Home A blog A इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्तीचा एकमेव मार्ग

इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्तीचा एकमेव मार्ग

प्रा. हाजी फातिमा मुजावर 
पनवेल, 8691837086
जगाची निर्मिती झाल्यापासून हजारो प्रेषित आणि सुधारक येवून गेले. सर्वांनीच समाज सुधारणेचे कार्य केले. पण अंतिम प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांच्याद्वारे जी क्रांती अल्पकाळात घडली त्याचे उदाहरण या जगाच्या इतिहासात सापडणे अशक्य आहे. प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांनी प्रस्तुत केलेला ‘इस्लाम’ हा धर्म जीवनाचे सर्वांग सुंदर मार्गदर्शन करणारी समता, बंधुता आणि एकता प्रदान करणारी समाज व्यवस्था देतो. तसेच अल्लाहाने समस्त मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी या धर्तीवर ईश ग्रंथाचे नियोजन केले. पवित्र कुरआन हा ईश ग्रंथाच्या मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. हा पवित्र ग्रंथ कुरआन मुहम्मद (स.अ.) यांच्यावर अवतरीत झाला. जो मानव जातीच्या समस्त समस्यांचे निराकरण करू शकतो. या पवित्र कुरआनचे मार्गदर्शनच ‘इस्लाम’ची शक्ती आहे, जी मनुष्याला विचार आणि आचाराच्या उच्चतम शिखरावर विराजमान करते. शांती व सुरक्षिततेचा मार्ग दाखविते. कुरआनच्या शिकवणीने विचार, मन आणि बुध्दी यांना चालना मिळते, वैचारिक शक्ती प्राप्त होते, असत्याविरूध्द आणि रूढीवादाविरूध्द प्रत्यक्ष आवाज उठवते आणि प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांनी सादर केलेल्या इस्लामच्या शिकवणुकीचा माणूस स्वीकार करतो. सदाचार आणि सत्यप्रियतेच्या शाश्वत मुल्यांना उराशी कवटाळतो. प्रेषित मुहम्मद (स.अ.) इतिहासातील एकमात्र व्यक्तिमत्व आहेत जे धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष दोन्ही मैदानात एकाच वेळी सर्वाधिक यशस्वी ठरले आहे. एक विख्यात गणिततज्ञ अंतराळ शास्त्रज्ञ आणि इतिहासकार मायकेल एच. हार्टने जगाच्या इतिहासात सर्वात प्रभावशाली ठरलेल्या 100 (शंभर) व्यक्तीमत्वाची अभ्यासपूर्ण यादी ‘द हंड्रेड’  च्या नावाने प्रसिध्द केले आहे.  त्यात पहिले स्थान प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांना देण्यात आले आहे. प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांचा उल्लेख वारंवार समतेचा प्रणेता म्हणून केला जातो. ‘इस्लाम’ म्हणजे शांति, नम्रता आणि अल्लाहच्या इच्छेपुढे शरणागती. अल्लाहने मानवाच्या कल्याणासाठी आणि मार्गदर्शनासाठी या जगात पाठविलेला हा धर्म आहे. इस्लामचा अर्थ लक्षात घेतला तर या धर्माने विश्वशांती व विश्वकल्याणाचा संदेश या जगाला दिला आहे. कलमा, नमाज, रोजा, जकात आणि ‘हजयात्रा’ ही इस्लाम धर्माचे आधारस्तंभ आहेत. 
इस्लामचे पहिले मुलभूत तत्व – “कलमा-ए- तयब्बा” चा अर्थ आहे अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही व मुहम्मद (स.अ.) अल्लाहचे प्रेषित आहेत.
इस्लामचे दुसरे मूलभूत तत्व – ‘रिसालत’ म्हणजे प्रेषितत्व हे आहे. अल्लाह एकमेव एक आहे व ईशभक्तीच्या श्रध्देला एक संकृती, एक सभ्यता आणि एक जीवनपध्दतीचे स्वरूप देण्याचे काम पैगंबराचे वैचारिक व व्यवहारीक मार्गदर्शन करीत असते. त्यांच्याचद्वारे आम्हांला कायदा प्राप्त होतो. या कायद्याला अभिप्रेत असलेली जीवन व्यवस्था प्रस्थापित होते आणि म्हणून (तौहीद) एकेश्वर वादानंतर रिसालतवर ईमान आणते. इस्लामची समाजरचना या तत्वावर आधारलेली आहे. मूर्ती पुजा इस्लाममध्ये निषिध्द मानली जाते. इस्लाम सामाजिक वृत्तीच्या विकासाला जास्त महत्व देतो हे नमाज, रोजा, जकात, हज यासारख्या मूलभुत धार्मिक कार्याने समजते. इस्लाम माणसाची ईश्वर विषयक जी कर्तव्य आहेत त्यापेक्षा त्याची आपल्या बांधवांसंबंधी जी कर्तव्य आहेत त्याला अग्रक्रम देतो व जगात शांति प्रस्थापित करतो. 
नमाज :- उदाहरणार्थ अजान झाली तर सर्व नमाजसाठी मशिदीत जातात. नमाज आदा करतांना मशिदीत गरीब, श्रीमंत, काळे-गोरे एकत्र जमा होतात, राव असो वा रंक असो, खांद्याला खांदा लावून, गुडघे टेकवून परमेश्वराची आराधना (इबादत) करतात. दुसऱ्याला कमी लेखण्याची, तुच्छ समजण्याची प्रवृत्ती इस्लाम धर्मात आढळत नाही. अहंकाराला मुळापासून नष्ट केले जाते. इस्लाम हा पहिला धर्म आहे कि ज्या धर्माने लोकशाही म्हणजे काय हे शिकविले. इस्लामची लोकशाही पाचवेळा दृष्य स्वरूप धारण करते. 
आम्ही सर्व भारतीय. भारतात हिंदू-मंदिरात परमेश्वर आळवतो, मुसलमान – मशीदीमध्ये संभाषण करतो, ख्रिस्त – चर्चमध्ये परमेश्वराला हाक मारतो, शीख – गुरूद्वारामध्ये प्रार्थना करतो. पण हे सर्व संपल्यावर मंदिरातून मशिदीतून गुरूद्वारातून किंवा चर्चमधुन जो माणूस बाहेर पडतो तो हिंदू नाही, मुसलमान नाही, ख्रिस्त नाही, शीख नाही तो फक्त भारतीय आहे, माणुस आहे हे इस्लाम शिकवतो.  धर्म हा व्यक्ती आणि अल्लाहास जोडण्याचा प्रयत्न करतो हे प्रेषित मुहम्मद (स.अ.) ची शिकवण कुणीही विसरता कामा नये जी जगात शांती निर्माण करते. 
प्रेषित मुहम्मद (स.अ.) जगातले पहिले व्यक्तीमत्व आहेत ज्यांनी इतिहासात पहिल्यांदा समतेचा व्यवहारीक संदेश दिला. केवळ 23 वर्षाच्या कालावधीत त्यांनी या समतेवर आधारित समाज स्थापन केला. जैद नावाच्या काळया  गुलामाला आपली आत्या बहिण देवून काळया गोऱ्याचा भेद प्रेषितांनी नष्ट केला. हरिसा नावाच्या गुलामाच्या घटस्फोटीतेशी विवाह करून तुच्छ समजल्या जाणाऱ्या  घस्फोटीतेला प्रेषितांची पत्नी बनण्याचा बहुमान दिला. बिलाल नावाच्या तुच्छ समजल्या जाणाऱ्या गुलामाला काबागृहावर चढून अजान देण्याचा आदेश देवून कोणताच माणूस अपवित्र नसल्याचा संदेश प्रेषितांनी दिला आणि स्पष्ट केले कि, “आजपासून रानटीपणाच्या सर्व प्रथा आणि परंपरा मी माझ्या पायदळी तुडवीत आहे. कोणाला कोणावर कसलेही प्रभुत्व नसून सर्व समान आहेत. एकाच मानवाची संतान आहेत. सर्वांना एकाच मानवाची संतान मानणे इस्लामच्या मुलभूत सिध्दांतापैकी एक सिध्दांत आहे. समता, बंधुत्व निरंतर नांदावयास हवे. जातीचा, मताचा, लिंगाचा आणि वर्णाचा भेद समाजात कदापी शिरणार नाही अशी इस्लामची तत्वे आहेत जी माणसाच्या वैचारिक प्रगतीची द्योतक आहेत. 
इस्लामचे आगमन भारतात भक्तीमार्गाने इ.स. (629) मध्ये पैगंबराच्या हयातीत झाले. केरळमधील चेरामन पेरूमल मस्जिद भारतामधील पहिली मस्जिद. केरळातील चेरानंद साम्राज्याचा शेवटचा राजाला इस्लामची ओळख झाली आणि त्यांनी मक्काकडे प्रस्थान केले. प्रेषित मुहम्मद (स.अ.) याच्या सान्निध्यात राहून त्यांना इस्लाम धर्म स्विकारला आणि स्वत:चे नांव ताजुद्दीन (रजि.) असे ठेवले. जेद्दातील राजाच्या बहीणीशी त्यांनी विवाह केला आणि तेथेच स्थायिक झाले. जीवनातील अंतिम काळात त्यांनी केरळमधील आपल्या नातेवाईकांना पत्र लिहून इस्लाम धर्माचा प्रसार केला. 
इस्लाममधील एक महत्वपूर्ण असलेला स्तंभ जकात आहे. जकात इस्लाम धर्मात गोरगरिबांसाठी आहेत. प्रत्येकी मुस्लीम जो जकात देण्यास पात्र आहे त्यांने आपल्या कमाईच्या प्रतिशेकडा अडीच रूपये प्रमाणे जकात गोरगरिब, अनाथ विधवा अथवा गरजवंतांना द्यावी. गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदतीसाठी प्रेषितांनी जकातची योजना इस्लाममध्ये केली. ईश्वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरीता जकात आहे. दिव्य कुराणच्या सुरह-9:60 मध्ये नमूद केले गेले आहे, जगातील सर्व लोकांनी जर या तत्वावर अनुकरण केले तर भूकबळी, कुपोषण अशा खूपच समस्या दूर होतील. 
इस्लाममध्ये सावकारी निषिध्द आहे. कर्ज दिलेल्या पैशांवर व्याज घेणे निषिध्द (हराम) आहे. अल्लाहने (व्यापाराला वैध केला आहे आणि व्याजाला निषिध्द केले आहे) दिव्य कुरआन (सुरह 2: 275)
व्याजाच्या शापाने ग्रस्त झालेल्या समाजाला प्रेषितांनी सावकारी पाशातून मुक्त करून व्याजमुक्त अर्थव्यवस्थेचा संदेश दिला आणि केवळ 10 वर्षांच्या कालखंडात व्याजमुक्त अर्थव्यवस्था प्रस्थापित करून दाखविली. अरब समाजात लोक सावकारी एक भयंकर पाप समजू लागले. केवळ व्याजाच्या नावाने सावकार थरथर कापू लागले. आपल्याकडे अधिक असलेली रक्कम लोक स्वत: दान करू लागले. गरीब व गरजवंताना पैसे उधार मागण्याची परिस्थितीच कधी प्रेषितांनी येवू दिली नाही. अरब प्रदेश पाहता पाहतां आर्थिकदृष्टया इतका सधन-संपन्न झाला कि ज्याच्या आधारे अरब समाजातून दारिद्रयाचा नाश झाला; जनता दान देण्यासाठी हातात रक्कम घेवून फिरू लागली. मुस्लीम साम्राज्याने (इस्लामी नव्हे) जगावर 1000 वर्षांपेक्षा जास्त काळ सत्ता गाजविली. या 1000 वर्षांत एकाही व्याजाच्या व्यवहाराची नोंद इतिहासात आढळत नाही. मुस्लीम शासनाला कधी कर्ज घ्यावे लागल्याची नोंद इतिहासात सापडत नाही. या उलट इतर शासनांना केलेल्या भरमसाठ मदतीच्या नोंदी आढळतात. आज जगाला व्याजमुक्त अर्थव्यवस्थेची ओढ लागली आहे.  व्याजाच्या पाशातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी आज श्रमिक वर्ग व्याजमुक्तीची मागणी करू लागला आहे. 
भारतात लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मुख्य कारण गरिबी नसून चक्रवाढ व्याजाचा बोजा आहे. कारण शेतकरी पूर्वीही गरीब होते परंतु गरिबीमुळे त्यांनी आत्महत्या केली नाही. इस्लामचे हे धोरण स्विकारल्यास आज भारताच्या प्रगतीस पोषक ठरणार आहे. मानवी इतिहासात या नवीन समाजास उच्च स्थान प्राप्त होणार आहे. मानवतेच्या तुलनेत संपत्ती, द्रव्य आणि धनास श्रेष्ठत्व देण्याऐवजी मानवता आणि सदाचारास संपत्तीपेक्षा जास्त महत्व प्राप्त होते. अर्थात मानवतेच्या विकासाचा प्रगतीचा मार्ग याने मोकळा होतो. 
रोजा :- प्रेमाने व सहानुभूतीने वागा, कठोर होवू नका, दयाळू राहा. तुम्ही सदाचरणी बनावे, तुमच्यातील वाईटपणा तुमच्यापासून दूर व्हावा म्हणुन उपवास (रोजे) तुमच्यावर अनिवार्य केले आहेत. खोटे बोलू नये, दुसऱ्यांची निंदा करू नये, व्याभिचार करू नये, रक्तपात करू नये, एका व्यक्तीचे प्राण वाचविणे म्हणजे सर्व मानव जातीचे प्राण वाचविणे आणि एका व्यक्तीची हत्या म्हणजे मानव जातीची हत्या, तसेच दिला शब्द पाळा, पाप टाळा, विश्वासघात करू नका ही इस्लामची शिकवण व तत्वप्रणाली वाखाणण्याजोगी आहे. दारूमुळे मनुष्याचे जीवन यातनामय बनते. उपवास दारूबंदीस जालीम उपाय आहे. एके दिवशी सर्वांना ईश्वराच्या न्यायासमोर उभे राहावयाचे आहे हे विसरू नका. वृध्दापकाळात आपल्या मातापित्याकडे लक्ष देण्यासंबंधी विसरू नका. तहानलेल्यांना पाणी देणे, आंधळयांना मदत करणे, रोजा ठेवा, ज्ञानार्जन करा, त्यामुळे काय निषिध्द आहे आणि काय नाही हे लक्षात येईल. 
हज :- जर ऐपत असेल तर मक्केची हज यात्रा करा. येथे जगातील लोक एकत्र येतात. जगभरातील मुस्लिम संस्कृतीची तोंडओळख होते. 
-: मुस्लिमांचे स्त्रियांसाठी योगदान :-
ज्याकाळी जगातील श्रेष्ठ तत्वज्ञान स्त्रीमध्ये आत्मा असतो कि नाही? सारख्या गप्पा मारण्यात व्यस्त होते त्या काळात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्त्रीला सर्वच क्षेत्रात समान (एकसारखे नव्हे) अधिकार देवून टाकले. प्रसिध्द मार्क्सवादी भारतीय विचारवंत एम.एन. रॉय आपल्या ‘इस्लामचे ऐतिहासिक योगदान’ या पुस्तकात स्त्रीला माणूस म्हणून दर्जा देणारा धर्म ‘इस्लाम’ असल्याचा उल्लेख करून प्रेषितांच्या कार्याचा गौरव करतात. अरब समाजाच्या नसानसात भिनलेल्या, जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरायच्या प्रथेला केवळ 13 वर्षाच्या कालखंडात प्रेषितांनी अशाप्रकारे हद्दपार करून दाखविले की मागील 1400 वर्षाच्या इतिहासात एकाही मुलीला केवळ मुलगी असल्यामुळे मारण्यात आलेले नाही. 
जगात महिलांसाठी इस्लाम एक क्रांतिकारक संदेश ठरला आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रख्यात जर्मन महिला प्राध्यापिका अ‍ॅनीमेरी स्किमेल म्हणतात की, तुलनात्मक दृष्टीने पाहिले असतां असे दिसते कि इस्लामने महिलांना दिलेले अधिकार इतरांच्या मानाने कित्येक पटीने पुरोगामी आहेत. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आईला हा दर्जा दिला कि धर्मातील सर्वोच्च संकल्पना असलेला स्वर्ग आईच्या पायाखाली आणून ठेवला आणि ‘जन्नत मां के कदमो के नीचे’ असल्याची शिकवण दिली. पत्नीला हा दर्जा दिला कि ‘तुमच्यापैकी सर्वोत्तम मुस्लीम तो आहे जो आपल्या पत्नीसाठी सर्वोत्तम पती आहे.’ मुलीला हे स्थान दिले कि “ज्याला एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुली असतील आणि तो त्यांचे पालनपोषण न्यायोचित पध्दतीने करेल, तो स्वर्गात माझा शेजारी असेल” अशी शिकवण प्रेषितांनी दिली. इस्लामच्या शिकवणीत अत्यंत संतुलन आहे तो प्रगतीचा एक मार्ग आहे. 
: इस्लाम मुक्तीचा मार्ग :
मानवी  समाजाला सर्वार्थाने सुखी होण्यासाठी दोन प्रकारच्या मुक्ती आवश्यक असते. एक म्हणजे आध्यात्मिक मुक्ती आणि दुसरी भौतिक मुक्ती. इस्लामच्या अभ्यासाने, शिकवणीने, आचरणाने आध्यात्मिक मुक्ती म्हणजे स्वचित्ताची शुध्दी करणे व विकार मुक्त होणे सहज शक्य आहे. नमाज, रोजा याचे उत्तम उपाय आहेत. भौतिक जगाचे प्रश्‍न व त्यातून उद्भवणारे राग, लोभ हे विकार यापासून तो दूर राहू शकतो. इस्लाम कोणत्याही जाती धर्माच्या माणसाशी भांडण, युध्दापासून दूर राहण्याची शिकवण देतो. अध्यात्माचा खरा अर्थ राग, लोभादी विकारापासून मुक्ती मिळविणे हा आहे. भौतिक मुक्ती मिळवून देण्यासाठी इस्लामने महत्वाची भुमिका निभावली आहे. शिक्षण, आरोग्य, राहणीमानाचा दर्जा, जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा प्रसार, प्रचार इस्लाम नेहमीच करत असतो. प्रचलित काळ भौतिक मुक्तीचा असल्याने दिशा ओळखून सर्व जाती-धर्मीय देशप्रेमींनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास भौतिक मुक्ती मिळावयास वेळ लागणार नाही.  (लेखिका : अध्यक्षा 11 व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पनवेल)
संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *