Home A प्रेषित A अनाथ पैगंबरांचा जन्म

अनाथ पैगंबरांचा जन्म

Madina
अब्दुल्लाह यसरिबला सासुरवाडीस जात असता वाटेत मरण पावला. त्याचे वय फक्त पंचवीस वर्षांचे होते आणि त्याच्या दु:खी पत्नीने पुढे लवकरच एका मुलाला जन्म दिला. तेच आपले पैगंबर मुहम्मद (स.)! जो पुढे सर्व अनाथांचा मायबाप झाला, तो जन्मताच पितृहीन होता! इ. स. ५७१ ची तारीख. जेव्हा हा महापुरुष जन्मला. अब्राहा सैन्याच्या नाशानंतरचा तो पन्नासावा दिवस होता.
अरब चालीप्रमाणे एका खेडूत दाईने दूध पाजून महुम्मद (स.) यांस वाढविले. पुढे तिने अमीनाजवळ ते वाढलेले लेकरू आणून दिले. अमीना मोठ्या प्रेमाने व काळजीने देवाचा हा ठेवा वाढवू लागली. तिचे हृदय दु:खाने पोळलेले होते. परंतु मुहम्मद (स.) यांच्या बालमूर्तीकडे पाही व शांत राही. परंतु तीही लवकरच मरण पावली. मुहम्मद (स.) लहानपणीच पोरके झाले! मुहम्मद (स.) यांचे वय सहा वर्षांचे, आई-बापाच्या प्रेमाची पाखर जगात कुठे मिळणार? तसे वात्सल्य कोण देणार? मुहम्मद (स.) यांच्या मनावर या गोष्टीचा फार परिणाम झाला. पोरक्या मुलांना फसवू नका, त्यांना प्रेम द्या, असे कुरआनात अनेक उल्लेख आहेत. पोरक्या मुलांची कधी दीनवाणी स्थिती होत असेल, याचा त्यांना अनुभव आलेला होता. ती आठवण ते कधी विसरले नाहीत.
आजोबांनी, अब्दुल मुत्तलिब यांनी मुहम्मद (स.) यांना आपल्याजवळ घेतले. या नातवावर ते फार प्रेम करीत. देवाला बळी देऊ केलेल्या मुलाचा हा मुलगा. पुढे चालून अब्दुल मुत्तलिब आजारी झाले. आपला मुलगा अबू तालिब यास त्यांनी बोलावले व मरणशय्येवरून सांगितले, ‘‘हा तुझ्या भावाचा पोरका मुलगा तुझ्या स्वाधीन मी करत आहे. त्याला प्रेम दे.’’ आणि इ. स. ५७९ च्या अखेर अब्दुल मुत्तलिब देह सोडून गेले.
चुलते अबू तालिब यांच्या घरी मुहम्मद (स.) राहू लागले. लहानपणापासूनच मुहम्मद (स.) विचारी होते. ते नेहमी विचारमग्न असत. डोळे मोठे काळेभोर. जणू आसारांतील सार शोधायला आले होते. सत्यशोधक, जिज्ञासू डोळे. कधी हा मुलगा एकटाच टेकड्यांवर जाई व सृष्टीसौंदर्य पाहत बसे. तेथे रमे, तल्लीन होई. स्वभाव मोठा सौम्य व गोड. दुसऱ्याच्या दु:खाने लगेच दु:खी होत. गहिवरत. फार करुण, कोमल हृदय होते ते. असा भावनोत्कट मुलगा सर्वांचा लाडका झाला. चुलत्या- पुतण्यांत अपार प्रेम जडले. ‘जणू देवदूताने येऊन त्यांची हृदये उघडून आत प्रकाश भरला.’
एकदा चुलत्याबरोबर ते सीरियात व्यापारी काफिल्याबरोबर गेले. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या आजोबांनीच दरवर्षी यमन व सीरियात मक्केहून काफिला पाठविण्याची पद्धत सुरू केली होती. ती अद्याप होती. या प्रवासात मुहम्मद (स.) यांनी सामाजिक दु:खे पाहिली, ऐकली. धार्मिक अध:पात सर्वत्र झालेला पाहिला. सीरियाच्या या प्रवासातच वाटेत एके ठिकाणी त्यांना एक खिश्चन साधू भेटला होता. या प्रवासात त्यांनी जे जे पाहिले, ऐकले, अनुभवले त्याची स्मृती त्यांच्या हृदयातून कधीही गेली नाही.
मुहम्मद (स.) यांना घरचे कामधाम करावे लागे. ते उंटांना चारायला नेत. शेळ्या घेऊन जात. मुहम्मद (स.) पुढे म्हणत असत, ‘‘ईश्वराने मेंढपाळांतूनच पैगंबर पाठविले!’’ उंट व शेळ्या-मेंढ्या चारताना ते डोंगरावर बसत. सृष्टीसौंदर्य पाहत. पृथ्वीच्या व आकाशाच्या अनंत सौंदर्याची उक्ती कुरआनात पदोपदी आहे. आकाशात व धरेवर सर्वत्र पाहणाऱ्यास ईश्वराच्या खुणा आहेत, असे कुरआन पदोपदी सांगत आहे. ईशज्ञान मुहम्मद (स.) यांना विश्वव्यापक प्रभूच्या सौंदर्यानेच करून दिले असावे. कुरआनातील भव्य सृष्टीवर्णनांची बीजे या वेळेसच, शेळ्या-मेंढ्या, उंट चारतानाच-मुहम्मदांच्या हृदयभूमीत पेरली जात होती.
मुहम्मद (स.) आता तारुण्यात होते. विशी-पंचविशीचे वय. या वेळेस ते पुन्हा सीरियात काफिल्याबरोबर गेले. कुरैश घराण्यातील एक स्त्री खदीजा. तिच्या मालाचे उंट घेऊन मुहम्मद (स.) गेले. खदीजा ही दूरची नातलग होती. खदीजा श्रीमंत होती. उदार होती. मुहम्मद (स.) परत आले. त्यांची कार्यनिष्ठा व प्रामाणिकपणा यांचा खदीजेवर परिणाम झाला आणि त्यांचा विवाह झाला. खदीजेचे वय अधिक होते. ती गतविधवा होती. चाळीस वर्षांची होती. मुहम्मद (स.) पंचवीस वर्षांचे. परंतु मुहम्मद (स.) ही आनंदाने लग्नास उभे राहिले!
हे लग्न अत्यंत कल्याणप्रद व शुभमंगल असे झाले. दोघांचे एकमेकांवर फार प्रेम. खदीजेचे हृदय अत्यंत प्रेमळ होते. मुहम्मद (स.) विषयी अपार प्रेम वाटे. या लग्नाने मुहम्मद (स.) यांना शांती, विश्रांती मिळाली. ज्या महान कार्यासाठी त्यांचा जन्म होता, त्याचा विचार करायला त्यांचे मन मोकळे झाले. प्रेमळ स्त्रीहृदय त्यांना मिळाले. या अवघ्या जगात त्यांच्या पैगंबर कार्यावर तिनेच प्रथम विश्वास ठेवला. निराशेत ती त्यांना शांतकरी, आधार देई, धीर देई. ती आशेची ज्योत विझू देत नसे. जेव्हा जगाचाच नव्हे तर स्वत: मुहम्मद (स.) यांचाही स्वत:वर विश्वास बसेना तेव्हा तिने विश्वास ठेवला! ज्या वेळेस मुहम्मद (स.) यांच्या डोळ्यांसमोर सर्व जग अंधारमय होते, तेव्हा तिने श्रद्धेचा, आशेचा दीप प्रज्वलित ठेवला.
माननीय खदीजा (रजि.) पासून मुहम्मद (स.) यांना सात मुले झाली. तीन मुलगे व चार मुली. परंतु सारे मुलगे बालपणीच निधन पावले. मुहम्मद (स.) यांना मुलगा राहिला नाही. त्यांचे शत्रू त्यांचा उपहास करण्यासाठी ‘अल् – अब्तर’ म्हणजे निपुत्रिक असे त्यांना संबोधित.
लग्नानंतरची पंधरा वर्षे मक्केत आत्मचिंतनात गेली. ते फारसे बोलत नसत. परंतु जेव्हा बोलत तेव्हा जोर देऊन बोलत, ठासून बोलत, विचारपूर्वक, जाणून समजून बोलत. पैगंबर मुहम्मद (स.) जे बोलत ते ऐकणारा कधी विसरत नसे. त्यांच्या बोलण्याचा ऐकणाऱ्यांवर विलक्षण परिणाम होई. पुष्कळ वेळा ते अशांत, चिंतीत, कष्टी असे असत. परंतु एकदम कोठूनतरी त्यांना स्फूर्ती येई. उत्साह संचारे. खिन्नता अस्तंगत होई. प्रसन्नता मुखावर पसरे. ते हसू बोलू लागत.
आणि लहान मुले म्हणजे त्यांचा प्राण! ही भावी पिढी जणू ते तयार करीत होते. रस्त्यांत मुलांना थांबवतील, त्यांच्या पाठीवरून हात फिरवतील. त्यांना लहानलहान गोष्टी सांगतील, त्यांच्याबरोबर दऱ्याखोऱ्यातून, पहाडांतून भटकतील. त्यांच्याबरोबर खेळतील. खिस्तही लहान मुलांचे असेच शौकीन होते. मुले म्हणजे देवाची प्रभा! या पंधरा वर्षांच्या काळात अंतपरीक्षण चालले होते. श्रद्धा व संशय यांची लढाई चालली होती. भावी कार्याची सिद्धता, तयारी होत होती. आध्यात्मिक ऐक्य अंतरंगी अनुभवीत होते.
मक्केत लोकांचे जीवन सुरक्षित नसे. त्यांची मालमत्ता लुटली जाई. त्यांच्या बायकामुली पळविल्या जात. पैगंबर मुहम्मद (स.) यांना हा अन्याय पाहवेना. ‘हल्फ-उल्-फझूल’ नावाची त्यांनी एक संस्था स्थापिली. प्राचीन काळी अशी एक संस्था होती. त्या प्राचीन संस्थेचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी पुनरुज्जीवन केले. या संस्थेच्या दबदब्यामुळे दुबळ्यांस व गरिबांस संरक्षण मिळे. या संस्थेने जरा धमकी देताच काम होत असे. दुष्कर्मीयांच्या दुष्ट कृत्यांस आळा बसला. ही संस्था पुढे सातव्या शतकाच्या अखेरपर्यंत होती.
पैगंबर  मुहम्मद (स.) गंभीरपणे विचार करू लागले. त्यांचा आत्मा उड्डाण करू लागला. सृष्टीच्या गुढ रहस्यात त्यांचा आत्मा डोकावू लागला. अनंततेच्या दरीत पाहू लागला. सत्य काय असत्य काय? जीवन मरण काय? या विश्वाच्या गोंधळातही काही व्यवस्था आहे का? मुहम्मद (स.) शोधू पाहत होते. त्यांना तळमळ लागली आणि देवाची वाणी त्यांच्या पवित्र, उदात्त हृदयाने ऐकली व ती वाणी जगाला नवजीवन देती झाली.
‘‘ऊठ, जगाला सत्याची सूचना दे. प्रभुचे गौरवगान गा. त्याचे वैभव गा.’’
असा स्पष्ट आदेश मिळाला. अंत: शंका-संभ्रम नाही. मुहम्मद (स.) आता उभे राहिले. अचल श्रद्धेने व अपार विश्वासाने उभे राहिले. सारे छळ, यातना, हालअपेष्टा यांना न जुमानता उभे राहिले. सत्यासाठी उभा राहिलेला हा महापुरुष असत्यासमोर शेवटपर्यंत नमला नाही.
हा सारा मनाचा खेळ होता का? मुहम्मद (स.) यांना जे देखावे दिसत, जे शब्द ऐकू येत, जे देवदूत दिसत ही सारी का प्रक्षुब्ध मनाची निर्मिती होती? ही का केवळ स्वत:ची स्वप्ने? सांगता येणार नाही. मानसशास्त्राचा अभ्यास अर्वाचीन शास्त्रज्ञांना अद्याप करावयाचा आहे. इंद्रियातील अशीही एक ज्ञानप्राप्तीची शक्ती मनुष्याला आहे. ते ज्ञान खोटे असे कोण म्हणेल? ते अनुभव खोटे असे कोण म्हणेल? महापुरुष सांगतात की आम्हाला असे असे अनुभव आले. ते प्रत्यक्षाच्याच गोष्टी बोलतात, करतात. तुम्हा-आम्हाला जे प्रत्यक्ष नसते ते त्यांना असते. त्यांना ते पाहण्याचे डोळे असतात. जणू निराळीच इंद्रिये मनाला फुटतात! काही असो, ती आत्मवंचना खास नव्हती.
‘‘तो मी ईश्वराचा दूत जिब्रिल (अ.). मी तुला ईश्वराचा मंगल संदेश घेऊन आलो आहे, ऊठ ईश्वराचा महिमा गा, उत्साही हो, पवित्र हो, शुद्ध हो, प्रत्युपकाराची, फळाची अपेक्षा ठेवून उपकार करू नको, तू भले कर, सर्वांचे मंगल कर, तुझ्या मंगल कार्याला फळ येईल, वाट पाहा,  ईश्वरावर श्रद्धा ठेवून धीराने, उतावीळ न होता वाट पाहा.’’
असे शब्द त्यांना ऐकू येत. जणू समोर दिसत आणि संशय झडझडून टाकून आत्मविश्वासाने एका ईश्वराचे, त्या अद्वितीयाचे गुणगान गावयास ते उभे राहिले.
संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *