Home A आधारस्तंभ A जकातचा हेतु

जकातचा हेतु

जकात देणे अनिवार्य का ठरविले आहे याबद्दल आता आपण चर्चा करू या. तसेच जकातमुळे कोणता हेतु साध्य होतो हेसुध्दा पाहू या. कुरआन अध्ययन आणि हदीसचा परामर्श घेतल्यानंतर कळून येते की जकातचे तीन हेतू आहेत. पहिला मौलिक आणि विशिष्ट प्रकारचा आहे तर दुसरे दोन दुय्यम आणि सामुदायिक महत्त्वाचे आहेत.

मनाचे पावित्र्य: जकातचा मौलिक हेतु मनाचे शुध्दीकरण करणे होय. यामुळे संपत्तीची लालसा जाऊन त्या जागी मनात ईशपरायणता निर्माण होते आणि मनुष्य सदाचारी बनतो. कुरआनोक्ती आहे,

‘‘निःसंदेह मार्ग दाखविणे आमच्यावर आहे आणि खरे पाहता परलोक आणि इहलोक, दोन्हीचे स्वामी आम्हीच आहोत. तर मी तुम्हाला खबरदार केले आहे भडकत्या अग्नीपासून. त्यात होरपळणारे नाही परंतु तो अत्यंत दुर्देवी ज्याने खोटे ठरविले आणि तोंड फिरविले, आणि त्यापासून दूर ठेवला जाईल तो अत्यंत पापभीरू, जो निर्मळ होण्यासाठी आपले धन देतो, त्याच्यावर कुणाचेही काही उपकार नाहीत. ज्याचा बदला त्याने द्यायला हवा, तो तर केवळ आपल्या उच्चतर पालनकर्त्याच्या प्रसन्नता प्राप्तीसाठी हे कार्य करतो. आणि जरूर तो (त्यावर) प्रसन्न होईल.’’ (कुरआन ९२: १२-२१)

दुसऱ्या ठिकाणी कुरआन स्पष्टोक्ती आहे,

‘‘है पैगम्बर (स), तुम्ही याच्या मालमत्तेतून दान घेऊन यांना शुध्द करा आणि (सदवर्तनाच्या मार्गात) यांना पुढे करा आणि यांच्यासाठी कृपेची दुआ करा कारण तुमची दुवा यांच्यासाठी समाधानकारक ठरेल, अल्लाह सर्वकाही ऐकतो व जाणतो.’’ (कुरआन ९: १०३-१०४)

वरील कुरआन संकेत वचनाने जकातचे महत्त्व अगदी स्पष्ट होते. जकात देण्याने मन निर्मळ होऊन आत्मशुध्दी होते. हे सर्वश्रुत आहे की या जगातील वस्तूवरील प्रेम (भौतिक प्रेम) हाच खरा शत्रु आहे नमाज आणि जकात यांचा! हे मनुष्याला अल्लाह आणि परलोकपासून दूर अतिदूर ठेवते. प्रेषित (स) एकदा म्हणाले होते,

‘‘प्रत्येक पापी कृत्याच मूळ हे भौतिक प्रेमात आहे.’’ (मिश्कात)

हे ऐहिक प्रेमात अनेकानेक गोष्टी येतात परंतु सर्वांत शक्तिशाली आणि धोकादायक साधनसंपत्तीबद्दलचे प्रेम आहे. म्हणून प्रेषित (स) यांनी साधनसंपत्तीच्या प्रेमाला मुस्लिमांचा सर्वांत धोकादायक शत्रू ठरविले आहे.

‘‘माझ्या अनुयायींची कसोटी साधन संपत्ती आहे.’’ (तिरमिजी)

मुस्लिम हा धनलालसेपासून अलिप्त राहिला तर तो इतर अनेक पाफत्यांपासून दूर राहू शकतो. या शत्रूपासून सुटका म्हणजे इतर अनेकानेकांपासून सुटका, मुक्तता मिळणे होय. ऐहिक प्रेमापासून मनाला निर्मळ ठेवणे म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर मनशुध्दी – मनःशांती होय! जकात देण्यामुळे ऐहिक साधनसामुग्रीच्या प्रेमापासून मन स्वतंत्र होते, तर याचाच अर्थ हा आहे की त्यामुळे आत्मशुध्दी होते. ऐहिक सुख व ऐहिक लालसेपासून स्वतंत्र मनुष्य अल्लाहची प्रसन्नता आणि परलोक सफलता (मुक्ती) प्राप्त करून घेतो. तो सदाचारी बनतो. म्हणूनच जकातचा परिणाम फक्त मनशुध्दीपर्यंतच सीमित नाही. त्याने अनेक सकारात्मक फायदे होतात. जकातमुळे सदाचार करण्याची एक प्रेरणा सतत मनात जागृत राहते.

इस्लाममध्ये गरीबांचा हक्क अदा करण्यासाठी जकात हा शब्द त्याच्या हेतु आणि उद्देशामुळेच वापरला जातो. जकातचा शब्दशः अर्थ होतो ‘‘शुध्दीकरण आणि वाढ’’. एखाद्याने दुसऱ्या गरजू, गरीब मनुष्याला आपल्या संपत्तीतून काही विशिष्ट भाग अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी देणे जकात आहे, कारण ते आत्मशुध्दी करते आणि धनसंचय शुध्द करते आणि त्यात वाढ करते.

हेसुध्दा येथे ध्यानात ठेवले पाहिजे की जकातचा उद्देश फक्त उत्पन्नाचा काही भाग गरीबास देऊन प्राप्त होत नाही तर तो उद्देश प्राप्त करण्यासाठी जकात शुध्द मनाने आणि व्यावहारिक कष्टाने प्रेरित असणे आवश्यक आहे. अल्लाहची प्रसन्नता ही प्रथम आणि सर्वांत महत्त्वाची अट आहे. इतर सर्व उद्देशांपासून हे कृत्य अलिप्त राहाणे अत्यावश्यक आहे. कुरआनोक्ती आहे,

‘‘हे नबी (स), लोकांना सरळ मार्गावर आणण्याची जबाबदारी तुमच्यावर नाही. अल्लाह ज्याला इच्छितो त्यालाच मार्गदर्शन प्रदान करतो आणि कल्याणकारी मार्गात जी संपत्ती तुम्ही खर्च करता ती तुमच्या स्वतःच्या हिताकरिता होय, शेवटी तुम्ही याचकरिता खर्च करताना की अल्लाहची मर्जी संपादन करावी. म्हणून जी काही संपत्ती तुम्ही कल्याणकारी मार्गात खर्च कराल त्याचा पुरेपूर मोबदला तुम्हाला दिला जाईल आणि तुमचा हक्क कदापि हिरावला जाणार नाही.’’ (कुरआन २: २७२)

‘‘शेवटी तुम्ही याचकरिता खर्च करताना, की अल्लाहची मर्जी संपादन करावी.’’ या वाक्यामुळे जकात देण्याची तत्त्वे मांडली गेली आहेत.
कुरआन वारंवार हे स्पष्ट करीत आहे की सच्चा मुस्लिम तोच आहे जो जकात देतो दानधर्म करतो ते फक्त अल्लाहच्या प्रसन्नतेसाठीच! म्हणून जकात देण्यास ‘‘अल्लाहच्या मार्गात खर्च करणे’’ असेही संबोधले आहे.

दुसरी अट जकात ही वैध (हलाल) मार्गाने कमविलेल्या संपत्तीतूनच अदा केली जाते कुरआनोक्ती आहे,

‘‘हे श्रध्दावंतांनो! जी संपत्ती तुम्ही कमविली आहे आणि जे काही आम्ही जमिनीतून तुमच्याकरिता उत्पन्न केले आहे, त्यापैकी उत्कृष्ठ भाग अल्लाहच्या मार्गात खर्च करा.’’ (कुरआन २: २६७)

प्रेषित (स) यांनी वरील कुरआनोक्तीला स्पष्ट करताना खुलासा दिला आहे,

‘‘लोकहो! अल्लाह सर्वोत्तम गुणांनी संपन्न आहे आणि तो उत्कृष्ठतेचाच स्वीकार करतो अन्य काहीही नाही. तो शुध्द आहे आणि शुध्दतेचाच स्वीकार करतो.’’

तिसरी महत्त्वाची अट आहे अल्लाहच्या मार्गात चांगलेच खर्च करा निकृष्ट खर्च करणे हा दांभिकपणा आहे.

‘‘असे होता कामा नये की त्याच्या मार्गात देण्याकरिता निकृष्टतम प्रतीची वस्तू निवडण्याचा तुम्ही प्रयत्न करावा.’’ (कुरआन २: २६७)

चौथी अट आहे की जकात ज्याला दिली जाते तो गरीब मनुष्य उफत होता कामा नये. त्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहचू नये. अन्यथा जकात देणे व्यर्थ ठरते. कुरआनोक्ती आहे,

‘‘हे श्रध्दावंतांनो, आपले दान, उपकार दाखवून आणि दुःख देऊन त्या माणसासारखे मातीत मिसळू नका जो आपली संपत्ती केवळ लोकांना दाखविण्यासाठी खर्च करतो.’’ (कुरआन २: २६४)

हदीसनुसार तीन माणसे सर्वप्रथम नरकात जाणार आहेत. त्यांच्यापैकी एक आहे तो मनुष्य जो दान फक्त आपले वर्चस्व समाजात वाढावे आणि लोकांनी आपणास दानशूर म्हणावे याच हेतुने दान करतो. दुसऱ्या हदीसमध्ये चांगलीच कानउघाडणी केली आहे,

‘‘जो कोणी दान दुसऱ्यांनी प्रशंसा करावी म्हणून देत असेल तर असा मनुष्य अल्लाहशी शत्रुत्व स्वीकारतो.’’ (मिश्कात)

जकात देतानाच्या काही अटी आहेत. या अटींचे काटेकोर पालन केल्यास हे कृत्य पुण्यमयी आणि शुध्दीकरणाचे स्त्रोत ठरते. जकात माणसात एक नैतिक अधिष्ठान निर्माण करते. याचमुळे सर्वसाधारण दानधर्म करणे आणि जकात देणे यात मौलिक अंतर आहे. जकात देण्याच्या अटींचा जर विचार केला तर असे कळते की स्वतःचे काटेकोर आत्मपरीक्षण करणे हे त्याचे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. ही एक अशी उपासना व भक्ती आहे की जिच्या आजुबाजूला असंख्य विरोधी तत्त्वे कार्यरत असतात. त्यावर कुठाराघात करण्यासाठी म्हणून कुरआनने सदाचरणी माणसाची मानसिकता स्पष्ट करताना म्हटले आहे,

‘‘आणि अल्लाहच्या प्रेमात गरीब आणि अनाथ व कैद्यांना जेवू घालतील आणि त्यांना म्हणतील.’’ आम्ही तुम्हाला केवळ अल्लाहसाठी जेवू घालीत आहोत, आम्ही तुमच्याकडून कोणताही मोबदला इच्छित नाही की आभार प्रदर्शन.’’ (कुरआन ७६: ८-९)
‘‘जे लोक आपल्या पालनकर्त्याच्या धास्तीने भयभीत होणारे असतात, जे आपल्या पालनकर्त्याच्या संकेतांवर श्रध्दा ठेवतात, जे आपल्या पालनकर्त्यांबरोबर कोणाला भागीदार बनवीत नाही, आणि ज्यांची स्थिती अशी आहे की देतात जे काही देतात आणि हृदयाचा त्यांचा या विचाराने थरकाप होत असतो की आम्हाला आमच्या पालनकर्त्यांकडे परतावयाचे आहे.’’ (कुरआन २३: ५९-६०)

गर्वाबद्दल काय बोलावे? अत्यानंद, डामडौल इ. लाभकारींच्या आत्मसन्मानाला आघात करतात. जकात देताना श्रध्दावंत हे अल्लाहच्या भयाने भयभीत झालेले असतात ते यामुळे की मनात काही अविचार गुपचूप येऊन त्यांच्या या सत्कृत्याला वाया घालवू नये. त्याला भीती असते की पुनरुत्थानाच्या दिवशी अल्लाहसमोर त्याचे दान देणे, जकात देणे हे सर्व वाया जाऊ नये.

गरीबांची मदत: आता आपण दुय्यम दर्जाच्या हेतुचा विचार करू या जकात देताना गरीब मुस्लिमांना त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी मदत करणे हा हेतु कार्यरत असतो. प्रेषित (स) यांचे कथन आहे,

‘‘अल्लाहने जकात त्यांच्यावर अनिवार्य केली आहे. श्रीमंत मुस्लिम कडून जकात घेऊन ती गरीब मुस्लिमांना देण्यात यावी.’’ – मुस्लिम

कुरआन जकात देणे हे सदाचारी मुस्लिमाचे लक्षण ठरवतो आणि जकात देण्याचा तपशील खालीलप्रमाणे स्पष्ट करतो.

‘‘सदाचार हा नव्हे की तुम्ही आपले तोंड पूर्वेकडे किवा पश्चिमेकडे करावे तर सदाचार हा आहे की जे अल्लाहवर आणि अंतिम दिवसावर ईमान धारण करतात. तसेच सर्व दूतांवर, सर्व ग्रंथ आणि सर्व प्रेषितांवर ईमान धारण करतात. ईशप्रेमापोटी आपल्याला प्रिय असलेली संपत्ती आपले नातेवाईक आणि अनाथ, गरजवंत, वाटसरू व याचक तसेच गुलामांच्या मुक्ततेसाठी खर्च करतात आणि नमाज कायम करतात व जकात अदा करतात. तसेच दिलेल्या वचनांची पूर्तता करतात आणि अडचणी संकटे आणि युध्दप्रसंगीदेखील संयम राखतात. हेच लोक सत्यशील आणि अल्लाहच्या कोपचे भय बाळगणारे आहेत.’’ (कुरआन २: १७७)

वरील संकेतवचनावरून हे सिध्द होते की जकात अदा करण्याचा आर्थिक आणि सामाजिक अंग आहे. त्याच्याशिवाय जकात देण्याला काहीच अर्थ उरत नाही. जकात देणारा तर आपली आत्मशुध्दी करून घेतो. परंतु गरीबाला ती रक्कम (जकात)दिल्यानंतरच त्या रकमेतून तो गरजू आपली गरज भागवितो. यानंतरच त्याचे (जकातचे) उद्देश साध्य होते. म्हणूनच कुरआन जकातचा उल्लेख श्रीमंत लोकांच्या धनसंपत्ती वर गरीबांचा हक्क असा उल्लेख करतो.

‘‘परंतु ते लोक जे नमाज अदा करतात, जे आपल्या नमाजात नेहमी नियमित पणा ठेवतात, ज्यांच्या मालमत्तेत याचक व वंचित असलेल्यांचा एक ठराविक हक्क आहे. जे मोबदल्याच्या दिवसाला सत्याधिष्ठित मानतात, जे आपल्या पालनकर्त्याच्या कोपचे भय बाळगतात.’’ (कुरआन ७० : २३-२६)

या हक्कासाठी इस्लामी शासनाला युध्द घोषित करण्याचा अधिकार आहे. आदरनीय अबू बकर (र) यांच्या उदाहरणाने वर हे स्पष्ट झालेले आहे. गरीबांना मदत करणे हा जकात देण्याचा दुय्यम हेतु जरी असला तरी त्याचे महत्त्व हे असाधारण असे आहे. त्याचे महत्त्व या ऐहिक जीवनात आणि पारलौकिक जीवनात उल्लेखनीय असे आहे. खालील हदीसनुसार त्याचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.

१) ‘‘जो स्वतः पोट भरून खातो आणि त्याचा शेजारी मात्र उपाशी पोटी राहतो, तर असा मनुष्य खरा मुस्लिम नाही.’’ (मिश्कात)

२) न्यायदानाच्या दिवशी अल्लाह विचारणा करील की,

‘‘हे आदमच्या संततीनो, मी तुम्हाला अन्नाबद्दल विचारले होते परंतु तुम्ही मला ते दिले नाही.’’ मनुष्य उत्तर देईल, ‘‘हे माझ्या प्रभुस्वामी, मी तुला अन्न कसे देणार की जेव्हा तू सर्वांचाच अन्नदाता आहेस!’’ या प्रश्नाचे उत्तर अल्लाह देईल की ‘‘तुला आठवत नाही की तुझ्याकडे एक मनुष्य आला होता आणि तो उपासी होता. तो तुझ्याकडे अन्नासाठी भीक मागत होता आणि तू त्यास नकार दिला?’’ (मुस्लिम)

हे अगदी निर्विवाद आहे की इस्लाम गरीबांच्या आणि गरजूंच्या गरजा भागविण्याबद्दल अत्यंत भावनाशील आहे. गरीबांच्या गरजा पुऱ्या करणे इस्लाममध्ये असाधारण असे कृत्य आहे.

इस्लामचा आधार: इस्लाममध्ये जकातचा दुय्यम हेतु मदत करणे आहे. कुरआन जकातच्या लाभ धारकांबद्दल तपशील देताना स्पष्ट निर्देश देत आहे,

‘‘हे दान तर खऱ्या अर्थी फकीर आणि गोर-गरीबांसाठी आहे. आणि त्या लोकांसाठी जे दान वसुलीच्या कामावर नेमले आहेत आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे, गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईशमार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरिता आहे. एक कर्तव्य आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्व काही जाणणारा द्रष्टा व बुध्दिमान आहे.’’ (कुरआन ९: ६०)

अल्लाहच्या मार्गात (ईशमार्गात) ही शब्दावली इस्लामसाठी केलेला संघर्ष दर्शविते, विशेषतः जिहादच्या गरजा पुऱ्या करण्यासाठी जकात व दान देणे हेसुध्दा उद्देशांपैकी एक उद्देश आहे. या उद्देशाने मुस्लिमांना कुरआन सतत सतर्क ठेवित आहे.

‘‘निघा, मग तुम्ही हलके असा अगर बोजड असा व संघर्ष करा अल्लाहच्या मार्गात आपल्या जीवित व वित्तानिशी, हे तुमच्यासाठी उत्तम आहे जर तुम्ही जाणत असाल.’’ (कुरआन ९: ४१)

कुरआन ज्या वेळी सदाचारी मुस्लिमांच्या गुणांचा उल्लेख करतो त्या वेळी हा गुण उल्लेखित केला जातो की ते अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा (जिहाद) करतात आपल्या वित्तानिशी. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. जिहादसाठी जो काही खर्च होतो तो मुस्लिमांनी आपल्या खाजगी मालमत्तेतून देणे आवश्यक आहे. धर्माचे रक्षण आणि धर्माची मदत करणे ही काही साधी बाब नाही. म्हणूनच आपली संपत्ती त्यासाठी खर्च करणे हे अतिमहत्त्वाचे आहे. जिहादवर खर्च करण्यासाठी आदेश देताना कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘अल्लाहच्या मार्गात (संपत्ती) खर्च करा आणि आपल्या हाताने स्वतःला अडचणीत टाकण्यापासून (स्वतःचा विनाश करण्यापासून) परावृत्त राहा आणि सद्वर्तन करा, अल्लाहला सद्वर्तन करणारेच आवडतात.’’ (कुरआन २: १९५)

यावरून हे सिध्द होते की धर्माचे रक्षण आणि धर्माला मदत करण्यासाठी आपली संपत्ती खर्च न करणे म्हणजे स्वतःच्याच हातून स्वतःचे लौकिक आणि पारलौकिक दोन्ही जीवन उध्वस्त करणे होय. आपल्या हाताने स्वतःचा विनाश करणे थांबविण्यासाठी दान व जकात देणे ही काही साधी बाब नाही. हे एक महान सद्वर्तन आहे.

संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *