जर असे नाही तर मग विचार करा की दोहोंमध्ये मूळ फरक काय आहे? याचे उत्तर केवळ एक आहे आणि ते असे की दोहोंमध्ये फरक इस्लाम व अनेकेश्वरत्वामुळे पडतो. इस्लामचा अर्थ अल्लाहची आज्ञा पाळणे आहे. आणि अनेकेश्वरत्वाच अर्थ अल्लाहची अवज्ञा करणे आहे. मुस्लिम व अनेकेश्वरवादी (अल्लाहचा इन्कार करणारे) दोघे मनुष्य आहेत. दोघे अल्लाहचे दास आहेत. परंतु एक मनुष्य अशा कारणाने श्रेष्ठ बनतो की तो त्याच्या स्वामीला ओळखतो, त्याच्या आज्ञेचे पालन करतो आणि त्याच्या अवज्ञेच्या परिणामाचे भय बाळगतो. दुसरा मनुष्य उच्च स्थानावरून या कारणास्तव खाली कोसळतो की तो त्याच्या स्वामीला ओळखत नाही आणि त्याची अवज्ञा करतो. यामुळेच अल्लाह आज्ञाधारकांवर (मुस्लिमांवर) प्रसन्न आहे व अनेकेश्वरवाद्यावर (अवज्ञाकारींवर) अप्रसन्न. तो आज्ञाधारकांना (मुस्लिमांना) जन्नत देण्याचा वायदा करतो आणि अनेकेश्वरवाद्यांना (अवज्ञाकारींना) म्हणतो की जहन्नममध्ये टाकीन.
फरकाचे कारण – ज्ञान व कर्म
यावरून असे कळते की आज्ञाधारकाला (मुस्लिमाला) अनेकेश्वरवादी (काफिर) पासून वेगळे करणारी मूळ कारणे हीच आहेत- एक ज्ञान व दुसरे कर्म. म्हणजे प्रथम तर त्याला हे जाणून घेतले पाहिजे की त्याचा स्वामी कोण आहे? त्याचे आदेश काय आहेत? त्याच्या इच्छेनुसार चालण्याचा अर्थ काय आहे? कोणते कर्म केल्याने तो प्रसन्न होतो व कोणत्या कर्मामुळे तो अप्रसन्न होतो? मग जेव्हा या गोष्टी त्याला कळल्या तेव्हा माणसाचे हे कर्तव्य ठरते की त्याने स्वत:ला स्वामीचा दास बनवावे. जशी मालकाची इच्छा असेल त्याप्रमाणे वागावे आणि जी स्वत:ची इच्छा असेल व मालकाची आज्ञा त्याच्या विरूद्ध असेल तर त्याने मनाचे म्हणणे ऐवूâ नये आणि स्वामीच्या आज्ञेचे पालन करावे. एखादे कर्म त्याला चांगले वाटत असेल आणि स्वामीने त्याला वाईट म्हटले तर त्याला वाईट समजावे. एखादे दुसरे कर्म त्याला वाईट वाटत असेल, परंतु स्वामीने सांगितले की ते चांगले आहे तर त्याला चांगलेच समजावे. एखाद्या कामात त्याला नुकसान दिसत असेल आणि स्वामीची आज्ञा आहे की त्याने ते करावे तर ते त्याने केलेच पाहिजे. मग ते करण्यात त्याला प्राणार्पण करावे लागो अथवा कितीही सांपत्तिक हानी त्याला सोसावी लागो ते त्याने अवश्य करून दाखवावे. एखाद्या दुसऱ्या कामात त्याला लाभच लाभ दिसत असेल आणि स्वामीची आज्ञा आहे की ते त्याने करू नये तर मग जरी त्या कामात विपुल संपत्ती त्याला मिळत असेल तरी ते कार्य कदापि करू नये.
हेच ते ज्ञान व कर्म आहे ज्यामुळे मुस्लिम अल्लाहचा प्रिय दास बनतो व त्यावर अल्लाहचा कृपाप्रसाद अवतरित होतो आणि अल्लाह त्याला गौरव प्रदान करतो. अवज्ञाकारी- अनेकेश्वरवाद्याजवळ हे ज्ञान नसते, त्यामुळे त्याचे कर्मसुद्धा तसे नसते. म्हणून तो ईश्वराचा अज्ञानी व अवज्ञाकारी दास बनतो आणि ईश्वर त्याला आपल्या कृपाप्रसादापासून वंचित ठेवतो.
आता स्वत:च न्यायाची कास धरून विचार करा की जो मनुष्य स्वत:ला आज्ञाधारक (मुस्लिम) म्हणत असेल आणि तसाच अज्ञानी असेल जसा एक अनेकेश्वरवादी- अवज्ञाकारी (काफिर) असतो व तसाच अवज्ञाकारी असेल जसा एक अनेकेश्वरवादी असतो तर मग केवळ नाव, पोशाख आणि खाण्यापिण्याच्या फरकामुळे एखाद्या अनेकेश्वरवाद्याच्या- अवज्ञाकारींच्या तुलनेत तो कशा प्रकारे श्रेष्ठ ठरू शकेल? कोणत्या आधारे या जगात व पारलौकिक जीवनात अल्लाहच्या कृपाप्रसादाचा तो अधिकारी ठरू शकेल? इस्लाम कोणत्याही वंश किंवा घराणे अथवा जातीचे नाव नाही. इस्लाम पित्याकडून पुत्रास व पुत्राकडून पौत्रास आपोआप मिळत नाही. इस्लामला मान्य नाही की ब्राह्मणाचा मुलगा कितीही अज्ञानी असो आणि त्याने कितीही दुष्कृत्ये केली तरी तो उच्च कुलीनच राहील, कारण त्याने ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला आहे आणि उच्च जातीचा आहे. तसेच चांभाराचा मुलगा मग तो ज्ञान व कर्माच्या दृष्टीने सर्वप्रकारे श्रेष्ठ असला तरी तो नीचच राहील, कारण त्याने चांभाराच्या घरी जन्म घेतला आहे व नीच आहे. इस्लाममध्ये तर अल्लाहने आपल्या ग्रंथात (पवित्र कुरआनमध्ये) स्पष्ट सांगितले आहे,
‘‘अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे.’’ (कुरआन-४९:१३)
प्रेषित इब्राहीम (अ.) एका मूर्तिपूजकाच्या घरी जन्मले. परंतु त्यांनी अल्लाहला ओळखले आणि त्यांनी त्याच्या आज्ञेचे पालन केले म्हणून अल्लाहने त्यांना संपूर्ण जगाचा नेता बनविले. प्रेषित नूह (अ.) यांच्या मुलाने एका प्रेषिताच्या घरी जन्म घेतला, परंतु त्याने अल्लाहला ओळखले नाही आणि त्याची अवज्ञा केली. म्हणून अल्लाहने त्याच्या घराण्याचा विचार केला नाही आणि त्याच्यावर असा प्रकोप केला की ज्यापासून जगाने धडा घ्यावा. म्हणून चांगल्याप्रकारे समजून घ्या की अल्लाहच्या दृष्टीने माणसामाणसात काही फरक आहे तर तो ज्ञान व कर्मामुळे आहे. या जगात व पारलौकिक जीवनातसुद्धा त्याची कृपा केवळ त्याच लोकांसाठी आहे जे त्याला ओळखतात आणि त्याने दाखविलेल्या सरळमार्गाचे ज्ञान बाळगतात व त्याच्या आज्ञेचे पालन करतात. ज्या लोकांत हे गुण नसतील, मग त्यांची नावे अब्दुल्लाह आणि अब्दुर्रहमान असोत अथवा दीनदयाल आणि कर्तारसिंह; अल्लाहच्या दृष्टीने या दोघांत काहीही फरक नाही आणि त्याच्या कृपेतील काहीही हक्क त्यांना प्राप्त होत नाही.
0 Comments