मुस्लिमांच्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नांपैकी खर्चिक विवाह हा एक मोठा महत्वाचा प्रश्न झालेला आहे. दुर्भाग्याने या प्रश्नाकडे म्हणावे तेवढ्या गांभीर्याने मुस्लिमांनी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चाललेला आहे. या प्रश्नाला जर समाज खंबीरपणे सामोरे गेला नाही आणि याचे उत्तर वेळीच शोधले नाही तर स्मार्टफोनच्या या काळात मुस्लिमांची तरूण पिढी वाम मार्गाला लागल्याशिवाय राहणार नाही.
जर मुस्लिमांनी आपल्या मुलां-मुलींच्या लग्नामध्ये इस्लामी आचारसंहितेचा काटेकोरपणे वापर केला तर मुस्लिमांचे विवाह ही साधेपणे होतील. त्यात बरकत येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या समाजाला कन्याभ्रुणहत्येसारख्या महापापाला सामोरे जावे लागणार नाही.
इस्लाममध्ये विवाह म्हणजे एक सामाजिक करार आहे. त्यात दोन व्यक्ती, दोन साक्षीदार, एक वकील आणि एक आलीम एवढेच लागतात. मुलाकडील लोकांना मुलगी पसंद पडली (इजाब), मुलीकडील लोकांना मुलगा पसंद पडला (कुबूल) की लग्न ठरते. दोन साक्षीदार आणि एक वकीलासमोर खुत्बा-ए-निकाह (विवाहाची विधी) अदा केला की विवाह संपतो. या विवाहात फक्त महेरचीच आर्थिक देवाण-घेवाण होते. वराकडून आपल्या होणाऱ्या पत्नीला भेट म्हणून जी रक्कम दिली जाते तिला मेहर म्हणतात. ती दोन्ही पक्षाकडील लोकांच्या संमतीने ठरविली जाते. ही रक्कम नवऱ्यामुलाच्या ऐपतीप्रमाणे ठरविली जाणे अपेक्षित आहे. निकाह अर्थात विवाह मस्जिदीमध्ये केला जातो. विवाहाला यापेक्षा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज नसते. जगातील सगळ्यात सुलभ अशी लग्नाची ही पद्धत आहे. मात्र या पद्धतीचे विकृतीकरण करून मुस्लिमांमध्ये खर्चिक विवाह करण्याची परंपरा अलीकडे रूढ झालेली आहे. विवाहाच्या वेळी मुलीच्या परिवाराकडून नवऱ्या मुलाच्या परिवाराला थोडासा पाहुणचार करणे समजण्यासारखे असते. मात्र आजकाल या पाहुणचाराला इव्हेंटचे स्वरूप देण्यात आलेले आहे. हीच बाब चिंतेची आहे. खर्चिक विवाहाचा परिणाम कन्याभ्रूण हत्येच्या रूपाने समोर येतो हे अजूनही लोकांच्या लक्षात येत नाही. मुस्लिमांमध्येही आता लिंगपरीक्षण करून कन्याभ्रूण हत्या होण्यास सुरूवात झाल्यास नवल वाटून घेण्याची गरज नाही. इतर समाजाप्रमाणे मुस्लिमही आपल्या मुलांमुलींच्या लग्नामध्ये आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करत आहेत. या खर्चामुळे अनेकांचे विवाह रखडलेले आहेत. 30-35 वर्षाच्या वयाची अविवाहित मुलं आणि मुली मुस्लिम समाजामध्येही आजकाल ठळकपणे दिसून येतात. अशी कोणती गोष्ट आहे, जी त्यांना एवढ्या वयापर्यंत लग्नापासून रोखून ठेवते? स्पष्ट आहे, लग्नातील अवाढव्य मागण्या, शोभेचा खर्च, मोठमोठ्या जेवणावळी, हुंडा, दागदागिने, मंडप, डेकोरेशन या सगळ्या गोष्टी मिळून मुस्लिम समाजामध्येही विवाह करणे अवघड झालेले आहे.
लग्नाच्या घरी दावत हा प्रकार मुस्लिमांमध्ये कधीच नव्हता. आजही मध्यपूर्वेतील मुस्लिम देशांमध्ये लग्नाच्या दिवशी पाहुण्यांना जेवण दिले जात नाही. मात्र भारतामध्ये लग्नाच्या दिवशी वधूपक्षाकडून शेकडो लोकांना जेवण देण्याची परंपराच रूढ झालेली आहे. यात हजारो नव्हे लाखो रूपयांचा खर्च केला जात आहे. मोठ्या शहरांमध्ये 2 लाख जेवणाचे व 2 लाख फंक्शन हॉलचे वेगळे काढून ठेवावे लागतात. तेव्हाच लग्न करणे शक्य होते. त्यानंतरचा इतर खर्च वेगळा. साहजिकच एक साधारण लग्न 6 ते 10 लाखाच्या घरात जाते. एवढी रक्कम तेच लोक खर्च करू शकतात, ज्यांच्याकडे उत्पन्नाचे चांगले-वाईट, मोठे स्रोत असतात. याचा परिणाम सर्वसामान्य मुस्लिमांवर होत आहे. प्रत्येकजण असे लग्न करू पाहत आहे, की तसे लग्न त्या वस्तीमध्ये त्यापूर्वी कोणाचेच झालेले नाही.
एकदा काही बदू (खेडूत मुस्लिम) चर्चा करीत होते की, त्यांच्यापैकी कोणाचा कबिला (घराणे) श्रेष्ठ आहे. प्रत्येकजण आपला कबिला श्रेष्ठ असल्याचे ठासून सांगत होता. बघताबघता प्रकरण चिघळले व हातघाईवर आले. तेव्हा एका बुजुर्ग बदूने सांगितले की, प्रेषित मुहम्मद (स.) आपल्यामध्ये हयात असताना आपण असे आपसांत भांडणे योग्य नाही. ते आपल्या सर्वांना ओळखतात. आपण त्यांनाच हा प्रश्न विचारू की आमच्यापैकी कोणता कबिला श्रेष्ठ आहे? त्यांनी दिलेल्या उत्तरावर आपल्याला सर्वांना राजी व्हावे लागेल. सर्वांनी या सल्याप्रमाणे प्रेषित (स.) यांच्याकडे जाऊन आपले म्हणणे मांडले व त्यांना विनंती केली की त्यांनी सांगावे की, आमच्यापैकी कोणाचा कबिला श्रेष्ठ आहे? प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकूण घेतले व उत्तर दिले की, तुमच्यापैकी तो कबिला सर्वश्रेष्ठ आहे ज्या कबिल्यामध्ये विवाह सुलभ आणि व्यभिचार कठीण आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येईल की हे एक सूत्र आहे जे प्रेषितांनी मुस्लिमांना दिलेले आहे. आज या सूत्रावर आपल्या सर्वांना आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झालेली आहे. मुस्लिमांच्या अत्यंत
महत्त्वाच्या प्रश्नांपैकी खर्चिक विवाह हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न झालेला आहे. दुर्भाग्याने या प्रश्नाकडे म्हणावे तेवढ्या गांभीर्याने मुस्लिमांनी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चाललेला आहे. या प्रश्नाला जर समाज खंबीरपणे सामोरे गेला नाही आणि याचे उत्तर वेळीच शोधले नाही तर स्मार्टफोनच्या या काळात मुस्लिमांची तरूण पिढी वाममार्गाला लागल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने तसे घडल्यास याची संपूर्ण जबाबदारी मुस्लिम समाजावर राहील. कुठलाही समाज आदर्श तेव्हा होतो, जेव्हा त्यातील विवाह आणि अन्य सोपस्कार सुलभ असतात. मुस्लिमांना शरियतने अत्यंत सुलभ अशी विवाहाची पद्धत आखून दिलेली आहे. मात्र आपल्या बडेजावाच्या तोऱ्यात आपण सर्वांनी त्या पद्धतीला हरताळ फासलेला आहे. यामुळे नको तेवढी अडचण निर्माण झालेली आहे. या प्रश्नाला सोडवायचे असल्यास व समाजाला जीवघेण्या खर्चिक विवाहातून बाहेर काढावयाचे असल्यास समाजातील श्रीमंत लोकांना पुढे यावे लागेल. जेव्हा मुस्लिमांतील श्रीमंत लोक कुठलाही बडेजाव न दाखविता साधेपणाने आपल्या पाल्यांचे लग्न करतील तेव्हा समाजातील मध्यम आणि गरीब वर्गातील लोकसुद्धा साधेपणाने लग्न करण्याची प्रेरणा मिळेल. यासाठी सर्वप्रथम लग्न मस्जिदीमध्ये करून मुलीच्या घरी दिल्या जाणाऱ्या शाही मेजवाणीवर प्रतिबंध आणावा लागेल. आजकाल अनेक लग्न मस्जिदीमध्ये होतात परंतु, लग्न होताच मस्जिदीमध्येच घोषणा होते की, अमुकअमुक फं्नशन हॉलमध्ये पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. ही पद्धत बंद केल्यास जेवणाचा प्रचंड खर्च, फं्नशन हॉलचे भाडे वाचेल व लग्नाच्या अर्ध्या खर्चाला या ठिकाणी आळा बसेल. दुसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे मुलींसोबत महागड्या वस्तू देण्याची प्रथा बंद पाडावी ला- गेल. दहेज-ए-फातमी या नावाखाली आज मुस्लिमांमध्ये नको त्या लाखो रूपयांच्या महागड्या वस्तू मुलींसोबत देण्याची फॅशन रूढ झालेली आहे. यात हजरत फातेमा (रजि.) आणि हजरत अली (रजि.) यांच्या विवाहामध्ये दिल्या गेलेल्या काही वस्तूंचा हवाला दिला जातो. यासंबंधी सत्य असे आहे की, अली (रजि.) हे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासोबतच लहानाचे मोठे झाले व त्यांच्याबरोबरच राहिले. म्हणून त्यांचे स्वतःचे घर किंवा स्वतःच्या कुठल्याही वस्तू नव्हत्या. जेव्हा प्रेषितांनी आपल्या लाडक्या लेकीसाठी त्यांचा वर म्हणून स्वीकार केला तेव्हा अली (रजि.) यांच्या घोड्याची जर्रा (घोड्याच्या पाठीवर ठेवण्याचे चामड्याचे आसन) विकून थोडी मातीची भांडी, एक मिश्कीजा (चामड्याची पाणी भरण्याची पिशवी), नारळाच्या केसरची एक गादी एवढ्या गोष्टी देण्यात आल्या होत्या. या गोष्टीचा दुरूपयोग मुस्लिमांनी इतका केला की, त्या नावाखाली आपल्या मुलींना कार, फ्रीज, टी.व्ही., लाखोंचे दागिने, भांडी, ब्रँडेड वस्तू, देऊन त्यांना सासरी पाठविण्याची प्रथा रूढ केली. हा फार मोठा अपराध या लोकांनी केलेला आहे. जहेज-ए-फातमीच्या नावाखाली एवढा प्रचंड खर्च करणे कुठल्याही इस्लामी चारित्र्यसंपन्न मुस्लिमाला शोभण्यासारखे नाही. विवाहानंतर तआम-ए-वलीमा नवऱ्या मुलाकडून देणे अनिवार्य असते. यातही दोन चुकीचे प्रकार समाजात रूढ झालेले आहेत. एक तर तआमे वलीमा दिला जात नाही. दुसरे हे की वलीमा हा अत्यंत महागड्या स्वरूपात दिला जातो. या दोन्ही रूढी या इस्लामला धरून नाहीत. कुठल्याही पद्धतीने केला गेलेला अवास्तव खर्च इस्लामला मान्य नाही. जर मुस्लिमांनी आपल्या मुलांमुलींच्या लग्नामध्ये इस्लामी आचारसंहितेचा काटेकोरपणे वापर केला तर मुस्लिमांचे विवाह ही साधेपणे होतील. त्यात बरकत येईल. आपल्या समाजाला कन्या भ्रूणहत्येसारख्या महापापाला सामोरे जावे लागणार नाही. सर्वश्रेष्ठ अल्लाह आम्हा सर्वांना आपापल्या पाल्यांची लग्ने इस्लामी शरियत (आचार संहिते)प्रमाणेच करण्याची सद्बुद्धी देवो. (आमीन.)
फेरोजा तस्बीह-
(मिरजोळी चिपळून, रत्नागिरी)
0 Comments