पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘मला अल्लाहने यासाठी पाठविले आहे की मी चारित्र्यसंपन्नतेला उच्चतम शिखरावर पोहचवावे.’’ (मुअत्ता इमाम मालिक)
निरुपण
चारित्र्यसंपन्नता हाच धर्माचा उद्देश आहे. ईश्वराने तमाम पैगंबरांकरवी अखिल मानवजातीला चारित्र्यसंपन्नतेचीच ताकीद केली आहे. चारित्र्यहीन माणूस जीवनाचे सार्थक करू शकत नाही. उलट तो जीवनाचा सत्यानाश करतो. इस्लाममध्ये ‘तकवा’ या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तकवा अर्थात ईशभीरूता असेल तरच चारित्र्यसंपन्नता निर्माण होईल.
कुरआनात नमाजसंबंधी म्हटले आहे, ‘‘नि:शंक, नमाज माणसाला वाईट कृत्यांपासून आणि निर्लज्जतेपासून दूर करते.’’
(कुरआन, २९ : ४५)
तद्वतच रोजांचा उद्देश विषद करताना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले,
‘‘रोजा म्हणजे केवळ पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्नपाणी सोडणे नव्हे! रोजा जिव्हेचा पण आहे, डोळ्यांचासुद्धा आहे, कानांचाही आहे आणि हातापायांचासुद्धा!’’
अर्थात खोटारडे न बोलणे, शिवीगाळ न करणे, निंदानालस्ती न करणे हा जिव्हेचा रोजा आहे. अश्लीलता व नग्नतेपासून दूर राहणे व जगाकडे वाईट नजरेने न पाहणे हा डोळ्यांचा रोजा आहें. कोणावर अन्याय-अत्याचार न करणे, भ्रष्ट आचार न करणे हा हातांचा रोजा आहे.
जकातचाही वास्तविक उद्देश माणसाच्या चित्ताचे शुद्धीकरणच आहे.
सार्थक हज्ज (हज्जे मबरूर) संबंधी म्हटलेले आहे की त्यामुळे हाजीचे चारित्र्य अधिकाधिक शुद्ध व्हावे त्याने हर वाईट कृत्यापासून स्वत:ला रोखावे.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
‘‘आता तरी पुढे हाची उपदेश! नका करू नाश आयुष्याचा!
सकळांच्या पाया माझे दंडवत! आपुलाले चित्त शुद्ध करा!’’
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी चारित्र्यसंपन्नतेचा केवळ उपदेशच केला नाही तर त्यांचे स्वत:चे जीवनच आता अखिल मानवजातीसाठी जगाच्या अंतापर्यंत सर्वांगांनी चारित्र्यसंपन्नतेचे एक श्रेष्ठतम व आदर्श उदाहरण आहे.
0 Comments