अरब समाजाचा आणि जगातील इतर राष्ट्रांचासुद्धा इस्लामपूर्व काळ हा अगदीच मार्गभ्रष्ट काळ होता. लिहिण्या-वाचण्याची कमतरता असलेल्या अरब समाजात मात्र कवनशास्त्र खूप प्रगत होते. अरब लोक अशिक्षित व असंस्कृत तर होतेच, परंतु अख्ख्या जगामध्ये कवनशास्त्रात त्यांचा कोणी स्पर्धक नव्हता. उच्च भाषाशैली आणि कविता त्यांच्या स्वभावातच होती. जणू अगदी लहानलहान मुलेसुद्धा कवनशास्त्रात तरबेज असत. एवढेच नव्हेतर गुलामांनासुद्धा कवनशास्त्रावर कमालींचे प्रभुत्व होते. त्या काळात मोठमोठी कविसंमेलने होत असत. या कविसंमेलनात दूरदूरचा प्रवास करून पुरुष व महिला मोठ्या संख्येत सहभागी होत असत. स्त्रियांसुद्धा कवनशास्त्रात खूप तरबेज होत्या. अरबांना आपल्या काव्यशक्तीचा एवढा अभिमान होता की, बिगर अरबांना ते ‘अजमी’(अर्थात बोलता न येणारा) या नावाने संबोधत असत. तसे पाहता ‘अरब’ या शब्दाचाच अर्थ ‘वक्तृत्व कलेत पारंगत असलेला’ असा होतो. आणि त्यांच्या वक्तृत्व प्राविण्यामुळेच ते जगभर ‘अरब’ या नावाने प्रसिद्ध होते.
हे लोक आपल्या वक्तृत्वकलेने सर्वांनाच प्रभावित करीत असत. वैयक्तिक आवडीशिवाय हे लोक आपल्या वक्तृत्वकलेने आणि काव्याने राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती बदलून टाकीत असत. अगदी युद्धाच्या वेळी योद्ध्यांना युद्धप्रेरणा देण्यासाठी सर्वांत जास्त प्रभावी माध्यम वक्तृत्वशास्त्रच होते. एखाद्याचा विरोध करण्यासाठीसुद्धा सर्वांत प्रभावी माध्यम कवनशास्त्रच होते. ‘तलवारीपेक्षाही जास्त तीक्ष्ण असलेले प्रभावी हत्यार म्हणजे कवनशास्त्र’, असेच त्या काळी समीकरण होते. कवनशास्त्राने त्या काळी मोठमोठे शूरवीर आणि योद्धे तयार केले. युद्धातील जय-पराजयाची पूर्ण परिस्थिती आणि सामाजिक व राजकीय परिस्थिती बदलून टाकण्याची अफाट शक्ती त्यांच्या कवनशास्त्रात होती.
अशा काळात आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी प्रेषित्वाची घोषणा करताच संपूर्ण अरबस्थान त्यांच्या विरोधात पेटून उठला. त्यांच्या विरोधात या समाजाने तलवार आणि भाल्यासह कवनशास्त्राच्या अतिप्रभावी हत्याराचासुद्धा भरपूर वापर केला. आदरणीय प्रेषितांनी मायभूमीचा त्याग केल्यावरसुद्धा हा विरोध थंडावण्याचे नाव घेत नव्हता. इस्लामद्रोह्यांनी इस्लाम व प्रेषितांविरुद्ध कवितांचा पर्वत रचून संपूर्ण अरब जगतात आणि अरब समाजाच्या प्रत्येक व्यक्तीत इस्लामविरोधी प्रेरणात्मक चळवळ उभी केली होती. इस्लामविरोधी कविता काही दिवसांतच कित्येक मैल दूरवर आपला प्रभाव टाकत होत्या. इस्लामसमर्थकांना रात्रंदिवस अशा काव्यांचा सामना करणे भाग होते. या मानसिक त्रासातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी प्रेषितसोबत्यांनी माननीय अली(र.)यांना विनंती केली की, ‘‘आपण इस्लामद्रोह्यांच्या इस्लामविरोधी काव्यांचे सडेतोड आणि प्रभावी उत्तर देणार्या कविता रचाव्यात’ माननीय अली(र.)यांनी यासाठी आदरणीय प्रेषितांची परवानगी घेण्याची अट घातली. प्रेषितसोबत्यांनी ही विनंती प्रेषितांना केली, तेव्हा प्रेषितांनी या कामाची जबाबदारी माननीय अली(र.)यांच्यावर टाकण्याऐवजी मदीना शहरातील मुस्लिमांची सभा बोलावून आवाहन केले,
‘‘ज्या लोकांनी तलवारीने माझे समर्थन केले, त्यांच्यापैकी कोण आहे जो या इस्लामविरोधी काव्यास तोंड देऊन इस्लामचे समर्थन करील?’’ एवढ्यात एक अन्सारी सोबती उठून उभे राहून म्हणाले, ‘‘हे प्रेषिता! मी यासाठी तयार आहे.’’
‘‘तुम्ही त्यांच्या काव्याचा सामना कसा कराल? प्रेषितांनी विचारले,
‘‘हे प्रेषित! मी आपले काव्य इस्लामचे समर्थन आणि इस्लामद्रोह्यांच्या विरोधात तयार करेन.’’
आदरणीय प्रेषितांनी त्यांना परवानगी दिली. इस्लामसमर्थक कविता रचणारे हे महान कविवर्य म्हणजेच – ‘माननीय हस्सान बिन साबित अन्सारी(र.)’ होत.
माननीय हस्सान बिन साबित(र.)यांनी इस्लामसमर्थनार्थ आपल्या सर्व काव्यशक्ती पणाला लावून संपूर्ण अरब जगतात इस्लामविरोधी काव्याचे सडेतोड उत्तर दिले आणि इस्लामची भरपूर सेवा केली. माननीय हस्सान बिन साबित(र.)हे ‘खजरज’ परिवाराच्या ‘नज्जार’ या प्रतिष्ठित शाखेचे सुपुत्र होत. त्यांची वंश शृंखला अशी आहे.
‘हस्सान’ पिता साबित पिता मंझर पिता हराम पिता अमरु पिता झैद मनात पिता अदी पिता अमरु पिता मालिक पिता नज्जार पिता सआलबा पिता अमरू पिता खजरज.’’ त्यांचे प्रसिद्ध टोपण नाव ‘अबू वलीद’ असे होते. परंतु त्यांना ‘शायर-ए-रसूल’ अर्थात ‘प्रेषितांचे कवि’ या नावानेच जास्त संबोधण्यात येते. त्यांच्या मातेचे नाव ‘फरिआ बिन्त खालिद’ असे होते. त्या ‘खजरज’ परिवाराच्या ‘साअदा’ या शाखेच्या गर्भश्रीमंत असलेल्या ‘माननीय साअद बिन उबादा(र.)’ यांची पुतनी होत. त्यांनासुद्धा इस्लाम स्वीकृतीचे सौभाग्य लाभले होते.
माननीय हस्सान(र.)यांनी एका अशा परिवारात जन्म घेतला, जो पहिल्यापासूनच काव्यशास्त्रात अरब समाजात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित होता. काव्यशास्त्राची या परिवारात परंपरागत आवड होती. त्यांनी आपल्या प्राचीन वाडवडिलांचा हा वारसा मोठ्या कौशल्याने जपला होता. तसेच या परिवाराने अरबी भाषेतील काव्यशास्त्रात नवनवीन संशोधनसुद्धा केले. म्हणून हा परिवार संपूर्ण अरबजगतात नावाजलेला आणि प्रसिद्ध होता.
माननीय हस्सान(र.)यांनी काही दिवसातच इस्लामविरोधी काव्याचे सडेतोड उत्तर देऊन विरोधकांची तोंडे बंद केली. ते हिजरी सन पूर्व ६५ वर्षांपूर्वी जन्मले आणि वयाच्या पासष्ठाव्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारून आपल्या कवन कौशल्याच्या माध्यमाने इस्लामची अभूतपूर्व सेवा केली. इस्लाम स्वीकारण्यापूर्वीही ते अरब जगतात क्रमांक एकचे कवि होते आणि अरब जगातील प्रत्येक व्यक्तीचे ते पहिल्या पसंतीचे नावाजलेले आणि आवडते कवि हते.
इस्लाम स्वीकृतीपूर्वी त्यांचे दिवस-रात्र याच कार्यात व्यतीत होत असे. कबिल्याच्या आपसांतील लढायांमध्ये ते योद्ध्यांना प्रेरित करण्यासाठी आवेशपूर्ण कवन करून त्यांची थैर्यशक्ती वाढवीत असत. युद्धभावना भडकाविण्यासाठी त्यांच्या कविता खूप प्रसिद्ध होत्या.
इस्लामस्वीकृतीच्या वेळी ते वयोवृद्ध होते. परंतु इस्लाम स्वीकृतीमुळे त्यांच्या काव्यात तारुण्य व नवचैतन्य निर्माण झाले. तसेच त्यांच्या काव्यशैलीतसुद्धा कमालीचा बदल झाला होता. प्रेषितकाळामध्ये त्यांनी सर्वांत मोठे ‘जिहाद बिल लिसान’ अर्थात मौखिल धर्मयुद्ध केले. एकीकडे त्यांनी इस्लामद्रोही कविंची आपल्या काव्यशक्तीने सडेतोड उत्तर देऊन तोंडे बंद केली तर दुसरीकडे त्यांनी इस्लामसमर्थनार्थ आणि प्रेषितत्वाच्या समर्थनार्थ सुद्धा प्रभावी काव्यरचना केली. या काव्यामुळे इस्लामसमर्थक वर्गात नवचैतन्य निर्माण झाले.
माननीय हस्सान(र.)हे अतिशय हळव्या स्वभावाचे होते. म्हणून त्यांना युद्धात सहभागी होण्याची संधी मिळाली नाही. इब्ने यसीर(र.)या इतिहासकाराने लिहिले की, ‘एहजाब’ च्या युद्धामध्ये(हिजरीसन ‘५‘) माननीय हस्सान(र.)यांच्या बाबतीत एक अतिशय विचित्र घटना घडली. या युद्धात सर्व इस्लामद्रोही लोकांनी आणि ‘ज्यू’ लोकांनी संघटित होऊन मदीना शहरावर हल्ला चढविण्याचा निश्चय केला. या कटकारस्थानाची वार्ता प्रेषितांना मिळाली. त्यांनी मुस्लिमांना एका किल्ल्यात थांबविले. कारण या ठिकाणी मुस्लिमांचा लष्करी दस्ता उपलब्ध नव्हता. या किल्ल्यात माननीय हस्सानसुद्धा इतर आबालवृद्धांसमवेत होते. याच काळात एक ‘ज्यू’ किल्ल्याजवळ येऊन परिस्थितीचा आढावा घेऊ लागला. आदरणीय प्रेषितांच्या आत्या सन्माननीय सफया बिन्त अब्दुल मुतल्लिब(र.)त्या ‘ज्यू’ माणसास पाहून हस्सान बिन साबित(र.)यांना म्हणाल्या, ‘त्या ‘ज्यू’ ला जाऊन ठार करा.’ परंतु माननीय हस्सान बिन साबित(र.)यांचे धैर्य झाले नाही आणि माननीय सफया(र.)यांनी एक लाकडी दांडा त्या शत्रूच्या डोक्यात इतक्या जोरात मारला की तो जागीच कोसळला. आता माननीय सफया(र.)म्हणाल्या, ‘‘आता तरी जाऊन त्याचे शीर धडा वेगळे करा!’’ परंतु माननीय हस्सान(र.)म्हणाले, ‘‘हे अब्दुल मुतल्लिबच्या कन्ये! त्याचे मुंडके कापण्याचे धैर्य माझ्यात नाही.’’
माननीय हस्सान बिन साबित(र.)यांचे बरेच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. शिवाय त्यांचे काव्यसंग्रह भारत, ट्यूनेशिया, ब्रिटेन आणि इतर देशांत प्रकाशित झाले असून बर्याच भाषांमध्ये त्यांचे भाषांतरसुद्धा झाले आहे.
माननीय हस्सान बिन साबित अन्सारी(र.) – इस्लामी कवि
संबंधित पोस्ट
0 Comments