Home A परीचय A इस्लामचे फायदे

इस्लामचे फायदे

इस्लामी जीवनपद्धती स्वीकारण्याचे कोणते फायदे आहेत? ते आता आपण पाहू या.
आपणास हे कळून चुकले आहे की या जगात चहुकडे ईशप्रभुत्वाच्या निशाण्या पसरलेल्या आहेत. विश्वाच्या एका परिपूर्ण व्यवस्थेनुसार व एका अनिवार्य नियमानुसार चालणारा हा विराट कारखाना खुद्द याच गोष्टीचा साक्षात पुरावा आहे की त्याच्या निर्माणकर्ता व त्याला कार्यान्वित करणारा एक अमर्याद शक्तिमान शासक आहे. त्याच्या शासनाविरुद्ध कोणतीही वस्तू डोके वर करू शकत नाही. संपूर्ण विश्वाप्रमाणेच मनुष्याची प्राकृतिक अवस्थाही अशीच आहे की ईश्वराच्या आज्ञेचे पालन व्हावे तद्नुसार
नकळत ते रात्रंदिवस त्याचे आज्ञापालन करीतच आहे. कारण त्याच्या प्राकृतिक नियमांचे उल्लंघन करून तो जिवंत राहूच शकत नाही.
परंतु ईश्वराने मनुष्याला ज्ञानाची क्षमता, विचार व आकलन शक्ती व चांगले वाईट यांची पारख देऊन इच्छायोजना व अधिकार याबाबतीत थोडेसे स्वातंत्र्यसुद्धा बहाल केले आहे. या स्वातंत्र्यातच वास्तविक मनुष्याची परीक्षा आहे, त्याच्या विचार-विवेकाची कसोटी आहे. तसेच त्याला जे स्वातंत्र्य दिले गेले आहे त्याचा तो कशा रीतीने वापर करतो, या गोष्टीचीही परीक्षा आहे. या परीक्षेकरिता कुठलाही एक मार्ग स्वीकारण्यासाठी त्याला विवश केले गेलेले नाही. कारण विवश केल्याने परीक्षेचे मूळ उद्दिष्ट नष्ट होते. एखाद्या परीक्षेत प्रश्नपत्रिका वाटल्यानंतर तुम्हाला एक विशिष्ट उत्तर देण्यास विवश केले गेले तर अशा परीक्षेपासून कोणताही लाभ होणार नाही, हे तुम्ही जाणू शकता. तुमची खरी क्षमता त्याच वेळी दिसून येईल जेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे उत्तर लिहिण्याचा अधिकार व मोकळीक असेल. तुम्ही बरोबर उत्तर दिले तर यशस्वी व्हाल व आगामी प्रगतीचीद्वारे तुमच्यासाठी उघडली जातील. उत्तर बरोबर दिले नाही तर अयशस्वी व्हाल व आपल्या अयोग्यतेमुळे खुद्द स्वतःच्याच प्रगतीचा व उन्नतीचा मार्ग बंद करून घ्याल. ठीक याच तऱ्हेने आपल्या परीक्षापद्धतीमध्ये अल्लाहने मनुष्यालासुद्धा त्याला हवी ती पद्धत अंगीकार करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे.
आता एक मनुष्य असा आहे की तो खुद्द स्वतःची तसेच या विश्वाच्या नैसर्गिक प्रकृतीशी अनभिज्ञ आहे. आपल्या निर्मात्याचे अस्तित्व व त्याची महान गुणवता ओळखण्यात तो चूक करतो आणि परिणामतः त्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा अनुचित फायदा घेऊन तो अवज्ञा व बंडखोरीचा मार्ग अवलंबतो. असा मनुष्य ज्ञान, बुद्धी, विवेक व कर्तव्यनिष्ठेच्या कसोटीत नापास झाला. प्रत्येक बाबतीत तो एक हलक्या दर्जाचा आहे असे त्याने स्वतःच सिद्ध केले. म्हणून वरीलप्रमाणेच त्याला परिणामाचे फळ मिळावयास हवे.
त्याच्या तुलनेत दुसरा एक मनुष्य या परीक्षेत सफल ठरला आहे. त्याने आपल्या ज्ञान व बुद्धीचा उचित वापर करून ईश्वरास जाणले व त्याचा स्वीकार केला. वास्तविकपणे असे करण्यास तो बांधलेला नव्हता. त्याने चांगले व वाईट यांची पारख करण्यात कसलीही चूक केली नाही. आपल्या स्वतंत्र निवडीने त्याने भलेपणा व चांगुलपणासच आपलेसे केले. खरे तर कुमार्गाकडे व वाईटपणाकडेही वळण्याचे त्याला अधिकार व स्वातंत्र्य होते. त्याने आपल्या प्रकृतीला जाणले. आपल्या ईश्वरास ओळखले व अवज्ञेचे स्वातंत्र्य असतानाही त्याने ईश्वराचे आज्ञाधारकत्वच पत्करले. अशा माणसाला परीक्षेमध्ये सफलतेचे भाग्य अशासाठीच लाभले की त्याने आपल्या बुद्धीकडून योग्य कार्य करून घेतले. डोळ्यांनी नीट पाहिले, कानांनी नीट ऐकले, बुद्धीने योग्य निर्णय घेतला व अंतःकारणाने योग्य असलेल्या गोष्टीचे अनुकरण करण्याचे ठरविले. सत्याला जाणून व ओळखून त्याने असेही सिद्ध करून दाखविले की तो सत्य ओळखणारा आहे. सत्यापुढे नतमस्तक होऊन त्याने असे दाखवून दिले की तो सत्याचा उपासक आहे.
अशा तऱ्हेचे गुण असणारा माणूस, या जगात तसेच पारलौकिक जीवनात सफल झालाच पाहिजे हे उघड आहे.
तो ज्ञानाच्या तसेच आचरणाच्या प्रत्येक बाबतीत योग्य मार्गाचाच स्वीकार करतो. कारण तो मनुष्य ईश्वराचे अस्तित्व ओळखतो व त्याची महान गुणवत्ता जाणतो, तो खऱ्या अर्थाने ज्ञानाचा आरंभही जाणतो व त्याचा शेवटसुद्धा जाणतो. असा मनुष्य कधीही वाट चुकणार नाही. त्याचे पहिले पाऊलही उचित तऱ्हेने पडले आहे. शेवटी ज्या इष्ट स्थानाप्रत त्याला जाणे आहे, त्याचीही त्याला विश्वासपूर्वक जाणीव आहे. आता तो तात्त्विक रीतीने चिंतन व अभ्यास करून विश्वातील दडलेली रहस्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु एखाद्या विद्रोही (काफीर) प्रमाणे तो कधी संदेह व शंकाकुशंकाच्या कोड्यात पडत नाही. तो विज्ञानाद्वारा निसर्गाचे नियम जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ब्रह्मांडात दडलेल्या अपरंपार खजिन्याचा शोध घेतो. ज्या शक्ती पृथ्वीमध्ये व खुद्द माणसाच्या अस्तित्वामध्ये ईश्वराने ठेवलेल्या आहेत त्या सर्वांचा जातीने शोध घेतो व ते जाणून घेतो. पृथ्वी व आकाशांत ज्या ज्या वस्तू आहेत त्या सर्वाचा वापर व उपयोग करण्यासाठी उत्तमोत्तम पद्धती शोधून काढतो. परंतु ईश्वर परिचय (ईशपरायणता) त्याला प्रत्येक वेळी विज्ञानाच्या दुरूपयोग करण्यापासून परावृत्त करतो. सर्व साधनांचा मीच धनी आहे असा गैरसमज त्याच्यात कधीही होत नाही.
मी निसर्गावर विजय मिळविला आहे, मी माझ्या फायद्यासाठी विज्ञानाचे सहाय्य घेईन, जगाला उद्ध्वस्त करून टाकीन आणि रक्तपात व लूटमार करून संबंध जगावर आपल्या सामर्थ्याचा दरारा निर्माण करीन, असे कृत्य एका विद्रोही (काफिर) वैज्ञानिकाचे आहे.(१) मुस्लिम वैज्ञानिक जितक्या जास्त प्रमाणात विज्ञानावर प्रभुत्व प्राप्त करतो तितक्याच जास्त प्रमाणात ईश्वरावर त्याचा विश्वास व श्रद्धा वृद्धिंगत करतो आणि त्याच प्रमाणात तो ईश्वराचा अधिकाधिक आभारी दास बनतो. त्याची विश्वासधारणा व श्रद्धा अशी होते की माझ्या प्रभुने माझ्या सामर्थ्यांमध्ये व माझ्या ज्ञानामध्ये जी भर घातली आहे, तिच्यापासून मी स्वतःच्या व सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयत्न करीत राहील. हेच त्याचे खरे आभार प्रदर्शन ईश्वराप्रति आहे.
(काहीशी अशीच आजची परिस्थिती आहे ज्याचा सामना आज मनुष्य करीत आहे. डॉ. जोड (Dr. Joad) यांनी स्पष्टपणे सत्य सांगितले आहे, –
‘‘विज्ञानाने आम्हाला अशा शक्ती प्रदान केलेल्या आहेत ज्या देवतांना प्राप्त होणे योग्य आहेत आणि आम्ही त्यांच्या उपयोगात शाळकरी विद्यार्थी आणि अयोग्य व्यक्तीप्रमाणे मनोवृत्ती व बुद्धीने काम घेत आहोत.’’
१) मनुष्याने आजपर्यंत जे काही पाहिले आहे ते ईश्वराच्या साम्राज्याचा अतिलहानसा भाग आहे.
विश्वविख्यात तत्त्वज्ञ बरट्रान्द रसेल (Bertrand Russel) लिहितो,
‘‘ढोबळमानाने म्हटले तर आम्ही एक अशा शर्यतीच्या मध्यभागी आहोत जिचे साधन तर मानवी कौशल्य व बुद्धी आहे आणि जिचा अंत मानवी मूर्खता वर होतो. त्यास प्राप्त करण्याची इच्छित कुशाग्रतेतील प्रत्येक वृद्धी वाईट परिणामाकडे नेत आहे. मानवजातीच्या या शर्यतीने अज्ञानता व अनिपुणतेच्या विरोधात जगात जगण्यासाठी संघर्ष केला आहे. परंतु मूर्खतामिश्रित प्राप्त ज्ञान व कुशलतेमुळे मानवी जीवनाला अविश्वासी बनविले आहे. ज्ञान शक्ती आहे परंतु ही शक्ती वाईटासाठीसुद्धा तितकीच खर्च केली जाऊ शकते जितकी चांगल्यासाठी व मानवी कल्याणासाठी केली जाते.
यावरून निष्कर्ष निघतो की मनुष्याने जर तत्त्वदर्शितेत तितकीशी उन्नती केली नाही जितकी तो ज्ञान वृद्धीत करतो तर ती ज्ञानवृद्धी खरेतर दुःखात वृद्धी सिद्ध होते.’’ (40 Impact of Science on Society – P. P. 120-121)
दुसऱ्या एका तत्त्वज्ञाचे कथन आहे,
‘‘आम्ही आकाशात पक्षाप्रमाणे उडणे आणि समुद्रात माशाप्रमाणे संचार करणे अवगत केले आहे, परंतु आम्हाला हे माहीत नाही की पृथ्वीवर कशा प्रकारे जीवन जगावे.’’ (Qouted by Joad in Counter Attack from the East. page – 28)
याचप्रमाणे इतिहास, अर्थशास्त्र, राजनीती, विधी व अन्य सर्व विद्या व कला यामध्ये आपल्या संशोधन व प्रयत्नांच्या दृष्टीने एक मुस्लिम कोणाही विद्रोहीच्या तुलनेत कमी पडणार नाही. तरीसुद्धा या दोहोंच्या दृष्टिकोनात मोठे अंतर आहे. मुस्लिम प्रत्येक विद्येचा अभ्यास उचित दृष्टीने करतो. उचित उद्दिष्टांसाठी करतो व यथार्थ निष्कर्षाप्रत जाऊन पोहोचतो. इतिहासापासून तो माणसांच्या गतानुभवाचा उचित व योग्य धडा व बोध घेतो. गतकाळातील भिन्न भिन्न जातीवंशाच्या उन्नतीची तसेच त्यांच्या अवनतीची कारणे जाणून घेतो. त्यांच्या संस्कार संस्कृतिमधील लाभकारक गोष्टी शोधून त्यांच्यापासून लाभ प्राप्त करतो. त्यांच्यातील सज्जन लोकांच्या स्थितीचा लाभ घेतो व गतकाळातील जातीवंशाचा ज्या ज्या गोष्टीमुळे नाश झाला, त्या सर्व गोष्टींपासून दूर राहतो. अर्थव्यवस्थेमध्ये संपत्ती मिळविण्याच्या तसेच तिचा विनियोग करण्याच्या अशा पद्धती शोधून काढतो की ज्यापासून सर्व मानवजातीचे कल्याण होईल. एकाचाच लाभ होईल व अनेकांचे नुकसान होईल अशा पद्धतीचा अंगीकार करणार नाही. राजकारण करण्यात त्याचे संपूर्ण लक्ष याच गोष्टीवर केंद्रित असते व कार्यरत होते की सर्व जगात शांतता, न्याय, सदाचार व सभ्यपणा यांचेच अधिपत्य व्हावे. कोणाही व्यक्तीने अगर समूहाने ईश्वराच्या दासांना आपला दास बनवू नये. शासन व तिच्या सर्व सामर्थ्याला, ईशअनामत (ठेव) मानली जावी व तिचा वापर ईश्वराच्या दासांच्या कल्याणासाठी केला जावा. कायदा करताना तो अशा दृष्टीने विचार करील की, काटेकोर न्यायनिष्ठतेने लोकांचे हक्क ठरविले जावेत व कोणाही व्यक्तीवर अन्याय होणार नाही.
एका मुस्लिामाच्या आचरणांत, ईशभय व सत्यनिष्ठा व सरळपणा असतो. जगात तो अशी जाणीव बाळगून राहतो की सर्व वस्तूंचा धनी ईश्वरच आहे. माझ्याजवळ व सर्व मानवाजवळ जे काही आहे, ते सर्व ईश्वरानेच दिलेले आहे. कोणत्याही वस्तुंचा किंबहुना माझ्या स्वतःच्या देहाचा व त्यातील शारीरिक सामर्थ्याचाही मी मालक नाही. हे सर्व काही ईश्वराची अनामत असून या अनामतीचा वापर करण्याचे जे अधिकार मला आहेत त्यांचा वापर ईश्वरी इच्छेनुसारच केला जाईल. एके दिवशी ईश्वर माझ्याकडून ही अनामत परत घेईल त्यावेळी मला प्रत्येक वस्तुचा हिशेब द्यावा लागेल.
ही जाणीव बाळगून जी व्यक्ती जगात राहील त्याच्या सदाचरणाची जरा कल्पना करा! तो आपले अंतःकरण कुविचारापासून निर्मळ राखील. तो त्याच्या बुद्धीला वाईट गोष्टीच्या चिंतनापासून दूर ठेवील. तो त्याच्या नेत्रांना वाईट दृष्टीपासून रोखून धरील, तो त्याच्या कानांना कुश्रवणापासून परावृत्त करील. तो त्याच्या जिभेचे अशा रितीने रक्षण करील की तिच्या द्वारा सत्याविरुद्ध कसलाही शब्द निघणार नाही. तो निषिद्ध मार्गाने आपले पोट भरण्याऐवजी उपाशीपोटी राहणे पसंत करील. अत्याचारासाठी तो त्याच्या हातांचा कधीही उपयोग करणार नाही. कुमार्गावर त्याचे पाय कधीही जाणार नाहीत. त्याचा शिरच्छेद जरी केला तरी असत्यासमोर तो कधीही नतमस्तक होणार नाही. त्याची कसलीही इच्छा व गरजेची पूर्तता तो अन्याय व अत्याचारांद्वारा करणार नाही. तो मूर्तिमंत सत्य व सदाचार असेल. सत्यनिष्ठेपेक्षा इतर कोणतीही गोष्ट त्याला अधिक प्रिय असणार नाही. त्यासाठी स्वतःच्या प्रत्येक हिताचे, प्रत्येक इच्छा आकांक्षेचे किंबहुना स्वतःचेही तो बलिदान करील. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जुलुम व अन्याय यांचा तो अधिक तिरस्कार करील. कसल्याही लाभाच्या आमिषाने व लालसेने अगर कसल्याही हानिच्या भयाने तो असत्याच्या पाठीशी राहणार नाही. या जगातील यशाचा वाटाही त्यालाच लाभेल.
सर्व जगात त्याच्याइतका कोणीही सदाचारी व आदरणीय असणार नाही, कारण की त्याचे मस्तक ईश्वराखेरीज इतरांपुढे कधीही वाकणार नाही, त्याचे हात ईश्वराशिवाय अन्य कोणापुढे पसरणार नाही. अशा व्यक्तीनजीक अवमान कसा फिरकू शकेल?
या जगात त्याच्याइतका अन्य कोणीही सामर्थ्यवानही असणार नाही, कारण त्याच्या अंतःकरणात ईश्वराखेरीज कोणाचेही भय असणार नाही, तसेच ईश्वराखेरीज अन्य कोणाकडून त्याला देणगी अथवा बक्षिसाची लालसाही असणार नाही. अशा व्यक्तीला सत्य व न्यायाच्या मार्गापासून पथभ्रष्ट करू शकणारी अशी कोणती शक्ती आहे? आणि कोणती अशी धलदौलत आहे जी अशा व्यक्तीचे ईमान विकत घेऊ शकते?
त्याच्यापेक्षा या जगात अन्य कोणीही धनसंपन्न व उदार असणार नाही कारण तो विलासप्रिय नाही. आपल्या इच्छा वासनांचा तो गुलाम नाही, तो लोभी नाही. आपल्या
श्रमाच्या घामाने जे धन मिळवितो, त्यातच तो समाधानी असतो. निषिद्ध मार्गाने मिळणाऱ्या धनाच्या राशी जरी त्याच्यासमोर मांडल्या तरी तो तुच्छतेने त्यांना लाथाडून टाकतो. हे संतोषाचे धन असून त्यापेक्षा मोठे कसलेच धन असू शकत नाही.
त्याच्याइतका लोकप्रिय व आवडताही अन्य कोणी असणार नाही. कारण तो प्रत्येक माणसाचा न्याय हक्क त्याला देईल. कोणाचाही हक्क तो हिरावून घेणार नाही. प्रत्येकाशी तो सत्व्यवहार करील व कोणाशीही तो कुव्यवहार करणार नाही. प्रत्येकाच्या कल्याणासाठी व भल्यासाठी तो झटेल व त्या मोबदल्यात तो निरपेक्ष असेल. अशा माणसाकडे लोकांची मने आपोआपच आकर्षित होतील व प्रत्येकजण त्याला प्रेम व आदर देण्यास विवश होईल.
त्याच्याइतका अन्य कोणीही विश्वसनीय असणार नाही, कारण तो कोणाच्याही अनामत ठेवीचा अपहार करणार नाही. सत्यापासून तो आपले तोंड कधीही फिरविणार नाही. आश्वासनपूर्ती करण्यात तो कधीही चुकणार नाही. तसेच आपल्या व्यवहारात तो सचोटीने वागणारा असेल व प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहाणारा साक्षीदार असला किंवा नसला तरी ईश्वर तर सर्वज्ञ व सर्वसाक्षी आहे; ही जाणीव मनात बाळगूनच तो प्रत्येक व्यवहार प्रामाणिकपणे व सचोटीने करील. अशा माणसाची पत, विश्वसनियता याबद्दल काय बोलावे! त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही असा कोण असेल?
एका मुस्लिमाचे चारित्र्य तुम्ही जर नीट जाणून घेतले तर तुमची अशी खात्री होईल की मुस्लिम जगामध्ये अवमानित, शासित तसेच प्रभावाधीन होऊन कधीही राहणार नाही. तो सतत प्रभावशाली व शासकच होऊन राहील. कारण त्याच्यामध्ये इस्लाम जी वैशिष्ट्ये निर्माण करतो त्याच्यावर कोणतीही शक्ती प्रभाव पाडू शकत नाही.
जगामध्ये अशा तऱ्हेने आदरयुक्त व गौरवपूर्ण जीवन व्यतीत केल्यानंतर आपल्या ईश्वरासमोर तो जेव्हा हजर होईल तेव्हा ईश्वर त्याच्यावर आपल्या कृपाप्रसादाचा व इनामांचा वर्षाव करील. कारण जी अमानत जगात त्याच्या स्वाधीन केली गेली होती तिचा त्याने यथायोग्य वापर केला. उज्वल यश मिळवून सफल झाला. ही अशी एक शाश्वत सफलता आहे जी या जगापासून पारलौकिक जीवनापर्यंत सतत गतिशील असते व तिची परंपरा कोठेही खंडित होत नाही.
हा इस्लाम आहे. असा हा इस्लामच मनुष्याचा प्राकृतिक व स्वाभाविक धर्म आहे. तो कोणत्याही एखाद्या जातीवंशापुरता अगर एखाद्या राष्ट्रापुरता मर्यादित नाही. प्रत्येक युगात व प्रत्येक जातीवंशात व राष्ट्रात जे काही ईश्वराची जाण असणारे व सत्यप्रिय लोक होऊन गेले ते सर्व मुस्लिमच होते. मग त्यांच्या भाषेत या धर्माचे नाव इस्लाम असो वा अन्य काही.
संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *