाही. जोपर्यंत त्याचे कृत्य आणि श्रद्धा ईश्वराच्या नियमावलीची पूर्तता करत नाही ( ईमान, कुरआन वाचणे व त्याला समजून दैनंदिन जीवनात त्याची अंमलबजावणी करणे, लोकांशी भेदभाव न करता करुणामय वर्तणूक ठेवणे आणि लोकाना हक्क, संयम याचे उपदेश देऊन एका ईश्वराकडे आमंत्रण देणे) आणि चुकलेच तर त्याची जाणीव होऊन मरण्यापूर्वी ईश्वराची माफी मागत नाही तोपर्यंत कोणीही स्वत:चे नरकापासून संरक्षण करु शकत नाही मग तो विश्वासू (मोमिन) असो वा अविश्वासू (काफिर).
६ प्रलय (कयामत)
कयामत म्हणजे हे जग बुडणे जेथे आपण आज निवांत जगत आहोत. कयामतचे चिन्हे म्हणजे एक रणशिंग फुंकणे आहे. कुरआननुसार, जग बुडणाच्या शेवटी व कयामत घटनेपूर्वी, रणशिंग दोनदा उडेल आणि हे महत्वाचे प्रसंग म्हणजे कयामत ची निशाणी जवळ आहे.
रणशिंग कसे दोनदा उडेल? प्रथम जगातील सर्व लोक मरतील आणि बरजखच्या जगात प्रवेश करतील. आणि दुसऱ्यांदा बरजखमधील सर्वजण कयामतसाठी पुन्हा जिवित केले जातील.
प्रलयाच्या दिवशी पूर्ण सौर यंत्रणा विस्कळीत होईल.
७ परलोक जीवन (न्यायाचा दिवस)
पुनरुत्थनाचा दिवस हा एक मनुष्याची नवीन जीवनाची सुरुवात होईल ज्याचा कधीही अंत होणार नाही. हा दिवस न्यायाचा दिवस आहे.
‘‘हा तो दिवस आहे जेव्हा कोणत्याही माणसासाठी काही करणे कुणाच्याही आवाक्यात नसेल. निर्णय त्या दिवशी अल्लाहच्याच अखत्यारीत असेल.’’ (कुरआन ८२:१९)
त्या दिवशी, सर्व लोक जीवित होतील व त्यांच्या श्रद्धेप्रमाणे आणि कर्मांनुसार त्यांना ईश्वराकडून बक्षीस देण्यात येईल.
सर्व ईश्वरासमोर नमस्तक होऊन एकत्र उभे राहतील, तेव्हा ईश्वर (अल्लाह) देवदूतांना आदेश देईल की प्रत्येक मनुष्याच्या कर्माचे पुस्तक उघडा. मग देवदूत पुस्तक उघडतील जेथे मनुष्याच्या ऐहिक जीवनाच्या कर्माची नोंदणी असेल ज्याला अरबीमधे किरामन कतिबीन (सन्मानीय निरीक्षक) असे म्हणतात.
स्वर्गामधील फळ हे सत्कर्म करणार्या व ईशभीरू लोकांचे शांतीचे स्थळ आहे. कुरआनात ईश्वराने वचन दिले आहे– ‘‘मी तुमच्यापैकी कोणाचेही कृत्य वाया घालविणार नाही मग तो पुरुष असो अथवा स्त्री, तुम्ही सर्वजण परस्परांशी संबंधित आहात, म्हणून ज्या लोकांनी माझ्यासाठी स्वदेश त्याग केला आणि ज्यांना माझ्या मार्गात आपल्या घरातून बाहेर काढण्यात आले आणि जे छळले गेले आणि माझ्यासाठी लढले व मारले गेले – त्यांचे सर्व अपराध मी माफ करून टाकीन व त्यांना अशा उपवनांत दाखल करीन ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील. हा त्यांचा मोबदला आहे अल्लाहजवळ आणि सर्वोत्तम मोबदला अल्लाहजवळच आहे.’’ (कुरआन ३:१९५)
आज आपण कळत-नकळत पणे हे सत्य विसरुन जात आहेत कारण आपण कुरआन विसरुन जात आहे जी अल्लाह (ईश्वर) ने आपल्याला देणगी दिलेली आहे. आज आपण वाडवडील, विद्वान काय म्हणत आहेत तेच अनुसरण करत आहेत पण कुरआनप्रमाणे काय चूक आणि काय बरोबर हे बघतच नाही. या जगात दर दिवशी १५१,००० पेक्षा जास्त लोक मृत्यू पावतात. आपण अत्यंत आभारी आहोत अल्लाहचे (ईश्वर) की तो आपणास अजूनही वेळ देत आहे आपल्या मुक्तीसाठी जेणेकरुन आपण आपल्यात सुधारणा करु.
जेव्हा जेव्हा आपत्ती येईल तेव्हा म्हणतील की, ‘‘आम्ही अल्लाहचेच आहोत, आणि अल्लाहकडेच आम्हाला परत जायचे आहे.’’ (कुरआन २:१५६)
चला तर मग आपण सर्व स्वत:ला व आपल्या परिवाराला व आपल्या भाऊ-बहिणीना अल्लाह (ईश्वर) च्या क्रोधापासून वाचवू आणि अर्थातच इन्शाअल्लाह स्वत:ला व या समाजाला स्वर्गाच्या मार्गाने जाण्यास मार्गदर्शन करु. ‘‘काळाची शपथ, मानव वस्तुत: तोट्यात आहे, त्या लोकांखेरीज ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि सत्कर्मे करीत राहिले. आणि एकमेकांना सत्याचा उपदेश आणि संयमाचा आदेश देत राहिले.’’ (कुरआन १०३:१-३)
0 Comments