इस्लाम आज्ञाधारकांसाठी (मुस्लिमांसाठी) कोणती कर्तव्यें निश्चित करत आहे. हा फार विस्तृत विषय आहे. याचा खुलासा करण्यासाठी हजारहून जास्त पाने खर्च करावी लागतील. आपण येथे खोलात न जाता सर्वसामान्य चर्चा करू या. इस्लामच्या प्रमुख आदेशांचा येथे थोडक्यात आढावा घेतला तरी आपला उद्देश पूर्ण होणार आहे. हे प्रमुख आदेश दोन भागांमध्ये विभागले जाऊ शकतात.
एक म्हणजे जे आदेश मौलिक महत्त्वाचे आहेत. इस्लामच्या शिकवणुकीत अशांचा समावेश श्रध्देनंतर लगेचच केला गेला आहे.
दुसरा प्रकार म्हणजे ज्या आदेशांचे स्वरूप हे पहिल्या प्रकारांपासून भिन्न आहे ते पहिल्या प्रकारच्या आदेशानंतर येतात. त्यांचे महत्त्व हे पहिल्या प्रकारच्या आदेशानंतरचे आहे.
म्हणून पहिल्या प्रकारच्या आदेशांचाच आपण स्वाभाविकपणे प्रथम विचार करु या कारण हे मौलिक स्वरूपाचे आदेश त्यातही प्रथम श्रेणीतील आहेत.
इस्लामने मुस्लिमांसाठी कोणत्या मौलिक अशा कर्तव्यांची जबाबदारी निश्चित केले आहे? उत्तरासाठी आपणास अनुमान अथवा कयास करण्याची मुळीच आवश्यकता नाही कारण प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.
‘‘इस्लामचा पाया पाच बाबींवर आधारित आहे. 1. अल्लाहशिवाय इतर कोणीही दुसरा ईश्वर नाही, मुहम्मद (स.) अल्लाहचे प्रेषित आहेत, 2. नमाज अदा करणे, 3. जकात अदा करणे आणि 4. रमजानचे उपवास (रोजे) ठेवणे, 5. पाचवे कर्तव्य हज यात्रा करणे होय.’’ (बुखारी)
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या एका कथनानुसार (हदीसनुसार) त्यांनी ‘‘इस्लामचा पाया पाच गोष्टींवर आधारित आहे.’’ असे म्हटल्यानंतर प्रेषितांनी ‘‘दायिम’’ हा शब्दसुध्दा वापरला आहे. या शब्दाच्या समावेशानंतर अर्थ असा होतो की ‘‘इस्लाम पाच खांबांवर उभा आहे.’’ आता खांब म्हणजे संपूर्ण इमारत नव्हे. ते त्या इमारतीचे अंग आहेत. इमारतीच्या इतर अंगाप्रमाणे खांब इमारतीचे एक महत्त्वाचे अंग आहे. इमारतीत त्यांचे महत्व हे अनन्यसाधारण असे आहे. जोपर्यंत खांब उभे राहत नाहीत तोपर्यंत इमारतीचे इतर भाग पूर्ण होतच नाहीत आणि त्यामुळे इमारत उभी राहाणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे इस्लामची कर्तव्ये जर पाळली गेली नाहीत तर इस्लामच्या इतर शिकवणींना आचरणात आणणे कठीण जाते. जर या मौलिक कर्तव्यांना डावलून काही कर्तव्ये पार पाडली गेलीत तर तो फक्त कर्तव्याचा आभास असेल आणि तत्त्वहीन कृत्य असेल. म्हणून मौलिक अशा महत्त्वाच्या कर्तव्यांना पार पाडले म्हणजे इतर कर्तव्यांना पार पाडण्यासारखे आहे. या दुसऱ्या प्रेषितकथनात (हदीसीमध्ये) फक्त याच इस्लामच्या मूलतत्त्वांना आणि कर्तव्यांना इस्लाम असे संबोधण्यात आले आहे.
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे कथन आहे, ‘‘इस्लाम म्हणजे तुम्ही याची खात्री करावी की ईश्वर दुसरा नाही फक्त अल्लाह आणि मुहम्मद (स) हे अल्लाहचे प्रेषित आहेत आणि तुम्ही नमाज अदा करावी, जकात द्यावी रमजानचे उपवास (रोजे) ठेवावेत आणि काबागृहाचे हज करावे आयुष्यातून एकदा तरी.’’
पहिल्या हदीसीमध्ये ही कर्तव्ये ‘‘इस्लामचे खांब’’ असे संबोधले गेले परंतु ते अतिमहत्त्वाचे असल्याने त्यांनी संपूर्ण इस्लामला प्रदर्शित केले आहे हे आपण खालील चर्चेतून पाहू या. आपण या इस्लामच्या प्रथम श्रेणीतील कर्तव्यांविषयी जाणून घेऊ या.
0 Comments