आपल्या सर्वांच्या गरजापूर्ण करण्यासाठी कुटुंबामध्ये जी सतत धावपळ करत असते ती आई असते. आपल्याला जीवापाड प्रेम करणारी आई असते. आई म्हणजे आनंदाचे सागर असते. आईकडे जादूची कुशी असते जेथे सारे दुःख दूर होतात. आईचे प्रेम निःस्वार्थ असते. म्हणूनच आईच्या प्रेमाला सगळ्या प्रेमाची ’’आई’’ म्हणतात. आई अशी व्यक्ती असते जी आपल्याला दुसऱ्यांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते. आईला जगात पर्याय नाही.
आई आपल्यावर निःस्वार्थ प्रेम का करते?
रक्ताचे नाते असते म्हणून, का नऊ महिने पोटात ठेवले म्हणून, प्रसुती वेदना सहन करून जन्माला घातलं म्हणून, का रक्ताचे दूध करून पाजले म्हणून, आपल्या संगोपनासाठी रात्रंदिवस एक केले म्हणून की झोपमोड केली म्हणून? आईच्या अस्तित्वात एवढे मोठे प्रेम आले कोठून? कधी विचार केलात का?
आपण फक्त एक आई पाहिली आहे. म्हणजे आपण आपल्या एकच आईच्या प्रेमाशी परिचित आहोत, पण का आपल्याला माहित आहे असे कुणी की ज्याची माया 70 आईंपेक्षा जास्त आहे. होय, अल्लाह पूर्ण मानवजातीवर 70 आईंपेक्षा जास्त प्रेम करणारा आहे. कृपा दया करणारा आहे. आपल्या आईला निर्माण करणाऱ्या अल्लाहने तिच्या अस्तित्वात प्रेम, दया, करूणा ठेवली आहे. हा अल्लाहच्या दये व प्रेम मधला एक वाटा आहे. जो त्याने मानवाला व जनावरांना सुद्धा प्रदान केला आहे.
लहानपणी आईच आपले सर्वस्व असते. आईलाही आपले लहानसे गोंडस बाळ तिचे संपूर्ण विश्व असते. बाळामध्ये गुंतून ती दुसरीकडे (बाळाच्या बाबांकडे वगैरे) थोडेफार दुर्लक्ष ही करते. बाळाला पहिल्यांदा बघितले की तिला समाधान वाटते, त्यात ती स्वतःला विसरून जाते. ती प्रसुतीच्या त्या भयंकर वेदना, जे अनेक हाडे एकदा मोडल्यानंतर झालेल्या वेदनेपेक्षा जास्त असते, विसून जाते.
आईसाठी तिचे बाळ, बाळ असते मग तो मुलगा असो की मुलगी. तिचे प्रेम दोघांवर सारखेच असते. सुंदर असो की कुरूप (क्षमा करा हा शब्द आईच्या शब्दकोशात नसावा) म्हणून प्रत्येक आईला तिचे बाळ सुंदरच वाटते. म्हणजे तिच्या मायेच्या चष्म्यातून तिला आपल्या बाळाचे सौंदर्यच दिसते.
आईसारख्या मायेचा चष्मा सगळ्यांना लागला असता तर जगच सुंदर झाले असते. कोणाला कोणाचे उणीव दिसली नसती. उलट चांगले गुण बघून माणसाने मानसावर प्रेम केले असते आणि माणुसकीचा उच्चांक गाठता आला असता. मग प्रयत्न करूया मायेचा चष्मा घालून जग बघायला, खरंच खूप सुंदर वाटेल.
मला तर वाटते माणुसकीची सुरूवातच आईपासून होते. आई ही बाळाला नाही तर एका व्यक्तीमत्वाला जन्म देते. आईची कुशी ही लेकराची पहिली शाळा असते. आई बोलण्या-चालण्या, लिहिण्या-वाचण्यापर्यंत आपले मार्गदर्शन नाही करत तर आपल्या पूर्ण चारित्र्याची निर्मिती करणारी असते.
ती आपल्या सर्व भौतिक गरजा पूर्ण करते. किती खूश असते ती आपले कपडे खरेदी करताना, आपल्या खेळणी निवडत असताना आपल्याला शाळेत घालताना, ने आण करताना, लहानपणी हवीहवीशी असणारी आई तारूण्यात पदार्पण केलेल्या लेकरांना नुसती किरकिरी वाटते. तरूणाईला आईचे चांगले बोलणे वाईट वाटते. आपल्या चांगल्यासाठी घातलेली बंधनं त्यांना नकोश्या असतात. ते तोडू इच्छितात. आई ही आपले संगोपण निसर्गाच्या नियमांवरच करत असते. आईचे प्रेम, घेतलेली काळजी, चांगले बोल हे किटकिट जरी वाटत असले तर पुन्हा आपल्या लक्षात येते की तेच आपल्यासाठी चांगले होते. आई ही एक चांगली टीकाकार असते. मात्र टिका करण्यामागचा शुद्ध हेतू आपल्याला कळत नसतो. म्हणून आपल्याला बोअर वाटते. मोठे झाल्यावर मित्र मैत्रीणीच्या प्रेमाचे पडदे आपल्या अकलेवर पडतात. त्याच्यामागे आईचे प्रेम लपून जाते. मग सुरूवात होते तिला क्रॉस करायची, तिला वाटेल ते बोलायची, तिच्यासोबत गैरवर्तन, दुर्व्यवहार करायची, तिच्या बोलण्यावर लक्ष न द्यायची, स्वतःला मोठे समजण्याची, आईला शत्रू समजण्याची. पण ती हे सर्व सहन करते मुकाट्याने. कारण की तिचे काळीज खूप मोठे असते. तिच्यात सहनशीलता असते, संयम असते.
खूप अभ्यास करूनही तुमचे मार्क्स येत नसतील, तुमच्या जीवनात असमाधान, उदासीनता असेल तर हे आईचा नव्हे (कोणतीही आई आपल्या लेकरांना शापीत करत नाही) तर हे तुम्ही आई सोबत केलेल्या गैरवर्तनाचा मोबदला आहे, असे समजा.
आजकालची युवा पिढी तर मोबाईलमध्ये एवढी लीन झाली आहे की, रात्रंदिवस त्यात मग्न. आईने बोलविले तरी हातातला मोबाईल सोडण्याची तयारी नसते. आईने काही काम सांगितले की ते टाळायचे. आईचे काम हलके करायला तयार नाही. रात्रंदिवस आपल्यासाठी मरमर करणाऱ्या आईची आपण किती काळजी घेतो हा विचार करायला सुद्धा वेळ नाही.
शिक्षणात सुरूवातीपासून आपली मदत करणारी, होमवर्क करून घेणारी, उजळणी पाठ करून घेणारी, परीक्षेचा सराव करताना आपल्या सोबत बसणारी, आपल्याला आवडेल ते पदार्थ करून देणारी, प्रश्नोत्तर पाठ झाले की नाही हे बघणारी, आपली परीक्षा जणू तिचीच परीक्षा असते. चांगला रँक आला तर सर्वात जास्त खुश होणारी, खरे आहे एका यशस्वी विद्यार्थ्यामागे तिचे आईचे मोठे योगदान असते.
आई हा दोनच अक्षरांचा शब्द असला तरी आईला दोन्ही जगाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
आपली लेकरे दुनियेत तर यशस्वी झालेच पाहिजे पण पारलौकिक जीवनातही ते उच्च स्थान प्राप्त करावे ही तिची इच्छा असते म्हणून ती आपल्याला ईश्वराची ओळख करून देते, माणुसकीचे धडे शिकविते, प्रेषितांच्या जीवनाची माहिती देते, चांगले विचार व आचार, आपल्यात रूजविते, ती आपली अध्यात्मिक गुरू असते .
एक अल्लढ मुलगी जेव्हा पहिल्यांदा आई बनते तेव्हा तिच्यात खूप बदल होतो. मग तिला कळते की तिच्या आईने तिच्यासाठी काय केले आहे? ऐरवी घाणीपासून दूर राहणारी, घानीचा तिरस्कार करणारी, सेन्सेटिव्ह मुलगी आता बाळाच्या प्रेमात कितीवेळा त्याची घाण उचलण्यास तयार असते.
नेहमी जास्त झोपल्याबद्दल लवकर न उठल्याबद्दल आईच्या शिव्या खाणारी आई झाल्यानंतर आता बाळासाठी झोपमोड करून घ्यायला तयार असते.
लेकरं मोठी झाली, शिकली तर त्यांच्या लग्नांची चिंता तिला होते, चांगले घर मिळावे याची काळजी करत असते. मुले लग्न झाल्यानंतर आईपासून दुरावतील पण मुलींची माया आईची बांधिलकी कायम असते उलट जास्त होते. तिच्या सासरचा इतिहास सांगणारी आई. लग्नानंतर मुलींच्या बाळंतपण करणे, नातवंडाची काळजी घेणे हेच तिचे काम.
हे सारे करताना आपल्या आईची तब्येत कधी खराब होते व ती मुकाट्याने कधी आपल्यातून निघून जाते ते आपल्यालाही कळत नाही. कारण जीवनात सारंच सहन करण्याची एवढी सवय झालेली असते की लहानसहान आजारांना ती जुमानत नाही. कधीही विचारा आई तब्येत कशी तर चांगलीच म्हणणार. सहन करत करत आजार कधी शेवटच्या स्टेजला जातो हे तिलाही कळत नाही आणि हळूच निघून जाते. ती आपल्याला सोडून कायमचा आराम करायसाठी अशी शांत झोप घेण्यासाठी की आपण कितीही रडलो तरी ती उठणार नाही.
आईला मरण्याची भीती नसते, भीती असते ती मी मेल्यावर माझ्या लेकरांना कोण बघेल? ह्याचीच. कोणाची आई मरू नये, असे आपण बोलत जरी असलो तरी या जीवनात कोणी कायम राहण्यासाठी आलेलो नाही म्हणून जोपर्यंत आईचा सहवास आपल्याला लाभला आहे तिची कदर करा, आदर करा. आईची कदर होते आपण पोरके झाल्यावर, मग दुसऱ्यांच्या आईला बघून घोकत बसण्याची वेळ येते. आई आहे तोपर्यंत तिला दुखवू नका. कितीही दुखवाल तरी ती तुमची काळजी घेणारच.
आई असो की वडील यांचे अस्तित्व खूप अनमोल असते. त्यांना वृद्धाश्रमामध्ये सोडण्याचा विचार ही करू नये कारण थोडीफार किटकिट सहन करून आपण स्वर्गात तर जाऊ शकतो पण सहन न केल्यास आपल्यालाही जीवंतपणी वृद्धाश्रमात आणि मेल्यानंतर नरकात जावे लागते.
इस्लाममध्ये आईचा दर्जा एवढा मोठा आहे की, पैगंबर सल्ल. म्हणतात, ’’आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. लहान असताना हे ऐकल्यावर मी माझ्या आईला विचारले होते की मला तर दिसत नाही, ती हसली आणि तिने सांगितले की आईची सेवा केल्यास स्वर्ग मिळते. मला वाटते लोकांनाही आईच्या पायाखाली लपलेले स्वर्ग दिसत नाही म्हणूनच आईला वृद्धामामध्ये सोडत असावेत.
एक व्यक्ती मुहम्मद पैगंबर (सल्ल.) यांच्याकडे आला आणि विचारले माझ्या चांगल्या वर्तुणुकीचा हकदार कोण? त्यांनी फर्माविले, तुझी आई, पुन्हा विचारले त्यानंतर कोण? फरमाविले, तुझी आई, पुन्हा विचारले त्यानंतर कोण परत फरमाविले तुझी आई. त्याने पुन्हा विचारले त्यानंतर कोण? मग फरमाविले तुझे वडील.आईचा दर्जा वडीलांपेक्षा तिप्पट अधिक आहे. आईचे पांग आपण फेडू शकत नाही. ती आपल्यासाठी स्वतःच्या हाडाचे चंदन करते.
एक व्यक्ती आईला खांद्यावर घेऊन हज करतो आणि येऊन पैगंबर सल्ल. यांना विचारतो की मी, आईचे हक्क अदा केले का? ते म्हणतात नाही, तिने सहन केलेल्या प्रसूती वेदनेच्या एका कळेचाही ह्नक अदा झाला नाही. आई-वडिलांची अवज्ञा हे गुनाहे कबिरा. म्हणजे मोठे पाप आहे. असल्या व्यक्तीची नमाज, रोजा, हज, जकात काहीच अल्लाह कबूल करत नाही.
रमजानचे शेवटचे दिवस राहिलेले आहेत म्हणून सावधान! आपले खोल निरीक्षण करा. आपण आपल्या आई-वडिलांना दुखावले तर नाही ना, त्यांचे आज्ञाचे पालन केेले आहे ना? जर नाही तर अजून वेळ गेेलेली नाही पटकन उठा आणि क्षमा मागा त्यांची ते आपल्याला नेहमी माफ करण्यास तयार आहेत.
रमजानुल मुबारकच्या शेवटच्या दहा रात्री पैकी एक रात्र अशी आहे की त्या रात्री आराधना, उपासना, प्रार्थन करणे हे हजार रात्रींपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. तिला ’’ लैलतुल कद्र’’ म्हणतात. कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे. या रात्री अल्लाह सर्व क्षमा मागणाऱ्यांची क्षमा करतो. मात्र 4 लोकांची नाही. 1. दारू पिणाऱ्यांची. 2. आई-वडिलांच्या आज्ञेचे पालन न करणारे 3. मनात कपट ठेवणाऱ्यांची 4. नाती तोडणाऱ्यांची.
सुरे बनी इसराईल आयत 22-24. ’’ तुझ्या पालनकर्त्याने निर्णय दिलेला आहे की तुम्ही लोकांनी इतर कोणाचीही भक्ती करू नये. परंतु, केवळ त्याची. आई-वडिलांशी सद्वर्तन करा. जर तुमच्यापाशी त्यांच्यापैकी कोणी एक अथवा दोघे वृद्ध होऊन राहिले तर त्यांच्यासाठी ’ब्र’ शब्ददेखील काढू नका व त्यांना झिडकारून प्रत्युत्तरदेखील देऊ नका. तर त्यांच्याशी आदराने बोला आणि नरमी व दयाद्रेतेने त्यांच्यासमोर नमून रहा आणि प्रार्थना करीत जा की,’’ हे पालनकर्त्या, त्यांच्यावर दया कर ज्याप्रमाणे त्यांनी दया व वात्सल्याने बालपणी माझे संगोपन केले. या आयातीमध्ये फरमावले आहे की, अल्लाह आणि रसूल (सल्ल.) नंतर सर्वप्रथम हक्क आई-वडिलांचा आहे. संततीला आई-वडिलांचा आज्ञाधारक, सेवक आणि शिष्टाचारी होणे आवश्यक आहे.
आई-वडिलांची सेवा, मुलांनी तशाच प्रकारे करावी जसे लहानपणात आई-वडिलांनी त्यांचे पालनपोषण केले होेते.
होणाऱ्या आईंनी तसेच वागावे जसे ते आपल्या बाळाला बघू इच्छिते. कारण आईच्या सवयी डायरे्नट बाळात येतात. गर्भकाळात सत्य बोलणे, वाईट सवयी सोडून देणे, विनाकारण काळजी न करणे. संतुलित आहार घेणे आणि आपला अध्यात्मिक दर्जा वाढविणे महत्त्वाचे.
आई म्हणजे आई असते, तिला नेहमी घाई असते, स्वयंपाक करायची, बाळाला भरवायची, आंघोळ घालायची, बाळाला तयार करायची, बाळाला बोलायला शिकवायची, चालायला शिकवायची, शाळेला ने आन् करायची, स्वादिष्ट डबा बनवून द्यायची, गृहपाठ करून घ्यायची, लेकराला सर्वप्रथम आणायची, आई म्हणजे आई असते तिला नेहमी घाई असते.
चांगले करिअर, चांगल्या नोकरीची, चांगला जावई, सुंदर सून आणायची, नातवंडे बघायची, नातवंडांसोबत खेळायची, सतत चिंता करायची. उन्हाळ्यात लोणचे, पापड, कुरड्या करायची, एवढेच तिचे विश्व.
या 9 मे ला मातृदिन साजरा झाला. आईबद्दल सुविचारांचा डोंगर, आपल्याला व्हॉटस्अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदींवर बघायला मिळला.
आईसोबत फोटो काढून सोशल मीडियावर टाकले जाणार. पण हे सगळे करून आईचे हक्क अदा होणार काय? आईबद्दल जितके आपण पोस्ट शेअर करू. प्रॅ्निटकली दररोज तिचा आदर करणे, तिच्यावर जीवापाड प्रेम करणे, तिचे आज्ञाचे पालन करणे गरजेचे आहे. तेव्हाच कोठे खऱ्या अर्थाने मातृदिन साजरा झाल्यासारखे होईल. स्वतःमध्ये बदल घडवा. अल्लाहकडे प्रार्थना आहे की, अल्लाह माझ्या आईची मग्फीरत करो. ज्यांच्या आई हयात आहेत त्यांना उदंड आयुष्य लाभो, ज्यांच्या आजारी आहेत त्यांना लवकर बरे करो आणि ज्यांच्या आई नाहीत त्यांच्या आईच्या आत्म्येस शांती लाभो. आमीन.
– डॉ. सीमीन शहापूरे
8788327935
0 Comments