माननीय अली (रजि.) यांनी उल्लेख केला आहे.
अबू जहलने पैगंबर मुहम्मद (स.) यांना सांगितले, ‘‘हे मुहम्मद (स.)!आम्ही कुरैश लोक तुम्हाला खोटे ठरवित नाही. आम्ही तर त्यास खोटे ठरवित आहोत ज्यास तुम्ही घेऊन आला आहात.’’
स्पष्टीकरण
अर्थात आम्हांवर तुमचे सत्य प्रकाशमान व दिवसाच्या उजेडाइतके स्पष्ट आहे. आम्ही कधीही तुम्हाला खोटे बोलताना ऐकले नाही. लोकांत सत्यवादिता व अमानतीच्या दृष्टीने तुम्ही ओळखले जाता. आम्ही खरेतर तुमचा ग्रंथ व शरीयतला अमान्य करतो. आम्ही त्या दिव्य अवतरणाला स्वीकारत नाही ज्यास तुम्ही प्रस्तुत करीत आहात.
कदाचित! सत्यविरोधकाला हे समजले व उमजले असते की जो मनुष्य या जगाच्या मामल्यात लोकांशी खोटे बोलू शकत नाही तो धर्माच्या मामल्यात खोटे कसे बोलेल? ज्या मनुष्याची स्पष्ट विशेषता ही सत्यवादिता आहे तो ईश्वराशी एखादी खोटी गोष्ट कशी संबोधित करील?
खरेतर मक्का येथील कुरैशचे मोठमोठे सरदार ईर्षा, द्वेष, अहंकार व पूर्वग्रहदूषित होते, ज्यामुळे सत्य स्वीकारणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते.
0 Comments