Home A प्रेषित A परिपूर्ण ईमान

परिपूर्ण ईमान

अल्लाहच्या आज्ञांचे पालन करणारा व ते आचरणात आणणारा, असा अर्थ मुस्लिम या शब्दाचा आहे. पण अल्लाहचे अस्तित्व व त्याची सत्ता, गुणवत्ता तसेच त्याच्या इच्छेनुसारची जीवनपद्धत व पारलौकिक जीवनामधील पुरस्कार व शिक्षा याविषयीचे यथार्थ ज्ञान केवळ अल्लाहच्या प्रेषिताद्वाराच कळू शकते. म्हणून इस्लाम धर्माची अचूक व्याख्या ही आहे की, प्रेषितांनी दिलेल्या शिकवणींशी दृढ श्रद्धा व निष्ठा बाळगणे व त्यांनी दाखविलेल्या पद्धतीने ईश्वराची उपासना व त्याचे दास्यत्व करणे. जी व्यक्ती प्रेषितांचे माध्यम सोडून देऊन ईश्वराशी आज्ञाधारकतेचे व आज्ञापालनाचे थेट नाते जोडल्याचा दावा करते ती कदापिही मुस्लिम नाही.
प्राचीन काळी वेगवेगळ्या जाती-वंशासाठी वेगवेगळ्या प्रेषितांचे आगमन होत असे. तसेच एकाच जाती-वंशात एका पाठोपाठ असे अनेक प्रेषित येत असत. त्याकाळी इस्लाम म्हणजे प्रत्येक जाती-वंशांना, त्यांच्या प्रेषितांनी दिलेला विशिष्ट धर्म व दिलेली शिकवण असा असे. प्रत्येक देशात व प्रत्येक काळात इस्लामचा मूळ गाभा व त्याची वास्तवता जरी एकमेवच होती तरी त्यांच्या उपासनांच्या पद्धती, त्यांचे नियम व आचारसंहिता किंचित विविध प्रकारचे होते. याचसाठी एका जाती-वंशास दुसऱ्या जाती-वंशाच्या प्रेषिताचे अनुयायीत्व आवश्यक नव्हते, तरीसुद्धा त्यांच्याशी दृढश्रद्धा (ईमान) मनात बाळगणे हे सर्वांना अनिवार्य होते.
प्रेषित मुहम्मद (स.) यांना जेव्हा प्रेषित्व देण्यात आले तेव्हा त्यांच्याकरवी इस्लामी शिकवणीची परिपूर्णता केली गेली. संपूर्ण जगासाठी एक नियमावली व आचारसंहिता अवतरीत झाली. आता हे प्रेषित्व कोणाही एका विशिष्ट देशापुरते अगर एखाद्या जाती-वंशापुरतेच मर्यादित राहिलेले नसून ते समस्त मानवजातीसाठी आहे व ते चिरकालीन आहे.
पूर्वीच्या प्रेषितांनी इस्लामची जी शरिअत (नियम व आचारसंहिता) सादर केली होती ती सर्वच्या सर्व प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आगमनानंतर रद्दबातल केली गेली. आता ‘कयामत’ (प्रलयकाळ) पर्यंत अन्य कोणत्याही प्रेषिताचे आगमन होणार नाही,
तसेच ईश्वराकडून दुसरी एखादी शरिअतही अवतरणार नाही. तात्पर्य हे की, इस्लाम म्हणजेच प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायित्व करणे व त्यांचे आज्ञापालन करणे होय. त्याचप्रमाणे त्यांचे प्रेषित्व श्रद्धापूर्वक मानणे व ज्या बाबीवर श्रद्धा बाळगण्याची शिकवण त्यांनी दिली त्या सर्व बाबींवर विश्वासपूर्वक दृढश्रद्धा बाळगणे व त्यांनी दिलेल्या सर्व आज्ञा व आदेश यांना ईश-आज्ञा व आदेश मानून त्यांचे पालन करणे, हाच इस्लाम आहे. आता ईश्वरातर्फे अशा कोणाही व्यक्तीचे आगमन होणार नाही ज्याच्याशी निष्ठापूर्वक श्रद्धा बाळगणे आवश्यक होईल व मुस्लिम होण्यासाठी आवश्यक व तसे न केल्याने मनुष्य काफिर ठरेल.
अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी कोणकोणत्या गोष्टीवर ‘ईमान’ (दृढश्रद्धा) बाळगण्याची शिकवण दिली त्या गोष्टी कशा खऱ्या आहेत व त्यांच्याशी दृढश्रद्धा बाळगण्याने माणसाचा दर्जा किती उंचावतो हे आता आपण पाहू या.
ईश्वरावरील श्रद्धा (ईमान) अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिलेल्या शिकवणीतील सर्वप्रथम महत्त्वाची शिकवण आहे ‘ला इलाहा इल्लल्लाह’ (अल्लाहखेरीज कोणीही ईश्वर नाही) हे इष्टवचन म्हणजे इस्लामचा इष्ट आधारस्तंभ आहे. एका काफिर (अश्रद्ध) पासून (सत्याचा इन्कार करणारा) एका अनेकेश्वरवाद्यापासून (मुश्रीक) तसेच एका नास्तिकापासून (Atheist) एका मुस्लिमास वेगळे करून फरक दर्शविणारे हेच ‘इष्टवचन’ आहे. याच वचनाचा स्वीकार करण्याने व अस्वीकार करण्याने माणसामाणसांत एक मोठा फरक निर्माण होतो. त्याचा स्वीकार करण्याऱ्यांचा एक समुदाय (Community) होतो व त्याचा इन्कार करणाऱ्यांचा दुसरा समुदाय होतो. त्याचा स्वीकार करणाऱ्यांना या जगापासून ते पारलौकिक जीवनापर्यंत प्रगती, सफलता व प्रतिष्ठा प्राप्त होते तर त्यास नकार देणाऱ्यांना नैराश्य, तिरस्कार व अवमान मिळतो. माणसामाणसांत जो इतका प्रचंड फरक घडून येतो तो या छोट्याशा वचनाचा तोंडाने केवळ उच्चार करण्यानेच होत नाही. जिभेने ‘क्रोसिन’चाच फक्त घोष केल्याने तुमचा ज्वर कमी होणार नाही. त्याचप्रमाणे तोंडाने ‘ला इलाहा इल्लल्लाह’ म्हणून त्याचा अर्थ काय निघतो हे समजून न घेता तसेच उच्चारत राहाणे आहे. किती महान गोष्टीची कबुली दिली आहे व त्या कबुलीनुसार तुमच्यावर किती मोठी जबाबदारी येऊन पडते, हे जाणून न घेतल्याने व अर्थ न जाणता केवळ अशा उच्चारानेच काहीही लाभ होणार नाही. खरेतर वर नमूद केलेला फरक तेव्हाच दृष्टीस पडेल जेव्हा ‘‘ला इलाहा इल्लल्लाह’’ चा अर्थ तुमच्या रक्तात भिनेल, त्याच्या अर्थावर तुमची गाढ श्रद्धा व दृढ विश्वास बसेल आणि त्याविरुद्ध जितक्या विचारधारणा व श्रद्धा आहेत त्यापासून तुमचे मन निर्मळ होईल. अग्नि जाळणारा आहे, विष ही मृत्यूदायक वस्तू आहे. या विधानाच्या परिणामाचा जितका खोलवर ठसा तुमच्या मनावर उमटतो, कमीतकमी तेवढाच खोलवर ठसा या वचनाचाही तुमच्या मनावर उमटलेला दिसेल. अग्निच्या गुणधर्मावरील विश्वास तुम्हाला निखाऱ्यास स्पर्श करण्यापासून परावृत्त करतो. तसेच विषाच्या गुणधर्मावरील विश्वसनीय ज्ञान तुम्हाला विषापासून दूर ठेवते. अगदी त्याचप्रमाणे ‘‘ला इलाहा इल्लल्लाह’’ वरील ईमान, श्रद्धेच्या व आचरणाच्या बाबतीत सत्याच्या इन्काराचा (कुफ्र) अनेकेश्वरत्वाचा (शिर्क) व नास्तिकपणाच्या लवलेशाचासुद्धा शिरकाव करण्यापासून तुम्हाला परावृत्त करणारा होईल.
‘‘ला इलाहा इल्लल्लाह’’ चा अर्थ सर्वप्रथम आपण ‘‘इलाह’’ म्हणजे काय हे समजून घेऊ या. अरबी भाषेत ‘इलाह’चा अर्थ ‘‘उपासना करण्यास पात्र’’ व ‘‘भक्ती करण्यास पात्र’’ असा आहे. म्हणजे अशा एका महासत्तेचे अस्तित्व जे त्याच्या सर्वश्रेष्ठतेमुळे, वैभवामुळे व त्याच्या महाप्रकोपामुळे त्याची योग्यता व पात्रता अशी आहे की ज्याची उपासना केली जावी. त्याची उपासना करताना व त्याचे दास्यत्व पत्करताना मानवाने त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे. ती सत्ता अमर्याद शक्तिशाली असून तिची भव्यता समजून घेताना मानवी बुद्धी थक्क होऊन जाते, असा अर्थही ‘इलाह’ शब्दात अंतर्भूत आहे.
तसेच ‘इलाह’चा एक अर्थ असाही होतो की, ती सत्ता कोणावरही विसंबून व अवलंबून नाही व उलट सर्व चराचर सृष्टी आपल्या जीवनातील सर्व बाबतीत तिच्या दयाकृपेवर अवलंबून आहे व सहाय्यार्थ तिची करूणा भाकित असते. ‘इलाह’ या शब्दात ‘गूढता’ असाही अर्थ समाविष्ट असलेला आढळतो, म्हणजे जी शक्ती गूढ व रहस्यमय आहे तिला ‘इलाह’ म्हणतात. पर्शियन भाषेतील ‘खुदा’, हिंदी भाषेतील ‘देवता’, इंग्रजीतील ‘गॉड’ या शब्दांचे अर्थसुद्धा ‘इलाह’ शब्दाच्या अर्थाशी जुळणारे असेच आहेत. जगातील अन्य विविध भाषेमध्येही या अर्थाचे काही विशिष्ट शब्द आढळतात. (१) १) उदा – ग्रीकमध्ये ‘डेओस’ (Deo’s), लॅटिनमध्ये ‘डेऊस’ (Deus), गोथिक (Gothic) मध्ये ‘गुथ’ (Guth), डॅनिशमध्ये ‘गुड’ (Gud) जर्मनमध्ये ‘गाट’(Gott).) ‘अल्लाह’ हा शब्द वास्तवात ईश्वराचे व्यक्तीवाचक नाव आहे. ‘ला इलाह इल्लल्लाह’ चा शाब्दिक अर्थ असा आहे की, कोणी दुसरा ‘इलाह’ (पूज्य) नाही शिवाय त्या विशेष सत्ताधीशाच्या ज्याचे नाव ‘अल्लाह’ आहे. ‘अल्लाह’ हा शब्द एका अशा अस्तित्वाचे नाव आहे की, जे एकमेव असून त्याचा कोणीही सहभागी नाही. ‘ला इलाहा इल्लल्लाह’ चे शब्दशः भाषांतर असे की ‘अल्लाह’च्या एकमेव व वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्वाखेरीज अन्य कोणीही ‘इलाह’ (ईश्वर) नाही. दुसऱ्या शब्दांत समस्त, ब्रह्मांडामध्ये ‘अल्लाह’खेरीज कसलेही असे अस्तित्व नाही जे उपासनेस पात्र असावे. ‘अल्लाह’खेरीज अन्य कोणीही अशी पात्रता धारण करणारा नाही की ज्याच्यासमोर उपासनेत दास्यत्वात व आज्ञापालनात, मानवाने नतमस्तक व्हावे. केवळ तोच एकमेव सत्ताधीश सर्व ब्रह्मांडाचा धनी व शासक आहे. सर्व चराचर सृष्टी त्याच्या कृपेवर विसंबून असून त्याचीच करूणा भाकण्यास व सहाय्याची याचना करण्यास विवश आहेत. तो ज्ञानेद्रिंयांच्या कार्यमर्यादेपलीकडे असून त्याचे अस्तित्व जाणून घेताना मती कुंठित होते इलाहा इल्लल्लाह’’ ची वास्तवता ‘ला इलाहा इल्लल्लाह’ चा केवळ शाब्दिक अर्थ आपण पाहिला. आता त्याची वास्तवता समजून घेण्याचा प्रयत्न करू या. आम्हास ज्ञात असलेला अतिप्राचीन मानवी इतिहास व अतिप्राचीन मानवी संस्कृतीचे अवशेष स्पष्टपणे दर्शवितात की मानव प्रत्येक युगात कोणत्या न कोणत्या शक्तीची उपासना व भक्ती करीत आला आहे. आजसुद्धा जगात जितके जाती-वंश आहेत मग ते अतिमागासलेले व रानटी असोत व अतिप्रगत असोत ते कशालातरी ईश्वर मानतात व त्याची उपासना करतात. यावरून हे स्पष्ट होते की, माणसाच्या स्वभावधर्मातच ईश्वरासंबंधीची कल्पना समाविष्ट आहे. मानवाच्या अंतःकरणात अशी कसलीतरी प्रेरणा उपजतच असते जी त्याला अगतिक व विवश बनविते की त्याने कोणालातरी ईश्वर मानून त्याची उपासना करावी. प्रश्न असा उद्भवतो की ती शक्ती व प्रेरणा काय आहे? तुम्ही स्वतःवर व समस्त मानवजातीच्या अवस्थेवर दृष्टीक्षेप टाकून या प्रश्नाचे उत्तर जाणू शकता. वास्तविकपणे मानव दास्यत्व घेऊनच जन्माला आला आहे आणि तो नैसर्गिकपणे लाचार व दुर्बल तसेच निर्धन आहे. ज्या अगणित वस्तू त्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी आवश्यक आहेत त्या सर्व त्याच्या नियंत्रणाबाहेर आहेत. त्या वस्तू त्याला आपोआप प्राप्तही होत असतात व त्याच्याकडून त्या हिरावून घेतल्याही जातात. अनेक वस्तू मानवाला हितकारक आहेत. त्या सर्व वस्तू तो प्राप्त करू इच्छितो. काही वेळा त्या प्राप्त होतात तर कधी त्या मिळत नाहीत कारण त्या प्राप्त करणे बिलकुल त्याच्या आवाक्याबाहेर असते. अनेक वस्तू मानवाला हानिकारक असतात. त्याच्या उभ्या आयुष्याचे श्रम काही क्षणात ते नष्ट करून टाकतात. त्याच्या आकांक्षाना धुळीस मिळवून टाकतात, त्याला रोगराईत व मृत्यूशय्येवर आणून टाकतात. तो त्यांचे निवारण करू इच्छितो. निवारण कधी होते तर कधी होत नाही. त्यावरून त्याला कळून चुकते की या घटना घडणे व न घडणे, तसेच संकटाचे निवारण होणे अगर न होणे, हे त्याच्या नियंत्रणात व आवाक्यात नाही. अनेक वस्तू अशा आहेत की ज्यांचे वैभव, शान व भव्यता पाहून मानव प्रभावित होतो. तो पर्वत पाहतो, महासागर पाहतो, भयप्रद आक्राळविक्राळ प्राणी पाहतो. तसेच वादळे, महापूर व धरणीकंप पाहतो, काळेकुट्ट मेघ पाहतो. मेघगर्जना ऐकतो, विजांचा कडकडाट व लखलखाट तसेच मुसळधार पावसाचा वर्षाव पाहतो. चंद्र, सूर्य, तारे यांचे भ्रमण पाहतो. या सर्व गोष्टी किती भव्य किती शक्तिशाली व किती शानदार आहेत आणि त्यांच्या तुलनेत तो किती दुर्बल व क्षुल्लक आहे, याची त्याला अनुभूती होते. ही सर्व दृश्ये पाहून व आपली स्वतःची अगतिक व विवश अवस्था पाहून, त्याच्या मनात आपोआपच अगतिकतेची, दुर्बलतेची, लाचारीची व दास्यत्वाची भावना निर्माण होते. जेव्हा अशी भावना अंतःकरणात उत्पन्न होते तेव्हा ईश्वरासंबंधीची कल्पनाही आपोआपच अंकुरते. अपार शक्ती असलेल्या त्या महान अस्तित्वाचा तो विचार करतो. त्यांची भव्यता माणसाला त्यांच्या समोर नतमस्तक होण्यास व त्यांची उपासना करण्यास विवश करते. त्यांच्या सामर्थ्याची जाणीव माणसाला त्यांच्यासमोर लीन दीन करून सोडते. त्याला हितकर असणाऱ्या शक्तीची जाणीव, माणसाला त्यांची याचना करण्यास भाग पाडते. त्याचप्रमाणे हानिकारक शक्तींची जाणीव व त्यांचे भय बाळगून त्यांचा प्रकोप टाळण्यास त्याला विवश करते. अज्ञानी माणसाला ज्या वस्तू शक्तिशाली व वैभवशाली दिसतात अथवा हितकारक अगर हानिकारक वाटतात त्याच देव आहेत, अशी माणसाची समजूत असते. म्हणूनच तो पशूंची, नद्यांची, पर्वतांची त्याचप्रमाणे भूमीची, अग्नीची, पावसाची, वायूची व चंद्र, सूर्याची पूजा व उपासना करू लागतो.
हे अज्ञान जेव्हा थोडेसे कमी होत जाते व थोडासा ज्ञानरूपी प्रकाश पडू लागतो तेव्हा त्याला असे कळून चुकते की, या सर्व गोष्टीसुद्धा त्याच्या स्वतःप्रमाणेच परावलंबी, दुर्बल व लाचार आहेत. एखादा अजस्त्र प्राणीसुद्धा क्षुल्लक चिलटासारखा मृत्यू पावतो. मोठमोठ्या नद्या सुकून जातात, त्यांची पात्रे लहान मोठी होतात. पर्वतराजींना तोडून फोडून माणूसच भंग करतो. पीक कमी जास्त प्रमाणात येणे, हे खुद्द जमिनीच्या मर्जीवर असत नाही तर जेव्हा तिला पाण्याची साथ लाभत नाही तेव्हा ती सुकून जाते. पाऊससुद्धा स्वतंत्र नसून तो वाऱ्यावर विसंबून असतो, त्याचप्रमाणे हवासुद्धा स्वतंत्र नाही. ती हितकारक असणे वा हानिकारक असणे, हे अन्य काही बाबींवर अवलंबून असते. चंद्र, सूर्य ग्रह व तारेसुद्धा विशिष्ट नियमांच्या नियंत्रणाखाली असून त्या नियमांविरुद्ध ते किंचितही हालचाल करू शकत नाहीत. आता माणसाची जिज्ञासा व त्याचे लक्ष, गूढ व रहस्यमय शक्तीकडे वळते. त्याला असे वाटते की त्या सर्व दृश्य वस्तूंच्या मागे काही अदृश्य व गूढ शक्तीचे नियंत्रण आहे. त्याच शक्तीचा त्यांच्यावर शासन व अधिकार आहे. येथूनच माणसाची देव-देवतांबद्दलची श्रद्धा जन्म घेते. हवा, पाणी, प्रकाश, आरोग्य, रोगराई व विविध इतर गोष्टींचे वेगवेगळे देव मानले जातात आणि त्यांची काल्पनिक रूपे निर्माण करून त्यांची भक्ती व उपासना केली जाते.
त्यानंतर ज्ञानप्रकाश जेव्हा आणखी वाढतो तेव्हा एकूण सृष्टीव्यवस्था एका भक्कम नियमाखाली चाकोरीबद्ध रीतीने कार्यान्वित असलेली माणसाला दिसून येते. वाऱ्यांचा रोख, पावसाचे आगमन, ग्रहांचे भ्रमण, ऋतंचा क्रम या सर्वांच्या बाबतीत किती नियमबद्ध काटेकोरपणा असतो. अगणित शक्ती कशा एकमेकाबरोबर कार्य करीत असतात. ज्या कार्यासाठी जो काळ निश्चित केला गेला आहे नेमके त्याचवेळी ब्रह्मांडातील सर्व पंचमहाभूते एकत्र येऊन एकमेकांशी मिसळून कार्य करतात. सृष्टीक्रमातील विविध पंचमहाभूतांचे असे सहकार्य पाहून अनेकेश्वरवादी मनुष्य अशी श्रद्धा बाळगण्यास व मानण्यास विवश होतो की या सर्व लहान सहान देवांच्यावर एका सर्वश्रेष्ठ परमेश्वराचे अधिपत्य आहे. तसे जर नसते व प्रत्येक देव स्वतंत्र व वेगळा असता तर ब्रह्मांडाच्या या कार्यशालेचे तीन तेरा वाजले असते. त्या सर्वश्रेष्ठ ईश्वराला तो ‘‘परमेश्वर’’, ‘‘अल्लाह’’, ‘‘देवाधिदेव’’ वगैरे नावाने संबोधितो. परंतु भक्ती व उपासना करताना तो या सर्वश्रेष्ठ परमेश्वराबरोबरच अन्य लहान देव-देवतांनाही सहभागी व समाविष्ठ करतो. त्याची अशी समजूत असते की ईशसत्ता (Divine Kingdom of God)सुद्धा जगातील राज्यसत्तेप्रमाणेच आहे. जगात जसे राजे त्यांचे प्रधानमंत्री व शासकीय अधिकारी असतात त्याचप्रमाणे ब्रह्मांडातही एक सर्वश्रेष्ठ परमेश्वर असून त्याच्या नियंत्रणाखाली अनेक लहानमोठे देव आहेत. जोपर्यंत छोट्या देवांची प्रसन्नता प्राप्त केली जात नाही तोपर्यंत परमेश्वरापर्यंत मनुष्य पोहोचू शकत नाही, असे त्याला वाटत असते. म्हणून त्यांची भक्ती व उपासना करावी, त्यांची करूणा भाकावी व याचना करावी. त्यांच्या कोपाचे भय बाळगावे, परमेश्वरापर्यंत पोहोचण्यास त्यांना माध्यम बनवावे, त्यांना नैवेद्य व देणग्या अर्पण करून प्रसन्न करून घ्यावे, असे त्याला वाटत असते. मानवी ज्ञानामध्ये जेव्हा आणखी अधिक भर पडली तेव्हा या देव-देवतांच्या संख्येत घट होऊ लागली. अज्ञानी मानवांनी काल्पनिक देव केलेले आहेत. त्यांतील प्रत्येकाबद्दल विचार-चिंतन केले असता ते देव असूच शकत नाहीत अशी जाण माणसाला होत जाते. आपल्याप्रमाणेच ते ईश्वराचे दास असून आपल्यापेक्षाही ते जास्त अगतिक व असहाय्य आहेत हे त्याला उमगते. अशा तऱ्हेने तो एक एक देव वगळत राहातो व सरतेशेवटी एकच एक ईश्वर उरतो. परंतु त्या एकमेव ईश्वरासंबंधीही बरेचसे अज्ञान त्याच्या कल्पनाविचारांत राहिलेले असते. काहींना असे वाटते की ईश्वराला मानवासारखा देह व आकार असून तो एका स्थानावर बसून आपली अधिसत्ता गाजवीत आहे. अन्य काहींची अशी समजूत आहे की, माणसासारखेच ईश्वराचीही बायकामुले असून माणसासारखीच त्याची वंशावळ आहे. इतर काही जणांचा असा समज असतो की ईश्वर माणसाचे रूप धारण करून पृथ्वीवर अवतरतो. काही लोक असे म्हणतात की ईश्वराने त्याच्या ब्रह्मांडाची निर्मिती करून व ते कार्यान्वित करून आता तो विश्रांती घेत आहे. काहींना असे वाटते की ईश्वराच्या दरबारात अन्य मातब्बर आत्म्यांचा व महापुरूषांचा वशिला असणे व त्यांच्याद्वारा शिफारस केली जाणे अगत्याचे आहे. काही लोक भक्तीसाठी ईश्वराचे एक रूप कल्पितात व तशी प्रतिकृती बनवून ती समोर ठेवणे आवश्यक मानतात. अशा रीतीने एकेश्वरत्वावर श्रद्धा बाळगूनसुद्धा अनेक प्रकारचे गैरसमज व अपसमज त्यांच्या मनात वसलेले असतात व त्यांच्यामुळेच तो अनेकेश्वरत्वात व सत्याचा इन्कार करण्यात गुरफटला जातो. हा सर्व अज्ञानाचाच परिणाम आहे. ‘ला इलाह इल्लल्लाह’ चा दर्जा सर्वांत वरचा आहे. हे असे ज्ञान आहे जे खुद्द अल्लाहने आपल्या प्रेषितांद्वारा सर्व युगात माणसांना पोहोचविले आहे. हेच ज्ञान देऊन सर्वप्रथम मानव आदरणीय आदम (अ.) यांना पृथ्वीवर पाठविण्यात आले होते. आदरणीय आदम (अ.) यांच्या पश्चात हेच ज्ञान आदरणीय नूह (अ.), आदरणीय इब्राहीम (अ.), आदरणीय मूसा (अ.) व अन्य सर्व प्रेषितांना दिले गेले होते. सर्वांत शेवटी हेच ज्ञान प्राप्त करून प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आगमन झाले. हे शुद्ध ज्ञान असून त्यामध्ये अज्ञानाचा लवलेशही नाही. वर आम्ही अनेकेश्वरत्वाचे, मूर्तिपूजेचे व ‘कुफ्र’ च्या प्रकारांचे विवरण केले आहे. त्या सर्वामध्ये मानव याच कारणामुळे गुरफटला गेला की, त्याने प्रेषितांच्या शिकवणींना अमान्य करून स्वतःच्या बौद्धिक क्षमतेवर, अनुभव तसेच आपल्या ज्ञानावर तो विसंबून राहिला. ‘ला इलाहा इल्लल्लाह’ या इष्टवचनात किती अथांग वास्तवता वर्णिली गेली आहे, ते आता आपण पाहू या.
1. यामध्ये सर्वात अग्रेसर ईशत्वाची (Divinity) कल्पना आहे. हे अतिविशाल ब्रह्मांड ज्याच्या प्रारंभाविषयी, ज्याच्या विस्ताराविषयी व ज्याच्या भवितव्याविषयी विचार करून आपली बुद्धी शिणते. हे ब्रह्मांड अज्ञात-काळापासून अस्तित्वात आहे व ते अनभिज्ञ काळापर्यंत अस्तित्वात राहणार आहे. त्यामध्ये अगणित चराचर वस्तू व जीव निर्माण झाले आहेत व निर्माण होत आहेत. त्यामध्ये अशा प्रकारचे विस्मयकारक व अद्भूत चमत्कार घडत आहेत ज्यांना पाहून माणसाची मति गुंग होते. जो स्वतः अमर्याद सत्ताधीश असेल केवळ तोच या विशाल ब्रह्मांडावर अधिपत्य करू शकतो. तो चिरकालपासून असलेला व चिरकालापर्यंत अस्तित्वात राहणारा असावा, तो कोणाचाही लाचार नसावा व तो निरक्षेप असावा. तो सर्वशक्तिमान जगनियंता असावा. सर्वज्ञानी व चातुर्यपूर्ण असावा. तो प्रत्येक वस्तूसंबंधी जाण व ज्ञान बाळगणारा असून कोणतीही गोष्ट त्याच्यापासून दडलेली नसावी. त्याचे सर्व चराचर सृष्टीवर प्रभुत्व असून कोणीही त्याच्याशी शिरजोरी करू शकणारा नसावा. तो अमर्याद शक्तीचा स्वामी असावा व सर्व चराचर सृष्टीला त्याच्याकडूनच जीवनपोषणाच्या सर्व वस्तू अव्याहतपणे पुरविल्या जाव्यात. कोणताही दोष, कसलीही उणीव व कमतरता व सर्व त्रुटींपासून तो निर्मळ असावा व त्याच्या कार्यात कोणाचाही हस्तक्षेप नसावा
2. ईशत्वाची वरील वर्णन केलेली वैशिष्ट्ये एकमेव शक्तीमध्येच एकवटलेली असणे अगत्याचे आहे. दोन भिन्न शक्ती व वैशिष्ट्ये समसमान धारण करीत असतील हे केवळ अशक्यप्राय आहे. याचे कारण असे की, सर्वांवर प्रभुत्व करणारी व प्रभावशालीपणे अधिपत्य करणारी तर एकच शक्ती असू शकते. या वैशिष्ट्यांची विभागणी होऊन तिचे अनेक देवदेवतांमध्ये वाटप व्हावे ही गोष्टसुद्धा अशक्य आहे. कारण जर शासनकर्ता एक असेल, ज्ञान व जाण धारण करणारा दुसरा असेल, अन्नदाता व पोषण करणारा आणखी वेगळा असेल तर प्रत्येक देव इतर देवांवर अवलंबून व विसंबून राहील. तसेच जर त्यांनी एकमेकांशी सहकार्य केले नाही तर एकाच क्षणी संपूर्ण सृष्टी नष्ट होईल. त्याचप्रमाणे या वैशिष्ठ्यांचे एकापासून दुसऱ्याकडे येणेसुद्धा शक्य नाही. कधी ती एका देवात आढळून येतील तर कधी दुसऱ्यात कारण असे की स्वतः चिरकाल राहण्याची क्षमता ज्या ईश्वरात नसेल तो सर्व ब्रह्मांडाला जीवन प्रदान करू शकत नाही. तसेच जो ईश्वर आपल्या ईशत्वाचे रक्षण करू शकत नाही तो इतक्या विशाल ब्रह्मांडावर अधिपत्य कसे करू शकणार? तात्पर्य, ज्ञानरूपी प्रकाश तुम्हाला जितक्या अधिक प्रमाणात प्राप्त होईल तितक्याच प्रमाणात तुमची खात्री अधिकाधिक दृढ होत जाईल की ही सर्व वैशिष्ठ्ये व गुणवत्ता एकाच शक्तीत सामावलेली व एकवटलेली असणे आवश्यक आहे.
ईशत्वाच्या स्वयंपूर्णतेची व यथार्थपणाची जाणीव नीट लक्षात ठेवून नंतर संपूर्ण विश्वावर दृष्टी टाका. जितक्या वस्तु तुम्ही पाहता व ज्ञानेंद्रियाद्वारा जितक्या गोष्टींची अनुभूती प्राप्त करता तसेच जितक्या वस्तु तुमच्या ज्ञानमर्यादेत
3. आहेत या सर्व वस्तूंपैकी एकसुद्धा अशा वैशिष्ट्यांनी व गुणवत्तेने युक्त नाही. चराचर सृष्टीतील प्रत्येक वस्तु परावलंबी, पराधीन व लाचार आहे. ती निर्माण होत असते व नष्ट होत असते. जगत असते व मरण पावते. कोणाही वस्तुची एकच शाश्वत स्थिरतेची अवस्था नसते. कोणालाही स्वेच्छेनुसार काहीही अघटित घडवून आणण्याची कुवत नसते. सर्वोच्च व सर्वंकश नियमाविरुद्ध किंचितही हालचाल करण्याचा वाव नाही. या वस्तूंची अवस्थाच अशी असते की, त्यापैकी कोणीही ईशत्व धारण करणारे नाही. कोणातही ईशत्वाची किंचित छटासुद्धा आढळत नाही. कोणाचाही ईशत्वामध्ये अगदी कणभरसुद्धा हस्तक्षेप नाही. ‘ला इलाह’ चा हाच अर्थ आहे.
4. ब्रह्मांडातील सर्व वस्तूमधून ईशत्व हिरावून घेतल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट मान्य करणे भाग पडते की, या सर्व वस्तूंव्यतिरिक्त एका सर्वोच्च शक्तीचे अस्तित्व आहे. तीच शक्ती ईशत्वाची सर्व वैशिष्ट्यें व गुणवत्ता बाळगते. त्या शक्तीखेरीज कोणीही ईश्वर नाही ‘इल्लल्लाह’ चा हाच अर्थ आहे.
हेच सत्य ज्ञान आहे. जितक्या प्रमाणात तुम्ही शोध घ्याल व प्रयत्न कराल तर तुम्हास हेच कळून येईल की ज्ञानाचा हाच आरंभ असून तेच ज्ञानाचे अंतिम टोक आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, जीवशास्त्र, जंतूशास्त्र, प्राणीशास्त्र, वंशशास्त्र इ. ब्रह्मांडातील गूढ सत्याचा शोध घेणाऱ्या विद्या व शास्त्रे आहेत, त्यापैकी कोणत्याही शास्त्राचे अध्ययन जितके खोलवर कराल तितक्याच जास्त प्रमाणात ‘ला इलाहा इल्लल्लाह’ ची वास्तवता व सत्य तुमच्यासमोर प्रकट होईल. त्यावरील तुमचा विश्वास अधिकाधिक दृढ होत जाईल. ज्ञानप्राप्तीच्या व शास्त्रांच्या व्यासंग करण्याच्या क्षेत्रात तुम्हाला पावलोपावली अशी प्रचिती येत राहील की या सर्वांत मोठ्या सत्याचा इन्कार केल्याने ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तु अर्थहीन ठरते.
संबंधित पोस्ट
April 2024 Ramadhan 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 22
2 23
3 24
4 25
5 26
6 27
7 28
8 29
9 30
10 Shawaal 1
11 2
12 3
13 4
14 5
15 6
16 7
17 8
18 9
19 10
20 11
21 12
22 13
23 14
24 15
25 16
26 17
27 18
28 19
29 20
30 21
1 22
2 23
3 24
4 25
5 26

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *