Home A प्रेषित A प्रेषित मुहम्मद (स.) यांचा अंतिम हज

प्रेषित मुहम्मद (स.) यांचा अंतिम हज

‘हज’ हे इस्लामच्या मूलभूत असलेल्या पाच प्रार्थनाविधीपैकी एक विधी आहे. प्रत्येक मुस्लिमास यथासामर्थ्य जीवनात एकदा हजविधीसाठी काबागृहास जाणे अनिवार्य आहे. काबागृहाच्या भूभागात प्रेषित इब्राहीम(अ) आणि प्रेषित इस्माईल(अ) यांच्या त्याग व बलिदानाचा सुगंध दरवळत आहे. येथे ‘सफा’ आणि ‘मरवा’च्या टेकड्या असून येथेच प्रेषित इब्राहीम(अ) यांची भार्या माननीय हाजरा(अ) आपल्या तहानने व्याकूळलेल्या तान्हुल्याकरिता पाणी शोधत धावपळ करीत होती. याच ठिकाणी ‘जमजम’ नावाची विहीर निघाली आणि त्यांनी आपल्या तान्हुल्याची याच विहिरीच्या पाण्याने तहान भागविली. त्या रेताळ प्रदेशात आजपासून सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी निघालेल्या या विहिरीचे पाणी अतिउष्ण हवामान असूनही आजपर्यंत आटलेले नाही. आजही कोट्यवधी जनता या पाण्याचा मनमुराद लाभ घेते. त्याचप्रमाणे याच वातावरणात अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांच्या सत्यधर्माचा डंका वाजला आणि प्रारंभी इस्लाम स्वीकारून इस्लामच्या मार्गात खडतर संघर्ष केला आणि त्यांचा संदेश घरोघर पोहोचविला. त्यांच्या रक्तरंजित संघर्षाच्या खुणा प्रत्येक ठिकाणी स्पष्ट दिसतात. याबरोबरच मक्का शहरात विजय मिळविणार्या लष्कराच्या तुकड्या गस्त घालताना दिसतात. ‘जबले नूर’ (अर्थात कांतीमय पर्वत) वरील कडे हे इतर सर्व पर्वतापेक्षा भिन्न आणि विशिष्ट स्वरुपाचे आहे. याच पर्वतावर ‘हिरा’ नावाची गुहा असून याच गुहेत आदरणीय प्रेषितांवर दिव्यवाणी प्रथमतः अवतरित झाली असून या गुहेचे स्वरुपही चौदाशे वर्षांपासून आजपर्यंत जसेच्या तसे आहे. याच ठिकाणी असलेल्या ‘सफा’ पर्वतावरून पहिल्यांदा आदरणीय प्रेषितांनी लोकांना जाहीर आवाहन केले होते की, ‘‘हे मानवांनो! ऐहिक आणि पारलौकिक जीवनात यशस्वी होण्यासाठी एकमेव असलेल्या ईश्वराचीच उपासना करा!!!’’ याच ठिकाणी माननीय उम्मे हानी(र) यांचे निवास होते. येथूनच प्रेषितांना ‘मेअराज’चा प्रवास ईश्वराने घडवून आणला. येथेच ‘शाबे अबीतालिब’चे स्थान आहे. याच स्थानावर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि हाशिम कबिल्याच्या परिवारजणांना तीन वर्षांपर्यंत समाजापासून विभक्त राहावे लागले. जवळच ‘सौर’ नावाची गुहा आहे, हीच ‘गुहा’ ‘हिजरत’ (वतनत्याग) ची पहिली मजल होय. येथेच ‘तनईम’ हे ठिकाण असून याच ठिकाणी इस्लामद्रोह्यांनी माननीय जैद(र) आणि माननीय खब्बाब(र) या प्रेषितसोबत्यांना ठार केले.
याच ठिकाणी ‘मुहस्सर’ची घाटी असून याच घाटीत आदरणीय प्रेषितांच्या जन्माच्या तीन वर्षांपूर्वी हत्तींच्या फौजेवर ईश्वराचा कोप आला होता. येथेच कुरबानी (बलिदान) ची ती जागा आहे, जेथे ईश्वराच्या एका इशार्यावर प्रेषित इब्राहीम(अ) हे आपल्या मुलाचा बळी देण्यासाठी त्यास घेऊन गेले होते.
तात्पर्य हेच की, येथील प्रत्येक ठिकाण आपल्या इतिहासाच्या पवित्र अध्यायांचे एक सुवर्ण पान आहे. ‘हज’चे उद्दिष्ट जेथे हे आहे की, ईश्वराशी पूर्णतः संबंध प्रस्थापित करणे आणि एकेश्वरवादाच्या इब्राहीमी केंद्राशी असलेले संबंध घनिष्ट करणे होय. तेथेच हादेखील उद्देश आहे की, आपले वर्तमान आपल्या धर्माच्या भव्यतम भविष्याशी एकरूप व्हावे.
वर उल्लेख केल्याप्रमाणे हिजरी सन नऊमध्ये ‘हज’च्या प्रसंगी मुक्ती आणि विभक्तीची घोषणा झाली. ‘सूरह-ए-बरात’च्या चाळीस आयती माननीय अली(र) यांनी विरोधकांसमोर वाचून दाखविल्या, याचा वर उल्लेख झालेलाच आहे. या ‘हज’मध्ये प्रेषित मुहम्मद(स) हजर होऊ शकले नाहीत आणि यानंतर लागलीच ईश्वरातर्फे ‘हज’ हे अनिवार्य असण्याची घोषणा झाली.
हिजरी सन दहामध्ये आदरणीय प्रेषितांनी ‘हज’ करण्याचा इरादा केला. प्रेषितांच्या ‘हज’ करण्याची वार्ता समजताच जवळच्या परिसरातील सर्वजण प्रेषितांसह ‘हज’ यात्रेस जाण्याच्या तयारीस लागले. ‘हज’यात्रेवर निघण्यापूर्वी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी एक विशेष भाषण दिले. एक लाख २४ हजार लोकांना घेऊन प्रेषितांनी हज यात्रेची सुरुवात केली.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी काबागृहास प्रदक्षिणा घातली. मक्केतील इब्राहीम स्थळावर दोन रकअत नमाज पढली. ‘हज’चा संपूर्ण विधी संपल्यावर प्रेषितांनी लोकांना संबोधित केले. या अंतिम हजच्या वेळी झालेले प्रेषितांचे भाषण म्हणजे उच्चकोटीचे आंतरमानवी दस्तावेजच होय. हे भाषण केवळ आपल्या काळातील अतुलनीय विधानप्रणाली नसून त्यासारखी विधानप्रणाली विश्व अस्तित्वात असेपर्यंत तयार होणार नाही, तसेच या विधानप्रणालीस कोणत्याही काळात आणि कोणत्याही भागात कोणताच पर्याय नाही, ही बाब सर्वसिद्ध आहे! याच विधानप्रणालीस विश्व कल्याणास्तव आणि पवित्र धार्मिक भावनेसह लागू करण्यासाठी एका विश्वव्यापी दलाची किवा जनसमूहाची ईश्वराने निर्मिती केली आहे. या ईश्वरी विधानप्रणालीचे काही घटक वर्तमान युगात इतर विधानप्रणालींतही आढळतात. परंतु या विधानप्रणालींमागे इस्लामची प्रेरणाशक्ती नसल्याने त्या यशस्वी होत नाहीत. कारण विद्युत दिवा किती जरी मोठा असला आणि वीजच नसेल तर तो दिवा प्रकाशमान होणार कसा काय?
अंतिम ‘हज’च्या प्रसंगी प्रेषितांनी दिलेल्या भाषणात इस्लामच्या मूलभूत श्रद्धेव्यतिरिक्त काही मूलभूत इस्लामी नियमावलीसुद्धा दिली. याच नियमावलींच्या आधारावर संपूर्ण जीवनाच्या रहस्याचा उलगडा होतो. या मूल्यांबाबतीत आजचे प्रगत जगसुद्धा अज्ञान आहे.
‘अंतिम हज’च्या प्रसंगी प्रेषित मुहम्मद(स) यांनी केलेल्या भाषणातून हे सत्य समोर येते की, आजतागायत ३००० वर्षांच्या इतिहासामध्ये आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे पहिलेच पावन व्यक्तिमत्त्व आहेत की जे समस्त मानवतेसाठी व्यापक आणि विस्तृत संदेश घेऊन आले आणि या संदेशास एका क्रांतिकारी आंदोलनाचे स्वरुप दिले. या आंदोलनातून मानवकल्याणकारी असलेल्या इस्लामी शासनाची स्थापना केली आणि येथेच न थांबता ही शासनव्यवस्था जगातील सर्व राष्ट्रांपर्यंत पोहोचविण्याकरिता समस्त मानवजातीसमोर साक्षीदाराच्या स्वरुपात उभे राहणारा जनसमूह स्थापन केला.
आता या भाषणाच्या काही महत्त्वपूर्ण अंशाचा येथे उल्लेख करण्यात येत आहे.
‘‘लोकहो! मी आज जे सांगत आहे, ते लक्षपूर्वक ऐका. कदाचित या वर्षानंतर या ठिकाणी मी तुम्हासमोर नसणार! अज्ञान काळातील (इस्लामपूर्व काळातील) संपूर्ण विधान व नियम माझ्या पायाखाली आहेत. (म्हणजेच गैरइस्लामी विधान व नियम नष्ट करण्यात येत आहेत) हे मानवांनो! आपणा सर्व मानवजातीचा (व सृष्टीतील समस्त सजीव आणि निर्जीव वस्तूंचा) निर्माता व पालनकर्ता हा एकच (ईश्वर) असून आपण समस्त मानवजातीचा पितासुद्धा एकच आहे. अर्थात मानवतेत ऐक्य हे एकच पालनकर्ता आणि एकच पिता (आदरणीय आदम) असण्याच्या आधारावरच प्रस्थापित होऊ शकते. म्हणजेच एकाच ईश्वराच्या आदेशांचे पालन करण्याची आन घेतल्याने मानवांतर्गतचे कोणत्याही प्रकारचे भेदभाव पार नष्ट होतात. त्याचप्रमाणे समस्त मानवजात ही एकाच पित्याची संतती असल्याने समस्त मानव आपसात बांधव आहेत. तेव्हा भेदभावाचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणूनच कोणत्याही अरब माणसाला कोणत्याही बिगरअरब माणसावर कोणत्याही प्रकारे श्रेष्ठत्व नाही. कोणत्याही गोर्या माणसास कोणत्याही काळ्या माणसावर कोणतेच श्रेष्ठत्व नाही. (अर्थात अरब असो, बिगरअरब असो, काळा असो वा गोरा असो, श्रीमंत असो की गरीब असो, कोणीच कोणापेक्षा श्रेष्ठ नाही. कोणासही कोणत्याही पटीने फाजील आभिमान बाळगण्याचे कारण नाही.) एवढेच सत्य आहे की, ईश्वराच्या दृष्टिकोनात श्रेष्ठ मानव केवळ तोच आहे, जो ईशप्रेमास्तव आणि ईशभयास्तव उत्तम आचरण ठेवतो आणि संयमाने वागतो. (अर्थातच वंश, वर्ण, प्रदेश, राष्ट्र, भाषा व यासारख्या इतर सर्वच बाबींमुळे माणूस श्रेष्ठ होत नसून श्रेष्ठत्वाचे मूळ हे मानवाचे योग्य (इस्लामी) आचरण होय. इस्लाम धर्माची हीच ती मूळ विचारसरणी आहे, जिचा स्वीकार केल्याने माणूस माणसांचा बंधु होतो. बंधुभावाचा यापेक्षा सत्य आधार इतर दुसरा कोणताच असू शकत नाही. जगात कोणासही या गोष्टीचा अधिकार नाही की, त्याने देश, वर्ण, वंश व अशा इतर आधारांवर मानवास संघटित होण्याची हाक द्यावी.)
हे लोकहो! तुम्ही आपल्या निर्माता व पालनकर्ता असलेल्या ईश्वरास भेटण्याच्या अंतिम क्षणापर्यंत अवैधरीत्या कोणत्याही मानवाची हत्या करणे व त्याची संपत्ती (आणि शील) घेणे निषिद्ध आहे. जे लोक तुमच्या सेवेत आहेत, त्यांना तेच खाऊ घाला, जे तुम्ही स्वतः खाता आणि त्यांना तीच वस्त्रे द्या, जी वस्त्रे व पोषाख तुम्ही स्वतः वापरता.
अज्ञानकाळात (गैरइस्लामी काळात) झालेल्या सर्व हत्यांच्या बदला घेण्याची चालू असलेली शृंखला येथेच थांबविण्यात येत आहे. अज्ञानकाळात दिलेल्या कर्जावरील घेण्यात येणारे आणि देण्यात येणारे व्याज संपविण्यात येत आहे. आजपासून कोणीही आपल्या कर्जावरील व्याज घेऊ नये. (इस्लामपूर्व काळात व्याजाची प्रथा खूप जोरात होती, ती प्रेषितांनी नष्ट केली व व्याजव्यवहारास निषिद्ध ठरविले.)
हे मानवांनो! स्त्रियांवर पुरुषांचे आणि पुरुषांवर स्त्रियांचे अधिकार आहेत. स्त्रियांनी आपल्या पतींचे आणि पतींनी आपल्या पत्नींचे अधिकार अनिवार्यरीत्या पूर्ण करावेत. स्त्रीकडून एखादी चूक घडलीच तर पुरुषांनी त्यांना आपल्या शयनगृहापासून वेगळे ठेवावे. केवळ एवढीच शिक्षा देण्याचा पतीला अधिकार आहे. खबरदार! स्त्रियांवर कोणत्याच प्रकारची सक्ती करू नये. आपल्या पत्नींना मारझोड करू नये. मग जेव्हा पत्नीस आपल्या चुकीची जाणीव होईल तेव्हा चांगल्या परीने त्यांना क्षमा करावी.
स्त्रियांच्या बाबतीत मी तुम्हास खबरदार करीत आहे की, त्यांच्याशी चांगले व प्रेमपूर्वक वर्तन करा. कारण त्या तुमच्यावर अवलंबून आहेत. त्या ईश्वराने तुमच्याकडे ठेवलेल्या ठेवी व अनामती आहेत. (म्हणून त्यांना धक्कादेखील लागता कामा नये.) ईश्वराने घालून दिलेल्या (अर्थात इस्लामी) नियमांनुसार त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करावे.
हे लोकहो! मी ईश्वराचा अंतिम प्रेषित आहे. माझ्यानंतर कोणीही प्रेषित येणार नाही. म्हणून मी तुम्हास ईश्वराचा आदेश देतो की, आपल्या निर्माता व पालनकर्ता ईश्वराचीच उपासना करावी. केवळ त्याच्याच आदेशानुसार आणि त्यानेच घालून दिलेल्या नियमांनुसार जीवन व्यतीत करावे. पाच वेळा नमाज पढावी, रमजान महिन्यात रोजे (उपवास) धरावे, आपल्या ईश्वराच्या घराचे दर्शन घ्यावे (अर्थात ‘हज’ करावे) आणि आपल्या प्रमुखाचे (वैध) आदेश व नियमांचे पालन करावे, तरच तुम्हास मुक्ती मिळून स्वर्गप्राप्ती होऊ शकते.
तुम्ही कधीही मार्गभ्रष्ट होऊ नये म्हणून मी तुम्हास दोन बाबी प्रदान करीत आहे. एक म्हणजे ईश्वरी ग्रंथ (दिव्य कुरआन) आणि दुसरे म्हणजे माझी जीवनप्रणाली (प्रेषितप्रणाली).’’ एवढे बोलून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले, ‘‘हे ईश्वरा! तू साक्षी आहेस की, मी तुझा संदेश मानवजातीपर्यंत पोहोचविला.’’ मग लोकांना उद्देशून म्हटले, ‘‘हा संदेश येथे हजर नसलेल्या मानवांपर्यंत पोहोचवावा.’’
प्रेषितांनी आपले भाषण संपविल्यावर नमाज अदा केली आणि ईश्वरासमोर प्रार्थना केली. याचप्रसंगी दिव्य कुरआनची ही आयत अवतरित झाली, ज्यामध्ये ईश्वराने म्हटले आहे,
‘‘या दिवशी तुमच्यासाठी तुमचा धर्म परिपूर्ण केला आहे आणि तुमच्यावरील माझी कृपा पूर्णत्वास नेली आहे. तसेच तुमच्यासाठी (जीवनविधीस्तव) मी (ईश्वराने) इस्लाम धर्म पसंत केला आहे.’’(संदर्भ : दिव्य कुरआन – ५ -४)
या आयतींचा स्पष्ट अर्थ असा होय की, आदरणीय प्रेषितांना ज्या उद्देशपूर्वीस्तव जगात पाठविण्यात आले होते, तो उद्देश पूर्ण झाला आणि ईश्वरातर्फे धर्माचे (जीवनसंहितेचे) जे नियम व आदेश यायचे होते ते सर्व आदेश व नियम प्रेषितांमार्फत आलेले आहेत.
यानंतर आदरणीय प्रेषितांनी ‘हज’च्या बाकीच्या विधी आटोपल्या. कुरबानीसाठी आणलेले ६३ उंट आदरणीय प्रेषितांनी स्वतःच्या हाताने ‘जबह’ केले. (कापले) बाकीचे उंट माननीय अली(र) यांच्या हस्ते जबह करण्यात आले.
जिलहज्जा महिन्यादरम्यान उत्तर रात्री मक्का शहरी ‘तवाफे विदाअ’ (निरोप प्रदक्षिणा) केल्यावर ‘फजर’ (सकाळ) ची नमाज अदा करून आपल्या सोबत्यांसह मदीना शहरी परत आले.
‘अंतिम हज’च्या प्रसंगी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी म्हटले होते,
‘‘या वर्षानंतर पुढील वर्षी कदाचित मी तुमच्या समोर नसेलही.’’
तसेच असेदेखील म्हटले की,
‘‘हे ईश्वरा! तू साक्षी आहेस, की मी तुझा संदेश मानवजातीपर्यंत पोहोचविला आहे.’’
मग असेदेखील म्हटले की,
‘‘लोकहो! मी तुमच्याकरिता ईश्वरी आदेश (दिव्य कुरआन) आणि माझी जीवनप्रणाली देऊन जात आहे. या दोन्हींवर आचरण केल्यास तुम्ही कधीच वाट भटकणार नाही.’’
मग ईश्वराचा आदेश असा आला की,
‘‘आजच्या दिवशी समस्त मानवांसाठी धर्मास (जीवनसंहितेस) पूर्णत्वाचे स्वरुप देण्यात आले आहे.’’
प्रेषितांच्या मृत्यूच्या सहा महिन्यांपूर्वी ‘सूरह-नस्त्र’ अवतरित झाली व यामध्ये असलेल्या संकेतावरून हे स्पष्ट झाले की, ईश्वरी दूत सत्य धर्माचे प्रवक्ते, इस्लामी समुदायाचे मार्गदर्शक नवीन सभ्यतेचे दाता आणि मानवतेचे उपकारक आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे लवकरच जगाचा निरोप घेणार आहेत. एवढेच नव्हे तर अंतिम हज करून परत येताना ‘गदीरे खुम’ या ठिकाणी पोहोचल्यावर प्रेषितांनी स्पष्टपणे म्हटले की,
‘‘मीसुद्धा एक मानव आहे आणि माझ्याकडे ईश्वरातर्फे लवकरच मृत्यूचा दूत येईल.’’
यानंतर असेही म्हटले,
‘‘मी तुमच्यावर दोन जवाबदार्या टाकून जात आहे, एक ईश्वरी ग्रंथ (दिव्य कुरआन) की ज्यामध्ये मार्गदर्शन आहे. म्हणून ईश्वरी ग्रंथास नेहमीच आपले मार्गदर्शक बनवा. दुसरी जी जवाबदारी तुम्हास सोपवीत आहे, ती माझ्या परिवारजणांची आहे. त्यांचा विसर पडू देऊ नका.’’
प्रेषितांच्या बोलण्याचा उद्देश अगदी स्पष्ट होता. प्रेषितानंतर येणार्या काळाच्या बाबतीत ते सूचना देत होते. पहिल्या वाक्यात ईश्वरी ग्रंथास मार्गदर्शक आणि जीवनाचे विधान बनविण्याची सूचना आणि दुसर्या वाक्यात प्रेषितांच्या परिवारजणांची काळजी घेण्याची सूचना होती. कारण प्रेषितपरिवाराच्या लोकांनी संपूर्ण जीवनच सत्यास अर्पण केलेले तर होतेच, शिवाय जीवनभर त्यांना धनहीन राहूनच जगावे लागलेले होते. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या परिवारजणांसाठी कोणतीच संपत्ती कमावून ठेवली नव्हती. तसेच त्यांच्यासाठी कोणतेही हित, अधिकार वा आरक्षण निश्चित केले नव्हते. प्रेषितांनीही स्वतः आपले प्रत्येक हित व अधिकार सत्यावर बळी चढविले तर होतेच, शिवाय आपल्या परिवारजणांनासुद्धा संपत्ती न जमविण्याची आणि संपत्तीचा लाभ न घेण्याची शिकवण दिली होती. म्हणून प्रेषितांनी आपल्या सोबत्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली की, माझ्या परिवारजणांची काळजी वाहावी. त्याचप्रमाणे आदरणीय प्रेषितांचे वैयक्तिक जीवन त्यांच्या परिवारजणांनी खूप जवळून पाहिल्यामुळे त्यांना प्रेषित जीवनप्रणालीचा चांगला अभ्यास होता आणि मुळातच प्रेषित जीवनप्रणाली मानवांपर्यंत पोहोचविण्याचे सर्वांत उत्तम साधन म्हणजेच त्यांचे परिवारजण होय. म्हणून त्यांच्या मार्गदर्शनापासून वंचित न राहण्याकरितासुद्धा त्यांची काळजी वाहणे आवश्यक होते. याचप्रसंगी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी असेदेखील म्हटले, ‘‘मी ज्याचा प्रिय मित्र आहे, ‘अली(र)’ सुद्धा त्याचा प्रिय मित्र होय! हे ईश्वरा! जो ‘अली(र)’ यांच्याशी मैत्री करील, तूदेखील त्याच्यांशी मैत्री कर आणि जो ‘अली(र)’ यांच्याशी वैरभाव ठेवील, तूसुद्धा त्याच्याशी वैरभाव ठेव!’’
अर्थातच माननीय अली(र) हे प्रेषितांचे जावई आणि चुलत भाऊदेखील होते. त्यांनी बर्याच महत्त्वाच्या कामगिर्या पार पाडल्या होत्या. प्रेषितांकरिता पावलोपावली नाना संकटे झेलली आणि बर्याच वेळा आपले प्राण धोक्यात घालून प्रेषितांचे प्राण वाचविले. धर्मयुद्धात प्राण पणाला लावून रणभूमी गाजविली. ते ज्ञान आणि विधीशास्त्रात पारंगत होते. अगदीच बालपणापासून त्यांनी प्रेषितांसोबत आपल्या जीवनाचा एक एक क्षण घालविला आणि प्रेषितांवर येणारे प्रत्येक संकट आपल्यावर घेतले. प्रेषितांशी त्यांचे नातेही होते आणि ते प्रेषितांच्या मुलासारखेच होते.
‘गदीरे खुम’च्या ठिकाणी माननीय अली(र) यांच्या बाबतीत प्रेमपूर्वक वर्तन करण्याची प्रेषितांची सूचना ऐकताच माननीय उमर(र) यांनी त्यांना शुभकामना देऊन आलिगन दिले. माननीय बरीदा अस्लमी(र) यांनी तर जीवनभर अली(र) यांची सेवा केली.
‘सफर’ महिन्याच्या (अकरा हिजरी सनात) वेळी प्रेषितांनी ईश्वर मिलनाची तयारी सुरु केली. एके दिवशी ‘उहुद’च्या ठिकाणी जाऊन ईश्वरासमोर नतमस्तक झाले आणि प्रार्थना केली, मग सर्वांना संबोधून म्हटले,
‘‘लोकहो! मी तुमचा निरोप घेणार आहे आणि ईश्वरासमोर तुमच्याबाबतीत साक्ष देणार आहे. मी ‘कौसर’च्या हौदाचे येथूनच दर्शन करीत आहे. मला या गोष्टीची भीती नाही की माझ्यानंतर तुम्ही अनेकेश्वरवादी व्हाल. केवळ एवढीच भीती वाटते की, माझ्या पश्चात तुम्ही ऐहिक सुखात गुरफटून सत्याची साथ सोडाल.’’
मग निम्या रात्री ‘बकीअ’ या कब्रस्तानात जाऊन आपल्या मृत नातेवाइकांसाठी मोक्षप्राप्तीची प्रार्थना केली आणि मृतांना उद्देशून म्हणाले,
‘‘मी लवकरच तुम्हाला येऊन भेटणार आहे.’’
नंतर एके दिवशी आंदोलनाच्या विशेष कार्यकर्त्यांची भेट घेऊन म्हणाले,
‘‘हे विश्व ईश्वराचे आहे. या विश्वात राहणारा प्रत्येकजण ईश्वराची निर्मिती आहे. तुम्हाला ईश्वराने शासन याकरिता प्रदान केले आहे की, तुम्ही त्यांच्या समस्या सोडवाव्यात. त्यांचे दुःख दूर करावे. त्यांचे अधिकार त्यांना प्रदान करावेत. त्यांच्यावर तुम्हास प्रभुत्व मिळाल्याचा अर्थ असा मुळीच नव्हे की, तुम्ही त्यांच्याशी उदंडपणाचे आणि दांभिकतेचे वर्तन करावे.’’
‘बकीअ’ कब्रस्तानातून परतताना प्रेषितांची प्रकृती खालावू लागली. आजारपणातही आदरणीय प्रेषित आंदोलन आणि इस्लामी राज्याची पूर्णतः काळजी वाहात होते. सफर महिन्याच्या सव्वीस तारखेस प्रेषितांनी ‘रोम’ वर हल्ला करण्याचा आदेश दिला आणि दुसर्या दिवशी माननीय उसामा बिन जैद(र) या तरुण व तडफदार योद्ध्यास या लष्करी मोहिमेचा प्रमुख नियुक्त केले. माननीय उसामा(र) यांचे वय या वेळी खूप कमी होते.
मृत्यूच्या पाच दिवसांपूर्वी प्रेषितांची प्रकृती थोडी सुधारली असल्याने ते मस्जिदमध्ये आले आणि आपल्या अनुयायांना संबोधित करताना म्हटले,
‘‘तुमच्यापूर्वी असे लोक होऊन गेलेत की ज्यांनी आपल्या प्रेषित आणि धार्मिक नेत्यांच्या कबरींना पूजास्थळे बनविली होती. (अर्थात प्रेषित आणि धर्मगुरुंच्या कबरींची पूजा व आराधना करू लागले व कबरींवर माथा टेकू लागले होते.) तुम्ही मात्र असे मुळीच करु नका. (कारण पूजा व आराधना केवळ ईश्वराचीच करणे आवश्यक आहे.)’’
मग प्रेषितांनी सामूहिक नमाज पढविली व परत लोकांना उद्देशून म्हणाले,
‘‘मी तुम्हास अन्सार (मदीनावासी जनता) च्या अधिकारांच्या बाबतीत विशेष जाणीव करून देत आहे. कारण हे लोक माझ्या शरीराचा पोषाख आणि माझ्यासाठी मार्गसाधन होय. त्यांनी त्यांच्या वाट्याची जवाबदारी पूर्ण केली. आता तुमच्यावर त्यांच्या जवाबदार्या शिल्लक आहेत.ईश्वराने आपल्या दासास (मानवास) याचा पूर्ण अधिकार दिला आहे की त्याने वाटल्यास केवळ ऐहिक सुखसमृद्धी घ्यावी अथवा वाटल्यास ईश्वराची मर्जी मिळवावी.’’आता प्रेषितांची प्रकृती मात्र खालावली. लोकांमध्ये शोकाकूल वातावरण निर्माण झाले. तेव्हा लोकांची अवस्था पाहून प्रेषित मुहम्मद(स) दोन जणांच्या सहार्याने परत मस्जिदमध्ये आले आणि लोकांना संबोधित केले,
‘‘प्रिय जणांनो! मला खबर मिळाली आहे की, तुम्हास माझ्या मृत्यूचे भय वाटते. माझा मृत्यू तुम्हासाठी असहनीय बाब झाली आहे. परंतु तुम्हास हे सहन करावे लागणारच आहे. कारण माझ्यापूर्वी जेवढे प्रेषित या जगाच्या पाठीवर आलेत, तेसुद्धा नेहमी जीवंत राहिले नाहीत. मला पण ईश्वरभेटीस जाणे भाग आहे. मी तुम्हास सूचना देतो की अंसार (मदीनावासी जनता) शी भलाई आणि उपकार व सौहार्दाचे वर्तन करा. तसेच मी सूचना करतो की, मुहाजिरीन (स्थलांतरीत) जणांनी आपसात सद्भावाचे व स्नेहभावाचे वर्तन करावे.’’
या भाषणानंतरच्या सोमवारी प्रेषितांनी आपल्या सोबत्यांना पाहून स्मीत हास्य केले. याच्या काही क्षणानंतर प्रेषितांनी हात उचलून प्रार्थना करताना तीन वेळेस म्हटले,‘‘अल्ला हुम – मा अर – रफीऊल आला!’’आणि माननीय आयशा(र) (प्रेषितांची अंतिम भार्या) यांच्या कुशीत डोके ठेवून ईश्वरभेटीस गेले. हा ‘रब्बील अव्वल’ महिन्याच्या बारा तारखेचा दिवस असून सकाळची वेळ होती. या वेळी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे वय चौसष्ट वर्षे आणि चार दिवस एवढे झाले होते. प्रेषितांचा मृत्यू म्हणजे एक विलक्षण घटना होती. एकाच क्षणामध्ये कित्येक शतकांचा अंत झाला होता. काळ जागीच स्तब्ध झाला होता. सर्वांचाच थरकाप उडाला होता. काळीज पार फाटून गेले होते. मने शिथील झाली होती. रक्त गोठून गेले होते. शब्द अबोल झाले होते. विश्वात निख शांतता पसरली होती. पाकळ्या कोमेजून गेल्या होत्या. सगळीकडे स्तब्धता! जीवनभर मानव कल्याणास्तव झटणार्या एका युगपुरुषाचा अंत झाला होता. माननीय उस्मान(र) यांना काही सुचत नव्हते. माननीय अली(र) अचेतावस्थेत पडले होते. माननीय अब्दुल्ला बिन अनीस(र) यांना शोक अनावर झाल्याने त्यांनी जागीच प्राण सोडला होता. माननीय उमर(र) यांचे काही वेळासाठी मानसिक संतुलन बिघडले होते.
आदरणीय प्रेषितांच्या मृत्यूमुळे केवढी मोठी पोकळी निर्माण झाली होती. प्रेषितांनी तयार केलेल्या समूहाने खरोखरच अशा संकटमय परीस्थितीतही आपल्या जवाबदारीची जाणीव आणि चारित्र्याच्या अभूतपूर्व दृढतेचा पुरावा अशा प्रकारे सादर केला की तत्काळ नेतृत्वाची ही पोकळी भरून काढली आणि या अतिशय नाजुक परिस्थितीतही कोणत्याच प्रकारची स्पर्धा झाली नाही.
ही आहे या थोर महामानवाची चरित्रकथा, ज्याचे उपकार समस्त मानवतेवर आहेत. आपण या अंतिम प्रेषितांची उम्मत (अनुयायीसमूह)आहोत. आपल्या प्रेषितांनी आपल्या हित व कल्याणासाठी अपार दुःख झेलले, ना ना प्रकारचे बलिदान दिले. त्यामुळे आपल्याजवळ त्यांचे ऋृण फेडण्याची ऐपतसुद्धा नाही.
शेवटी ईशदरबारी पाणावलेल्या डोळ्यांनी प्रार्थना करू या की, हे ईश्वरा! तुझ्या आदेशांवर आणि प्रेषितांनी दाखविलेल्या मार्गावर समस्त मानवजातीस जाण्याची सद्बुद्धी मिळो आणि समस्त मानवजातीचे कल्याण होवो!तथास्तु!
संबंधित पोस्ट
June 2024 Zul Qa'dah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
27 19
28 20
29 21
30 22
31 23
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 30
8 Zul Hijjah 1
9 2
10 3
11 4
12 5
13 6
14 7
15 8
16 9
17 10
18 11
19 12
20 13
21 14
22 15
23 16
24 17
25 18
26 19
27 20
28 21
29 22
30 23

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *