इस्लामी कायद्याचे हे सर्वस्वीकृत वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये मानवाच्या प्राण, इज्जत व शीलतेला केवळ अमर्याद महत्त्वच दिले नसून त्यांच्या रक्षणाची परिपूर्ण आणि यशस्वी सोय केली आहे. याच कार्यपूर्तीसाठी या कायद्यात ‘हद‘ आणि ‘दंडविधानाची‘ तजवीज केली आहे. इस्लामी कायद्याने या गोष्टीची पूर्ण खबरदारी घेतली की समस्त मानवजातीचे प्राण, प्रतिष्ठा, शीलता आणि संपत्तीचे पूर्ण संरक्षण व्हावे. माणसाने भयमुक्त वातावरणात सुख-समाधानाने जगावे. कुरआनात हाच उद्देशपूर्ण करण्यासाठी म्हटले आहे,
‘‘हे श्रद्धावंतांनो, तुमच्यासाठी हत्या करण्याची शिक्षा मृत्यूदंड ठरविण्यात आली आहे. स्वतंत्र माणसाने हत्या केल्यास त्याच्याकडून स्वतंत्र व्यक्तीच बदला घेईल. गुलामाने हत्या केली असेल, तर गुलामच बदला घेईल, स्त्रीने हत्या केली असेल तर तिलाच मृत्यूदंड देण्यात येईल, मात्र एखाद्या खुन्याबरोबर त्याचा भाऊ दयेपूर्ण वर्तन दाखवीत असेल तर भल्या पद्धतीने खूनभरपाईची तडजोड करण्यात यावी. तसेच खुन्यानेसुद्धा अनिवार्यरित्या खूनभरपाई द्यावी. हे तुमच्या पालनकर्त्याकडून शिक्षेत शिथिलता आणि कृपा आहे. एवढे असूनही कोणी अतिरेक करीत असेल तर त्याच्यासाठी यातनादायक शिक्षा आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-बकरा – १७८)
0 Comments