Home A प्रेषित A इस्लामी आंदोलनाचा विरोध

इस्लामी आंदोलनाचा विरोध

इस्लाम धर्माच्या गुप्तप्रसार व प्रचाराच्या काळातसुद्धा जरी प्रेषित मुहम्मद(स) यांच्या आंदोलनाची कुनकुन विरोधकांना लागली असली तरी इस्लाम स्वीकारणार्यांच्या पंक्तीत एखादा मोठा नेता नसल्याने अथवा धार्मिक व राष्ट्रीय पदावर पीठासीन असलेला माणूस नसल्याने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. त्यांना असे वाटत होते की, हे केवळ काही तरूण मंडळीचा पोरखेळच आहे. चार दिवसांत डोक्यात भरलेली हवा निघून जाईल. विरोधकांची शक्तीदेखील एवढी जबरदस्त होती की, त्यांच्यासमोर दम मारण्याची विरोधक कल्पनादेखील करू शकत नव्हते. शिवाय विरोधक असलेल्या कुरैश कबिल्याची श्रद्धादेखील अशी होती की, ‘लात’, ‘मनात’, ‘उज्जा’ व ‘हुबल’ आणि इतर पूजल्या जाणार्या देवीदेवतांचा असा शाप त्यांना लागेल की, त्यांची एकेश्वरची सगळी धारणा नष्ट पावेल.
माननीय अबू जर(र) हेसुद्धा इस्लामी आंदोलनाच्या गुप्त प्रचारकाळातच मुस्लिम झालेले होते. ते सातव्या क्रमांकाचे मुस्लिम होते. मूर्तीपूजा आणि कृत्रिम देवी-देवतांच्या पूजाप्रथेपासून वैतागलेल्या जणांपैकी तेदेखील एक होते. ते मूर्तीपूजेचा त्याग करून आपल्याच स्वभावाच्या मार्गदर्शनानुसार एकाच ईश्वराची उपासना करीत असत. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचा सत्य संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनी आपल्या बंधुमार्फत परिस्थितीचा अभ्यास केला. त्यांच्या बंधुनी प्रेषित मुहम्मद(स) यांची भेट घेतली. प्रेषितांच्या मुखाने दिव्य कुरआनचा संदेश ऐकला. त्या संदेशाचा सार त्यांनी आपले बंधु माननीय अबू जर(र) यांच्यासमोर अशा प्रकारे वर्णण केला की,
‘‘लोक त्यांना निधर्मी म्हणतात. परंतु ते श्रेष्ठ आणि उत्तम आचरणाची शिक्षा देतात. त्यांची वाणी विचित्र असून सर्व प्रकारच्या काव्यरचनेपेक्षा भिन्न आहे. त्यांच्या कार्यपद्धती तुमच्या स्वभावाशी अगदीच सुसंगत आहेत.’’
हे वर्णन ऐकताच माननीय अबूजर(र) यांनी प्रेषित मुहम्मद(स) यांची तत्काळ भेट घेतली आणि इस्लामचा स्वीकार करून इस्लामी आंदोलनात सहभागी झाले. ते अत्यंत भावूक आणि तीव्र स्वभावाचे होते. त्यांनी इस्लाम स्वीकारताच पवित्र ‘काबा’मध्ये जाऊन इस्लामची घोषणा केली आणि यास्तव विरोधकांचा मारही खाल्ला.
इस्लामप्रचाराचा हा काळ तीन वर्षे चालला. परंतु ईश्वरी इच्छाच मुळात परिस्थितीला स्थिर राहू देत नाही. ईश्वराची कार्यपद्धतीच जणू अशी आहे की, असत्याविरुद्ध मोर्चा उभा करण्यासाठी तो सत्याला उभे करीत असतो.
अचानक इस्लाम प्रचाराच्या द्वितीय काळाची सुरुवात झाली. ईश्वरी आदेश अवतरला की,
‘‘जो ईश्वराचा आदेश पाठविण्यात येत आहे, तो सर्वांना स्पष्टरीत्या घोषित करा!’’
ईश्वराने नियुक्त केलेल्या प्रेषित मुहम्मद(स) या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रभातकाळी ‘सफा’ या पर्वतावर जाऊन उभे राहिले आणि समाजाच्या प्रचलित पद्धतीनुसार वादळाची घोषणा केली. त्यांनी उंच आवाजात साद घातली,
‘हाय रे प्रभातकाळाच्या वादळा!’’
ही साद ऐकून रूढ असलेल्या प्रथेप्रमाणे समाजाचे सर्वच लोक प्रेषितांजवळ गोळा झाले. त्या काळात अरब समाजात प्रथाच अशी होती की, वादळ अथवा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी एखाद्या पर्वतावर जाऊन येणार्या संकटाची सूचना देण्यात येत असे आणि सर्वजण आपापली कामे सोडून सूचना देणार्याकडे ती ऐकण्यासाठी धाव घेत असत. प्रेषितांच्या सुचनेवरसुद्धा लोक त्यांच्या ठिकाणी गोळा झाले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी उंच आवाजात जमलेल्या समुदायास विचारले,
‘‘तुमचा माझ्या सूचनेवर विश्वास आहे काय?’’
उत्तर मिळाले, ‘‘होय! निस्संदेह!! कारण आपण जीवनात कधीच खोटे बोलला नाही!!!’’
मग प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले, ‘‘जर मी तुम्हास सूचना दिली की, या पर्वताच्या मागून एक मोठे लष्कर तुमच्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे, तर तुम्ही मान्य कराल काय?’’
सर्वांनी एकमुखाने सांगितले, ‘‘हे सत्यवचनी मानवा! निश्चितच मान्य करु!!’’
यावर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले, ‘‘मग मी तुम्हास सांगतो की, केवळ एकाच ईश्वराची उपासना करा! हे अब्दुल मुत्तलिबच्या परिवारजणांनो, हे अब्द मुनाफच्या परिवारजणांनो, हे जोहराच्या परिवारजणांनो, हे तमीमच्या परिवारजणांने, हे मखजूमच्या परिवारजणांनो, हे असदच्या परिवारजणांनो, एकाच ईश्वराची उपासना करा. केवळ त्याचाच आदेश स्वीकारा अन्यथा तुमच्यावर मोठे दैवी संकट येईल. अर्थात, तुमच्यावर शत्रूंच्या फौजेपेक्षाही भयानक संकट येईल.’’
प्रेषित मुहम्मद(स) यांच्या मुखाने हे शब्द ऐकताच त्यांचा चुलता ‘अबू लहब’ हा क्षुब्ध होऊन म्हणाला, ‘‘हे सांगण्यासाठी तू आम्हास या ठिकाणी गोळा केलेस काय?’’ आणि सर्वचजण रागारागाने तेथून निघून गेले.
सत्य धर्म इस्लामच्या न्याय आणि दया-कृपेवर आधारित व्यवस्थेचा संदेश देणार्या प्रेषित मुहम्मद(स) यांनी धर्मप्रचाराचे दुसरे पाऊल उचलले. त्यांनी अब्दुल मुत्तलिबच्या सर्व परिवारजणांना जेवणाचे निमंत्रण दिले. या सभेत माननीय हमजा(र), अब्बास(र) आणि अबू तालिब यांच्यासारखे प्रमुख आणि प्रतिष्ठित लोक होते. भोजन संपल्यावर प्रेषित म्हणाले,
‘‘जो संदेश घेऊन मी आलो आहे, त्याचा स्वीकार केल्यास ऐहिक व पारलौकिक दोन्ही प्रकारे यशस्वी होण्याची मी तुम्हास हमी देतो. माझ्या संदेशाचा स्वीकार करून माझी साथ देण्यासाठी कोण तयार आहे?’’ प्रेषितांच्या आवाहनानंतर केवळ त्यांचे चुलत भाऊ माननीय अली(र) उठले व म्हणाले,
‘‘मी तुमची साथ देण्यासाठी तयार आहे.’’ या वेळी त्यांचे वय केवळ तेरा वर्षे होते. यावर या जनसभेतील मान्यवर जोरदारपणे हसले. जणू आपल्या हसण्यातून ते सांगत होते की, पाहू या, संदेश देणारा व संदेश स्वीकारणारा कोणती क्रांती घडवून आणणार. हा तर निव्वळ पोरखेळ होय.
या घटनेपर्यंत प्रेषितांच्या आंदोलनात केवळ चाळीसजण सहभागी झाले होते. तरीदेखील पक्क्या निश्चयाच्या या अनुयायांमुळे हे एक शक्तिशाली आंदोलन उभे ठाकले होते. उघडपणे ईश्वरी संदेश पोहोचविण्याच्या ईश्वरी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी एकेदिवशी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे ‘काबा’च्या ‘हरम’ या ठिकाणी उभे राहिले व एकेश्वरवादाची घोषणा केली. विरोधकांनी प्रोपगंडा केला की, पवित्र काबाची विटंबना झाली आणि चोहीकडून विरोधक धावून आले व प्रेषित मुहम्मद(स) यांना घेराव घातला. हा हलकल्लोळ ऐकून प्रेषितांच्या मदतीसाठी माननीय हारिस बिन अबी हाला(र) आणि उम्मे हाला(र) यांचे परिवारजण धावून आले. प्रेषितांना वाचविण्यासाठी विरोधकांच्या तळपत्या तलवारींचे वार स्वतःवर घेऊन हुतात्मे झाले. त्यांच्याच रक्ताने येणार्या हिसक काळाच्या अध्यायाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात झाली.
प्रेषित मुहम्मद(स) यांनी गल्लोगल्ली जाऊन ईश्वरी संदेश पोहोचविण्यास सुरुवात केली. ते ईश्वराचे एकच अस्तित्व असणे पटवून देत असत. एकाच ईश्वराची उपासना करण्याचे व अनेकेश्वरवाद सोडून देण्याचे अवाहन करीत असत. मूर्तीपूजा, वृक्षपूजेपासून लोकांना रोखत असत. पोटच्या मुलींना जिवंत दफन करण्यापासून रोखत असत. व्यभिचार, जुगार आणि मद्यपानाच्या कर्मांपासून रोखत असत. कधी मेळावे आणि जनसमुदायास उद्देशून भाषण देऊन लोकांना उपदेश देत असत की, केवळ एकमेव ईश्वरच या संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे. सूर्य, चंद्र, तारे, ग्रह आणि मानव व प्राणी एकूण संपूर्ण सृष्टीच केवळ ईश्वराची निर्मिती आहे. म्हणून एकमेव ईश्वर सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता असल्याने उपासना केवळ त्याचीच करावी. आपण सर्वजण त्याचीच निर्मिती असून आपण त्याचे मोताद वा गरजवंत आहोत. केवळ त्याच्यासमोर आपण नतमस्तक होऊन आपल्या मागण्या ठेवाव्यात. तोच आपल्या प्रार्थना पूर्ण करणारा आहे.जीवन, मृत्यू, अरोग्य, आजार, अन्न, पाणी, संतती देणे केवळ त्याच्या अखत्यारीत आहे. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा आणि संकटापासून वाचविणारा केवळ एकमेव ईश्वरच आहे. ‘फरिश्ते’ आणि ‘प्रेषित’सुद्धा त्याच्याच आदेशाचे पालन करतात. मरणोत्तर प्रत्येकास आपल्या बुर्याभल्या कर्मांचा त्याच्यासमोर जाब द्यावा लागणार आहे आणि प्रत्येकास ईश्वरच न्यायनिवाडा करून त्याच्या कर्मानुसार कर्मफळ देईल. चांगले कर्म करणार्यास स्वर्ग आणि वाईट कर्म करणार्यास नरकाग्नीच्या स्वाधीन करील.
अरब समाजाचे प्रतिकूल वातावरण प्रेषित मुहम्मद(स) यांची सत्य शिकवण सहन करू शकत नव्हते. त्या ठिकाणी अनेकेश्वरवाद्यांच्या हातात सर्व प्रकारचे अधिकार व शक्ती होत्या. त्यांना प्रेषितांची शिकवण म्हणजे त्यांच्या अन्यायी व्यवस्थेवर जबर प्रहार वाटत होता. धर्माच्या ठेकेदारांची फीस आणि नजराणे व भेटींच्या स्वरुपात मिळणार्या अमाप संपत्तीवर मोठी गदा येत असलेली दिसत होती. सर्व कबिल्यांची सरदारी, अरब प्रायद्वीपाच्या वस्त्यांवर असलेली कुरैश कबिल्याची विशेष जरब आणि स्वामित्व हे सर्व काही संकटात सापडणारे दिसत होते.
सत्याच्या मुकाबल्यात जेव्हा असत्य उभे ठाकते तेव्हा सत्याकडून केवळ एकच गोष्ट सांगण्यात येते, परंतु याचे खंडन करण्यासाठी असत्य नेहमीच नवनवीन गोष्टी घडवीत असते. एवढेच नव्हे तर असत्याने घडविलेल्या गोष्टींदरम्यान विसंगतपणा व विषमता निर्माण होते. उदाहरणार्थ, अरबजणांमध्ये चर्चा होऊ लागली की, मुहम्मद(स) यांची शिकवण नेमकी काय आहे? तर ती म्हणजे जुन्या आणि होऊन गेलेल्या लोकांचे किस्से व कथाच आहेत. जग कुठल्या कुठे जात आहे. आजच्या समस्या काय आहेत. दुसर्या शब्दांत असे की, हे सर्व रुढीवादी व परंपरावादी आणि कट्टरपंथी होय. वास्तवात मक्का शहराचे अनेकेश्वरवादी प्रगदीवादी होते. परंतु याच्याच उलट दुसरीकडे अशीदेखील भूमिका घेऊन विरोध करीत असे की, ‘पाहा! वाड- वडील आणि आजोबा पंजोबांच्या सर्व धर्मपद्धती त्यागून नवीन धर्मपद्धती सांगण्यात येत आहे. बरे ही बुद्धीत बसणारी गोष्ट आहे काय की, एकच ईश्वर विश्वाची संपूर्ण व्यवस्था सांभाळीत आहे. तसेच ही गोष्ट पण बुद्धीत कशी काय बसेल की, मृत्यू झाल्यावर आपण मातीत मिसळल्यावर पुनर्जीवित केले जाऊ?
कुरैश कबिल्याच्या सरदारांनी आणखीन कुटील डाव खेळला. मक्का शहरातील सर्व कवींना एके ठिकाणी संघटित केले. अबू सुफियान बिन हारिस, अम्र बिन आस आणि इब्ने जिबारा यांना यासाठी नियुक्त केले की, त्यांनी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्याविरुद्ध गलिच्छ शिवीगाळ ओकणार्या कविता लिहाव्यात आणि प्रसारित कराव्यात. हे विसरता कामा नये की, त्या काळातील अरब प्रदेशातील साहित्यकांना व कवींना खूप मानाचा दर्जा असून त्यांचा अतिशय मोठा प्रभाव समाजाच्या विचारसरणीवर होता. आजकालच्या पत्रकारांप्रमाणेच ते विचारांची व लोकांच्या मानसिकतेची दिशा वाट्टेल तिकडे बदलण्यास समर्थ व सक्षम होते. हेतु एवढाच होता की, सरस आणि अलंकृत शिव्याशाप दूरदूरपर्यंत पोहोचावेत, जणू एखाद्या प्रामाणिक माणसामागे पिसाळलेली कुत्री सोडण्यात यावीत.
आस बिन वाईल याने प्रेषितांच्या घरी मुलगा न जन्मल्याची टीका करताना म्हटले की, ‘‘तुम्ही अशा माणसाचा पिच्छा करता काय की, ज्याला वडील-आजोबा नाहीत व वंशवेल सुरु ठेवण्यासाठी मुलगादेखील नाही. त्याचे डोळे मिटताच त्याचा संपूर्ण खेळ संपून जाईल.’’ याच्या उत्तरादाखल दिव्य कुरआनात सांगितले गेले की, प्रेषित मुहम्मद(स) यांना तर ‘कौसर’ वा ‘खैरे कसीर’ प्रदान करण्यात आले आहे. अर्थात, या जगामध्ये प्रेषित मुहम्मद(स) यांच्या अनुयायांची अमर्याद संख्या असेल. प्रेषित मुहम्मद(स) यांनी सुरु केलेले आंदोलन त्यांच्या अनुयायांची अफाट संख्या सुरु ठेवील आणि त्यांनी ईश्वराकडून आणलेल्या सत्यधर्माचे रक्षण करील. हे आंदोलन जग अस्तित्वात असेपर्यंत चालूच राहील. या अनुयायांना त्यांच्या या पुण्यकर्माच्या मोबदल्यात अंतिम निवाड्याच्या दिवशी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे स्वतः ‘कौसर’ नावाच्या पवित्र हौदातून पेय पाजतील. एखाद्याची वंशवेल वाढणे हे मोठेपणा व प्रतिष्ठेचे प्रतीक नसून प्रतिष्ठा व महिमत्व हे यामध्ये आहे की, एखाद्याने दिलेल्या सत्य संदेशाने लाखो लोकांनी आपली मशाल पेटवावी. जग अस्तित्वात असेपर्यंतच्या लोकांनी त्याच्या पवित्र चारित्र्यास आदर्श मानून आपले चारित्र्य सुशोभित करावे. त्याने प्रस्थापित केलेल्या जीवनव्यवस्थेपासून विश्वातील संपूर्ण मानवजातीने लाभ घ्यावा आणि हे नेमके असेच घडलेसुद्धा इतिहासाने याची जबरदस्त साक्ष दिली आहे.
विरोधक प्रेषितांविषयी म्हणायचे, ‘‘हे पाहा! हा आहे तो माणूस ज्याला ईश्वराने प्रेषित बनविले. याच्याशिवाय दुसरा माणूसच जणू ईश्वराला मिळाला नाही. ईश्वराला जर प्रेषितच पाठवायचा असता तर ‘मक्का’ आणि ‘ताईफ’ येथील प्रतिष्ठित सरदारांना प्रेषित म्हणून पाठविले असते.’’ प्रेषित मुहम्मद(स) यांच्या अनुयायांना पाहून व्यंग करीत व त्यांची खिल्ली उडविताना म्हणत, ‘‘हे पाहा प्रेषिताचे अनुयायी, हे आहेत ते महाभाग, म्हणे यांना ईश्वर अरब आणि अजम (अरबेतर) समुदायांची सरदारी व नेतृत्व प्रदान करणार आहे!’’
परंतु घडलेही असेच. विरोधक तोंडघशी पडले. प्रेषितांच्या या प्रामाणिक अनुयायांनी जगाचे स्वामित्व आणि सत्याचे शासन सांभाळले. इतिहासाने याची साक्ष दिली. विरोधकांना ईश्वराने चोख प्रत्युत्तर देऊन तोंडघशी पाडले.
विरोधकांच्या या समस्त निरर्थक आणि वाह्यात टीकांमुळे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) खूप व्यथित होत असत. ईश्वराने प्रेषित मुहम्मद(स) यांचे वेळोवेळी सांत्वन करताना म्हटले की, विरोधकांकडे दुर्लक्ष करून सत्याचा उपदेश चालूच ठेवा. विरोधकांपासून व त्यांच्या निरर्थक बडबडींना न जुमानता संयमाने सत्याचे आंदोलन चालू ठेवा. विरोधकांच्या सगळ्या क्लृप्त्या आणि डावपेच संपल्यावर ते वैफल्यग्रस्त झाले. आंधळ्या व विरोधी भावनांनी ते अत्यंत क्षुधातायी झाले. त्यांच्या तळपायांची आग त्यांच्या मस्तकास भिडली. कारण त्यांच्या कोणत्याही डावाचा इस्लामी आंदोलनावर काहीच परिणाम होत नव्हता. त्यामुळे संतापाच्या भरात ते चित्रविचित्र कर्म करू लागले. प्रेषित मुहम्मद(स) यांच्या वाटेत काटे पसरवू लागले. कट्टर विरोधक आणि विरोधकाचा म्होरक्या असलेल्या अबू लहबची पत्नी तर अक्षरशः प्रेषितांच्या मार्गात मलमूत्र टाकीत असे. प्रेषित मुहम्मद(स) नमाज अदा करतेवेळेस मोठा आवाज करून व शिट्या वाजवून कल्लोळ माजविण्यात येत असे. एकेदिवशी ‘उतबा’ नावाच्या माथेफिरूने प्रेषित मुहम्मद(स) यांना नमाज अदा करतेवेळेस त्यांच्या गळ्यात चादर अडकवून जोराचा हिसका दिला व चादर गळ्याभोवती जोरात आवळली. प्रेषित मुहम्मद(स) यांचा जीव जाता जाता वाचला. एकदा एका विरोधकाने प्रेषितांच्या डोक्यावर मातीने भरलल टोपले उलटविले.
एकदा ‘काबा’मध्ये विरोधकांचा एक म्होरक्या ‘अबूजहल’ आणि ‘कुरैश’ कबिल्याच्या काही सरदारांनी प्रेषित मुहम्मद(स) यांना त्रस्त करण्याची नवीन योजना आखली. ही मोहीम ‘उतबा’च्याच नेतृत्वाखाली राबविण्यात आली. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) नमाज अदा करतेवेळी आणि सजदामध्ये जाण्याच्या वेळी मलाचा ढीग त्यांच्या पाठीवर टाकण्यात आला आणि विरोधकांच्या जोरजोरात हसण्याचा आवाज आकाशाला भिडला.
परंतु आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे संयम व सहनशीलतेचे तठस्थ व स्थिर पर्वत होते. सर्व प्रकारचा विरोध, थट्टा-मस्करी आणि कोणत्याही प्रकारच्या त्रासाला न जुमानता पूर्ण संयम व शांतीने आपले महान कार्य सुरु ठेवले. हा या गोष्टीचा नेमका पुरावाच आहे की, विरोधकांचा हेतूच मुळात खोटा आहे आणि याच्या उलट ज्याची श्रद्धा व उद्दिष्ट सत्य असेल, त्याचा मान-सन्मान आणि प्रभाव बरोबर वाढत असतो. कोणत्याही प्रकारचे काटे, कोणत्याही प्रकारची खिल्ली आणि कोणत्याही प्रकारचा त्रास सत्य आंदोलनाचा मार्ग रोखू शकत नव्हता.
या निरर्थक बाबींमुळे जर बिघडलेल्या व्यवस्थांचा नायनाट करणार्या सत्य संदेशाचे मार्ग बंद झाले असते, तर इतिहासात कदाचित कधीच कोणतीही क्रांती आली नसती.
संबंधित पोस्ट
October 2024 Rabi'al Awwal 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *