Home A प्रेषित A ‘उहुद’चे ऐतिहासिक युद्ध

‘उहुद’चे ऐतिहासिक युद्ध

‘सवीक’च्या युद्धानंतर मक्का सरदार ‘अबू सुफियान’ची मुस्लिमांचा वचपा काढण्याची शपथदेखील वरवर पूर्ण होताना दिसत असली तरी ‘माननीय जैद बिन हारिसा(र)’ यांच्या हातून व्यापारी काफिल्याशी लढाई होऊन एक लाख दिरहमचे जे नुकसान झालेले होते आणि ‘बद्र’च्या युद्धात कैदी सोडविण्यासाठी जे अडीच लाख दिरहम मोजावे लागले होते, त्यामुळे मक्का शहरात प्रेषित मुहम्मद(स) आणि मुस्लिमांविरुद्ध संताप धुमसत होता. अबू सुफियानवर मदीनावर हल्ला करण्यासाठी सतत दबाव येत होता. त्यामुळे अबू सुफियानने मदीनावर हल्ला करण्याची घोषणा केली.
‘बद्र’च्या युद्धप्रसंगी सीरिया देशातून आणलेले-व्यापारी सामान आणि त्या व्यापारातून मिळालेला नफा हा मुस्लिमांविरुद्ध लढण्यात येणार्या युद्धासाठी सामरिक कोशात जमा होता. या शिवाय लोकांकडून भरपूर प्रमाणात वर्गणी गोळा करण्यात आली. या युद्धाच्या तयारीसाठी मक्कावासीयांनी एक हजार उंट केवळ युद्ध सामग्रीच्या दळणवळणासाठी तयार ठेवले होते. प्रचंड संपत्ती खर्च करून युद्धाची जय्यत तयारी करण्यात आली होती. तीन हजार सशस्त्र सैनिक जमविण्यात आले. ‘अम्र जोम्ही’ आणि ‘मुसाफिह’ या दोन कवीनी संपूर्ण मक्का शहराचा दौरा करून सर्वांना युद्धासाठी प्रेरित केले. मक्कातून लष्कर रवाना करतेवेळेस स्त्रियांनीसुद्धा सैनिकांचा स्वाभिमान जागृत केला. या सैन्याने ‘उहुद’ पर्वताजवळील ‘ऐनैम’ या ठिकाणी पडाव टाकला.
‘बद्र’च्या युद्धानंतर प्रेषितांचे काका माननीय अब्बास(र) यांनी इस्लाम स्वीकारला होता. आदरणीय प्रेषितांच्या आदेशाने ते मदीनाऐवजी मक्केतच राहिले. त्यांनी आपल्या इस्लाम स्वीकृतीस गुप्त ठेवले होते. ते मक्कातील इस्लामद्रोह्यांवर गुप्त पाळत ठेवून त्यांचे इस्लाम व प्रेषिताविरुद्धचे कटकारस्थान प्रेषितांना खबर्यामार्फत कळवीत. त्यांनी ‘अबू सुफियान’च्या सामरिक योजनेची खबर द्रुतगती खबर्यामार्फत प्रेषितांना कळविली.
खबर मिळताच आदरणीय प्रेषितांनी ‘माननीय अनस(र)’ आणि ‘माननीय मुनिस(र)’ या दोघांना शत्रूसेनेचा तपास करण्यासाठी पाठविले. त्यांच्याकडून खबर मिळाली की, शत्रूचे सैन्य ‘मदीना’ राज्याच्या सीमेत दाखल झाले आणि आसपासच्या परीसरात गुराख्यांची हत्या करण्याचा सपाटा लावला. इकडे आदरणीय प्रेषितांनी आपल्या अनुयायांच्या सल्लामसलतीने सैन्य तयार करून आणि स्वतःही सामरिक पोषाख धारण करून ‘मदीना’ शहराबाहेर शत्रूंचा समाचार घेण्यासाठी बाहेर आले.
तो हिजरी सन ३ च्या ‘शब्वाल’ महिन्याचा सहा तारखेचा शुक्रवारचा दिवस होता. ‘माननीय इब्ने मक्तम(र)’ यांच्यावर ‘मदीना’ शहराची जवाबदारी सोपवून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी एक हजार मुजाहिदीन (धर्मयोद्धे) ची फौज घेऊन मदीनाहून ‘उहुद’कडे कूच केले. वाटेतच ‘शौत’ या ठिकाणी पोहोचताच ‘इब्ने उबई’ हा तीनशे दांभिकांना घेऊन इस्लामी सैन्यातून वेगळा झाला. सैन्याची साथ सोडण्याचे एवढेच निमित्त सांगितले की, त्याचा सल्ला प्रेषितांनी मान्य केला नाही. ‘इब्ने उबै’ हा दांभिकांचा सरदारच होता. वरवरून इस्लाम स्वीकारण्याचे सोंग घेऊन छुप्यारीतीने इस्लामी आंदोलनात संकटे आणणेच त्यांचा हेतु असे. याकरिता ऐनवेळेवर त्याने तीनशे दांभिक सैन्यातून वेगळे केले. आता प्रेषितांसोबत केवळ सातशे सैनिकांचीच फौज शिल्लक राहिली. या सातशेजणांना घेऊन प्रेषितांनी या ठिकाणीच पडाव घातला.
उत्तरार्ध्या रात्री आदरणीय प्रेषितांनी सैन्य घेऊन ‘उहुद’च्या मैदानाच्या जवळ आपल्या सैन्यासह ‘फज्र’ची (सूर्योदयापूर्वीची) ‘नमाज’ अदा केली. ही जागा मदीना शहरापासून चार मैल अंतरावर होती. आदरणीय प्रेषितांनी योजनेनुसार ‘उहुद’ च्या पर्वतामागे ‘माननीय अब्दुल्लाह बिन जुबैर(र)’ यांच्या नेतृत्वाखाली पन्नास धनुर्धारी सैनिकांची तुकडी नियुक्त केली. प्रेषितांना या तुकडीस आदेश दिला की, कोणत्याही परिस्थितीत हे स्थान सोडू नये.
आदरणीय प्रेषितांनी लष्कराचा झेंडा ‘माननीय मुसअब बिन उमैर(र)’ यांना सोपविला. ‘माननीय मुसअब बिन उमैर(र)’ यांनी इस्लाम स्वीकारण्यापूर्वी अतिशय श्रीमंतीत आणि वैभवसंपन्न परिस्थितीत जीवन व्यतीत केले होते. इस्लाम स्वीकारण्यामुळे त्यांना आपल्या सुखसंपत्तीचा त्याग करावा लागला होता. या युद्धामध्ये त्यांनी आपल्या जबरदस्त युद्ध कौशल्याचे प्रदर्शन केले. डाव्या बाजूला ‘माननीय जुबैर(र)’ आणि उजव्या बाजूला ‘माननीय मुंजिर(र)’ यांना सैन्याचे नेतृत्व सोपवून आपली तलवार ‘माननीय अबू दुजाना(र)’ यांना प्रदान केली. ‘माननीय अबू दुजाना(र)’ यांनी याच तलवारीने शत्रूंचा जबरदस्त समाचार घेतला.
इकडे इस्लामद्वेष्टे कुरैशजणांनी मक्कावरून तीन हजारांचे बलाढ्य लष्कर तयार केले होते. या लष्करात सातशे कवचधारी, दोन हजार घोडे आणि तीन हजार उंट आणि सोबत सैनिकांना युद्धप्रेरणा देण्यासाठी सरदारांच्या स्त्रियादेखील होत्या. या स्त्रिया योद्ध्यांना प्रेरित करण्यासाठी काव्य करीत सर्वप्रथम युद्ध मैदानात दाखल झाल्या. मग शत्रूफौजेतून ‘तलहा बिन अबी’ आपली तलवार उंचावत आणि मुकाबला करण्यासाठी आवाहन देत मैदानावर आला. त्याचा मुकाबला करण्यासाठी इस्लामी लष्करातून माननीय अली(र) पुढे आले. दोघांची लढत चांगलीच रंगली. माननीय अली(र) यांनी त्याचा फड्शा पाडला. माननीय हमजा(र) यांनी ‘उस्मान बिन अबी तलहा’ यास तलवारीच्या एकाच वारात यमसदनी धाडले. मग ‘मा. साअद बिन अबी वकास(र)’ यांनी बानाचा निशान साधून ‘अबी तलहा’ यास कंठस्नान घातले. त्यानंतर शत्रूकडून ‘मुसाफीह बिन तलहा’ मैदानात उतरला आणि ‘माननीय आसिम बिन साबित(र)’ यांनी त्याचा खातमा केला.
आता लढाईने जोर धरला ‘माननीय अबू दुजाना(र)’ यांनी तलवार घेऊन शत्रूच्या फौजेत घुसून त्यांची दानादान उडविली. ‘माननीय हमजा(र)’ यांनी आपल्या तलवारीने ‘सिबाअ बिन अब्दुल उज्जा’ यास ठार करून तलवारीची तृष्णा भागविली.
‘वहशी बिन हर्ब’ हा ‘जुबैर बिन मुतईम’ चा दास होता. त्याच्या मालकाने (जुबैर बिन मुतईमने) त्याच्याशी करार केला होता की, ‘माननीय हमजा(र)’ यांची हत्या केल्यास तो त्यास स्वतंत्र करील. त्याने दगडाच्या आडोशात दडी मारून अचानक ‘माननीय हमजा(र)’ यांच्या पोटात भाला आरपार केला. ‘माननीय हमजा(र)’ धरतीवर कोसळले. ईश्वराचे स्मरण करीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लढाईने उग्र रुप धारण केले. मुस्लिमांच्या जोरदार हल्ल्यामुळे ईशद्रोही ‘कुरैश’ सैन्याची दानादान उडाली. मुस्लिम लष्कर विजयाकडे वाटचाल करीत होते. युद्ध जिकण्याचे स्पष्ट संकेत दिसू लागले. लढाई अजून संपलेली नव्हती. तरीसुद्धा इस्लामी लष्कर गनीमतची संपत्ती (युद्धातील शत्रुची संपत्ती) समेटू लागले.
धनाचा लोभ आणि अनुशासनाच्या बेपरवाईमुळे हातात आलेले यश मुस्लिमांच्या हातून निसटले. प्रेषितांनी नियुक्त केलेल्या ठिकाणाहून काही सैनिक आपली जागा सोडून गनीमतची संपत्ती समेटू लागले. याच ठिकाणी आदरणीय प्रेषितांनी सैनिकांना जागा न सोडण्याचा आदेश दिला होता. यावरून आदरणीय प्रेषितांच्या युद्धनेतृत्व कौशल्याची कल्पना येते. मुस्लिम लष्कराने जागा सोडताच शत्रूसैनिकांच्या एका सेनापती ‘खालिद बिन वलीद’ (यांनी नंतर इस्लामचा स्वीकार करून इस्लामी शासच्या सीमा विस्तारित केल्या.)यांनी इस्लामी लष्करावर मागून जोरदार हल्ला चढवून इस्लामी लष्कराच्या अकरा सैनिकांना शहीद केले. पाठीमागून झालेल्या अकस्मात हल्ल्यामुळे ‘माननीय मुसअब बिन उमैर(र)’ या मुस्लिम सेनापतीचा बळी गेला. ‘माननीय मुसअब बिन उमैर(र)’ हे दिसायला प्रेषितांसारखेच होते. त्यामुळे प्रेषित मुहम्मद(स) शहीद (हुतात्मे) झाल्याची अफवा उडाली. या अती भयानक अफवेमुळे मुस्लिम सैनिकांचा मानसिक समतोल ढासळला. त्यांना मित्र आणि शत्रूंतील फरक समजेनासे झाले. समोर येईल तो तलवारीचा बळी चढत गेला. त्यात मुस्लिम सैनिकांच्या तलवारीस मुस्लिम सैनिकच बळी पडले.
‘खालिद बिन वलीद’च्या अचानक जोरदार हल्ल्याने मुस्लिम सैन्य विचलित झाले असले तरीही आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) जागेवरून किचितही हल्ले नाहीत. प्रेषितांच्या रक्षणार्थ ‘माननीय जियाद बिन सकन(र)’ हे पाच सैनिकांसह शहीद (हुतात्मे) झाले. माननीय साद बिन वकास(र) यांचा एक भाऊ ‘उत्बा’ ईशद्रोही लष्कराकडून मुस्लिमांविरुद्ध लढत होता. त्याने प्रेषितांच्या चेहर्यावर दगडाचा वार केल्यामुळे प्रेषितांचा खालचा दात पडून चेहरा रक्तबंबाळ झाला. प्रेषितांना बर्याच गंभीर जखमा झाल्याने ‘माननीय अली(र)’ आणि ‘माननीय तलहा(र)’ यांनी त्यांना हात देऊन पर्वतावर चढविले. प्रेषितांच्या रक्षणार्थ ‘माननीय तलहा(र)’ यांची बोटेदेखील कापली गेली. त्यांच्या शरीरावर सत्तर जखमा झाल्या. कारण प्रेषितांवर होणारा प्रत्येक वार त्यांनी आपल्या शरीरावर झेलला.
अशा भयानक संकटसमयी सर्वप्रथम ‘माननीय काब बिन मालिक(र)’ यांनी प्रेषितांना जीवित असल्याचे ओळखून उंच पर्वतावर जाऊन सैरावैरा पळणार्या मुस्लिम सैनिकांना मोठ्याने साद घातली आणि प्रेषित मुहम्मद(स) जीवित असण्याची सूचना दिली. ही सूचना मिळताच मुस्लिम सैनिकांचे आत्मिक बळ वाढले आणि ते प्रेषितांभोवती जमा होऊ लागले. ‘माननीय काब बिन मालिक(र)’ यांची सूचना शत्रू लष्करानेसुद्धा ऐकली आणि मुस्लिम लष्करास प्रेषितांच्या नेतृत्वात परत गोळा होताना पाहताच त्यांच्यावर बाणांचा वर्षाव सुरु केला. तेवढ्यातच ‘उबई बिन खल्फ’ हा घोड्यावर स्वार होऊन प्रेषितांवर चालून आला. प्रेषितांनी तत्काळ त्याच्या मानेवर भाल्याचा वार करून त्यास नरकाग्नीत पाठविले.
शत्रूसैनिकांनी इस्लामी लष्कराच्या मृत शरीरांची विटंबना केली. मृतांच्या नाका आणि कान कापले. ‘अबू सुफियान’ या शत्रूसरदाराची पत्नी ‘हिन्दा’ हिने तर ‘माननीय हमजा(र)’ यांचे काळीज कापून चावले. त्यांची हत्या करणार्या ‘वहशी’ यास आपल्या शरीरावरील सोन्याचे सर्व दागिने बक्षीस दिले. मुस्लिम लष्कराच्या मृत शरीराचे नाक कान कापून त्यांचा हार करून गळ्यात टाकला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आपल्या सोबत्यांना घेऊन घाटीत पोहोचले. युद्ध सपले होते. माननीय अली(र) यांनी त्यांच्या चेहर्यावरील रक्त पाण्याने धुतले. मग प्रेषितांनी वुजू केला. (चेहरा व हात पाय धुतले) आणि बसल्याबसल्याच सर्वांसमवेत जुहर (दुपार) ची नमाज अदा केली.
शत्रूलष्कराने जेव्हा परत जाण्याचा विचार केला तेव्हा त्याचा सरदार ‘अबू सुफियान’ पर्वतावर चढून म्हणाला, ‘मुहम्मद(स) जीवित आहे काय?’ प्रेषितांनी सोबत्यांना उत्तर न देण्याची सूचना दिली. मग परत ओरडला ‘अबू बकर(र) जीवित आहे काय?’ मग परत ओरडला, ‘उमर(र) जीवित आहे काय?’ परंतु कोणतेही उत्तर न मिळाल्याने तो आसुरी आनंदाने आपल्या सैनिकांना उद्देशून म्हणाला, ‘सर्वजण ठार झाले. जिवंत असते तर उत्तर दिले असते.’ आता मात्र माननीय उमर(र) यांना राहावले नाही आणि प्रत्युत्तर दिले,
‘‘हे ईशद्रोह्या! ईश्वराची शपथ, तू खोटे बोललास. तू स्वतः साठी शोकसामग्री तयार करून ठेवली आहेस!!’’ मग परत ‘अबू सुफियान’ किचाळला,
‘‘हे ‘हुबल’ (देवतेचे नाव)! तुझा विजय असो!’’
‘‘ईश्वर सर्वांत महान आहे!’’ माननीय उमर(र) यांनी प्रेषितांच्या आदेशाने प्रत्युत्तर दिले.
‘‘उज्जा देवी’ आमची आहे, तुमची नव्हे!’’ अबू सुफियान
‘‘ईश्वर आमचा सहाय्यक आहे, तुमचा नाही!’’ माननीय उमर(र)
‘‘‘उहुद’चे युद्ध हे ‘बद्र’च्या युद्धाचा बदला आहे! आता तुमचा आमचा हिशोब बरोबर झाला!’’ अबू सुफियान
‘‘मुळीच नाही! आमचे सैनिक स्वर्गात गेले, तुमचे नरकाग्नीत!’’ माननीय उमर(र).
‘‘आता तुमचा आमचा सामना पुढील वर्षी ‘बद्र’च्या मैदानात होईल!’’ अबू सुफियान.
लढाई संपल्यावर आदरणीय प्रेषितांनी मृतांवर नजर टाकली. प्रेषितांनी आपले काका माननीय हमजा(र) यांचे मृत शरीर हुडकून काढले. आदरणीय प्रेषितांनी रडतरडत ईश्वराशी प्रार्थना केली, ‘‘हे हमजा(र)! तुमच्यावर ईश्वराची कृपा असो.’’ संपूर्ण हुतात्म्याचा तेथेच दफनविधी करण्यात आला.
‘उहुद’चे युद्ध मुस्लिमांसाठी दुःख, शोक आणि अरिष्टांचा दिवस ठरला. या युद्धात मोठमोठ्या दर्जाचे सोबती शहीद झाले. या युद्धात चाळीस मुस्लिम सैनिक शहीद झाले आणि शत्रुचे तीस सैनिक ठार झाले.
‘कुरैश’ ‘उहुद’च्या युद्धावरून परत जाताना ‘रौहाअ’ ठिकाणी पोहोचल्यावर त्यांच्या मनात एक विक्षिप्त विचार आला. त्यांना वाटले की, प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांचे सैनिक अतिशय गंभीर जखमी झालेले आहेत. त्यामुळे अशा जखमी अवस्थेत त्यांच्यावर हल्ला चढविल्यास नेहमीची खटखट एकदाच संपून जाईल. शत्रूच्या या कारस्थानाची खबर खबर्यामार्फत प्रेषितांना समजताच मदीना शहरात सर्वांनी युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश त्यांनी जारी केले. तत्काळ सर्वांना घेऊन ‘शव्वाल’ महिन्याच्या आठ तारखेस प्रेषित मुहम्मद(स) यांनी मदीनावरून कूच केले आणि आठ मैल दूर असलेल्या ‘हमराऊल असद’ या ठिकाणी सैन्यासह पडाव टाकला. परंतु ‘खुजाआ’ कबिल्याचा सरदार ‘माअबद खुजाई’ याने प्रेषितांच्या सामरिक योजनेची ‘अबू सुफयान’ ला खबर देताच त्याने आपल्या सैन्यासह तेथून पळ काढला.
प्रेषित मुहम्मद(स) ‘हमराऊल असद’ या ठिकाणी तीन दिवस वास्तव्यास होते. वातावरण निवळल्यावर प्रेषित मुहम्मद(स) आपल्या लष्करासह मदीना शहरी परत आले. या प्रसंगी प्रेषितांवर जीव ओतणार्या सोबत्यांची स्तुती करणारी कुरआनाची ही आयत अवतरली,
‘‘ज्यांनी जखमा झेलूनही ईश्वर आणि त्याच्या प्रेषितांच्या आदेशाचे पालन केले, आणि जे लोक सदाचारी व पापभीरु आहेत, त्यांच्यासाठी (ईश्वराजवळ) मोठा मोबदला आहे.’’(संदर्भ : दिव्य कुरआन, ४:१७२
संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *