स्पष्टीकरण
मूळ हदीस मध्ये ‘ममलूक’ हा शब्द आला आहे, त्याचा अर्थ गुलाम आणि सेविका आहे, जे इस्लामच्या पुनरुत्थानापूर्वी अरब समाजात आढळत होते. लोक त्या गुलामांशी आणि सेविकांशी पशुपेक्षाही वाईट व्यवहार करीत होते. त्यांना व्यवस्थित जेवण देत नव्हते की त्यांना व्यवस्थित कपडे घालायला देत नव्हते आणि इतके काम करून घ्यायचे की त्यांना ते असह्य व्हायचे. जेव्हा इस्लामचे पुनरुत्थान झाले तेव्हा हा वर्ग अस्तित्वात होता. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मुस्लिम समाजाला उपदेश दिला की त्यांच्याशी मानवतेचा व्यवहार करावा, त्यांना तेच खायला व प्यायला द्या जे तुम्ही खाता-पिता आणि तेच कपडे घालण्यासाठी द्या जसे तुम्ही परिधान करता आणि त्यांना शक्य असेल तितकेच काम त्यांच्याकडून घ्या.
असाच व्यवहार तुमच्याबरोबर रात्रंदिवस राहणाऱ्या सेवकाशीदेखील करा. सेवकांशी कशी वागणूक असायला हवी हे जाणून घेण्यासाठी माननीय अबू कलाबा (रजि.) यांचे एक कथन पाहा. अबू कलाबा (रजि.) यांच्या कथनानुसार, माननीय सलमान फारसी (रजि.) गव्हर्नर असताना त्यांच्याकडे एक मनुष्य आला. ते आपल्या हाताने पीठ मळत असल्याचे त्याने पाहिले. त्याने विचारले, ‘‘हे काय?’’ सलमान फारसी (रजि.) म्हणाले, ‘‘मी माझ्या सेवकाला एका कामानिमित्त बाहेर पाठविले आहे आणि त्याच्यावर दोन्ही कामांचा भार टाकणे मला पसंत नाही.’’
माननीय अबू हुरैरा यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सेविका व सेवक (गुलाम) तुमचे बंधु आहेत. त्यांना अल्लाहने तुमच्या ताब्यात दिले आहे. अल्लाहने ज्या भावाला तुमच्यापैकी एखाद्याच्या ताब्यात दिले असेल तर त्याने तेच खायला दिले पाहिजे जे तो स्वत: खातो आणि त्याच प्रकारचे कपडे नेसायला दिले पाहिजेत जे तो स्वत: परिधान करतो आणि त्याच्यावर कामाचा इतका भार टाकू नये जो त्याच्या शक्तीच्या बाहेरचा असेल. जर त्याच्या शक्तीपेक्षा अधिक भार असलेले काम त्याला दिले गेले आणि ते काम तो करू शकत नसेल तर त्याच्या कामात त्याची मदत करावी.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा तुमच्यापैकी कोणा एकाचा सेवक जेवण बनवून त्याच्याजवळ घेऊन येईल आणि स्थिती अशी आहे की त्याने जेवण बनविताना उष्णता व धुराचा त्रास सहन केलेला आहे, तेव्हा मालकाने त्याला आपल्याबरोबर बसवून जेऊ घालायला हवे. जेवणाचे पदार्थ कमी असतील तर एक घास अथवा दोन घास त्यामधून त्याच्या हातात ठेवावेत.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय अबू बक्र सिद्दीक (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘आपल्या गुलामांवर व सेवकांवर आपल्या अधिकारांचा वाईट वापर करणारा स्वर्गात (जन्नतमध्ये) दाखल होणार नाही.’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! त्या लोकसमुदायात दुसऱ्या लोकसमुदायांच्या तुलनेत गुलाम व अनाथ अधिक असतील, असे आपणच आम्हाला सांगितले नव्हते काय?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘होय, मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली आहे, तेव्हा तुम्ही लोकांनी आपल्या मुलाबाळांप्रमाणेच त्यांचे स्वागत करा आणि त्यांना तेच जेवण द्या जे तुम्ही खाता.’’ (हदीस : इब्ने माजा)
माननीय अबू उमामा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माननीय अली (रजि.) यांना एक गुलाम दिला आणि म्हटले, ‘‘याला मारू नका, कारण मला नमाजीला मारण्यापासून मनाई करण्यात आली आहे आणि मी याला नमाज अदा करताना पाहिले आहे.’’ (हदीस : मिश्कात)
0 Comments