Home A मूलतत्वे A इस्लामच्या दृष्टिकोनातून संसारत्याग आणि संन्यास सत्य धर्माच्या विरुध्द आहे

इस्लामच्या दृष्टिकोनातून संसारत्याग आणि संन्यास सत्य धर्माच्या विरुध्द आहे

Sanyas

इस्लामच्या दृष्टिकोनातून संसारत्याग आणि संन्यास सत्य धर्माच्या विरुध्द आहे आणि जगात बिघाड आणि विकृतीला कारणीभूतदेखील असते. म्हणून पवित्र कुरआनमध्ये ख्रिस्ती लोकांमध्ये प्रचलित असलेल्या संन्यासाचे खंडण करून त्यास अस्वाभाविक आणि अप्रशंसनीय पध्दत म्हटले आहे. कुरआनमध्ये नमूद आहे,
‘‘आम्ही नूह(अ.) आणि इब्राहीम(अ.) ना पाठविले आणि त्या दोघांच्या वंशात प्रेषितत्व आणि ग्रंथ ठेवले. मग त्यांच्या संततीपैकी काहीनी मार्गदर्शन स्वीकारले आणि बरेचसे अवज्ञाकारी बनले. त्यांच्यानंतर आम्ही लागोपाठ आपले प्रेषित पाठवले, आणि त्यानंतर मरयम पुत्र ईसा(अ.) ला पाठविले, आणि त्याला इंजील प्रदान केले, आणि ज्या लोकांनी त्याचं अनुयायित्व स्वीकारले त्यांच्या हृदयांत आम्ही करूणा आणि दया घातली, आणि वैराग्य त्यांनी स्वतःच काढले, आम्ही ते त्यांच्यासाठी कर्तव्य म्हणून ठरविले नव्हते, परंतु अल्लाहच्या प्रसन्नतेच्या शोधात त्यांनी स्वतःच ही ‘बिदअत’(कुप्रथा) काढली आणि मग त्यावर कायम राहण्याचे जे कर्तव्य होते त्यांनी ते पूर्ण केले नाही. त्यांच्यापैकी ज्या लोकांनी ईमान आणले होते. त्यांचा मोबदला आम्ही त्यांना प्रदान केला, परंतु त्यांच्या पैकी बहुतेक जण अवज्ञाकारी होते.’’(सूरह हदीद – २६:२७)
या आयतीत ‘रहबानियत’ हा शब्द आलेला आहे. या शब्दाची व्याख्या आणि संपूर्ण आयतीचे स्पष्टीकरण वर्तमान काळाचे महान इस्लामी विद्वान आणि कुरआन मजीदचे भाष्यकार मौलाना सैयद अबुल आला मौदुदी(रह.) यांनी आपले प्रसिध्द कुरआन भाष्य ‘तफहीमुल कुरआन’ खंड क्रमांक पाचमध्ये केले आहे.
शब्द ‘रहबानियत’ची व्याख्या करताना मौलानांनी लिहिले आहे की या शब्दाचा धातु र-ह-ब आहे. ज्याचा अर्थ ‘भय’ असा आहे. रहबानियतचा अर्थ आहे भयभीत राहण्याचा मार्ग आणि ‘रहबानियत’ म्हणजे भयभीत असणार्याचा मार्ग. परिभाषेत यामुळे असे अभिप्रेत आहे की एखाद्या व्यक्तीचे भयामुळे(मग ते कोणाच्या अत्याचारामुळे असो किवा जगातील उपद्रव्याचा भय असो किवा आपल्या दुर्बलतेचा भय असो) जगाचा त्याग करणे आणि सांसारिक जीवनापासून पळ काढून वनात आणि पर्वतांमध्ये संरक्षण प्राप्त करणे किवा सर्वांपासून अलिप्त होऊन एकान्तात जाऊन बसणे.
या आयतीचे स्पष्टीकरण करताना मौलानांनी लिहिले आहे की ख्रिस्ती लोकांवर अल्लाहने संन्यासला अनिवार्य केले नव्हते. पुढे ते स्पष्ट करतात,
संन्यास हे गैरइस्लामी आहे आणि हे कधीही सत्यधर्मात सामील नव्हते. यालाच पैगंबरानी हदीसमध्ये म्हटले आहे, ‘‘इस्लाममध्ये कोणताही संन्यास नाही.’’(मुसनद अहमद) आणखी एक हदीसमध्ये प्रेषित मुहम्मद(स.) यांनी फरमावले, ‘‘या उम्मतचा(अर्थात मुस्लिम लोकसमूहाचा) संन्यास अल्लाहच्या मार्गात जिहाद आहे.’’(मुसनद अहमद मुसनद अबी याला) अर्थात, या उम्मतीचा(अनुयायी) अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग हा नाही की मानवाने संसाराचा त्याग करावा. उलट तो हा आहे की मानवाने अल्लाहच्या मार्गात जिहाद करावा. ही उम्मत(अनुयायी) उपद्रवांना घाबरून वन आणि पर्वताकडे पळ काढीत नाही, उलट अल्लाहच्या मार्गात जिहाद करून त्यांचा मुकाबला करते.
बुखारी आणि मुस्लिम दोन्ही हदीसच्या पुस्तकांमध्ये कथन करण्यात आले आहे, ‘‘सहाबांपैकी एकाने सांगितले की मी सदैव रात्रभर नमाज पठण करीत राहणार.’’ दुसर्याने म्हटले, ‘‘मी सदैव रोजे(उपवास) करीन. त्यात कधी खंड पडू देणार नाही.’’ तिसर्याने म्हटले, ‘‘मी कधीही लग्न करणार नाही आणि स्त्रियांशी कोणताही संबंध ठेवणार नाही.’’ अल्लाहचे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी या गोष्टी ऐकल्या आणि फरमावले, ‘‘अल्लाहची शपथ! मी तुमच्या सर्वांपेक्षा जास्त अल्लाहचे भय बाळगणारा आणि त्याची अवज्ञा न करणारा आहे. परंतु माझी पध्दत अशी आहे की मी रोजे पाळतो आणि नाहीदेखील पाळत, रात्री नमाज पठणही करतो आणि झोपतोही आणि स्त्रीशी विवाहदेखील करतो. ज्याला माझी पध्दत पसंत नाही, त्याचा माझ्याशी काहीएक संबंध नाही.’’
आदरणीय अनस(र.) म्हणतात, प्रेषित मुहम्मद(स.) म्हणत, ‘‘स्वतःवर सक्ती करू नका की अल्लाहने तुमच्यावर सक्ती करावी, एका लोकसमूहाने अशा पद्धतीनेच सक्तीचा अंगीकार केला होता, तर अल्लाहनेदेखील त्यांना सक्तीने पकडले. पाहून घ्या त्यांचे अवशेष, संन्यासगृह आणि चर्चमध्ये दिसून येईल.’’(अबू दाऊद)
संन्यास आणि संसारत्यागाचा मार्ग पत्करून ख्रिस्ती लोकांनी दुहेरी चूक केली आहे. एक चूक तर ही की स्वतःवर तो अंकुश लावला ज्यासंबंधी कोणताही आदेश अल्लाहने दिलेला नव्हता. दुसरी चूक अशी की अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करून घेण्याकरिता त्यांच्या दृष्टीने जे निर्बंध आवश्यक समजून स्वतःवर त्या लादून घेतल्या, ते निर्बंध ते पाळू शकले नाही आणि अशी कृत्ये करू लागले जे अल्लाहच्या प्रसन्नतेऐवजी त्याचा कोप होण्याला कारणीभूत ठरले. हा मुद्दा समजून घेण्यासाठी ख्रिस्ती संन्यासाच्या इतिहासावर एक दृष्टिक्षेप टाकला पाहिजे.
आदरणीय ईसा(अ.) अर्थात येशू ख्रिस्तानंतर दोनशे वर्षांपर्यंत ख्रिस्ती चर्च संन्यासापासून अपरिचित होता. परंतु आरंभापासूनच ख्रिस्तींमध्ये त्याचे रोगाणु आढळून येत होते आणि असे विचार त्यांच्यात रूजले होते जे या गोष्टीला जन्म देतात. त्याग आणि ब्रह्मचर्यला नैतिक श्रेष्ठता म्हणणे आणि अनुचित संन्यस्थ जीवनाला विवाह आणि सांसारिक व्यवासायाच्या जीवनाची अपेक्षा श्रेष्ठ आणि उत्तम समजणे हेच संन्यासाचे मूळ आहे आणि या दोन्ही गोष्टी ख्रिस्तीमध्ये सुरुवातीपासूनच अस्तित्वात होत्या. विशेष म्हणजे ब्रह्मचर्यला पवित्रतेचा पर्याय समजणे यामुळे चर्चमध्ये धार्मिक सेवा करणार्यांकरिता ही गोष्ट अप्रिय समजली जात होती की त्यांनी विवाह करावा, त्यांना मुलं व्हावीत आणि त्यांनी गृहस्थीच्या लफड्यात पडावं. या गोष्टीनेच तिसर्या शतकापर्यंत येऊन उपद्रव्याचे रूप धारण केले आणि संन्यास एका संक्रामक रोगाप्रमाणे ख्रिस्तींमध्ये पसरू लागला. ऐतिहासिकदृष्ट्या याचे तीन मुख्य कारणे होती.
एक हे की प्राचीन अनेकेश्वरवादी समाजात कामवासना, दुश्चरित्रता आणि भौतिकता जितक्या मोठ्या प्रमाणात पसरलेली होती, त्याचा तोड करण्याकरिता ख्रिस्ती विद्वानांनी संतुलित मार्गाचा अवलंब करण्याऐवजी अतिरेकी मार्गाचा अवलंब केला. त्यांनी पवित्रतेवर इतके भर दिले की मुळापासून स्त्री-पुरुष संबंधच अपवित्र समजले जाऊ लागले, मग ते संबंध विवाहच्या रूपाने का असेना. त्यांनी प्रपंचाविरुध्द इतकी कट्टरता दाखवली की अन्ततः एका धार्मिक पुरुषाकरिता मुळापासून कोणत्याही प्रकारची संपत्ती ग्रहण करणे हे पाप समजू जाऊ लागले आणि चारित्र्यसंपन्नतेचे मापदंड हे झाले की, मानवाने अगदी निर्धन आणि हर प्रकारे संसारत्यागी असावं. याच प्रकारे अनेकेश्वरवादी समाजाच्या सुख आणि वासनाप्रियतेच्या उत्तरादाखल ते इतक्या चरमसीमेला जाऊन पोहोचले की सुखत्याग, आत्मदमन आणि इच्छा आकांक्षाचे खच्चीकरण करणे हेच चारित्र्याचे लक्ष्य बनले आणि विविध प्रकारच्या तप-तपस्यांनी शरीराला कष्ट पोहोचविणे मानवाच्या आध्यात्माची पूर्णता आणि त्याचे पूर्णत्व समजले जाऊ लागले.
दुसरे असे की ख्रिस्ती धर्माचा जेव्हा सफलता प्राप्त करून जनतेमध्ये प्रसार होऊ लागला तेव्हा आपल्या धर्माच्या प्रसार व विस्ताराकरिता त्या प्रत्येक वाईट गोष्टीला आपल्या आधिक्षेत्रात दाखल करीत गेले जे लोकप्रिय होते. प्राचीन इष्टदेवांच्या जागी महापुरुषांची भक्ती होऊ लागली. होरस आणि आईसिसच्या मूर्तींच्या जागी येशू ख्रिस्त आणि मरियमच्या मूर्ती पूजल्या जाऊ लागल्या. सेटरनेलियाच्या जागी क्रिसमसचा उत्सव साजरा केला जाऊ लागला. प्राचीन काळातील धागे-ताईत, मंत्र-तंत्र, शगून काढणे. भविष्यवाणी आणि भूतात्मा पळवणे वगैरसंबंधीची सर्व कामे ख्रिस्ती संतानी सुरु केली. या कारणास्तव सर्वसामान्य लोक त्या व्यक्तीला ईश्वरापर्यंत पोहोचलेला समजत असत जी व्यक्ती घाणेरडी आणि नग्न राहत आणि एखाद्या पर्वताच्या गुहेत राहत. म्हणून ख्रिस्ती चर्चमध्ये भक्तीची हीच पध्दत लोकप्रिय झाली आणि अशा लोकांच्या चमत्कारिक किस्स्यांनी ख्रिस्तीलोकांमध्ये ‘‘सन्त कथा’’ यासारख्या पुस्तकांचा भरणा झाला.
तिसरे असे की ख्रिस्ती लोकांजवळ धर्माच्या सीमा निश्चित करण्याकरिता कोणतेही विस्तृत असं धर्म-विधान आणि कोणतीही स्पष्ट अशी पध्दत अस्तित्वात नव्हती. मूसा(अ.) यांचे धर्मविधान(तौरात) चा त्यांनी त्याग केला होता आणि बायबलमध्ये पूर्णपणे कोणतीही नियमावली आढळून येत नव्हती. म्हणून ख्रिस्ती विद्वान काही प्रमाणात बाहेरील दर्शनशास्त्र आणि त्याचे रंग-रूप यांनी प्रभावित होऊन आणि काही प्रमाणात आपल्या स्वतःच्या आवडीनिवडीनुसार वेगवेगळ्या पध्दतींच्या व नवनवीन गोष्टी आपल्या धर्मात समाविष्ट करीत गेले. संन्यासदेखील या सर्व नवीन गोष्टींपैकी एक होते. ख्रिस्ती धर्माच्या विद्वानांनी आणि तत्त्ववेत्त्यांनी त्याचा दर्शनशास्त्र आणि त्याची कार्यप्रणाली बौध्द धर्माच्या भिक्षूकांडून, हिदू योगी आणि संन्यासी, प्राचीन इजिप्तचे फकीर, ईराणचे मानविये आणि अफलातून व फलातीनूसचे अनुयायी रहस्यवादींकडून घेतले आणि त्यालाच आत्मशुध्दीचा विधी, आध्यात्मिक विकास आणि अल्लाहचे सामीप्य प्राप्तीचे साधन ठरवले. ही चूक करणारे लोक कोणीही साधारण व्यक्ती नव्हते. तिसर्या शतकापासून येशू ख्रिस्ताच्या सातव्या शतकापर्यंत(अर्थात कुरआन अवतरण्याच्या वेळी) जे लोक पूर्व आणि पश्चिम ख्रिस्ती धर्माचे मोठमोठे विद्वान महागुरू आणि आधिनायक मानले जातात. सेंट अथानासेविस, सेंटबासिल, सेंट गिरिगोरी, नाजियानजिन, सेंट कराई सूस्टम, सेंट एमब्रोज, सेंट जीरूम, सेंट आगस्टाइन, सेंट वीनिडिक्ट, महान गिरीगोरी सर्वचे सर्व स्वतः संन्यासी होते आणि संन्यासाचे जबरदस्त समर्थक होते. यांच्याच प्रयत्नानी चर्चमध्ये संन्यासाचे प्रचलन झाले.
इतिहासात माहिती मिळते की ख्रिस्ती लोकांमध्ये संन्यास इजिप्तहून आरंभ झाला. त्याचा संस्थापक सेंट अॅन्थोनी होता, जो सन १५० मध्ये जन्मला आणि ३५० मध्ये या जगाचा निरोप घेतला. त्याला पहिला ख्रिस्ती संन्यासी म्हटले जाते. ख्रिस्ती लोकांमध्ये संन्यासाचे मूल सिध्दान्त त्याचे लेख आणि आदेशावरून प्राप्त होतात. या मूळ प्रारंभापासून ही पध्दत इजिप्तमध्ये जलप्रवाहाप्रमाणे पसरू लागली आणि ठिकठिकाणी संन्यासी स्त्री-पुरुषाकरिता आश्रम किवा मठ स्थापन होऊ लागले. त्यांच्यापैकी काही आश्रमांमध्ये तीन तीन हजार संन्यासी एकाच वेळी राहात होते. सन ३२५ मध्ये इजिप्तमध्येच आणखी एक ख्रिस्ती महापुरुष पाखुमियुस उत्पन्न झाला ज्याने दहा मोठे आश्रम संन्यासी स्त्री-पुरुषाकरिता बनवले. त्यानंतर हा सिलसिला जॉर्डन, पॅलेस्टाईन आणि युरोपच्या विभिन्न देशांमध्ये पसरत गेला. चर्च व्यवस्थेला अगदी प्रारंभी या संन्यासच्या समस्येमुळे फारच अडचणींना तोंड द्यावे लागले. कारण तो संसारत्याग आणि ब्रह्मचर्याला, गरीबी व निर्धनतेला आध्यात्मिक जीवनाचा आईडियल(आदर्श) तर समजत होता. परंतु संन्यासीप्रमाणे विवाह अगर संततीप्राप्ती किवा संपती ग्रहण करण्याला पापदेखील घोषित करू शकत नव्हता. शेवटी अथानासियोस(मृत्यु सन ३७३), सेंट बासिल(मृत्यू सन ३७१), सेंट आगस्टाईन(मृत्यू सन ४३०) आणि महान गिरिगोरी(मृत्यु सन ६०९) यासारख्या लोकांच्या प्रभावाने संन्यासाचे अनेक सिध्दान्त चर्च व्यवस्थेत विधिवत रूपाने दाखल झाले.
या संन्यासच्या रूपाने त्यांनी आपल्या धर्मात ज्या नवीन गोष्टी सामील करून घेतल्या होत्या त्यांची काही वैशिष्ट्ये आम्ही संक्षिप्त रूपाने वर्णन करीत आहोत.
कठोर तपस्या आणि नवनवीन पध्दतींनी आपल्या शरीराला यातना देणे. या बाबतीत प्रत्येक संन्यासी दुसर्यापेक्षा पुढे निघुन जाण्याची इच्छा करीत होता. ख्रिस्ती महापुरुषांच्या कथांमध्ये या लोकांचे जे चमत्कार वर्णिले जातात ते पुढील प्रकारे आहेत. इस्कन्द्रियाचा सेंट मकारियूस प्रत्येक वेळी आपल्या शरीरावर एंशी पौंड वजन उचलून फिरत असे. सहा महिन्यांपर्यंत तो एका दलदलीत झोपून राहिला. विषारी मासे त्याच्या शरीराला चावत होते. त्याचा शिष्य सेंट यूसिबियूसने आपल्या गुरुपेक्षाही अधिक तपस्या केली. तो एकशे पन्नास पौंडांचे वजन उचलून फिरत असे. आणि तीन वर्षांपर्यंत एका कोरड्या विहीरीत पडून राहिला. सेंट साबियूस केवळ तो मका खात असे, जो एक महिना भर पाण्यात भिजवून ठेवलेला असायचा आणि ज्यात खूप घाणेरडा असा वास येत असे. सेंट बेसारियून ४० दिवस एका काटेरी झुडूपात पडून राहिला आणि चाळीस वर्षांपर्यंत जमिनीला पाठ टेकले नाही. सेंट पाडूमियूसने पंधरा वर्षे आणि एका वर्णनानुसार पन्नास वर्षे जमिनीला पाठ न लावता व्यतीत केले. एक सन्त सेंट जॉन तीन वर्षे भक्ती करीत उभा राहिला. या संपूर्ण कालावधीत ना कधी बसला नाही त्याने कधी जमिनीला आपली पाठ टेकली नाही. आरामाकरिता तो केवळ एका टेकडीचा आश्रय घेत असे. त्याचा भोजन तो प्रसाद असे जो दर रविवारी त्याच्याकरिता आणला जात असे.
सेंट सीमीयून स्टाइलाईट(३८०-४४९) ज्याची ख्रिस्तींच्या महान पुरुषांमध्ये गणना होते. हिरायस्टरपूर्वी पूर्ण चाळीस दिवस उपवास करीत असे. एकदा तो संपूर्ण एक वर्षभर एका पायावर उभा राहिला. प्रायः तो आपल्या आश्रममधून निघून एका विहीरीत जात होता. शेवटी त्याने उत्तर सीरीयाच्या सीमान किल्ल्याजवळ साठ फूट एक स्तंभ बनवला. ज्याचा वरचा भाग केवळ तीन फूट व्यासाचा होता आणि त्यावर कठडा बनवण्यास आला होता. या स्तंभावर पूर्ण तीस वर्षे व्यतीत केले. ऊन, पाऊस, हिवाळा, उन्हाळा सर्वकाही तो सहन करीत राहिला. परंतु कधीही स्तंभाच्या खाली उतरला नाही. त्याचे शिष्य सीढी लावून वर जाऊन त्याला भोजन पुरवीत आणि त्याची घाण स्वच्छ करीत असत. नंतर एक दोरखंड घेऊन त्या स्तंभाशी स्वतःला बांधून घेतले. ते दोरखंड त्याच्या शरीराच्या मासांत घुसून अदृस्य झाले. शरीरातील मांस सडून गेले आणि त्यात किडे पडले. जेव्हा एखादा किडा त्यांच्या जख्मातून निघून खाली पडत असे तर तो त्या किड्यास उचलून पुन्हा त्या फोड्यात ठेवत असे आणि म्हणत असे, ‘‘खा जे काही प्रभूने तुला दिले आहे.’’ ख्रिस्ती लोक दूरुन त्याच्या दर्शनासाठी येत असत. जेव्हा तो मरण पावला तर सर्वसामान्य ख्रिस्तीच्या असा निर्णय होता की तो ख्रिस्ती ऋषिचा सर्वांत उत्कृष्ट उदाहरण होता.
त्या काळातील ख्रिस्ती संतांची जी वैशिष्ट्ये वर्णिली गेली आहेत ती सर्व अशाच उदाहरणानी भरलेली आहेत. कोणा एखाद्याची विशेषता अशी होती की त्याने तीस वर्षांपर्यंत मौन पाळले आणि त्याला कधीही कोणी बोलताना पाहिले नाही. कोणा एखाद्याने स्वतःला एखाद्या टेकडीशी बांधून घेतले होते. कोणी वन वन भटकत असे आणि घास-फूस खाऊन आपले गुजराण करीत असे. कोणी एखादं जड वजन कायम स्वरूपी उचलून फिरत असे. कोणी बेडीनी आणि साखळ्यांनी स्वतःला जखडून ठेवत असे. काही महाभाग जनावराच्या गोठ्यात, राहात किवा कोरड्या विहीरीत अथवा जुनाट कबरीत राहात असत व काही महापुरुष सदैव नग्न राहात असत आणि आपले गुप्तांग आपल्या केसांनी लपवत किवा जमिनीवर रेंगाळताना चालत असत. अशाच महापुरुषांचे वर्णन व चर्चा सर्वत्र होत असे आणि ते मेल्यानंतर त्यांची हाडे आश्रमांमध्ये सुरक्षित ठेवण्यात येत असत. मी स्वतः सीना पर्वताच्या खाली सेंट कॅथाराइनच्या आश्रमात अशाच प्रकारच्या हाडाची एक संपूर्ण व सुसज्य लायब्ररी पाहिली, ज्यात काही महापुरुषांच्या डोक्याच्या कवट्या सुयोग्य पध्दतीने ठेवलेल्या दिसत होत्या. कुठे पायाची हाडे आणि कुठे हाताची हाडं आणि एका महापुरुषाचा तर शरीराचा संपूर्ण सांगाडाच काचेच्या कपाटात ठेवलेला आढळून आला.
त्यांचे दुसरे वैशिष्ट्य असे होते की ते सदैव घाणेरडे राहात असत आणि स्वच्छतेपासून फार लांब राहात. त्यांच्यामते स्नान करणे किवा शरीरावर पाणी टाकणे हे ईशभक्तीच्या विरुध्द होते. शरीराच्या स्वच्छतेला ते आत्म्याची अस्वच्छता समजत असत. सेंट अथानासिवुस मोठ्या गर्वाने सेंट ऐन्थोनीच्या या वैशिष्ट्याचे वर्णन करतो की मरेपर्यंत त्याने कधी पायही धुतले नव्हते. सेंट इब्राहीमने जेव्हांपासून ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला तेव्हापासून पूर्ण पन्नास वर्षे त्याने ना तोंड धुतले ना पाय. एक प्रमुख संन्यासीन कुमारी सिलबियाने संपूर्ण आयुष्य आपल्या बोटांशिवाय शरीराच्या कोणत्याही भागाला पाणी लागू दिले नाही. एका कॉन्व्हेंटच्या एकशे तीस संन्यासिणीची प्रशंसा करून लिहिले आहे की, त्यानी कधीही आपले पाय धुतले नाही. स्नानाचे तर नाव ऐकूनच त्यांच्या अंगाचा थरकाप होत असे.
या संन्यासी वृत्तीने वैवाहिक जीवनाला व्यावहारिकदृष्ट्या अगदी निषिध्द करून टाकले आणि विवाहसंबंधाला तोडून फेकून देण्यात अगदी निर्दयतेने कार्य केले. चौथ्या आणि पाचव्या शतकातील सर्व धार्मिक लेख या विचाराने भरलेले आहेत की ब्रह्मचर्य सर्वांत महान नैतिक मूल्य आहे आणि पवित्रतेचा अर्थ असा आहे की मानवाने यौवनसंबंधापासून पूर्णपणे सुरक्षित राहावे, मग तो पती-पत्नीचा संबंध का असे ना. पवित्र अध्यात्मिक जीवनाचा उत्कर्ष याला मानला जायचा की मानवाने आपले मन पूर्णपणे मारून टाकावे आणि त्याच्यात शारीरिक सुखाची कोणतीही इच्छा असता कामा नये. त्या लोकांच्या प्रति इच्छांचे दमन याकरिता आवश्यक होते की त्यात पाशविकतेला बळ प्राप्त होत असते. त्यांच्या दृष्टिकोनातून सुख आणि पाप समानार्थक होते. येथपर्यंत की खुशीदेखील त्यांच्या दृष्टीने ईशविस्मरणचा पर्याय होती. सेंट वासिल याने हसणे आणि स्मितहास्यालादेखील वर्जित ठरवले होते. या सर्व कारणांमुळेच स्त्री आणि पुरुषांच्या दरम्यान विवाहबंधन त्यांच्यामध्ये अजिबात अपवित्र घोषित करण्यात आले होते. संन्यासींकरिता आवश्यक होते की जर त्यांना लग्न करावयाचे असेल तर त्यांनी वेगळे राहायला हवे. स्त्रीचे रूपदेखील पाहू नये आणि जर विवाहित असेल तर पत्नीचा त्याग करून निघून जावे. पुरुषांप्रमाणे स्त्रियांच्या मनांमध्ये हे बिबवले गेले की जर त्यांना स्वर्ग राज्यात प्रवेश करावयाचे असेल तर त्यांनी सदैव अविवाहित राहिले पाहिजे. जर पूर्वीपासून विवाहित असतील तर आपल्या पतींचा त्याग करून निघून जावे.
सेंट जीरूमसारखा ख्रिस्ती विद्वान म्हणतो की, जी स्त्री येशूकरिता आजीवन कुमारिका राहते ती येशूंची वधू आहे. त्या स्त्रीच्या मातेस प्रभू अर्थात येशू ख्रिस्ताची सासू होण्याचे श्रेय प्राप्त होते. एका ठिकाणी जीरूम म्हणतो की, ‘पवित्रतेच्या कुर्हाडीचे वैवाहिक संबंधाच्या लाकडाला कापून फेकणे ईशकामनेत व्यस्त व्यक्तीचे सर्वप्रथम कर्तव्य होय.’ या शिकवणुकीमुळे धार्मिक भावनांच्या आविर्भावानंतर एका ख्रिस्ती स्त्री अगर ख्रिस्ती पुरुषावर पहिला प्रभाव हा होत असे की त्याचे सुखमय जीवन नेहमीसाठी समाप्त होते असे. ख्रिस्ती धर्मामध्ये फारकती किवा विभक्त होण्याचे मार्ग बंद होते, याकरिता विवाहाच्या बंधनात राहूनदेखील पती आणि पत्नी एकमेकांपासून विभक्त होत असत. सेंट नाइलस दोन मुलांचा बाप होता. जेव्हा त्याला संसारत्यागाचे वेड लागले तर त्याची पत्नी रडतच राहिली आणि तो तिला सोडून वेगळा झाला. सेंट अम्मूनने लग्नाच्या पहिल्याच रात्री आपल्या वधुला शारीरिक संबंधाच्या अपवित्रतेविषयीचा उपदेश सुनावला आणि दोघांनी आपल्या सहमतीने निश्चय केला की जिवंत असेपर्यंत एकमेकांपासून वेगळे राहतील. सेंट अब्राहम लग्नाच्या पहिल्याच रात्री आपल्या वधूला सोडून फरार झाला. असेच कृत्य सेंट एलेक्सिसनेदेखील केले. अशा पध्दतीच्या घटनानी ख्रिस्ती महापुरुषांच्या कथा परिपूर्ण आहेत.
चर्चची व्यवस्था तीन शतकांपर्यंत या सीमांमध्ये या अतिरेकांवर आधारित धारणांमुळे संघर्ष करीत राहिली. त्या काळात एका पादरीकरिता ब्रह्मचारी असणे अनिवार्य नव्हते. जर पादरीच्या पदावर नियुक्त होण्याआधी त्याचे लग्न झाले असेल तर तो पत्नीबरोबर राहू शकत होता. परंतु नियुक्तीनंतर विवाह करणे, त्याच्याकरिता वर्जित होते. तसेच कोणा अशा व्यक्तीला पादरी बनवले जाऊ शकत नव्हते ज्याने एखाद्या विधवा अगर घटस्फोटित स्त्रीशी लग्न केले असावे किवा ज्याच्या दोन पत्नी असाव्यात किवा ज्याच्या घरात दासी असावी. चौथ्या शतकात ही विचारसरणी पूर्णपणे स्वीकारण्यात आली होती की चर्चमध्ये ज्या व्यक्तीचा संबंध धार्मिक सेवांशी असतो त्याने विवाहित असणे घृणास्पद गोष्ट आहे. सन ३६१ च्या गिगंरा परिषद ही अंतिम परिषद होती, ज्यात अशा प्रकारच्या विचारांना धर्मविरुध्द घोषित केले गेले. परंतु यानंतर थोड्याच कालावधीनंतर सन ३८४ च्या रोमन सेनाडने सर्वच पादरींना सल्ला दिला की त्यांनी वैवाहिक संबंधापासून अलिप्त राहावे आणि दुसर्या वर्षी पोप साईरीकियस याने आदेश दिला की जो पादरी विवाह करेल किवा वैवाहिक असून आपल्या पत्नीशी संबंध ठेवेल त्याला पदच्युत करण्यात यावे. सेंट जीरूम, सेंट एम्ब्रोज आणि सेंट आगस्टाईनसारख्या महान विद्वानांनी या निर्णयाचे अगदी संपूर्ण शक्तीनिशी समर्थन केले. अगदी अल्पविरोधाने ते पश्चिमी चर्चमध्ये पूर्ण सक्तीने लागू केले गेले. त्या वेळी अनेक परिषदांचे या तक्रारीवर विचार विनिमय करण्याकरिता आयोजन करण्यात आले की जे लोक पूर्वीपासून विवाहित होते ते धार्मिक सेवांवर नियुक्त झाल्यानंतरदेखील आपल्या पत्नींसी अवैध संबंद ठेवत आहेत. शेवटी त्यांच्या सुधारणेकरिता नियम केला गेला की त्यांनी सर्वसामान्य जागी झोपावं, आपल्या पत्नींशी एकान्तात कधीही भेटू नये आणि त्यांच्या भेटीच्या वेळी कमीतकमी दोन व्यक्ती उपस्थित असले पाहिजेत. गिरीगोरी एका पादरींची प्रशंसा करताना लिहितो की चाळीस वर्षे तो आपल्या पत्नीपासून वेगळा राहिला. येथपर्यंत की मृत्यूच्या वेळी जेव्हा त्याची पत्नी त्याच्याजवळ गेली तर तो बोलला, ‘‘स्त्री! छे दूर जा.’’
सर्वांत अधिक हृदय पिळून टाकणारा अध्याय या संन्यासासंबंधीचा असा आहे की या संन्यासामुळे आई-बाप, भाऊ-बहीण आणि आपल्या अपत्यांशीदेखील संबंध तोडले गेले. ख्रिस्ती संतांच्या दृष्टिकोनातून मुलाकरिता माता-पित्याचे प्रेम, भावाकरिता भाऊ-बहिणीचे प्रेम आणि बापाकरिता मुलांचे प्रेमदेखील एक पाप होते. त्यांच्या दृष्टीतून आध्यात्मिक विकासाकरिता हे अनिवार्य होते की माणसाने ही सर्व बंधने तोडून टाकावीत. ख्रिस्ती संताच्या कथांमध्ये त्यांच्यासंबंधी अशा अनेक हृदयविदारक घटना आढळून येतात. ज्या वाचल्यानंतर मानवाला आपले धैर्य टिकून ठेवणे कठीण होऊन बसते. एक संन्यासी सेवागिरियस अनेक वर्षांपासून जंगलात तपस्या करीत होता. एके दिवशी अचानक त्याच्या विरहात व्याकुळ असलेले त्याच्या माता-पित्याचे पत्र प्राप्त झाले. त्याला भीती वाटली की हे पत्र वाचल्यानंतर त्यांच्या मनात मानवी प्रेमाच्या भावना तर उत्पन्न होणार नाहीत ना? त्याने लगेच ते पत्र न उघडताच आगीत झोकून टाकले. सेंट थ्योडा रसची आई आणि बहीण अनेक पादरींचे सिफारसपत्र घेऊन आश्रमात पोहोचल्या जेथे तो राहात होता. त्यांनी इच्छा प्रकट केली की केवळ एक क्षण मुलाला आणि भावाला पाहून घ्यावं. परंतु तो त्यांच्या समोरदेखील यायला तयार झाला नाही. सेंट मारकसची आई त्याला भेटण्यासाठी त्याच्या आश्रमात गेली आणि आश्रमच्या गुरुच्या विनवण्या करून त्याला राजी केले की त्याने मुलाला आईसमोर येण्याचा आदेश द्यावा. परंतु मुलगा कोणत्याही परिस्थितीत आईला भेटू इच्छित नव्हता. शेवटी त्याने गुरूच्या आदेशाचे पालन या पध्दतीने केले की वेश बदलून आईसमोर गेला आणि डोळे मिटले अशा तर्हेने मातेने तर मुलाला ओळखलेच नाही, मुलानेदेखील मातेचे तोंड पाहिले नाही. आणखी संत सेंट पोइमत आणि त्याचे सहा भाऊ इजिप्तच्या एका जंगलाच्या आश्रमात राहात होते. अनेक वर्षांनंतर त्यांच्या वृध्द मातेला त्यांच्याबद्दल माहिती मिळाली आणि ती त्यांना भेटण्यासाठी तेथे पोहोचली. दुरूनच आईला येताना पाहून मुलं झोपडीत पळून गेली आणि आतून दार बंद केले. त्यांची आई बाहेर बसून तेथे रडू लागली आणि ओरडून ओरडून सांगू लागली, ‘‘मी इतक्या म्हातारपणी इतक्या लांबून केवळ तुम्हाला पाहण्याकरिता येथे आले. जर मी तुमचं तोंड पाहून घेतलं तर त्यात तुमचे काय नुकसान होणार आहे. काय मी तुमची माता नव्हे?’’ परंतु त्या महापुरुषाने दार उघडलेच नाही. मातेला सांगून टाकले, ‘‘आम्ही तुला ईश्वराकडेच भेटू. यापेक्षाही अधिक करुणामय कहाणी सेंट सिमायान इस्टाइलाइटसची आहे जो आपल्या आई-बापाला सोडून सत्तावीस-वर्षांपर्यंत बेपत्ता राहिला. त्याच्या विरहात बापाने जगाचा निरोप घेतला. आई जीवित होती. मुलाच्या सिध्द झाल्याची चर्चा सर्वदूर पसरली व तिला त्याचा पत्ता मिळाला तेव्हा ती बिचारी त्याला भेटण्यासाठी त्याच्या आश्रमापर्यंत गेली. परंतु तेथे स्त्रियांना प्रवेश करायला परवानगी नव्हती. तिने जीव तोडून त्यांना विनंती केली की एकतर तिला आत बोलावण्यात यावं किवा बाहेर निघून त्यानेच आपला चेहरा तिला दाखवून द्यावा. परंतु त्या ‘ईशप्रेमी’ने साफ नकार दिला. तीन रात्री आणि तीन दिवस ती आश्रमाच्या दाराजवळ उभी राहिली. शेवटी तेथेच पडून तिने आपल्या प्राणाचा त्याग केला. त्यावेळी संतजी निघून बाहेर आले, मातेच्या मृतदेहावर आश्रू गाळले आणि तिच्या मुक्तीकरिता प्रार्थना केली.
अशीच निर्दयता या संतांनी आपल्या बहीण व आपल्या अपत्यांच्या प्रति दाखवली. म्युटियसचा किस्सा लिहिला आहे की तो एक संपन्न व्यक्ती होता. अचानक त्याच्यात धार्मिक भावना जागृत झाल्या आणि तो आपल्या आठ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाला घेऊन एका आश्रमात पोहचला. तेथे त्याच्या आध्यात्मिक विकासाकरिता हे अनिवार्य होते की त्याने आपल्या हृदयातून आपल्या मुलाचे प्रेम काढून टाकावं. याकरिता सर्वप्रथम मुलाला त्याच्यापासून दूर केले गेले. नंतर त्याच्या डोळ्यांसमोर काही काळ विविध प्रकारचे अत्याचार त्या निरागस मुलावर करण्यात येते होते आणि त्याचा बाप सर्वकाही पाहात राहिला. नंतर आश्रमच्या गुरुने त्याला आदेश दिला की त्याला घेऊन त्याने आपल्या हातानेच नदीत फेकून द्यावे. जेव्हा तो या आदेशाचे पालन करायलाही तयार झाला तर त्या वेळी संतांनी त्याचे प्राण वाचवले जेव्हा तो त्याला नदीत फेकण्याच्याच तयारीत होता. त्यानंतर स्वीकारण्यात आले की त्याने खरोखरच आता सिध्दावस्था प्राप्त करून घेतली आहे.
ख्रिस्ती संन्यासचा दृष्टिकोन यासंबंधी असा होता की जी व्यक्ती ईशप्रेमाची इच्छुक आहे तिने मानवप्रेमाचे ते सर्व बंधन कापून टाकावेत जे जगात तिला आपले माता-पिता, भाऊ-बहिणी आणि मुलांशी बांधून ठेवतात. सेंट जीरूम म्हणतो, ‘‘तुझा पुतण्या तुझ्या गळ्यात हात घालून तुला मिठी मारलेला असला तरीही, तुझी माता तुला तिच्या दुधाची शपथ देत देत थांबवत असेल तरीही, तुझा बाप तुला थांबवण्याकरिता तुझ्यासमोर येऊन झोपला तरीही तू सर्वांचा त्याग करून आणि बापाच्या शरीरावरून आश्रूचा एक थेंबही न गाळता क्रॉसच्या झेंड्याखाली धावत ये.’’ यासंबंधी निर्दयता हीच धर्मपरायणता आहे. सेंट गिरीगोरी लिहितो, ‘‘एक युवक आपल्या मनातून माता-पित्यांचे प्रेम काढू शकला नाही आणि एके दिवशी रात्रीच्या वेळी पळून तो त्यांना जाऊन भेटला. ईश्वराने त्याच्या या चुकीची सजा अशी दिली की आश्रम पोहोचल्याबरोबर तो मरण पावला. त्याचा मृतदेह पुरण्यात आल्यावर जमिनीने त्या मृतदेहाचा स्वीकार केला नाही. वारंवार त्याला कबरीत टाकले जायचे आणि प्रत्येक वेळी जमीन त्याला बाहेर फेकून देत असे. शेवटी सेंट बैनीडिक्टने त्याच्या छातीवर मांगलिक प्रसाद ठेवला. त्यानंतर कबरीने त्याचा स्वीकार केला.’’ एका साध्वीसंबंधी लिहिले आहे, ‘‘ती मृत्यूनंतर तीन दिवसांपर्यंत यातनाग्रस्त राहिली. कारण ती आपल्या मनातून आपल्या मातेचे प्रेम काढू शकली नव्हती.’’ एका संताची प्रसंशा करताना लिहिले आहे, ‘‘त्याने कधी आपल्या नातेवाईकांशिवाय कोणाबरोबरही निर्ममता दाखवली नाही.’’
आपल्या निकटवर्तियांप्रति निर्दयता, क्रूरता आणि कठोरहृदयता दाखवण्याचा जो अभ्यास हे लोक करीत होते, त्यामुळे त्यांच्या मानसिक कोमल भावनांचा अंत होत असे. परिणामस्वरूप ज्या लोकांशी धर्मासंबंधी मतभेद होत असत, त्यांच्याविरुध्द ते अत्याचाराला त्याच्या चरमसीमेपर्यंत पोहचवून देत असत. चौथे शतक येईपर्यंत ख्रिस्ती लोकांमध्ये ८०-९० संप्रदाय निर्माण झाले होते. सेंट आगस्टाइन याने आपल्या कालात ८८ संप्रदाय दाखवले आहेत. हे संप्रदाय आपसात एकमेकांत अत्यंत घृणेची वर्तणूक करीत होते. या घृणेची आग भडकविणारेदेखील संन्यासीच होते. या घृणेच्या आगीत विरोधी जमातीच्या लोकांना पेटवून राख करून देण्याच्या प्रयत्नातदेखील संन्यासीच पुढाकार घेत होते. इस्कन्द्रिया या सांप्रदायिक संघर्षाचा एक मोठा आखाडा होता. तेथे सुरुवातीला ऐरियन संप्रदायाच्या बिशपने अथानसियसच्या संप्रदायावर हल्ला चढविला. त्याच्या आश्रमातून कुमारिका संन्यासिणींना पकडून बाहेर काढले. त्यांना नग्न करून काटेरी शस्त्रांनी पिटाळण्यात आले. त्यांच्या शरीराला चटके देण्यात आले. कारण त्यांनी आपल्या संप्रदायात असलेल्या तत्त्वांचा त्याग करावा. मग जेव्हा इजिप्तच्या कॅथोलिक दलाला अधिकार प्राप्त झाले तेव्हा त्यांनीदेखील ऐरियस संप्रदायाविरुध्द तेच सर्वकाही केले. यासंबंधी अधिक शक्यता याच गोष्टीची आहे की ऐरियसलादेखील विष पाजून ठार करण्यात आले. याच इस्कद्रियामध्ये सेंट साईरिलच्या शिष्य-संतांनी खूपच उपद्रव माजवले. त्यांनी विरोधी दलाच्या एका साघ्वीला पकडून आपल्या चर्चमध्ये घेऊन गेले, तिची हत्या केली, तिच्या मृतदेहाचे लचके तोडले आणि तिच्या शरीराचे अवयव आगीत झोकून देण्यात आले. रोमची स्थितीदेखील यापेक्षा वेगळी नव्हती. इ. स. ३६५ मध्ये पोप लिवोरियसच्या निधनावर दोन पक्षांनी पोप पदाकरिता आपापले उमेदवार उभे केले. दोघांमध्ये भीषण रक्तपात घडला. इतकेच नव्हे तर केवळ एका दिवसात एकाच चर्चमधून १३७ मृतदेह काढण्यात आले.
हा त्याग आणि ब्रह्मचर्य तथा संन्यासाबरोबरच सांसारिक धनसंपत्ती साठवण्याकरितादेखील कोणती कमतरता करण्यात आली नाही. पाचव्या शतकापर्यंत अशी स्थिती झाली होती की रोमचा बिशप राजा-महाराजासारखा आपल्या महालात राहात होता. त्याची स्वारी जेव्हा शहरातून निघत होती तेव्हा त्याची शानबान राजांपेक्षा कमी राहात नसे. सेंट जीरूम आपल्या काळात(चौथ्या शतकाच्या अंतिम समयी) तक्रार करतो की अनेक बिशपांचे विलासी जीवन आपल्या भव्यतेमध्ये राज्यपालांच्या जीवनाला लाजविणारे असे होते. आश्रम आणि चर्चकडे धनसंपत्तीचा हा प्रभाव सातव्या शतकापर्यंत(कुरआन अवतरण्याच्या वेळेपर्यंत) पोहोचता पोहोचता एका प्रचंड जलप्रवाह बनला. ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीच्या मनात बिबविण्यात आली होते की ज्या कोणाच्या हातून एखादे मोठे पाप घडले असेल तर त्याची मुक्ती कोणत्याही सिध्द मठावर भेटवस्तू चढवल्याने किवा एखाद्या आश्रम अगर चर्चला भेटवस्तू दिल्यानंतरच होऊ शकते. त्यानंतर तेच जग त्यांच्या पायाखाली येऊन पडले ज्यापासून दूर राहणे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य होते. विशेष रूपाने जे काही या पतनाचे कारण होते ते हेच होते. संन्यासींच्या असधारण तपस्या आणि त्यांच्या आत्म-दमनाचे चमत्कार पाहून जेव्हा सामान्य जनतेमध्ये त्यांच्याप्रति अत्याधिक आस्था निर्माण झाली तेव्हा बरेच पारिवारिक लोक संन्यासीची वेषभूषा धारण करून संन्यासींच्या जमातीत सामील झाले. त्यांनी संसाराचा त्याग करून या वेषभूषेत जग-संपत्ती कमावण्याचा कारभार अशा तर्हेने वृध्दीस आणला की मोठमोठ्या सांसारिक लोकांना त्यांनी मागे टाकले.
पवित्रतेच्या संबंधातदेखील प्रकृतीच्या विरोधात जाऊन संन्यासाला वारंवार पराभव स्वीकारावा लागला. जेव्हा पराभूत झाला त्या वेळी त्याला अत्यंत नामुष्की पत्करावी लागली. आश्रमांमध्ये आत्मदमनाचे काही अभ्यास असेही होते ज्यात जोगी आणि जोगिणी दोन्ही एकाच जागी राहात आणि प्रायः काही अधिक तपस्येकरिता एकाच बिछान्यावर रात्र व्यतीत करीत असत.
प्रसिध्द संन्यासी सेंट इवागीरियस मोठ्या प्रशंसेने पॅलेस्टाईनच्या त्या संन्यासींच्या आत्मनियंत्रणाचा उल्लेख करतो ज्यांनी आपल्या वासनांवर इतके जबरदस्त नियंत्रण प्राप्त करून घेतले होते की ते स्त्रियांबरोबर एकाच ठिकाणी स्नान करीत असत आणि पाहिल्याने, त्यांच्या स्पर्शाने आणि त्यांना आलिगण घातल्यानेसुध्दा त्यांच्यावर प्रकृति विजय प्राप्त करीत नव्हती. स्नान यद्यपि संन्यासमध्ये अत्यंत अप्रिय होते. परंतु आत्मदमनाच्या परीक्षेकरिता अशा प्रकारचे स्नानदेखील करवून घेतले जायचे. अन्ततः त्याच पॅलेस्टाईनसंबंधी नेसाचा सेंट गिरीगोरी(मृत्यू सन ३९६) लिहितो, ‘‘ते दुष्टचरित्रतेचे गड बनले होते. मानवप्रकृति केव्हाही त्या लोकांचा प्रतिशोध घेतल्याशिवाय राहात नाही. जे त्याच्याशी संघर्ष करतात संन्यास त्याच्याशी संघर्ष करून शेवटी अश्लीलतेच्या ज्या खड्ड्यात जाऊन पडले त्याची कथा आठव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंत धार्मिक इतिहासाचा अत्यंत कुरूप असा कलंक आहे.’’
दहाव्या शतकातील एक अतालव्याचा बिशप लिहितो, ‘‘चर्चमध्ये धार्मिक सेवा करणार्या सेवकांविरुध्द बदफैलीच्या शिक्षाचा कायदा व्यवहारात लागू करण्यात आला तर मुलाशिवाय कोणीही शिक्षेपासून वाचू शकणार नाही. जर अवैध मुलांनादेखील धार्मिक सेवांपासून निलंबित करून टाकण्याचा कायदा लागू केला गेला तर कदाचित चर्चच्या सेवेत एकही बालक राहू शकणार नाही.’’ मध्य युगातील लेखकांची पुस्तके या तक्रारींनी भरलेले आहेत की जोगिणीचे आश्रम कुकर्माची वैश्यालये बनलेली आहेत. त्यांच्या चार भितीत नवजात शिशूंची हत्या होत आहे. पाद्री आणि धार्मिक कर्मचार्यांचे त्या स्त्रियांशीदेखील अनैतिक संबंध प्रस्थापित झाले आहेत ज्या स्त्रियांशी कोणत्याही स्थितीत विवाह होऊ शकत नाही आणि आश्रमांमध्ये प्रकृतिविरुध्द कर्म हे अपराधदेखील फैलावले आहेत. चर्चमध्ये अपराध स्वीकृतीची रीती कुकर्माचे साधन बनले आहे.
उपरोक्त विवेचनाने चांगल्या प्रकारे अनुमान लावता येईल की पवित्र कुरआन येथे धर्मात संन्याससारख्या नवीन कल्पनेला प्रवेश करणे आणि मग त्याप्रमाणे वागण्याचे वर्णन करून ख्रिस्ती धर्मातील कोणत्या बिघाडाकडे संकेत करीत आहे.

संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *