हकीम बिन मुआविया आपले वडील मुआविया यांच्याद्वारे कथन करतात, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘एखाद्या पतीच्या पत्नीचा त्याच्यावर काय अधिकार आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तिचा अधिकार हा आहे की जेव्हा तुम्ही जेवण कराल तेव्हा तिलाही जेवण द्यावे आणि जेव्हा तुम्ही परिधान कराल तेव्हा तिलाही परिधान करण्यास द्यावे आणि तिच्या चेहऱ्यावर मारू नये आणि तिला शिव्याशाप देऊ नये आणि जर तिच्याशी संबंधविच्छेद करायचा असेल तर फक्त घरातच दुरावा बाळगावा.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण
जसे तुम्ही खाता तसेच आपल्या पत्नीलाही खायला द्या आणि ज्या प्रकारचे कपडे तुम्ही परिधान कराल त्याच दर्जाचे कपडे तिलाही परिधान करण्यास द्या. शेवटच्या शब्दाचा अर्थ आहे की जर पत्नीद्वारे अवज्ञा व दुष्टपणा झाला तर कुरआनच्या उपदेशानुसार अगोदर तिची समजूत घालावी, जर त्यानेही तिच्यात बदल झाला नाही तर घरात अंथरूण वेगळे करा आणि ही गोष्ट घराबाहेर माहीत होता कामा नये, कारण हे सज्जनतेविरूद्ध आहे, तरीही तिच्यात बदल झाला नाही तर मग तिला मार दिला जाऊ शकतो, परंतु तोंडावर न मारता शरीराच्या इतर भागावर. त्यातही उपदेश आहे की हाडाला दुखापत पोहचणारा अथवा जखमी करणारा मार देता कामा नये.
लकीत बिन सबरा यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हटले, ‘‘माझी पत्नी अर्वाच्च बोलत असते.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तिला तलाक द्या.’’ मी म्हणालो, ‘‘तिच्यापासून मला मुले आहेत, अनेक वर्षांपासून आम्ही एकत्र राहत आहोत.’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘तिला समजवा जर तिच्यात चांगुलपणा स्वीकार करण्याची योग्यता असेल तर ती तुमचे म्हणणे मान्य करील. आणि खबरदार! तुम्ही तुमच्या सेविकेला मारता तसे आपल्या पत्नीला मारू नका.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण
सेविकांना खूप मार द्या आणि पत्नींना मारू नका असा या हदीसच्या शेवटच्या भागाचा असा अर्थ नसून ज्याप्रकारे लोक आपल्या सेविकांशी वागतात तशा पद्धतीने आपल्या पत्नीशी वर्तणूक करता कामा नये.
माननीय अयास बिन अब्दुल्लाह यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे लोकहो! अल्लाहच्या दासींना (म्हणजे आपल्या पत्नींना) मारू नका.’’ यानंतर माननीय उमर (रजि.) पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याजवळ आले आणि म्हणाले, ‘‘पैगंबरांच्या या उपदेशामुळे पतींनी मारणे सोडून दिले तेव्हा महिला आपल्या पतींच्या डोक्यावर चढल्या आणि धाडसी बनल्या.’’ तेव्हा पैगंबरांनी त्यांना मारण्याची परवानगी दिली. यानंतर पैगंबरांच्या पत्नींकडे अनेक महिला आल्या आणि त्यांनी आपल्या पतींच्या मारहाणीची तक्रार केली तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘माझ्या पत्नींकडे अनेक महिला आपल्या पतींची तक्रार घेऊन आल्या, असे लोक (पत्नींना मारहाण करणारे) तुमच्यापैकी चांगले लोक नाहीत.’’ (हदीस : अबू दाऊद)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एखाद्या मोमिन पतीने आपल्या मोमिन पत्नीचा द्वेष करू नये. जर तिची एक सवय पसंत आली नाही तरी दुसरी सवय पसंत पडेल.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण
पत्नी जर सुंदर नसेल अथवा दुसरी एखादी कमतरता तिच्यात आढळून येत असेल तर त्या कारणास्तव लगेच तिच्याशी संबंध तोडून टाकण्याचा निर्णय घेऊ नका. एका महिलेत एखाद्या प्रकारची कमतरता असेल तर तिच्यात अनेक अशी चांगली गुणवैशिष्ट्येदेखील असतात ज्यांच्यामुळे ती पतीचा मनावर ताबा मिळविते. मात्र तिला तशी संधी देण्यात यावी आणि फक्त तिच्या एका अजाणतेपणी झालेल्या चुकीमुळे कायमची मनात द्वेष बाळगता कामा नये. (हदीस : तिर्मिजी)
0 Comments