Home A प्रेषित A खंदक’ची लढाई

खंदक’ची लढाई

आपण मक्कावासीय कुरैश कबिल्याच्या इस्लामद्रोही कारवायांकडे वळू या. ‘कुरैश’ आणि मदीनातील मुस्लिम शक्तींमध्ये एक मोठा फरक होता. ‘कुरैश’जणांतील ‘अज्ञान व्यवस्थेचा’ आत्मा अत्यंत थकलेला आणि कुजलेला होता. त्या समाजाचा एखादा अवयव प्रत्येक वेळी तुटून मदीनाच्या झोळीत येऊन पडत. त्या तुलनेत इकडे मदीनातील मुस्लिम शक्ती रचनात्मक, सिद्धान्तनिष्ठ, संदेशवाहक आणि जनसमर्थित शक्ती असल्यामुळे ती गतीशील, सक्रीय असून सतत विकास पावत होती. काळ लोटत होता आणि जसाजसा काळ लोटत होता, तसतसा मदीनासाठी फायद्याचा आणि मक्कासाठी हानीकारक सिद्ध होत होता. तेव्हा आता मुस्लिमांवर हल्ला करून त्यांची शक्ती नष्ट करण्यासाठी त्यांना एका प्रचंड शक्तीची नितांत आवश्यकता होतीच. याकरिता कुरैश, ज्यूडिश, अहाबिश, गतफान वगैरे कबिल्याचे लोकही शक्ती निर्माण करण्याच्या जोरदार तयारीस लागले. याचाच एक भाग म्हणून त्यांनी एक जबरदस्त योजना मुस्लिम शक्तीविरुद्ध आखली.
या योजनेनुसार दहा हजार सैनिकांचे एक जबरदस्त लष्कर तयार करण्यात आले. आदरणीय प्रेषितांना या योजनेची खबर मिळताच त्यांनी तत्काळ बैठक भरवून निर्णय घेतला की, मदीना शहरात राहूनच शत्रूपक्षाचा प्रतिकार करावा. ‘माननीय सलमान फारसी(र)’ यांचा सल्ला मान्य करण्यात आला की, मदीनेच्या उत्तरेकडे असलेल्या खुल्या भागात खंदक खोदण्यात यावा. या कार्यासाठी तीन हजार मुस्लिम सैनिक कामाला लागले. दहाजणांची टोळी तयार करून पाच किलोमीटर लांबीची असलेला हा खंदक तेरा लाख शेह्यांशी हजार घनफूट माती खोदून तयार करण्याचे कार्य सुरु झाले. यानुसार प्रत्येक सैनिकाच्या वाट्याला जवळपास चारशे बासष्ट घनफूट खड्डा खोदून माती बाहेर फेकण्याचे काम आले. टोपली कमी असल्यामुळे ‘माननीय अबू बकर(र)’ आणि ‘उमर(र)’ यांच्यासारख्या लोकांनी आपल्या अंगरख्याच्या झोळीत माती उचलून काम केले.
खंदक खोदण्याचे काम पूर्ण होताच हि. स. पाचमध्ये शत्रूचे पायदळ सैनिक मदीना शहराजवळ धडकले. खंदकाची कल्पना त्यांना माहीतच नव्हती. काहीजण घोड्यांवर स्वार होऊन खंदक पार करण्याच्या प्रयत्नांत दरीत कोसळून ठार झाले. केवळ एकदाच असे झाले की, शत्रूपक्षाच्या ‘अम्र बिन अब्दे वदूद’ या बलाढ्य योद्ध्याने एका योग्य ठिकाणी येऊन काही सैनिकांसह खंदक पार करून प्रवेश मिळविला. त्याने युद्धाचे आवाहन करताच ‘माननीय अली(र)’ यांनी त्यास यमसदनी धाडले. अशा प्रकारे काही ठिकाणी टोळीटोळीने झडपा होत राहिल्या. परंतु अशा झडपांमुळे लढाई निर्णयास पोहोचत नाही. शेवटी निर्णयात्मक लढाई लढण्याासाठी कुरैश कबिल्याने एक धूर्त चाल आखली. त्यांनी ‘कुरैजा’ परिवारास मदिनातील मुस्लिमांवर पाठीमागून हल्ला करण्यास भाग पाडले. यासाठी त्यांना दीड हजार सैनिक देण्यात आले.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ‘औस’ आणि ‘खजरज’ कबिल्याच्या सरदारांना बोलावून सांगितले की, तुमची हरकत नसेल तर ‘गतफान’ कबिल्याशी मदीनाच्या मिळकतीच्या एक तृतीयांश भागावर समझोता करु या. परंतु या सरदारांनी अशी भूमिका मांडली की, ‘‘ज्या वेळी आम्ही इस्लामचा स्वीकार केलेला नव्हता त्या वेळी आम्ही एक खडकूसुद्धा त्यांना खंडणी दिली नाही. मग आता कशापोटी आपली संपत्ती त्यांना द्यावी?’’
याच प्रसंगी ‘नुएम बिन मसऊद(र)’ यांनी इस्लाम स्वीकारण्याची घोषणा करून प्रेषितांना सांगितले की, ‘‘आपली परवानगी असेल तर मी ‘कुरैश’ आणि ‘कुरैजा’ कबिल्यात फूट पाडू शकतो. कारण अद्याप त्यांना माझ्या इस्लामस्वीकृतीची खबर मिळालेली नाही.’’ प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्यांना परवानगी देऊन टाकली आणि माननीय नुएम बिन मसऊद(र) यांच्या प्रयत्नाने शत्रूपक्षात फूट पडली.
तब्बल एक महिन्यापर्यंत शत्रूने ‘मदीना’ शहरास वेढले होते. सैन्याचे मोर्चावर जाऊन रिकामे बसणे कठीण होत जात असते. त्याचबरोबर ‘रसद’चा प्रश्नही शत्रूसाठी बिकट होत होता. शत्रूच्या रसदीच्या एका खेपेवर मुस्लिम सैन्याने ताबा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. ऋतुमानसुद्धा जास्त थंड होत असल्याने शत्रूपक्षाचे अवसान गळून पडत होते. एके रात्री खूप जोरात सोसाट्याचा वारा सुटला आणि शत्रूसैन्याचे तंबू उडू लागले. प्राणी सैरावैरा पळू लागले. तसेच शत्रूसैन्यसुद्धा वादळास घाबरून पळू लागले. सकाळ होता होता पूर्ण मैदान रिकामे झाले.
या प्रसंगी मदीना शहरात मुस्लिम समुदायाकडे खाद्य सामग्रीची चणचण होती. लोक पोटावर दगड बांधून काम करीत होते. आदरणीय प्रेषितांनीसुद्धा आपल्या पोटावर दोन दगड बांधले हते. अर्थात मुस्लिम समुदायाचे आणि इस्लामी राज्याचे प्रमुख असलेले लोकसुद्धा सामान्यजणांप्रमाणे आपल्या रयतेत मिसळून कामाला लागलेले होते.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे जातीने खोदकामात मग्न होते. एखादी बिकट समस्या आल्यास विशेषतः प्रेषितांना बोलावून समस्या दूर करण्यात येत असे. माननीय अली(र) यांचे कथन आहे की, ‘‘या कामामध्ये एक मोठे पाषाण लागले. ते लवकर फुटत नसल्याने माझ्या जवळच काम करीत असलेल्या प्रेषितांना दाखविले. प्रेषित मुहम्मद(स) यांनी माझ्या हातून टिकाव घेतला आणि नेमक्या ठिकाणी दोन वार करून ते पाषाण फोडले. याच प्रसंगी ईश्वराकडून प्रेषितांना ‘येमेन’, सीरिया, पश्चिमी अरब आणि पर्शिया विजयाच्या भविष्यवार्ता देण्यात आल्या.
इतक्या कठीण परिस्थितीतही आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे प्राण पणाला लावून घाम गाळत होते. कारण त्यांना आता पूर्ण विश्वास झाला की, आता आपणास आणि आपल्या आंदोलनास निश्चितच यश लाभेल. एवढेच नव्हे तर प्रेषितांनी आपल्या प्रबळ विश्वास शक्तीच्या आधारे घोषणादेखील करून टाकली की, ‘‘आता कुरैश ‘मदीना’वर कधीच चढाई करू शकणार नाही.’’ आदरणीय प्रेषितांची ही भविष्यवाणी अगदी सत्य सिद्ध झाली.

संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *