Home A आधारस्तंभ A मानवाच्या निर्मितीचा उद्देश हा मुळात ‘उपासना’ आहे

मानवाच्या निर्मितीचा उद्देश हा मुळात ‘उपासना’ आहे

दिव्य कुरआनची शिकवण आहे की, मानवाच्या निर्मितीचा उद्देश हा मुळात ‘उपासना’ आहे.
‘‘मी ‘मानव’ आणि ‘जिन’ यांना केवळ आपल्या उपासनेकरिताच निर्माण केले!’’ (दिव्य कुरआन)
ईश्वराने जगात जेवढे प्रेषित पाठविले ते केवळ याच उद्देशांसाठी की, मानवास ईश्वराच्या उपासनेची शिकवण द्यावी.
‘‘अल्लाहचीच उपासना करा आणि सैतानापासून दूर राहा.’’ (दिव्य कुरआन) 
आता आपणा सर्वांना हे जाणून घेणे आवश्यक आहे की, उपासना म्हणजे नेमके काय? तसेच इस्लामने आपल्यावर ज्या उपासना व आराधना अनिवार्य ठरविल्या त्यांचा मूळ आत्मा काय आहे? जर या बाबी आपण जाणून घेतल्या नाहीत, तर ज्या उद्देशपूर्तीसाठी आपण जन्म घेतला, तो उद्देश पूर्ण होणे शक्यच नाही.
उपासनेची अज्ञानी कल्पना
इस्लाममध्ये उपासनेचा अर्थ केवळ भक्ती (Worship) नसून तो ‘दासत्व’ (Obediance) या अर्थात व्यापलेला आहे. उपासनेचा अर्थ केवळ भक्तीपुरता मर्यादित ठेवणे ही अज्ञानी कल्पना आहे. अज्ञानी समुदायाचे लोक असे समजत असतात की, ज्याप्रमाणे मोठी माणसे सरदार, प्रमुख अथवा राजे-महाराजे स्तुती केल्याने प्रसन्न होतात, भेटवस्तू दिल्याने मेहेरबान होतात, त्यांच्यासमोर हात जोडल्याने व नतमस्तक होण्यामुळे ते आपल्यावर कृपा करतात, तेव्हा अशाच पद्धतीने त्यांच्याकडून आपली कामे करून घ्यावीत, नेमक्या अशाच तऱ्हेने त्यांच्या उपास्याची आपल्या उपासकांकडून अपेक्षा व मागणी असते. आपल्या उपासकाचीसुद्धा दोन्ही हात जोडून, नतमस्तक होऊन व अजीजी करून त्यास प्रसन्न करावे आणि आपली मागणी पूर्ण करून घ्यावी. याच कल्पनेच्या आधारावर अज्ञानी धर्मांमध्ये काहीं विशेष पूजापाठ व कर्मकांडांना ‘उपासना’ असे नाव देण्यात आले आहे.
उपासनेची वैराग्यात्मक कल्पना
त्याचप्रमाणे इस्लाममध्ये उपासनेचा अर्थ असासुद्धा नाही की, मानवाने व्यावहारिक जीवनाचा त्याग करून संन्यास घ्यावा आणि केवळ ईशभक्तीत रममान व्हावे, ध्यानस्थ वा समाधिस्थ (Madiation) व्हावे, आपल्या इच्छा, आकांक्षा आणि गरजांना दाबून ठेवावे (Self Annihilation) व घोर तपश्चर्या करून (Spritual Exersises) आपली आत्मिक शक्ती वाढवावी अथवा साक्षात्कार आणि चमत्कारांची शक्ती आपल्यात निर्माण करावी. तसेच या व्यावहारिक जीवनाचा अर्थात संसाराचा त्याग करून मोक्षप्राप्ती करून घ्यावी. उपासनेची ही कल्पना संन्यासी अथवा वैराग्य दृष्टिकोनावर आधारित आहे. या प्रकारात धर्म आणि सामाजिक जबाबदाऱ्या व व्यावहारिक जीवन हे आपसांत अगदी परस्पर विरुद्ध बाबी ठरतात. संसाराच्या जवाबदाऱ्या आणि सामाजिक जबाबदाऱ्यांमधून मुक्त होण्याचा मार्ग शोधणे अथवा पळ काढणे म्हणजे उपासना असा हा विचित्र दृष्टिकोन आहे. कारण या दृष्टिकोनामध्ये आत्मिक विकासाकरिता भौतिकतेतून मुक्त होणे वा सन्यास घेणे अनिवार्य आहे.
उपासनेची इस्लामी कल्पना
इस्लामच्या दृष्टिकोनात उपासनेची कल्पना उपरोक्त दोन्ही कल्पनांपेक्षा अगदीच भिन्न आहे. इस्लामचा दृष्टिकोन आहे की, मानव हा एकमेव ईश्वराचा दास आहे. मानवाचा निर्माता, पालनकर्ता आणि स्वामी केवळ एकमेव ईश्वरच आहे. ईश्वराने मानवास या भूतलावर आपला प्रतिनिधी नेमला आहे. त्याला काही जवाबदाऱ्या, अधिकार व महत्त्वपूर्ण सेवा प्रदान केल्या आहेत. मानवाचे कर्तृत्व म्हणजे आपला स्वामी अर्थात एकमेव ईश्वराचा उद्देश पूर्ण करणे, आणि आपल्या जवाबदाऱ्यांची जाण ठेवून कर्तव्य पूर्ण करणे, तसेच आपली शक्ती व अधिकार आपल्या वास्तविक स्वामीच्या कायद्यांनुसार आणि मजीनुसार वापरणे होय. मानवाच्या यशाचे रहस्य हे या गोष्टीत दडले आहे की, त्याने या ऐहिक जीवनात प्रयत्नांची पराकाष्ठा करून व प्राण पणाला लावून आपले कर्तव्य आणि जवाबदाऱ्या पूर्ण कराव्यात आणि इमानेइतबारे आपल्या एकमेव स्वामी असलेल्या ईश्वराच्या आदेश व कायद्यांचे पालन करावे. आपल्या कर्तव्यपूर्तीची मुदत पूर्ण झाल्यावर जेव्हा तो आपल्या एकमेव स्वामी ईश्वरासमोर आपल्या कर्मांचा हिशेब चुकता करण्यासाठी उभा राहील, तेव्हा त्याच्या जीवनकार्यावरून हे सिद्ध होईल की, तो कर्तव्याची जाण असलेला आणि ईश्वराचा आज्ञाधारक एक दास होता. इस्लामच्या या स्पष्ट दृष्टिकोनानुसार उपासनेची हीच वास्तविकता आहे. उपासनेच्या उपरोक्त दोन्ही कल्पनांशी इस्लामी उपासनेचा कवडीमात्र संबंध नाही. जो माणूस थोडासा वेळ काढून भक्ती केल्यानंतर असे समजतो की, मी आपल्या उपास्याचा हक्क पूर्ण केला आणि मोकळा झालो, आता आपल्या व्यावहारिक जीवनात वाटेल तसे वागण्यास मुक्त आहे. त्याचे उदाहरण असे आहे, जणू एखादा असा कर्मचारी ज्याला तुम्ही चोवीस तासांकरिता चाकरीवर ठेवले आणि पूर्ण पगार देऊन त्याचे पालनपोषण करीत आहात, परंतु तो कर्मचारी केवळ सकाळी व संध्याकाळी येऊन तुम्हास साष्टांग नमस्कार घालून जातो, तुमच्या चरणात फुले वाहून जातो आणि मग इतर वेळेत टवाळक्या करीत फिरतो अथवा दुसऱ्याची चाकरी करीत राहतो. याचप्रमाणे जो माणूस जगामध्ये व्यावहारिक जीवनातून व जवाबदाऱ्यांतून पळ काढतो आणि सांसारिक जवाबदाऱ्या सोडून एकांतात जाऊन आपला पूर्ण वेळ नमाज पढण्यात व ईश्वराचे नामस्मरण करण्यात घालवतो, त्याचे उदाहरण असे आहे की, जणू एखाद्या माणसास तुम्ही आपल्या बागेच्या रखवलीकरिता नियुक्त केले, परंतु तो बागेची राखण न करता व तेथील कामकाज न करता सकाळ ते संध्याकाळ व संध्याकाळ ते सकाळपर्यंत तुमच्या समोर हात बांधून उभा आहे व तुमच्या स्तुतिगाणात चोवीस तास तल्लीन आहे आणि बागेसंबंधी तुम्ही त्यास जी कामे सोपविली होती, त्या कामांची रुपरेखा मोठ्या आनंदाने तुमच्यासमोर केवळ पठण करीत आहे आणि त्या आदेशांनुसार मुळीच कोणतेही काम करीत नाही, अशा माणसाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटेल ? अर्थात तुम्हाला जे वाटेल, तीच भूमिका व दृष्टिकोन इस्लामचा आहे. अशा कर्मचाऱ्यांशी तुम्ही जे वर्तन कराल, तेच वर्तन अशा चुकीच्या कल्पनेनुसार उपासना करणाऱ्यांशी ईश्वर करील.
इस्लामचा उपासनेविषयी दृष्टिकोन असा आहे की, मानवाचे संपूर्ण जीवन ईश्वराच्या दासत्वात ((Whole time Servant)वा त्याच्या आदेशपालनात व्यतीत व्हावे. त्याने स्वतःस कायमस्वरुपी आणि प्रत्येक क्षणी ईश्वराचे दासत्व करायला हवे. अर्थात या जगामध्ये प्रत्येक बाब, प्रत्येक कार्य व प्रत्येक कृती ईश्वराने प्रदान केलेल्या कायद्यानुसार करावे. आपले झोपणे-जागणे, खाणे-पिणे, चालणे-फिरणे, अशाप्रकारे सर्वकाही ईश्वराच्या मर्जी व कायद्यानुसार असावे. ईश्वराने ज्या संबंधात मानवास बांधले आहे, त्या सर्वांत तो बांधील असून हे संबंधसुद्धा ईश्वराच्याच मर्जी व कायद्यानुसार असावेत. ईश्वराने ज्या सेवा आणि कर्तव्य मानवास सोपविले आणि व्यावहारिक जीवनात ज्या जवाबदाऱ्या त्याच्यावर टाकल्या आहेत त्या ईश्वराच्या कायद्यानुसार स्वखुषीने पार पाडाव्यात. ईश्वराचा हा कायदा त्याने प्रेषितांच्या माध्यमाने मानवास प्रदान केला. मानवाने प्रत्येक क्षणी प्रत्येक कार्य व कृतीस ईश्वराप्रती आपली जवाबदारी समजावी आणि याची पूर्णतः जाणीव ठेवावी की, आपल्या प्रत्येक कृती वा कार्याचा आपणास ईश्वरासमोर जाब द्यावा लागणार आहे. आपल्या घरी पत्नी व मुलाबाळांशी, गल्ली वा मोहल्ल्यात आपल्या शेजार-पाजाऱ्यांशी, आपल्या सोसायटीत वा समाजात मित्र-मंडळींशी, आपल्या व्यवहारात संबंधितांशी वर्तन करतेवेळेस प्रत्येक बाबीत आणि प्रत्येक कामात ईश्वराने निश्चित केलेल्या मर्यादांचे उल्लंघन होऊ नये, याची खबरदारी घ्यावी. जेव्हा आपण रात्रीच्या काळोखात असू आणि आपल्याला पाहणारा पण कोणीच नसेल, अगदी अशा वेळीसुद्धा कोणतेही वाईट कर्म करताना याची प्रखर जाण असावयास हवी की, ईश्वर आपल्याला पाहात आहे. जेव्हा आपण एखाद्या जंगल अथवा अरण्यातही असू आणि ईश्वरीय अवज्ञा किवा अपराध करण्याची पुरेपूर संधी प्राप्त असेल, तसेच त्या ठिकाणी आपल्या अपराधाची साक्ष देणारासुद्धा कोणीच नसेल व कोणी अटक करणारा पोलीससुद्धा नसेल, अशा वेळीसुद्धा आपल्याला या गोष्टीची जाणीव असावी की, आपल्या अपराधाची कोणी साक्ष देवो अथवा न देवो, पोलीस अटक करो अथवा न करो, ईश्वर मात्र आपले कर्म पाहात आहे आणि आपल्या या पापी कर्माचा ईश्वरास जाब द्यावा लागणार आहे. अशा प्रकारच्या ईशभयामुळे निश्चितच आपल्याकडून पातक कर्म घडण्याचे टळेल. अशा ईशभय अथवा ईशपरायणता किवा ईश्वराच्या नाराजीमुळे माणूस आपला मोठ्यात मोठा लाभसुद्धा सोडून देऊ शकतो. ज्या वेळी सत्य आणि इमानदारीमध्ये आपल्याला नुकसान उचलावे लागते, तेव्हा आपल्याला दुःख होण्याऐवजी या गोष्टीमुळे समाधान व शांती प्राप्त होते की, माझ्या सत्य व इमानदारीमुळे माझा ईश्वर माझ्यावर प्रसन्न होत आहे.
सांसारिक जीवन, व्यावहारिक जवाबदाऱ्या, मुलेबाळे सोडून एकांतात जाऊन बसणे, संन्यास व वैराग्य पत्करणे आणि ईश्वराच्या नावाचा जप करीत बसणे, ही मुळी उपासनाच नव्हे. उलट व्यावहारिक जीवनाच्या जवाबदाऱ्या आणि घर-परिवार ईश्वराच्या मर्जी व कायद्यानुसार सांभाळणे हीच मुळात उपासना होय. ईशस्मरण म्हणजे जगातील ज्या बाबी माणसाला ईशस्मरणापासून गाफील करतात त्यांतच रहावे आणि ईश्वराच्या ध्यान आणि स्मरणापासून गाफील होता कामा नये. ऐहिक जीवनामध्ये ईश्वरीय कायदा मोडून अर्थात बेईमानी करून वा बट्टेबाजी आणि लबाडी करून अमाप संपत्ती कमविण्याच्या संधी असतात. अन्याय व अत्याचार करून भौतिक सुख मिळविता येते. तसेच ईश्वरीय मर्जी आणि कायदा पाळल्यामुळे मोठमोठ्या फायद्यांच्या संधी गमावून बसावे लागते. अशा प्रसंगी ऐहिक सुखाच्या लाभास बळी न पडता मोठमोठ्या संधी ईश्वराच्या मर्जीवर बळी चढविणे हेच ईश्वराचे वास्तविक स्मरण करणे होय. अशा प्रकारच्या व्यवहारात ईश्वराचे अशा प्रकारे स्मरण करावे. सत्ता हाती आली तरी हे विसरता कामा नये की, मी मानवांचा स्वामी अथवा उपास्य अगर ईश्वर नसून त्या सर्वशक्तिमान ईश्वराचा केवळ दास आणि सेवक आहे. न्यायदानाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यास एखाद्यावर अन्याय करण्याची शक्ती हाती आली असली तरी, हे विसरता कामा नये की, ईश्वराने माझ्यावर न्याय करण्याची जवाबदारी सोपविली आहे. या भूतलावरील अफाट भौतिक संपत्ती आणि भौतिक शक्ती हाती आली तरी, ही वास्तविकता विसरता कामा नये की, मी या संपत्ती आणि शक्तीचा मूळ मालक नसून केवळ रक्षक व अनामतदार आहे व मला एक-एक पैशाचा ईश्वरास हिशेब द्यावा लागणार आहे. कारण भूतलावरील समस्त संपत्तीचा वास्तविक स्वामी हा एकमेव ईश्वरच आहे. लष्कराचे प्रमुख असले तरी, ईश्वरासमोर जाब देण्याची जाणीव तुम्हाला शक्तीच्या तंद्रीत वा मस्तीत येऊन दुर्बलांवर अन्याय करण्यापासून परावृत्त ठेवील. राज्यकारभाराचे कठीण कार्य हाती आल्यावरसुद्धा सत्य, न्याय आणि सत्यसमर्थनाच्या कायमस्वरूपी ईश्वरीय नियमांच्या खडतर मार्गावर चालून दाखवावे. व्यवसाय, वित्त आणि उद्योगधंद्यात खुशाल प्रगती करावी, परंतु या प्रगतीच्या माध्यमांत पवित्र आणि अपवित्र अथवा वैध आणि अवैध बाबीमध्ये फरक ओळखून वैध मार्गाचाच अवलंब करावा. तुमच्या जीवनमार्गात प्रत्येक पावलावर निषिद्ध कमाई किवा अवैध बाबी अत्यंत सुंदर आणि मोहक स्वरुपात तुम्हास मोहिनी घालतील, परंतु तुम्ही त्या मोहिनीच्या आहारी जाता कामा नये, तुमची पावले डगमगता कामा नये. चोहीकडे अन्याय, अत्याचार, धोकेबाजी आणि व्यभिचाराचे मार्ग तुम्हास अगदी मोहक स्वरुपात आकर्षित करतील, ऐहिक आणि भौतिक सुखवस्तू यशाच्या स्वरुपात तुमच्यासमोर लोटांगण **घालतील, व्यभिचार आणि स्वैराचार आधुनिक प्रगतीचे रूप व सोंग घेऊन तुमच्यावर भुरळ टाकतील, परंतु तुमच्या अंतःकरणात ईश्वराचे स्मरण आणि त्याच्या समोर जाब देण्याच्या जाणिवेने तुम्ही या संपूर्ण अवैध बाबींचा त्याग कराल. ईश्वरीय कायदा स्थापन करण्याच्या मार्गात अगणित संकटे आणि समस्या दिसू लागतील, सत्याची कास धरण्यात आणि न्याय व सत्यावर तटस्थपणे कायम राहण्यात प्राण व संपत्तीचे नुकसान होताना दिसेल, तसेच ईश्वरीय कायदा आणि मर्जीनुसार जीवन जगण्याकरिता समस्त विश्वाचे वैर ओढवून घेण्यासमान असेल, परंतु तुमच्या उद्दिष्टाच्या अथांग सागरात किचितही हेलकावा येता कामा नये. अर्थात हीच आहे वास्तविक उपासना, याचेच नाव आहे ईश्वराचे स्मरण, हीच ती ईश्वराची भक्ती आणि नामस्मरण आहे, ज्याच्याकडे दिव्य कुरआनाने अंगुलीनिर्देश करून म्हटले आहे की,
‘‘नमाज संपल्यावर भूतलावर अल्लाहची कृपा (उपजीविका) प्राप्त करा आणि अल्लाहचे स्मरण करा, जेणेकरून तुम्हास यश मिळावे.’’ (दिव्य कुरआन)
संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *