अलाउद्दीन खिलजीच्या काळात जियाउद्दीन बरनी हा बाजार आणि अर्थकारणाचा अभ्यासक होता. त्याने बाजार व्यवस्थापनाचे अनेक नियम सांगितले आहेत. त्याने मांडलेल्या ‘दारुल अदल’ या महागाई, साठेबाजारी रोखणाऱ्या बाजारपेठेच्या संकल्पनेला त्याकाळी खूप यश आले. बरनीने बाजार आणि अर्थव्यवस्थेविषयीची आपली मते इस्लामी अर्थशास्त्रावर आधारीत असल्याचे म्हटले आहे. इस्लामी तत्त्वज्ञानामुळेच या नव्या संकल्पनेने जन्म घेतल्याची पुष्टीही त्याने आपल्या लिखाणाला जोडली आहे. प्रेषित मुहम्मद (स.) मदीनेत असताना त्यांनी ‘दारुल अदल’ सारख्या आर्थिक शोषण नाकारणाऱ्या बाजाराची स्थापना केली होती. हे बाजार मस्जिद ए नबवीच्या शेजारी होते. या बाजाराविषयी प्रेषितांनी त्या वेळी भूमिका मांडताना म्हटले होते, ‘हा तुमच्या स्व:चा बाजार आहे. इथे कुणीच तुमच्याशी जबरदस्ती अथवा फसवणूक करणार नाही. कुणीच तुमच्याकडून जुलमी करदेखील घेणार नाही.’ या बाजाराच्या आधारे प्रेषितांनी व्यापाऱ्यांच्या मनमानीला लगाम लावला होता.
मदीनेतील बाजारस्थापनेमागची कारणमिमांसा
प्रेषितांनी मदीना शहरात स्थापन केलेल्या बाजारामागची पार्श्वभूमी कथन करताना डॉ. मेहमूद अहमद गाजी लिहितात, ‘या बाजाराची स्थापना करुन प्रेषितांनी इस्लामच्या अर्थव्यस्थेची मूलभूत तत्त्वेच सांगितली. प्रेषितांनी म्हटले होते की, बाजारात जे लोक व्यापार करतील त्यांना पुर्ण: स्वातंत्र्य असावे. त्यांना कोणत्याही बाह्य प्रभावाने आपल्या इशाऱ्यावर चालण्यासाठी बाध्य करु नये. अनैसर्गिक पध्दतीने वस्तूंच्या दरांमध्ये चढ-उतार होऊ नये. साठेबाजी होऊ नये. आणि कोणत्याच व्यक्तीला बाजारात आपला माल आणण्यापासून रोखले जाऊ नये.’ ही घोषणा करण्यामागे एक मुलभूत कारण होते.
‘मक्का शहरात कातडीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असे. कातडे विकण्यासाठी मदीना शहरातील बाजारात मक्केतील व्यापारी येत असत. ज्यू सावकारांना याची माहिती मिळाल्यानंतर ते मदीना शहराच्या बाहेर जाऊन त्या व्यापाऱ्याला रोखत. त्याला बाजारातील दराची माहिती मिळू देत नसत. त्याच्याकडून संपूर्ण माल खरेदी करत. त्यामुळे या सावकारांना बाजारातील दरांवर नियंत्रणही ठेवता येई. या प्रकाराने माल विकणाऱ्या संबधित व्यापाऱ्याला बाजारातील दरामुळे मिळणाऱ्या लाभापासून वंचित रहावे लागे. प्रेषितांनी या प्रकाराला निषिध्द ठरवले. आणि बाजारातील स्वातंत्र्याची घोषणा केली.’ त्याशिवाय प्रेषितांनी ग्रामीण उत्पादनव्यवस्थेला शहरी प्रभावापासून रोखण्याचे प्रयत्नही केले. त्यांनी ग्रामीण भागातील उत्पादक घटकांकडून शहरी व्यक्तींवर माल खरेदी करण्यासाठी निर्बंध लादले. शहरी व्यापारी ग्रामीण भागातील उत्पादक घटकाकडून वस्तू खरेदी करुन शहरातल्या बाजारपेठेत मनमानी दरावर विकत होते. या नव्या नियमामुळे ग्रामीण उत्पादक घटकाला थेट बाजारपेठेत प्रवेश मिळाला. आणि शहरी व्यापाऱ्यांच्या दलालीलाही लगाम लागले.’
इब्ने खल्दून हे इस्लामप्रणित प्रगत अर्थशास्त्राचे व्याख्याता मानले जातात. त्यांच्या मते, ‘बाजारातील शोषण संपवून इस्लामने सामान्यांच्या जगण्याला आधार दिला. बाजारात श्रमाचे मुल्य, वस्तूंचे मुल्य आणि नफ्याविषयी इस्लामने मांडलेला सिध्दांत शोषणव्यवस्थेला संपवणारा ठरला. इस्लाम हा नव्या जगातील माणसांसाठी माणूसकीचा संदेश घेऊन आला होता. कारण त्याने जीवनासाठी गरजेच्या वस्तू उपलब्ध करुन देणारी बाजारपेठ त्याच्यासाठी सुकर केली होती.’ इस्लामने मांडलेला श्रममूल्याचा सिध्दांत हा बाजारातील मुजोर व्यापारी आणि उत्पादन करणाऱ्या धनदांडग्यांना उघड आव्हान होते. श्रमिकांना सन्मान देण्यासाठी इस्लामने सक्तीची धर्मकर्तव्ये म्हणून काही नियम केले. नफा ठरवणारी अनियंत्रित व्यवस्था मोडीत काढण्यासाठी इस्लामने नफ्याचे प्रमाण ठरवून दिले.
हल्फुल फुदूल करार आणि शोषणाला आव्हान
प्रेषितांनी मक्का शहराच्या समाजजीवनात इस्लामच्या स्थापनेआधी केलेला पहिला हस्तक्षेप हा बाजारातील शोषणाविरोधात होता. प्रेषितत्वापूर्वी मुहम्मद (स.) यांनी ‘हल्फुल फुदूल’ हा करार मक्का शहराच्या बाजारात न्यायाच्या प्रस्थापनेसाठी घडवून आणला होता. मक्का हे शहर व्यापारीकेंद्र होते. आंतरराष्ट्रीय मसाला मार्गावर वसलेले हे शहर अरबांची सांस्कृतिक राजधानी म्हणून इतिहासात ओळखले जायचे. व्यापाऱासाठी भटकणाऱ्या इथल्या नागरीकांना भटकंतीमुळे आणि शहरात येणाऱ्या बाहेरच्या व्यापाऱ्यांमुळे उर्वरीत जगातल्या सांस्कृतिक घडामोडी ज्ञात व्हायच्या.
मक्केतील काही व्यापाऱ्यांकडे संपत्तीचे केंद्रीकरण झाले होते. ते त्यांच्या हिताची व्यवस्था लहान व्यापाऱ्यांना वेठीस धरुन जन्माला घालत. त्यामूळे कित्येक व्यापारी भिकेला लागत. शहरात श्रीमंत आणि गरीब अशी दरी निर्माण झाली होती. व्यापारी मार्गावरील शहर म्हणून बाहेरील अनेक उद्योजक मक्का शहरात यायचे. नव्या उद्योगांची सुरुवात करायचे. तेथील कनिष्ठ वर्गीय मजूरांमुळे आणि भिकेला लागलेल्या लहान व्यापार्यांमुळे मजुरांची संख्या मोठी होती. व्यापारी तांड्यासोबत हे मजूर शेकडो मैल चालून जात. सातत्याने होणाऱ्या आर्थिक शोषणातून या मजुरांची स्थिती दयनीय झाली होती. त्यातच व्यापाऱ्यांना अर्थसाहाय्य करणाऱ्या सावकरांनी आर्थिक शोषणाची सीमा ओलांडली. शोषणाचे हे चक्र मक्का शहराच्या अर्थकारणाला वेठीस धरत होते.
आर्थिक शोषण सामाजिक अराजकतेला आमंत्रण देते. अरबांना प्रिय असणाऱ्या मक्का शहरात माजलेली ही अराजकता अरबी मनाला अस्वस्थ करणारी होती. म्हणून कालांतराने ‘हल्फुल फुदूल’ सारखे करार करुन अरबी युवकांनी आर्थिक शोषणाच्याविरोधात एल्गार केला. तारुण्यात प्रेषित मुहम्मद (स.) हे त्या करारातील एक महत्त्वाचा दुवा होते. प्रेषिततत्वाची घोषणा केल्यानंतर देखील प्रेषितांनी पुढे आयुष्यात कधीही ‘हल्फुल फुदूल’ सारख्या सामंजस्य करारात सहभागी होण्याची संधी मिळाली, तर आपण त्यासाठी सिध्द असल्याचा पुनरुच्चार अनेकदा केला.
यामुळेच प्रेषितांना मक्का शहरातील धनिकांचा सर्वाधिक विरोध सहन करावा लागला. कारण या विरोधाच्या मुळाशी प्रेषितांद्वारे होऊ घातलेल्या आर्थिक बदलांची भिती होती. आर्थिक हितसंबंध गुंतलेल्या भांडवली घटकांना त्याच्या अर्थकारणाला आव्हान नको होते. एच. आर. गिब या मताची पुष्टी करताना म्हणतात, ‘मक्कावाल्यांचा विरोध त्यांच्या रुढींना (इस्लामने) आव्हान दिले म्हणून नव्हता. किंबहूना त्यांच्या धार्मिक अंधश्रध्देमुळे देखील तो विरोध नव्हता. मात्र त्या विरोधाच्या मुळाशी आर्थिक आणि राजकीय कारणे होती. मुहम्मद (स.) प्रणित समाजक्रांती त्यांच्या आर्थिक समृध्दीला प्रभावीत करण्याची शक्यता आधिक होती. नवस्थापित इस्लाम त्यांच्या मूर्तीप्रणित अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करु पाहत होता. प्रेषितांनी अर्थव्यवस्थेत सांगितलेले बदल अरबांच्या नफेखोरीला, शोषणाला रोखत होते.’ ते गरीबांचे अधिकार आणि सामान्य व्यापाऱ्यांच्या हितसंबंधांना जपण्याचे तत्त्व सांगत होते.
ज्या गटाचे शोषण उच्चवर्गीयांच्या हितांशी बांधील असणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे झाले होते. त्यांना इस्लामी अर्थव्यवस्थेची ही नवी तत्त्वे आकर्षित वाटत होती. धर्मप्रेरीत भांडवली सत्तेला इस्लाममुळे मिळालेले आव्हान मक्का शहरातील कनिष्ठ व मध्यमवर्गीयांना आकर्षित करत होते. त्यातही शोषित युवकांना इस्लामी परिवर्तनाने आपल्या बाजूला वळवले. असगर अली इंजिनीयर युवकांच्या सहभागाविषयी माहिती देताना लिहीतात, ‘ सुरुवातीच्या काळात इस्लामी आंदोलन समाजातील दुर्बल व पीडित व्यक्तींच्या विचारांना अभिव्यक्त करत होते. त्यामुळेच हे संशोधन रुचीपूर्ण ठरेल की, (इस्लामचे) आरंभीचे समर्थक कोण होते? अब्दुल मुतअल अस्सईदी नावाच्या एका इजिप्शीयन लेखकाने याविषयी संशोधन केले आहे. ते म्हणतात, नवस्थापित इस्लाम मुळात युवकांचे आंदोलन होते. ज्या लोकांच्या वयांची नोंद आढळते त्यामध्ये हिजरतच्या वेळी (मक्काहून मदीनेत स्थलांतर करताना) मोठी संख्या ४० हून कमी वयाच्या व्यक्तींची होती. त्यांनी आठ ते दहा वर्षापूर्वी इस्लामचा स्वीकार केला होता. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मक्केतील भांडवलदारांना इशारा दिला होता की, त्यांनी साठेबाजी करु नये, श्रीमंतीचा अहंकारी अभिमान बाळगू नये. हेच पीडित, गुलाम आणि अनाथांना अधिक आकर्षक वाटायचे.’
बाजाराचे नियमन
सामान्य माणसांच्या शोषणाचे केंद्र बाजार होते. बाजारातून मक्केतील अर्थकारण चालायचे. त्यामुळेच बाजारातील अर्थकारण, व्यवस्था, व्यवहार हा प्रेषितांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. प्रेषितांनी केलेल्या बाजाराच्या व्यवस्थापनाविषयी डॉ. यासीन मजहर सिद्दीकी लिहीतात, ‘बाजाराचे व्यवस्थापन हे शासनव्यवस्थेचा प्रमुख म्हणून इस्लामी राज्याच्या प्रमुखाचे कर्तव्य होते. प्रेषित वचनसंग्रहातून हे सिध्द होते की, प्रेषित स्व: बाजारांचा दौरा करायचे. व्यापऱ्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करीत. वस्तूंच्या दरातील चढ-उतार, श्रमिकांची स्थिती वगैरेंची माहिती घेत. ‘तिरमिजी’ या प्रेषित वचनसंग्रहात एक प्रसंग नोंदवला आहे. प्रेषित एकदा बाजारातून जात होते. त्यांनी एकेठिकाणी विक्रीसाठी आणलेल्या गव्हाचे ढिग पाहिले. प्रेषितांनी त्या ढिगाऱ्यात हात घातला. गव्हू ओलसर असल्याची त्यांना जाणीव झाली. प्रेषितांनी त्या व्यापाऱ्याकडे नाराजी व्यक्त केली. आणि ग्राहकांशी धोकेबाजी करण्यास मनाई केली.’
प्रेषितांनी बाजारात दलाली आणि दरांमधील कृत्रिम चढउतार रोखण्यासाठी प्रयत्न केले. बाजारात एकाच ठिकाणी उत्पादक व व्यापाऱ्यांना खरेदी-विक्री करण्यास मनाई केली होती. खरेदीची ठिकाणे व विक्रीची ठिकाणे अलग करण्यात आली होती. व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांच्या धोकेबाजी, मनमानीला लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे काही इस्लामी विद्वानांचे मत आहे. याकरीता प्रेषितांनी बाजाराचा प्रमुख म्हणून आधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. मक्केवरील विजयानंतर तत्काळ प्रेषितांनी बनु उमैय्या वंशाच्या सईदी घराण्यातील सआबद बिन सईद यांना मक्का शहराच्या बाजारात आधिकारी म्हणून नियुक्त केले. मक्का शहराचे अर्थकारण, बाजारपेठेवरील नियंत्रणासाठी ही नियुक्ती अत्यंत महत्वाची होती. यापध्दतीनेच हजरत उमर यांना मदीनेच्या बाजाराचा प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. त्याकाळात व्यापारी मदिनेच्या बाजाराला अतिशय महत्त्व देत.
मदीनेची बाजारपेठ त्याकाळात अनियंत्रीत होत चालली होती. देश-विदेशातील व्यापारी तेथे व्यापारास येत होते. त्यामूळे मदीनेच्या बाजारावरील उमर यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते. ज्या शहरातल्या बाजारात प्रमुखाची नियुक्ती केलेली नव्हती, त्याचे व्यवस्थापन त्या प्रदेशाच्या प्रमुखाकडे दिले होते.
साठेबाजारी आणि तोलन मापन
बाजारात सट्टेबाजारीवर प्रतिबंध घालण्यात आले होते. मदीनेच्या बाजाराची सुरुवात करताना प्रेषितांनी याविषयी भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी म्हटले होते, ‘आमच्या या बाजारात कुणी साठेबाजारी करु नये. असे करणाऱ्याला तीच शिक्षा दिली जाईल जी अल्लाहच्या संदेशात प्रक्षेप करणाराला दिली जाते.’ बाजारातल्या तोलन-मापनातली अनियमितताही प्रेषितांनी दूर केली होती. कुरआननेच याविषयी स्पष्ट आदेश दिला आहे. सूरह अल्मुतअफीन मध्ये काटा मारणाऱ्या आणि वस्तूंचे वजन कमी तोलणाऱ्यांची निंदा करण्यात आली आहे. याविषयी कुरआनमध्ये अनेक नियम सांगितले आहेत.
प्रेषितांनी बाजारात तोलन-मापनाची व्यवस्था एकसारखी असावी यासाठी काही नियम केले होते. डॉ. मेहमूद अहमद गाजी लिहितात, ‘बाजाराला चांगल्या पध्दतीने चालवण्यासाठी बाजारातील तोलन मापनाची पध्दत एकसारखी असणे गरजेचे असते. जर प्रत्येक व्यक्ती तोलन-मापनासाठी वेगवेगळे परिमाण वापरायला लागला की, बाजारातील वजन तोलनाची प्रक्रिया न्यायी राहणार नाही. प्रेषितांनी या सर्व प्रक्रियेचा आढावा घेतला. वजन मापनासाठी वापरल्या जाणाऱ्या परिमाणांचे परीक्षण करुन त्याला बाजारात लागू केले. आणि सर्वांना हेच परिमाण वापरणे बंधनकारक केले होते.’ दुसऱ्या शहरांमध्ये तोलन मापनाच्या या प्रक्रियेत काहीसे बदलही केलेले होते.
समारोप
इस्लाम हे जीवनवादी तत्त्वज्ञान आहे. जीवनाला आधिकाधीक निकोप करण्यासाठी इस्लामने सर्व प्रकारचे प्रयत्न केले. आणि काही नियम सांगितले आहेत. इस्लामने जीवनातल्या सर्वप्रकारच्या शोषणाला नाकरून नव्या व्यवस्थेची संकल्पना समोर ठेवली आहे. बाजार हे जीवनाची गरज पूर्ण करणारे माध्यम आहे. त्यामुळे बाजाराचे नियमन ही त्याकाळातील अपरिहार्य गरज होती. इस्लामने अर्थकारण आणि बाजाराचे नियमन सांगून आर्थिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली.
-सरफराज अहमद
(लेखक गाजीउद्दीन रिसर्च सेंटरचे सदस्य आहेत.)
0 Comments