स्पष्टीकरण
माननीय मुआज यांच्या कथनाचे स्पष्टीकरण असे आहे की मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या अगदी जवळ बसलो होतो, ऐकणे व ऐकवण्यास कसलाही अडथळा नव्हता, पैगंबरांचे वक्तव्य अगदी सहजतेने मी ऐकू शकत होतो परंतु जी गोष्ट पैगंबर (स.) ऐकवू इच्छित होते ती अत्यंत महत्त्वाची होती, म्हणून पैगंबरांनी तीन वेळा हाक दिली आणि ती गोष्ट सांगितली. असे यासाठी केले जेणेकरून मला या गोष्टीचे महत्त्व चांगल्या प्रकारे कळावे आणि मी अगदी लक्ष्यपूर्वक कान देऊन ऐकावे. पैगंबरांच्या वक्तव्याद्वारे ‘एकेश्वरत्वा’चे महत्त्व स्पष्ट झाले की ते नरकाच्या यातनांपासून वाचविणार आहे. जी गोष्ट अल्लाहच्या क्रोधापासून वाचविणारी असेल आणि स्वर्गाचा (जन्नतचा) हक्कदार बनविणारी असेल, तिच्यापेक्षा अधिक मौल्यवान गोष्ट दासालाच्या दृष्टीने दुसरी कोणती असू शकते?
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी (अब्दुल कैस यांच्या कबिल्याची देखभाल करणाऱ्यांना) विचारले, ‘‘एक अल्लाहवर ईमान बाळगण्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे काय?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘अल्लाह आणि त्याचे पैगंबरच उत्तमप्रकारे जाणतात.’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘ईमान म्हणजे मानवाने या सत्याची ग्वाही द्यावी की अल्लाहशिवाय कोणीही उपास्य नाही आणि मुहम्मद अल्लाहचे पैगंबर आहेत आणि नमाज योग्य पद्धतीने अदा करावी आणि जकात (दानधर्म) द्यावी आणि रमजान महिन्याचे रोजे करावेत.’’ (मिश्कात) माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जेव्हा जेव्हा प्रवचन दिले, की ‘‘ज्याच्यात ठेव नाही त्याच्यात ईमान नाही आणि ज्याच्यात वचनाचे संरक्षण व आदर नाही त्याच्याकडे दीन (जीवनधर्म) नाही.’’ (मिश्कात)
स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ असा की जो मनुष्य अल्लाहचे हक्क आणि दासांचे हक्क, ज्यांची पूर्ण यादी अल्लाहच्या ग्रंथात आहे, अदा करीत नाही त्याचा ईमान परिपूर्ण नाही आणि जो मनुष्य एखादी गोष्ट पूर्ण करण्याचे वचन देतो, मग ती गोष्ट पूर्ण करीत नाही आणि ते वचन पाळत नाही, तो धर्मपरायणतेच्या ईशदेणगीपासून वंचित राहतो. ज्याच्या मनात ईमानची मुळे दृढ रुतलेली असतात तो सर्व प्रकारचे हक्क प्रामाणिकपणे अदा करतो. कोणताही हक्क अदा करण्यात कुचराई करीत नाही. अशाप्रकारे ज्या मनुष्यात धर्मपराणता असेल तो मरेपर्यंत वचनाचे पालन करील. लक्षात असू द्या की सर्वांत मोठा हक्क अल्लाहचा आहे, त्याच्या पैगंबरांचा आहे, त्याने अवतरित केलेल्या ग्रंथाचा आहे आणि एखाद्या मनुष्याने आपल्या अल्लाहशी आणि त्याने पाठविलेल्या पैगंबराशी आणि पैगंबरांनी आणलेल्या जीवनधर्माशी केलेला करार सर्वांत मोठा करार असतो.
0 Comments