– नौशाद उस्मान
जगातले ते फार मोजके युद्ध ज्यांनी जगाच्या राजकीय व सांस्कृतिक घडामोडींवर दूरगामी परिणाम झाला, त्यापैकी एक असलेले प्रेषितकालीन युद्ध म्हणजे ”बद्रचे युद्ध” जे रमजान महिन्यातच घडले होते. रमजान, रोजे आणि त्या युद्धाचा कसा संबंध आहे, ते जाणून घेण्यासाठी त्या युद्धाची माहिती घेणे आवश्यक आहे.
पार्श्वभूमी –
प्रेषित मुहम्मद सल्लम यांची चळवळ मक्केतल्या प्रस्थापितांच्या पुरोहितगिरीच्या मुळावरच उठली होती. त्यामुळे त्यांनी प्रेषित सल्लम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा छळ सुरु केला होता. मर्यादेपेक्षा जास्त छळ सुरु झाल्यामुळे शेवटी त्यांनी मदिन्याकडे स्थलांतर (हिजरत) केले. प्रेषितांच्या मक्केतील अनेक अनुयायिनींही हिजरत केली. मदिन्यात स्थायिक झाल्यानंतर तिथे त्यांनी इमान, न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्यवर आधारित एक व्यवस्था कायम केली. त्यामुळे मक्केकर मोठ्या युद्धाच्या तयारीत होते. प्रेषितांच्या अनुयायींना मात्र सुरुवातीला कुणावरही हाथ उगारण्याची परवानगी नव्हती. पण हिजरतच्या दोन वर्षांनंतर स्वतः अल्लाहने (ईश्वराने) युद्धाची परवानगी कुराणाचा हा श्लोक अवतरवून दिली –
”ज्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारण्यात आलेले आहे, त्यांना (युद्ध करण्याची ) परवानगी देण्यात येत आहे. कारण त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. अन अल्लाह त्यांना विजयी करण्यास निश्चितच समर्थ आहे. या लोकांना त्यांच्या घरातून अन्यायपूर्वक बाहेर घालविले गेले आहे. केवळ या कारणासाठी, कारण ते म्हणतात, ”आमचा पालनकर्ता (एकमेव) अल्लाह आहे.”
– कुरआन (२२: ३९-४०)
या श्लोकात संरक्षणासाठी युद्ध करण्याची त्या लोकांसाठी परवानगी दिली गेली आहे, ज्यांना घरदार सोडून लेकरांबाळांसोबत, आपल्या नातेवाईकांना सोडून देशाबाहेर विस्थापितांचे जीवन जगण्यास भाग पाडले गेले होते.
घडामोडी –
मक्केकरांनी मदिन्यावर हल्ला करण्यासाठी लागणाऱ्या हत्यारांसाठी पैसा गोळा करण्याचे ठरविले. त्यासाठी खास सत्तर व्यापाऱ्यांचा तांडा सैनिकांसह सीरियाला पाठविण्यात आला. मदिनेवर हल्ला करण्याची आर्थिक तयारी म्हणून पाठविलेला हा तांडा सीरियाहून परतत असतांना त्यांच्या सैनिकांवर हल्ला करण्याची योजना प्रेषितांनी बनवली.
प्रेषित त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बद्र या मोक्याच्या ठिकाणी निघाले. मात्र ते पोहोचण्याआधीच मक्केकरांचे आर्थिक केंद्र असलेला तो तांडा तिथून निसटला. त्या तांड्याचे नेतृत्व अबू सुफियानकडे होते. ते नंतर प्रेषितांचे अनुयायी बनले, पण या युद्धावेळी ते शत्रुपक्षाचे प्रमुख होते. त्यांना मुसलमान हल्ला करण्यासाठी येत असल्याचा सुगावा लागला आणि त्यांना कुमक पाठविण्यासाठी मक्केला निरोप पाठवला. परंतु मक्केची कुमक येण्यापूर्वीच ते माल घेऊन तांड्यासोबत मक्केकडे निघून गेले. त्यानंतर मक्केहून निघालेल्या जवळपास हजार सैनिकांची कुमक बद्र मध्ये येऊन धडकली आणि त्यांनी युद्धाचे आव्हान केले. प्रेषितांसोबत फक्त ३१३ अनुयायी होते, तरी त्यांनी अल्लाहवर विश्वास ठेऊन ते आव्हान स्वीकारले.
दि. १७ रमजान हिजरी २ (१३ मार्च ६२४) चा तो ऐतिहासिक दिवस. प्रत्यक्ष लढाईपूर्वी प्रेषितांनी अल्लाहला स्मरून नतमस्तक होऊन प्रार्थना केली.
युद्धापूर्वी प्रेषित नेहमी सैनिकांना खालीलप्रमाणे काही सूचना करत असत –
१) महिला व लहान लेकरांना मारू नका (संदर्भ: मुस्लिम शरीफ)
२) वृद्ध लोकांना आणि गुहेत असणाऱ्या भिक्कूना मारू नका. (संदर्भ: बैहिकी शरीफ, नायलूल औतार)
३) मजूर, कामगारांना ठार मारू नका (संदर्भ: अहमद शरीफ )
४) अपंग, दिन दुबळ्या लोकांना मारू नका (संदर्भ: अल – मुगनी )
५) शत्रूंच्या प्रेतांची विटंबना करू नका (संदर्भ: मुस्लिम शरीफ)
६) शरण आलेल्यांना ठार मारू नका (संदर्भ: कुरआन – ९:५ )
७) युद्धकैद्यांना खाऊ पिऊ घाला (संदर्भ: कुरआन – ७६:८)
८) युद्धभूमीवरील झाडे, पिके विनाकारण उद्ध्वस्त करू नका, तेथील गुरं, ढोरं, जनावरांना विनाकारण इजा करू नका (संदर्भ: आलं-मुवत्ता)
९) धर्मात कोणतीही जोरजबरदस्ती नाही. (संदर्भ: कुरआन २:२५६)
घोर युद्ध झाले. प्रेषितांचे हबशी (आफ्रिकन आदिवासी) असलेले सेवक आदरणीय बिलाल यांनी त्यांचा पूर्वाश्रमीचा अत्याचारी मालक उमैय्याला भाला फेकून ठार केले. शत्रूकडचे ७० ठार झाले, ज्यात शत्रूचा म्होरक्या अबू जहलही मारला गेला, तर प्रेषितांकडचे फक्त १४ जन शहिद झाले. प्रेषितांच्या अनुयायींना अल्लाहची मदत लाभली. म्हणूनच शत्रूचे जवळपास तिप्पट सैनिक असूनही इमानवंतांचा विजय झाला.
बोध –
अल्लाहवर विश्वास ठेऊन कोणतेही आव्हान स्वीकारले आणि युद्धसदृश्य परिस्थितीतही संयम आणि नैतिकता सोडली नाही तर विजय हमखास आपलाच असतो. मग रमजानच्या रोजा ठेवणाऱ्या सैनिकांनाही अल्लाह बळ पुरवितो. एकांतातही पाणी न पिणाऱ्या रोजाधारकाला अल्लाहच्या अस्तित्वावर, त्याच्या प्रभुत्वावर विश्वास असतो, हा विश्वास वृद्धिंगत करणे, हा तर रोजचा उद्देश आहे. तसेच आळस सोडून सामाजिक चळवळीत युद्ध पातळीवर कार्य करण्यासाठी चपळ बनविणेही याचा उद्देश आहे. सध्या फक्त सोशल मीडियावरच सक्रिय असणाऱ्या चळवळींनी या रामजाननिमित्त तरी आभासी विश्वातून थोडेसे बाजूला होऊन वास्तविकतेच्या जमिनीवर सक्रिय व्हावे हीच अपेक्षा!
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)
0 Comments