धर्मावरील प्रेम ईश्वराचे महान वरदान आहे. स्त्री असो की पुरुष, मूल असो की वृद्ध, ईश्वर ज्याला इच्छितो त्याला हे वरदान देतो. प्रेषितत्वाच्या अंतिम काळात मदीनावासीयांनी एका निरागस मुलामध्ये धर्मश्रद्धा आणि प्रेषितप्रेमाचा एक विचित्र स्वभाव अनुभवला. हा मुलगा नेहमी प्रेषितदरबारी हजर राहात असून मोठ्या तल्लीनतेने आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांची वचने ऐकत असे. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) भाषणासनावर विराजमान होत असत, तेव्हा हा मुलगा त्यांच्या जवळ जाऊन त्यांचे भाषण अगदी तन्मयतेने ऐकत असे. प्रत्येक बोल तो स्मरणात ठेवीत असे. तो प्रेषितांबरोबर नमाज अदा करीत असे आणि रमजान महिन्यात रात्रीच्या वेळी जागून प्रेषिताबरोबर ईशोपासना करीत असे. प्रेषितांचेही त्याच्यावर प्रेम होते. एकदा प्रेषितांच्या सेवेत ‘ताईफ’ शहरातून द्राक्षे पाठविण्यात आली. हा मुलगादेखील तेथे हजर होता. प्रेषितांनी त्यास द्राक्षांचे दोन झुबके देऊन सांगितले की, ‘‘एक तुझ्यासाठी व एक तुझ्या आईसाठी. घरी जाऊन एक झुबका आईस दे .’’ त्याने स्वतःस दिलेला एक झुबका रस्त्यातच खाल्ला. त्यास तो खूप गोड लागल्याने त्याने आईस दिलेला दुसरा झुबका देखील खाऊन घेतला. शेवटी तो लहान मुलगाच होता. त्याने आपल्या आईस या बाबतीत काही सांगितले देखील नाही. काही दिवसांनी प्रेषितांनी त्यास विचारले, ‘‘हे मुला! आईस द्राक्षाचा झुबका दिलास का?’’ ‘‘नाही! हे प्रेषिता (स.)! मी दिला नाही. दोन्ही झुबके मी स्वतःच खाल्ले.’’ प्रेषितांच्या उपदेशाने तो मुलगा सत्यवचनी झाला होता. त्याचे हे उत्तर ऐकून प्रेषितांच्या चेहर्यावर स्मित हास्य उमटले. त्यांनी त्याचा कान धरून लाडिकपणे म्हणाले, ‘‘लबाड कुठला!’’
हा मुलगा ज्याचा आदरणीय प्रेषित अत्यंत लाड पुरवीत असत. तोच मुलगा.. माननीय नोअमान बिन बशीर(र.)होय.
माननीय नोअमान बिन बशीर(र.)हे ‘खजरज’ परिवाराच्या ‘हारिस’ शाखेचे सपुत्र होत. त्यांची वंशशृंखला अशी आहे,
‘‘नोअमान पिता बशीर पिता साअद पिता सआलबा पिता खलास पिता झैद पिता मालिक पिता अगर पिता सआलबा पिता कआब पिता खजरज पिता हारिस पिता खजरजुल अकबर.
बदरच्या युद्धाच्या तीन महिन्यांपूर्वी हिजरी सन ‘२’ मध्ये माननीय नोअमान बिन बशीर(र.)यांचा जन्म झाला. त्यांनी एक इस्लामप्रिय परिवारात जन्म घेतला. बालपणापासूनच त्यांचे शिक्षण-प्रशिक्षण इस्लामी वातावरणात झाले. त्यांचे पिता माननीय बशीर बिन साअद अन्सारी यांनी प्रेषितांच्या अगदी प्रारंभीच्या प्रतिकूल काळात इस्लामचा स्वीकार केला होता. तसेच ते आदरणीय प्रेषितांचे खूप जवळचे श्रद्धाळू आणि सोबती होते. ते बदर, ओहद, एहजाब आणि इतर सर्वच युद्धांत आदरणीय प्रेषितांसोबत शत्रूंशी लढले. आदरणीय प्रेषितांच्या स्वर्गवासानंतर इस्लामी शासनाची धुरा सांभाळण्यासाठी अन्सारी सोबत्यांच्या एका मोठ्या वर्गाची भूमिका होती की, इस्लामी शासनाची धुरा ‘माननीय साअद बिन उबादा अन्सारी(र.)’ यांना सोपविण्यात यावी. परंतु माननीय बशीर बिन साअद(र.)यांनी मुहाजिरीन सोबत्यांचे समर्थन केले आणि सर्व अन्सार सोबत्यांनी माननीय अबू बकर(र.)यांना इस्लामी शासक नेमले.
माननीय नोअमान बिन बशीर(र.)यांच्या माता सन्माननीय ‘उमरा(र.)’ या माननीय अब्दुल्लाह बिन खाहा(र.)यांची बहीण होती. त्यांचे पुत्र नोअमान(र.)वर अपार प्रेम होते. एकदा त्यांनी एक विशिष्ट संपत्ती नोअमान(र.)यांच्या नावे करण्यासाठी आपले पती बशीर(र.)यांचे मन वळविले आणि यासाठी आदरणीय प्रेषितांची साक्ष घेण्यासाठीदेखील तयार केले. माननीय बशीर(र.)हे आपल्या चिमुकल्या नोअमान(र.)यांना प्रेषितांसमोर हजर करून म्हणाले, ‘‘हे प्रेषिता! मी आपली अमुक अमुक संपत्ती आपल्या साक्षीने या मुलाच्या नावे करीत आहे!’’ प्रेषितांनी विचारले, ‘‘तुम्ही याच्या इतर भावडांनादेखील या संपत्तीचा वाटा दिला काय?’’
‘‘नाही दिला, हे प्रेषिता!’’ बशीर(र.)उत्तरले. ‘‘तर मग हा अन्याय होईल आणि मी अन्यायाची साक्ष देऊ शकत नाही! हे बशीर! ईश्वराच्या नाराजीचे भय बाळगा. त्याला अन्याय मुळीच पसंत नाही!!’’ प्रेषितांनी सांगितले. प्रेषितांचा आदेश ऐकून माननीय बशीर(र.)यांनी घरी येऊन आपल्या पत्नीस वृत्तांत सांगितला आणि त्यांच्या पत्नीनेसुद्धा प्रेषितांच्या आदेशावर मान झुकविली.
माननीय नोअमान बिन बशीर(र.)यांनी खूप कमी वयात प्रेषितांची असंख्य वचने मुखपाठ केली होती. ते आठ वर्षे आणि सात महिन्याचे असतानाच आदरणीय प्रेषितांनी परलोकमार्गी कूच केले.
माननीय नोअमान बिन बशीर(र.)लहानपणापासूनच प्रेषितांच्या सोबत असल्याने त्यांच्या नीतिमत्तेत खूप पावित्र्य होते. त्यांच्यात धैर्य, संयम, मृदु स्वभाव आणि दानशूरता यासारखे असंख्य गुणधर्म आढळतात. त्यांच्या जीवनाचा एक अतिशय मोठा भाग तंटे-बखेड्यांत व्यतीत झाला, तरी देखील त्यांनी शक्य होईल तेवढे रक्तपातापासून स्वतःस अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. अतिशय नाजूक आणि गंभीर परिस्थितीतही स्वतःस नियंत्रणात ठेवले.
त्यांच्या दानशूरतेबाबत एक विचित्र घटना इतिहासात आढळते. ते ‘हमस’ शहराचे राज्यपाल असताना ‘प्रसिद्ध कवि एअशा हमदानी’ त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, ‘‘मी ‘यजीद’ बादशाहकडे गेलो आणि त्याला मदतीची विनंती केली. परंतु त्याने मला रिकाम्या हाती परत केले. नंतर मी आपल्याकडे खूप आशा व आकांक्षेने आलो आहे. माझ्यावर कर्जाचे प्रचंड ओझे असून मला आर्थिक मदतीची खूप गरज आहे.’’ माननीय नोअमान(र.)यांनी त्यास सांगितले की, ‘‘तुम्हाला देण्यासारखी रक्कम सध्या माझ्याजवळ नाही.’’ ‘एअशा हमदानी’ त्यांचे उत्तर ऐकून फार निराश झाले. माननीय नोअमान(र.)यांचे हृदयदेखील त्यांची ही केविलवाणी परिस्थिती पाहून पाझरले. त्यांनी जनतेस हाक देऊन सांगितले, ‘‘एअशा हमदानी यांना आज आर्थिक मदतीची खूप गरज आहे. म्हणून त्यांची मदत करावी.’’ माननीय नोअमान यांच्या या आवाहनामुळे लोकांनी आपसात वर्गणी करून वीस हजार दिरहमची रक्कम जमा करून त्यांना दिली.
माननीय नोअमान बिन बशीर(र.)हे अतिशय उच्च कोटीचे ज्ञानी व विद्वान होते. आदरणीय प्रेषितांच्या काळात वयाने लहान असूनही आपल्या प्रचंड स्मरणशक्तीमुळे त्यांना प्रेषितांची प्रत्येक शिकवण, कार्यप्रणाली, जीवनशैली आणि नीतिमत्तेचे नियम अवगत झाले होते. आदरणीय प्रेषितांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर त्यांनी सन्माननीय आयशा(र.)आणि माननीय उमर(र.)यांच्याकडून धर्मज्ञानाचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी आदरणीय प्रेषितांचे एकूण १२२ वचने कथन केली. त्यांच्या शिष्यवृंदामध्ये इमाम शैबी, सिमाक बिन हरब, अबुइसहाक, सालिम बिन अबू जाअद, उरवा बिन जुबैर, अबू कलाबा, उबैदुल्लाह, हबीब बिन सालिम, अब्दुल मलिक बिन और यासारखे तज्ज्ञ होत.
माननीय नोअमान(र.)यांनी विविध ठिकाणी राज्यपालपदाच्या जबाबदार्या पार पाडल्या. म्हणून त्यांनी अनेक स्वरुपाच्या प्रकरणांचे निर्णय दिल्याने त्यांचा अनुभव तगडा होता. प्रकरणे हताळताना आणि निर्णय देताना दिव्य कुरआन आणि प्रेषित जीवनचरित्राच्या आधारावर निर्णय देण्यात ते तरबेज होते. शिवाय त्यांची वक्तृत्वशैलीसुद्धा खूप आकर्षक होती. भाषण देताना ते प्रेषितवचनांचे अचूक संदर्भ सादर करीत असत. आपल्या कानांकडे बोट दर्शवून म्हणत की, ‘‘मी आदरणीय प्रेषितांकडून या कानांनी ऐकले.’’
त्यांचे लिखाणशास्त्र माहितीचा खजिना असे. त्यांना भाषाशास्त्र आणि साहित्यात विशेष रस होता. साहित्य आणि कवनशास्त्राच्या नियमांचे काटेकोर पालन करून त्यांनी बरेच साहित्य आणि कविता रचल्या.
माननीय नोअमान बिन बशीर(र.)यांनी आदरणीय प्रेषितांची जी वचने कथन केली आहेत, त्यापैकी काही वचने या ठिकाणी सादर करीत आहोत.
- नमाज पढण्यासाठी करण्यात आलेल्या रांगा सरळ ठेवा अन्यथा ईश्वर तुमच्यात मतभेद निर्माण करील.
- तुम्ही श्रद्धावंतांना आपसात दया करणे, प्रेम करणे आणि कृपा व उपकार करण्याच्या बाबतीत अशा स्वरुपात पाहाल जसे शरीराच्या एका अवयवास त्रास अथवा क्षती पोहोचल्यास शरीराचे इतर अवयवदेखील ज्वराने फणफणतात.
- जे वैध आणि धर्मसंमत आहे, ते अगदीच स्पष्ट आहे. तसेच जे अवैध आणि धर्मविरोधी आहे, तेदेखील अगदीच स्पष्ट आहे. या दोन्हींच्या दरम्यान केवळ काही बाबीच अस्पष्ट आहेत. बर्याच जणांना याचे ज्ञान नाही. अर्थात जो माणूस एखाद्या बाबीच्या संशयास्पद अथवा अस्पष्ट परिस्थितीतही स्वतःस त्यापासून दूर ठेवील, तोच आपला धर्म आणि आपली इभ्रत सुरक्षित ठेवू शकेल आणि पवित्र व डागरहित असेल. तसेच जो माणूस संशयास्पद अथवा अस्पष्ट बाबीत गुरफटून जाईल, तो अवैध आणि धर्मविरोधी बाबींच्या गर्तेत बुडून जाईल. खबरदार! मानवी शरीरात एक मांसाचा गोळा आहे. तो ठीक राहिल्यास संपूर्ण शरीर सुदृढ असेल आणि तोच बिघडला तर संपूर्ण शरीर बिघडेल. तो मासाचा गोळा म्हणजेच तुझे हृदय होय!
- ‘‘प्रार्थना हीच उपासना आहे.’’ असे म्हणून आदरणीय प्रेषितांनी दिव्य कुरआनची ही आयत पठन केली, ‘‘तुमच्या पालनकर्त्याचा आदेश आहे की, माझ्याकडे प्रार्थना करा व मागणी करा. मी(निश्चितच तुमची मागणी) पूर्ण करीन आणि तुम्ही मागितलेली बाब तुम्हास प्रदान करीन. जे लोक माझ्या उपासनेस गर्विष्ठपणाने पाठ दाखवतील त्यांना अपमानित होऊन नरकाग्नीत जावे लागेल.’’
- माननीय नोअमान बिन बशीर(र.)यांनी हिजरी सन ६४ मध्ये माननीय अब्दुल्लाह बिन जुबैर(र.)यांचे इस्लामी शासन स्वीकारले. अब्दुल्लाह बिन जुबैर(र.)यांनी त्यांना ‘हमस’ च्या राज्यपालपदी नेमले आणि ‘सीरिया’ व इतर भागाच्या राज्यपालपदी ‘जहाक बिन कैस’ यांची नेमणूक केली. तिकडे मलिक बिन मरवान या जुलमी शासकाने ‘जहाक बिन कैस’ यांच्यावर आक्रमक स्वारी केली. माननीय नोअमान(र.)यांनी ‘जहाक बिन कैस’ यांच्या मदतीसाठी कुमक पाठविली. दोन्ही लष्करात घनघोर युद्ध झाले. या युद्धात इस्लामशासित लष्करास पराभव पत्करावा लागला.
माननीय ‘जहाक बिन कैस’ यांच्या पराभवानंतर अब्दुल मलिकच्या लष्कराने माननीय नोअमान(र.)यांना एकटे गाठून ठार करून त्यांचे शीर त्यांच्या पत्नीला दिले. अशा प्रकारे माननीय नोअमान बिन बशीर अन्सारी(र.)यांनी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण इस्लामच्या सेवेत अर्पण केला आणि शेवटी आपले प्राणसुद्धा ईश्वरीय धर्मावर बलिदान केले. ही घटना हिजरी सन ६५ मध्ये घडली. या वेळी त्यांचे वय ६४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि एक पत्नी असा परिवार होता.
0 Comments