Home A प्रेषित A प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आदर्श आचरण

प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आदर्श आचरण

बोले तैसा चाले,‘ या म्हणीनुसार आपण नेहमीच पाहतो की कोणत्याही समाजसुधारकाच्या शिकवणींचा प्रभाव केवळ अशाच परिस्थितीत होत असतो की स्वतः समाजसुधारक त्या शिकवणींवर आचरण करीत असतो. अन्यथा ‘लोकां सांगे विश्वज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण‘ अशी अवस्था असेल तर त्याच्या शिकवणीचा कोणताही प्रभाव इतरांवर पडत नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आचरण हे नेमके कुरआनाच्या शिकवणींचे परिपूर्ण स्वरूप होय. ईश्वरी आदेशावर कशाप्रकारे आचरण असावे, याचे परिपूर्ण प्रात्यक्षिक म्हणजेच त्यांचे समस्त जीवन होय. म्हणूनच त्यांचे आचरण हे एक आदर्श चरित्र आहे.

प्रेषित मुहम्मद (स.) हे बालपणापासून खरे बोलणारे आणि लोकांच्या अनामतींचे रक्षण करणारे असल्याची ख्याती पूर्ण समाजात होती. एवढेच नव्हे तर त्यांना त्यांच्या याच गुणविशेषणामुळे ‘अमीन‘ व ‘सादिक‘ अर्थात सत्यवचनी व अनामतदार अशा गौरवास्पद विशेषणानी लोक संबोधित असत. त्यांनी कधीही अरब समाजातील अज्ञानता व अमानवी परंपरांचा बालपणापासूनच स्वीकार केला नाही. अन्याय व अत्याचारांची कधीही साथ दिली नाही. ते अत्यंत गंभीर, मधुरभाषी आणि दयाळू स्वभावाचे होते. इतरांचे दुःख त्यांना पाहवत नसे. इतरांचे दुःख दूर करण्यासाठी स्वतः कष्ट उचलायचे, लोकांच्या आर्थिक अडचणी स्वतःचा कमाईतून खर्च करून सोडवायच्या, स्वतःजवळ पैसे नसल्यास इतरांकडून कर्ज घ्यायचे, मात्र कोणत्याही याचकास त्याची अडचण भागविल्याशिवाय परत करीत नसत. स्वतः भूकेले तहानलेले राहून इतरांचे पोट भरायचे. फक्त मानवच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांवर दया करायचे. अनाथ, वृद्ध, विधवा आणि गरिबांवर त्यांची विशेष कृपा असे. त्यांच्या याच दयाळू आणि कृपाळू वृत्तीमुळे ते समाजात सर्वांचे लाडके आणि प्रिय होते. त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. त्यांनी स्वतःकरिता काहीही ठेवले नाही. जे प्राप्त झाले, ते इतरांना वाटले.
दरिद्री आणि रंजल्यागांजल्यांविषयी त्यांच्या मनात कमालीची आपुलकी होती. त्यांनी रंजल्यागांजल्यांसाठी कल्याण केले. एवढेच नव्हे तर समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणार्या या अंतिम प्रेषितास जीवनभर कधीही पोटभर जेवणसुद्धा मिळाले नाही. (संदर्भ : सीरतुन्नबी, प्रथम खंड) ते नेहमी म्हणत असत,
‘‘तुम्हास ईश्वराकडून जी सहायता आणि उपजीविका मिळते ती गरिबांच्या आणि दीनदुबळ्यांच्या मदतीकरिता मिळते.‘‘ (संदर्भ : सहीह मुस्लिम)
त्यांच्या या वचनावरून हीच बाब स्पष्ट होते की आपल्याकडे असलेल्या संपत्ती, सामर्थ्य आणि शक्तीवर दीनदुबळ्यांचासुद्धा अधिकार आहे. त्यांचीच सेवा करण्यासाठी ईश्वराने आपल्याला हे ‘तन-मन-धन‘ प्रदान केलेले आहे.
संयम, शांती, दया आणि कृपाळू वृत्ती असलेल्या आदरणीय मुहम्मद (स.) यांची ही घटना अवश्य लक्षात घ्यावी. एकदा काय झाले की प्रेषित नेहमीप्रमाणे नमाज पढण्यासाठी मस्जिदकडे जात होते. रस्त्यात एका ‘ज्यू‘ समाजाच्या म्हातारीने त्यांच्या अंगावर कचरा फेकला. ते कचरा धुवून व कपडे बदलून परत मस्जिदीकडे गेले. हा नित्याचाच क्रम झाला. एके दिवशी म्हातारीचा कचराच अंगावर पडला नाही आणि प्रेषित अस्वस्थ झाले. ते सरळ म्हातारीस पाहायला व तिच्या खुशालीची विचारपूस करायला तिच्या घरी पोचले. म्हातारी आजारी पडली होती. प्रेषितांनी मोठ्या आपुलकीने तिची विचारपूस केली म्हणाले, ‘‘माते! आज तू माझ्या अंगावर कचरा फेकला नाही. म्हणून मला वाटले की कदाचित तू आजारी असावी. म्हणूनच तुला पाहायला आलो.‘‘ तिची शुश्रूषा केली. हा प्रकार पाहून म्हातारी दंग झाली. तिच्या डोळ्यांतून ढळा-ढळा अश्रु वाहायला लागले. प्रेषित मुहम्मद (स.) यांची हीच सहानुभूती आणि त्यांच्या मनातील सर्वांविषयी असलेले अपार प्रेम जेव्हा राजकीय आणि सामाजिक नभांच्या क्षितीजावर उगवले, तेव्हा समस्त मानवसमाज या सोनेरी किरणांनी उजळून निघाला. प्रत्येकाच्या मनातील द्वेष, मत्सर, ईर्ष्या आणि वैरभावाचे अंधकार नष्ट झाले. कोणी स्वीकारो अथवा न स्वीकरो! वस्तुस्थिती तर हीच आहे की, समाजाची अशा प्रकारे निःस्वार्थ भावाने सेवा केल्याशिवाय लोकांच्या मनमस्तिष्कावर आणि हृदयावर कोणासही अधिराज्य गाजविता येत नाही, हा सृष्टीचा नियमच आहे. त्यागाशिवाय प्रेम आणि सहानुभूती निरर्थक होय! हेच सत्य प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मक्का शहरावरील विजयाप्रसंगी स्पष्टपणे दिसून आले. त्यांनी याप्रसंगी लोकांना आणि समस्त मानवजातीस आपल्या अंतिम प्रवचनात स्पष्टपणे संबोधून म्हटले,
‘‘आज अज्ञानतेने बरबटलेल्या या वांशिक अभिमान आणि अहंकाराचा ईश्वराने नाश केला आहे. समस्त मानवजात आदम (अ.) अर्थात जगातील प्रथम मानवाची संतती असून आदमची निर्मिती मातीपासून झालेली आहे.‘‘ (संदर्भ : सीरतुन नबी, भाग – १)
मुळात हाच संदेश समस्त विश्वातील मानवांना ऐक्याची जबरदस्त आधारशिला उपल्बध करून देतो. प्रवचन संपल्यावर प्रेषितांनी प्रचंड जमलेल्या जवळपास सव्वालाख लोकांवर दृष्टी टाकली आणि मग कुरैश कबिल्यावर दृष्टी टाकली. या ठिकाणी ते अन्यायी व अत्याचारी लोकसुद्धा होते, ज्यांनी प्रेषितांनी सुरु केलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता, प्रेषित आणि त्यांच्या सहकार्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला होता, त्यांना रक्तबंबाळ करून सोडले होते, त्यांना परिवार, संपत्ती आणि मायभूमीचा त्याग करण्यास भाग पाडले होते, कित्येकांना शहीद केले होते, कटकारस्थान कले होते, प्रत्येक प्रकारचा छळ केला होता. समस्त विश्वाकरिता दया आणि कृपा असलेल्या या अत्यंत उदार मनाच्या प्रेषितांनी त्यांना संबोधित करून विचारले,
‘‘आज मी तुमच्याबरोबर कसा व्यवहार करणार आहे, हे तुम्हाला माहीत आहे काय?‘‘
या निष्ठूर, कठोरहृदयी, अन्यायी व अत्याचारी स्वभावाच्या लोकांनासुद्धा या गोष्टीचा पूर्ण विश्वास होता की प्रेषित मुहम्मद (स.) यांचा स्वभाव किती उदार आणि दयाळू आहे! ते किती थोर आहेत! त्यांनी साद घातली,
‘‘तुम्ही आमचे परम बंधु आहात!‘‘
विश्वबंधुत्वाचे आणि सत्य व न्यायाचे स्थापक प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सार्वजनिक अभयदानाची व क्षमादानाची घोषणा करीत म्हटले,
‘‘आज तुम्हा सर्वांना अभय देण्यात येत आहे! तुम्हा सर्वांना क्षमा करील आहे!‘‘
ही क्षमाशीलता, दया, प्रेम, त्याग आणि सहनशीलतेचे विलक्षण उदाहरण जगाच्या मानवेतिहासात कोठेच सापडू शकत नाही. आज म्हणजे मक्केच्या विजयाच्या प्रसंगी प्रेषितांकडे सर्वकाही होते. सत्ता होती, लष्करी सामर्थ्य होते. त्यांच्या फक्त एकाच इशार्यावर इस्लामविरोधी कृत्य करणार्यांच्या रक्तने मक्का शहराची भूमी लाल झाली असती. मक्का त्यागण्याच्या प्रसंगी विरोधकांनी हडपलेल्या संपत्ती आणि मालमत्ता परत घेता आली असती, मात्र प्रेषितांच्या या उदारपूर्ण स्वभावाचे कौतुक करण्याचा मोह इतिहासतज्ञ आवरू शकला नाही. एवढेच नव्हे तर आजपर्यंतच्या इस्लामविरोधक विचारवंतांनासुद्धा हे सत्य नाकारण्याचे धारिष्ट्य, झाले नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आणलेली ही क्रांती खरोखरेच अहिंसापूर्ण क्रांती होय.
इतिहासात ही बाब आपल्याला सातत्याने दिसून येते की एखाद्या समूहाने दुसर्या समूहावर जर का विजय प्राप्त केला की समजा विजेत्या पक्षाकडून लूटमार, हिंसा, सूड, अन्याय, अत्याचार, जाळपोळ, मानभंग यासारख्या असंख्य बाबी घडतात. पराजयाची नामुष्की पत्करलेल्या पक्षाच्या संपत्ती ताब्यात घेण्यात येतात. सर्वत्र अन्याय व अत्याचाराची आग लागलेली असते. दुसर्या महायुद्धाचे उदाहरण आजही इतिहासात प्रत्यक्ष पाहायला मिळते. या महायुद्धात फक्त पावने दोन कोटी लोकांच्या रक्तने लाल क्रांतीची लाल पहाट उगवली. या रक्तरंजित क्रांतीने इतिहासाची पाने आजही रक्तळलेली आहेत. अर्थात क्रांती म्हणजेच रक्तपात असे जणू समीकरणच झाले. मात्र इस्लामी क्रांती ही अहिसात्मक क्रांती होय, एवढे मात्र निश्चित! या क्रांतीची पहाट उगवली आणि मानवतेस अभय मिळाले. म्हणूनच मायकेल हार्टसारख्या ख्रिस्ती धर्मीय विचारवंताने अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांना जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती घोषित केले.

एक सामाजिक विश्लेषण

प्रारंभीच आपण इस्लामपूर्वीच्या अरब समाजाचे ‘सी.राइट मील्स‘ यांच्या दृष्टिकोनाच्या आधारावर तीन प्रकारे विश्लेषण केले आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याद्वारे जी क्रांती मानवजातीने अनुभवली, त्यानंतर अरब समाजाचे याच तीन प्रकारांच्या आधारे विश्लेषण करण्यात आले तर ते अशा प्रकारे होईल.
  1. समाजातील सर्व प्रकारची विषमता नष्ट झाली. मानवसमाज ऐक्य आणि न्यायाच्या भक्कम आधारावर उभा राहिला. समाजाच्या प्रत्येक भागात शोषण आणि विरोधपूर्ण संबंध नष्ट होऊन त्या ठिकाणी न्यायसंगत आणि शोषणरहित संबंध स्थापित झाले. वांशिक आणि वर्णावर आधारित तसेच गरिबी आणि श्रीमंतीच्या आधारावर असलेला भेदभाव नष्ट झाला. उच्च-नीच आणि श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या आधारावरील विषमता कायमची नष्ट झाली.
  2. मानवी इतिहासात या नवीन समाजास अत्यंत उच्च स्थान प्राप्त झाले. मानवतेच्या तुलनेत संपत्ती, द्रव्य आणि धनास श्रेष्ठत्व देण्याऐवजी मानवता आणि सदाचारास संपत्तीपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झाले. अर्थात मानवतेच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला.
  3. या नवनिर्मित समाजात जे लोक सत्तेमध्ये आले ते मानवतावादी, विनयशील, दयाळू, मानवसमानतेचे ध्वजवाहक, शोषणविरोधी मानसिकता असलेले आणि मानवतेचे खर्या अर्थाने प्रेरक होते. असत्यापासून दूर आणि सत्याची जीवंत उदाहरणे आहेत.
आजही जगाला याच परिवर्तनाची नितांत आवश्यकता आहे. आजच्या शोचनीय परिस्थितीत विव्हळत असलेल्या, व्याकूळ आणि भेदभावाच्या आगीत होरपळत असलेल्या मानवतेस मुक्ती देण्याची गरज आहे. सर्वत्र फक्त न्याय, प्रेम, बंधुत्व आणि त्यागाचे नंदनवन फुलविण्याची गरज आहे, शेवटी एवढेच!
संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *