वैराग्य इस्लामला मान्य नाही. इस्लामला वरील तीन संकल्पनांपैकी प्रथम संकल्पना अजिबात मान्य नाही. इस्लामची तत्त्वे या संकल्पनेच्या पूर्ण विरोधात आहेत. इस्लामची आचारप्रणाली, श्रध्दा आणि मूलकर्तव्ये सर्वप्रथम या संकल्पनेच्या विरोधात जातात. त्याची स्पष्ट कारणे खालीलप्रमाणे आहेत.
१) इस्लाम धर्मात अल्लाहबद्दलची संकल्पना ही फक्त ‘खरा प्रियतम’ची नाही तर ती ‘खरा मालक’ आणि ‘खरा कायदे करणारा’ अशी आहे. जर अल्लाहला फक्त ‘खरा प्रियतम’ मानले तरच वैरागी आणि संन्यासी जीवन पुढे येते. परंतु इस्लामच्या जीवनपध्दतीत अल्लाह मालक, शासक आणि पालक आहे. अल्लाहजवळ त्याच्या निर्मितीसाठी काही कायदे आणि दिव्य मार्गदर्शन आहे. म्हणून मनुष्याने फक्त अल्लाहच्या प्रेमात अथवा अल्लाहच्या भीतीपोटी स्वतःला विसरून जाणे पुरेसे नाही. तर हे तितकेच महत्त्वाचे आहे की त्या व्यक्तीने आचरणातून स्वतःला अल्लाहचा आज्ञाधारक सिध्द करण्यासाठी अल्लाहच्या ईशआदेशांचे पालन करावे.
२) इस्लामच्या मूलतत्त्वांना आचरणात आणण्यासाठी सामाजिक जीवन अत्यावश्यक आहे. संन्यासी संकल्पनेत सार्वजनिकतेला अजिबात थारा नाही. इस्लामच्या मुख्य कर्तव्यांना जर जीवनव्यवहारात पार पाडले जात नसेल तर अशा व्यक्तीकडून इस्लाम पूर्ण रूपात आपल्या जीवनव्यवहारात आचरणात आणणे अशक्य आहे.
३) इस्लामचे आधारस्तंभ हे सर्व खरे तर प्रार्थनेच्या स्वरूपात आहेत. परंतु त्याच वेळी त्या प्रार्थनेत अनेक सामाजिक मूल्ये आणि राष्ट्रीय व्यवहार्यता समाविष्ट असतात. म्हणूनच इस्लामचे आधारस्तंभ (प्रार्थना) वैयक्तिकरित्या नव्हे तर सामुदायिकरित्या अदा केले जातात. एकीकडे इस्लामच्या मूळ कर्तव्यामुळे इस्लामी चरित्र जे साकार होते ते संन्यास, वैराग्य आणि सर्वसंग परित्यागच्या विरुध्द आहे. दुसरीकडे व्यक्तीजर सामुदायिकरित्या (जमात) नव्हे तर एकटाच दररोजची नमाज अदा करत असेल आणि जकात देत असेल तर यामुळे इस्लामला अभिप्रेत आणि अपेक्षित परिणाम मुळीच मिळणार नाहीत. अशा परिस्थितीत, अधिक काय सांगावे, प्रार्थनेचे उच्च टोक जरी एखाद्याने पटकावले तरी अल्लाहच्या उपासनेचा हक्क पूर्णतः ती व्यक्ती पार पाडूच शकत नाही.
४) इस्लामच्या पाच मुख्य कर्तव्यांना इस्लामचा आधार स्तंभ म्हटले आहे आणि ‘पूर्ण इस्लाम’ असे संबोधण्यात आलेले नाही. हे सत्य येथे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. याचाच अर्थ असा होतो की इस्लामची ही पाच मुख्य कर्तव्ये म्हणजे इस्लाम नव्हे. आणखी काही प्रमुख बाबींचा समावेश त्यात आहे. इमारत स्तंभाविना उभी राहिली असे आपण म्हणू शकत नाही. इमारतीचे आधारस्तंभ म्हणजेच इमारत हे म्हणणे सुध्दा चुकीचे त्याच प्रमाणे इस्लामची पाच आधार स्तंभ म्हणजे पूर्ण इस्लाम नव्हे. एखाद्याच आधारस्तंभाला (उदा. नमाजला) फक्त इस्लाम कदापि म्हटले जाऊ शकत नाही. इमारत खांब, भिती आणि छत मिळून तयार होते. त्याचप्रमाणे इस्लाम धर्माचे आहे. इस्लाम धर्माचे छत हे त्याची शिकवण आहे जी पाच मूळ कर्तव्यांसोबत जीवनव्यवहारात आचरणात आणली जाते. त्यांना वैयक्तिकरित्या (एकटे) आचरणात आणणे हे तितकेच कठीण कृत्य आहे जितके वाळूत पोहणे. एकटेपणा हा इस्लामला पूर्ण न्याय देऊच शकत नाही. सामुदायिकपणा हा इस्लामच्या कर्मशीलतेचा गाभा आहे. इस्लामच्या पाच मूलतत्त्वांना (मूलाधार) पूर्ण न्याय देणे आणि इस्लामला पूर्णतः कृतीशील आचरणात आणणे या दोन गोष्टी भिन्न भिन्न आहेत. इस्लाम आणि वैराग्य व संन्यासचा दूरदूरचासुध्दा संबंध नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे स्पष्ट म्हणणे आहे,
‘‘इस्लाममध्ये वैराग्याला अजिबात स्थान नाही.’’
एकदा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे उस्मान बिन माजून यांनी स्वतःहून वैराग्य पत्करण्यासाठी परवानगी मागितली तेव्हा नकार देत प्रेषित म्हणाले,
‘‘वैराग्याऐवजी अल्लाहने आपणास एक साधा सरळ मार्ग दिला आहे आणि इब्राहीमचा धर्म दिला.’’
अशा प्रकारे ख्रिस्ती धर्मात वैराग्याला सदाचार आणि ईशभक्तीचा उच्चांक समजला जातो, त्याला इस्लामने रद्दबातल ठरविले आहे. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘आणि त्या सर्वानंतर मरयमपुत्र ईसा (अ.) ला पाठविले आणि त्याला इंजील (बायबल) प्रदान केले, आणि ज्या लोकांनी त्याचे अनुयायित्व स्वीकारले त्यांच्या हृदयात आम्ही करूणा आणि दया घातली, आणि वैराग्य त्यांनी स्वतःच काढले, आम्ही ते त्यांच्यासाठी कर्तव्य म्हणून ठरविले नव्हते, परंतु अल्लाहच्या प्रसन्नतेच्या शोधात त्यांनी स्वतःच ही कुप्रथा (बिदअत) काढली.’’ (कुरआन ५७: २७)
वरील ईशवाणीने हे स्पष्ट झाले की इस्लामच फक्त वैराग्याचा धिक्कार करणारा एकमेव धर्म नाही तर इतर ईश्वरीय धर्म सुध्दा वैराग्याचा त्याग करतात. जो कोणी वैराग्य आणि सन्यास पत्करतो, तो स्वतः आपल्यातर्फे तसे करतो. कोणत्याच ईश्वरी धर्माने वैराग्याचे समर्थन केलेले नाही.
ज्याप्रमाणे ईश्वरी धर्म आणि त्याची मूलभूत तत्त्वे वैराग्याच्या विरोधात आहेत, त्याचप्रमाणे त्या ईश्वरी धर्माची शिकवणसुध्दा वैराग्य तथा संन्यासच्या विरोधात आहे. याचमुळे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अशा सर्व कृत्यांना निषिध्द ठरविले आहे जी वैराग्याशी साम्य राखतात अथवा वैराग्याला प्रोत्साहन देतात. म्हणूनच ब्रम्हचर्य, खच्चीकरण अथवा वैराग्य घेणे, निरंतर उपवास अथवा अन्नत्याग, मौन धारण करणे, रात्रभर जागरण करणे इ. कृत्ये जी शरीराला त्रासदायक आहेत आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या हक्कांना पायमल्ली करणारी आहेत. ही सर्व कृत्ये अवैध ठरविण्यात आली आहेत.
इस्लामचे वैयक्तिक जीवन: दुसरी ही संकल्पनासुध्दा इस्लामला मान्य नाही. इस्लाम काही असा धर्म मुळीच नाही जो ईश्वर आणि मनुष्याच्या संबंधांना वैयक्तिक बाब समजतो. तसे असते तर इस्लामच्या सर्व शिकवणी वैयक्तिक जीवनाच्या समस्या सोडविण्यासाठीच मर्यादित असत्या. मग फक्त मशिदपुरते, उपवासापुरते अथवा काही नैतिक मूल्यांचा फक्त इस्लाम धर्मात उल्लेख असता. परंतु कुरआन आणि हदीसचे प्रत्येक पान अन् पान ग्वाही देत आहे की इस्लाम धर्म फक्त वैयक्तिक बाब नाही. इस्लाम फक्त नमाज अथवा इतर उपासनापध्दतीचे नीतीनियम आणि वैयक्तिक जीवनाचे नीतीनियमच देत नाही. इस्लाम मनुष्यजीवनाच्या सर्व क्षेत्रांत मार्गदर्शन करते. आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, शासकीय, सामाजिक क्षेत्रात कुरआनने मानवी जीवनव्यवहारासाठी नियम आणि मर्यादा घालून दिल्या आहेत. उदा. कुरआन व्यभिचार करणाऱ्याला शंभर फटके देण्याचा आदेश देत आहे. हा ईशआदेश शासनसंस्था, पोलीस आणि न्यायसंस्था यांच्याशी निगडीत आहे. हे सामाजिक कार्य आहे. परंतु कुरआननुसार हे दिव्य प्रकटन ‘अल्लाहचा धर्म आहे.’ कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘व्यभिचारी स्त्री व व्यभिचारी पुरूष दोहोंपैकी प्रत्येकास शंभर फटके मारा, आणि त्यांची कींव करू नका, अल्लाहच्या धर्माच्या बाबतीत जर तुम्ही सर्वश्रेष्ठ अल्लाह आणि अंतिम दिनावर श्रध्दा बाळगत असाल आणि त्यांना शिक्षा देतेवेळेस श्रध्दावंतांचा एक समूह उपस्थित असावा.’’ (कुरआन २४: २)
अशा प्रकारे वरील दिव्य प्रकटना नुसार शंभर फटके व्यभिचारी व्यक्तीला मारणे हा ‘अल्लाहच्या धर्माचा’ एक भाग आहे. हे कृत्य धर्माच्या बाहेरचे मुळीच नाही. त्याच प्रमाणे कुरआन नुसार वर्षातील चार महिने पवित्र मास आहेत (पवित्र चातुर्मास) आणि त्या काळात युध्द करणे निषिध्द आहे. कुरआनचा हा आदेश युध्दशास्त्राबाबतचा आहे. तसेच सामाजिक प्रश्नाशीसुध्दा निगडीत आहे. परंतु कुरआन यास ‘योग्य धर्म’ म्हणून संबोधते. कुरआनचे खालील दिव्य प्रकटन आहे,
‘‘वस्तुस्थिती अशी आहे की, महिन्यांची संख्या, ज्या दिवसापासून अल्लाहने पृथ्वी व आकाशांना निर्माण केले आहे, अल्लाहच्या लेखी बाराच आहेत आणि त्यापैकी चार महिने अवैध आहेत. हाच योग्य धर्म आहे.’’ (कुरआन ९:३६)
या चार महिन्यांचे पावित्र्य राखण्याचा आदेश आणि युध्दाने त्यांचे पावित्र्यभंजन न करण्याचा आदेश हे कृत्य धर्माचा एक भाग आहे आणि त्यात धर्मबाह्य असे काहीही नाही. कुरआन फक्त इस्लामचे सामाजिक कायदे आणि समाज यांना ‘धर्म’ ही संज्ञा देत नाही तर इतर धर्माच्या सामाजिक कायद्यांना आणि समाजास ‘त्यांचा धर्म’ म्हणून संबोधतो. कुरआनोक्ती आहे,
‘‘त्याचे हे काम नव्हते की बादशाहच्या धर्मात (मिस्त्रच्या शाही कायद्यात) आपल्या भावाला पकडावे.’’ (कुरआन १२: ७६)
प्रेषित युसुफ (अ.) यांना हे शक्य नव्हते की त्यांच्या बंधुना मिस्रच्या शाही कायद्याद्वारे पकडावे. याचा अर्थच हा होतो की मिस्र देशाचा कायदा किवा गुन्ह्यासंबंधीचा कायदा त्यांच्या बंधुना लागू होत नाही. कारण ते त्या देशाचे रहिवाशी नव्हते.
वरील उदाहरणे पुरेशी आहेत हे स्पष्ट करण्यासाठी की अल्लाहचा प्रत्येक आदेश आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांची प्रत्येक हदीस इस्लाम धर्माचे अविभाज्य अंग आहे. त्यांच्यापैकी एकालासुध्दा धर्मबाह्य अथवा बाहेरचे म्हणू शकत नाही. इस्लाम जर अल्लाहला पूर्ण शरण जाणे आणि अल्लाहची आज्ञाधारकता स्वीकारणे आहे तर त्याचे काही आदेशांचे पालन करावयाचे आणि इतर आदेश आज्ञाधारकतेबाहेरचे म्हणून पालन करावयाचे नाही, हे कसे शक्य आहे?
वरील विवेचनाने हेच सिध्द होते की कुरआन आणि हदीस दोघांनी मनुष्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाला तसेच मनुष्य जीवनव्यवहाराच्या प्रत्येक क्षेत्राला व्यापून टाकले आहे. आणि त्यासंबंधीचे सर्व दिव्य प्रकटने इस्लाम धर्माचा भाग आहेत. अशा परिस्थितीत आपण हे कसे सांगू शकता की इस्लाम व्यक्तिगत जीवनापुरताच आहे आणि सार्वजनिक जीवनाशी त्याचा काडीमात्र संबंध नाही?
0 Comments