यानंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी कुरआनच्या चार आयती पठण केल्या. या चारही आयतीत अशी शिकवण आहे,
“अल्लाहचे भय बाळगा आणि त्याची अवज्ञा करू नका.” अर्थात अल्लाहचे भय हे जीवनाच्या म्हणजे इहलोकी आणि परलोकी जीवनाच्या यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी वारंवार याचे स्मरण करून दिले आणि प्रामुख्याने लग्नसमारंभाच्या आनंदाच्या प्रसंगी. माणूस आनंदाच्या भरात अल्लाहची अवज्ञा करण्याची जास्त शक्यता असते. वस्तुस्थिती अशी आहे की माणूस हा अल्लाहच्या तुलनेत शून्य आहे. तो अन्न-पाणी आणि एकेका श्वासासाठी अल्लाहवरच अवलंबून आहे. मात्र संपत्ती आणि सामथ्र्याच्या झिंगेत त्याला अल्लाहचा विसर पडतो आणि कधी-कधी तर संपत्ती आणि सामर्थ्य नसतानादेखील तो आपला विवेक हरवून बसतो. वाटेल ते करीत राहतो. आपल्या इच्छा-आकांक्षाची पूर्तता करताना अल्लाहच्या आज्ञांची पायमल्ली करीत जातो. मात्र एक दिवस असा येतो की त्याचे सर्वकाही नष्ट होते. त्याची संपत्ती आणि सामर्थ्य त्याच्याकडून हिरावून घेण्यात येते. याच दुष्प्रवृत्तीमुळे मोठमोठी राष्ट्रे नष्ट पावली. मनुष्य हा मुळात अतिशय दुर्बल आणि परावलंबी आहे. तो आत्मबळावर काहीही करू शकत नाही. त्याने अल्लाहस शरण राहूनच जगावयास हवे. त्याचे दास्यत्व पत्करून आणि त्याच्या अभयछत्रात राहून जगावयास हवे. एके दिवशी समस्त मानवांना त्याच्या न्यायालयात हजर होऊन आपल्या कर्मांचा जाब द्यावा लागणार आहे. अल्लाहच्या आज्ञांचे पालन करून जीवन जगणाऱ्यांसाठी निश्चितच स्वर्गाची प्राप्ती होईल आणि अवज्ञाकारीसाठी भयावह नरकाग्नीच्या उग्र ज्वाला पेटविण्यात आलेल्या आहेत. धन्य ते लोक ज्यांनी ईशपरायणशील व आज्ञाधारकतेने जीवन व्यतित केले आणि सुखदु:खाच्या कोणत्याही स्थितीत त्याना आपल्या कामगिरीचा जाब अल्लाहला धावा लागेल याचा विसर पडत नाही.
0 Comments