इस्लामच्या मुलभूत आधारस्तंभांपैकी एक हजसुद्धा आहे. हज विशिष्ट दिवसांत काबागृहाला जाऊन विशिष्ट विधी अदा करण्याचे नाव आहे. उमराहमध्ये जवळजवळ हजसारख्याच विधि हजच्या वेळेला सोडून इतर वेळी अदा करण्यात येतात.
हज व उमराहची मोठी महत्ता वर्णिली गेली आहे. हदीसमध्ये त्याला स्त्रियांचे धर्मयुद्ध (जिहाद) म्हटले गेले आहे. माननीय आयेशा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, ‘‘आम्हीसुद्धा तुम्हा सर्वांबरोबर धर्मयुद्धात सामील होऊ शकतो का?’’ ते म्हणाले,
‘‘तुम्हा स्त्रींयासाठी सर्वांत चांगले व सुंदर धर्मयुद्ध ‘हज्जे मबरूर’ आहे.’’ (बुखारी (किताबुल हज))
एक अन्य कथनात आहे की, माननीय आयेशा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे पृच्छा केली की, ‘‘मला पवित्र कुरआनमध्ये धर्मयुद्धापेक्षा अधिक श्रेष्ठ कार्य दिसत नाही. मग आम्हीसुद्धा तुम्हांसमवेत धर्मयुद्धात (जिहाद) का सामील होऊ नये?’’ प्रेषित उत्तरले,
‘‘नाही, तुम्हा लोकांसाठी सर्वश्रेष्ठ व सुंदर धर्मयुद्ध अल्लाहच्या काबागृहाची यात्रा म्हणजे ‘हब्जे मबरूर’ होय.’’ (जी अल्लाहसाठी केली असावी.) (नसाई (किताब मनासिकिल हज))
अबू हुरैराह (र) यांचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘वृद्ध, लहान मूल, अशक्त व स्त्रीसाठी हज व उमराह ‘जिहाद’ आहे.’’ (मागीलप्रमाणे)
माननीय अबू हुरैरा (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांच्या समवेत त्यांच्या पवित्र पत्नींनीसुद्धा हज केला होता. प्रेषित मुहम्मद (स) यांच्या नंतर माननीय सौदा (र) यांनी हज केला नाही. दुसऱ्या पवित्र पत्नीं हजला जात असत. (तबकाते इब्ने साद – ८ : ५५)
हज्जतुलविदाअ (प्रेषित मुहम्मद (स) यांची अंतिम हज यात्रा) मध्ये दहा हजार सहाबींनी (प्रेषित मुहम्मद (स) यांच्या सोबत्यांनी) प्रेषित मुहम्मद (स) यांच्या समवेत हज अदा केला होता. अंदाज येतो की यात महिला सहाबींचीसुद्धा मोठी संख्या होती. उत्साह व आवड इतक्या प्रमाणात होती की, आजारी, गर्भवती व मुले असलेल्या महिलासुद्धा यात सामील झाल्या होत्या.
जबाआ बिन्ते जुबैर (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्यासमोर निवेदन केले, ‘‘मी हजचा इरादा केला आहे, परंतु मी आजारी आहे.’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले, ‘‘हज करा. ‘इहराम’ (साध्या पांढऱ्या चादरीचा पोषाख, जो हज यात्रेच्या काळात हाजी लोक परिधान करतात. हे लक्षात असावे की, हजच्या काळात शिवलेले कपडे नेसण्याची मनाई आहे.) असा संकल्प करून बांधा की, महान अल्लाह जेथे रोखील तेथेच ‘इहराम’ काढीन. (बुखारी (किताबुन्नकाह), मुस्लिम (किताबुल हज).
माननीय जाबिर (र) म्हणतात की, ‘‘प्रेषित मुहम्मद (स) यांनी हिजरी सन १० मध्ये हजची घोषणा केली. तेव्हा आम्ही सर्वजण हजसाठी रवाना झालो. जेव्हा जुलहुलैफा या ठिकाणी पोचलो तेव्हा तेथे अस्मा बिन्ते उमैस (र) यांना मुहम्मद बिन अबू बकर (र) नावाच्या पुत्राचा जन्म झाला.’’ (मुस्लिम (किताबुल हज), अब दाऊद (किताबुल मनासिक)
माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) ‘रौहा’मध्ये काही स्वारांशी भेटले. त्यांच्यापैकी एका स्त्रीने मूल दाखविले आणि प्रश्न केला की, ‘‘याचा सुद्धा हज होईल का?’’ प्रेषित उत्तरले, ‘‘होय, याचासुद्धा हज होईल आणि याचे पुण्य तुम्हाला लाभेल.’’ (मुस्लिम (किताबुल हज), अब दाऊद (किताबुल मनासिक)
एक अन्सारी महिला उम्मे सिनान हज्जतुलविदाअ (प्रेषितांची अंतिम हज यात्रा) मध्ये सामील होऊ शकल्या नव्हत्या. हजहून परतल्यानतर प्रेषितांनी याचे कारण विचारले. त्या म्हणाल्या, ‘‘आम्हा लोकांजवळ दोनच उंटिणी होत्या. एकावर माझे पति आणि माझा मुलगा हजसाठी गेले. दुसऱ्या उंटिणीकडून जमिनीला जलसिचन करण्याचे काम घेतले जात होते.’’ प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘बरे तर तुम्ही रमजानच्या महिन्यात उमराह करा. महान अल्लाह हजच्या बरोबरीचे पुण्य प्रदान करील.’’ (बुखारी (अबवाबुल उमरा), मुस्लिम (किताबुल हज)
आणखी एक महिला ज्यांचे नाव उम्मेमाकल होते, त्यासुद्धा त्यावेळी हजला जाऊ शकल्या नव्हत्या. प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांनासुद्धा रमजान महिन्यात उमरा करावयास सांगितले. (अबू दाऊद (किताबुल मानसिक या घटनेच्या विवरणात मतभेद आहेत. पहा औतुल माबूद – २ : १५०-१५१. असे शक्य आहे की, उपरोक्त दोन्ही कथन एकाच प्रसंगासंबंधी असावेत. जास्त शक्यता अशी आहे की, हे दोन्ही वेगवेगळे प्रसंग असतील. हाफिज इब्ने हजर (र) म्हणतात की, त्या महिलेच्या आडनावात मतभेद असेल अथवा अशाच अनेक घटना घडल्या असंतील आणि हीच गोष्ट अधिक योग्य वाटते. (अल इसाबा फी तमईजिस्सहाबा – ४ : ९९)
अशा प्रकारे ज्या महिला इच्छा करूनदेखील हजला जाऊ शकल्या नव्हत्या, त्यांना प्रेषित मुहम्मद (स) यांनी उमराह करण्याची प्रेरणा दिली. हजच्या बाबतीत स्त्रियांना सवलती उपलब्ध करुन देणे आणि त्यांच्या अडचणी दूर करण्याचासुद्धा आदेश दिला आहे. स्त्रिया ‘महरम’ (‘महरम’ अशा व्यक्तीला म्हणतात, ज्याच्याशी एखाद्या स्त्रीचा विवाह निषिद्ध अथवा वर्ज्य आहे. जसे भाऊ, चुलता, मामा, आजा, पुत्र वगैरे.) शिवाय हज करू शकत नाहीत. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र) म्हणतात की, एका माणसाने प्रेषित मुहम्मद (स) यांना सांगितले, ‘‘माझी पत्नी हजला जाऊ इच्छिते आणि मी युद्धात सामील होण्यासाठी माझे नाव नोंदले आहे.’’ प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले ‘‘तू आपल्या पत्नीसमवेत हजला जा.’’ (बुखारी (अबवाबुल उमरह), मुस्लिम (किताबुल हज))
स्त्रिया स्वतःकडूनही हज करीत असत व आवश्यक झाल्यास दुसऱ्याकडूनही करीत असत.
माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र) म्हणतात की, जुहैना टोळीची एक स्त्री प्रेषित मुहम्मद (स) यांना म्हणाली की, माझ्या आईने हजला जाण्याचा नवस केला होता. परंतु हज करण्यापूर्वीच तिचे देहावसान झाले. मी तिच्यातर्फे हज करू शकते काय ? प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले,
‘‘तिच्यातर्फे हज करा. जर तुमच्या आईवर कर्ज असते, तर तुम्ही ते अदा केले नसते का ? अल्लाहचेसुद्धा कर्ज अदा करा. अल्लाहचा हा जादा अधिकार आहे की, त्याचे कर्ज अदा केले जावे.’’
माननीय फजल बिन अब्बास (र) म्हतात की, खसअम टोळीच्या एका स्त्रीने प्रेषित मुहम्मद (स) यांच्या समोर आपली व्यथा व्यक्त केली,
‘‘अल्लाहने आपल्या सेवकांवर हज अनिवार्य केले आहे. ही अनिवार्यता माझ्या वडिलांवरदेखील येते. परंतु ते फार वयस्क आहेत. वाहनावर बसू शकत नाहीत. जर मी त्यांच्यातर्फे हज केले तर त्यांचा फर्ज अदा होईल का ?’’ ते म्हणाले, ‘‘होय, अदा होईल.’’ (बुखारी (अबवाबुल उमरह), मुस्लिम (किताबुल हज))
धर्माचरणात कठोरता व सक्ती नापसंत आहे. एका महिलेने हजसंबंधी असाच व्यवहार अवलंबिला तेव्हा प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यास मनाई केली.
उक्बा बिन आमिर जुहनी (र) म्हणतात की, माझ्या बहिणीने नवस केले होते की, मी काबागृहाला पायी जाऊन त्याचे दर्शन घेईन. बहिणीने मला सांगितले की यासंबंधी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे पृच्छा करावी. मी विचारणा केली तेव्हा प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘याची गरज नाही.’’ त्यांनी पायीही चालावे व वाहनाचासुद्धा उपयोग करावा. (एका कथनात आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी या नवसाचे प्रायश्चित्त (करणारा) करण्यास सांगितले.)
उक्बा बिन आमिर जुहनी (र) म्हणतात की, माझ्या बहिणीने नवस केले होते की, मी काबागृहाला पायी जाऊन त्याचे दर्शन घेईन. बहिणीने मला सांगितले की यासंबंधी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे पृच्छा करावी. मी विचारणा केली तेव्हा प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘याची गरज नाही.’’ त्यांनी पायीही चालावे व वाहनाचासुद्धा उपयोग करावा. (एका कथनात आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी या नवसाचे प्रायश्चित्त (करणारा) करण्यास सांगितले.)
हजच्या प्रवासाला हदीसमध्ये महान अल्लाहच्या मार्गात प्रवास म्हणून संबोधले गेले आहे आणि असेही म्हटले गेले आहे की, महान अल्लाह हाजी लोकांची प्रार्थना स्वीकारतो. म्हणून त्यांच्याकडून प्रार्थना करण्याची प्रेरणा दिली गेली आहे. एका प्रसंगी उम्मे दरदा (र) यांनी माननीय सफवान यांना विचारले की, आपली हजला जाण्याची इच्छा आहे काय? त्यांनी सांगितले, ‘‘होय’’ माननीय उम्मे दरदा (र) यांनी त्यांना विनंती केली की, ‘‘आमच्या कल्याणासाठीसुद्धा प्रार्थना करा.’’ ते अशासाठी की प्रेषित मुहम्मद (स) यांनी म्हटले आहे की,
जो मनुष्य आपल्या भावासाठी त्याच्या अपरोक्ष जी प्रार्थना करतो ती स्वीकारली जाते. त्याच्या उशाशी एक फरिश्ता (देवदूत) त्याच्या प्रार्थनेवर आमीन (असेच होवो) म्हणत असतो. आणि असे म्हणतो की, महान अल्लाहने तुमचेही असेच कल्याण करावे. माननीय सफवान म्हणतात की, मी तेथून निघालो तर माननीय अबू दरदा (र) यांच्याशी भेट झाली. त्यांनीसुद्धा प्रेषित मुहम्मद (स) यांचे असेच कथन असल्याचे सांगितले.
0 Comments