Home A मूलतत्वे A अंतिम दिवसाची सफलताही ‘‘महानसफलता’’ आणि तेथील असफलता ‘‘स्पष्टतोटा’’ आहे

अंतिम दिवसाची सफलताही ‘‘महानसफलता’’ आणि तेथील असफलता ‘‘स्पष्टतोटा’’ आहे

allah

मनुष्याने स्वतः पूर्ण विचाराअंती निर्णय करावा व आपला मार्ग सुनिश्चित करावा की, तो अंतिम दिवशीच्या कोणत्या परिणामास मान्य करतो व त्याचा काय अंत होणार आहे?
आज संपूर्ण जग अत्यंत व्याकूळ आणि अनिश्चित अवस्थेत आहे. कोठेही शांतता दृष्टीस पडत नाही. जगाच्या विविध भागांत युद्धाचे ढग घोंघावत आहेत. युद्ध आणि आक्रमकता आग ओकीत आहे. अधिकारांचे हनन होत आहे. शक्तिशाली शक्तिहीनास आपल्या जोखडामध्ये बांधत आहे आणि शक्तिहीनाची याचना ऐकणारा कोणी नाही. चोहीकडे अन्याय व अत्याचारचे नग्न नृत्य सुरू आहे. आज अन्याय व अत्याचार व्यक्तीचेच नव्हे तर समाजाचे आचरण बनले आहे. नैतिकतेचे मापदंड जे मानवतेच्या गौरवाचे प्रतीक मानले जाते, ते आज पायदळी तुडविले जात आहे. प्रेम, बंधुता, निष्ठा, सहानुभूती, सत्य, सत्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा, तसेच वचनाचे पालन यापासून मनुष्याचे नाते संपुष्टात आले आहे. कधी एखादी चांगली गोष्ट नजरेस पडली तरी ती निष्ठा, निस्वार्थ भावना आणि शुभचितन यापासून रिक्त असते. स्वार्थ, सांप्रदायिक स्वार्थ या गोष्टींनी सुंदरता हिरावून घेतली आहे. चोहीकडे भ्रष्टाचार, चोरी, डकैती, लूटमार, रक्तपात सर्रास सुरू आहे. दारू व नशेच्या वस्तु यांचा वापर वाढत आहे. अश्लीलता, नग्नता ही एक सर्वमान्य बाब झाली आहे. ही बाब चोहीकडे विखुरलेली आहे. ही वाईट प्रवृत्ती वेषांतर करून, नवीन नाव धारण करून समोर येत आहे. गरीब लोक छोट्या स्तरावर तर श्रीमंत मोठ्या स्तरावर यामध्ये लिप्त आहेत. या वाईट प्रवृत्तींनी व्यक्तीच नव्हे तर समाज व राष्ट्र यांनासुद्धा गिळंकृत केले आहे. समस्यांचे निराकरण म्हणजे आतंकवाद, रक्तपात समजण्यात येत आहे. मनुष्य न्यायाच्या प्रती निराश होऊन भयभीत जीवन जगत आहे. ही परिस्थिती बदलण्याची त्याची इच्छा आहे, पण त्याचा मार्ग त्यास माहीत नाही.
या जगात जेव्हा काही वाद किवा बिघाड आढळला जो की आज आहे, त्याचे मूळ मनुष्याने स्वतःच्या निर्माणकर्त्यास विसरणे हे आहे. तो स्वतःला विनावेसनी उंटासारखा स्वतंत्र समजत आहे. तो जो काही विचार करतो तो निर्माणकर्त्यास विसरून. तो कोणतेही कार्य करतांना त्याचे भय मनात बाळगत नाही. परलोक ध्यासातच ही शक्ती आहे की, तो मनुष्यास ईशविमुखतेपासून मुक्ती व त्याच्या दुष्परिणामापासून सोडवू शकतो. अंतिम दिवसावरील विश्वास मनुष्याचे नाते निर्माणकर्त्याशी सशक्त व दृढ बनवतो. याचा अंदाज यावरून येतो की सर्वश्रेष्ठ मानव, अल्लाहचे प्रिय आज्ञाधारक प्रेषित मुहम्मद(स) यांना सांगितले जात आहे की,
‘‘सांगा, अल्लाहला सोडून मी इतर कोणाला आपला पालक बनवू काय? त्या अल्लाहला सोडून जो आकाश व पृथ्वीचा निर्माता आहे. तो उपजीविका देतो, उपजीविका घेत नाही. सांगून टाका, मला तर हाच आदेश दिला गेला आहे की, सर्वप्रथम मी त्याच्यापुढे आज्ञापालनार्थ मान तुकवावी.(आणि सक्त सूचना देण्यात आली आहे की, कोणी अनेकेश्वरवादी होत असेल तर होवो) तू कोणत्याही परिस्थितीत अनेकेश्वरवाद्यांत सामील होऊ नकोस. सांगा, जर मी आपल्या पालनकर्त्याची अवज्ञा केली तर मला भय वाटते की, एका मोठ्या(भयंकर) दिवशी मला शिक्षा भोगावी लागेल. त्या दिवशी जो शिक्षेपासून वाचेल त्यावर अल्लाहने मोठीच दया केली आणि हेच स्पष्ट यश आहे.’’(कुरआन ६ : १४-१६)
निर्माणकर्त्यास विसरणार्याच्या समोर फक्त जग राहते. तो त्या बाबतीतच विचार करतो व युक्ती बनवतो. त्यासाठीच त्याचा संपूर्ण संघर्ष, संकल्पना व योजना असतात. त्यासाठी तो सर्व उचित आणि अनुचित साधनांचा उपयोग करतो. अत्याचार, छळ, कपट, असत्य, भ्रष्टाचार यासारख्या कोणत्याही मार्गाचा वापर करण्यास तो संकोच करत नाही. तो जगाच्या प्राप्तीसाठी हिंस्त्र पशु बनू शकतो. त्याच्याकडून चोरी, डकैती किवा लूटमार व हत्या हे सर्व संभावित आहे.
जगप्राप्ती हेच मनुष्याचे लक्ष्य ठरल्यास तो इच्छा व आकांक्षाचा दास होऊन जातो. ते त्यास जिथे वाटेल तिथे घेऊन जातात. तो पोटाची मागणी व वासनाप्रेरक गोष्टींच्या मागे धावत राहतो. यामध्ये कोणताही अडथळा त्यास सहन होत नाही. याच मार्गावर नग्नता, निर्लज्जता आणि अश्लीलता यांचा भडीमार असतो आणि मनुष्य यामध्ये प्रसन्नतापूर्वक पाशविक जीवन जगू लागतो.
अंतिम दिवसाचा विचारच त्यास जगाचा पुजारी होण्यापासून वाचवू शकतो. त्यासाठी ही बाब अत्यावश्यक आहे की, मनुष्याच्या मनात ही बाब बिबली गेली पाहिजे की, येथील जीवन अल्प आहे, येथील भोगविलास व त्याची सामग्री क्षणिक आहे. येथील सुख-चैन नाशवंत आणि येथील सर्व सुंदरता, आकर्षण हे क्षणिक आहे. याच्या विरुद्ध अंतिम दिवसानंतरचे जीवन शाश्वत व चिरकालीन आहे. तेथील प्रत्येक भेट पतनहीन व शाश्वत आहे. तेथील सुख-चैन आणि भोगविलास अमर्याद आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लालसा किवा अपयश याचे अस्तित्व नाही. तेथे सर्व मनोकामनापूर्तीची व्यवस्था आहे. तेथे सर्व उपलब्ध आहे, जे डोळ्यांनी कधी पाहिले नाही, कानांनी कधी ऐकले नाही आणि ज्याच्या सौंदर्याची कधी कोणी कल्पना केली नाही व करूही शकत नाही. ही धारणा जेव्हा बुद्धीच्या क्षितिजावर प्रकट होईल व त्याचा प्रकाश पसरेल तेव्हा आपोआप हे जग तुच्छ वाटेल, त्याचे सौंदर्य व आकर्षण संपुष्टात येईल. त्यापेक्षा भाबडा कोण असेल जो सर्वकाही माहीत असतांना या नाशवंत संसारापायी शाश्वत अंतिम जीवन सोडून देईल?
कुरआनमध्ये दोन्ही जीवनांचे चित्र असे रेखाटले आहे,
‘‘लोकांकरिता वासनाप्रिय गोष्टी, स्त्रिया, संतती, सोन्या-चांदीचे ढीग निवडक घोडे, पशु आणि शेतजमिनी अत्यंत मोहक बनविल्या गेल्या आहेत. पण या सर्व वस्तू तर क्षणिक ऐहिक जीवनाची सामग्री आहे. खरे पाहता जे सर्वोत्तम ठिकाण आहे, ते अल्लाहजवळ आहे. त्यांना सांगा! यापेक्षा अधिक चांगली वस्तू काय आहे, ते सांगू? जे लोक अल्लाहच्या कोपाचे भय बाळगून वागतील, त्यांच्यासाठी त्यांच्या पालनकर्त्याजवळ उद्याने आहेत ज्यांच्याखालून कालवे वाहत असतील. तेथे त्यांना चिरकालीन जीवन प्राप्त होईल. पवित्र पत्नीं त्यांच्या सोबती असतील आणि त्या अल्लाहच्या प्रसन्नतेने मान्यवर होतील. अल्लाह आपल्या दासांच्या वागणुकीवर देखरेख ठेवतो.’’(कुरआन ३ : १४-१५)
कुरआन वारंवार आठवण करून देतो की, हे जग अर्थहीन आणि अस्थायी आहे. वस्तुतः विश्वास केवळ अंतिम दिवसावर आहे. याकरिता या नश्वर जगासाठी आपल्या परलोकाची विल्हेवाट लावली जाऊ नये, जे की शाश्वत नेहमी कायम राहणार आहे.
कुरआन म्हणतो की,
‘‘जे काही तुम्हा लोकांना दिले गेले आहे, ते केवळ जगाच्या क्षणभंगूर जीवनाचा सरंजाम आहे आणि जे काही अल्लाहपाशी आहे ते उत्तम आहे आणि सदैव राहणारेदेखील. ते त्या लोकांसाठी आहे ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि जे आपल्या पालनकर्त्यावर विश्वास ठेवतात.’’(कुरआन ४२: ३६)
हीच गोष्ट अन्य प्रकारे अशी आहे की,
‘‘जे काही तुमच्यापाशी आहे ते समाप्त होऊन जाणार आहे व जे काही अल्लाहजवळ आहे तेच बाकी राहणार आहे आणि आम्ही जरूर संयम बाळगणार्यांना त्याचे मोबदले त्यांच्या उत्तम कर्मानुसार देऊ.’’(कुरआन १६ : ९६)
अंतिम दिवसाची सफलता ही ‘‘महान सफलता’’ आणि तेथील असफलता ‘‘स्पष्ट तोटा’’ आहे. ती व्यक्ती सफल आहे जी ही ‘‘महान सफलता’’ प्राप्त करेल व ती अत्यंत तोट्यात आहे जी असफल होईल. तिच्यासाठी सफलतेचे सर्व मार्ग बंद होतील.
‘‘प्रत्येक जीवास मृत्युची चव चाखायची आहे. तुम्ही सर्वजण आपापले पुरेपूर मोबदले अंतिम दिवशी प्राप्त करणार आहात. यशस्वी खर्या अर्थी तोच आहे जो तेथे नरकाग्नीपासून वाचेल व स्वर्गामध्ये दाखल केला जाईल. उरले हे जग तर ही केवळ एक भुरळ पाडणारी बाब आहे.’’(कुरआन ३ : १८५)
त्या दिवशी सफल होणार्यांशी असफलांच्या बाबतीत असे सांगितले जाईल की,
‘‘आणि वजन त्या दिवशी अगदी बरोबर असेल. ज्यांचे पारडे जड असेल तेच सफलता प्राप्त करणारे असतील आणि ज्यांचे पारडे हलके असेल तेच स्वतःला नुकसानीत टाकणारे असतील, कारण ते आमच्या संकेतवचनांशी अत्याचारी वर्तन करीत राहिले होते.’’(कुरआन ७ : ८-९)
हेच खरे सत्य आहे जे की नेहमी समोर असावयास हवे. याचा विसर पडल्यास अंतिम दिवसाची शाश्वत सफलतेची संभावना समाप्त होते आणि केवळ असफलताच शिल्लक राहते.
आजच्या जगातील विकृतीस सतत नवनवीन कायदे करून संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु विकृती(बिघाड) कायद्यांद्वारा संपविला जाऊ शकत नाही. कायदा प्रेम, सहानुभूती आणि निष्ठा निर्माण करू शकत नाही. याद्वारे मन जोडले जाऊ शकत नाही. न्यायाच्या स्थापनेसाठी कायद्याची मदत होऊ शकते, पण त्याद्वारे अन्याय व अत्याचार पूर्णतः समाप्त केला जाऊ शकत नाही. कारण मनुष्य जगातील प्रत्येक कायद्याचे उल्लंघन करण्याचे उपाय शोधू शकतो व त्यापासून मुक्तीचे पर्याय काढू शकतो. सत्य बाब तर ही आहे की, जगातील विकृती आणि वाद याचे निराकरण यामध्येच आहे की, मनुष्याच्या मनामध्ये अंतिम दिवसावर पूर्ण विश्वास असावा व तो सतत त्याच्या मनात तरंगत असावा. त्याला परलोक ध्यास असावा. त्याने या सत्याचा स्वीकार केला पाहिजे की, तो निर्माणकर्त्याचा आज्ञाधारक आहे. त्याचे आज्ञापालन त्यास बंधनकारक आहे. त्याने त्याच्या आज्ञेचे पालन केले, तर तो अल्लाहच्या कृपेस पात्र राहील व त्याच्या बक्षिसांनी अलंकृत होईल. जर त्याने अवज्ञा केली तर तो जगात त्याच्या शिक्षेपासून वाचून जाईल, पण अंतिम दिवशी यापासून वाचणार नाही. त्या ठिकाणी त्यास आपल्या करणीची शिक्षा भोगावीच लागेल. या धारणांचा प्रभाव व त्यामुळे मनुष्याचे आचरण, व्यवहार यामध्ये होणारी क्रांती याचे उदाहरण इतिहासात सुरक्षित आहेत. आज पण त्या गौरवशाली इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते.
हा एक अशा लोकसमूहाचा इतिहास आहे ज्याच्याकडे हत्या आणि रक्तपात, चोरी आणि डकैत, व्याभिचार, दुष्कर्म, दारू पिणे, जुगार खेळणे यासारखे अपराध सर्वमान्य होते. निर्माणकर्ता प्रभुच्या आणि अंतिम दिवसाच्या भयाने त्या लोकसमूहाचा कायापालट करून टाकला. त्या लोकसमूहाने या अपराधांपासून अशा रीतीने क्षमायाचना केली की, त्याकडे फिरकून पाहणेसुद्धा मान्य केले नाही. त्यांच्याकडे जीव, वित्त आणि अब्रू याविषयी सन्मान निर्माण झाला आणि पाहता पाहता पवित्रता, स्वच्छता, विश्वासू ठेवीदार, सत्य तसेच नशा निर्माण करणार्या वस्तूंचे पथ्य यासारखे सद्गुण निर्माण झाले. अपराधांचे प्रमाण इतके कमी झाले की, प्रेषित मुहम्मद(स) आणि चार आदर्श खलीफा यांच्या काळात त्याचे तुरळक उदाहरण आढळते. संपूर्ण समाज सुरक्षित व शांत आढळून येतो. मग हाच विखुरलेला लोकसमुदाय कोणाच्या कायद्याच्या बंधनात अडकणे अशक्य होते. परंतु त्या कायद्याचा एवढा सन्मान करणारा बनला की, तसे उदाहरण मानवी इतिहासात मिळत नाही. अंतिम दिवसाच्या यातनांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कायद्यासमोर शरणागती पत्करणे आणि स्वतःचा जीव देणे त्यांच्यासाठी सहज झाले. ही गोष्ट खालील उदाहरणांवरून स्पष्ट होते.
प्रेषित मुहम्मद(स) मस्जिदमध्ये बसलेले आहेत. त्याच वेळी माननीय माइज बिन मलिक(र) त्यांच्या सेवेत हजर होतात व विचारतात की, ‘‘हे प्रेषित! माझ्याकडून व्याभिचारसारखा गुन्हा घडला आहे. मला पापमुक्त करा!’’ प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्यांच्याकडून आपले तोंड फिरवून घेतले. त्या व्यक्तीने समोर येऊन आपली गोष्ट पुन्हा सांगितली. प्रेषितांनी त्या बाजूनेही आपले तोंड फिरवून घेतले. पुन्हा ती व्यक्ती त्या बाजुला पोहचली. या प्रकारे त्या व्यक्तीने चार वेळेस आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यावर प्रेषित म्हणाले,
‘‘कदाचित तुम्ही चुंबन घेतले असेल किवा डोळ्यांनी इशारा केला असेल किवा पाहिले असेल व त्यास व्याभिचार समजत आहात!’’ त्या व्यक्तीने सांगितले की, ‘‘नाही, असे नव्हे तर मी प्रत्यक्षात व्याभिचार केला आहे. आपण मला पापमुक्त करावे.’’ प्रेषितांनी आपल्या सहकार्यांद्वारे त्या व्यक्तीच्या नातेवाईकांकडून ही माहिती घेतली की, ही व्यक्ती वेडी तर नाही ना? माहीत झाले की, ती वेडी नाही. प्रेषितांनी सांगितले की, ‘‘याने दारू तर प्राशन केली नाही ना?’’ एका व्यक्तीने तिच्याजवळ जाऊन वास घेतला. तिच्यापासून दारूचा गंध येत नव्हता. प्रेषितांनी विचारले की, ‘‘तुमचे लग्न झाले आहे का?’’ त्याने सांगितले ‘‘होय.’’
माईजच्या मृत्युनंतर कोणी म्हणे की, ही व्यक्ती स्वतःच्या वाईट कृत्यामुळे मारली गेली, तर कोणी तिच्या प्रायश्चित्ताची प्रशंसा केली. दोन-तीन दिवस यावर चर्चा होत राहिली. त्यावर विचार प्रकट होत राहिले. त्यानंतर प्रेषित मुहम्मद(स) आपल्या सहकार्यांच्या सभेत आले आणि सांगितले की, ‘‘माईजसाठी मुक्तीची प्रार्थना करा, त्याने असे प्रायश्चित्त केले आहे जे की, सर्व समाजात वाटप केले तर ते सर्वांसाठी पुरेसे होईल.’’(हदीस मुस्लिम)
याच प्रकारे ग्रामीण समुदायाची एक स्त्री प्रेषित मुहम्मद(स) यांच्या सेवेत हजर होऊन निवेदन करते की, ‘‘मला पापमुक्त करा.’’ प्रेषित मुहम्मद(स) यांनी सांगितले, ‘‘तुझे वाईट होओ! जा ईश्वराशी क्षमा माग आणि प्रायश्चित्त कर.’’ तिने सांगितले, ‘‘कदाचित आपण मलाही त्याच प्रकारे परतवीत आहात ज्या प्रकारे सुरुवातीला माइजला परतविले होते किवा आपणास वाटते की, मी भविष्यात आपल्या जबानीचा अस्वीकार करीन. माझी तर गर्भधारणाही झाली आहे.’’ प्रेषित म्हणाले, ‘‘ठीक आहे जा, बाळाच्या जन्माची प्रतीक्षा कर.’’
एका व्यक्तीने त्या बाळाच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. बाळाच्या जन्मानंतर त्याची सूचना त्या व्यक्तीने प्रेषितांना दिली की, गर्भवती स्त्रीचे बाळ जन्मले आहे. प्रेषितांनी सांगितले की, ‘‘आम्ही तिला मृत्यदंड करावा आणि त्याच्या छोट्या बाळास अशा परिस्थितीत सोडून द्यावे की, त्यास दूध पाजणारा कोणी नसावा, असे होऊ शकत नाही. ‘‘एका व्यक्तीने सांगितले की, ‘‘हे प्रेषित! त्यास दूध पाजण्याची जबाबदारी मी स्वीकारतो.’’
हदीस कथन आहे की, प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्या स्त्रीस सांगितले की, ‘‘जा त्या बाळाच्या दूध पिण्याच्या वयापर्यंत त्यास दूध पाज.’’ सरतेशेवटी बाळाचे दूध सुटल्यानंतर ती त्या बाळास घेऊन आली. बाळाच्या हातात भाकरीचा तुकडा होता. तिने सांगितले की, ‘‘हे प्रेषित! बाळाने दूध सोडून दिले आहे. तो जेवू लागला आहे.’’ प्रेषितांनी त्या बाळास एका व्यक्तीकडे सुपूर्द करून तिला मृत्यूदंडाची शिक्षा दिली.
त्या स्त्रीच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करताना माननीय खालिद बिन वलीद(र) यांच्या तोंडावर रक्ताचे शितोळे उडाले तेव्हा त्यांच्या तोंडून तिच्या विरोधात काही अपशब्द निघाले. हे ऐकल्यानंतर प्रेषित मुहम्मद(स) यांनी सांगितले की, ‘‘खालिद! थांबा! उताविळेपणामध्ये चुकीचे बोलू नका. या स्त्रीने असे प्रायश्चित्त केले आहे की, अत्याचारपूर्वक महसूल वसूल करणार्या प्रशासकाने असे प्रायश्चित्त केले तर त्याची मुक्ती होईल.’’ एका प्रचलनात आहे की, माननीय उमर(र) यांनी प्रेषित मुहम्मद(स) समोर निवेदन केले की, तुम्ही एका दुराचारी स्त्रीच्या अंतिम नमाजमध्ये भाग घ्याल काय? प्रेषितांनी सांगितले की, ‘‘तिने तर असे प्रायश्चित्त केले आहे की, ते जर मदीनेतील सत्तर लोकांमध्ये वितरीत केले तर ते त्या सर्वांच्या मुक्तीसाठी परिपूर्ण होईल. यापेक्षा मोठे प्रायश्चित्त काय असू शकते की, तिने आपले प्राण समर्पित केले.’’(हदीस मुस्लिम)
माननीय उम्मे सलमा(र) निवेदन सादर करतात की, प्रेषित मुहम्मद(स) यांच्या समोर दोन व्यक्तींच्या वारसाहक्कासंबंधी प्रकरण आले. दोघांचे म्हणणे होते आपल्याला ही वस्तू वारसाने मिळावी. परंतु दोघांकडे त्यासंबंधी पुरावा नव्हता. प्रेषितांनी सांगितले की, ‘‘असे होऊ शकते की, आपल्यापैकी कोणी एक आपल्या वाकचार्तुयाने ती वस्तु आपली आहे हे सिद्ध करून देईल. पण लक्षात ठेवा की, मी त्याच्या बाजुने निर्णय देईन आणि त्याच्या भावाच्या वाट्याचा वस्तुचा भाग त्याला देऊन टाकीन. तर नरकाचा भाग त्याच्या स्वाधीन करीत आहे.’’ हे ऐकून दोघे सांगू लागले की, ‘‘हे प्रेषित! मी माझा अधिकार सोडून देत आहे. माझा वाटा माझ्या सोबत्याचा आहे.’’ प्रेषितांनी सांगितले की, ‘‘असे नका करू, तर तुम्ही दोघे जा आणि ती वस्तू आपसात वाटून घ्या आणि सत्य व न्याय याची आठवण ठेवा आणि मग वाटा करून एक एक भाग घेऊन टाका. त्यामध्ये काही कमी-जास्त झाल्यास तो परस्परांना वैध घोषित करा.’’(हदीस : अबू दाऊद)
अशा प्रकारच्या भरपूर घटना हदीस आणि इतिहास पुस्तकात नमूद आहेत, ज्या हे सिद्ध करतात की, अंतिम दिवसाची विचारपूस व त्यानुसार दंड किवा पुरस्कार याचे भय मनुष्याच्या मनात कायद्याचा आदर निर्माण करते. याशिवाय कायदा फक्त कायद्याची शोभा वाढवेल. पण व्यक्ती स्वतःस कायद्यास समर्पित करणे किवा त्याचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्त्वावर पाडून घेऊ शकणार नाही. कायद्याचे पालन करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी कायद्याच्या उल्लंघनापासून रोखले जाऊ शकत नाही. कायद्याद्वारा कायद्याचे राज्य निर्माण झाले नाही आणि भविष्यातही होणार नाही.
हेच भय आणि अंतिम दिवसाची पकड यामुळे माननीय उमर(र) यांच्यासारखा न्यायनिष्ठ आणि ईशपरायण शासकसुद्धा अल्लाहच्या कोपाच्या भीतीने कंपित होत असे. एकदा प्रेषित मुहम्मद(स) यांचे सहकारी अबु मूसा अशअरी(र) यांनी माननीय उमर(र) यांच्याकडे मोबदला व पुण्य याबाबत विचारणा केली. यावर उमर(र) म्हणाले की, ‘‘मी अल्लाहपाशी बरोबरीत जरी सुटलो तरी भरपूर आहे.’’(हदीस बुखारी) माननीय अनस(र) म्हणतात की, माननीय उमर(र) एका बागेत गेले. त्यांच्या आणि माझ्या दरम्यान एका भितीचा आडोसा होता. मी ऐकले की, ते बागेत एकांतात सांगत होते की, ‘‘उमर बिन खत्ताब! तुम्ही मुस्लिमांचे शासक आहात! फार चांगले, फार चांगले! ईश्वराशपथ तुम्हाला निश्चित त्याचे भय बाळगून वागावे लागेल अन्यथा तो तुम्हाला दंडीत करेल.(हदीस मुवत्ता इमाम मालिक)
अंतिम दिवसाची ही भावना सर्व व्यक्तींमध्ये जागृत झाल्यास मनुष्याच्या आचार-विचार, चारित्र्य आणि संपूर्ण जीवनावर त्याचे परिणाम दिसू लागतील. त्याच्या प्रकाशाने जीवनाचे प्रत्येक अंग तेजोमय होईल. मनुष्याचा अल्लाहशी वास्तविक संबंध प्रस्थापित होईल. त्याच्या मनास शांती प्राप्त होईल. मनुष्याचे मनुष्यावरील शासन समाप्त होईल. चोहीकडे अल्लाहचे कायदे प्रस्थापित होतील. कायद्याचे उल्लंघन किवा त्याचा अनादर संपुष्टात येईल. कोणतेही कृत्य करण्यापूर्वी मनुष्य एकदा नव्हे तर हजारदा विचार करेल की, ‘‘मृत्यु माझ्या शिरावर उभा आहे आणि अंतिम दिवस जवळच आहे. मला खूप लवकरच जगाच्या निर्माणकर्त्यासमोर उपस्थित होऊन आपल्या कर्माचा अहवाल सादर करावयाचा आहे.’’ याच धारणेमुळे जगाची दिशा बदलून जाईल. जग अन्याय, अत्याचार, दंगली यांपासून मुक्त होईल. मनुष्याच्या सर्व आवश्यक गरजा कोणाचेही हक्क न हिरावता पूर्ण होतील. चोहीकडे शांतता प्रस्थापित होईल. चांगल्या गोष्टीचा प्रसार होईल तर वाईट गोष्टी संपुष्टात येतील आणि गुन्हेगारी जगत मोडीत निघेल. पुण्याईचा सदाबहार ऋतु येईल. नैतिकतेचे चलन वाढेल. अनैतिकता संपुष्टात येऊन मनुष्यास त्याची लाज वाटेल. असे हे नवीन जग किती सुंदर आणि विलोभनीय असेल!

संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *