Home A परीचय A आज्ञापालनास ज्ञान व दृढविश्वासाची आवश्यकता आणि ज्ञानप्राप्तीचे साधन

आज्ञापालनास ज्ञान व दृढविश्वासाची आवश्यकता आणि ज्ञानप्राप्तीचे साधन

इस्लाम वस्तुतः ईशआज्ञा-पालनाचेच नाव आहे, मनुष्य ईश्वराच्या आज्ञेचे पालन करू शकत नाही जोवर त्याला काही गोष्टींचे ज्ञान प्राप्त होत नाही आणि जोपर्यंत ते ज्ञान दृढविश्वासाच्या दर्जाप्रत वृद्धिंगत होत नाही.
सर्वप्रथम माणसाला ईश्वराच्या सत्तासामर्थ्यावर परिपूर्ण विश्वास असावयास हवा, त्याच्या अस्तित्वावरच जर विश्वास नसेल तर त्याच्या आज्ञांचे पालन तो कसा करू शकेल? त्याचबरोबर ईश्वराच्या गुणवैशिष्ट्यांचे संपूर्ण ज्ञान असावयास हवे. ईश्वर एकच आहे आणि ईशत्वामध्ये त्याचा कोणीही सहभागी नाही, हेच ज्याला माहीत नाही तो इतरासमोर मान झुकविण्यापासून व हात पसरविण्यापासून दूर कसा राहू शकतो? ईश्वर सर्व काही पाहणारा आहे, सर्व ऐकणारा आहे व सर्वज्ञ आहे, या गोष्टीवर ज्याचा विश्वास नाही. तो ईश्वराची अवज्ञा करण्यापासून स्वतःला कसा रोखू शकतो? या बाबीवर जेव्हा तुम्ही चिंतन कराल तेव्हा तुम्हाला असे आढळून येईल की विचारधारणा, आचार व कर्म या बाबतीत इस्लामच्या मार्गाने जाण्यासाठी माणसामध्ये काही गुणवैशिष्ठ्ये असणे आवश्यक आहेत; ती सर्व गुणवैशिष्ट्ये त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकत नाहीत, जोपर्यंत त्याला ईश गुणवत्तेचे व त्याच्या वैशिष्ठ्यांचे नीट ज्ञान प्राप्त होत नाही. हे ज्ञान केवळ कळण्यापुरतेच मर्यादित असून चालत नाही तर त्याची रुजवणूक दृढविश्वासपूर्वक अंतःकरणात व्हावयास हवी. त्यामुळे माणसाचे मन त्याविरुद्ध विचार करण्यापासून व त्याचे जीवन त्याच्या ज्ञानाविरुद्ध कृती करण्यापासून सुरक्षित होते.
त्यानंतर मनुष्याला हे ही कळणे आवश्यक आहे की, ईश्वरेच्छेनुसार जीवन व्यतीत करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? ईश्वराला काय आवडते ज्याचा आम्ही अंगीकार करावा? त्याला काय नापसंत आहे की ज्याचे आम्ही पथ्य पाळावे. या गरजेपोटी माणसाला ईशनियमांचे व विधिचे पुरेपूर ज्ञान असते. जे ईश नियम व विधि आहेत यावर त्याचा पुरेपूर विश्वास असतो. त्याचे पालन केल्यानेच ईश्वराची प्रसन्नता लाभू शकते, त्याचे कारण असे की ज्याला मुळातच त्याचे ज्ञान नसेल तर तो आज्ञापालन कशाची करेल? ज्ञान आहे परंतु त्यावर पूर्ण विश्वास नसेल किंवा हे नियम व विधिंबरोबरच अन्य नियमही यथोचित व योग्य आहे असा समज असेल तर तो मनुष्य ईश-नियमांचे काटेकोर पालन कसा करू शकेल?
तसेच माणसाला या गोष्टीचेही ज्ञान असणे अत्यंत जरुरीचे आहे की, ईश्वरेच्छेनुसार आचरण न केल्यास तसेच ईश्वराच्या विधी व नियमांचे पालन न केल्यास कोणते परिणाम होतात आणि त्याच्या आज्ञापालनाचे इनाम काय आहे? यासाठी अत्यावश्यक आहे, की आखिरत (परलोक) च्या जीवनावर, ईशन्यायालयात हजर होण्यावर, अवज्ञांबद्दल शिक्षा मिळण्यावर व आज्ञापालनाचा पुरेपूर मोबदला मिळण्यावर अढळ विश्वास, श्रद्धा व त्याचे ज्ञान असणे अगत्याचे आहे. जी व्यक्ती ‘आखिरत’ (पारलौकिक जीवन) च्या जीवनाशी अपरिचित आहे, ती आज्ञापालन व अवज्ञा या दोहोंना निरर्थक समजत असते. त्याची समजूत तर अशी असते की आज्ञापालन करणारा व आज्ञापालन न करणारा, या दोघांची अवस्था शेवटी सारखीच असेल कारण दोघेही मातीत मिसळून जातील. या जगात ज्या पापांपासून व दुष्कृत्यापासून कसलीही हानी होण्याचे त्याला भय नाही त्यापासून तो कसा वाचेल व आज्ञापालनांची बंधने व त्रास सहन करण्याचा तो कसा स्वीकार करील? अशी आशा त्याच्याकडून कशी केली जावू शकते? अशी श्रद्धा व विश्वास असल्यास, मनुष्य ईशआज्ञेचे पालन करणारा कधी होऊच शकत नाही. त्याचप्रमाणे, आज्ञापालन करण्यात, असा माणूसही अढळ राहू शकत नाही ज्याला आखिरतचे जीवन व ईशन्यायालयात हजर होण्याचे ज्ञान तर आहे परंतु त्यावर अढळ श्रद्धा व विश्वास नाही. याचे कारण असे की शंका व द्विधा मनःस्थितीच्या अवस्थेत मनुष्य एखाद्या गोष्टीवर ठामपणे राहू सकत नाही. एखादे कृत्य लाभकारक आहे अशी तुमची मनोमन खात्री व विश्वास असला तरच ते काम तुम्ही मनःपूर्वक करू शकता. तसेच एखादे कृत्य हानिकारक आहे असा तुमचा ठाम विश्वास असेल तेव्हाच त्यापासून पथ्य पाळणे तुम्ही अविचलपणे करू शकता. म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो की एखाद्या पद्धतीचे आज्ञापालन व अनुकरण करण्यासाठी तिच्या परिणामाचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. ते ज्ञान दृढ विश्वासाच्या व नितांत श्रद्धेच्या स्वरुपाचे असणेही आवश्यक आहे.
ज्ञानप्राप्तीचे साधन
ईशआज्ञापालनासाठी ईमानची आवश्यकता आता तुम्हास माहीत झाली आहे. आता प्रश्न असा आहे की, ईशगुण व त्याला प्रिय असणारे नियम व आखिरतच्या जीवनाबद्दल (पारलौकिक जीवन) अचूक व खरे ज्ञान कोणत्या मार्गाने प्राप्त होऊ शकते?
याआधी आम्ही हे वर्णन केलेलेच आहे की विश्वामध्ये सर्वत्र ईश्वराच्या कारगिरीची, कौशल्याची चिन्हे व निशाण्या पसरलेल्या आहेत. ते सर्व या सत्यतेचा पुरावा सादर करतात की या प्रचंड विश्वरूपी कारखान्याचा निर्माता व नियंता एकच एक ईश्वर आहे. तोच त्याचा चालकही आहे या सर्व चिन्हात व पुराव्यात समस्त ईशगुणांची छबी दृष्टीस पडते. त्याची तत्त्वदर्शिता त्याचे ज्ञान, त्याचे सामर्थ्य, त्याचा दयाळूपणा, त्याची पालनक्रिया, त्याचा प्रकोप या सर्व गोष्टी दृष्टीस पडतात. अशी कोणती गुणवत्ता राहते जिची शान या पुराव्यांतच स्पष्ट होत नाही? माणसाची बुद्धी व त्याची पात्रता या गोष्टींना पाहण्यात व समजण्यात बहुधा चूक करीत आली आहे. हे सर्व पुरावे डोळ्यांसमोर आहेत. असे असतानासुद्धा कोणी म्हणतो की ईश्वर दोन आहेत. अन्य कोणीतरी म्हटले की ते तीन आहेत. काहींनी अगणित ईश्वर मानले आहेत, काहींनी ईशत्वाचेच विभाजन केले आणि असे म्हटले की एक पर्जन्याचा देव आहे, एक वायूचा देव आहे व एक अग्निदेव आहे. तात्पर्य हे की प्रत्येक गुणवत्तेचा व शक्ती-सामर्थ्याचा वेगवेगळा देव आहे आणि एक ईश्वर या सर्वांचा प्रमुख (महादेव) आहे. अशा तऱ्हेने ईश्ववराची सत्ता व त्याची गुणवत्ता समजून घेण्यास माणसाची बुद्धी व मती अनेकदा फसली आहे ज्याचे सविस्तर विवरण करण्याची ही वेळ नाही.
आखिरत अर्थात पारलौकिक जीवनासंबंधी माणसांनी, पुष्कळसे गैरसमज व विचार दृढ करून घेतले आहेत. कोणी म्हणतात की मेल्यानंतर मनुष्य मातीत मिसळून जाईल व तद्नंतर कोणतेही जीवन नाही. कोणी म्हणतात की मनुष्य पुन्हा पुन्हा अनेकदा या जगात जन्म घेईल व आपल्या कर्मांनुसार शिक्षा किंवा पुरस्कार प्राप्त करील.
ईश्वरेच्छेनुसार जीवन व्यतीत करण्यासाठी ज्या नियमांचे पालन आवश्यक आहे ते नियम स्वयंबुद्धीने निर्धारित करणे तर आणखी अधिक बिकट काम आहे.
माणसाजवळ अत्यंत उचित बुद्धी असली व त्याची ज्ञानक्षमता ही उच्च कोटीतील असली तरी वर्षानुवर्षाचे अनुभव व विचार-चिंतन केल्याने तो एका विशिष्ठ मर्यांदेपर्यंत आपले मत बनवू शकतो. आपण सत्य पूर्णपणे जाणले आहे असा पुरेपूर विश्वास त्याला त्यावेळीसुद्धा नसतो. ज्ञान व बुद्धीची खरी परीक्षा तर अशा रीतीने होऊ शकत होती की, माणसाला कसल्याही मार्गदर्शनाखेरीज मोकळे सोडून दिले असते. मग जो आपल्या प्रयत्नामुळे व योग्यतेमुळे सत्य व वास्तवाप्रत पोहोचेल तोच सफल होईल. जो पोहोचू शकला नाही तो असफल राहील. परंतु ईश्वराने आपल्या दासांना अशा कठीण परीक्षेत टाकलेले नाही. त्याने दयाळूपणाने खुद्द माणसातूनच अशी माणसे जन्माला घातली ज्यांना त्याने आपल्या सर्व गुणवत्तेचे यथार्थ ज्ञान दिले. ती जीवनपद्धतीसुद्धा दिली ज्याद्वारा मनुष्य या जगात ईश्वराच्या इच्छेनुसार जीवन-यापन करू शकतो. पारलौकिक जीवनासंबंधीसुद्धा यथार्थ ज्ञान दिले, तसेच जीवनाच्या बाबतीतही खरेखुरे ज्ञान त्यांना प्रदान केले व त्यांना आदेश दिला की सर्व मानवांना हे ज्ञान व आदेश पोहोचवावे. हेच ते अल्लाहचे प्रेषित आहेत. ज्या साधनाद्वारा अल्लाहने त्यांना ज्ञान प्रदान केले त्याला ‘वही’ (दिव्य प्रकटन) म्हणतात. ज्या ग्रंथाद्वारा त्यांना हे ज्ञान दिले त्याला ईशग्रंथ-ईशवाणी असे म्हणतात. आता माणसाच्या बुद्धीची व त्याच्या क्षमतेची कसोटी येथे आहे की, जो प्रेषितांचे सोज्वळ व पवित्र जीवन व त्यांच्या उच्च शिकवणीवर विचार-चिंतन केल्यावर त्यांच्यावर ईमान-दृढविश्वास व श्रद्धा धारण करतो किंवा नाही ही खरी कसोटी आहे. जो सत्यनिष्ठ व सत्यप्रिय असेल तर सत्य गोष्ट व सत्यनिष्ठ माणसांच्या शिकवणुकीचा स्वीकार करील व या कसोटीत उतरेल. जर त्याने हे मान्य केले नाही तर त्याचा नकाराचा अर्थ असा होईल की तो सत्य व कसोटीला जाणण्याची व त्याचा स्वीकार करण्याची क्षमता व पात्रता गमावून बसला आहे. असा इन्कार त्याला कसोटीत असफल होण्यास कारणीभूत ठरेल. ईश्वर व त्याचे नियम तसेच पारलौकिक जीवनासंबंधी तो कदापिही खरे ज्ञान प्राप्त करू शकणार नाही.
संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *