Home A परीचय A उपासना / इबादत चा अर्थ

उपासना / इबादत चा अर्थ

आदरणीय मुहम्मद (स.) यांनी पाच बाबींवर ईमान धारण करण्याची शिकवण दिलेली आहे.
१) एकेश्वरत्वावर दृढ विश्वास.
२) ईशदूतांवर दृढ विश्वास.
३) ईशग्रंथांवर विशेषकरून पवित्र कुरआनवर दृढ विश्वास.
४) ईश्वराच्या सर्व प्रेषितांवर आणि विशेषकरून अंतिम प्रेषित आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) वर दृढ विश्वास.
५) पारलौकिक जीवनावर दृढ विश्वास.
हा इस्लामचा मूळाधार आहे. या पाचही बाबींवर जेव्हा तुम्ही दृढ विश्वास धारण केला तेव्हा तुम्ही मुस्लिमांच्या समूहात दाखल झालात, परंतु अजून परिपूर्ण मुस्लिम बनला नाहीत. परिपूर्ण मुस्लिम मनुष्य तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तो प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईशआदेशांची जी शिकवण दिली तिचे पालन करून तिच्यानुसार आचरण करतो (आणि त्यानुसार आपले जीवनव्यवहार पार पाडतो) कारण असे आहे की, ईमान धारण करण्याबरोबरच आज्ञांचे पालन करणे व त्या आचरणांत आणणे तुमच्यावर अनिवार्य ठरते. आज्ञापालन व त्यानुसार आचरण करण्याचेच नाव इस्लाम आहे.
असे पाहा की, तुम्ही हे मान्य केले आहे की, ईश्वर केवळ तुमचा एकमेव ईश्वर आहे. याचा अर्थ असा आहे की तो तुमचा स्वामी असून तुम्ही त्याचे आज्ञापालनकर्ते आहात. आता तुम्ही त्याला स्वामी व आज्ञादाता मानून जर त्याची अवज्ञा केली तर तुमच्या स्वतःच्या कबुलीनुसारच तुम्ही बंडखोर व अपराधी ठराल. तसेच तुम्ही हे मान्य केलेत की पवित्र कुरआन हा ईशग्रंथ आहे. पवित्र कुरआनमध्ये जी वचने आहेत ती ईशवाणी व ईश आदेश आहेत, हे तुम्ही मान्य केलले आहे असा याचा अर्थ होतो. त्यातील प्रत्येक वचन मानून त्याच्या पुढे नतमस्तक होणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरते. तसेच तुम्ही हेही मान्य केलेत की, प्रेषित मुहम्मद (स.) हे अल्लाहचे प्रेषित आहेत. वास्तविकपणे ही कबुली याच गोष्टींची आहे की प्रेषित मुहम्मद (स.) जे कृत्य करण्याचा आदेश देतात व जे करण्यापासून परावृत्त करतात ते सर्व ईश्वराकडूनच आहे. अशी कबुली दिल्यानंतर आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आज्ञांचे पालन व तदनुसार आचरण करणे तुम्हावर अनिवार्य कर्तव्य ठरते. म्हणूनच तुमचे प्रत्यक्ष आचरण जेव्हा तुमच्या ईमाननुसार होईल आणि तेव्हाच तुम्ही परिपूर्णपणे मुस्लिम व्हाल. तसे झाले नाही तर तुमच्या ईमानमध्ये व तुमच्या प्रत्यक्ष आचरणामध्ये जितकी तफावत असेल तितक्याच प्रमाणांत तुमच्या ईमानात उणीव राहील.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईश्वरेच्छेनुसार जीवन व्यतीत करण्याची कोणती पद्धत दाखवून दिली आहे. ते आता आपण पाहू या. तसेच काय करण्याचा आदेश दिला आहे व काय करण्यापासून मनाई केली आहे, तेही आपण पाहू या. या संदर्भात अनिवार्य कर्तव्य ईश्वर उपासना (इबादत) आहे.
उपासना (इबादत) चा अर्थ
‘इबादत’ या शब्दाचा खरा अर्थ ‘दास्यत्वाचे कर्तव्य’ असा आहे. आता आपण दास आहात. अल्लाह आपला उपास्य (ईश्वर) आहे. दास आपल्या उपास्याचे आज्ञापालन करताना जी कृत्ये करीत असतो ते सर्व उपासनेत मोडताच. उदा. तुम्ही इतरांशी संभाषण करीत असता. संभाषण करताना तुम्ही असत्याचा, निंदानालस्तीचा, अश्लीलतेचा त्याग केला आणि असे पथ्य केवळ यासाठीच पाळले की, ईश्वराने या सर्व गोष्टींना मनाई केली आहे. तुम्ही सतत सत्य, न्याय, भलेपणा व शिष्टाचारयुक्त संभाषण यासाठीच केले की या गोष्टी ईश्वरास प्रिय आहेत तर तुमचे संपूर्ण संभाषण ‘इबादत’ (उपासनेत) ठरते. मग ते संभाषण व्यवहारी जीवनातील कोणत्याही बाबीसंबंधी का असेना. तुम्ही इतरांशी देवाणघेवाण करीत असता बाजारात खरेदीविक्री करीत असता, तुमच्या घरात आईवडील व भावंडासमवेत राहात असता, मित्रमंडळीशी व आप्तेष्टांशी गाठीभेटी करीत असता. अशा वेळी आपल्या जीवनातील वरील सर्व व्यवहार करताना तुम्ही ईशआदेश व त्याचे नियम दृष्टीसमोर ठेवले व ईश्वराने जे आदेश दिलेले आहेत हे समजून घेऊन प्रत्येकाचा हक्क त्याला देऊन टाकला. तसेच कोणाचाही हक्क व हितसंबंध हिरावून घेण्याची ईश्वराने मनाई केली आहे हे जाणून तुम्ही कोणाचाही हक्क हिरावून घेतला नाही तर तुमचा संपूर्ण जीवनकाल जणू ईशउपासना करण्यातच गेला असे होईल. तुम्ही जर एखाद्या गरीबाला सहाय्य केले, एखाद्या भुकेलेल्याला जेऊ घातले, एखाद्या रोग्याची सेवा-सुश्रुषा केली आणि ही सर्व कृत्ये करताना तुम्ही आपल्या डोळ्यांसमोर कसलेही स्वहित अगर आदर, प्रतिष्ठा व नावलौकिक न ठेवता, केवळ ईशप्रसन्नता प्राप्त होण्यासाठीच ती केली तर ती सर्व कृत्ये उपासनाच (इबादत) ठरतात. तुम्ही व्यापार- उदीम केला किंवा उद्योगधंदा अथवा शारीरिक कष्टाचे काम केले व ते करत असताना ईशभय मनात सतत बाळगून अगदी प्रामाणिकपणाने व सचोटीने ते केले, उचित मार्गाने (हलाल) कमाई केली व निषिद्ध (हराम) ठरविले गेलेल्या वाममार्गापासून दूर राहिलात व ही कृत्ये जरी तुम्ही उपजीविकेसाठीच केली असली तरी अशा कर्माचे कृत्यसुद्धा ईशउपासनेतच (इबादत) गणले जाईल. तात्पर्य असे की या जगातील जीवनकालात प्रत्येक वेळी व प्रत्येक व्यवहार करताना ईशप्रसन्नता नजरेसमोर ठेवणे, त्याच्या आदेशांचे पालन करणे, त्याची अवज्ञा करून मिळणारे लाभ व फायदे लाथाडून टाकणे आणि त्याच्या आदेशांचे पालन करताना होणारा तोटा अगर तसा तोटा होण्याचा धोका पत्करणे व सोसणे ही कृत्येही ईशोपासनेतच अंतर्भूत आहेत. अशा पद्धतीचे जीवन म्हणजे सरळ सरळ भक्ती व उपासनाच (इबादत) आहे. असे (ईशपरायणशील) जीवन जगताना खाणे, पिणे, हिंडणे, फिरणे, झोप घेणे व जागे होणे, बोलणे या सर्व कृती उपासनेतच (इबादत) दाखल आहेत.
भक्ती व उपासनेचा (इबादत) असा खरा अर्थ आहे व मुस्लिमांना (आज्ञाधारकांना) अशा तऱ्हेने उपासना करणारा दास बनविणे हेच इस्लामचे खरे उद्दिष्ट आहे. या गरजेपोटी इस्लाममध्ये अशा काही उपासना अनिवार्य व आवश्यक ठरविल्या गेल्या आहेत ज्यांची पूर्तता केल्याने मनुष्य एका विशाल उपासनेस सिद्ध होतो. असे समजा की या आवश्यक विशिष्ट उपासना जणू त्या विशाल उपासनेसाठी असणारे प्रशिक्षणच आहे. हे प्रशिक्षण जी व्यक्ती उत्तम तऱ्हेने प्राप्त करील तीच नंतरची विशाल व अस्सल उपासना योग्य तऱ्हेने पार पाडू शकेल. म्हणूनच या विशिष्ट उपासनांना अनिवार्य कर्तव्य ठरविण्यात आले आहे व त्यांना ‘अरकाने दीन’ म्हणजे इस्लामचे आधारस्तंभ असे म्हटले गेले आहे. जशी एखादी इमारत त्याच्या स्तंभावर आधारलेली असते त्याचप्रमाणे इस्लामी जीवनरुपी इमारतसुद्धा या स्तंभावरच आधारलेली आहे. हे स्तंभ पाडाल तर इस्लामी इमारत ढासळून टाकाल.
नमाज
नमाज या अनिवार्य कृत्यांमध्ये, प्रथम क्रमांक नमाजला दिला गेला आहे. ही नमाज काय आहे? ज्या गोष्टीवर तुम्ही ईमान धारण केले आहे त्या गोष्टींचा कृतीने तसेच मुखातून दिवसातून पाच वेळा पुनरुच्चार व उजळणी करणे याचेच नाव नमाज आहे. तुम्ही उठला व ईमान (श्रद्धा) ताजे करून पुन्हा जगरहाटीत गुंतून गेला. सकाळच्याप्रहरी उठून आधी शुचिर्भूत होऊन तुम्ही ईश्वरासमोर हजर झालात. त्याच्यापुढे उभे राहून वाकून, जमिनीवर कपाळ टेकवून आपले दास्यत्व मान्य केले, त्याच्याकडून मदतीची याचना केली व मार्गदर्शनासाठी त्याचीच करुणा भाकली. त्याच्या आज्ञापालनाचे वचन पुन्हा एकदा उच्चारले. त्याचीच प्रसन्नता प्राप्त करण्याचा व त्याच्या कोपापासून दूर राहण्याचा विचार मनात पुन्हा पुन्हा जागृत केला. त्याच्या ग्रंथातील धडा पुन्हा गिरविला. त्याच्या प्रेषिताच्या सत्यतेबद्दल ग्वाही दिली व ज्या दिवशी तुम्ही त्याच्या न्यायालयात आपल्या कृत्यांचा जाब देण्यासाठी हजर होणार आहात त्या दिवसाचेही स्मरण केले. अशा तऱ्हेने तुमच्या दिनक्रमाचा आरंभ झाला. काही तास तुम्ही आपल्या कामात गढून गेलात. मग पुन्हा ‘जोहर’ (दुपारची नमाज) च्या वेळी ‘अजान’ देणाऱ्याने ‘अजान’ (बांग) देऊन तुम्हाला आठवण करून दिली की या व पुन्हा एकदा काही मिनिटे एकदा तो धडा गिरवा. असे होता कामा नये की एखादे वेळी तुम्हाला त्याचा विसर पडून तुम्ही ईश्वरापासून गाफील होऊन जावे. दिवसभरात काही तास गेल्यानंतर ‘असर’ (तिसरे प्रहरची नमाज) च्या वेळी तुम्हाला पुकारण्यात आले व तुम्ही ईमान ताजा करून घेतला. नंतर सूर्यास्त झाला व सायंकाळ सुरवात झाली. जी उपासना करुन तुम्ही आपल्या दिनचर्येचा आरंभ केला होता, तीच उपासना करुन तुम्ही आपल्या दिनचर्येची सांगताही केली. असे केल्याने रात्र झाल्यावरही तुम्हास त्याच्या धड्याचा विसर पडू नये व तुम्ही त्याला विसरून भरकटू नये. पुन्हा काही वेळाने ‘इशा’ (रात्रीची नमाज) ची वेळ झाली व झोपण्याचीही वेळ झाली. आता शेवटी पुन्हा एकदा तुम्हाला ईमानची सारी शिकवण व त्याचे स्मरण केले गेले, कारण ती वेळ शांत असते. दिवसभराच्या धावपळीत जर तुम्हाला पूर्णपणे एकाग्र होण्यास उसंत मिळाली नसेल तर या शांत वेळी पूर्ण समाधान व एकाग्रता आणू शकता.
पाहा, नमाज रोज पाच वेळा इस्लामच्या आधारस्तंभाला बळकटी आणीत असते. ती वारंवार तुम्हाला त्या विशाल उपासनेसाठी तयार करीत असते जिच्या स्वरुपाचे विवरण आम्ही या अगोदरच्या काही ओळीत केलेले आहे. तुमच्या मनाचे पावित्र्य, आत्म्याची प्रगल्भता, चारित्र्य सुधारणा व आचारशुचिता ज्यावर अवलंबून असते त्या सर्व श्रद्धांना ती ताजेपणाची टवटवी आणीत असते. ‘वझू’ (नमाजपूर्वी हात, पाय, तोंड, नाक धुऊन स्वच्छ करण्याची क्रिया) करताना प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दाखवून दिलेल्या पद्धतीचेच तुम्ही अनुकरण का करीत असता व नमाजमध्ये त्यांनी शिकवण दिलेल्या त्या सर्व वचनांचे पठन तुम्ही का करीत असता? प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिलेल्या शिकवणुकीचे पालन करणे तुम्ही अनिवार्य मानता एवढ्यासाठीच ना? कुरआनचे पठन तुम्ही जाणूनबुजून चुकीचे का करीत नाही? एवढ्यासाठीच ना की ती ईशवाणी आहे याची तुमच्या मनाची खात्री आहे? नमाजमध्ये जी वचने स्तब्धपणे मनातच स्मरण करावयाची असतात, ती जर तुम्ही मनात म्हटली नाही अगर त्यांच्याऐवजी अन्य वचने म्हटलीत तर त्याकरिता तुम्हाला कोणाचे भय असते? ते ऐकणारा कोणी मनुष्य तर असत नाही. यावरून हे उघड आहे की स्तब्धपणे जे काही पठन मनातल्या मनात तुम्ही करीत असता तेसुद्धा ईश्वर ऐकतो, असे तुम्ही समजत असता व आपल्या गुप्त हालचालीसुद्धा त्याला अनभिज्ञ नसतात. जेथे पाहणारा कोणी नसतो तेथे तुम्हाला नमाजसाठी उभी करणारी कोणती प्रेरणा असते? ईश्वर तुम्हाला पाहात आहे. या श्रद्धेचीच ती प्रेरणा असते ना? नमाजची वेळ आली म्हणजे आपल्या हातातील अत्यंत निकडीचे काम सोडून देऊन नमाजकडे तुम्हाला वळण्यास लावणारी कोणती शक्ती असते? नमाज ईश्वराने अनिवार्य व सक्तीचे ठरविलेले कर्तव्य आहे. हीच ती जाणीव असते ना? कडक थंडी पडली असताना सूर्योदयापूर्वी, कडक उन्हाळ्यात भर दुपारच्या वेळी तसेच सायंकाळच्या फिरावयास जाण्याच्या चित्ताकर्षक समयी तुम्हाला नमाज अदा करण्यास भाग पाडणारी कोणती शक्ती असते? ती कर्तव्यतत्परता नाही तर दुसरे काय आहे? तसेच नमाज अदा करताना अगर नमाजमध्ये जाणूनबुजून एखादी चूक करण्यापासून तुम्हाला कोणाचे भय वाटत असते? तुमच्या मनात ईशभय असते व तुम्हाला हे ठाऊक असते की, एके दिवशी ईशन्यायालयात तुम्हाला हजर होणे क्रमप्राप्त आहे एवढ्यासाठीच ना? तुम्हाला परिपूर्ण व सच्चा मुस्लिम बनवून सोडणारे नमाजपेक्षा अधिक चांगले असे कोणते प्रशिक्षण असू शकते? मुस्लिमासाठी यापेक्षा अधिक चांगली शिकवण व संस्कार कोणते असू शकते की, त्याने दिवसातून कित्येक वेळा ईश्वराचे स्मरण, त्याचे भय, तो सर्वसाक्षी असण्याबद्दल दृढ विश्वास आणि ईशन्यायालयात हजर केले जाण्याची श्रद्धा यांना तजेला द्यावा, अनिवार्यपणे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आज्ञांचे पालन करावे, सकाळपासून रात्रीपर्यंत काही तासांच्या अवधीने त्याला कर्तव्यपूर्तीचा सराव करावयास लावला जातो. अशा व्यक्तीपासून अशी अपेक्षा केली जाऊ शकते की, जेव्हा तो नमाज अदा करून मोकळा होतो व जगातील व्यवहारात गढून जातो तेव्हा तेथेही त्याच्या मनात ईशभय असते व त्याच्या कायद्याचे तो पालन करतो. प्रत्येक दुष्कृत्याच्या समयी त्याला आठवण होते की, ‘‘ईश्वर मला पाहात आहे.’’ अशी उच्चदर्जाची शिकवण प्राप्त करुनही ईशभय बाळगत नसेल त्याची अवज्ञा करण्याचे सोडत नसेल तर हा दोष नमाजचा नसून त्या व्यक्तीचा आत्मदोष आहे.
आणखी असे पाहा की, महान अल्लाहने नमाज सामुदायिकपणे एकत्रित अदा करण्याची सक्त ताकीद दिलेली आहे. विशेषकरून आठवड्यात एकदा ‘जुमअ’ ची नमाज (शुक्रवारची दुपारची सामुदायिक नमाज) सामुदायिकपणे एकत्रित अदा करणे सक्तीचे केले गेले आहे. मुस्लिमांमध्ये समभाव, एकोपा व समानता निर्माण करणारी ही बाब आहे. ती मुस्लिमांना एकवटून त्यांचा मजबूत संघ निर्माण करते. ते सर्व मिळून एकत्रितपणे एकाच ईश्वराची उपासना करतात, एकत्रितपणे उठत व बसत असतात तेव्हा त्यांची मने आपोआपच परस्परांशी जुळत असतात आणि आपण सर्व बंधु आहोत ही जाणीव त्यांच्या मनात उत्पन्न होते. ह्यामुळे त्यांच्यात एकाच नेत्याचे आज्ञापालन करण्याची प्रवृत्ती निर्माण करत असते व त्यांना शिस्तबद्ध करीत असते. यामुळेच त्यांच्यात आपापसाबद्दल सहानुभूती निर्माण होते. तसेच त्यांच्यात समानता व एकात्मता निर्माण होते. श्रीमंत व गरीब, लहान थोर, उच्चपदाधिकारी व कनिष्ठ दर्जाचा शिपाई सर्व एकत्र उभे राहतात. त्यांच्यात कोणी उच्च नसतो, कोणी नीच नसतो.
हे त्या अगणित लाभांपैकी काही आहेत जे तुम्ही नमाज अदा केल्याने ईश्वराला प्राप्त होत नसून तुम्हाला स्वतःलाच ते प्राप्त होत असतात. तुमच्या कल्याणासाठीच ईश्वराने ती सक्तीची केली आहे. नमाज अदा न केल्याने तुम्ही ईश्वराचे काही नुकसान केलेले नसते. म्हणून त्याची गैरमर्जी होत नसते उलट तुम्ही स्वतःचेच नुकसान करून घेतले आहे. नमाजद्वारा केवढे महान सामर्थ्य ईश्वर तुम्हाला देत आहे व तिचा स्वीकार करण्यापासून तुम्ही तोंड चुकवीत आहात? मुखाने तर, तुम्ही ईश्वराचे ईशत्व, प्रेषिताचे अनुयायित्व व ‘आखिरत’चा जाब विचारणे यांचा स्वीकार करीत असता, पण तुमचे प्रत्यक्ष आचरण असे असते की, ईश्वराने व त्याच्या प्रेषिताने जे सर्वात मोठे कर्तव्य तुम्हासाठी ठरविले आहे त्याची पूर्तता केली जात नाही, ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे. तुमचे हे आचरण पुढे दिलेल्यापैकी एका अवस्थेत निश्चित असते. एक तर नमाज अनिवार्य कर्तव्य असण्याचा तुम्ही इन्कार करता किंवा तुम्ही तिला अनिवार्य कर्तव्य मानता परंतु ते टाळण्याचा प्रयत्न करीत असता. जर अनिवार्य असण्याचा इन्कार असेल, तर अल्लाह व त्याच्या प्रेषिताला तसेच कुरआनला तुम्ही खोटे ठरविता व पुन्हा त्यांच्यावर ‘ईमान’-दृढविश्वास असल्याचा खोटा दावा करीत असता. नमाजला अनिवार्य कर्तव्य मानत असूनही जर तुम्ही ती आचरणात आणीत नसाल तर तुम्ही विश्वासपात्र नाही. जगातील इतर व्यवहाराच्या बाबतीतसुद्धा तुमच्याबद्दल कसलाही भरवसा बाळगला जाऊ शकत नाही.
जर तुम्ही ईशकर्तव्य चुकविण्याची चोरी करू शकता तर माणसांची कामे करताना तुम्ही चोरी करणार नाही, अशी कोण अपेक्षा करू शकतो.
रोजा /उपवास
रोजा /उपवास हे दुसरे अनिवार्य कर्तव्य आहे. हा रोजा म्हणजे काय? नमाज ज्या कर्तव्यांची दररोज तुम्हाला पाच वेळा आठवण करून देत असते, त्याच कर्तव्याची आठवण रोजा वर्षातून संपूर्ण एक महिनाभर सतत करून देत असतो. रमजान महिना येतो व सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचे खाणेपिणे बंद होते. ‘सहरी’ (उपास करण्यापूर्वीचा फराळ) करीत असताना ‘अजान’ (नमाजपूर्वीची बांग) ऐकू येते व खाताखाता तुम्ही हात आखडता. त्यानंतर कसलेही पक्वान्न तुमच्यासमोर आहे, कितीही भूक अगर तहान लागली, मनाची कितीही तीप इच्छा झाली तरी सूर्यास्तापर्यंत तुम्ही तोंडात अन्नाचा कणही घालीत नाही. केवळ लोकांसमक्षच खातपीत नाही एवढेच नव्हे तर जेथे कोणीही पाहाणारा समक्ष नसतो अशा एकांतातही पाण्याच एक थेंब घशाखाली घालणे अगर अन्नाचा एक कणही गिळणे तुम्हाला शक्य होत नाही. मग ही सर्व बंधने एका विशिष्ट वेळेपर्यंतच असतात. ‘मगरिब’ (सूर्यास्तानंतरची) अजान ऐकू आल्याबरोबर तुम्ही उपवास समाप्त करण्यासाठी फलाहार घेता. त्यानंतर रात्रभर तुम्ही बिनदिक्कत व बिनधास्तपणे हवा तो पदार्थ खात असता. हे सर्व काय आहे? यासंबंधी विचार करा. या कृत्याच्या मुळाशी ईशभय आहे. तो सर्वव्यापी व सर्वज्ञानी आहे यावर दृढविश्वास आहे. पारलौकिक जीवन व ईशन्यायालयावर ईमान आहे. कुरआन व प्रेषिताच्या आज्ञांचे कडक पालन आहे. कर्तव्याची प्रखर जाणीव आहे. सहनशीलता, सोशीकपणा व संकटांना सामोरे जाण्याच्या कर्तव्यांची उजळणी आहे. ईशप्रसन्नता प्राप्त होण्यासाठी मनाच्या इच्छावासनांना काबूत ठेवणारे बळ आहे. दरवर्षी ‘रमजान’ महिन्यात संपूर्ण तीस दिवस रोजाद्वारे तुम्हावर संस्कार होतात व तुमच्यात वरील सर्व गुण उत्पन्न होण्याचा प्रयत्न होतो, ज्यायोगे तुम्ही पक्के व परिपूर्ण मुस्लिम बनावे. या सर्व गुणांनी तुम्हाला अशा उपासनेस पात्र बनवतो जी उपासना एका सच्चा मुस्लिमासाठी आपल्या जीवनात पार पाडणे अनिवार्य आहे.
पुन्हा असे पाहा की, सर्वश्रेष्ठ अल्लाहने ‘रोजा’ सर्व मुस्लिमांसाठी एकाच महिन्यात अनिवार्य केला आहे जेणेकरून सर्वांनी मिळून एकत्रितपणे ‘रोजा’ (उपवास) करावा. प्रत्येकाने स्वेच्छेनुसार वेगवेगळ्या वेळी तो करू नये. असे केल्याने अन्य अगणित फायदेही आहेत. संपूर्ण मुस्लिम वस्तीत संबंध महिनाभर पावित्र्य व मांगल्य ओतप्रोत भरलेले असते. सर्व वातावरण ईमान, ईशभय व कर्तव्यपूर्तीची प्रबळ इच्छा, आचारशुद्धी व नैतिकता यांनी भरलेले असते. अशा वातावरणात दुष्कृत्ये गाडली जाऊन सत्कर्माना उधाण येते. सज्जन माणसे, सत्कर्म करण्यात एकमेकांना सहाय्य करीत असतात. दुर्जन दुष्कर्म करण्यात संकोचतात व लाजतात.
निर्धनांना मदत करण्याची भावना धनिकांमध्ये निर्माण होते. ईशमार्गात धनसंपत्ती खर्च केली जाते. सर्व मुस्लिम समान अवस्थेत असतात व असे समान अवस्थेत असणे त्यांच्यात अशी जाणीव निर्माण करते की ते एकाच समूहाचे घटक आहेत. त्यांच्यात बंधुभाव, सहानुभूती व आपसातील एकोपा निर्माण होण्यास हे अत्यंत प्रभावी साधन आहे.
हे सर्व आमच्याच हिताचे आहे. आम्हाला उपाशी ठेवण्यात ईश्वराचा कसलाही लाभ होत नाही. त्याने आमच्याच हितासाठी ‘रमजान’ महिन्यातील ‘रोजे’ आम्हासाठी अनिवार्य ठरविले आहेत. कसलेही योग्य कारण अगर सबब नसताना जे कोणी हे अनिवार्य कर्तव्य पार पाडीत नसेल तर ते खुद्द स्वतःवरच अन्याय करीत असतात. जे लोक रमजान महिन्यात दिवसा उघडपणे खात-पित असतात, त्यांची स्थिती सर्वांत जास्त लज्जास्पद आहे. असे करून जणू ते असे घोषित करतात की ते मुस्लिम समूहांपैकी नाहीतच. तसेच ते असे दर्शवित असतात की त्यांना इस्लामच्या अनिवार्य कर्तव्याची कसलीही पर्वा नाही. ते इतके निर्ढावलेले आहेत की ज्या ईश्वरास ते मानतात त्याच्या आज्ञा व आदेशही ते सरळ सरळ धाब्यावर बसवितात. त्यांच्या समाजापासून वेगळे होणे ज्यांना सोपे आहे ज्यांना त्यांच्या निर्माणकर्त्या व पालनकर्त्याच्या विरुद्ध बंड करताना थोडीसुद्धा शरम वाटत नाही आणि त्यांच्या धर्माच्या सर्वश्रेष्ठ नेत्याने ठरवून दिलेल्या नियमांचे जाहीर उल्लघंन करतात. अशाकडून कोणता मनुष्य कसली विश्वासार्हता, कसल्या प्रामाणिकपणाची व सदाचाराची, कसली कर्तव्यनिष्ठा व कायदापालनाची अपेक्षा करू शकतो ते दाखवा?
जकात
तिसरे अनिवार्य कर्तव्य जकात(१) आहे. महान अल्लाहने प्रत्येक धनवान मुस्लिमास हे कर्तव्य अनिवार्य ठरविले आहे की ज्याच्याकडे कमीतकमी साढे बावन्न तोळे चांदी किंवा तितकी रक्कम शिल्लक व बचत सतत एका संपूर्ण वर्षाच्या काळात उरली असेल, तर त्या शिलकीपैकी चाळीसवा भाग त्याने आपल्या एखाद्या गरीब नातेवाईकास किंवा एखाद्या लाचार माणसास, एखाद्या दारिद्र्यपीडितास, एखाद्या नवमुस्लिम, एखाद्या प्रवासी माणसास किंवा एखाद्या कर्जबाजारी माणसास देऊन टाकावा.
१) जकात केवळ रोख रकमेपुरतीच नसून सोने, चांदी, व्यापारी माल व पशुधनासही ती लागू आहे. या सर्व वस्तूमध्ये किती मालमत्तेसाठी किती जकात द्यावी याचे कोष्टक तुम्हाला इस्लामी कायदे पुस्तकात आढळेल. येथे केवळ जकातच्या मागे असलेली उद्दिष्टे, तसेच त्यापासूनचे कल्याण विशद करणे एवढाच हेतू आहे, म्हणून उदाहरणासाठी रोख रक्कमेचे वर्णन दिले गेले आहे.)
अशा तऱ्हेने, अल्लाहने धनवानाच्या संपत्तीमध्ये, गोरगरींबासाठी कमीतकमी अडीच टक्के हिस्सा नियुक्त(२) केला आहे. यापेक्षा जास्त प्रमाणात एखाद्याने दान केले. तर ते उपकारक होईल व त्याचे पुण्य आणखी अधिक असेल.
हा तुमचा वाटा काही अल्लाहला पोहचत नाही. तो तुमच्या कसल्याही दानाचा गरजू नाही, परंतु त्याचे असे फर्मान आहे की, तुम्ही माझ्यासाठी आपल्या एखाद्या निर्धन बांधवास काही दान केले तर ते दान मला दिल्यासारखे आहे. त्या निर्धनातर्फे मी कितीतरी अधिक पटीने त्याचे फळ तुम्हाला देईन. अर्थातच त्यासाठी अट अशी आहे की दान दिल्यानंतर तुम्ही केलेल्या उपकाराचा उच्चार करता कामा नये, दान घेतलेल्या माणसाला तुच्छ लेखू नये, त्याच्याकडून आभारप्रदर्शनाची सुद्धा अपेक्षा बाळगू नका. तुम्ही केलेल्या दानकर्माचा लोकांत बोलबाला अगर प्रसिद्धी व्हावी व लोकांनी तुमच्या दानशौर्याचे कौतुक करावे अशी इच्छा बाळगू नका व तसा प्रयत्न करू नका. जर वरील सर्व अमंगळ विचार मनातून काढून टाकून अंतःकरण पवित्र राखले व केवळ अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी आपल्या संपत्तीमधून गोरगरीबांना हिस्सा द्याल, तर अल्लाह त्याच्या अमर्याद संपत्तीमधून तुम्हाला इतके काही देईल जे कधीही संपणार नाही.
महान अल्लाहने जसे नमाज, रोजा (उपवास) आमच्यावर अनिवार्य केले आहेत त्याचप्रमाणे जकातसुद्धा अनिवार्य केली आहे. हा इस्लामचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. जकातला आधारस्तंभ यासाठी ठरविले गेले आहे की तिच्यायोगे ईश्वरासाठी त्याग करण्याची व तिला प्राधान्य देण्याची भावना व जाणीव मुस्लिमात निर्माण होते. स्वार्थ, संकुचित मनोवृत्ती व संपत्तीलोलुपता यासारखे दुर्गूण नष्ट होते. धनाची पूजा करणारा धनासक्त लोभी व कृपण मनुष्य तसेच पैशावर जीव ओवाळणारा माणूस, इस्लामसाठी अगदी कुचकामी आहे. जो मनुष्य स्वतःचे रक्त आटवून व घाम गाळून मिळवलेली संपत्ती स्वतःच्या गरजेसाठी न वापरता अल्लाहच्या आज्ञेनुसार बलिदान करू शकतो, तोच इस्लामच्या सरळ मार्गाने जाऊ शकतो. जकात अशा त्यागाचे धडे मुस्लिमांना गिरवावयास लावते. अल्लाहसाठी जेव्हा संपत्तीचा व्यय करण्याचा प्रसंग येतो तेव्हा संपतीला उराशी कवटाळून बसू नये अशी त्याची मानसिकता करून सोडते.
२) अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आपल्या वंशाच्या लोकांना म्हणजे सय्यद व हाशमी लोकांना जकात स्वीकारणे निषिद्ध केले आहे, ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. याचा अर्थ असा की सय्यद व बनी हाशीम यांना जकात देणे तर अनिवार्य आहे परंतु जकात स्वीकारणे त्यांना धर्मसंमत नाही. जी कोणी व्यक्ती एखाद्या गरीब सय्यद अगर हाशमी माणसास मदत करू इच्छित असेल, भेट व देणगी म्हणून तो मदत देऊ शकतो. दानधर्म खैरात किंवा जकात या नावाने तो देऊ शकत नाही.
जकातचा ऐहिक फायदा हा आहे की मुस्लिमांनी आपापसात एकमेकांना सहाय्य करावे. कोणीही मुस्लिम उघडानागडा, भुकेलेला, तुच्छ होऊ नये. श्रीमंतानी गोरगरिबांना सहाय्य करावे व गरिबांनी भीक मागत फिरू नये, कोणीही व्यक्तीने आपली धनसंपत्ती केवळ आपल्या ऐषआरामासाठी व आपल्या शान व लौकिकासाठीच उधळू नये. उलट आपल्या संपत्तीत आपल्या जातीतील विधवांचा, अनाथ व पोरक्यांचा तसेच निराधार व निर्धनाचाही वाटा आहे. हे सतत लक्षात ठेवावे. जे लोक एखादे काम करण्याची क्षमता बाळगतात परंतु केवळ भांडवलाअभावी ते करू शकत नाहीत, अशा असहाय्य लोकांचाही आपल्या संपत्तीत काही हक्क व हिस्सा आहे ही गोष्टही लक्षात असावी. उपजत बुद्धिमान असून केवळ दारिद्र्यामुळे ज्यांना शिक्षण घेणे दुरापास्त होते, अशा बालकांचाही त्यात वाटा आहे. अपंगाचाही त्यात वाटा असतो. कोणतेही काम करण्यास असमर्थ असलेल्यांचाही त्यात वाटा असतो. या सर्वांचा हक्क जी व्यक्ती मानीत नाही ती जुलमी आहे. तुमच्या जातीतील हजारो माणसे भाकरीसाठी तडफडत असताना, हजारो कामगार बेकारीमुळे वणवण करीत भटकत असताना, तुम्ही आपल्याजवळ पैशाच्या राशी बाळगून असावे. मोठमोठ्या हवेलीत विलासात व ऐष आरामात असावे, मोटारीत फिरावे यापेक्षा अधिक मोठा जुलूम व अन्याय कोणता असेल? इस्लाम अशा प्रकारच्या स्वार्थांधपणाशी शत्रुत्व करतो. विद्रोहींना (काफिर) त्यांची संस्कृती अशी शिकवण देते की जी काही संपत्ती प्राप्त होते तिचा संचय करून ठेवावा व व्याजापोटी तिची गुंतवणूक करून भोवतालच्या लोकांची मिळकतही आपल्याकडे ओरबाडून घ्यावी. परंतु मुस्लिमास त्यांचा धर्म अशी शिकवण देतो की ईश्वराने तुमच्या गरजेपेक्षा अधिक उपजीविका व मिळकत प्रदान केली तर तिचा नुसता संचय करून ठेवू नका तर आपल्या गरजू बांधवांना ते द्या, जेणेकरून त्यांच्याही गरजा भागवाव्यात व तुमच्याप्रमाणे तेही मिळवते बनावेत.
हज (पवित्र मक्का यात्रा)
हज हे चौथे अनिवार्य कर्तव्य आहे. आयुष्यभरात फक्त एकदाच ते पार पाडणे अगत्याचे आहे व जो कोणी पवित्र ‘मक्का’ शहरापर्यंत जाणे येण्याची क्षमता बाळगतो केवळ त्यावरच हे कर्तव्य अनिवार्य केलेले आहे.
आज ज्या ठिकाणी ‘मक्का’ शहर वसलेले आहे त्याच जागी हजारो वर्षापूर्वी आदरणीय प्रेषित इब्राहीम (अ.) यांनी अल्लाहची उपासना करण्यासाठी एक छोटेसे घर बांधले होते. त्यांच्या निष्ठेची व प्रेमाची अशी काही कदर अल्लाहने केली की त्या छोट्याशा
घराला अल्लाहने आपले घर घोषित केले. अल्लाहने असा आदेश दिला की ज्या कोणाला आमची उपासना, आराधना करावयाची असेल त्यांनी या घराच्या दिशेने आपले तोंड करूनच ती करावी. पुढे असाही आदेश दिला की मुस्लिम जगातील कोणत्याही भागात व कानाकोपऱ्यात राहणारा असो, त्याची ऐपत असल्यास आयुष्यातून एकदा तरी या घराचे दर्शन घेण्यासाठी यावे व अल्लाहचा अतिप्रिय दास इब्राहीम (अ.) जितक्या प्रेमाने व मनोभावाने या घराला प्रदक्षिणा घालीत असे तशाच प्रेमाने व मनोभावाने या घराला प्रदक्षिणा घालावी. पुढे असाही आदेश दिला की, ‘‘तुम्ही जेव्हा आमच्या घराकडे याल तेव्हा आपली अंतःकरणे निर्मळ करा. आपल्या वासनांना आवर घाला. रक्तपात, अनाचार, अर्वाच्च बोलणे, यापासून दूर राहा. आपल्या स्वामीच्या दरबारात जितक्या आदबीने व नम्रतेने जाणे आवश्यक असते तशाच पद्धतीने आमच्या घराचे दर्शन करावे. जो पृथ्वी, आकाशाचा धनी आहे व ज्याच्या तुलनेत सर्व मानव क्षुल्लक याचक आहेत, अशा सम्राटाच्या सेवेत रुजू होण्यासाठी आपण चाललो आहोत असे समजा.’’
अशा प्रकारची नम्रता धारण करून अगदी अंतःकरणापासून जेव्हा तुम्ही आमची उपासना कराल तेव्हा आम्ही आपल्या देणग्यांनी तुम्हाला धनसंपन्न करुन सोडू.
एका अर्थाने विचार केल्यास हज ही सर्वांत महान उपासना आहे. अल्लाहचे प्रेम जर माणसाच्या अंतःकरणात नसेल तर आपली सर्व कामे व व्यवहार टाकून देऊन आपल्या सर्व प्रियजनांचा व नातेवाईकांचा विरह सहन करून, इतक्या लांबच्या प्रवासाची दगदग कशासाठी सोशील? म्हणूनच हजयात्रेचा इरादा करणे हाच मुळी अल्लाहच्या प्रेमाचा व निष्ठेचा पुरावा आहे. हज यात्रेसाठी जेव्हा मनुष्य निघतो तेव्हा त्याची अवस्था इतर प्रवासाच्या प्रसंगासारखी नसते. या प्रवासात माणसाचे सर्व लक्ष अल्लाहकडे जास्त असते. त्याच्या मनात ध्यास व उत्कटता वाढत असते. ‘‘काबागृह’’ जसजसे जवळ येते तसतसे हा प्रेमाग्नी अधिकच उफाळतो. दुष्कृत्ये व पापकृत्ये याबद्दल माणसाचे मन आपोआपच तिरस्कार करू लागते. हातून घडलेल्या पापकर्माबद्दल मनात खजीलपणा निर्माण होतो. भविष्यकाळात आज्ञापालनाची सुबुद्धी व सन्मती प्रदान करण्याची अल्लाहची याचना करीत असतो. जप व अल्लाहचे स्मरण व उपासनेत अधिकाधिक रस वाटू लागतो. नमाजमध्ये असताना अल्लाहसमोर मस्तक टेकण्याचा काळ प्रदीर्घ होऊ लागतो व खूप वेळ तरी मस्तक वर करण्यास मन तयार नसते. कुरआन पठन करताना त्यातून आगळा आनंद मिळू लागतो. रोजा (उपवास) केला असताना त्याची वेगळीच गोडी अनुभवू लागतो. जेव्हा तो अरबस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवतो तेव्हा इस्लामचा संपूर्ण प्राथमिक इतिहास त्याच्या डोळ्यांपुढे येऊ लागतो. जागोजागी व पावलोपावली अल्लाहवर उत्कृष्ट प्रेम केलेल्यांची व त्यांच्यासाठी प्राण कुर्बान केलेल्यांची चिन्हे व अवशेष दृष्टीस पडू लागतात. तेथील वाळूचा कणकण इस्लामच्या महानतेची साक्ष देत आहे. प्रत्येक कण व दगडगोटे असा गजर करीत आहेत की ह्याच भूमितून अल्लाहच्या संदेशाचे प्राबल्य वाढले. अशा तऱ्हेने मुस्लिमांची अंतःकरणे अल्लाहचे प्रेम व इस्लामवरील प्रेमाने ओसंडू लागतात. त्याचा असा काही चिरकाल टिकणारा ठसा त्यांच्या मनावर उमटला जातो की मरेपर्यंत तो त्यांच्या मनातून पुसला जात नाही.
धर्मकर्माबरोबरच या जगातीलही अनेक फायदे हजयात्रा करण्यामध्ये कृपाळू अल्लाहने ठेवलेले आहेत. हजच्या कारणाने मक्का शहर हे जगातील सर्व लोकांचे मध्यवर्ती केंद्र केले गेले आहे. एकाच विशिष्ट वेळी अल्लाहचे नामस्मरण करणारे लोक जगातील विभिन्न ठिकाणाहून येऊन तेथे एकत्रित होतात. एकमेकांना भेटतात. आपापसात इस्लामी प्रेम प्रस्थापित होते. मुस्लिम मग तो कोणत्याही देशाचा अगर कोणत्याही वंशाचा असला तरी सर्व एकच राष्ट्र असून सर्व एकमेकांचे बंधु आहेत, असाच ठसा मनावर उमटतो. या आधारे जर एकीकडे हजयात्रा अल्लाहची उपासना आहे तर त्याच्याबरोबर दुसऱ्या अंगाने ती जगातील एकूण मुस्लिमांची ‘कॉनफरन्स’ही आहे, तसेच मुस्लिमांचे विश्वबंधुत्व व एकोपा निर्माण करण्याचे सर्वात मोठे साधन आहे.
जिहाद
ईश्वराकडून तुम्हावर जे अखेरचे अनिवार्य कर्तव्य लागू करण्यात आले आहे ते इस्लामची पाठराखण करणे आहे. हे अनिवार्य कर्तव्य जरी इस्लामच्या आधारस्तंभात मोडत नसले तरी ते इस्लाममधील अत्यंत महत्त्वाच्या अनिवार्य कर्तव्यांपैकी एक आहे. ‘कुरआन’ व ‘हदीस’मध्ये यावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. इस्लामची पाठराखण व समर्थन म्हणजे काय? हे अनिवार्य कर्तव्य का ठरविण्यात आले आहे? या प्रश्नांचे उत्तर एका उदाहरणाने तुमच्या सहजपणे लक्षात येऊ शकते. कल्पना करा की एक मनुष्य तुमच्याशी मैत्री करतो. परंतु कसोटीच्या प्रत्येक प्रसंगी हे सिद्ध होते की तुम्हाबद्दल त्याच्याजवळ कसलीही सहानुभूती नाही. त्याला तुमच्या लाभहानीबद्दल किंचितही पर्वा नसते. एखाद्या कार्यामुळे तुमची हानी होत असली तरी स्वतःच्या हितापायी ते कार्य तो निःसंकोचपणे करतो. एखादे कृत्य तुम्हास लाभकारक असल्यास त्यापासून तो केवळ एवढ्यासाठीच अलिप्त राहतो की त्यात त्याला स्वतःला कसलाही लाभ नसतो. तुम्हावर एखादे संकट कोसळले तर तुम्हाला कसलीही मदत तो करीत नाही. तुमची निंदा जेथे कोठे होत असेल तर तो तुमच्या निंदकात सामील होतो अथवा कमीतकमी तुमच्याबद्दलची निंदा मूकपणे ऐकतो, तुमचे हितशत्रु तुम्हाविरुद्ध एखादे कारस्थान करीत असले तर त्यांच्याशी तो सामील होतो किंवा किमान तुम्हाला त्यांच्या कारस्थानापासून वाचविण्याचा कसलाही प्रयत्न करीत नाही. आता तुम्हीच सांगा की अशा माणसाला तुम्ही आपला मित्र म्हणाल? खचितच ‘नाही’, असे तुमचे उत्तर असेल, कारण तो जरी तोंडाने तुमच्याशी मैत्रीचा दावा करीत असला तरी वास्तविकपणे त्याच्या अंतःकरणात तुमच्याशी मैत्रीचा लवलेशही नाही. मैत्रीचा अर्थ तर असा आहे की जो मनुष्य तुमच्याशी मैत्री करीत असेल तर तुम्हाबद्दल त्याला अंतःकरणापासून विशुद्ध प्रेम हवे. तो तुमचा हितचिंतक, पाठीराखा असावा. प्रसंगी तो तुमच्या उपयोगी पडावा व शत्रूशी सामना करताना त्याने तुमचे सहाय्य करावयास हवे. तुमची निंदा ऐकून व तुमच्याबद्दल वाईट उद्गार ऐकून स्वस्थ बसण्याइतपत तो सहनशील नसावा. जर हे सर्व गुण त्याच्यात नसतील तर तो दांभिक आहे, त्याचा मैत्रीचा दावा फोल आहे.
या उदाहरणावरून तुम्ही अनुमान काढू शकता की जेव्हा तुम्ही मुस्लिम असण्याचा दावा करीत आहात तेव्हा तुम्हावर कोणकोणती कर्तव्ये येऊन पडतात. मुस्लिम असण्याचा अर्थ असा आहे की, तुमच्यात इस्लामबद्दल स्वाभिमान आहे. त्याच्यावरील ईमानबद्दल अभिमान आहे. इस्लामबद्दल खरेखुरे प्रेम व आपल्या श्रद्धावंत धर्मबांधवाबद्दल तुम्ही खरेखरे हितचिंतक आहात. जगात तुम्ही कसलेही ऐहिक कृत्य करीत असला तरी त्या पाठीमागे इस्लामचे इष्ट व मुस्लिमांचे कल्याण हाच दृष्टिकोन सतत तुमच्या डोळ्यांसमोर असेल. स्वहितापोटी अगर स्वतःची कसलीही हानी टाळण्यापोटी तुमच्याकडून असे एखादे कृत्य कदापिही घडू नये जे इस्लामच्या ध्येयधोरणाविरुद्ध अगर मुस्लिमांच्या कल्याणाविरुद्ध असेल. तसेच इस्लामला व मुस्लिमांना हितकारक असणाऱ्या कृत्यात तुम्ही तन-मन-धनाने सहभागी व्हावे व इस्लामला वा मुस्लिमांना अनिष्ट व हानिकारक असणाऱ्या प्रत्येक कृत्यापासून दूर राहावे. आपला धर्म व धर्मबांधवांची प्रतिष्ठा यांना स्वतःची प्रतिष्ठा मानली जावी. जसा स्वतःचा अपमान तुम्हाला सहन होत नाही अगदी तसेच इस्लामचा अवमान व अप्रतिष्ठा तुम्हाला सहन होता कामा नये. स्वतःचे हितरक्षण करताना तुम्ही जसे आपल्या वैऱ्याशी साथ करत नाही तसेच इस्लाम व मुस्लिमांशी वैरभाव बाळगणाऱ्यांशीही तुम्ही सहभागी होऊन त्यांची साथ करू नये. स्वतःच्या प्राणाच्या, मालमत्तेच्या व अब्रुच्या रक्षणार्थ सर्व प्रकारचा त्याग करण्यास तुम्ही जसे तयार होता त्याचप्रमाणे तुम्ही इस्लाम व मुस्लिमांच्या रक्षणासाठीही कसल्याही त्यागाची तयारी बाळगावी. स्वतःला मुस्लिम म्हणविणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये वरील गुण असणे आवश्यक आहे, नाहीतर त्याची गणना दांभिकामध्ये होऊन त्याचे आचरण त्याच्या तोंडी दाव्याला फोल ठरविल.
इस्लामसमर्थनाचे एक अंग असे आहे ज्याला ‘शरिअत’च्या भाषेत ‘जिहाद’, असे म्हणतात. ‘जिहाद’चा शब्दशः अर्थ एखाद्या कृत्यासाठी आपली सर्व शक्ती पणास लावणे असा आहे. या अर्थाने अलहचा आदेश सर्वव्यापी करण्यासाठी जो कोणी शारीरिक कष्टाने, लेखणीने, धनसंपत्तीने, वाणीने प्रयत्नांची पराकाष्ठा करतो तोही ‘जिहाद’च करीत असतो. परंतु सर्व ऐहिक उद्दिष्टापासून संपूर्णपणे निर्मळ व केवळ ईश्वरेच्छेपोटी व इस्लामच्या वैऱ्याशी जे युद्ध केले जाते त्या युद्धासाठी विशेष करून ‘जिहाद’ शब्द प्रयुक्त झालेला आहे. वरील शेवटच्या ‘जिहाद’ला शरीअतमध्ये ‘फर्जे किफाया’ असे नामकरण आहे. ‘फर्जे किफाया’ हे एक असे कर्तव्य आहे जे सर्व मुस्लिमांवर येऊन तर पडते, परंतु ते कर्तव्य जर एका समूहाने पार पाडले तर त्या कर्तव्याची पूर्तता करण्याची इतर मुस्लिमांवरील जबाबदारी टळून जाते. खरेतर एखाद्या इस्लामी राष्ट्रावर शत्रूचा हल्ला झाल्यास त्या राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकावर शत्रूशी ‘जिहाद’ करणे हे नमाज व ‘रोजे’प्रमाणेच एक अनिवार्य कर्तव्य बनते. जर ते राष्ट्र आपले रक्षण करण्यास असमर्थ असेल तर त्याच्या शेजारी असणाऱ्या देशातील प्रत्येक मुस्लिमांनी तन-मन-धनाने त्याचे सहाय्य करणे हे अनिवार्य कर्तव्य होते. त्यांची कुमक मिळूनही जर शत्रूचे निवारण होऊ शकले नाही तर सर्व जगातील एकूण मुस्लिमांसाठी, ज्याप्रमाणे नमाज व ‘रोजे’ हे अनिवार्य कर्तव्य आहे त्याचप्रमाणे त्या आक्रमित राष्ट्राची पाठराखण करणे हेही अनिवार्य कर्तव्य ठरते. हे अनिवार्य कर्तव्य पार पाडण्यात चुकारपणा करील तर तो अल्लाहच्या दृष्टीने गुन्हेगार ठरेल. या परिस्थितीत ‘जिहाद’चे महात्म्य नमाज व रोजे यापेक्षाही अधिक होते. कारण ती परिस्थिती ‘ईमान’च्या कसोटीचा प्रसंग असते. संकटकाळात जो मनुष्य इस्लाम व मुस्लिमांस साथ देत नाही, त्याचा ‘ईमान’च संशयास्पद आहे. तसे झाले तर त्याची नमाज काय कामाची व त्याचे रोज्यांचे कसले मूल्य? एखादा नतदृष्ट असा असेल की त्या संकटकाळात तो मनुष्य इस्लामच्या व मुस्लिमांच्या शत्रूंना साथ देतो तर तो मनुष्य खात्रीने दांभिक आहे. त्याची नमाज, त्याचा रोजा, त्याची जकात व त्याचा हज हे सर्व काही निरर्थक आहे.
संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *