“मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.”
दोन प्रकारच्या साक्षीचे हे दोनच शब्द आहेत, मात्र यावर इस्लामची पूर्ण भव्य इमारत उभी आहे आणि यापासून त्या वृक्षाची निर्मिती होते, ज्यासंबंधी कुरआनात म्हटले आहे,
“अल्लाहच्या या कलिम्याचे (धर्मसूत्राचे) उदाहरण एका अत्यंत पवित्र वृक्षासम असून त्याचे मूळ अत्यंत मजबूत आणि त्याच्या फांद्या आसमंतात सर्वत्र विस्तारलेल्या आहेत. तो आपल्या पालनकर्त्याच्या कृपेने प्रत्येक क्षणी चांगली फळे देतो. अल्लाह या उदाहरणाच्या आधारे श्रद्धावंतांना वर्तमान आणि परलोकी जीवनात स्थैर्य प्रदान करतो.”
याच कलिम्यासंदर्भात पैगंबर मुहम्मद (स.) यांनी उघड आवाहन दिले आहे,
“लोकहो या कलिम्याचा स्वीकार करा. अरब आणि बिगरअरबांचे पूर्ण नेतृत्व तुमच्या हाती येईल.”
आणि इतिहास साक्षी आहे की ज्यांनी या धर्मसूत्राचा स्वीकार केला, ते समस्त जगाचे शासक बनले. अल्पसंख्येत असूनही रोम आणि पर्शियासारख्या साम्राज्यांना गुलामी पत्करावी लागली. कारण या धर्मसूत्राचा चमत्कारच असा आहे की माणूस समस्त प्रकारची गुलामगिरी झुगारून देतो आणि एकाच अल्लाहची गुलामी स्वीकारतो. या धर्मसूत्रामागे एकमेव अल्लाहची प्रचंड शक्ती असून जगात यामुळे अद्वितीय क्रांती घडली. म्हणूनच हा कलिमा प्रत्येकाच्या मानसिकतेत रूजावयास हवा. यासाठीच मूल जन्मताच त्याच्या कानात हे शब्द उच्चारून त्यास याचे बाळकडू पाजण्यात येते. प्रत्येक नमाजीत याच विचारधारेचे स्मरण करून देण्यात येते आणि प्रत्येक भाषणात आणि लग्न प्रवचनात याची साक्ष देण्यात येते. हे यासाठी की, आम्हाला सतत स्मरण राहावे की आम्ही प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक वेळी अल्लाहचे दास आहोत आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अनुयायी आहोत.
0 Comments