‘‘हे पैगंबर (मुहम्मद स.) आम्ही तुम्हास समस्त जगवासियांसाठी कृपा बनवून पाठविले आहे.’’ (कुरआन)
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याविषयी साने गुरूजी असे म्हणतात की, ‘‘मुहम्मद (स.) चमत्कारावर भर न देता बुद्धीवर भर देतात. विचाराला चालना देतात. भोळसटपणावर भर देणारे ते नव्हते. प्रज्ञेचा डोळा त्यांना प्रिय होता. बुद्धीची महिमा ते जाणत. पैगंबरांना ही सारी सृष्टी ईश्वराचे अस्तित्व पुकारणारी असे वाटे. सर्वत्र ईश्वरी चमत्कार! सारी सृष्टी ईश्वराची महिमा! अद्वितीय केवळ एक अशा ईश्वराचा आचार्य. हा आचार्य सृष्टीचाही आचार्य आहे. त्या एक ईश्वराचा हा प्रेषित सृष्टीचाही प्रेषित आहे.’’ (संदर्भ : इस्लामी संस्कृती, साने गुरुजी, पान क्र. ७१)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की त्यांचे आवाहन वर्ण, वंश, भाषा, देश इ. तमाम भेदांच्या पलीकडे जाऊन समस्त मानवजातीला संबोधन करते.
‘‘मजुराचा घाम वाळण्यापूर्वी त्याची मजुरी अदा करा.’’ (हदीस : इब्ने माजा)
काबाडकष्टाने हातावर घट्टे पडलेल्या एका कष्टकऱ्याच्या हाताचे चुंबन घेऊन प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘हे तर स्वर्गामध्ये जाणारे हात आहेत.’
पर्यावरण संवर्धनासाठी आणि वैश्विक समतोल राखण्यासाठी प्रेषितांचे मार्गदर्शन मोलाचे आहे. ते म्हणतात,
‘‘एखाद्याच्या हाती एखादे रोपटे असेल त्याच्या डोळ्यादेखत सृष्टीचा विनाश होत असेल तरी त्याने रोपटे लावावे.’’ (हदीस)
‘‘एखादे झाड तोडावे लागले तर त्याऐवजी एक नवीन झाड लावावे व जोपासावे.’’
‘‘एखाद्याने वृक्षारोपन करून त्याची निगा राखली तर जोवर जग त्यापासून लाभान्वित होईल तोवर त्याच्यासाठी शाश्वत पुण्याई आहे.’’ (हदीस : मुसनद अहमद)
‘‘द्वेष करणाऱ्यांपासून दूर राहा, कारण द्वेष चांगल्या गोष्टी खाऊन टाकतो. जसे अग्नी लाकडाला भस्म करतो किंवा गवताची राख करतो.’’
‘‘जो अत्याचारीला अत्याचार करण्यापास बळ देतो आणि त्याला माहीत असते की तो अत्याचारी आहे, तर अशा मनुष्याने इस्लामचा त्याग केला आहे.’’ (हदीस)
कौटुंबिक जीवनाविषयी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी केलेले मार्गदर्शन मोलाचे आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘कोणत्याही श्रद्धावंताने श्रद्धावंत स्त्रीशी (पत्नीशी) घृणा करू नये, तिची एखादी सवय आवडलली नाही तर दुसरी आवडेल.’’ (हदीस)
‘‘ज्या कोणाच्या तीन मुली अथवा तीन बहिणी असतील, अथवा दोन मुली वा दोन बहिणीच असतील आणि त्याने त्यांचे चांगले संगोपन केले आणि त्याच संबंधाने अल्लाहचे भय बाळगले तर त्याच्यासाठी स्वर्ग आहे.’’ (हदीस)
त्या काळात मुलींना जिवंत गाडण्याची क्रूर प्रथा होती, ती प्रथा पैगंबरांनी संपुष्टात आणली. संपूर्ण स्त्रीजातीला मानसन्मान दिला. स्त्रीयांना आपल्या पसंतीने विवाह करण्याचा हक्क दिला, मातापित्याच्या, पतीच्या व पुत्राच्या संपत्तीत वाटा दिला. प्रार्थनास्थळामध्ये प्रवेश दिला. विधवा व परित्यक्ता विवाह प्रचलित केला. हुडाप्रथा रद्द करून महेर (स्त्रीधन) अनिवार्य केले.
आदर्श समाजव्यवस्था निर्मितीसाठी मातापिता व थोरामोठ्यांचा आदर करणे प्रेषितांनी शिकविले त्यानुसार, ‘‘मातापिता प्रसन्न तर अल्लाह प्रसन्न, मातापिता नाराज तर अल्लाह नाराज.’’ (हदीस)
‘‘तो श्रद्धावंत होऊच शकत नाही जो पोटभर खातो, परंतु त्याचा शेजारी मात्र उपाशी राहतो.’’ (हदीस)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुमच्यापैकी तो श्रद्धावंत परिपूर्ण श्रद्धावंत आहे जो चारित्र्यवान आहे आणि तुमच्यामध्ये सर्वोत्त तो आहे जो आपल्या पत्नीशी उत्तम वागणूक
ठेवून आहे.’’ (हदीस)
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याविषयी संत तुकडोजी महाराज म्हणतात,
‘‘मुहम्मदाने केली प्रार्थना।
विखुरला इस्लाम कराया शहाणा।।
संघटित केले प्यारे स्वजना। त्या काळी
लोक प्रतिमापूजक नसावे
त्यांनी एका ईश्वरासी प्रथावे।।
हा मुहम्मदांचा उपदेश
नव्हे एकच देशासाठी।।’’
(संदर्भ : ग्रामगीता, अध्याय २७, ओवी ९०, पान २५२)
– खालिद जकी, चोपडा,
८९८३१०४६९९
0 Comments