आता जरा अंशात्मक गोष्टीकडून व्यापक गोष्टीवर दृष्टिक्षेप टाका. मनुष्याला या जगात आपले अस्तित्व जाणवते. त्याचे एक शरीर आहे, त्यात बऱ्याचशा शक्ती भरलेल्या आहेत. मनुष्यासमोर पृथ्वी व आकाशाचे एक महाविशाल पट पसरलेले आहे. त्यात अमाप व अगणित वस्तू आहेत. त्या वस्तूंचा उपयोग घेण्याचे सामथ्र्य आपल्यात असल्याचे त्याला आढळते. त्यांच्या अवतीभोवती बरीचशी माणसे, पशूप्राणी, वनस्पती आणि जड पदार्थ इ. विखुरलेले आहेत. या सर्व वस्तू त्याच्या जीवनाशी संबंधित आहेत. मग जोपर्यंत तो सर्वप्रथम आपल्या स्वत:संबंधी, अस्तित्वात असलेल्या या सर्व वस्तूसंबंधी व त्याच्याशी स्वत:च्या संबंधाबाबत एखादे मत निश्चित करीत नाही, त्यापूर्वच तो त्यांच्याशी एखादे वर्तन अंगिकारू शकतो अशी कल्पनाही आपण करू शकतो का? जोपर्यंत मनुष्य हे निश्चित करीत नाही की, मी कोण आहे, कसा आहे, जबाबदार आहे की बेजबाबदार आहे, स्वतंत्र आहे की अधीन, अधीन आहे तर कुणाच्या आणि जबाबदार आहे तर कुणासमोर? माझ्या या ऐहिक जीवनाची काही निष्पत्ती आहे की नाही, असेल तर कोणती? त्याचप्रमाणे हे शरीर आणि शरीरातील कुवती त्याच्या स्वत:च्या मालकीच्या आहेत की अन्य कुणाच्या देणग्या आहेत. त्या कुवतीचा कोणी हिशोब विचारणारा आहे किंवा नाही? त्या कुवतींना उपयोगात आणण्याचा कायदा त्याला स्वत:ला निश्चित करावयाचा आहे की इतर कोणाला? जोपर्यंत तो या प्रश्नांसंबंधी निर्णय घेत नाही तोपर्यंत तो आपल्यातील कुवतीच्या उपयोगासाठी एखादा मार्ग ठरवू शकतो का? त्याचप्रकारे तो आपल्या अवतीभोवतीच्या वस्तूंसंबंधी एखादे वर्तन अंगिकारू शकतो का? जोपर्यंत हे निश्चित करीत नाही की त्या वस्तूंचा मालक तो स्वत: आहे की इतर कोणी, त्या वस्तूंवर त्याचा अधिकार मर्यादित स्वरूपाचा आहे की अमर्याद, मर्यादित आहे, तर मर्यादांच्या सीमा ठरविणारा कोण आहे? त्याचप्रमाणे तो परस्परांत आपल्या मानवजातीशी वर्तणुकीची एखादी पद्धत तोपर्यंत निश्चित करू शकतो का जोपर्यंत याबाबतीत एखादे मत निश्चित करीत नाही की माणुसकीचे स्वरूप काय आहे, माणसामाणसांदरम्यान फरक व श्रेष्ठत्व ठरविण्याचा आधार कोणता, शत्रुत्व आणि मित्रत्व, एकमत आणि मतभेद, सहकार आणि असहकार यांच्या आधारभूत गोष्टी कोणत्या? त्याचप्रमाणे ही सृष्टीव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे व त्यात मला कोणत्या प्रकारचे स्थान प्राप्त आहे, यासंबंधी तो एखाद्या निर्णयाप्रत येत नाही तोपर्यंत तो एकूणपणे या जगाशी एखादे वर्तन अंगिकारू शकतो का?
जी प्रस्तावना मी अगोदर मांडली आहे, त्या आधारावर नि:संकोचपणे असे म्हटले जाऊ शकते की, या सर्व गोष्टीसंबंधी कोणते ना कोणते मत निश्चित केल्याशिवाय कोणतेही वर्तन अंगिकारणे अशक्य आहे. प्रत्यक्षातसुद्धा जगात जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य या प्रश्नासंबंधी कळत वा नकळत कोणते न कोणते मत जरूर बाळगतो. तसे करणे त्याला भाग आहे, कारण त्या मताशिवाय तो कोणतेही पाऊल उचलू शकत नाही. प्रत्येक माणसाने हमखासपणे या प्रश्नावर तात्त्विक दृष्टीने विचारचिंतन केले असावे आणि स्पष्टपणे शंकानिरसन करून एकेका प्रश्नासंबंधी निर्णय घेतला असावा, असे असणे जरूरीचे नाही. वस्तुत: बऱ्याचशा माणसांच्या मनात हे प्रश्न एखाद्या निश्चित स्वरूपात असतच नाहीत. ते त्याच्यासंबंधी जाणीवपूर्वक विचारही करीत नाहीत. परंतु असे असतानासुद्धा प्रत्येक माणूस ढोबळ स्वरूपात या प्रश्नासंबंधी होकारात्मक किंवा नकारात्मक स्वरूपात एखाद्या मतापर्यंत निश्चितपणे पोचलेला असतो. जीवनात त्याचे जे काही वर्तन असते ते निश्चितपणे त्याच्या त्याच मतानुसार असते.
व्यक्तीव्यक्तीसंबंधी ज्याप्रमाणे ही गोष्ट खरी ठरते, त्याचप्रमाणे जाती व जमातीसंबंधीसुद्धा ती खरीच आहे. हे प्रश्न मानवी जीवनाचे मूलभूत प्रश्न आहेत, म्हणून कोणत्याही सांस्कृतिक व्यवस्थेसाठी व कोणत्याही प्रकारच्या सामूहिक स्वरूपासाठी कोणतेही कार्यक्रम तोपर्यंत ठरविले जाऊ शकत नाहीत जोपर्यंत या प्रश्नांची कोणत्या न कोणत्या प्रकारची उत्तरे निश्चित केली जात नाहीत. त्याची जी कोणती उत्तरे निश्चित केली जातील त्यानुसार नीतीमत्तेसंबंधीचा एक दृष्टिकोन निश्चित होईल. त्यानुरुपच जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांना आकार प्राप्त होईल आणि एकूणपणे त्या उत्तराच्या आवश्यकतेनुसारच एकूण संस्कृतीला रंग प्राप्त होईल. याबाबतीत कोणताही विपर्यास घडण्याची शक्यताच नाही. मग हे एका व्यक्तीचे वर्तन असो की एका समाजाचे, कोणत्याही परिस्थितीत त्याला अगदी तेच रूप प्राप्त होईल जे या प्रश्नाच्या उत्तरांचे स्वरूप असेल. इथपावेतो की, वाटल्यास एका व्यक्तीच्या किंवा एखाद्या जमातीच्या वर्तनाचे पृथ:करण करून त्या वर्तनाच्या मुळाशी जीवनाच्या सदरहू मूलभूत प्रश्नाची कोणती उत्तरे कार्यशील आहेत, हे सहजपणे आपणास माहीत होऊ शकते, कारण एखाद्या व्यक्तीच्या किंवा जमातीच्या वर्तनाचे स्वरूप एका दुसऱ्या प्रकारचे असावे व त्या प्रश्नांच्या उत्तराचे स्वरूप एका वेगळ्याच प्रकारचे असावे ही गोष्ट अगदी अशक्यप्राय आहे. विपर्यास तोंडाने केला जाणारा दावा आणि प्रत्यक्ष वर्तनादरम्यान तर असू शकतो, परंतु वास्तविकपणे या प्रश्नांची जी उत्तरे मनात ठाण मांडून बसली आहेत, त्यांचे स्वरूप आणि प्रत्यक्ष वर्तनाच्या स्वरूपात कदापि भिन्नता असू शकत नाही.
आम्हाला आणखीन एक पाऊल पुढे गेले पाहिजे. जीवनाचे हे मूलभूत प्रश्न ज्यांच्यासंबंधी आपण आत्ताच ऐकले की त्यांच्या उलगड्यासंबंधीचे एखादे उत्तर आपल्या मनात निश्चित केल्याशिवाय मनुष्य जगात एक पाऊलसुद्धा पुढे जाऊ शकत नाही. आपल्या मूळ स्वरूपात ते सर्व परोक्ष बाबींशी संबंधित आहेत. त्याचे कोणतेही उत्तर क्षितिजावर लिहिलेले नाही की, प्रत्येक माणसाने जगात येताक्षणी ते वाचावे, तसेच त्याचे उत्तर इतके सामान्यही नाही की प्रत्येकास आपोआपच ते माहीत व्हावे. म्हणूनच सर्वच माणसांचे ज्याच्यावर एकमत होईल असे त्याचे कोणतेही एक उत्तर नाही, तर त्याच्यासंबंधी नेहमी मानवजातीत मतभेद राहिले आहेत. नेहमी निरनिराळी माणसे निरनिराळ्या पद्धतींनी त्याची उत्तरे प्रस्तुत करीत राहिली आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की, प्रश्नांच्या निराकरणांचे कोणकोणते मार्ग संभवतात, कोणकोणत्या पद्धतीचा जगात अवलंब केला गेला आहे व त्या निरनिराळ्या मार्गानी जी उत्तरे समोर येतात ती कोणत्या प्रकारची आहेत?
या प्रश्नांच्या सोडवणुकीचा एक मार्ग असा की, माणसाने आपल्या ज्ञानेंद्रियांवर विश्वास ठेवणे व त्यांच्याद्वारे जे काही वाटते त्या आधारावर त्या प्रश्नासंबंधी एखादे मत निश्चित करावे.
दुसरा मार्ग असा की, ज्ञानेंद्रियाविषयक निरीक्षणाबरोबरच कल्पना अनुमानाला जोडून एक निष्कर्ष काढला जावा.
तिसरा मार्ग असा की, पैगंबरांनी सत्याचे प्रत्यक्षपणे ज्ञान मिळविण्याचा दावा करताना सदरहू प्रश्नांची जी उत्तरे सांगितली आहेत ती मान्य केली जावी.
जगात या प्रश्नांच्या सोडवणुकीचे हेच तीन मार्ग अवलंबिले गेले आहेत व बहुतेक करून हे तीनच मार्ग त्याबाबतीत संभवनीयही आहेत. यापैकी प्रत्येक मार्गाने एका वेगळ्या पद्धतीने या प्रश्नांचे निराकरण होते. प्रत्येक प्रकारच्या निराकरणानंतर एका विशिष्ट प्रकारचे वर्तन जन्म घेते व एका विशिष्ट प्रकारची सांस्कृतिक व्यवस्था उदयास येते. ही सांस्कृतिक व्यवस्था आपल्या मूलभूत गुणवैशिष्ट्यांत इतर सर्व निराकरणांद्वारे जन्मास आलेल्या वर्तनापेक्षा वेगळी असते. अशा विभिन्न मार्गांनी प्रश्नाचे कोणकोणते निराकरण समोर येते व प्रत्येक निराकरणामुळे कोणत्या प्रकारचे वर्तन जन्म घेते हेच आता मी दाखवू इच्छितो.
जीवनाचे मूळ प्रश्न
संबंधित पोस्ट
0 Comments