अल्लाहचा सच्चा दास आणि श्रद्धावंत नेहमीच प्रयत्न करीत असतो की आपल्याकडून आपल्या स्वामी अल्लाहची अवज्ञा होऊ नये. मात्र शेवटी तो एक मानव असतो. त्याच्या स्वभावातच सत्यमार्गात असंख्य अडचणी निर्माण करणाऱ्या बाबी असतात. त्यातल्यात्यात तो स्वत: चुकीचा पुतळा असल्यामुळे कळत-नकळत त्याच्याकडून चुका घडत असतात. मात्र चुकीची जाणीव होताच त्याचा आत्मा थरथर कापायला लागतो. ईशअवज्ञेचे कारण दुष्परिणामाला तो जाणतो. त्यास ईशकोपाचा भयावह परिणाम माहीत असतो. त्याला आपल्याकडून झालेल्या चुकीचा खूप पश्चात्ताप होतो आणि यापुढे परत ही चूक घडू न देण्याचा पक्का निश्चय करतो. याप्रसंगी तो पश्चात्तापाने अल्लाहसमोर आपल्या अपराधाची गयावया करून क्षमा मागतो आणि परत अल्लाहशी आपले भक्तीसंबंध पूर्ववत जोडतो.
अल्लाहचा सच्चा आज्ञाधारक आणि आत्मसमर्पित माणूस अर्थात मुस्लिम आपले तन-मन-धन ईशमार्गात झोकून देतो आणि एवढे करूनही त्याला अल्लाहच्या दासत्वाच्या नात्याशी न्याय केल्याचे समाधान होत नाही. त्यास या गोष्टीची सतत जाणीव असते की अल्लाहने आपल्याला अस्तित्व देऊन आणि जगण्यासाठी सर्व सोयी करून आपल्यावर प्रचंड उपकार केले. आपले तन-मन-धन हे अल्लाहनेच आपल्याला प्रदान केलेले आहे. मग त्याच्या एका इशाऱ्यावर त्याने प्रदान केलेल्या या बाबी त्यालाच समर्पित केल्यास आपले काय बिघडणार? उलट याचा सर्वोच्च मोबदला आपल्याला मिळणार.
त्याला हे चांगलेच ठाऊक असते की, पैगंबर मुहम्मद (स.) एक निरपराध व्यक्तिमत्त्व असूनही ते अल्लाहच्या प्रत्येक आज्ञेचे तंतोतंत पालन करीत, त्याची भक्ती करीत आणि त्यांच्यासारखा भक्त इतर कोणीही नाही. तरीसुद्धा ते आपल्या स्वामी, प्रभू आणि उपास्य अल्लाहसमोर माफी व मुक्तीची प्रार्थना करताना अश्रु ढाळत असत.
0 Comments