Home A प्रेषित A अंतिम सत्याचा शोध भाग १

अंतिम सत्याचा शोध भाग १

हे विश्व, एका भल्या मोठ्या पुस्तकासमान आपल्या समोर पसरलेले आहे, परंतु हे एक अजब पुस्तक आहे ज्याच्या कोणत्याही पृष्ठावर त्याचा विषय अथवा त्याच्या लेखकाचे नाव लिखित स्वरुपात नाही, तरीही या पुस्तकाचा एकेक शब्द बोलत आहे, की त्याचा विषय काय असू शकतो आणि त्याचा लेखक कोण आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती डोळे उघडते आणि पाहते की ती एका विशाल, भव्य विश्वामध्ये उभी आहे, तेव्हा स्वाभाविकपणे त्याच्या मनमस्तिष्कात प्रश्न उद्भवतो की, ‘‘मी काय आहे, कोण आहे आणि ही सृष्टी म्हणजे काय?’’ तो स्वतःला आणि विश्वाला समजून घेण्यास अस्वस्थ होतो. आपल्या प्रकृतीत समाविष्ट संकेतांचे वाचन करण्याचा प्रयत्न करतो, जगात ज्या परिस्थितीना त्याला तोंड द्यावे लागते, त्यामागील वास्तविक कारणांचा शोध घेण्याचे तो इच्छितो. त्याच्या मनमस्तिष्कात अगणित प्रश्न निर्माण होतात. त्यांची उत्तरे माहित करून घेण्याकरिता तो अस्वस्थ असतो, परंतु त्याची उत्तरे त्याला सापडत नाहीत.
हे प्रश्न केवळ दार्शनिक अथवा तत्वज्ञानात्मक स्वरुपाचे नाहीत, तर मानवी स्वभाव, प्रकृती आणि परिस्थितीचा तो स्वभाविक परिणाम आहे. हे असे प्रश्न आहेत, जे जगातील जवळपास प्रत्येक व्यक्तीला एकदा तरी भेडसावत असतात. त्याची उत्तरे न मिळाल्याने कोणी वेडा होतो, कोणी आत्महत्या करून घेतो, कोणाचे उभे आयुष्य अस्वस्थतेत संपते आणि कोणी आपल्या ‘वास्तविक’ प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने संसारिक जीवनाच्या मनोरंजनात गुरफटून जातो आणि त्यामध्ये गुंग होऊन सदर मानसिक दगदगीतून सुटका प्राप्त करण्याचे इच्छितो. तो जे काही प्राप्त करू शकतो, प्राप्त करण्याच्या प्रयत्नात त्याला त्याचे विस्मरण होते जे तो प्राप्त करू शकला नाही.
सदर प्रश्नाला आपण मोजक्या शब्दामध्ये ‘अंतिम सत्याचा शोध’ म्हणून संबोधू शकतो परंतु याचे आपण विश्लेषण केले तर हा बर्याच प्रश्नांचा संग्रह असल्याचे दिसून येईल. ते प्रश्न कोणते आहेत? वेगवेगळ्या अंगानी ती प्रश्ने विचारली जाऊ शकतात परंतु सोयीकरिता मी खालील प्रमाणे तीन शीर्षकात त्यांची विभागणी करू इच्छितो.
  1. सृष्टिकर्त्याचा शोध
  2. उपास्य (माबूद – ईश्वर) चा शोध
  3. आपल्या अंतिम परिणामाचा शोध
माझ्या मतानुसार ‘सत्याचा शोध’ खरे पाहता नामाभिदान आहे त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचे. कोणत्याही शब्दात तुम्ही ते प्रश्न मांडा, वस्तुतः ते त्यांचेच परिवर्तीत स्वरुप असेल आणि याच तिन्ही सदराखाली त्यांना एकत्र केले जाणे शक्य असेल.
वर वर पाहता हे प्रश्न असे आहेत ज्याबाबत आपणास काहीही कल्पना नाही. अथवा एखाद्या पर्वताच्या माथ्याशी एखादा असा फलक लावलेला दृष्टीस पडत नाही जेथे या प्रश्नांची उत्तरे लिहून ठेवलेली असतील. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की प्रश्नातच त्याचे उत्तरही सामावलेले आहे. विश्व आपल्या वास्तवतेकडे स्वतः संकेत करीत आहे. ते आपणास निश्चित ज्ञानापर्यंत पोहचवत नसले तरी हा संकेत व इशारा अगदी स्पष्ट व अंतिम आहे. कोणत्याही प्रकारे आपणास वास्तविकतेचे ज्ञान प्राप्त झाले तर आपले अंतःकरण, खरोखर हेच सत्य आहे, याखेरीज विश्वाची अन्य काहीही वास्तवता असणे शक्य नसल्याचे कबूल करील.
  1. सृष्टिकर्त्याचा शोध
  2. सृष्टीला पाहता क्षणीच सर्वप्रथम हा प्रश्न पडतो की हिचा निर्माणकर्ता कोण आहे आणि तो कोण आहे जो या भव्य कारखान्यास चालवित आहे. जुन्या काळात लोकांचा असा समज होता की बर्याच अदृश्य शक्ती या सृष्टीरूपी कारखान्याचे स्वामी आहेत. एका मोठ्या ईश्वराच्या देखरेखीत बरेचसे लहान सहान ईश्वर त्याची व्यवस्था पहात आहेत. आज देखील बरेच जण अशाच प्रकारची विचारप्रणाली बाळगतात. परंतु युक्तिवाद आणि सिध्दांताच्या जगात आता या विचारांना मान्यता नाही. आजमितीस हा एक सजीव नव्हे तर निर्जीव दृष्टिकोन आहे.

    वर्तमान जगात जे लोक स्वतःला प्रगतीवादी, सुसंस्कृत म्हणवून घेतात आणि स्वतःला नवयुगाचा मानव म्हणून संबोधितात, ते ‘शिर्क’ अर्थात अनेकेश्वरवादाऐवजी नास्तिकता आणि संयोग सिध्दांताचे समर्थक आहेत. त्यांच्या मतानुसार हे विश्व एखाद्या विवेकी आणि जागृत अस्तित्वाची निर्मिती नाही तर आकस्मिक अपघाताचा परिणाम आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की जेव्हा एखादी घटना आकस्मिक घडते तेव्हा परिणामस्वरूप आणखी प्रतिघटना अस्तित्वात येतात. अशा प्रकारे कारण आणि कार्याची एक लांबलचक श्रृंखला सुरु होते, आणि हीच श्रृंखला ते कारण आहे जिने संपूर्ण विश्वाला गतिमान केले आहे. या विचारप्रणाली मध्ये दोन मूलभूत गोष्टी आहेत. एक ‘योगायोग’ आणि दुसरी कार्यकारण सिध्दांत ( law of Causation )
    या विचारप्रणालीनुसार आजपासून जवळजवळ दोन लाख अरब वर्षा -पूर्वी या विश्व वा सृष्टीचे अस्तित्व नव्हते. त्या समयी ना तर तारे होते ना तर ग्रह परंतु वातावरणात जड पदार्थ अस्तित्वात होता. हा जड पदार्थ त्यावेळी स्थायी स्वरुपात नव्हता. त्याचे स्वरूप इतके जटिल नव्हते तर आपल्या सरळ आणि प्रारंभिक अवस्थेत होता. अर्थात हा पदार्थ इलेक्ट्रान आणि प्रोटानच्या रुपात संपूर्ण आकाशात वा संपूर्ण वातावरणात समानरित्या पसरला होता.
    दुसर्या शब्दात सांगावयाचे झाल्यास ही संपूर्ण सृष्टी, हे पूर्ण विश्व अगदी छोट्या छोट्या कणांमध्ये अथवा सूक्ष्म परमाणूंच्या धुळीच्या धूसर लोटा समान होते. त्या समयी पदार्थ अगदी समतोल अवस्थेत होता. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया, कोणत्याही प्रकारची गती नव्हती.
    गणिताच्या दृष्टीने पाहिल्यास हा समतोल असा होता की जर त्यामध्ये एखाद्याने थोडासा जरी विघ्न निर्माण केला, तर ते स्थिर राहणे शक्य नसावे, अस्थिरतेची ती श्रृंखला सुरुच रहावी. जर त्या प्रथम हालचालीस – व्यत्ययास गृहीत धरले तर त्या दृष्टिकोनानुसार तद्नंतरच्या सर्व घटना गणिती पद्धतीने सिद्ध होतात.
    असो, मग असे झाले की पदार्थरूपी या आभाळात किचितशी हालचाल झाली जसे एखाद्या हौदातील पाणी कोणी हात घालून हलवावे तसे. विश्वाच्या या शांततामय दुनियेत हा विघ्न व गती कोणी उत्पन्न केला, याबाबत काही माहिती नाही, परंतु हालचालीची क्रिया घडली आणि त्यात वृध्दी होतच गेली. गतीची एक श्रृंखला अविरत सुरु झाली. परिणामतः पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित गोळा होणे सुरु झाले. हाच तो एकत्रित जमलेला पदार्थ होय ज्यास आपण तारे, ग्रह आणि नक्षत्रे म्हणतो.
    सृष्टीसंबंधी सदर व्याख्या विज्ञानाने प्रस्तुत केली होती परंतु हा युक्तीवाद कमकुवत व ठिसूळ आहे, हे सत्य आहे. कारण स्वतः वैज्ञानिकांची मनःस्थितीही यावर टिकू शकली नाही. ही विचारप्रणाली, विश्वाला सर्वप्रथम कोणी क्रियाशील केले, यापासून स्वतःच अनभिज्ञ असण्याची वास्तविकता स्वीकारते आहे. तरीही सदर विचारधारा प्रस्तुत करणार्यांचा, सृष्टीला सर्वप्रथम गती देण्याच्या बाबतीत माहिती प्राप्त केल्याचा दावा आहे. त्यांच्या मतानुसार या पहिल्या क्रियेला जन्म देणार्याने नाव अपघात वा योगायोग आहे.
    प्रश्न असा उद्भवतो की जेव्हा विश्वाच्या पोकळीत केवळ एक निष्क्रीय आणि गतिहीन पदार्थाचे अस्तित्व होते, त्याखेरीज अन्य एखादी वस्तू अस्तित्वात नव्हती, तर हा विचित्र योगायोग मध्येच कोठून टपकला ज्याने संपूर्ण सृष्टीला गतिमान करून टाकले. ज्या घटनेचे कारण ना त्या पदार्थात होते, ना त्या पदार्थाबाहेर, मग ही घटना घडली तरी कशी?
    या विचारप्रणालीचा हा एक अत्यंत मजेशीर विरोधाभास आहे की त्यामध्ये प्रत्येक घटनेच्या आधी एक घटना, प्रत्येक प्रतिक्रिये आधी एक क्रिया असण्याचे आवश्यक मानले जाते, जे नंतर घटित अथवा जारी असणार्या घटनांचे कारण बनू शकेल, परंतु या विचारप्रणालीचा आरंभ एका अशा घटनेद्वारे होतो, ज्याच्या आधी त्याचे कारण अस्तित्वात नाही. हाच तो बिनबुडाचा विचार ज्याच्या पायावर विश्वाच्या आकस्मिक जन्माच्या सिद्धांताची इमारत उभी करण्यात आली आहे.
    या विश्वाची निर्मिती योगायोगाने वा आकस्मिक झाली असेल तर मग अनिवार्यतः काय त्या दिशेचाच अवलंब करण्यास त्या घटना विवश होत्या ज्या दिशेचा त्यांनी अंगिकार केला? याव्यतिरिक्त अन्य काही घडणे शक्य नव्हते काय? काय हे संभव नव्हते की तारे परस्परात टक्कर होऊन नष्ट व्हावेत? तथाकथित पदार्थामध्ये हालचालीची क्रिया निर्माण झाल्यानंतर, ती क्रिया त्यापुरतीच मर्यादित न राहता एक विकसनशील क्रिया बनली. आणि एका आश्चर्यजनक श्रृंखलेचा आरंभ होवून सर्व क्रमबध्दता वर्तमान विश्वाला साकार करण्याकरिता गतिमान झाली, काय हे आवश्यक होते?
    शेवटी तो कोणता तर्क, कोणता लॉजिक की ज्याने तार्यांच्या निर्मिती – नंतर त्यांना अनंत अवकाशात शिस्तबद्धरित्या पद्धतशीरपणे फिरावयास लावले. मग ते कोणते लॉजिक होते ज्याने सृष्टीच्या एका उपयुक्त ठिकाणी सूर्यमालेला अस्तित्वात आणले व त्याचे स्थान निश्चित केले? तद्नंतर तो कोणता युक्तीवाद होता ज्यामुळे आपल्या पृथ्वीवर ते चमत्कारिक परिवर्तन घडले, ज्याच्या परिणामस्वरुप येथे जीवसृष्टी निर्माण होणे शक्य होऊ शकले? आणि त्या परिवर्तनांचा आजपावेतो सृष्टीतील असंख्य जगतापैकी एका जगातही थांगपत्ता लागू शकला नाही? मग तो कोणता युक्तीवाद, तर्क होता, जो एखाद्या विशिष्ट अवस्थेत पोहचून निर्जीव पदार्थापासून सजीव प्राण्यांच्या जन्मास कारणीभूत ठरला? काय या गोष्टीची एखादी न्यायोचित व्याख्या करणे शक्य आहे की पृथ्वीवर जीवन का आणि कशा प्रकारे अस्तित्वात आले? आणि ते नियमानुसार का सातत्याने निर्माण होत चालले आहे?
    मग तो कोणता तर्क होता, ज्याने विश्वाच्या एका छोट्याशा भागात चमत्कारिकरित्या त्या सर्व वस्तू निर्मिल्या, जे आपल्या जीवन, आपल्या विकास आणि आपल्या संस्कृतीकरिता आवश्यक होत्या? मग तो कोणता तर्क आहे, ज्याने ही स्थिती आपल्याकरिता शाबूत ठेवली आहे? काय निव्वळ एक योगायोग – अपघात घडणे या गोष्टीस पुरेसे कारण होते की या सर्व घटना, इतक्या सुरेख पद्धतीने आणि अगदी क्रमबध्दरित्या निरंतरपणे घडत जाव्यात आणि कित्येक अरब, खरब वर्षानुवर्षे तो क्रम सुरू रहावा आणि त्यात कोणताही फरक आढळू नये?
    मग, योगायोगाने घडणार्या घटनामध्ये हे परस्पर सहकार्य – ताळमेळीचे वैशिष्टय कोठून आले? इतक्या चमत्कारिकपणे निरंतर विकास साधणेची प्रवृत्ती त्यामध्ये कशी काय आली, या गोष्टीची खरोखर एखादी व्याख्या केली जाऊ शकते का?
    या विश्वाची निर्मिती कशी झाली? या प्रश्नाचे हे उत्तर होते. तद्नंतर हा प्रश्न उद्भवला की या सृष्टीला चालविणारा कोण आहे? तो कोण आहे जो या महान व विशाल कारखान्यास इतक्या व्यवस्थितरित्या गतिशील ठेवित आहे? तत्संबंधी व्याख्या अशा प्रकारची आहे की दोन ईश्वराखेरीज त्याचे काम चालत नाही, कारण प्रारंभिक अवस्थेत हालचालीची क्रिया अथवा गतिला योगायोग म्हटले जाऊ शकते, परंतु तद्नंतरच्या निरंतर गतीला कोणत्याही परिस्थितीत योगायोग वा संयोग म्हटले जाणे अशक्य आहे. सदर व्याख्येनुसार दुसर्या ईश्वराचा शोध घेतला पाहिजे.
    हा पेच सोडविण्याकरिता कार्यकारण सिद्धांत (Principle of Causation) प्रस्तुत करणेत आला. याचा अर्थ असा की पहिल्या हालचालीच्या क्रियेनंतर विश्वामध्ये कारण आणि कार्याची एक श्रृंखला सुरु झाली आहे. त्यानुसार एका पाठोपाठ घटना घडत चालल्या आहेत, अगदी त्याप्रमाणे जसे बालकांनी अनेक विटा रचाव्या, एखादी मधली वीट पाडावी आणि तद्नंतर सर्व विटा आपोआप कोसळू लागाव्यात. ज्या घटना घडतात, त्याचे कारण विश्वाच्या बाहेर कोठे अस्तित्वात नाही तर अनियंत्रित नियमांतर्गत त्या आधीच्या घटनांचाच तो अपरिहार्य परिणाम तसेच त्या आधीच्या घटना देखील त्यांच्या तत्पूर्वीच्या घटनांचा अपरिहार्य परिणाम होत.
    अशा प्रकारे विश्वामध्ये कारण आणि कार्य व क्रिया – प्रतिक्रियेचा एक अखंड क्रम सुरु झाला आहे येथपावेतो की ज्या स्वरुपात सृष्टीच्या इतिहासाचा प्रारंभ झाला, त्यांने भावी घटनांचीही निश्चिती करून टाकली. जेव्हा विश्वाचे प्राथमिक स्वरुप एकदा निश्चित झाले तेव्हा निसर्ग देखील एकाच मार्गावर भ्रमण करण्यास विवश होते. अर्थात विश्व ज्या दिवशी जन्मले, त्याच दिवशी त्याच्या भावी दिनाची निश्चिती झाली.
    उपरोक्त सिध्दांताला निसर्गाचा पायाभूत नियम ठरविणे सतराव्या शतकातील सर्वात मोठी घटना होती. या अनुषंगाने संपूर्ण सृष्टीला एक यंत्र सिद्ध करण्याच्या आंदोलनास सुरूवात झाली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या आंदोलनाने आपली चरम सीमा गाठली. हा काळ वैज्ञानिक इंजिनिअरांचा काळ होता. शास्त्रज्ञ, निसर्गाचे यांत्रिक मॉडेल बनवू पहात होते. त्याच समयी हेल्म होल्टज् (Helm Holtz) ने म्हटले होते, ‘‘सर्व प्राकृतिक विज्ञानांचे अंतिम ध्येय स्वतःला यांत्रिकी (चशलहरळिली) मध्ये रुपांतरित करणे आहे.’’ जेव्हा की या नियमांतर्गत विश्वातील सर्व वस्तूंच्या व्याख्या निश्चित करण्यात अद्याप वैज्ञानिकांना यश प्राप्त झाले नव्हते, तरी विश्वाची व्याख्या यांत्रिक पध्दतीने केली जाऊ शकते, यावर त्यांचा विश्वास होता. त्यांना वाटत होते की केवळ थोड्याशा प्रयत्नांची गरज आहे, तद्नंतर संपूर्ण विश्व एक चलत यंत्र सिद्ध होईल.
    मानवी जीवनाशी उपरोक्त गोष्टींचा संबंध पूर्णतः स्पष्ट होता. कार्यकारण सिद्धांत आणि विश्वाची यांत्रिक व्याख्या पाहता मानव लाचार ठरतो, मानवाची शक्ती आणि त्याच्या सामर्थ्यावर विश्वास बाळगणे कठिण होते. जर हा नियम पूर्णतः निसर्गावर आच्छादलेला असल्यास मानवी जीवन त्यापासून कसे सुरक्षित राहू शकते?
    उपरोक्त विचारसरणीने सतराव्या व अठराव्या शतकातील यांत्रिक तत्वज्ञानाला जन्म दिला. जेव्हा सजीव पेशी (Living Cell) देखील निर्जीव पदार्थाप्रमाणे केवळ रासायनिक तत्वानी बनले असल्याचा शोध लागला तेव्हा प्रश्न उद्भवला की ज्या विशिष्ट मूलतत्वानी आपले शरीर व मेंदू बनले आहे, ते या कार्यकारण सिध्दांताच्या कक्षेबाहेर असणे कसे काय शक्य आहे ?
    शेवटी असा अनुमान लावला गेला किबहुना जोरदारपणे दावा करणेत आला की जीवन देखील एक यंत्र आहे. एवढेच नव्हे तर न्यूटन, बाख (Bach) आणि माइकल एंजिलो (Michel Angelo)यांच्या मेंदू आणि छपाई मशीन मध्ये फारसा फरक नव्हता याखेरीज की त्यांच्या मेंदूची संरचना कमी जास्त प्रमाणात अधिक गुंतागुंतीची होती आणि बाह्य प्रेरणांचे पूर्णतः उत्तर देण्याचेच केवळ त्यांचे कार्य होते, असेही म्हटले गेले.
    परंतु विज्ञान अशा प्रकारच्या अत्यधिक व समतोल सिध्दांताना आज मान्यता देत नाही. सापेक्षता सिध्दांत (Theory of Relativity) सदर नियमा – (कार्यकारण नियम) स एक धोका संबोधितो. यास तो भ्रम (Illusion) ची उपमा देतो. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटास, निसर्गातील बर्याच गोष्टी विशेषकरून प्रकाश आणि गुरुत्वाकर्षण, सृष्टीच्या यांत्रिक व्याख्येचे उच्चाटन करीत असल्याचे विज्ञानाला पटले होते. काय एखादे असे यंत्र बनविणे शक्य आहे ज्याद्वारे न्यूटनचे चितन, ‘बाखची भावनिकता आणि माइकल एंजिलोच्या कल्पना शक्तीचे पुनरुज्जीवन करता यावे, या चर्चा अद्याप झडत होत्या, तरी दिव्याचा प्रकाश आणि सफरचंदाचे खाली पडणे, याची पुनरावृत्ती मशीन करू शकत नाही, यावर वैज्ञानिकांचा जलद गतीने विश्वास बसत चालला होता.
    प्राचीन विज्ञानाने संपूर्ण विश्वासानिशी घोषित केले होते की निसर्ग, केवळ एकाच मार्गाचा अवलंब करू शकते, जो प्रथम दिनापासून कार्यकारणच्या निरतंर श्रृंखले अंतर्गत अंतापर्यंत निश्चित झालेला आहे, परंतु सरतेशेवटी विश्वाचा भूतकाळ इतक्या अटळपणे त्याच्या भविष्याचे कारण नव्हे, जसे पूर्वी समजले जात होते, हे विज्ञानाला स्वतः मान्य करणे भाग पडले. आता बहुतेक वैज्ञानिकांचे नव्या माहिती आधारे, आमचे ज्ञान आम्हास एका अयांत्रिकी (Non-Mechanical Reality) सत्याकडे नेत असल्याच्या गोष्टीवर एकमत आहे.१
    विश्वाचा जन्म आणि त्याच्या गती बाबत हे दोन्ही दृष्टीकोन ज्यांचा विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच जन्म झाला होता, आजपावेतो खात्रीलायक मर्यादा गाठू शकले नाहीत. नवनवीन शोध त्यांचा पाया भक्कम करण्याऐवजी आणखी कमकुवत करीत आहेत. अशा प्रकारे विज्ञान स्वतःच उपरोक्त दृष्टिकोनाचे खंडन करीत चालले आहे. आता माणूस पुनश्च त्या उंबरठ्यावर येऊन पोहचला आहे, जे त्यज करून त्याने आपला प्रवास सुरु केला होता. आमच्या पुढ्यात पुनश्च हा प्रश्न आहे की विश्वाला कोणी निर्माण केले आणि कोण त्याचा चालक आहे?
  3. उपास्य (माबूद) चा शोध
  4. ही होती सृष्टीकर्त्याच्या शोध विषयक समस्या. यानंतर दुसरी गोष्ट जो मनुष्य जाणू इच्छितो, ती ही की ‘माझा उपास्य कोण आहे? तो कोण आहे ज्याच्यापुढे मी माझे सर्वकाही समर्पण करावे?’
    जीवनात एक प्रकारची पोकळी, शून्यत्व असल्याची आपणास स्पष्टरित्या जाणीव होत असते. परंतु ही पोकळी वा शून्यत्व कशा प्रकारे भरून काढायचे हे आपणास माहित नाही. याच पोकळीच्या जाणीवेस मी ‘उपास्य (माबूद) चा शोध’ म्हटले आहे. सदर पोकळीची अनुभूती दोन प्रकारे होत असते.
    आपले अस्तित्व आणि बाह्य जगताचे जेव्हा आपण निरिक्षण करतो तेव्हा दोन तीव्र स्वरुपाच्या भावना आपल्या अंतर्मनातून प्रकट होतात. पहिली आभार व कृतज्ञतेची आणि दुसरी दुबळेपणा व विनम्रतेची.
    जीवनात आपण जेथे कोठेही दृष्टिक्षेप टाकतो, तेव्हा आपले जीवन कोणाच्या तरी उपकाराने आच्छादले असल्याचे स्पष्टरित्या आपणास दिसून येते. हे पाहून ते प्रदान करणार्याच्या प्रती आपल्या अंतर्मनात अथांग कृतज्ञता व आभाराची भावना ओसंडू लागते आणि आपण आपल्या सर्व अमूल्य श्रद्धा – धारणा आपल्या उपकारकर्त्याच्या प्रती व्यक्त करू इच्छितो.
    याचा शोध, आपल्याकरिता केवळ एका तत्वज्ञानाची गोष्ट नाही तर आपल्या मानसशास्त्राशी त्याचा घनिष्ट संबंध आहे. हा प्रश्न केवळ एका बाह्य समस्या निराकरणा संदर्भातला नाही तर ती आपल्या अंतर्मनाची तहान आहे. आपले पूर्ण अस्तित्व त्या प्रश्नाचे उत्तर मिळवू इच्छिते.
    जरा विचार करा, मनुष्याच्या स्व-प्रयत्नांचा कोठेही अंतर्भाव नसतानाही तो या विश्वामध्ये स्थायी घटनेच्या रुपात उपस्थित आहे, या सत्यतेकडे एक सूज्ञ व्यक्ती डोळेझांक करू शकते का? मनुष्य स्वतःला एका अशा शरीरात पहात आहे ज्याची त्याहून उत्कृष्ट शरीराची तो कल्पना देखील करू शकत नाही, जेव्हा की शरीराची निर्मिती त्याने स्वतः केली नाही. त्यास अशा चमत्कारिक बौद्धिक क्षमता दिल्या गेल्या आहेत, ज्या अन्य प्राणीमात्रांना प्राप्त नाहीत.यद्यपि त्या क्षमता प्राप्त करण्याकरिता त्याने काहीच केलेले नाही वा करू शकत नाही. आपले अस्तित्व खासगी नव्हे तर ती एक भेट वस्तू आहे. ही भेटवस्तू कोणी दिली आहे ? त्या महान उपकारकर्त्याचे आभार प्रदर्शन करता येणे शक्य व्हावे याकरिता मानवी अंतर्मन त्या प्रश्नाचे उत्तर शोधते.
    आता आपल्या शरीराबाहेर डोकावून पहा. जगात आपण या अवस्थेत जन्मतो की आपल्यापाशी स्वतःचे असे काहीच नसते, ना तर विश्वावर आपला एखादा अधिकार चालतो की ज्यायोगे आपल्या आवश्यकतेनुसार त्यास बनविणे शक्य व्हावे. आपल्या हजारो प्रकारच्या गरजा आहेत परंतु एखादी गरज सुद्धा आपणहून पूर्ण करू शकत नाही. या जगात आश्चर्यकारकरित्या आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्याची व्यवस्था केली गेली असल्याचे आपण पाहतो. असे वाटते जणू विश्व आपल्या सर्व साधनानिशी मनुष्य जन्माची प्रतिक्षा करीत असावे जेणेकरून त्याच्या सेवेत रूजू होता यावे. उदाहरणार्थ ध्वनी घ्या ध्वनीच्या माध्यमाने आपण आपले म्हणणे दुसर्यापर्यंत पोहचवतो. हे कसे शक्य झाले की आपल्या मस्तिष्कात निमार्ण होणारे विचार जिव्हेचे स्पंदन रूपाने दुसर्याच्या कानापर्यंत पोहचावेत आणि त्याने समजण्यायोग्य ध्वनी रूपात त्यास ऐकू शकावे? याकरिता आपल्या अंतर्गत व बाह्य जगतात असंख्य व्यवस्था करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक मधले माध्यम आहे ज्यास आपण हवा म्हणतो. आपण जे शब्द उच्चारतो, ते ध्वनी विशिष्ट लहरींच्या रूपात हवेवर, जसे पाण्याच्या पातळीवर लहरी उत्पन्न होत असतात व त्याचे प्रसरण होत असते, त्याप्रमाणे तरंगत असतात.
    माझ्या तोंडून निघालेला ध्वनी तुम्हापर्यंत पोहचण्याकरिता दोहोदरम्यान हवा उपस्थित असणे गरजेचे आहे. हवेचे हे माध्यम दोहोदरम्यान नसल्यास तुम्ही माझ्या ओंठाची हालचाल पहाल परंतु माझा आवाज ऐकू शकणार नाही. उदाहरणार्थ एका काचेच्या बंद कंदिलात विद्युत बेल ठेवून वाजवली गेली तर त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येईल परंतु त्या कंदिलातील हवा पूर्णतः काढून टाकल्यास व नंतर बेल वाजविल्यास काचेच्या आत घंटी वाजत असल्याचे तर तुम्ही पहाल परंतु त्याचा आवाज काहीच ऐकू येणार नाही. कारण घंटी वाजल्याने जे स्पंदन निर्माण होते, ते ग्रहण करून तुमच्या कानापर्यंत पोहचविण्याकरिता कंदिलात हवेचे अस्तित्व नाही.
    परंतु हे माध्यम देखील पुरेसे नाही कारण हवेच्या माध्यमाने तर आपला ध्वनि पाच सेकंदात केवळ एक मैलाचे अंतर कापतो. याचा अर्थ असा की हवेचे माध्यम केवळ निकटच्या वातावरणात बोलणीकरिता उपयुक्त – गुणकारी असते. ते आपला आवाज दूरपर्यंत पोहचवू शकत नाही. जर ध्वनी निव्वळ हवेच्या माध्यमाने पसरला असता तर त्यास एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोहचविणे शक्य झाले नसते. याकरिता निसर्गाने आपणास एक अत्यंत द्रूतगतीचे साधन उपलब्ध करून दिले आहे. ते साधन म्हणजे प्रकाश अथवा विद्युत तरंग होय, ज्याची गती एक लाख श्याएशी हजार मैल प्रति सेकंद आहे. बिनतारी (Wireless) संदेश माध्यमात याच साधनांचा उपयोग केला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती आकाशवाणी केंद्रात लावण्यात आलेल्या माइक्रोफोन समोर आवाज करते तेव्हा माइक्रोफोन तो ध्वनी ग्रहण करून त्याचे विद्युत लहरी मध्ये रूपांतर करतो आणि तारेद्वारे तो प्रसारण यंत्र वा ट्रान्समीटरपर्यंत धाडतो. ट्रान्समीटर कंपन पावून वायूमंडलात तेच कंपन निर्माण करते. अशा प्रकारे पाच सेकंदात एक मैलाचा पल्ला गाठणारा ध्वनी, विद्युत लहरीत रूपांतरित होऊन जवळपास दोन लाख मैल प्रति सेकंदाची गती प्राप्त करतो आणि क्षणार्धात संपूर्ण जगात प्रसरण पावतो. याच बिनतारी लहरीना आपल्या रेडिओ संचातील मशीन ग्रहण करते आणि स्पष्ट आणि उच्च स्वरात तिचा पुनरुच्चार करते. मग हजारो मैल अंतरावरून बोलण्यात आलेल्या आवाजास आपण त्या क्षणीच ऐकू लागतो.
    हे त्या अगणित व्यवस्थापैकी एक होय. त्याचे वर्णन मी केलेले नाही तर केवळ नावापुरता उल्लेख केला आहे. जर त्याचे आणि अन्य बाबींचे तपशीलवार वर्णन करावयाचे झाल्यास त्याकरिता हजारो पाने कमी पडतील आणि तरीही त्याचे वर्णन संपणार नाही.
    हे उपकार आणि सुख सुविधा ज्याचा मनुष्य प्रत्येक समयी उपभोग घेत आहे, याविना भूतलावर मानवी जीवन आणि संस्कृतीची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. हे सर्व त्याच्याकरिता कोणी उपलब्ध केले आहे, हे जाणून घेण्याची मानवाची इच्छा आहे. प्रत्येक क्षणी जेव्हा तो एखाद्या उपकार वा देणगीने लाभान्वित होतो तेव्हा त्याच्या अंतर्मनात आभार व कृतज्ञतेच्या भावना निर्माण होतात आणि आपल्या उपकारकर्त्याला भेटून स्वतःला त्याच्या चरणी झोकून द्यावे असे त्याला मनापासून वाटते. उपकारकर्त्याचे उपकार मानणे, त्याला आपल्या हृदयात खोलवर स्थान देणे आणि आपल्या उदात्त व श्रेष्ठतम भावना त्याच्यासमोर समर्पित करणे, ही मानवी प्रकृतीची शुध्द व उदात्त भावना आहे. मानवी स्वभावातील ही सभ्य भावना आहे. प्रत्येक मनुष्य जो आपल्या जीवन आणि या जगतावर विचार चितन करतो, त्याच्या अंतर्मनात ही भावना तीव्रतेने उत्पन्न होते. मग काय या भावनांचे उत्तर काहीच असू नये? काय या विश्वात मनुष्य एक अनाथ बालक आहे,ज्याच्या अंतःकरणात उत्पन्न होणार्या प्रेम आणि समर्पणाच्या भावना तृप्तीकरिता एखादे अस्तित्व उपस्थित नसावे ? काय हे असे विश्व आहे, जेथे उपकार व देणग्या तर असाव्यात परंतु उपकारकर्त्याचा थांगपत्ता नसावा, जेथे भावना आहेत, परंतु भावनांच्या तृप्तीचे एखादे साधन नसावे?
    उपास्याचा शोधासंबंधीचा हा एक पैलू आहे. मानवाचे स्थान व त्यास संबंधित परिस्थितीची निकड आहे की या सृष्टीमध्ये त्याचा एखादा आधार असावा, हा दुसरा पैलू होय. डोळे उघडून पाहिले तर या जगात आपण अगदी क्षुद्र व लाचार प्राणी असल्याचे आढळेल. जरा त्या अवकाश पोकळीची कल्पना करा, ज्यामध्ये आपली ही पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करीत आहे. तुम्हास माहित आहे की पृथ्वीचा वर्तुळाकार सुमारे पंचवीस हजार मैल एवढा आहे, आणि एखाद्या उसळणार्या भोवर्यासमान तो आपल्या आसाभोवती निरंतर अशा प्रकारे भ्रमण करीत आहे की प्रत्येक चोवीस तासात त्याची एक प्रदक्षिणा पूर्ण होते. अर्थात पृथ्वीची गती जवळपास एक हजार मैल प्रति तास आहे. त्याचबरोबर ती सूर्याभोवती अठरा करोड साठ लाख मैल लांबच्या कक्षेत अत्यंत द्रूतगतीने भ्रमण करीत आहे.
    अवकाश पोकळीत इतक्या द्रूतगतीने भ्रमण करणार्या पृथ्वीवर आपले अस्तित्व टिकविण्याकरिता पृथ्वीच्या गतीला एका विशिष्ट प्रमाणबद्धतेत ठेवण्यात आले आहे. असे जर नसते तर पृथ्वीतलावर मनुष्याची अवस्था एका चालत्या चक्रावर बारीक खडी ठेवण्या समान झाली असती. त्याचबरोबर दुसरी सोय ही करण्यात आली आहे की पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आपणास धरून ठेवले आहे आणि वरून हवेचा प्रचंड दाब आहे. हवेद्वारे जो दबाव पडत आहे. तो शरीराच्या प्रतिवर्ग इंचावर पंधरा पौंड इतका आहे, अर्थात एका सर्वसाधारण मनुष्याच्या संपूर्ण शरीरावर सुमारे २८० मनाचा दबाव आहे. या चमत्कारीक व्यवस्थेने आपणास अवकाशात निरंतर भ्रमण करणार्या पृथ्वीवर प्रत्येक बाजूनी टिकवून ठेवले आहे.
    मग जरा सूर्या संबंधी विचार करा. सूर्याचा गोलाकार आठ लाख पासष्ट हजार मैल आहे, याचा अर्थ असा की तो आपल्या पृथ्वीच्या मानाने दहा लाख पटीने मोठा आहे. हा सूर्य ज्वालांचा धगधगता समुद्र आहे. त्याच्या जवळपास कोणतीही वस्तू स्थायी स्वरूपात राहू शकत नाही. पृथ्वी आणि सूर्या दरम्यान सद्य समयी सुमारे साडे नऊ करोड मैलाचे अंतर आहे. यदाकदाचित तो याच्या निम्म्या अंतरावर असता तर सूर्याच्या उष्णतेने वस्तू पाघळण्यास सुरुवात झाली असती, अथवा तो चंद्राच्या ठिकाणी म्हणजे दोन लाख चाळीस हजार मैल अंतरावर आला तर पृथ्वी पाघळून बाष्पात तिचे रूपंातर होईल. हाच तो सूर्य आहे, ज्याच्या मेहरबानीने पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. या हेतुकरिता त्यास एका विशिष्ट अंतरावर ठेवण्यात आले आहे. जर तो दूर गेला तर जमीन बर्फ बनून राहील आणि जवळ आला तर आपल्या सर्वांची राखरांगोळी होऊन जाईल.
    मग विश्वाचा विस्तार व फैलावाकडे नजर टाका. आणि त्या गुरुत्वाकर्षण शक्तीकडे पहा जिने या महान विश्वाला सांभाळून ठेवले आहे. विश्व एक अमर्याद विशाल कारखाना आहे. प्रकाशाचा वेग एक लाख श्याएशी हजार मैल प्रति सेकंद आहे. विश्वाला चोहोबाजूनी एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यात कित्येक अरब वर्षे लागतील, असा खगोल शास्त्रीय दृष्टिकोनाने विश्वाच्या विशालतेचा अनुमान आहे. ही सूर्यमाला ज्यामध्ये आपली पृथ्वीही समाविष्ट आहे, दिसण्यात प्रचंड मोठी असल्याचे वाटते परंतु संपूर्ण विश्वाच्या मानाने तिचे स्थान नगण्य आहे. विश्वामध्ये याहूनही मोठमोठाले असंख्य तारे असीम विस्तारित स्वरूपात पसरले आहेत. ज्यापैकी बरेच इतके मोठे आहेत की आपली संपूर्ण सूर्यग्रहमाला त्याच्यावर ठेवली जाऊ शकते. ज्या गुरुत्वाकर्षण शक्तीने या अगणित जगतांना सांभाळून ठेवले आहे, तिच्या महानतेची कल्पना अशा प्रकारे केली जाऊ शकते की सूर्य ज्या अभूतपूर्व शक्तीनिशी पृथ्वीला स्वतःकडे खेचत आहे आणि तिला अनंत अवकाशात पडून नष्ट होण्यापासून रोखत आहे, ती अदृश्य शक्ती इतकी प्रचंड शक्तीशाली आहे की जर या हेतुकरिता एखाद्या भौतिक वस्तूने पृथ्वीला बांधावे लागले असते तर गवत जसे जमिनीला आच्छादून टाकते तसे धातूंच्या तार्यांनी पृथ्वीचे भूतल झाकोळून गेले असते.
    आपले जीवन पूर्णतया अशा शक्तीवर निर्भर आहे ज्यावर आपले प्रभुत्व नाही. मानवी जीवनाकरिता जगामध्ये ज्या व्यवस्था व सोयी आहेत आणि ज्या नसल्याने मानवी जीवनाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही, त्या इतक्या उच्च पातळीवर होत आहेत आणि त्या अस्तित्वात आणण्याकरिता इतक्या असाधारण शक्ती हव्यात की मनुष्य स्वतः त्या अस्तित्वात आणण्याची कल्पना देखील करू शकत नाही. सृष्टिकरिता जी कार्यपद्धत निश्चित करण्यात आली आहे ती निश्चित करणे तर दूर राहो, त्याचे नियंत्रण करणे देखील मनुष्याच्या आवाक्याबाहेर आहे. विश्वातील अन्यसाधारण शक्ती त्याचेशी ताळमेळ सहकार्य केल्या नाहीत तर तो जमिनीवर टिकूच शकणार नाही, मग जमिनीवर एका सुसंस्कृत जीवनाची निर्मिती तर दूरवरची गोष्ट आहे, हे तो पाहतो आहे.
    अशा एका विश्वात जेव्हा मनुष्य आपल्या तुच्छ अस्तित्वाला पाहतो तेव्हा स्वतःला तो इतका जास्त लाचार अनभवु लागतो जसे समुद्राच्या लाटामध्ये एक मुंगी स्वतःचा जीव वाचविण्याकरिता धडपडत असते. या अथांग विश्वात त्याचा आधार बनू शकणारा कोणी असावा, अनायासे तो इच्छितो. तो एका अशा अस्तित्वाचा आश्रय शोधू इच्छितो, जे विश्वाच्या शक्ती पेक्षाही उच्चतर असेल आणि ज्याच्या आश्रयाखाली आल्यानंतर तो स्वतःस सुरक्षित अनभवु शकेल.
    या दोन भावना आहेत, ज्याना मी ‘उपास्य (माबूद) चा शोध’ हे नाव दिले आहे. उपास्याचा शोध वस्तुतः एक स्वाभाविक भावना आहे, ज्याचा अर्थ एका अशा अस्तित्वाचा शोध आहे जे मानवाच्या प्रेम आणि श्रद्धेचे केंद्र बनू शकेल. आधुनिक युगात मानवाच्या या तहानेला उत्तर म्हणून राष्ट्र – लोकसमुह, देश आणि राज्याला प्रस्तुत केले गेले आहे. आपले राष्ट्र, आपला देश आणि आपल्या राज्याला तुमच्या श्रद्धा-निष्ठेच्या केंद्रस्थानाचा दर्जा द्या असे नवीन संस्कृती सांगते. तसेच त्यानाच तुमच्या आत्मीयतेचा आधार बनवा, असे म्हणते. या गोष्टींना उपास्याच्या नावाखाली प्रस्तुत केले जात नाही. परंतु व्यवहारात त्याना जे स्थान प्राप्त आहे, ते जवळजवळ तसेच आहे जसे वास्तविकपणे एका उपास्याकरिता असले पाहिजे.
    परंतु उपरोक्त गोष्टींना उपास्याचे स्थान बहाल करणे म्हणजे अगदी तसेच आहे जसे एखाद्याला जीवन साथी हवा असेल आणि त्याच्या हाती तुम्ही एक दगडशिला सोपवून टाकावी. मानवामध्ये शोधाची जी भावना डोके वर काढते, त्याची कारणे मानवी अंतःकरणात अगदी खोलवर रूजली आहेत, हे स्पष्ट आहे. तो एका अशा अस्तित्वाच्या शोधात आहे ज्याने संपूर्ण विश्व व्यापले असावे. सदर इच्छेचे उत्तर एखाद्या भौगोलिक सीमाक्षेत्रात मिळणे अशक्य आहे. राष्ट्रभक्तीच्या या गोष्टी जास्तीत जास्त एका समाज निर्मितीकरिता सहाय्यक असू शकतात परंतु मानवाच्या उपास्या संदर्भातील असणार्या त्या तहान व भावनेची त्या तृप्ती करू शकत नाहीत. त्याकरिता एका विश्वव्यापी अस्तित्वाची गरज आहे. आपल्या श्रद्धा व प्रेमभावनेचे केंद्ररूपात मानवाला एक असे अस्तित्व हवे आहे ज्याने जमीन व आकाश निर्मिले आहे. स्वतःच्या आश्रयाकरिता त्याला एका अशा शक्तीचा शोध आहे, जी कोणाची गरजू-मोताद नसावी, जी संपूर्ण सृष्टीची सत्ताधीश असावी. जोपर्यंत मनुष्याला असे एखादे अस्तित्व भेटत नाही, तोपर्यंत त्याच्यातील शून्यत्व – पोकळी वा एकांतवास यथावत शिल्लक राहील, कोणत्याही अन्य गोष्टीने ते भरून निघणार नाही.
  5. अंतिम परिणामाचा शोध
  6. सत्याच्या शोधासंदर्भात तिसरा भाग आहे आपला शेवट अथवा आपल्या अंतिम परिणामाचा शोध. आपण कोठून आलो आहे व कोठे जाणार आहोत हे जाणून घेण्याची मानवाची इच्छा आहे. आपल्या अंतःकरणात अनेक इच्छा आकांक्षा, अनेक अभिलाषा तो बाळगतो. या इच्छा आकांक्षा आणि या अनंत अभिलाषा कशा प्रकारे पूर्ण होतील, हे तो जाणू इच्छितो. या वर्तमान मर्यादित जीवनाव्यतिरिक्त एक दीर्घकालीन जीवन त्यास हवे आहे परंतु ते कोठे भेटेल याबद्दल तो अनभिज्ञ आहे. त्याच्या आतमध्ये बर्याच नैतिक भावना आणि मानवी संवेदना आहेत ज्याना या जगात वाईट प्रकारे पायदळी तुडविले जात आहे. काय आपण आपल्या पसंतीची दुनिया कधीच प्राप्त करू शकणार नाही ? असा प्रश्न त्याच्या अंतर्मनात निर्माण होतो. हे आणि अशा प्रकारचे प्रश्न मानवी अंतर्मनातून कशा प्रकारे उसळत असतात आणि विश्वाचे निरीक्षण अध्ययन कशा प्रकारे त्याच्या मनमस्तिष्कात हे प्रश्न उभे करतात, याचे या ठिकाणी थोडे तपशीलवार वर्णन करणे उचित ठरेल.

    जीवशास्त्रज्ञांच्या मतानुसार मनुष्य, आपल्या सद्य रूपात तीन लाख वर्षापासून पृथ्वीवर अस्तित्व करून आहे. याच्या तुलनेने विश्वाचे आयुष्य हे फार जास्त आहे, अर्थात दोन लाख अरब वर्षे. या आधी विश्व, विद्युत कण रूपी एका धुळीच्या धूसर लोटासमान होते, तद्नंतर त्यामध्ये हालचालीची क्रिया घडली आणि पदार्थ वाह्त जाऊन भिन्न भिन्न ठिकाणी साचण्यास सुरुवात झाली. हाच तो साठलेला पदार्थ आहे ज्यास आपण तारे, ग्रह वा नक्षत्र संबोधितो. पदार्थाचे हे अवशेष गॅसरूपी भयानक गोळ्याच्या रूपात अगणित युगानुयुगे आकाशात भ्रमण करीत राहिले. सुमारे दोन अरब वर्षापूर्वी असे घडले की विश्वामधील कोणता तरी मोठा तारा भ्रमण करीत करीत सूर्याच्या जवळ येऊन ठेपला, जो त्या समयी आजच्या पेक्षा आकाराने फार मोठा होता. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे ज्याप्रमाणे समुद्रात उंचच्या उंच लाटा निर्माण होतात, तसे त्या दुसर्या तार्याच्या आकर्षणाने आपल्या सूर्यावर एक फार मोठे वादळ निर्माण झाले, जबरदस्त लाटा निर्माण झाल्या, ज्या हळूहळू जास्त उंच होत गेल्या आणि या आधी की तो तारा सूर्यापासून दूर हटू लागावा, त्याची आकर्षण शक्ती इतकी जास्त वाढली की सूर्याच्या त्या प्रचंड गॅसरूपी लाटा पैकी काही भाग विलग होऊन एका झटक्यासरशी अवकाशात दूरवर निघून गेला. नंतरच्या काळात थंड झाल्यानंतर हेच सूर्यमालेचे सदस्य बनले. सद्य समयी हे सर्व निखळलेले भाग सूर्याभोवती परिभ्रमण करीत आहेत आणि त्यापैकीच एक आपली पृथ्वी होय.
    सुरुवातीस पृथ्वी एका ज्वालाग्रही रूपात सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत होती, तद्नंतर वातावरणात निरंतर उष्मा सोडल्याने थंड होण्यास सुरुवात झाली. ही प्रक्रिया करोडो वर्षापर्यंत चालू राहिली. सरतेशेवटी पृथ्वी अगदी थंड झाली. तरीही सूर्याची उष्णता पृथ्वीवर पडत असल्याने वाफा निर्माण होण्याची क्रिया सुरु झाली आणि ढगांच्या स्वरुपात वायू मंडलावर ती वाफ आच्छादली गेली. तद्नंतर या ढगांचा वर्षाव सुरु झाला आणि पृथ्वी पाण्याने भरून गेली. पृथ्वीच्या पृष्ठभाग तर थंड झाला होता. परंतु तिचा आतील भाग अद्यापही उष्ण – गरम होता. त्याचा असा परिणाम निघाला की पृथ्वी आकुंचन पावू लागली. परिणामस्वरुप पृथ्वीच्या तळातील उष्ण वायुरूपी द्रव्यावर दबावात वाढ झाली आणि ते बाहेर पडण्यास उतावीळ झाले. थोड्या थोड्या अवधीने जमीन दुभंगू लागली. ठिकठिकाणी भेगा पडू लागल्या. अशा प्रकारे सागरी वादळे, भयानक भूकंप आणि आगी ओकणारे स्फोट यामध्ये हजारो वर्षे निघून गेली. याच भूकंपामुळे पृथ्वीचा काही भाग वरती उसळून आला आणि काही भाग खाली दाबला गेला. दबलेल्या खालच्या भागात पाणी साचले आणि ते समुद्र बनले. वरती आलेल्या पृष्ठ भागानी द्वीप आणि महाद्वीपांचे रूप धारण केले. कोठे कोठे तर हे उंचवटे इतके वरती आले की जणू उंचच्या उंच लाटा निर्माण झाल्या असाव्यात. जगातील ही पहिली पर्वते होत.
    भूगर्भशास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनानुसार एक अरब तेवीस करोड वर्षापूर्वी प्रथमतः पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पत्ती झाली. लहान सहान जंतूंच्या रूपात पाण्याच्या किनार्यावर यांचा जन्म झाला. तद्नंतर भिन्न भिन्न प्रकारचे जीवजंतू जन्मत राहिले व नष्ट होत गेले. कित्येक हजार वर्षापर्यंत जमिनीवर केवळ पशू प्राणी यांचे अस्तित्व राहिले. त्यानंतर समुद्री रोप आढळू लागले आणि जमिनीवरही गवत पसरण्यास सुरुवात झाली. अशा प्रकारे दीर्घ कालावधीपर्यंत असंख्य घटना घडत राहिल्या येथपर्यंत की मानवी जीवनाकरिता अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आणि भूतलावर मनुष्याचा जन्म झाला.१
    उपरोक्त विचारसरणीनुसार मानवी जीवनाचा आरंभ गेल्या तीन लाख वर्षापूर्वी झाला आहे. हा अवधि अत्यंत कमी आहे. वेळ कालावधीचा जो दीर्घ पल्ला सृष्टीने गाठला आहे, ते पाहता मानवाचा इतिहास डोळ्याच्या पापण्या लवविण्यापेक्षाही जास्त लांबचा नाही. मग व्यक्तिशः एका मानवाकडे पाहिल्यास एका मनुष्याच्या आयुष्याची सरासरी शंभर वर्षापेक्षाही जास्त नसल्याचे दिसून येईल. एकीकडे हा प्रसंग डोळ्यासमोर ठेवा आणि मग या विश्वामध्ये मानवापेक्षा श्रेष्ठतर अशा एखाद्या अस्तित्वाचा शोध लागू शकलेला नाही, ही सत्यता पहा.
    पृथ्वी आणि आकाशाच्या कित्येक अरब खरब वर्षांच्या कालानंतर जी उत्कृष्ट निर्मिती अस्तित्वात आली आहे, ती म्हणजे मानव होय. परंतु हे चमत्कारिक अस्तित्व मानव ज्याचे जगात सर्वोच्च स्थान आहे, जो जगातील सर्व विद्यमान वस्तूंपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे, त्याचे आयुष्य हे मोजक्या वर्षाचेच आहे. ज्यांचे अस्तित्व जड पदार्थानी बनले आहे, त्यांचे आयुष्य कित्येक करोडो वर्षांचे असावे आणि आपल्या मृत्यूनंतरही ते शिल्लक रहावेत, परंतु या आधि – भौतिक जड पदार्थांच्या संयोगाने ज्या श्रेष्ठ अस्तित्वाची निर्मिती होते, तिचे आयुष्य केवळ शंभर वर्षे असावे. सृष्टीचा जो सार, परिणाम आहे, सृष्टीपेक्षाही त्याचे वय कमी आहे. विश्वाच्या दीर्घकालीन इतिहासात असंख्य घटना, क्रिया – प्रतिक्रिया काय एवढ्याकरिताच घडल्या होत्या की एका मानवाला काही दिवसाकरिता जन्म देऊन नष्ट करून टाकले जावे?
    पृथ्वीवर आजमितीस जेवढी माणसे आढळतात, त्यापैकी प्रत्येक माणूस सहा फूट उंच, अडीच फूट रूंद आणि एक फूट जाड धरला तर या संपूर्ण जनसंख्येला एका अशा पेटीत जी लांबी रूंदी व जाडीने एक मैल असल्यास, सहजरित्या बंद केले जाऊ शकते. हे सगळे अजब वाटते परंतु हेच सत्य आहे. मग या पेटीला एका समुद्र किनारी नेऊन सावकाशरित्या ढकलून दिल्यास ती पेटी पाण्यात खोलवर जाऊन पडेल. शतके लोटतील. मानववंश आपल्या कफनात निरंतरपणे पडून राहील. मानव या नावाच्या एखाद्या वंशाची येथे वस्ती होती, हे कोणासही माहित पडणार नाही. समुद्रसपाटीवर अशाच प्रकारे नित्यनेमाने वादळांचे आगमन होत राहील, सूर्य अशाच प्रकारे चकाकत राहील, पृथ्वी आपल्या आसाभोवती नित्याप्रमाणे परिभ्रमण करीत राहील, सृष्टीच्या अमर्याद फैलावातील अगणित जग या इतक्या मोठ्या अपघाताला एका सामान्य घटनेपेक्षा जास्त महत्व देणार नाहीत. कित्येक शतकानंतर एक उंच मातीचा ढिगारा शांतपणे साक्ष देत उभा असेल की हे मानवजातीचे थडगे आहे, ज्यात शतकानुशतकापूर्वी एका लहानश्या पेटीत तिला दफन केले गेले होते.
    काय मानवाचे केवळ इतकेच मूल्य आहे, इतकेच त्याचे महत्व आहे? पदार्थाला कांडप करा, दळा वा जाळा, काहीही करा ते नष्ट होत नाही. प्रत्येक स्थितीत ते आपले अस्तित्व कायम राखते (मग ते धातू रूपात असो, द्रव रूपात असो वा वायू रूपात) परंतु मनुष्य जो पदार्थापेक्षा श्रेष्ठतर प्राणी आहे. काय त्याच्याकरिता अमरत्व नसावे ? हे जीवन जे संपूर्ण विश्वाचे सार आहे, काय इतके अवास्तव व मिथ्या आहे की इतक्या सहजतेने त्यास संपुष्टात आणले जाऊ शकते? मानवाने एका भूभागावर मोजक्या दिवसाकरिता जन्म घ्यावा आणि नंतर नष्ट होऊन जावे, काय मानवी जीवनाची हीच सर्वथा कहाणी आहे ? संपूर्ण मानवी ज्ञान, त्याने संपादन केलेले सर्व यश, त्याच्याबरोबर कायमचे नष्ट व्हावे आणि जग त्याच्या मागे अशा प्रकारे शिल्लक रहावे जणू मानवाचे, त्याचे निकट काहीच स्थान नव्हते?
    या अनुषंगाने दुसरी गोष्ट आम्हास ही जाणवते की जीवन हे केवळ वर्तमान जगापुरतेच मर्यादित आहे तर हे असे जीवन आहे ज्याद्वारे आपल्या आशा आकांक्षाची पूर्ती होऊ शकत नाही. मनुष्याची निरंतर जगण्याची इच्छा असते, मृत्यू कोणासही पसंत नाही परंतु जगात जन्मणार्या प्रत्येकाला माहीत आहे की तो अमर नाही. मनुष्य आनंद प्राप्त करू इच्छितो. दुःख यातना आणि हर प्रकारच्या त्रासाविना जीवन व्यतीत करण्याची प्रत्येक मानवाची इच्छा असते. परंतु खर्या अर्थाने काय असले जीवन कोणताही मनुष्य प्राप्त करू शकतो?
    प्रत्येक मनुष्याची इच्छा असते की त्याला त्याच्या आकांक्षापूर्तीकरिता शेवटच्या क्षणापर्यंत संधी मिळावी, आपल्या सर्व इच्छा साकार झाल्याचे तो पाहू इच्छितो परंतु या मर्यादित जगात त्याला असे करणे शक्य नाही. आपण जे काही इच्छितो, त्याकरिता हे जग अगदी अपुरे व अयोग्य वाटते. प्रत्येक पावलावर ते आपल्या मार्गात अडथळा उभा करत असते. एका ठराविक हद्दीपर्यंत जग आपला साथ देते, तद्नंतर आपणास निराश व अपयशी परतावे लागते.
    प्रश्न उद्भवतो, मानवी जीवन केवळ मार्गभ्रष्ट होऊन एका अशा जगात भरकटत आले आहे की काय जे त्याच्याकरिता बनविले गेले नव्हते आणि त्याच्या जीवन, समस्या व हिताशी ते परिचीत नसावे? काय आपल्या इच्छा, आशा – आकांक्षा, भावभावना, अनुभूती, आपले विचार अवास्तव व मिथ्या – खोट्या आहेत – ज्यांचा या जगाशी काहीच संबंध नाही?
    काय आपल्या मनातील सर्व उच्च कोटीचे विचार, कल्पना, विश्वाच्या मार्गापासून विमुख झाल्या आहेत आणि आपल्या मनमस्तिष्कात विनाकारण निर्माण होत आहेत? त्या सर्व जाणिवा, अनुभूती ज्यासह मानवजात गेल्या हजारो वर्षापासून जन्मत आहे व त्या आपल्या उराशी बाळगून प्राप्त न करताच दफन होत आहे, काय त्या अनुभूतींचे कोणतेच लक्ष्य नाही? मानवाच्या अंतःकरणात काय उगाच त्या निर्माण होत असतात, ज्यांचा ना तर भूतकाळात आधार आहे ना तर भविष्यात त्यांचे एखादे मूल्य?
    संपूर्ण विश्वात केवळ मानव हेच एक असे अस्तित्व आहे जे उद्या (Tomorrow) ची कल्पना करते. हे केवळ मानवाचेच वैशिष्टय आहे जो भविष्याबाबतीत विचार करतो, आणि आपले भविष्य उज्जवल बनवू इच्छितो. काही कीटक प्राणी जसे मुंग्या आपल्या भोजनाची साठवणूक करतात किवा बाया -एक पक्षी घरटे बनवितो, यात शंका नाही परंतु त्यांचे हे कार्य अविवेकी स्वरूपात केवळ नैसर्गिक स्वभावानुसार घडते. उद्याकरिता भोजन साठविले पाहिजे, तसेच हवामानापासून बचावाकरिता घरटे बनविले पाहिजे याचा निर्णय त्यांची बुद्धी घेत नाही. मानव आणि अन्य प्राण्या दरम्यान या फरकामुळे स्पष्ट होते की मानवाला इतरांपेक्षा जास्त संधी मिळाली पाहिजे. जनावराकरिता वर्तमान जीवनच जीवन आहे, जीवनाचा भविष्य ते बाळगत नाहीत. मग काय अशाच प्रकारे मानवाच्या जीवनाचेही भविष्य नाही? असे होणे हे प्रकृति विरुद्ध असेल. माणसामध्ये येणार्या उद्याच्या दिवसाची जी कल्पना आढळते, त्याची निकड ही आहे की जीवन त्यापेक्षा बरेच मोठे असावे जितके त्यास आज प्राप्त आहे. मानवास उद्याचा दिवस हवा आहे परंतु त्यास केवळ ‘आज’ देण्यात आला आहे.
    त्याचप्रमाणे जेव्हा आपण सामाजिक जीवनाकडे पाहतो तेव्हा आपणास प्रचंड विरोधाभास दिसून येतो. एकीकडे भौतिक जग आहे, जे आपल्या ठायी अगदी परिपूर्ण दृष्टीस पडते. ते एका निश्चित कायदा बंधनात जखडले आहे. आणि त्याची प्रत्येक गोष्ट आपल्या निर्णायक मार्गाकडे वाटचाल करीत चालली आहे. दुसर्या शब्दात सांगायचे झाल्यास भौतिक जग अशा स्वरुपात आढळते, जसे ते असले पाहिजे, परंतु मानवी जीवनाची स्थिती जशी ती असावयास होती, त्याहून विपरित आहे.
    उघड्या डोळ्यांनी आपण पाहतो की एक मनुष्य दुसर्या मनुष्यावर अन्याय करतो आणि दोघेही अशा अवस्थेत मृत्यू पावतात की एक जुलमी असतो व दुसरा अत्याचारपिडीत. मग काय अत्याचारीला त्याच्या अत्याचाराबद्दल शिक्षा आणि अत्याचारपिडीतास त्याच्या सहिष्णुतेची भरपाई मिळाल्याखेरीज दोघांच्या जीवनाला पूर्ण म्हटले जाऊ शकेल?
    एखादा मनुष्य खरे बोलतो, लोकांचे जे हक्क अधिकार आहेत, ते अदा करतो, त्याच्या परिणामस्वरूप त्याचे जीवन संकटाने वेढले जाते. दुसरा मनुष्य खोटेपणा व दगाबाजीने आपले काम निभावतो, ज्याचे काही हडप करता येते, ते हडप करतो. यामुळे त्याचे जीवन अगदी ऐषआरामात व्यतित होते. जर जग अशाच अवस्थेत संपले तर दोन्ही प्रकारच्या मनुष्याबाबत कोणता निर्णय व्हावा. यावर कोणता उपाय आहे? एक लोकसमूह दुसर्या लोकसमुहावर दरोडा घालतो, त्याच्या साधन सामग्रीवर कब्जा करतो; तरीही जगामध्ये त्याचे नाव लौकिक असते. कारण त्याच्यापाशी प्रचार प्रसारमाध्यमाची सर्व साधने आहेत. आणि या अत्याचारात भरडलेल्या लोकसमुहाच्या स्थितीशी जग अनभिज्ञ राहते. कारण त्याची ही आर्त हाक – विलाप जगापर्यंत पोहचण्याकरिता त्याचेपाशी कोणतेही साधन नाही. मग काय दोहोंचे वास्तविक रूप कधीच प्रकट होणार नाही? दोन व्यक्ती आणि दोन लोकसमुह वा जाती मध्ये एखाद्या बाबतीत मतभेद निर्माण होते आणि जबरदस्त संघर्ष होण्याची पाळी येते. दोघेही आपलीच बाजू खरी असल्याचा दावा करीत असतात आणि परस्परांना तुच्छ सिद्ध करू लागतात. परंतु जगात त्यांचा न्यायनिवाडा होत नाही. मग काय असे एखादे न्यायालय नाही जे त्यांच्या दरम्यान न्यायोचित निवाडा करू शकेल?
    वर्तमान युगाला अणु युग, परमाणु युग म्हटले जाते, परंतु त्यास स्वैराचाराचे युग संबोधिणे अधिक उचित ठरेल. आजचा मानव केवळ आपल्या स्वैराचारी मार्गाने चालू इच्छितो मग त्याच्या इच्छा व त्याचे मत कितीही चुकीचे का असेना. प्रत्येक मनुष्य भरकटलेला आहे, भ्रष्ट आहे. याउपर प्रत्येकजण मीच योग्य मार्गावर असल्याचे पूर्ण कुव्वतीनिशी सिद्ध करीत आहे. वर्तमानपत्रात नेतेमंडळी व शासनकर्त्यांच्या भाषणबाजीकडे पहा. जो तो अत्यंत निर्भयतेने, निर्लज्जपणे आपल्या अत्याचाराला, न्याय सिद्ध करीत असल्याचे आणि चुकीच्या कार्य पद्धतीला उचित सिद्ध करीत असल्याचे दिसून येईल. काय हा पडद्याआडचा सावळा गोंधळ कधीच उजेडात येणार नाही?
    हे जग याकरिता अपुरे असल्याचे वरील गोष्टीवरून स्पष्ट होते. त्याच्या परिपूर्णतेकरिता एक असे जग हवे आहे जेथे, ज्याचे त्याला उचित स्थान मिळू शकेल. भौतिक जड जगात आपण पाहतो की जेथे कोठे शून्यत्व वा पोकळी आढळते तेथे ते भरून काढण्याचा उपाय सापडतो. या जगात कोठेही एखादी उणीव दृष्टीस पडत नाही जेव्हा की माणसाच्या जीवनात प्रचंड शून्यत्व – पोकळी आढळते. ज्या निसर्गाने भौतिक जगाचा पूर्णतया विकास केला, त्याच्याकडे मानवी जीवनाची पोकळी भरून काढण्याचे एखादे साधन नाही का ?
    आपली जाणीव वा अनुभूती काही कर्मांना सत्कृत्य व काही कर्माना दृष्कृत्य समजते. काही गोष्टी घडाव्यात वा काही गोष्टी घडू नयेत असे आपणास वाटते. तरीही आपल्या या उच्च व उदात्त भावनांची गळचेपी होते आहे आणि जगात तेच सर्वकाही घडते आहे ज्यास मानवाचा मूळ स्वभाव वाईट समजत असतो. मानवामध्ये उदात्त भावना समाविष्ट असण्याचा अर्थ हा आहे की जग सत्यावर प्रस्थापित झाले आहे. याठिकाणी अन्याया ऐवजी न्यायाची प्रस्थापना झाली पाहिजे. मग काय पूर्ण न्याय मिळणार नाही वा सत्य प्रकट होणार नाही? भौतिक जगात जी गोष्ट पूर्ण होते आहे, काय ती मानवी जगात पूर्ण होणार नाही?
    हेच ते प्रश्न आहेत ज्यांना, मी वर ‘मानवतेच्या अंतिम परिणामाचा शोध’ म्हटले आहे. एक विवेकी मनुष्य जेव्हा या परिस्थितीला सामोरे जातो तेव्हा अत्यवस्थ होतो. जीवन सर्वस्वी हेच आहे, जिचे स्व चक्षूनी दर्शन घेत आहोत तर ते किती व्यर्थ व निरर्थक आहे, याची तीव्रतेने त्याला जाणीव होते. एकीकडे तो पाहतो की मानवी जीवनाकरिता इतक्या साधन सामग्री उपलब्ध आहेत, जणू सर्वकाही केवळ त्याच्याचकरिता असावे. दुसरीकडे मानवी जीवन इतके मर्यादित व अपयशी आहे की कोणत्या हेतुकरिता त्याचा जन्म झाला आहे हेच त्याला कळत नाही.
    उपरोक्त प्रश्नासंदर्भात अशा प्रकारच्या उपद्व्यापात गुरफटणे व्यर्थ व निरर्थक आहे, या सर्व प्रश्नांचे स्वरूप तात्विक आहे. जीवनाचा जो क्षणही तुम्हास प्राप्त आहे तो आनंदमय करण्याचा प्रयत्न करा, भविष्यात काय होईल अथवा जे काही घडत आहे, ते चुकीचे की बरोबर या भानगडीत पडण्याची आवश्यकता नाही, अशी सर्वसाधारण आज लोकांची विचार प्रवृत्ती आहे.
    याच्या उत्तरादाखल कमीत कमी शब्दात जे सांगितले जाऊ शकते ते हे की जे लोक अशा प्रकारच्या विचारांचे पुरस्कर्ते आहेत, त्यानी अद्याप मानवतेच्या स्थानाला काडीमात्र ओळखले नाही. अवास्तव ऐहिकवादालाच ते सत्य मानतात. अनंत जीवनाचे रहस्य जाणून घेण्यासाठी घटना त्याना आमंत्रित करीत आहेत परंतु क्षणभंगुर जीवनावरच ते संतुष्ट होऊन बसले आहेत. आपल्या इच्छा आकांक्षा, अभिलाषा पूर्तीकरिता एका मोठ्या जगताचा शोध घ्यावा ही मानवी स्वभाव मानसिकतेची निकड आहे. परंतु हे अडाणी, मूर्ख, प्रकाशाऐवजी त्याच्या सावलीवर संतुष्ट आहेत. वर्तमान जग तुमच्याकरिता अपुरे आहे, दुसर्या परिपूर्ण जगताचा शोध घ्या, अशी विश्वाची हाक आहे. परंतु या अपूर्ण विद्यमान जगातच आम्ही आपली जीवनरूपी इमारत उभी करु, आम्हाला परिपूर्ण जगाची आवश्यकता नाही, असा आम्ही निर्णय घेतला आहे. जीवनाचा एक शेवट असला पाहिजे, या गोष्टीकडे परिस्थिती स्पष्ट संकेत करीत आहे परंतु या लोकांनी केवळ आरंभाशी हातमिळवणी केली आहे. आणि अंतापासून डोळे मिटून घेतले आहेत. शहामृगाबाबतचा कथित मूर्खतेचाच हा प्रकार होय.
    खरोखरच जीवनाचा एखादा शेवट आहे तर तो आल्याशिवाय राहणार नाही आणि कोणी त्यापासून अनभिज्ञ असणे हे त्यास प्रतिबंध करण्याचे कारण बनू शकणार नाही. होय, मात्र अनभिज्ञ असणार्याकरिता ते अपयशाचा निर्णय अवश्य बनू शकते. सत्य हे आहे की विद्यमान जीवनाला संपूर्ण जीवन मानणे आणि केवळ वर्तमानालाच आनंदयुक्त बनविण्याच्या प्रयत्नांना आपले उद्दिष्ट समजणे भ्याडपणाची व मूर्खतेची गोष्ट आहे. मनुष्याने आपले जीवन आणि विश्वावर थोडासा जरी विचार केला तर उपरोक्त दृष्टिकोनातील निरर्थकपणा लगेच समोर येतो. सत्यापासून डोळे बंद करणारा आणि एक अविचारी जीवन जगणाराच चुकीचा निर्णय घेऊ शकतो.
    हे ते प्रश्न आहेत, जे विश्वाला पाहताक्षणीच आपल्या मनमस्तिष्कात गांभीर्याने निर्माण होतात. या सृष्टीचा एक सृष्टिकर्ता व निर्माता असला पाहिजे परंतु आपणाला त्याच्या बाबतीत काहीच माहिती नाही. सृष्टिला गती देणारा व सांभाळणारा असला पाहिजे परंतु आपणास ठाऊक नाही की तो कोण आहे. आपण ज्या कोणाच्या उपकाराने उफत झालो आहोत, कृतज्ञता व आभाराची साक्षात प्रतिमा बनून त्या अस्तित्वाचा शोध घेऊ इच्छितो जेणेकरून त्याच्यासमोर आपल्या श्रद्धा, भावना प्रकट करू शकावे. परंतु असले एखादे अस्तित्व आपल्या नजरेस पडत नाही. या विश्वात आपण अगदी लाचार व विवश आहोत. असले आश्रयस्थान जेथे पोहचून आपण स्वतःला सुरक्षित अनुभवू शकू आपणास हवे आहे. परंतु असले आश्रयस्थान आपल्या डोळ्या – समोर नाही. मग जेव्हा आपण आपले जीवन व आपल्या आयुष्यावर नजर टाकतो तेव्हा विश्वाचे आयुष्य खरबो वर्षे असावे आणि मानव, जो या सृष्टिचा सार आहे, त्याचे आयुष्य मात्र मोजकी वर्षे ! हा विश्वाचा विरोधाभास आपल्या डोक्यात शिरत नाही. निसर्गाने आपणास असंख्य इच्छा, आशा – आकांक्षा, अभिलाषांनी भरून टाकावे परंतु जगात त्याच्या तृप्तीच्या साधनांची व्यवस्था करू नये, हे कसे शक्य आहे?
    यानंतर सर्वाधिक मोठा विरोधाभास तो आहे, जो भौतिक जग आणि मानवी जगात आढळतो. भौतिक जग अत्यंत परिपूर्ण आहे. त्यामध्ये कोठे एखादे शून्यत्व, पोकळी किवा उणीव दृष्टीस पडत नाही परंतु मानवी जीवनात प्रचंडरित्या शून्यत्व – पोकळी आढळते. सर्वश्रेष्ठ समजल्या जाणार्या या प्राण्याची अवस्था अखिल प्राणी जगतात दयनीय असल्याचे दृष्टिस पडते. पेट्रोलच्या एखाद्या नव्या खाणीचा शोध लागला किवा शेळ्या मेंढ्याची पैदास वाढली तर यावर आपल्या आनंदाला पारावार उरत नाही. परंतु मानवी वंश वृद्धी आपल्यास खटकते, आपल्याला भेडसावण्यार्या समस्यांनी आपण इतके त्रस्त झालो आहोत की मानवाच्या जन्मावरच बंदी घालू इच्छितो, ही आपल्या दुर्भाग्याची चरमसीमा नव्हे तर आणखी काय?

मानवाची असमर्थता
हे प्रश्न आपणाला चोहोबाजूनी वेढले आहेत. आतून ही आपणास ते पोखरत आहेत आणि बाहेरूनही ग्रासून टाकले आहे. परंतु त्यांची उत्तरे आपणाकडे नाहीत. जीवनाचे सत्य माहिती करून घेण्यासंबंधीचा हा प्रश्न आहे परंतु जीवन तर आपणास मिळाले पण त्याची वास्तविकता आपणास सांगितली गेली नाही, ही अगदी अजब गोष्ट आहे.
या सत्याच्या शोधार्थ जेव्हा आपण आपली बुद्धी आणि आपल्या अनुभवाकडे रूजु होतो तेव्हा त्याचे बिनचूक व स्पष्ट उत्तर मिळविणे, हे आपल्या बुद्धी व अनुभवापलिकडचे असल्याचे उघड होते. या अनुषंगाने आजपावतो आपण जे मतप्रवाह स्थापित केले आहेत, त्यांचे एका अटकळी पेक्षा जास्त महत्व नाही. ज्याप्रमाणे आपली दृष्टी कक्षा सीमित आहे आणि आपण एका विशिष्ट आकारापेक्षा लहान वस्तूना पाहू शकत नाही, त्याचप्रमाणे विश्वाबाबत आपले ज्ञानही एका मर्यादित कक्षेपर्यंत आहे. त्याच्या मागील व पुढील गोष्टींशी आपण अनभिज्ञ आहोत. आपले ज्ञान अपूर्ण आहे. आपल्या पाहणे, ऐकणे, वास घेणे, चव घेणे व स्पर्श करणेच्या शक्ती अत्यंत सीमित आहेत. आपली संवेदनशक्ती एका ठराविक मर्यादेपर्यंत आपला साथ देते. आपण वास्तव पाहू शकत नाही. मैदा आणि काळ्या रंगाच्या पावडरचे मिश्रण केल्यास राखट रंगासारखी पावडर बनते परंतु त्या पावडर मधला एक सूक्ष्म कीटक ज्याचा आकार त्या पावडरच्या बारीक कणा एवढाच असतो आणि ज्यास सूक्ष्मदर्शक यंत्रानेच पाहता येणे शक्य आहे, तो मिश्रणास काळ्या रंगाची व पांढर्या रंगाची पर्वते समजू लागतो. त्याच्या दृष्टीच्या मूल्यमापनानुसार राखट रंगी – मिश्रित पावडरचे अस्तित्वच नाही.
मानवजातीचे जीवन त्यावेळेच्या तुलनेत जेव्हा की पृथ्वी अस्तित्वात आली, इतके सूक्ष्म व संक्षिप्त आहे की त्याची गणना करता येणार नाही. तसेच स्वतः पृथ्वी देखील विश्वरूपी या अथांग सागरात एका बारीक कणासमानही नाही. अशा परिस्थितीत विश्वाच्या वास्तवतेबाबत माणूस, जो विचार वा जी कल्पना करतो, त्यास अंधारात चाचपडण्यापेक्षा जास्त काही म्हटले जाऊ शकत नाही. सृष्टीच्या विस्ताराबाबत कल्पनाविलास करण्याचा प्रयत्न करताक्षणीच आपला परम अडाणीपणा उघडकीस येतो.
हे चित्र जर डोळ्यासमोर ठेवले की सूर्य एशी अरब वर्षापासून अस्तित्वात आहे, पृथ्वीचे वय दोन अरब वर्षे आहे आणि भूतलावर जीवसृष्टीची लक्षणे प्रकट होण्याला तीन करोड वर्षांचा कालावधि लोटला आहे. परंतु त्याच्या तुलनेत पृथ्वीवर विवेकसंपन्न मनुष्याचा इतिहास हा पंधरा वीस हजार वर्षाहून अधिक नाही, तेव्हा काही हजार वर्षातच मानवाने तत्संबधी आपली माहिती गोळा केली असल्याचे सत्य उघडकीस येते. त्याचबरोबर ती माहिती त्या दीर्घ कालावधीचा, जी वस्तुतः सृष्टीचे रहस्य उलगडण्याकरिता हवी आहे, एक अत्यल्प अंशच असल्याचे सत्य समोर येते.
सृष्टीच्या अत्यंत दीर्घ भूतकाळ आणि अनंत रहस्यमय भविष्या दरम्यान मानवी जीवन निव्वळ एका क्षणाचे स्थान बाळगते. आपले अस्तित्व अत्यंत क्षुद्र व मध्यम स्वरुपाचे आहे, ज्याच्या मागचे व पुढचे आपणास ज्ञात नाही. या सृष्टीची विशालता अमर्याद आहे आणि ती समजून घेण्यात आपली बुद्धी व आपला अनुभव हे फार तोकडे आहे, या गोष्टीचा आपल्या बुद्धीला नाइलाजास्तव स्वीकार करावा लागतो. आपणास प्राप्त सीमित क्षमताद्वारे कधीही त्यास आपण समजू शकत नाही. आजपर्यंतच्या प्रयत्नांना आलेले अपयश हे सिध्द करण्यास पुरेसे आहे.
अशा प्रकारे आपले माहितीरूपी ज्ञान व आपले अध्ययन आपणास एका अशा ठिकाणी आणून सोडते जेथे आपल्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित होतात. असले प्रश्न, निश्चितरित्या ज्यांचे उत्तर हवे आहे, ज्या विना मानवी जीवन अगदी व्यर्थ व निरर्थक वाटते. परंतु जेव्हा कधी आपण त्याबाबतीत विचार चितन करू लागतो तेव्हा आपल्या बुद्धी मार्फत त्यांचे उत्तर प्राप्त करू शकत नसल्याचे आपल्या निदर्शनात येते. आपणास ती दृष्टीच प्राप्त नाही ज्याद्वारे सत्याचे दर्शन करणे शक्य व्हावे. त्याचबरोबर तो मेंदू – मस्तिष्क ही आम्हास प्राप्त नाही ज्याद्वारे प्रत्यक्षात सत्य जाणू शकावे.
संबंधित पोस्ट
December 2024 Jamadi'al Ula 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
1 30
2 Jamadi'al Thani 1
3 2
4 3
5 4
6 5
7 6
8 7
9 8
10 9
11 10
12 11
13 12
14 13
15 14
16 15
17 16
18 17
19 18
20 19
21 20
22 21
23 22
24 23
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *