Home A प्रेषित A ‘उहुद’ युद्धाच्या काही महत्त्वाच्या बाजू

‘उहुद’ युद्धाच्या काही महत्त्वाच्या बाजू

‘बद्र’ चे युद्ध सत्य-असत्यातील फरक स्पष्ट करणारे आणि ईश्वराच्या मदतीमुळे कमी सैन्यसंख्या, कमी हत्यार व शस्त्रे असूनही सशस्त्र आणि बहुसंख्य असलेल्या शत्रूवर विजय प्राप्त करून देणारे असल्यामुळे इस्लामी इतिहासात यास अत्यंत महत्त्व आहे. त्याचा प्रभाव मुस्लिमांच्या संपूर्ण सामरिक इतिहासावर पडलेला आहे.
परंतु ‘उहुद’चे युद्धसुद्धा अतिशय बोधात्मक आहे. त्यातून असाधारण महत्त्वाच्या शिकवणी मिळाल्या. या युद्धात मुस्लिमांना पूर्ण वर्चस्व मिळाले नसले तरी सामना अटीतटीचाच म्हणावा लागेल. युद्ध समाप्तीनंतर शत्रूपक्षाचा सरदार ‘अबू सुफियान’ याने हिशेब बरोबर झाल्याची घोषणा जरी केली, तरी एका महत्त्वाच्या गोष्टीवर त्याचे लक्ष गेलेच नाही. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे सैन्य कमी संख्येत आणि कमी शस्त्रधारी, तसेच बिकट परिस्थितीत होते. या तुलनेत शत्रूचे सैन्य जवळपास चार पटीने जास्त आणि सशस्त्र होते. शत्रूचे तीस सैनिक ठार होऊनसुद्धा गर्वाच्या उन्मादात त्याने हिशेब चुकता वा बरोबर होण्याची घोषणा केली. एकार्थाने हासुद्धा इस्लामी सैन्याचाच विजय म्हणावा लागेल. नैतिक विजय तर वेगळाच भाग आहे.
या युद्धाचे काही बोधात्मक पैलू आपण पाहू या.

  1. आंदोनांचा हा पराक्रम असतो की, ते विरोधी समुदायातसुद्धा अतिशय नाजुक प्रसंगी साथ देणारे समर्थक निर्माण करतात. प्रत्यक्षात मात्र या गोष्टीची विशेष व्यवस्था नव्हती की, मक्कातील शत्रूच्या कटकारस्थानाची नियमित सूचना ‘मदीना’ शासनास पोहोचत राहावी. परंतु ‘माननीय अब्बास(र)’ यांचा सुरुवातीपासून प्रेषित मुहम्मद(स) यांच्याकडे कल होता. एका विशिष्ट उद्दिष्टपूर्तीस्तव त्यांनी आपल्या इस्लाम स्वीकृतीस गुप्त ठेवून मदीनास हिजरत न करता मक्कामध्येच वास्तव्य केलेले होते. म्हणून मक्कामध्ये चालणार्या इस्लामविरोधी कटकारस्थानाची आणि यौद्धिक हालचालीची गुप्त सूचना ते प्रेषितांना कळवीत असे.
  2. खरे पाहता युद्धजन्य परिस्थिती ‘अबू सुफियान’ याने स्वतःच निर्माण केली होती. त्याने प्रेषितांच्या इस्लामी संघटनास पत्राद्वारे चिथावणी दिली होती की, ‘कुरैश’जणांनी काबागृहात प्रतिज्ञा घेतली आहे की, ‘लात’ (कुरैशजणांची देवता) च्या आदर आणि रक्षणार्थ आम्ही जवळपासच्या सर्वांनाच गोळा करून एक भव्य आणि सशस्त्र लष्कर तयार करू व घोड्यांवर स्वार होऊन लवकरच तुमचा नायनाट करणार आहोत. मस्जिदींना जमीनदोस्त करू. सोबत मदीनाच्या कमाईचा निम्मा भाग खंडणीच्या स्वरुपात मक्कावासियांना द्यावा.’ प्रेषित मुहम्मद(स) यांनी सुद्धा अतिशय कडक शब्दात या पत्राचे उत्तर दिले होते.
  3. दुसरी महत्त्वाची बोधात्मक बाजू अशी की, इस्लाम धर्मतत्त्वात सल्लामसलतीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रेषित मुहम्मद(स) यांनी जर लोकांना आदेश दिला असता की, मदीना शहरातच युद्धासाठी तयार व्हा, तर कोणीही या आदेशाची अवज्ञा करण्यासाठी धजावले नसते. परंतु ईश्वरी आदेशानुसार सल्लामसलत करण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक होते.

मस्जिदमध्ये प्रेषितसोबत्यांची आम सभा घेण्यात आली. प्रेषित मुहम्मद(स) यांनी संपूर्ण प्रकरण त्यांच्यासमोर चर्चेसाठी ठेवले. तसेच स्वतःचा सल्लादेखील दिला की, ‘मदीना’ शहरात राहूनच शत्रूला धूळ चारू या. परंतु असे मुळीच म्हटले नाही की, सभेतील सर्व उपस्थितांनी आपापली तोंडे बंद ठेवून कोणताही सल्ला न देता आपला आदेश स्वीकारावा. कारण इस्लाममध्ये विचार आणि भूमिकास्वातंत्र्यास खूप महत्त्व आहे. प्रेषितांचे सर्वच अनुयायी प्रेषितांच्या अगदी एका इशार्यावर आपले प्राण बलिदान करायला एका पायावर तयार असत. ईश्वरी आदेशावर आपले सर्वस्व अर्पण करण्यातच आपले सौभाग्य समजत. तरीसुद्धा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आपल्या अनुयायांचा सल्ला अवश्य घेत असत. या सभेत बर्याच अनुयायांनी उघडपणे व जोशपूर्ण भाषण दिले. बहुतेकजणांनी प्रेषितांशी असहमती दर्शविली. ‘माननीय खुसैमा(र)’, ‘अबू साद(र)’, ‘नोअमान बिन मालिक(र)’ आणि ‘साद बिन उबादा(र)’ यांचा असाच दृष्टिकोन होता. तसेच ‘माननीय हमजा(र)’ यांनीसुद्धा मदीनाबाहेरच लढण्याची भूमिका व्यक्त केली होती. ‘माननीय अयास बिन अतीक(र)’ यांनी असे मत मांडले होते की, जर मदीना शहरात युद्ध केले तर लोक आपणावर टीका करतील की, आपण शत्रूच्या सैन्यास मदीनात घेरून पराभूत केले. तसेच शत्रूचे सैन्य आपल्या शेती व बागा नष्ट करतील.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या अनुयायांच्या परखड भूमिकेचा आदर करून हेच मत स्वीकार केले. मग मस्जिदमध्ये जाऊन सामरिक पोषाख परिधान केला.

  1. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची अशी प्रणाली होती की, आपल्या विविध सोबत्यांचे विशेष कौशल्य ओळखून त्यांच्या परीने त्यांच्यावर जवाबदार्या सोपवीत असत. त्याचप्रमाणे इस्लामी सैन्याचे कायमस्वरुपी सरसेनापती वास्तविकरीत्या स्वतःच असून युद्धप्रसंगी लष्करप्रमुखपदाची जवाबदारी ‘माननीय जुबैर बिन अव्वाम(र)’ यांना सोपविली होती. ‘माननीय मुसअब बिन उमैर(र)’ यांच्या हाती इस्लामी लष्कराचे ध्वज दिले.
  2. ‘शीखीन’ या ठिकाणी लष्करास पंक्तीबद्ध करून प्रेषितांनी लष्कराचे निरीक्षण केले. लष्करात सामील असलेल्या ‘जैद बिन साबित(र)’, ‘अबुसईद खुदरी(र)’, ‘उसैद बिन जुबैर(र)’, ‘बरा बिन आजब(र)’, ‘अजाया औसी(र)’ यासारख्या किशोरवयीन मुलांना लष्करातून परत पाठविले. ‘राफेअ बिन खदीज(र)’ या किशोरवयीन सैनिकाने प्रेषितांची नजर चुकवून सैन्यात प्रवेश मिळविला. प्रेषित मुहम्मद(स) जेव्हा लष्कराचे निरीक्षण करीत होते तेव्हा त्यांनी आपल्या पंजावर उभे राहून उंची दर्शवून प्रेषितांची नजर चुकविली. हे पाहून ‘समुरा बिन जुंदब(र)’ या किशोरवयीन सैनिकाने ‘राफेअ बिन खदीज(र)’ यांची चाल ओळखून प्रेषितांची तत्काळ भेट घेतली आणि डोळ्यांत पाणी आणून सांगितले की, ‘मी राफेअ ला कुस्तीमध्ये कित्येकदा हरविलेले असूनही आपण त्यांना लष्करात भरती करून मला वंचित ठेवीत आहात.’ प्रेषितांनी त्यांच्या विनंतीवरून दोघांची कुस्ती लावली. ‘समूरा बिन जुन्दुब(र)’ यांनी ‘राफेअ बिन खदीज(र)’ यांना खरोखरच कुस्तीत हरविले. त्यामुळे प्रेषितांनी त्यांनाही लष्करात भरती करून घेतले.

या घटनेवरून स्पष्ट होते की, युद्धासारख्या भयानक आगीत उडी घेण्यासाठी इस्लामी आंदोलनातील तरूणांमध्ये किती प्रखर भावनांच्या ज्वाला भडकत होत्या. हाच ईश्वराची प्रसन्नता मिळविण्याचा एकमेव मार्ग असल्याने ऐहिक जीवन आणि प्राणाचा बळी देण्याची किती प्रखर भावना त्यांच्यात होती.

  1. ‘मदीना’वरून ‘जिहाद’ (धर्मयुद्ध) साठी कूच करताना आदरणीय प्रेषितांनी मदीनावासीयांना नेतृत्वहीन आणि वार्यावर न सोडता ‘माननीय अब्दुल्लाह इब्ने मक्तूम(र)’ यांना मदीनाची जवाबदारी सोपविली. यावरून प्रेषितांच्या दृष्टिकोनात अनुशासन व व्यवस्थेचे असलेले महत्त्व लक्षात येते.
  2. ‘शीखीन’ या ठिकाणी इस्लामी लष्कर पोहोचल्यावर दांभिकांचा सरदार ‘इब्ने उबै’ हा आपल्या तीनशे दांभिकजणांना घेऊन लष्करातून विभक्त झाला. अर्थात प्रेषितांचे संख्याबळ तीस टक्क्यांनी घटले. तरीपण प्रेषित किचितही डगमगले नाहीत.

कपटाने आणि दंभाने ओतप्रोत असलेली ही ऐनवेळेवर साथ सोडण्याची वृत्ती इस्लामी इतिहासात आपले स्थायी महत्त्व बाळगून आहे. धर्माचे नियम व आदेश याची कसोटी नसून पृथक होण्यासाठी एखादा कोणतेही किरकोळ नियम पुरेसा आहे. प्रत्येक बिदूवर मतभेद असूनसुद्धा संघटनप्रमुखाच्या निर्णयावर प्राणाची आहुती देण्यास विशेष महत्त्व आहे. प्रमुखाच्या अंतिम निर्णयाचा स्वीकार न केल्यास कोणतीही व्यक्ती संघटनव्यवस्थेत बसत नाही आणि अशा परिस्थितीत संघटन चालविणे अशक्य असते. धर्म प्रस्थापनेसाठी तयार झालेल्या संघटनांची अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था असेल आणि सामूहिकरीत्या लोक निष्ठावंत असतील, तसेच कुरआन आणि हदीस (प्रेषित जीवनचरित्र) नुसार एखादा प्रश्न चर्चेच्या ऐरणीवर असेल, अशा प्रसंगी त्याच्याशी मतभेद करून विभक्त होणे हे एक अनावश्यक कृत्य आहे आणि अशा प्रकारे संघर्षाच्या अतिशय नाजुक प्रसंगी विभक्त होणे हे तर दांभिकता अर्थात वरून वरून इस्लामच्या समर्थनाचा देखावा आणि मनात मात्र इस्लामशी वैर बाळगण्याचाच गुण असू शकतो. कोणत्याही व्यक्ती किवा समुदायाचा अहं हा एवढा आसुरी व शक्तिशाली असणे की त्याच्यावर संघटन आणि सामुदायिक हिताचा बळी द्यावा, ही वृत्ती म्हणजेच अतिशय मोठा मानसिक रोग होय. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्ती अथवा नेत्याशी व्यक्तिगत मतभेदाचा वचपा संघटन किवा आंदोलनास वेठीस धरून काढणे ही अतिशय भयानक बाब होय.
‘अब्दुल्लाह बिन उबै’ याने नेमके हेच केले की, आपली भूमिका अहंच्या उन्मादात एवढी महत्त्वाची समजली की, संघटन आणि आंदोलनासाठी अगदी युद्धाच्या मैदानात उतरल्यावर नाजुक परिस्थिती निर्माण करून इस्लामवर संकट आणले. मुळात हा माणूस दंभ आणि कपटाचाराने ग्रस्त होता. अशा प्रकारच्या रोगाने ग्रस्त असलेला माणूस कामात बाधा आणण्यासाठी निमित्तच पाहत असतो.
अशी माणसे स्वस्थ व निरोगी सामूहिकतेतून विभक्त होतात खरे. परंतु आपणच स्वतःहून तयार केलेल्या नियमांनुसारसुद्धा एखादे कार्य करून दाखवू शकत नाहीत. ‘अब्दुल्लाह बिन उबै’ आणि त्याच्या तीनशे साथीदारांचा इतिहासात कोणताच कारनामा सापडत नाही. केवळ एवढेच श्रेय त्यांना मिळते की, ईश्वरचे प्रेषित आणि त्यांच्या अनुयायांच्या कामात त्याने खूप अडथळे आणले.
दुसरीकडे ईश्वर व प्रेषितांवर श्रद्धा राखणार्यांचे चारित्र्य मोठा आदर्श आहे. अगोदरच त्यांची संख्या आणि शस्त्रशक्ती शत्रूच्या तुलनेत कमी होती आणि अगदी अंतिम क्षणी या अल्प शक्तीमधूनसुद्धा तीनशेजण त्यांच्यातून विभक्त होऊनसुद्धा त्यांच्या श्रद्धा, निश्चय आणि संकल्पांत काहीच फरक पडला नाही.
युद्ध सुरु होण्यापूर्वी ज्या वेळी दोन्ही सैन्य समोरासमोर उभे होते, तेव्हा ‘मदीना’ शहराचा सर्वांत प्रिय असलेला माणूस ‘अबू आमिर’ मैदानात उतरला. ‘औस’ कबिल्याचा हा माजी सरदार मोठा वैरागी आणि संन्यासी समजला जात असे. मदीना शहरात जेव्हा लोकांनी विद्युतगतीने इस्लामचा स्वीकार केला, तेव्हा या माणसाचा खूप जळफळाट झाला. त्याच्या याच द्वेषभावनेमुळे तो मक्कातील इस्लामद्रोह्यांना जाऊन मिळाला. त्याचे वैराग्य आणि शिकवणींचा प्रेषित मुहम्मद(स) यांच्या निसर्गसिद्ध शिकवणीशी मेळ साधत नव्हता आणि लोकांनी त्याच्या वैराग्याच्या शिकवणी झुगारून प्रेषित मुहम्मद(स) यांच्या समाजात प्रामाणिकपणे जगण्याच्या आणि अतिशय व्यावहारिक शिकवणींचा स्वीकार केला. यामुळेच त्याच्या द्वेषभावना भडकल्या. त्याच्या याच दुष्कृत्यामुळे त्याच्या तथाकथित आत्मिक संमोहनाचे साम्राज्य विस्कळीत झाले आणि मदीनावासी त्यास ईशद्रोही व प्रेषितद्रोहीच्या नावाने संबोधू लागले.
खरे ‘‘पाहता ‘अबू आमिर’ या वैराग्याने कुरैशजणांना विश्वास दिला होता की, ‘औस’ कबिल्याचे लोक माझ्यावर इतका विश्वास करतात की मी मैदानात उतरताच ते सर्वजण प्रेषितांच्या विरोधात माझे समर्थन करतील.’’ पंरतु ज्या वेळी तो मैदानात उतरला तेव्हा ‘औस’ कबिल्याचे सर्वजण त्याचे समर्थन करण्याऐवजी त्याला धिक्कारताना म्हणाले, ‘‘हे ईश्वराच्या गुन्हेगारा! तुझा नेहमीच जळफळाट होत राहील. तुझ्या मनास कधीच शांती मिळणार नाही!’’
हे ऐकून त्याची पार निराशा झाली आणि अपमानाचे घोट गिळून तो कुरैशजणांत परतून म्हणाला, ‘‘माझ्या गैरहजेरीमुळे त्यांचे कदाचित विचार बदलले.’’
आपली विचारचळवळ अयशस्वी सिद्ध झाल्यावरसुद्धा त्याला मूळ सत्याचा उलगडा झाला नाही. विश्वासु धार्मिक जणांपासून विभक्त होऊन निधर्मी जणांना जाऊन मिळणारा प्रत्येकजण हा बाजारात बाद झालेल्या खोट्या नाण्यासारखा असतो. त्याचे काही एक चालत नाही.
‘उहुद’च्या युद्धात मुस्लिमांना अतिशय कठीण आणि प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जावे लागले. त्यांच्यावर भयानक संकटे आली. तरीसुद्धा त्यांच्यात किचितही दौर्बल्य आले नाही. त्यांनी शौर्य, साहस, त्याग आणि बलिदानाची अप्रतिम उदाहरणे सादर केली.
युद्धाच्या पहिल्याच फेरीत शत्रूच्या अवाहनावर ‘माननीय अली(र)’, ‘साद बिन अबी वक्कास(र)’, ‘आसिम बिन साबित(र)’ आणि ‘हमजा(र)’ यांनी शत्रूपक्षाच्या ध्वजधारकांसहित पाच सरदारांना यमसदनी धाडले. ‘माननीय अबू दुजाना(र)’ यांना हे सौभाग्य मिळाले की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्यांना आपली विशेष तलवार प्रदान केली होती. तसेच ही शिकवणसुद्धा देण्यात आली होती की, कोणत्याही मुस्लिमास याचा त्रास होऊ नये आणि कोणताही शत्रू यातून निसटू नये. मग ‘माननीय अबू दुजाना’ यांनी याच तलवारीने शत्रूंचा फडशा पाडला. अशा प्रकारे सर्वच मुस्लिम सैन्य शत्रूशी जिकिरीचा लढा देत होते आणि मुस्लिम सैन्याच्या पारड्यात यश पडण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली.
‘माननीय मुसअब बिन उमैर(र)’ या तरूण सैनिकाच्या हाती इस्लामी ध्वज होता. शत्रूने त्यांच्या हातावर वार केला, त्यांनी तत्काळ दुसर्या हातात झेंडा सांभाळला. शत्रूने दुसर्या हातावरही वार केल्यावर त्यांनी दोन्ही तुटलेल्या हातांनी झेंड्यास छातीशी कवटाळले. शेवटी त्यांना शहीद करण्यात आल्यावर आळीपाळीने इतरांनी इस्लामी ध्वज सांभाळला.
इस्लामी झेंड्यास आपल्या छातीशी कवटाळून धरणारे ‘माननीय मुसअब बिन-उमैर(र)’ हे इस्लाम स्वीकारण्यापूर्वी खूप थाटात जगत होते. तरूण, देखणे व अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. उंची वस्त्र परिधान करणे, सुगंधाचा वापर करणे आणि उच्च राहणीमान ठेवण्याचा त्यांना खूप छंद होता. परंतु इस्लाम स्वीकारल्यानंतर त्यांच्या अंगावर केवळ एकच चादर होती. युद्ध संपल्यावर प्रेषितांना त्यांच्या मृत शरीरास पाहताच रडू कोसळले. चादरही एवढीच होती की, पायावर झाकल्यास चेहरा उघडा पडत आणि चेहरा झाकल्यास पाय उघडे पडत. चेहर्यावर चादर घालून त्यांचे पाय गवताने झाकण्यात आले.
मक्काहून आलेल्या इस्लामद्रोही लष्कराचे सैनिक जेव्हा जीव मुठीत धरून सैरावैरा पळू लागले आणि त्यांच्यासोबत प्रेरणागीत म्हणणार्या सरदारांच्या बायकांनी जेव्हा पर्वतावर आश्रय घेतला, तेव्हा मुस्लिम सैन्यास वाटले की, आता शत्रू पराभूत झाला आणि त्यांनी शत्रू सैन्याची संपत्ती समेटण्यास सुरुवात केली. ‘माननीय अब्दुल्लाह बिन जुबैर(र)’ यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या टोळीतील काहीजणसुद्धा शत्रूची संपत्ती समेटण्याच्या धुंदीत लागले. ‘माननीय अब्दुल्ललाह बिन जुबैर(र)’ यांनी त्यांना रोखण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु व्यर्थ! मुस्लिम सैन्यांची हीच गफलत पाहून शत्रूसैन्याने त्यांच्यावर मागून जोरदार हल्ला चढविला आणि ‘माननीय अब्दुल्लाह बिन जुबैर(र)’ यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या टोळीचा खातमा करून पुढे वाटचाल केली. मुस्लिम लष्कराची हीच अवज्ञा होती. कारण काही जरी झाले तरी या ठिकाणावरून किचितही न हलण्याचे आदेश त्यांना प्रेषितांनी दिले होते. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मुस्लिम सैन्य विचलित झाले आणि पूर्ण व्यवस्थापनच कोलमडले. समोर येईल त्याच्यावर मुस्लिम सैनिकांनी याच गडबडीत तलवार चालवून कित्येकांचे रक्त सांडले.
यावरून हेच स्पष्ट होते की, ईश्वराच्या दृष्टिकोनात असा कोणताच आवडता आणि लाडका समुदाय नाही की चुका केल्यावर आणि प्रेषितांची अवज्ञा करूनही ईश्वर त्यास यश प्रदान करेल. चूक करणार्यास निश्चितच चुकांची शिक्षा भोगावी लागणार. मग गुन्हेगार मुस्लिम असो की इतर कोणीही असो. धनाचा लोभच मुळात एवढी मोठी चूक होती की, युद्धाचा परिणाम पार बदलून गेला.
शिक्षा केवळ एवढीच मिळाली नसून या शिक्षेच्या सीमा आणखीन विस्तारल्या. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) सुद्धा घायाळ झाले.
शिक्षा आणि तंबीचा तिसरा पैलू असा होता की, ‘सैन्याचे ध्वजधारक ‘माननीय मुसअब बिन उमैर(र)’ यांच्या आणि प्रेषित मुहम्मद(स) यांच्या चेहर्यात साम्य असल्याने ‘माननीय मुसअब(र)’ जेव्हा शहीद झाले तेव्हा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) शहीद झाल्याची अफवा उडाली आणि यामुळे प्रेषितांचे अनुयायी विचलित झाले. त्यांच्यात अशी भावना निर्माण झाली की, ज्या अर्थी प्रेषितच शहीद झाले तेव्हा आपण लढून आणि जगून तरी काय करणार? ही भावना निर्माण होणे एका दृष्टीने स्वभाविकच होते. कारण शत्रूसैन्यात घेरले गेलेल्या मुस्लिम सैन्याची प्रेरणाशक्ती हे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हेच असून त्यांच्यासाठीच हे सर्वकाही चालू होते. नेता संपला, नेतृत्व संपले, आंदोलन संपले. जे आंदोलन चालू ठेवण्यासाठी जीवन जगत होतो आणि संघर्ष करीत होतो, त्याचा हेतुच संपला. म्हणून मुस्लिम सैन्यात पार निराशा निर्माण झाली. तलवारी बेकाबू झाल्या. आपला मित्र आणि शत्रूमधील फरकसुद्धा समजत नव्हता. समोर येईल तो तलवारीच्या फटक्यात येत होता. परंतु निराशा आणि कर्मत्यागाच्या मार्गावर नेणार्या कोणत्याही दृष्टिकोनास इस्लामी आंदोलनात मुळीच स्थान नाही. मग यामागे कोणतीही स्वाभाविक भावना का असेना.
या संपूर्ण संकटमय परिस्थितीत ‘माननीय अनस बिन मालिक(र)’ यांनी मुस्लिम योद्ध्यांना जोरदारपणे अवाहन केले की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) शहीद झाल्यास आपणच जगून काय करायचे? प्रेषित शहीद झाले तरी ईश्वर तर सदा जीवित आहे. मग आपण संपूर्ण शक्तीनिशी शत्रूला झुंज देऊन शहीद होऊन प्रेषित व ईश्वराला जाऊन भेटू या!!!’’ आणि या आवाहनामुळे मुस्लिम लष्कर आवेशाने लढू लागले. एवढ्या प्रेषित जीवित असल्याची खूशखबर मुस्लिम लष्करास मिळाली.
याच प्रसंगी दिव्य कुरआनचा ईश्वरी आदेश अवतरला,
‘‘आदरणीय मुहम्मद(स) या जगात शाश्वत जीवन घेऊन आलेले नसून ते ईश्वराचे प्रेषित असण्याव्यतिरिक्त शारीरिक दृष्टीने मानवी अस्तित्व आहेत. त्यांनाही मृत्यू ओढाऊ शकतो. प्रेषित हे काही अनैसर्गिक जीव नसून त्यांच्या पूर्वीसुद्धा प्रेषित आले आणि मृत्यू पावले. (त्यांच्यापैकी काहींची हत्यासुद्धा करण्यात आली) मग तुम्ही प्रेषितांचे भौतिक देह नष्ट झाल्यास त्यांच्यावरील श्रद्धा सोडून, प्रेषितांनी तुमच्यापर्यंत पोहोचविलेले धर्म, आंदोलन व संघर्ष सोडून उलट्या पावलांनी पळून जाल काय? ईश्वर जर (स्थायीस्वरुपी जीवित आणि कायम आहे, तसेच सत्यधर्म बाकी असून त्याच्या प्रस्थापनेची मोहीम जर चालू आहे, तर तुमची सर्वस्वी शक्ती त्यातच खर्च व्हायला पाहिजे आणि तेही प्रेषित हयात असताना व त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा!’’(संदर्भ : दिव्य कुरआन, आले इम्रान, १४४)
यावरून स्पष्ट होते की, प्रेषितांचे मूळ कार्य हे सदा जीवित असलेल्या ईश्वराशी मानवाचा संबंध सत्यधर्माच्या नियमांवर मजबूत करणे होय. मुळात या सत्यधर्माचा प्रत्येक भाग मानवी समूहास ईश्वर आपल्या वाणीच्या आधारे (दिव्य कुरआनच्या आधारे) अवतरित करीत असतो आणि ईश्वराचा प्रेषित याच ईश्वरी आदेशास अर्थात दिव्य कुरआनच्या शिकवणीस आपले कथन आणि कर्माच्या माध्यमाने स्पष्ट करीत असतो. तसेच केवळ ईश्वराचीच उपासना करण्याची शिकवण देतो. कारण उपासना हा केवळ ईश्वराचाच अधिकार आहे. कोणताही प्रेषित आपल्या अनुयायांना या गोष्टीची मुळीच शिकवण देत नाही की, मानवाने प्रेषितांची उपासना व भक्ती करावी. आणि अशी शिकवणही देत नाही की, प्रेषिताचा मृत्यू झाल्यास भक्ती आणि आज्ञापालनाच्या अनेकानेक अनिवार्य आणि अभीष्ट स्वरुपांना सोडून द्यावे. सत्यधर्माचा त्याग करावा. प्रेषित हा आपली शिकवण, प्रचार, जीवनपद्धत व आचरणाच्या माध्यमाने ईशपरायण जीवनाच्या संपूर्ण गरजा व मागण्याचे संकलन करून जातो. तसेच जोपर्यंत त्याचा वारसा बाकी राहतो, तोपर्यंत त्याच्या प्रेषितत्वाचा काळ चालु राहतो. अर्थातच त्याच्या प्रेषितत्वाचा काळ आणि त्याच्या प्रेषितत्वाचे अधिकार त्याच्या दैहिक मृत्यूमुळे नष्ट होत नाही.

  1. संकटाच्या या वादळी परिस्थितीत ‘माननीय काब(र)’ यांनी सर्वप्रथम प्रेषित मुहम्मद(स) यांना ओळखून मुस्लिम लष्करास आवाहन केले की, ‘मुस्लिमांनो! प्रेषित मुहम्मद(स) जीवित आहेत.’ प्रेषितांनी इशार्याने त्यांना मनाई केली तरीसुद्धा ही वार्ता वार्यासारखी पसरली.
  2. या प्रसंगीच्या काही घटनांवरून मुस्लिम सैनिकांच्या शौर्यभावनाव्यतिरिक्त प्रेषित मुहम्मद(स) यांच्यावर असणार्या अप्रतिम स्नेह आणि प्रेमाचे स्पष्टीकरण देतात.

मुस्लिम सैन्य ज्या वेळी विचलित झाले आणि प्रेषित आपल्या काही अनुयायांच्या दरम्यान एकटेच राहिले तेव्हा शत्रूलष्कराने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. अशा प्रसंगी ‘माननीय जयाद बिन सकन अन्सारी(र)’ हे आपल्या पाच अनसारी सवंगड्यांसह आले आणि प्रेषितांसमोर उभे राहून शत्रूचा प्रत्येक वार आपल्या शरीरावर झेलत प्रेषितांचे रक्षण करताना शहीद झाले. त्यांच्यासोबत पाचही सवंगडी शहीद झाले. ‘माननीय तलहा(र)’ यांच्या शरीरावर प्रेषितांच्या रक्षणास्तव सत्तर गंभीर जखमा झाल्या. प्रेषितांवर होणार्या बाणांचा वर्षाव रोखण्यासाठी शत्रूचे सर्व बाण आपल्या पाठीवर झेलले. ‘माननीय कतादा बिन नोअमान(र)’ यांनी प्रेषितांच्या चेहर्यावर येणारा बाण आपल्या चेहर्यावर झेलला व त्यामुळे त्यांचा एक डोळा फुटला. ‘माननीय साद बिन अबी वक्कास(र)’ यांनी शत्रूवर बाणांचा वर्षाव करून प्रेषितांवरील संकट टाळले. प्राणांची बाजी लावून प्रेषितांचे रक्षण करणार्यांत स्त्रिया देखील मागे नव्हत्या. ‘माननीय उम्मे अम्मारा(र)’ या ‘उक्बा’ स्थळावरील इस्लाम दीक्षा कार्यक्रमात हजर होत्या. जखमी सैनिकांना त्या पाणी पाजत होत्या. शत्रू प्रेषितांवर हल्ला करण्यासाठी येत असताना त्या तलवार घेऊन ‘कमीआ’ या शत्रूवर तुटून पडल्या. त्यांच्या या हल्ल्यामुळे ‘कमीआ’ पळून गेला. ‘माननीय उम्मे अम्मारा(र)’ यांच्या शरीरावर तेरा जखमा झाल्या होत्या. प्रेषित मुहम्मद(स) यांनी माननीय उम्मे अम्मारा(र) यांना शुभवार्ता दिली की माननीय उम्मे अम्मारा(र) यांना अंतिम निवाड्याच्या दिवशी माझे स्नेह लाभेल.

  1. महिलांचा उत्साह आणि जोश या ठिकाणी अतिशय वाखाणण्यायोग्य आहे. ‘माननीय हिद अन्सारिया(र)’ त्यांना सूचना मिळाली की, त्यांचे बंधु युद्धात शहीद झाले. थोड्या वेळानंतर सूचना मिळाली की, त्यांचे वडील शहीद झाले आणि मग परत सूचना मिळाली की, त्यांचे पतीसुद्धा शहीद झाले. भाऊ, वडील आणि पती शहीद झाल्यावरसुद्धा त्यांनी आपले अनावर झालेले दुःख व्यक्त होऊ दिले नाही. कोणाचीही खबर न विचारता त्यांनी व्याकूळतेने विचारले की, ‘ईश्वराचे प्रेषित कुशल आहेत काय?’ त्यांना प्रेषित कुशल आणि सुरक्षित असण्याची खबर मिळाली तेव्हा समाधान झाले आणि मुखातून भावनिक उद्गार निघाले,
  2. ‘‘प्रेषित सुरक्षित असल्यास आता कोणत्याही गोष्टीची काहीच चिता नाही!’’
    त्याचप्रमाणे ‘माननीय हमना बिन्त जहश(र)’ यांचे पती, पिता आणि मामा शत्रूंशी झुंज देताना शहीद झाले. त्यांनी मोठ्या संयमाने आणि आपल्या श्रद्धेच्या बळावर हे दुःख सहन केले. मदीना शहरात ‘उहुद’च्या युद्धाची वार्ता पसरताच ‘माननीय फातिमा(र)’ सहित बर्याच महिला ‘उहुद’पर्यंत पोहोचल्या. मदीना शहरातील एकही घर असे सुटला नाही की ज्या घरातील एखादा माणूस शहीद झाला नसेल.
  3. दोन्ही पक्षातील नैतिक फरक खूप मोठा आणि महत्त्वाचा दिसून येतो. मुस्लिम सैन्याच्या आणि शत्रूसैन्याच्या नैतिक वर्तनात मोठी तफावत आढळून येते. ‘माननीय दुजाजा(र)’ यांना प्रेषितांनी तलवार प्रदान केली होती. शत्रूपक्षाचा सरदार ‘अबू सुफियान’ ची पत्नी ‘हिंदा’ ‘अबू दुजाना(र)’ यांच्या कचाट्यात सापडली. त्यांनी तिच्या डोक्यावर वार करण्यासाठी तलवार उगारली, परंतु अचानक त्यांच्या मनात एक विचार येऊन धडकला की, ही तलवार प्रेषितांनी प्रदान केलेली आहे. कोणत्याही अबलेच्या रक्ताने रंगता कामा नये. तर दुसरीकडे ‘माननीय हमजा(र)’ यांच्यावर हल्ला करणारा शत्रू ‘वहशी’ हा दगडाच्या आड बसला होता आणि त्याने अचानक त्यांच्यावर भ्याड हल्ला केला.
  4. दुसरे नैतिक अंतर असे की शत्रूपक्षाचा सरदार ‘अबू सुफियान’ च्या पत्नीने आणि इतर शत्रूसैनिकांनी शहीद झालेल्या मुस्लिम सैनिकांच्या शवांची विटंबना केली. ‘माननीय हमजा(र)’ यांची छाती कापून त्यांचे काळीज आपल्या दातांनी चावले. नाक, कान कापून त्याचे हार गळ्यात घालून आपला आसुरी आनंद साजरा केला. परंतु मुस्लिम सैन्याने पराभूत शत्रूपक्षाच्या सैनिकांच्या शवांचा कधीच अनादर केला नाही.

  5. शत्रू पक्षातला मदीनावासी असलेला ‘औस’ कबिल्याचा माजी सरदार ‘अबू आमिर’ वैरागीच्या चारित्र्याच्या तुलनेत मुस्लिम सैनिक असलेले ‘माननीय उसैरम(र)’ यांचे चरित्र येथे पाहण्यासारखे आहे. ‘माननीय उसैरम(र)’ हे तर ‘ज्यूडिश’ समाजाचे होते. ‘ज्यू’ समाज मुस्लिमांविरुद्ध असूनही हे मात्र नेक आणि प्रामाणिक स्वभावाचे होते. त्यांनी ‘ज्यू’ समाजाच्या लोकांना कित्येकवेळा जाणीव करून दिली होती की, ‘ज्यू’ समाजाने प्रेषितांशी जो समझोताकरार केला होता, त्याचे पालन करणे आवश्यक आहे. ते खजुरी खाता खाता युद्धभूमीकडून जात होते. त्यांनी युद्धपरिस्थिती पाहताच प्रेषितांची भेट घेऊन विचारले, ‘‘आपल्या समर्थनार्थ लढताना प्राणाचा बळी गेल्यास मला काय मिळेल?’’
  6. ‘‘स्वर्ग!’’ प्रेषित मुहम्मद(स) तत्काळ उत्तरले. त्यांनी तत्काळ तलवार सांभाळली आणि शत्रूसैन्यात घुसले. लढता लढता शहीद झाले.

  7. निश्चितच काही चुकांमुळे हातात आलेला विजय निसटला. परंतु या पराभवास पराभव म्हणणे चुकीचे ठरेल. कारण मुस्लिम सैन्याने अजूनही रणभूमी सोडली नव्हती आणि ‘अबू सुफियान’ आपले लष्कर घेऊन निघून गेला. त्याला या गोष्टीची चांगल्या प्रकारे कल्पना होती की, आपला विजय हा एक योगायोग आहे. मग ‘रौहा’ या स्थानावर पोहोचल्यावर ‘कुरैश’च्या काही बड्या नेत्यांनी या प्रकरणावर विचार केल्यावर असा निर्णय घेण्यात आला की, आपण येथून परत जाऊन ‘मदीना’ शहरावर अकस्मात हल्ला चढवू या. परंतु ‘सफवान बिन उमैया’ ने सल्ला दिला की, ‘या वेळी प्रेषित मुहम्मद(स) यांचे सैनिक ‘जिहाद’ ने प्रेरित आहेत. त्यामुळे ते प्राणपणाला लावून आपला सामना करतील व आपल्या पदरी पराभवाचे खापर येतील. तेवढ्यात त्यांना अशी गुप्त सूचनासुद्धा मिळाली की प्रेषित मुहम्मद(स) तुमचा पाठलाग करीत आहेत. ही सूचना मिळताच शत्रूंचा म्होरक्या ‘अबू सुफियान’ने आपले लष्कर घेऊन मक्का शहर गाठले.

‘उहुद’च्या युद्धातील या बोधात्मक बाबींवरून हे स्पष्ट होते की, या युद्धात स्वतः आदरणीय प्रेषितांनी केलेल्या नेतृत्वात या क्रांतिकारी प्रयत्नांचे कोणकोणते महत्त्व होते. ‘उहुद’चे युद्ध हे प्रेषितांच्या क्रांतीच्या इतिहासाचा मोठा आणि महत्त्वाचा अध्याय होय. यामध्ये आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या व्यक्तिमत्त्व आणि शिकवणीचे कौशल्य स्पष्ट होते.

संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *