ईद-उल-अज़्हा ला आपल्याकडे बकरी ईद ही म्हटले जाते जे की चुकीचे आहे. ही ईद केवळ बकऱ्याची कुर्बानी देण्यापर्यंत मर्यादित नसून या ईदच्या मागे फार मोठा इतिहास आहे. हजरत इब्राहिम अलै. आपले एकुलते एक सुपूत्र इस्माईल अलै. यांची अल्लाहच्या आदेशाने कुर्बानी देण्याची तयारी असल्याच्या घटनेची आठवण म्हणून ही ईद साजरी केली जाते. या ईदचा थोडक्यात संदेश त्याग आहे. आपण स्वतः या घटनेपासून प्रेरणा घेऊन गरीबांसाठी, देशासाठी काय त्याग करू शकतो याचा वार्षिक आढावा घेण्याची संधी प्रत्येकाला ही ईद उपलब्ध करून देते. ईदनिमित्त आजच्या महामारीच्या युगात रक्त, प्लाज्मा दान तसेच वंचित घटकांसाठी आपण काय त्याग करु शकतो, हा विचार मनात येणे आणी तो प्रत्यक्षात रुजविने हे जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने ईदुल अज्हा साजरी करण्याचे सार्थक होईल आणी खऱ्या अर्थाने आपण इब्राहीम अलै. यांचे अनुयायी असल्याचे सिद्ध होईल.
ईद-उल-अज्हा संपूर्ण जगभर साजरी केली जात आहे. इस्लामी कॅलेंडरच्या बाराव्या महिन्यामध्येच ज्याला जिलहज्जा म्हणतात जगाच्या काना-कोपऱ्यामधून लाखो हाजी (भाविक) अल्लाहच्या मार्गामध्ये म्हणजेच हज यात्रे मध्ये सामिल होत असतात व तेथे इब्राहीम अलै. च्या आपल्या सुपूत्राच्या कुर्बानीच्या घटनेची आठवण ठेवून प्रतिकात्मकरित्या बकऱ्याची किंवा उंटाची कुर्बानी देत असतात. जे हजला जावू शकत नाहीत ते आपापल्या ठिकाणी कुर्बानी देवून आपण मानवतेच्या मार्गामध्ये त्याग करण्यासाठी बांधिल असल्याची ग्वाही देतात. परंतु दुर्दैवाने कोरोनामुळे गत आणी ह्या वर्षी सऊदी अरेबिया व्यतिरिक्त इतर देशातील हज यात्रेकरूंना सामिल होण्याची परवानगी नाही.
हज हा खरे तर अरबी शब्द– त्याचा अर्थ होतो – दर्शन करण्याचा निश्चय करणे. हजसाठी जगभरातील लाखोंच्या संख्येने मुस्लिमबांधव काबाच्या दर्शनाचा निश्चय करुन मक्का या शहराकडे निघतात. हज मुस्लिम बांधवाना संपूर्ण आयुष्यात एकदाच पार पाडण्याचे संकेत देण्यात आले आहेत जो कोणी मक्का शहरापर्यंत जाण्या-येण्याचा खर्च करण्याची क्षमता बाळ्गतो केवळ त्या व्यक्तीवरच हे कर्तव्य अनिवार्य करण्यात आले आहेत. हा खर्च स्वकष्टार्जित असेल तर उत्तमच. त्यामुळेच अवैधमार्गार्तून कमाविलेल्या संपत्तीतून हज यात्रा करता येत नाही.
हजचा इतिहास फार उद्बोधक आहे. आजपासून 4 हजार 500 वर्षापूर्वी हजरत इब्राहिम (अलै.) यांनी अल्लाह ची उपासणा करण्याखातर एक छोटेसे घर बांधले होते. त्याचा उद्देशच जणू असा होता की जगातील कोणत्याही भाविकाने जो शरिराने तंदुरूस्त असेल आणी आर्थिक क्षमता बाळगू शकतो, त्यानेच काबाचे दर्शन घेण्यासाठी निघावे. परंतु निघताना आपली अंत:करणे निर्मळ ठेवावीत तसेच वासनांवर आवर घालावा. रक्तपात, अनाचार , अर्वाच्य बोलणे ह्या पासून जो संयम राखू शकेल त्यानेच अल्लाहचा गुलाम बनून मार्गस्थ व्हावे. हे नियम अर्थात बंधन घालण्याचे कारण म्हणजे तो काळ असा होता कि बहुतेक सर्वांना अल्लाहचे विस्मरण झाले होते. भानामती, जादुटोना व ताईत्त-गंड्याचे स्त्तोम माजले होते. ह्या अनिष्ट प्रथा, चालीरिति त्यांना सहन होनाऱ्या नव्हत्या. म्हणूनच त्यांनी परिवर्तनचा हा विडा उचलला.
हजरत इब्राहीम (अलै.) व हजरत ईस्माईल (अलै.) यांच्या कारकिर्दित हजला महत्त्वाचे स्वरुप प्राप्त झाले. परंतु त्यांच्या हयातीनंतर हजमध्ये एवढ्या बिघाडाचे स्वरुप आले की अहंकार, स्वार्थ, स्वैराचार, अश्लिलतेने थैमान घातले होते. जणू हा काळ अंधःकारमय म्हणून गणला जावू लागला होता. ही स्थिती अशीच पुढे हजारो वर्षे चालत राहिली.
या काळात कोणी पैगम्बर जन्माला आला नाही की, पैगम्बरांची शिकवण देखील लोकापर्यंत पोहोचली गेली नाही. अखेर हजरत इब्राहीम (अलै.) ह्यांचे भाकित खरे ठरले. त्यांच्या संततीमधून एक परिपूर्ण व्यक्तीमत्व 6 व्या शतकात जन्मास आले. ज्यांचे नाव मुहम्मद बिन अब्दुल्लाह (स.) असे होते. त्यांचा जन्म झाला व अरबस्थानात जणू नवचैतन्य निर्माण झाले. भविष्यातील ज्या कार्याचा आराखडा हजारो वर्षापूर्वी हजरत इब्राहिम (अ.) ह्यानि बांधला होता. ते पूर्णत्वास तर आलेच परंतु केवळ 23 वर्षाच्या कालखंडात सर्व अनिष्ट प्रथांना पायबंद घालून एक वेगळाच आदर्श जगासमोर ठेवला गेला. असे धाडस आणी कार्य करणारी व्यक्ती सामान्य असूच शकत नव्हती. त्यांचे हे कार्य त्या काळात तर उल्लेखनिय होतेच परंतू आजही 1442 वर्षानंतर सर्व मानव जातीला प्रेरणा देणारे असेच आहे. अज्ञान आणि अंधकारमय युगातील सर्व अनिष्ट प्रथा नष्ट केल्या गेल्या.
’’हज्जचे महिने नियत (निश्चित केलेले) आहेत. जी व्यक्ती ह्या निश्चित महिन्यामध्ये हज करण्याचे ठरवील तर त्याने वैषयिक वासनेपासून दूर रहावे. आणि अभद्र बोलू नये आणि भांडणतंटे करू नये. जे काही तुम्ही सत्कर्मे कराल ते अल्लाह जाणतो आहे आणि हज्जच्या काळांत सोबत शिदोरी घ्या. सर्वोत्तम शिदोरी म्हणजे अल्लाहचे भय बाळगणे होय. आणि हे ज्ञानीजनहो माझे भय बाळगा.’’ (सुरे बकरा :197)
’’नंतर जेव्हा हज्जसंबंधीचा विधी तुम्ही पूर्ण कराल तेव्हा त्यानंतर तुम्ही अल्लाहचे स्मरण करा जसे तुम्ही आपल्या पूर्वजांचे स्मरण करीत होतात. किंबहुना त्याहीपेक्षा अधिक स्मरण करा, (परंतु अल्लाहचे स्मरण करणार्यांमध्येही खूप फरक आहे.) त्यांच्यापैकी काही तर असे आहेत जे म्हणतात कि, ’’हे आमच्या पालनकर्त्या, आम्हाला या लोकीच सर्वकाही दे. अशा व्यक्तीसाठी परलोकमध्ये काहीही वाट्याला येणार नाही.’’ (सुरतुल बकरा :200)
जगभरातून सामील झालेले हाजी यांचा देश, प्रांत बोलीभाषा ही निरनिराळी असू शकते, परंतू त्यांनी परिधान केलेला पोशाख (एहराम) मात्र सारखाच असतो. गरीब असो अथवा श्रीमंत सर्वजण अल्लाहसमोर समसमान. हाच संदेश ह्या यात्रेतुन पहावयास मिळ्तो. हज यात्रेत श्रद्धावंतांच्या समोर जसजसा काबागृह जवळ येवू लागतो, तसतसा हा हाजी अल्लाहच्या भेटीसाठी बेभान होतो. जीवनात केलेली दुष्कृत्यांबद्दल मनात अपराधी भावना निर्माण होतात. तसेच या यात्रेतून मिळालेल्या सकारात्मक उर्जेतून हाजी भविष्यकाळात एक चांगला, आज्ञाधारक व सुजान नागरीक बनण्याची प्रतिज्ञा मनात करूनच मक्का सोडतो.जणू एक वेगळीच उर्जा त्याच्या अंगात संचारते. हज यात्रेत सामिल झालेल्या सर्वच हाजींची हीच अवस्था असते. हज प्रक्रियेच्या दरम्यान प्रत्येक हाजी हा साक्षात अल्लाहच्या भेटीसाठी लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीका लकलब्बैक (मी हजर आहे, तुझ्या घराच्या दर्शनासाठी) अशा घोषणा करत पुढे सरकत असतो.
मुहम्मद पैगम्बर (स.) हे अंतिम प्रेषित होत त्यांच्यानंतर कोणी प्रेषित जन्माला येणार नाही हे सत्य आहे. त्यांनी हजमध्ये सामील झालेल्या यात्रेकरुसाठी दिलेले शेवटचे भाषण आजही तेवढेच समर्पक व प्रत्येकाने अनुकरण करावे असेच आहे. ह्या शेवटच्या संवादातून त्यानी सर्व मानव एकमेकांचे बंधूच असून मानवतावाद आणी विश्व- बंधुत्वाचा संदेशच दिला. वास्तविक पाहता जगातील मानवाधिकाराची ही पहिलीच सनद असून, त्यानंतर पुढच्या कालखंडात मानवाधिकाराच्या संवेदना जागतिक स्तरावर लोकांमध्ये जाग्या झाल्या.
– अस्लम जमादार, पुणे
(लेखक परिवर्तन – अल्पसंख्यांक शैक्षणिक चळ्वळीचे संस्थापक-अध्यक्ष आहेत.)
0 Comments