Home A प्रेषित A प्रेषित / संदेश वाहक

प्रेषित / संदेश वाहक

ईश्वराने मानवाला जे आचार-विचारांचे स्वातंत्र दिले आहे, त्याचा गैरवापर करुन मानव ईश्वराची अवज्ञा करुन बंडाचा मार्ग अनुसरु शकतो. परंतु मानवाकरिता योग्य, वैध, नैतिक आणि इहलोक व परलोक जीवनामध्ये यशाचा व चांगल्या साफल्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ईश्वराला प्रसन्न करणे, त्याची भक्ती करणे आणि त्याच्याच कायदे-कानून व आदेशपालनाचा मार्ग स्वीकारणे होय.
सर्व विश्व, सृष्टी फक्त ईश्वराची भक्ती आणि त्याच्याच आदेशाच्या पालनाकरिता आहे. ईश्वराचा भक्त, उपास्य, गुलाम म्हणजेच विश्वमानवसुद्धा ईशनिर्मितीचे एक अंग असल्यामुळे त्यानेदेखील ईश्वराच्या कायद्याचे आणि आदेशाचे पालन केले पाहिजे. याच अवस्थेत तो विश्वाशी, सृष्टीशी एकरूप होऊन सफलतेच्या मार्गावर जाऊ शकतो. ईश्वराशी बंड, त्याची अवज्ञा म्हणजे लोक-परलोक या दोन्ही जीवनांमध्ये अयशस्वी होऊन आपले जीवन बरबाद करण्याचा मार्ग आहे. आणखी दुसऱ्या दृष्टीकोनातून विचार केला तर माणसाची सर्वांत मोठी गरज आहे की, त्याला समजले पाहिजे की, ईश्वराने त्याला जीवन बहाल केलेले आहे. त्याने दिलेल्या कर्तृत्वाचा आणि सामर्थ्याचा वापर अशा प्रकारे करावा की, लोक व परलोक या दोन्ही जीवनांमध्ये यशस्वी व्हावे. त्याचा मालक, पालनकर्ता आणि बुद्धिमान असा ईश्वर त्याच्यावर संतुष्ट व प्रसन्न व्हावा. ही फक्त व्यक्तिगत बाब नसून ती सर्व जाती, समाज आणि संपूर्ण मानवतेशी संबंधित आहे. मानवाला एका अशा कायद्याची नितांत आहे, ज्यामध्ये काळे-गोरे, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, कामगार-भांडवलदार, पौर्वात्य-पाश्चिमात्य सर्वांना समान न्याय मिळेल! सर्वांना कायमस्वरुपी समान संधी असेल. सर्व मानवजातीच्या समस्यांचे एकमेव आणि समाधानकारक निराकरण असेल अशा प्रकारचे कायदे-कानून मनुष्य आजपर्यंत बनवू शकला नाही किंवा तो कधीही बनवू शकत नाही. त्याच्याजवळ ते ज्ञान, समज, बुद्धी, दृष्टी आणि ते कतृत्वच नाही जे नैतिक धर्म व शाश्वत कायदे-कानून बनविण्याकरिता जरुरीचे आहे. अशा प्रकारचे धर्म, जीवनपद्धती आणि कायदा फक्त ईश्वरच बनवू शकतो, जो सर्वज्ञानी असून सर्व मानवजात आणि निसर्गाचा निर्माता आहे. व्यक्तीचे नशीब, उत्कर्ष व अवकर्ष, यश व अपयश यांच्या कारणांचा माहीतगार आहे. अज्ञानापासून पवित्र, ज्ञान आणि विद्वत्तेचा उगम, अन्याय आणि जबाबदारीच्या प्रत्येक भागाबद्दल ज्ञानी आणि न्यायी आहे. त्याच्या दृष्टीत सर्व मानव एकसारखे, एकरुप व समान आहेत. सर्व त्याचीच निर्मिती, सेवक व भक्त आहेत. तो सर्वांकरिता कृपाळू व दयाळू आहे. त्याने मानवाच्या सर्व लहान-मोठ्या गरजांच्या पूर्ततेची व्यवस्था केली आहे. तोच संपूर्ण मानवजातीच्या सर्वांत मोठ्या आणि मूलभूत गरजांची पूर्तता करु शकतो. विचारांती ईश्वराशिवाय कोण ठामपणे सांगू शकतो की, त्याची मर्जी, आशा-आकांक्षा, इच्छा काय आहे ? ईश्वराशिवाय ईश्वरी कायदा-व्यवस्था कोण प्रदान करू शकतो? परलोकाची कायमस्वरुपी मुक्ती, सफलता आणि यशाचा मार्ग कोण दाखवू शकतो ? आणि म्हणूनच अशा न्यायी दयाळू, कृपाळू, ज्ञानी ईश्वरावर पूर्णतः श्रद्धा ठेवली पाहिजे. त्याने मानवाच्या मूलभूत आणि महत्त्वपूर्ण गरजांच्या पूर्ततेकरिता व्यवस्था केलीच असेल आणि त्यांची पूर्तता तो आणि फक्त तोच ईश्वर करू शकतो.
आम्ही पाहतो की, वस्तुतः ईश्वराने मानवाच्या सर्वांत मोठ्या गरजेच्या पूर्ततेची व्यवस्था केली आहे. त्याने प्रत्येक काळामध्ये निरनिराळ्या समाजांमधून, जातींमधून अशा व्यक्ती निवडल्या आहेत की, ज्या उत्तमोत्तम बुद्धिमत्ता, सदाचारी आणि सन्मार्गी होत्या. त्या व्यक्तींना आपल्या देवदुतांमार्फत आपल्या मर्जीप्रमाणे आपला धर्म आणि कायदे-कानून याविषयी मार्गदर्शन केले आणि त्यांना या गोष्टींची जवाबदारी दिली की, हा ईशधर्म सर्वसामान्य, अज्ञानी, मार्गभ्रष्ट, अन्यायी, कुकर्मी, सामान्य माणसांपर्यंत पोहचवावा. त्यांना सुधारण्याचे अथक प्रयत्न त्यांनी (अर्थात प्रेषितांनी) करावे. या ईशधर्मामध्ये ईश्वराने सरळ स्पष्ट केले होते की, ईश्वराचे सेवक, भक्त, दास यांनी कोणत्या रीतीने ईश्वराची भक्ती करावी, कोणते कर्म ईश्वराच्या दृष्टीने चांगले आहे ते त्यांनी करावे, कोणते कर्म ईश्वराच्या दृष्टीने वाईट आहे की ज्यापासून त्यांनी दूर राहावे. जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणत्या मार्गाने ते कार्यरत राहतील ज्यामुळे सर्वांचा मालक व शासक ईश्वर प्रसन्न होईल. ईशधर्माने अशा कायद्यांची देणगी दिली, ज्यांमध्ये सर्व मानवजातीकरिता न्याय, जीवनातील सर्व बाबी, व्यवस्था, कर्तव्य, सदाचार, सामाजिक, आर्थिक, राजकीय इत्यादी घडामोडींमध्ये सार्वजनिक समस्यांचे समाधान आहे. त्यांच्या इहलोक जीवनाची सफलता आणि कायमस्वरुपी विकास व यशाची हमी, त्याचबरोबर परलोकाची कायमस्वरुपी मुक्ती आणि यशाची खात्री व हमी दिलेली आहे.
ईश्वराने निवडलेले प्रेषित हे ईश्वर नाहीत किंवा ईश्वराचे अपत्य, अवतार नसून ते ईश्वराच्या सृष्टीमध्ये, ईशरत्वामध्ये कणभर सुद्धा ढवळाढवळ करीत नाहीत. तेही मानवच आहेत. ईश्वराचे सेवक, भक्त व दास आणि प्रत्येक गोष्टीमध्ये, क्षेत्रामध्ये सामान्य मानवाप्रमाणेच लाचार आहेत. तेदेखील ईश्वरीय कोपापासून, अवज्ञापासून स्वतःचा बचाव करतात आणि ईश्वर त्यांना पापांपासून वाचवीत असतो. त्यांचे जीवन म्हणजे पवित्र जीवन असते. ते ईश्वराचे उत्तम दास, उपासक व भक्त असतात. ते ईश्वरीय धर्माचा, जीवनपद्धत्तीचा प्रचारक आणि सदाचाराचा एक आदर्श नमुना असतात. प्रेषितांचे शुद्ध जीवन म्हणजे उत्तम जीवनाचा एक आदर्श नमुना आहे.
अल्लाहचे हे निवडक दास ईश्वरीय कायदे-कानून, नीती-नियम सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवीत असतात. मार्गभ्रष्ट झालेले मानव त्यांचा (प्रेषितांना) विरोध करत, त्यांना शिवीगाळ करत आणि त्यांची थट्टामस्करी करत असत व त्यांच्यावर दगडफेकही करीत असत. त्यांच्यावर अन्यायाचे डोंगर कोसळत असत व त्यांना देशांतर करण्यास भाग पाडण्याच्या किंवा ठार मारण्याच्या योजना बनवत असत. परंतु ते मनुष्याला किंवा संकटास भिऊन स्वार्थापोटी आपल्या ईश्वरीय धर्म आणि जीवनपद्धतीमध्ये कणभरही बदल करीत नसत. उलट तेच विरोधकांना क्षमा करून त्यांचीसुद्धा स्वच्छ मनाने सेवा करत असत आणि ईश्वराकडून त्यांना (विरोधकांना) सन्मार्ग मिळावा यासाठी प्रार्थना करावयाचे. त्यांना प्रसिद्धीची किंवा ऐहिक फायद्यांची लालसा नव्हती. त्यांच्या जीवनाचा उद्देश व जीवनकार्य एकच असे की, ईश्वरीय धर्म, जीवनपद्धती सतत व निःस्वार्थपणे आचरणे, त्यांचा प्रचार करुन ईश्वराच्या दासांमध्ये सुधारणा घडवून आणणे, ईश्वरीय नियम, कायदे व ईशवाणी त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आणि ईश्वराच्या भूमीवर त्यास प्रस्थापित करणे, या उद्देशाकरिता, मिशनकरिता प्रेषित आणि त्यांचे खरे अनुयायी प्रचारक आपले संपूर्ण जीवन आणि आपले कर्तव्य पणास लावतात. प्रत्येक प्रकारची संकटे सहन करून आपल्या प्राणांची, संपत्तीची आहुती देऊन आपल्या ईश्वराला जाऊन भेटतात.
इस्लामी दृष्टीकोनातून प्रथममानव माननीय आदम (अ.) यांच्यापासून प्रेषितत्वाचा उगम होतो आणि शेवटचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यापर्यंत येऊन पूर्ण होतो. हे सर्व प्रेषित एकाच समुहाशी संबंधित आहेत. ईश्वराचे सर्व प्रेषित आणि त्यांच्यावर अवतरित ईशग्रंथ यांवर विश्वास, श्रद्धा ठेवणे हे मुक्तीकरिता जरुरीचे आहे. एखाद्या प्रेषिताला नाकारणे म्हणजे सर्व प्रेषितांना नाकारण्यासारखे आहे. तसेच कोणताही ईश्वरीय ग्रंथ नाकारणे म्हणजे सर्व ईशग्रंथांना नाकारण्यासारखे आहे.
ईश्वराचे हे प्रेषित निरनिराळ्या काळांमध्ये, युगांमध्ये समाजांमध्ये, जातींमध्ये, परिस्थितींमध्ये झाले. या फरकामुळे व विविधतेमुळे त्यांनी आणलेल्या नियमांच्या, कायद्यांच्या तपशीलामध्ये स्थानपरत्वे, काळपरत्वे काही फरकसुद्धा दिसून येतो. परंतु सर्वांचे मूलभूत तत्त्व एकच होते. सर्व प्रेषितांचा मूलभूत संदेश एकच होता की,
‘‘ईश्वराचीच-अल्लाहचीच भक्ती, आराधना, पूजा-अर्चा करा. अल्लाहशिवाय भक्ती व उपासनेयोग्य दुसरा कोणी नाही.’’
अल्लाहच्या (ईश्वराच्या) भक्तीशिवाय इतर दुसरा कोणताच मार्ग नाही की ज्यानुसार ईशधर्माचे, जीवनपद्धतीचे अनुसरण व पालन करता येईल. दुसऱ्या शब्दांत असे म्हणता येईल की, प्रेषितांच्या आज्ञेचे पालन केले जावे. कारण प्रेषितांचे आज्ञापालन हे ईश्वराचे आज्ञापालन आहे आणि ईश्वराचे आज्ञापालन म्हणजे ऐहिक व पारलौकिक जीवनामध्ये सफलतेचे, यशाचे मानचिन्ह आणि प्रतीक आहे. प्रेषितांची अवज्ञा म्हणजे ईश्वर (अल्लाह) आणि त्याच्या आदेशांची, कायद्यांची अवज्ञा आहे आणि ईश्वराची अवज्ञा करणे म्हणजे ऐहिक व पारलौकिक जीवनामध्ये अयशस्वी होणे आणि विनाशाला कवटाळण्यासारखे आहे.
प्रेषित मुहम्मद (स.) पृथ्वीतलावर अवतरले तेव्हा अनेक ईश्वरीय ग्रंथ उदा. तौरात, जबुर व बायबलमध्ये लोकांनी बदल करुन टाकले होते. आजसुद्धा हीच परिस्थिती आहे. पवित्र कुरआनशिवाय कोणताच ईश्वरीय ग्रंथ खऱ्या स्वरुपात आणि सुरक्षित अवस्थेत अस्तित्वात नाही. मानवी फेरफार व बदल यामुळे सत्य व असत्य यांत संभ्रम निर्माण होतात. ईश्वरीय आदेश व कायदे- व्यवस्था यामध्ये मानवी कायदेव्यवस्थाची भेसळ झाली होती. ऐहिक व भौतिक यशाचा मार्ग ऐहिक मायाजालामध्ये जोखडून गेला होता. आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर कुरआन अवतरले. कुरआनची शिकवण काही नवी नाही. कुरआनने प्रेषितांच्या शिकवणींमधील मानवी फेरबदलाला वेगळे केले, असत्यापासून सत्याला उजेडात आणले, ईश्वराशी नाते आणि मुक्तीच्या खऱ्या मार्गाची ओळख निर्माण केली, ईश्वरीय कायदे-कानून, नियम यांचे खऱ्या व ठोस पद्धतीने स्पष्टीकरण केले, सर्व मानवांच्या व जगाच्या अंतापर्यंत एक सन्मार्ग आणि मार्गदर्शनामध्ये कायमस्वरुपी आधुनिकता निर्माण केली. आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) जरी अरब देशातील मक्का शहरामध्ये जन्मले किंवा जगाच्या इतर कोणत्याही ठिकाणी जन्मले असते तरी इस्लामचा संदेश आणि इस्लामी संविधान संपूर्ण मानवजाती, सर्व देशांमध्ये, राष्ट्रांमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मानवाकरिता प्रलयकाळापर्यंत लागू झाले असते. प्रेषित मुहम्मद (स.) समस्त मानवांकरिता ईश्वराचे अंतिम प्रेषित आहेत.
आता आपण प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांचा ईशधर्म म्हणजेच (जीवन-व्यवस्थेला) आजच्या युगामध्ये किती महत्त्व आहे हे समजण्याचा प्रयत्न करू या.
ही गोष्ट बायबल, कुरआन आणि धर्मांच्या इतिहासामध्ये अगदी स्पष्ट आहे की, पूर्वीचे प्रेषित (मुहम्मद पैगंबराच्या आधीचे) हे संपूर्ण मानवजाती आणि प्रलयकाळापर्यंतच्या सर्व मानवांच्या मार्गदर्शनाकरिता आलेले नव्हते, तर ते ठराविक अशा विशिष्ट समूह, जातीकरिता, विशिष्ट अशा देशासाठी, राष्ट्रासाठी पाठविण्यात आले होते. याउलट पवित्र कुरआनबद्दल ईश्वराने प्रत्येक वेळी स्पष्ट शब्दांमध्ये जाहीर केले आहे की, ते संपूर्ण विश्वाच्या आणि अंतिम दिवसापर्यंतच्या सर्व मानवांकरिता, सर्व युगांमध्ये, सर्व काळांमध्ये मार्गदर्शनासाठी अवतरले आहे. आपण पाहतो की, आज देशाला, मानवतेला ठराविक कालखंडामध्येच मार्गदर्शनाची गरज नाही तर विश्वाला, मानवतेला सर्व युगांमध्ये, सर्वकाळ मार्गदर्शनाची गरज आहे आणि ती फक्त प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांच्या शिकवणीद्वारेच आपणाला प्राप्त झाली आहे.
दुसरी गोष्ट आपण पाहतो की, ईश्वरीय ग्रंथांमध्ये पवित्र कुरआन कोणताही बदल न होता मूळ स्वरुपात, स्थितीत सुरक्षित आहे. इतर ईश्वरीय ग्रंथ सुरक्षित स्थितीत नाहीत. म्हणूनच ईश्वरीय मार्ग प्राप्त करण्याकरिता पवित्र कुरआनाकडेच निर्देश करावा लागतो आणि (आम्हाला) दुसऱ्या कोणामार्फत हे ईश्वरीय मार्गदर्शन मिळू शकत नाही.
तिसरी गोष्ट ही आहे की, पवित्र कुरआनविषयी जो तपशील प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिला आणि त्यांनी संपूर्ण जीवनभर स्वतः त्याप्रमाणे आचरण केले. हे हदीस (प्रेषिताचरण) आणि मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्रामध्ये तपशीलवार नमूद केलेले आहे. जगातल्या कोणत्याही महात्म्याचा, महान नेत्याच्या जीवनाचा तपशील प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनाप्रमाणे सुरक्षित नाही. हेच एकमेव असे कृतीशील आणि व्यावहारिक उदाहरण आहे, जे सर्व मानवतेच्या मार्गदर्शनाकरिता उपलब्ध आहे.
चौथी गोष्ट ही आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अल्लाहच्या मार्गदर्शनाच्या अधीन राहून अरबांच्या अत्यंत बिघडलेल्या समाजाचे एका उत्तम सजग समाजामध्ये परिवर्तन घडवून आणले. या परिवर्तनाचा व समाजसुधारणेचा हा एकमेव प्रयत्न आणि या एकमेव आदर्श नमुना बनलेल्या समाजाचा तपशील इतिहासामध्ये एक आदर्श उदाहरण आहे. सामाजिक सुधारणा आणि रचनात्मक समाजकार्याकरिता आपण त्यांचा लाभ घेऊ शकतो.
पाचवी बाब लक्षात येते की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईश्वरीय धर्म (इस्लाम) प्रस्थापित करण्यासाठी एक महान क्रांती घडवून आणली आणि एका आदर्श राष्ट्राची व राज्याची स्थापना केली. त्यांच्या पश्चात खलीफांनी आणि त्यांचे सहकारी व अनुयायी यांनी त्यास विशाल करुन त्यामध्ये दृढता आणली. या एकमेव आंतरराष्ट्रीय, मानवतेचा दृष्टीकोन असणारे धार्मिक, सदाचारी आणि आदर्श राज्याच्या प्रस्थापनेचा तपशील इतिहासात सुरक्षित आहे. आपण निरंतर क्रांतिकारक देश आणि नमुनेदार आदर्श राज्याची प्रस्थापना करण्यासाठी याची मदत घेऊ शकतो.
सहावी गोष्ट ही आहे की, संपूर्ण मानवता आज महान समस्यामध्ये गुरफटलेली आहे. त्या समस्या सोडविण्यास हल्लीचे सर्व धर्म आणि ‘इझम’ (वाद) अपयशी ठरले आहेत. परंतु इस्लाम धर्मामध्ये या सर्व समस्यांचे कायमस्वरुपी उत्तर व मार्ग अस्तित्वात आहेत. दुसरा कोणताही धर्म आणि व्यवस्था अशी नाही की, सर्व मानवतेच्या समस्यांचे निराकरण करु शकेल. हाच खरा चमत्कार व महत्त्व प्रेषित मुहम्मद (स.) आणि इस्लामचे आजच्या युगामध्ये आहे!
संबंधित पोस्ट
October 2024 Rabi'al Awwal 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *