बंधुनो! हे ज्ञान ज्याच्या गरजेविषयी मी तुम्हाला सांगत आहे त्यावर तुमचे आणि तुमच्या संततीचे मुस्लिम असणे, मुस्लिम म्हणून राहणे अवलंबून आहे. ही काही हलकी गोष्ट नाही की त्यापासून निष्काळजी बनून राहावे. तुम्ही तुमच्या शेतीवाडीच्या कामात गाफील राहात नाही. तुमच्या शेतीला पाणी देणे आणि पिकाचे रक्षण करण्यातसुद्धा गाफील राहात नाही. जनावरांना चारा देण्यात गाफील राहात नाही. तुमच्या धंद्याच्या कामात गाफील राहात नाही; ते केवळ या कारणासाठी की त्यात गाफील राहाल तर उपाशी मराल आणि प्राणासारखी प्रिय गोष्ट व्यर्थ होईल. मग मला सांगा की ते ज्ञान प्राप्त करण्यात का गाफील राहाता ज्यावर तुमचे मुस्लिम बनणे आणि मुस्लिम राहणे अवलंबून आहे? काय यात हा धोका नाही की ईमानसारखी प्रिय गोष्टनष्ट होईल? काय ईमान जिवापेक्षा अधिक प्रिय नाही? तुम्ही प्राणाचे रक्षण करण्यासाठी जितका वेळ व जितके श्रम खर्च करता तितका वेळ व त्या श्रमाचा दहावा भागसुद्धा ईमानचे रक्षण करण्यासाठी खर्च करू शकत नाही का?
मी तुम्हाला असे सांगत नाही की तुमच्यापैकी प्रत्येकाने मौलवी (धर्मपंडित) बनावे, मोठमोठ्या ग्रंथांचे अध्ययन करावे आणि आपल्या आयुष्याची दहा-बारा वर्षे शिकण्यात खर्च करावीत. मुस्लिम बनण्यासाठी इतक्या शिक्षणाची गरज नाही. माझी केवळ इतकी अपेक्षा आहे की तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीने रात्र व दिवसाच्या चोवीस तासांपैकी केवळ एक तास धार्मिक शिक्षण घेण्यासाठी खर्च करावा. कमीतकमी इतके ज्ञान प्रत्येक मुस्लिम मुलाला, म्हाताऱ्याला व तरुणाला प्राप्त झाले पाहिजे की पवित्र कुरआन ज्या उद्देशासाठी व जी शिकवण घेऊन अवतरित झाले आहे त्याच्या सारांशाचेज्ञान त्याला व्हावे. प्रेषित मुहम्मद (स.) जे नष्ट करण्यासाठी व त्या जागी ज्याची स्थापना करण्यासाठी या जगात आले होते त्याविषयीची चांगली ओळख प्रत्येकाने करून घ्यावी. तसेच त्या विशिष्ट जीवनपद्धतीशी परिचित व्हावे जी अल्लाहने मुस्लिमासाठी ठरवून दिली आहे. इतक्या ज्ञानासाठी काही जास्त वेळेची गरज नाही आणि ईमान (धर्मावरील विश्वास) प्रिय असेल तर त्यासाठी दररोज एक तासाची वेळ काढणे काही कठीण नाही.
0 Comments